समीहन लोहित…मुक्तांगण सदस्य
समीहन म्हणजे सर्वांचं लक्ष वेधुन घेणारं व्यक्तीमत्त्व. आपल्याच गुंगीत असणारा, जगाची फिकीर न करणारा आणि त्याला पाहिजे तसे करण्याचा सदा प्रयत्न करणारा. आपल्या आजूबाजूच्या लोकांचा, मित्रांचा स्वभाव कसा आहे याविषयी त्याला चांगली जाण होती .त्याला जे काही अपेक्षित आहे किंवा हवे आहे ते तो मिळवायचा प्रयत्न करत असे. आई, बाबा आणि बहीण घरातील लोकां

विषयी तर त्याचा अभ्यास चांगलाच होता.इतर मुलांच्या तुलनेत तो अंगापिंडाणे मोठा वाटत असे. वाचनाची त्याला आवड होती .खाण्या विषयी मात्र त्याच्या शिबिरा दरम्यान कधोही तक्रारी नसत.
त्याचे सहसा कुणाशी जास्त पटत नसे.एक तर त्याच्या विचाराशी कोण जुळवुन घेऊ शकत नसे. दुसरी गोष्ट म्हणजे हा कुठल्या वेळी काय करेल याचा नेम नसे. वर्षातुन एकदा तरी याचा हात किंवा पाय जायबंदी असायचा. किरकोळ लागणे वैगेरे हे महिन्यातून दोन तीन वेळा असायचेच.तो कुठून उड्या मारेल याची खात्री नसल्याने घरातले सुध्दा थोडे काळजीत असत. मैदानावर, स्विमिंग पूलवर हा मित्रांच्या बऱ्याचवेळा खोड्या करायचा. त्यामुळे मुलांशी त्याचे जुळवुन घेणे अवघड होते.मी सुध्दा स्विमिंग पुलवर त्याला एक दोनदा खोड्या करताना पाहिले होते. काही पालकांची तशी तक्रार पण असे.अनेकदा तो घरी बऱ्याच गोष्टी सांगायचा नाही. काही वर्षे नाना-नानी पार्क मध्ये मुक्तांगण उपक्रम चालत असत. त्यावेळी उपक्रमाच्या शेवटी खोखो सारखे मैदानी खेळ आम्ही पार्किंग लॉट वर घ्यायचो.पण खाली माती नसल्याने बऱ्याचदा मुले घसरली की जखम होत असे. एकदा असाच समीहन घसरून पडला.रक्त येत होते , मला बघताना कसेतरी वाटत होते.पण याच्या चेहऱ्यावरची रेष हलली नव्हती.तो म्हणजे काही न झाल्यासारखे निवांत उभा होता.इतर मुलांनी मात्र रडून गोंधळ घातला असता..उमेश जाधव त्यावेळी ग्रुप मध्ये होता. त्याने आणि इतर दोन तीन मुलांनी मेडिकल सेंटर मध्ये त्याला नेले आणि त्याला मलमपट्टी बांधून आणले. खरंतर हा पठ्या अगोदर समीहन दवाखान्यात जायला सुध्दा तयार नव्हता.तो परत येई पर्यंत बाकी मुलांचे खेळ मी घेत बसलो होतो. मेडिकल सेंटर समोरच असल्याने पंधरा वीस मिनिटात ते सर्वजण परत आले.कार्यक्रम संपल्यावर मी समीहनला घरी व्यवस्थीत जायला सांगितले. दुसऱ्या दिवशी जितेंद्र लोहित मला भेटला त्याला समीहनच्या पायाच्या जखमेविषयी विचारले.तो म्हणाला याबाबतीत त्याला किंवा घरातील कुणालाही माहिती नाही.तशी जखम बऱ्यापैकी होती. रक्त सुध्दा आले होते.पण त्याने घरी थांगपत्ताही लागु दिला नव्हता.तर असा हा करामती.
