तन्वी सावंत (तनु)…. मुक्तांगण सदस्य
तनु म्हणजे आमचा टॉम बॉय.एकदम रोखठोक आणि बिनधास्त्त व्यक्तिमत्त्व.आई बाबांची एकुलती एक जरी असली तरी आईची कुठेही कुठल्याही बाबतीत सूट नसायची. आई एकदम शिस्तप्रिय असल्याने कुठेही अति लाडकोड नाही. एकटी आहे म्हणून कोणतीही वेगळी ट्रीटमेंट तिला नसे. तिच्या बाबांची मात्र लाडकी.बाबा मात्र याबाबतीत नेहमी लाईटली घेत. परंतु ते तिच्या आईच्या निर्णयात हस्तक्षेप करत नसत. बँकेचे कर्मचारी असल्याने व्यवहारातील शिस्तप्रियपणा मात्र त्यांनी तनुला शिकवला.त्याचा फायदा तिला पुढच्या काळात खुप झाला. पहिल्यापासून पेहराव मात्र बऱ्याचदा मुलांसारखाच असायचा. तिला ते शोभुन दिसायचे. मुक्तांगणच्या सुरवातीच्या काळात तिची आई अंजली सावंत आमच्या ग्रुपच्या महत्वाच्या भूमिकेत होती.सर्व मीटिंग तिच्याच घरी व्हायच्या.शेजारी साधना गोसावी रहात असल्याने दोन मेंबर मीटिंगला हजर असायचेच.मुक्तांगणच्या सुरवाती पासुनचा काळ तिने जवळुन पाहिला होता. आपोआपच आमच्या ग्रुप बरोबर तिचे टियूनिंग छान जमायचे. उपक्रम असो वा शिबीर घरचाच कार्यक्रम असल्यासारखे त्यामुळे या सर्व ठिकाणी यायचे ठरलेले असायचे. साधना गोसावी यांच्या मुली करुणा आणि तेजस्विनी या सोबत असायच्या.तसा तिचा ग्रुप मोठा होता . शिल्पा वंजारी,आफरीन पठाण, भक्ती दिवेकर,गौरी नगरकर, ज्युली पवार अशा बऱ्याच मुली तिच्या गटात होत्या पण मुक्तांगण कार्यक्रमाला मात्र शिल्पा वंजारी तिच्यासोबत नेहमी यायची.उपक्रम घरातूनच सुरू झाल्याने आपोआपच नेतृत्व गुण तयार होऊ लागले. शिल्पा आणि तनु प्रत्येक महिन्यात काही ना काही नवीन करत असणारच.कधी डान्स स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा, एक पात्री अभिनय स्पर्धा या ठिकाणी सहभागी होणे हे सारखे चालुच असायचे. त्यामुळे त्यांच्याशी याबद्दल चर्चा आणि नियोजन आलेच.पण साधना गोसावी आणि अंजली यांची मात्र खूप मेहनत असायची कुठूनही साहित्य, ड्रेपरी, पुस्तके गोळा करण्याची तयारी असायची. आपला वेळ आणि पैसा खर्च करण्याची तयारी असायची.रविवारच्या कार्यक्रमात याविषयी चर्चासत्र होत असत. त्यावेळी सुमित गायकवाड, स्वप्नील बर्गोले, प्रशांत जाधव, प्रणव अवताडे असा एक मुलांचा ग्रुप होता ज्यांच्याशी तनुचे चांगले जमत असे.ती त्यांचे नेतृत्व करत असे. वेगवेगळ्या वयाची मुले असल्याने बऱ्याचदा मोठया मुलांकडून तयारीला मदत होत असे.यात तनु अग्रेसर असायची.