पण त्याचे हे वागणे म्हणजे जाणूनबुजून केलेले कारनामे नसायचे.त्याच्या वागण्यातुन कळत नकळत या गोष्टी घडून जात असत.तो नेहमी एका विशिष्ट विचारात गढलेला असायचा. रविवारचा कार्यक्रम चालु असताना तर बऱ्याच वेळा याचे काहीतरी वेगळे चाललेले असायचे. नेहमीच कुठल्यातरी धुंदीत असायचा.रविवारच्या उपक्रमात सुरवातीला मुले बातम्या सांगत.त्यावर नंतर दहा पंधरा मिनिटे चर्चा होत असे.ज्यावेळी मुले आठवड्याच्या बातम्या सांगत असत त्यावेळी हा इकडे तिकडे बघत गालात गालात मिश्किल डोळे बारीक करून हसत असायचा. मग त्याला मुद्दाम विचारले की सांगरे कुणी काय काय बातम्या सांगितल्या.पण अजब… हा पठ्या सर्व बातम्या लगेच सांगायचा. त्याचे कान एकीकडे ऐकत असायचे आणि सोबत खोड्या एकीकडे चालूच. एखादा विषय चर्चेला दिला तर हा खूप चांगली चर्चा करत असे. त्याचे वर्तमानपत्राचे नियमित वाचन असायचे. त्यामुळे कोणत्याही करंट अफेअर वर तो व्यवस्थीत बोलत असे . त्याची ग्रासपींग पॉवर देखील खूप चांगली होती.

एकदा त्याला छोटया मोटरचा उपयोग करून काहीतरी प्रयोग करायचा होता.त्याच्या डोक्यात चक्र चालु होते. बॅटरी वर चालणारी छोटी मोटर नागोठणे येथील एका दुकानात मिळत असे.घरी त्यासाठी बाबांना विचारले.त्याच्या वडिलांनी त्याला मोटर आणुन दिली.त्याच्या दुसऱ्या दिवशी जितेंद्र लोहित मला कंपनीत कॅन्टीन मध्ये सकाळीच भेटला. त्याने आपले मला सहज विचारले अरे सद्या काय मुलांकडून तुम्ही प्रोजेक्ट करुन घेत आहात काय? मला जरा शंका आली कारण तसे ते दिवस विज्ञान प्रदर्शनाचे नव्हते .मला समीहनच्या खोड्यांचा अंदाज होता त्यामुळे मी त्याला असेच हो म्हणालो.मग त्याने सांगितले अरे काल समिहनने एक छोटी मोटर आणायला सांगितली होती आणि तू प्रोजेक्ट दिला आहेस असे बोलत होता.मी त्याला अगोदरच हो बोललो ते बरे झाले. नंतर संध्याकाळी तो मला भेटला. त्याला मी विचारले अरे मला अगोदर का नाही सांगितलेस मोटर बद्दल. त्याने उत्तर दिले की असे मला सहज बाबांनी मोटर आणुन दिली नसती आणि मला खात्री होती की तुमचे नाव सांगितल्यावर मिळणार. वर तो हेही म्हणाला की मला निश्चित माहिती होती तुम्ही बाबांना सांगणार की प्रोजेक्ट साठी लागणार आहे म्हणुन.मी तर एकदम चाट पडलो. त्याचे डोके असे सुपरफास्ट चालत असे.
तो रविवारचा उपक्रम कधी सोडत नसे. त्यावेळी असा नियम होता की जो जास्त आठवड्याचे कार्यक्रम करेल त्याला शिबिराला पहिली पसंती. शिबिराच्या अगोदर एक पालकांची मीटिंग होत असे त्यात काही पालक विनंती करायचे या पोराला घेऊ नका.पण मला पर्याय नसायचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे समीहन हे मला एक आव्हान असायचे की याला तीन दिवस सांभाळून दाखव.तसा तो जरी खोडकर असला तरी मला तो खुप आवडत असे कारण त्याच्याकडे जेव्हढे काही नावडते गुण होते त्यापेक्षा त्याच्याकडे कितीतरी चांगल्या गोष्टी होत्या.त्याच्याकडे जी बेधडक गोष्टी करण्याची धमक होती ती इतर कोणत्याही मुलांमध्ये नव्हती . फक्त भीती एव्हढीच असायची की तो कोणती गोष्ट बेधडक करेल याची.