शिबिराला तर ती अगदी दुसरी तिसरी पासुन येत होती. आम्ही त्यावेळी सहकुटुंब सहपरिवार शिबिरात तिन्ही दिवस असायचो. अगदी सुरवातीला म्हणजे १९९७ आणि १९९८ या वर्षात मी बॅचलर असल्याने एकटा असायचो नंतर मात्र आम्ही सर्वजण असायचो.पण तनुची आमची गट्टी तेंव्हापासून होती. माझ्या लग्नानंतर मात्र नंदाशी तिचे आणि शिल्पाचे अगदी चांगलेच जमत असे.त्या दोघींच्या आया नोकरीला जायच्या मग या दोघी अगदी तासभर तरी आमच्या घरी येत असत.माझी भाची निशा त्यावेळी नागोठ्ण्याच्या कॉलेज मध्ये शिकत होती. त्यामुळे त्यांची छान मैफिल जमत असे.माझे वडील आणि नंदाचे वडील हे कधी कधी नागोठ्ण्याला येत असत.त्यांच्याशी सुध्दा या दोघींचा चांगला संवाद असायचा. अगदी ते आजोबा पण शिल्पा आणि तनु यांनी वाटून घेतले होते. माझे वडील म्हणजे शिल्पाचे आजोबा आणि नंदाचे वडील म्हणजे तनुचे आजोबा.
तनु तशी तिच्या वयानुसार इतरांपेक्षा मोठी दिसायची. कराटे हा खेळ ती अगदी केजीत असल्यापासून खेळत असे.स्विमिंगला नियमित जात असल्याने तिची फिटनेस चांगली असायची. त्यामुळे कुठल्याही किल्ल्यावरचे ट्रेकिंग असो किंवा सायकलिंग ट्रीप असो ही लहान वयात ती लीलया पार करत असे.ती तिसरीत असताना सर्वांच्या बरोबर तिने बावीस किलोमीटर सायकल चालवली होती.पाहिलीत असताना सुधागड किल्ला सर केला होता.पण एकटी मुलगी म्हणुन आईने कधीही आडकाठी आणली नाही. आतापर्यंत तनु आणि विक्रांत दोघांनी सर्वात जास्त शिबिर अटेंड केली आहेत.त्यावेळी स्विमिंग या खेळात असणारी कॉलनीतील मुले मोरा ते गेटवे हे १४ किलोमीटर अंतर पोहुन पार करत असत. दर वर्षी हा उपक्रम कंपनी राबवत असे.त्यासाठी मुले सहा महिने पूल वर प्रॅक्टिस करत असत. पालक आणि मुले खूप मेहनत घेत असत. सकाळी पाच ते सात आणि रात्री सात ते आठ या दरम्यान दररोज सराव होत असे. काही वेळा समुद्रात जाऊन प्रॅक्टिस करत असत. एके वर्षी मुक्तांगणचे चार पाच मेंबर यात सहभागी होते.त्यात तनु, पृथ्वीराज चव्हाण, पद्मसिंह चव्हाण, नेवसे होते. प्रत्येक मुलाबरोबर एक बोट दिली जायची .तो स्पर्धक बोटीच्या मार्गदर्शनात पुढे जायचा.जर काही अडचण आली तर तर बोटीवर एक प्रशिक्षित व्यक्ती लाईफगार्ड म्हणून असायचा. मुलांना प्रोत्सहन देण्यासाठी एक व्यक्ती बोटीत असायचा. प्रमोद चव्हाण यांनी मला पदमा सोबत राहायला सांगितले. त्यांनी मला सांगितले तुम्ही माझ्यापेक्षा ज्यास्त चांगले त्याला प्रेरित करू शकता. त्याचवेळी तनु सुध्दा या उपक्रमात होती. आदल्या दिवशीच रात्री आम्ही ONGC च्या गेस्ट हाऊस मध्ये गेलो होतो. सकाळी पाच वाजता मुले समुद्रात उड्या मारणार होते. त्यामुळे सर्वांना चार वाजता उठून तयारी करायची होती.रात्री सर्वजण लवकरच झोपले.सकाळी उठून मोरा जेटीवर गेलो.सर्व मुले ओळीने उभी राहिली.बाहेर काळाकुट्ट अंधार पसरला होता. समुद्राच्या लाटांचा आवाज येत होता. मुले उड्या मारणार एवढ्यात तनुने सांगितले मी उडी मारणार नाही. सर्वजण समजावू लागले.पण वेळ थोडा होता कारण सुमद्रात वेळ महत्वाची असते. भरती ओहोटी याचे गणित बघुन स्पर्धा ठरविलेली असायची.