शिबिराच्या ठिकाणी त्याला वेगळया प्रकारे हॅण्डल करावे लागे.अशा मुलांना ग्रुप मध्ये विशेष किंमत नसते.आणि त्यामुळे काहीवेळा त्याला टार्गेट सुध्दा केले जायचे.पण असे प्रसंग कमी घडत.अगदी नव्वद टक्के तक्रारीत याचीच चुक असायची.पण त्या दहा टक्के प्रकारात मागच्या अनुभवानुसार त्यालाच बोलणी खावी लागत.तो मग 'कानफट्या’ प्रकारात मोडला जात असे. शिबिराला शक्यतो त्याला मी मीटिंगला बोलावत नसे .मग त्याची आई किंवा बाबा त्याला घेऊन जा असे मला सांगायला हमखास यायचे. शिबिराच्या नावाखाली त्याच्याकडून बऱ्याच चांगल्या ते गोष्टी करुन घेत. त्याला सक्त ताकीद असायची शिबिरातील कपडे घरी येऊन धुतले जाणार नाहीत , ते तिकडूनच धुवून आणायचे. शिबिरात नियमांचे पालन करायचे वगैरे वगैरे.हा मात्र सगळ्या गोष्टी मान्य करून शिबिरात यायचाच.त्याला सगळे जण खेळायला घेत असत पण थोडे त्याच्याशी फटकून वागत असत. त्यामुळे त्याला अशी इच्छा असायची की यांना मला ऑर्डर्स देता येतील का? मला त्याची कल्पना होती. त्यामुळे शिबिराच्या सुरवातीला ज्यावेळी कॅम्प लीडर निवडला जायचा त्यावेळी त्याची मी उपनेता म्हणून निवड करायचो. इतर मुलांना कुणालाही ही गोष्ट आवडत नसे.ज्यावेळी मी त्याने करावयाची कामे सांगत असे त्यावेळी मात्र मुले मनातल्या मनात खुश होत असत. त्याची कामे अशा प्रकारची असायची,कुठंही बाहेर निघताना सर्वात शेवटी निघायचे, निघताना रूम चेक करून निघायचे ,मुलांना पुर्ण कार्यक्रमाच्या सूचना द्यायच्या,जर कुणाला लागले तर त्याच्यावर प्रथमोपचार त्यानेच करायचा, प्रत्येक ग्रूप आपापली कामे कशी करत आहेत याची माहिती कॅम्प लीडरला द्यायची.एव्हढी कामे दिल्यावर त्याला खोड्या करायला वेळच मिळायचा नाही. पण मुलांना ऑर्डर्स द्यायला एव्हढा उत्साह असायचा की बोलायची सोय नाही. मंदार कांदळगावकर, निसर्ग देशमुख, अमेय वाघमारे यांच्याशी त्याचे अजिबात पटत नसे. त्यांना तो सूचना द्यायला उभा राहिला की त्यांना राग येत असे कारण हा त्यांच्याकडे बघुन मिश्किल हसत असे. त्यांना वाटायचे हा मुद्दाम हसतो.पण ती त्याची एक नेहमीची स्टाईल होती.मात्र सर्वात जास्त त्रास होत असे तो कॅम्प लीडरला म्हणजे वरद जोशी, तन्वी सावंत, विक्रांत मोटे , शंतनु राणे या सर्वांना.त्याला सतत स्वतः बरोबर ठेवावे लागे. .मला तर डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावे लागे.रात्री तर बऱ्याच वेळा उठून सर्वांना बघावे लागे आणि विशेष करुन समीहनला पहावे लागे. त्याचा कारण नेम नसायचा हा रात्री उठून पण जायची शक्यता असायची.

एकदा सुधागड कॅम्पच्यावेळी मुले गावात मुलाखती घ्यायला गेली होती. मीही त्यांच्यासोबत फिरत होतो.फिरत असताना बघतो तर काय हा पठ्या एके ठिकाणी जेवत बसला होता.तो काय करेल याचा नेम नसायचा. एकदा पेडली कॅम्प दरम्यान माझ्याकडे एक छोटी कोंबडी घेऊन आला आणि त्याने विचारले की हिची मुंडी गोल फिरवून बघितली तर काय होईल, तिची हाडे मोडतील काय?. मी त्याला समजावले असे केलेस तर ती कोंबडी मरू शकते. मग त्याने कोंबडी सोडुन दिली. तिसऱ्या दिवशी कॅम्प संपल्यावर आवराआवर करताना मी कुठे काय वस्तू राहिल्या काय हे बघत होतो माझे सहज लक्ष त्या घराच्या पाठी गेले तिथे एक कोंबडी मरून पडली होती.हा पराक्रम त्याचाच असणार हे मला समजले पण आता शिबीर संपल्यामुळे काहीही गोंगाट न करता आवरते घेतले.
खांब जवळील चिले या गावात एक शिबीर होते . यात विविध विज्ञान प्रयोगांचे प्रदर्शन, सोप्या भाषेत वेगवेगळे विषय कसे शिकवता येतील यावर चार्ट तयार करणे,यात अगदी केजी वर्गापासूनचे चार्ट केले होते. मुलांनी खुप मेहनत घेतली होती. प्रदर्शन बघण्यास सर्व गावातील लोकांना निमंत्रित केले होते. सारिका शेट्ये, अंकिता मुसळे, समीहन, श्रिया सातगोंडा यांनी छान प्रेझेंटेशन केले होते. समीहनने इलेक्ट्रिसिटीचा सिरीज सर्किटचा प्रयोग केला होता.लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची छान उत्तरे देत होता.ज्या दिवशी शिबीर होते त्यात दोन दिवस गावात हनुमान जन्मोत्सव सोहळा होता. गावातील सर्व भाविक देवळात जमले होते.त्या शिबिराच्या वेळी मुले देवळात आणि मुली मुख्याध्यापक खांडेकर यांच्या घरी मुक्कामी होत्या. रात्री बारा वाजता जन्मोत्सव कार्यक्रम होता.मंदीरात भजन चालू होते.एक पाळणा ठेवला होता. सर्वजण फेर धरून नाचत होते.मग काय इथे सुध्दा समीहन त्या टाळकऱ्याच्यात कधी सामील झाला कळाले नाही. त्याला त्याची कधी फिकीर नसायची की मला कुणी हसेल, चिडवेल. बिन्धास्त एन्जॉय करायचे.रात्री पालखी निघाली त्यावेळी आमचा कॅम्प फायर उपक्रम चालला होता. पालखी येताच आम्ही सर्वजण ती बघण्यास गेलो. तिथेही काहींना नाचण्याची हुक्की आली त्यात समीहन होताच पण उगीच दुसऱ्यांच्या गावात काही उद्योग नकोत त्यामुळे मुलांना लांबूनच बघा असे सांगितले. बऱ्याचदा पालखीत भानगडी होतात. त्यांना आपल्या मुलांचे नाचणे आवडले नाही तर उगीच प्रॉब्लेम नको त्यामुळे मुलांना आवरते घेतले .दुसऱ्या दिवशी सकाळी देवाची पूजा करण्यास काही पुरुष आणि स्त्री मंडळी येत होती त्यांच्या पुढे ताशा वाजवणारे होते. त्या तालात काही बायका घुमत येत होत्या. आम्ही सर्वजण ते पाहण्यास देवळाच्या बाहेर आलो.त्या सर्वांच्या मागे एक मुलगा नाचताना दिसत होता.तो जसे त्या बायका घुमत चालल्या होत्या अगदी हिबेहुब नाचत होता.पण नीट बघितले तर तो समीहन होता.मी जरा घाबरलो. गावातल्या लोकांना उगीच टिंगल करतोय असे वाटेल यामुळे जरा भीती वाटली .पण खरंतर तो एवढा रममाण झाला होता की बोलण्याची सोय नाही. मंदीर जवळ असल्याने तो तिथे आल्यावर त्याला ओढुन घेतला. त्याला मात्र त्याचे काहीही सोयरसुतक नव्हते.त्या प्रसंगात मात्र काय करावे मला सुचत नव्हते.वेळीच त्याला ओढून घेतल्यामुळे बरे झाले नाहीतर उगीच गावातील लोकांचा गैरसमज झाला असता.याच शिबिरात आम्ही एका जंगलात गेलो तेंव्हा एका ठिकाणी मोठा खड्डा होता. तिथे जमिनीतील मातीचे विविध थर दिसत होते.त्याविषयी समिहनने खूप सुंदर माहिती सांगितली होती.त्याचे अवांतर वाचन आणि क्रमिक पुस्तक वाचन चांगले असल्याने त्याच्या बोलण्यात एक आत्मविश्वास असायचा.पण त्याच्या या गुणांकडे लोकांचे लक्ष जात नसे.