मी सुध्दा समजवायचा प्रयत्न केला पण तिच्या मनात भीती निर्माण झाली आणि तिने नकार दिला.मग तिला एका बोटीवर पाठवले.मी पदमाच्या बोटीत असल्याने मला पुढचे काय घडत होते ते तेंव्हा कळाले नाही.पण नंतर समजले की तिनेही दहा किलोमीटर अंतर पार केले.पण ती स्पर्धक म्हणून गणली गेली नाही. तिला अजूनही याबाबत वाईट वाटते. त्याचे कारण म्हणजे समुद्रातील हे पोहणे म्हणजे एक वेगळा अनुभव असतो पाण्याचे बदलणारे प्रवाह, मोठया बोटींचे कर्णकर्कश आवाज, त्याच्यामुळे उठणाऱ्या लाठा, पुढे दिसणारे मुंबईचे अप्रतिम सौंदर्य, दिमाखाने उभे असलेले ताज हॉटेल, गेटवे , रामदास बोट बुडाली तो करंजा पॉइंट अशा कितीतरी गोष्टी अनुभवता येऊ शकतात. याला काही प्रमाणात आपण मूकलो असे तिला नंतर वाटले.खरेतर त्या दिवशी तिच्या पेक्षा कमी चांगले पोहणारे आरामात ते अंतर पार करून गेले आणि ते सर्व तिच्या डोळ्यासमोर झाले.पण तिला एक छान धडा मिळाला. मलाही थोडे वाईट वाटले की त्यावेळी तिचे मन वळवू शकलो नाही.पण एक चांगली गोष्ट झाली ती म्हणजे तिने थोडा वेळ का होईना समुद्रात उडी मात्र टाकली.
एकदा शाळेने विज्ञान प्रदर्शन आयोजित केले होते. त्यातील निवडक प्रकल्प जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पाठविनार होते.त्यात दोन स्तर होते .राष्ट्रीय विज्ञान परिषद मुंबई विभागातर्फे राज्यस्तरीय आयोजित स्पर्धा केली होती. त्यातील जिल्हा लेव्हलची स्पर्धा पनवेल येथे होती.विषय दिलेले होते.पण एक प्रॉब्लेम असा होता की विज्ञान प्रदर्शन म्हंटले की ते जादूच्या प्रयोगा सारखे असावेत असा त्यावेळी अट्टाहास असायचा.त्यात इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरून केलेले प्रयोग, टाळी वाजवावी की लाईट पेटली, यंत्र चालू बंद होणेम्हणजे कसेही करून ते लाईव्ह दिसले पाहिजे आणि निवडक मुले जी पोपटपंची करून विषय मांडू शकतात अशांना प्राधान्य असायचे.एखाद्या गोष्टीचा सर्व्हे करून महिती जमा करणे, काहीतरी वेगळा अभ्यास करून त्याची माहिती,विविध स्तरावरच्या नोंदी करून प्रकल्प तयार करणे याला किंवा अशा विचाराला कचऱ्याची पेटी दाखवली जायची. कदाचित नियम तसे असावेत.त्यावेळी मुक्तांगणच्या रविवारच्या कार्यक्रमात या शिबिरासाठी कोणकोणते प्रकल्प करता येतील यावर चर्चा झाली.मग तसे मुलांचे ग्रुप बनवले. तनु- शिल्पा, विक्रांत मोटे,प्रणव अवताडे, प्रशांत जाधव,सुमित गायकवाड अशा बऱ्याच जणांना वेगवेगळे उपक्रम दिले.त्यात तनु- शिल्पा यांनी टिश्यू कल्चर विषयावर प्रोजेक्ट करायचे ठरवले.त्यांनी माहिती गोळा केली.नंतर विक्रांतला एक प्रकल्प सुचवला आणि आम्ही सर्वांनी त्यावर चर्चासुध्दा केली. सह्याद्रीच्या बऱ्याच डोंगर भागातून पावसाचे पाणी वाहून समुद्रात जाते ते डोंगराळ भागात असलेली पाणी आपल्याला टनेल, पंपिंग या माध्यमातुन वळवता येईल काय याचा एक प्रोजेक्ट करता येईल काय? मग थोडी माहिती तयार केली. विक्रांतने मग थोडी माहिती जमा केली.काही पुस्तके आणि नकाशे त्याने वाचले .एका ग्रुपने आयुर्वेदिक चूर्ण हा विषय घेऊया असे ठरवले. बरेच प्रकल्प मुलांनी तयार करायला सुरवात केली.पण ज्यावेळी ही मुले प्रकल्प विषय सांगायला गेली त्यावेळी एक दोन विषय सोडता सर्व प्रोजेक्टला कचरा कुंडी दाखवली. मुले जरा त्रासली.पण त्यांना समजावले की आपले विषय कदाचीत त्यांना पटले नसतील तेंव्हा परत कधीतरी प्रयत्न करू .पण त्यावेळी तनु म्हणाली की आपण जिल्लास्तरिय प्रदर्शन बघायला जायचे, तिथे खरंच सर्व प्रकल्प लाईव्ह असे आहे का ते पहायचे. आपल्यातील एक प्रोजेक्ट जो निवडला आहे प्रणव अवताडे आणि प्रशांत जाधव त्यांच्यासाठी तरी जायचे आणि तो नक्कीच प्रकल्प जाऊन बघायचा. पनवेल येथे जाण्या अगोदर रवीवारी त्या मुलांकडून प्रश्न उत्तरांची तयारी करून घेतली होती .त्या दोघांना प्रोत्साहन द्यायला जायचे असे ठरले.मग प्रदर्शनास मी आणि तनु तिच्या कारने पनवेल येथे गेलो. आमच्या सोबत तिची आई ,बाबा नव्हते. तिच्या आईने एक ड्राइव्हर सोबत पाठवला होता. पनवेल येथे CKT कॉलेज मध्ये प्रदर्शन होते. आपल्याच कॉलनीतील पूर्वी राहणाऱ्या पवार मॅडम तिथे शाळेत शिकवतात . त्यांना भेटलो.मग त्यांच्याकडून प्रदर्शन बघण्याची परवानगी घेतली कारण त्या दिवशी फक्त सहभागी मुले ,शिक्षक आणि परीक्षक यांनाच परवानगी होती. मी आणि तनु दोघांनी सर्व प्रदर्शन पालथे घातले. प्रशांत आणि प्रणव यांना त्यांच्या प्रेझेंटेशनच्या वेळी मदत केली.त्यातील नव्वद टक्के प्रयोग लाईव्ह प्रकारातील नव्हते. तनुला थोडे वाईटही वाटले कारण तिच्या विषयासारखे बरेच प्रकल्प तिथे होते.पण पुढच्या आयुष्यात वेगळेच काहीतरी लिहीलेले असते, ज्याची आपण प्रामाणिकपणे स्वप्ने पाहतो ती प्रत्यक्षात उतरु शकतात . तिने पुढे जाऊन BTech in Biotechnology केले आणि virology मध्ये MS केले.आज ती अमेरीकेत एका रिसर्च लॅबमध्ये काम करत आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे तिला नासाच्या R &D लॅब मध्ये सुध्दा काम करण्याची संधी मिळाली होती.
त्यावेळी मुक्तांगण मध्ये इंग्रजी माध्यमातील मुले थोडी कमी असायची पण तसे त्यावेळी सीबीएसई नव्हती.पण मोठा ग्रुप मात्र मराठी माध्यमाच्या मुलांचा होता.पण जबरदस्त ग्रूप होता.सुमित गायकवाड,स्वप्निल बर्गोले,प्रणव अवताडे, प्रशांत जाधव, पल्लवी थोरात, तेजस्विनी गोसावी अशी रथी महारथी मुले होती. डान्स, चित्रकला, खेळ, शालेय शिक्षण सर्वात अव्वल.सर्व स्पर्धा मध्ये हीच नावे पुढे असत.यासोबत काही अशीही मुले होती ती त्यावेळी या सर्वात कुठेच नव्हती म्हणजे अक्षय पोटे, सुशील सातपुते असे काहीजण.पण आजच्या घडीला ही मुले त्या सर्वांच्या पुढे गेली आहेत.पण त्यांच्याकडे एक गुण होता तो म्हणजे सर्व गोष्टी फक्त एन्जॉय करायला येणे.कोणी किती छान काढत आहे किंवा कुणाचा नंबर येतो यापेक्षा त्या ॲक्टीव्हीटीचा आनंद लुटायला ते यायचे.तनु या सर्वांबरोबर असायची कारण तिच्या वर्गातील फक्त शिल्पा तिच्यासोबत असायची. त्याचा परिणाम असा झाला की तिला पहिल्यापासूनच अशा बहुढंगी, बहुआयामी मुलांबरोबर उपक्रम करायला मिळाले. त्याचा फायदा तिला पुढे झाला.