खांब शिबिरात याला नेहमी प्रमाणे उपनेता केले होते.हा प्रामाणिक पणे सर्व गोष्टी करत होता.पण याला काही गप्प बसवत नव्हते. मध्येच कधीतरी तो शर्वरी मोडक, प्रणाली रोडे यांच्या डोक्यात टपल्या मारत होता. त्या मुली माझ्याकडे तक्रार घेउन आल्या. समीहन तसा वयाच्या मानाने मोठा दिसायचा.उंच आणि आडवा असल्याने त्याला सर्वजण दबकत असत.मुलींना सांगितले तुमचा ग्रूप पाच सहा जणींचा आहे,त्यात ऐश्वर्या घोलप आहे आणि समिधा गांधी, शर्वरी मोडक, प्रणाली रोडे, श्रिया सातगोंडा आहेत. त्याने जर आता खोड काढली तर त्याला जरा ठोका त्याची कणीक जरा तिंबा असे सुचवले .ऐश्वर्या घोलप त्यांच्यात बऱ्यापैकी समीहनला थोपवून धरू शकते अशी होती. तिला सांगितले त्याचे फक्त तू तोंड पकड आणि बाकीच्यांनी पाठीत धबाके मारा.मग तासाभराने माझ्याकडे समीहन मुलींची तक्रार घेऊन आला.मी त्याला विचारले तू काय केलेस त्याने सांगितले मी त्यांना टपल्या मारल्या मग त्यासाठी एव्हढे मारतात काय?.मी त्याला सांगितले तू कॅम्पचा लीडर आहेस तू असे वागले नाही पाहिजे पण त्या मुलींचे काही चुकले नाही परत अशी चूक करू नकोस नाही तर अजून मार पडेल.मग तो निघुन गेला पण लगेच विसरला सुध्दा कारण काही तासांनंतर आम्ही कोलाड धरणावर गेलो असता नदी मध्ये उतरतांना समिधा गांधीच्या पायाला जखम झाली. माझ्या सोबत बॅगेत औषधे, कापुस होता. समीहनने लगेच बॅग घेतली. तिच्या पायाची जखम डेटॉलने स्वच्छ करून, औषध लाऊन पट्टी बांधली.तासभरा अगोदरचे घडलेले तो विसरून गेला आणि लीडरचे काम लगेच केले. त्याला अशा गोष्टी आवडायच्या.या कँपच्या तिसऱ्या दिवशी आम्ही रमेश ढोणे यांचे कोलाड येथील प्रदर्शन बघण्यास गेलो होतो. समीहनला फोटो काढून घेण्याची फार हौस होती त्यामुळे प्रत्येक शिबिरातील त्याचे फोटो बरेच आहेत.त्याला त्या प्रदर्शनात एक लाकडी पुतळा दिसला तो होता एअर इंडियाचा लोगो महाराजा याचा. त्याची पोझ बघुन हा खूप खुश झाला. त्याने रत्नाकर ठाकूरला त्याचा फोटो काढायला सांगितले.त्याने सुध्दा अटी टाकल्या तुझे फोटो काढतो पण समोर एक नारळाचे झाड आहे त्यावर चढण्याचा प्रयत्न कर आणि नंतर त्या एअर इंडियाच्या महाराजाची नक्कल करत तसेच उभे राहायचे.त्याने दोन्ही अटी स्वीकारल्या. माडाच्या झाडावर चढण्याचा प्रयत्न केला आणि झाड फार मोठे नसल्याने तो बऱ्यापैकी वर चढला.मग महाराजाची पोझ पाच सहा वेळा घेतली. ठाकूरने सुध्दा त्याला खूप तंगवले कारण त्यावेळी डिजिटल कॅमेरा नव्हता त्यामुळे फोटो नेमकेच काढावे लागत. आतासारखे दहा दहा स्नॅप एका ठिकाणी मारता येत नसत.मग शेवटी त्याचे दोन फोटो काढले.पण त्याने हुबेहूब महाराजा दिसण्याचा प्रयत्न केला होता. नेहमी प्रमाणेच मिश्किल हास्य करत छान पोझ दिली होती.

समीहनने कधीही पावसाळी सहली, शिबिरे ,प्रकल्प भेटी, मुलाखती सोडल्या नाहीत. नेहमी त्याचा पुढाकार असे. भलेही त्याचे कुणाशी पटत नसे पण उपक्रमांना हजेरी असायचीच.प्रत्येक ठिकाणी काहीतरी आठवणी मात्र ठेऊन जात असे.तो सातवी आठवीत असताना त्याचे बाबा गल्फला शिफ्ट झाले. त्यामुळे तो तिकडेच गेला.त्याने त्याचे शैक्षणिक करीयर चांगले केले.पुढील आयुष्यात देखील तो खूप प्रगती करेल.पण एव्हढे मात्र निश्चित जिथे जाईल तिथे त्याचे वेगळेपण मात्र नक्की दिसेल. त्याच्यातल्या गुढ अशा गुणांना वाव मिळाला तर तो खूप चांगले करू शकेल.मुक्तांगण ग्रुपला मात्र तो कायम स्मरणात राहील आणि आमचे डोळे कायम नवीन समीहन, विक्रांत, विजय, शंतनु, सुमित…यांच्या शोधात राहतील..
Sanjay Gole.
_edited_edited_edited.jpg)
Comments