मुलाखती घेणे हा प्रकार तनुला अगदी लहान असल्यापासून अगदी परिचित.ती सहावीत असताना पुण्याहुन वृषाली निकम नावाची मुलगी माझ्या अरुण पाटील नावाच्या मित्राकडे दिवाळीच्या सुट्टीत आली होती. अतीशय हुशार आणि अगदी नववी असताना लेख लिहायची.वाचन अफाट होते. निरनिराळे प्रोजेक्ट ती करायची.मग एकदा मुक्तांगणच्या चार पाच जणांना घेऊन मित्राच्या घरी गेलो. तिच्याशी गप्पा मारत तिच्याकडून या मुलांना काही घेता येईल काय हे पाहायचे होते. नेहमीप्रमाणे विक्रांत होताच.तनु, शिल्पा ,तेजा असे सोबत होते. तनूने , शिल्पाने खुप छान प्रश्न विचारले. विक्रांत थोडा विचार करून प्रश्न विचारत होता. बाकीचे बेधडक विचारत होते. तुला भविष्यात काय बनायचे आहे हा प्रश्न तनूने विचारल्यावर तिने पटकन उत्तर दिले 'दुभाषी’. त्याविषयी तिने सविस्तर सांगितले सुध्दा.पण सर्वात विकेट काढणारा प्रश्न होता तो म्हणजे विक्रांतचा. अर्थात एकदम निरागसपणे विचारलेला. त्याने विचारले ‘तुला जे पुढील आयुष्यात जे बनायचे आहे असे तुला सुचते किंवा वाटते ते मला कसे वाटत नाही ? या प्रश्नावर वृषाली निरुत्तर झाली.कारण ती सुध्दा त्यावेळी नववीत होती.पण यावर त्याची फिरकी घ्यायला मात्र तनु पुढे होती. राजेशच्या वडिलांची मुलाखत घेताना तनुचा ग्रुप होता.राजेशचे वडील जिल्हा परिषदामध्ये मोठया हुद्यावर काम केलेली व्यक्ती होती. सरकारी अधिकारी कसा असावा याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे गोविंद सावंत. त्यांच्याशी गप्पा मारत असताना कधीही वाटले नाही की ते एवढ्या मोठ्या पदावर त्यांनी काम केले असेल.कारण अशा लोकांच्या रुबाबाच्या गोष्टीच नेहमी काना वर येतात. समाजासाठी काम केलेल्या सरकारी व्यक्ती फक्त सिनेमात पाहायला मिळतात.ते अतिशय शिस्तप्रिय आणि काटेकोर होते. तनुने आणि इतरांनी त्यांच्याशी तासभर गप्पा मारल्या. विशेष गोष्ट म्हणजे त्यावेळी अचानक लाईट गेली. कॉलनीत लाईट नसने म्हणजे कधीतरी पाच सहा वर्षात एखादा अपवाद आणि अगदीच काय तर त्या घराची लोडींग मुळे फ्युज जाऊन लाईट जाणे.पण मुलांनी अजिबात न गडबड करता मस्त मेणबत्तीच्या उजेडात पुढील अर्धा तास मुलाखत घेतली.यात तनुच्या ग्रुपची एक आवड , विषय जाणुन घ्यायची उत्सुकता दिसुन यायची. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर त्यांना याचा उपयोग होत गेला.
सुधागड कॅम्पच्या वेळी अख्या गावात दुकानात घरोघरी, शेतावर जाऊन मुलांनी मुलाखती घेतल्या.त्यात तनुचा ग्रुप अग्रेसर असे.चिल्ले शिबिराच्या वेळी बहिणाबाई चौधरींच्या कविता चित्रात शब्दबध्द केल्या होत्या.त्यात अक्षय पोटे, तनू, शिल्पा, ज्युली यांनी आठ मोठे पोस्टर्स बनवले होते.त्यात माहेरवाशीण, खोपा, साधू अशा बऱ्याच कवितांचे सुंदर चित्रण केले होते.ती पोस्टर्स कार्डबोर्डवर चिटकवली. त्याला दोऱ्या बांधून शिबिराच्या वेळी तिथल्या हायस्कूल मध्ये भेट दिली.या शिबिरावेळी तिने तिचा शूटिंग कॅमेरा आणला होता. त्यामुळे काही रेकॉर्डिंग उपलब्ध आहेत. त्यादरम्यान सारिका शेट्ये, सिद्धी गुरव, जागृती पाटील, श्रिया सातगोंडा, प्रणाली रोडे , मनाली पवार, मानसी सुपेकर, पुजा खराडे हा एक ग्रुप होता जो तनुला ज्युनियर होता. यांचा ग्रुप खुप अक्टिव असायचा. त्यांचे तनुशी खूप जमत असे. अगदी खेड्यात जा किंवा शहरात जा या मुली बेधडक मुलाखती घ्यायच्या. समोरच्या व्यक्ती कडून माहिती काढून घेता येईल तेव्हढी काढायचीच असा त्यांचा ठेका असायचा.
तळा येथील शिबिरात तर ही मुले मुख्य भूमिकेत होती कारण त्यावेळी ते दहावीत शिकत होती. त्यावेळी तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक,यांच्या मुलाखती घ्यायला तनुचा ग्रुप अग्रेसर होता. तहसीलदार श्री. निकम यांची फार सुंदर मुलाखत घेतली. मुलांनी जवळ जवळ तासभर त्यांच्याशी गप्पा मारल्या.यात तनुचा सहभाग असा होता की जे प्रश्न विचारावयाचे आहेत ते प्रत्येक ग्रुप मधील मुलांशी अगोदर चर्चा करून ठरवायचे. यामुळे कार्यक्रमाला एक शिस्त येत असे.
आम्ही दापोली कृषी महाविद्यालय येथे तीन दिवसाच्या कॅम्पला मुलांना घेऊन गेलो होतो. त्यावेळी तिथल्या ट्रेनिंग सेंटरचे प्रमुख नाडकर्णी यांनी मुलांसाठी खास लेक्चर्स आयोजित केली होती. मुलांना तिथले काही शिक्षक सोबत देऊन सर्व कृषी महाविद्यालय फिरुन दाखवले होते. तनुला मुख्य आकर्षण असलेली टिश्यू कल्चर लॅब त्यांनी दाखवली. प्रत्यक्ष तिथले प्रयोग अनुभवता आले. मुलांनीही मिळालेल्या संधीचे सोने केले . केळशी गाव, मुरुड हर्णे बंदर, रस्त्यात आढळणारे कोळंबी प्रकल्प मुलांना जवळुन पाहता आले.तनु , शिल्पा यांचा ग्रूप तसा मोठा असल्याने त्यांना अभ्यासातील काही गोष्टी अनुभवता आल्या. तिथे वेगवेगळया शेतकऱ्यांशी मुलांनी संवाद साधला. अशाच प्रकारच्या झिराड, नागाव आणि नांदगाव या शिबिरात पोल्ट्री फार्म, मासेमारी संघ, सुपारी संघ अशा बऱ्याच ठिकाणांना भेट द्यायला मिळाली.ते प्रकल्प मुलांनी जवळुन पाहिले.त्यांच्या भावी आयुष्यातील एक ती शिदोरीच होती.
दहावी पर्यंत कोणत्या ना कोणत्या निमित्ताने तनुच्या ग्रूपशी चर्चा होत असत.ती दार्जिलिंग , अंदमान निकोबार या ठिकाणी फिरायला गेली होती.तिथले अनुभव, प्रवास वर्णन तिला लिहायला सांगितले होते.तिने दार्जिलिंग ट्रिपचे छान वर्णन लिहीले होते.आम्ही ते एका मॅगझिन साठी सुध्दा पाठवले होते. खाण्याच्या बाबतीत मात्र ती फार हौशी होती.तिला काही ठरावीक पदार्थ ठरावीक लोकांकडून हवे असायचे.तिला नंदाने केलेले ब्रेड रोल्स खूप आवडायचे. आताही ती अमेरिकतुन जरी आली तरी तिची डिमांड ठरलेली असायची.पण शिबीर असो वा घर असो खाण्याचा मन मुराद आनंद लुटणे हे तिचे ठरलेले असायचे.
दहावीनंतर तनु पनवेल येथे शिफ्ट झाली. पनवेल येथे कॉलेजमध्ये तिला नवीन ग्रूप मिळाले.त्यातून बायोग्रुप घेऊन पुढे शिकायचं असे तिचे ठरले.मग त्यानुसार तिने तशा प्रकारच्या परीक्षा दिल्या.त्या दरम्यान झालेल्या कर्नाळा शिबिराला ती आली होती. पनवेल येथे रहात होती.तिला तिच्या स्कूटर वरून यायचे होते. आई परवानगी देत नव्हती. मग बसने येते असे सांगुन ही स्कूटर वरूनच आली. आम्ही सर्वजण मुलांना घेऊन किल्ल्यावर गेलो ती आणि नंदा दोघीजणी वनाधिकारी ऑफिसच्या बाजूला गप्पा मारत बसल्या. आम्ही गडावरून परत आल्यावर मात्र शिबिराच्या मुक्कामी तारा गावात गेलो. अंजलीचा फोन आल्यावर ती स्कूटर वरून आल्यामुळे तिला बोलणी खावी लागली होती.ती मग आमच्या सोबत शिबिराच्या ठिकाणी राहिली. या मुलांना उपक्रमाची एक ओढ लागलेली असायची. त्यांचे पाय आपोआपच अशा ठिकाणी वळायचे.
बारावी झाल्यानंतर तिने बायोटेक साठी MGM कॉलेजला प्रवेश घेतला. तिला खरंतर मेडिकल करायचे होते परंतु घरातील प्रत्येकाला ती लांब जाऊ नये असे वाटत होते.पण तिने बायोटेकला सुध्दा खूप चांगला इंटरेस्ट घेतला. नवनवीन प्रोजेक्ट केले. आयआयटी फेस्टला त्यांच्या ग्रुपला बक्षीस सुध्दा मिळाले. महिन्या दोन महिन्यात कॉलनीत फेरी असायची.आली की घरी अगदी चारपाच तास गप्पा मारायला येत असे. गार्गी आणि सौजु दोघांचेही तिच्याशी अगदी लहान असल्यापासून एक वेगळं अटॅचमेंट असल्याने तेही खूप एन्जॉय करत.लहान असताना त्या दोघांचेही वाढदिवस साजरे करायला मुक्तांगणची सर्व टीम असायची. नो गिफ्ट, येताना फक्त वॉटर बॉटल आणायची हे मुलांना सांगितलेले असायचे.सर्व वाढदिवस पाच बंगल्यात आल्यावर स्कल्पचर पार्कमध्ये साजरे करायची. त्यामुळे कमीत कमी ४०-५० मुले तरी असायची.पालक फक्त पांडे काका, अभिजीत, चौधरी कुटूंब आणि राजेश सावंत फॅमिली एवढेच. सर्व जबाबदारी मुलेच घेत.त्यात तनुचा नेहमी पुढाकार असायचा.मुले मग घरी ग्रीटिंग कार्ड्स बनवत असत आणि वाढदिवसाला घेऊन येत असत.अशी चार पाचशे ग्रीटिंग कार्ड्स माझ्याकडे असतील.पण ही मुले सर्व इव्हेंट छान एन्जॉय करत असत.
बीटेक झाल्यावर तिने वर्षभर हाफकिन इन्स्टिट्यूट मध्ये ट्रेनिंग घेतले.मग तिने MS साठी अमेरिकेतली कॉलेज शोधायला सुरुवात केली.काही प्रवेश परीक्षा दिल्या. त्यासाठी रीतसर पात्रता पुर्ण केल्या.हा जाण्याचा निर्णय फार मोठा होता.पण तिच्या कर्तुत्वाला न्याय देणारा एक फायदेशीर मार्ग मिळाला. तिच्या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. आयुष्याच्या नवीन वळणावर ती गेली.एक आटोपशीर, सुरक्षित जीवन सोडुन एका मोठ्या प्रवाहात उडी मारली होती.ती उडी खरंतर उरणच्या जेट्टीवर उडी मारताना आलेल्या तणावासाखीच होती.पण इथे तणाव तिच्यापासून दूर जाणाऱ्यांना जास्त होता. तिथे गेल्यावर तनुला रुळण्यास प्रचंड मानसिक त्रास झाला.पण आई बाबा तिच्या पाठीशी उभे राहीले. अमेरिकेत शंतनु राणे याने खुप मदत केली. तिला तिथे सर्व प्रकारची मदत त्याने आणि त्याच्या पत्नीने केली. कॉलेजच्या परीसरात तिला नंतर हॉस्टेल मिळाले. तिची रूम पार्टनर चिनी होती त्यामूळे सवांद साधण्यास खूप प्रॉब्लेम येत असे आणि त्या कारणामुळे तिला काही दिवस एकाकीपणा आला होता.मी आणि नंदा दोघेजण तिच्याशी दोनतीन वेळा गप्पा मारल्या. तिला त्यावेळी खूप बरे वाटले होते. नंतर ती अशी रुळत गेली की मागे वळुन पाहिले नाही.कॉलेजचा वेळ सोडुन ती पार्ट टाईम जॉब करत असे. आपण थोडे स्वयंपूर्ण असावे यासाठी ती दिवसाचे दोन तास काम करत असे. तिथे रिसर्च सेंटर लॅब खूप चांगल्या पद्धतीच्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुसज्ज अशा आहेत. एखादया रोगावर किंवा औषधावर तिथे कित्येक वर्षे संशोधन चाललेलं असतं. तिने सांगितले की ती एका कॅन्सर वरील प्रकारच्या रिसर्च लॅब मध्ये काम करीत होती तिथं मागील वीस वर्षे संशोधन चाललेलं होते.म्हणजे निव्वळ एक रोग नाही तर त्याच्या एका प्रकारावर ते लोक वीस वर्षे संशोधन करत आहेत. आपल्याकडे हे प्रॅक्टिकली तेव्हढे शक्य नाही.ती सांगत असे की कधी तरी सतरा अठरा तास सलग सुध्दा ती लोकं काम करत असतात. तिने नासा लॅब विषयी सांगितले की तिला तिथं काम करण्यास परवानगीसाठी सहा महिने लावले होते. त्यादरम्यान तिची सर्व माहिती घेण्यात आली. तिथं कोणत्याही प्रकारची रिस्क घेतली जात नाही. अशा ठिकाणी नियम फार कडक असतात .प्रत्येक गोष्टीवर अविश्वास हा दाखवतात.अगदी हा व्यक्ती एजेंट आहे काय याची चौकशी केली जाते. तिने जेंव्हा तिचे स्वतः चे घर घेतले त्यावेळी तिने फोटो पाठवले होते. तिला सहज सुचवले की एक छान वड, पिंपळ, जांभुळ आणि आपल्याकडील झाडे लाव.पण तिने सांगितले अमेरिकेमध्ये बाहेरील कोणत्याही बियांना आणण्यात बंदी आहे..तिला भारतातील बरेच जण तिथे भेटले.ते सर्व सण एकत्र साजरे करायचे.तिथले मराठी मित्र मंडळ सुध्दा तिच्या परिचियाचे आहे. त्यांचे उपक्रम ती बघत असते . बऱ्याच सणाच्या वेळी मराठी लोकांचे गेट टुगेदर असते. तिथले मराठी बांधव आपले सण रीतिरिवाज सांभाळण्याचा प्रयत्न करतात. दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून हे लोक त्यानिमित्ताने एकत्र येतात त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा प्रयत्न करतात. आपल्या देशातील , राज्यातील, शहरातील किँवा गावातील घालवलेले दिवस आणि त्यांच्या आठवणी हा त्या लोकांच्या दृष्टीकोनातून अनमोल ठेवा असतो.इथे लहानपणापासून शिबीरे , गड किल्ल्यांना भेटी दिल्यामुळे तिथे इथल्यासारखी तिने डोंगर दऱ्या, बीच भटकंती चालु ठेवली. जगातील प्रसिद्ध अमेरिकेतील नायगारा फॉल्सला तिने भेट दिल्यावर त्याचे वर्णन आणि फोटो पाठवले होते. लहानपणी लागलेले छंद अशा ठिकाणी कामी येतात.MS झाल्यावर तिने चार पाच कंपनीत काम केले. त्यात नासा रिसर्च सेंटर आणि कॅन्सर वरील लॅबज , बायोटेक कंपनीत तिने काम केले. भविष्यातील तिच्या बऱ्याच योजना आहेत. तिला मोठ्या कंपनीच्या CEO च्या पदापर्यंत पोहचायचे आहे. तिच्याशी बोलत असताना असे वाटते की आता तिची वैचारिक पातळी आता वैश्विक झाली आहे.
SANJAY GOLE
_edited_edited_edited.jpg)

Comments