top of page

विक्रांत मोटे…मुक्तांगण सदस्य

Nov 15
9 min read

विक्रांत एक जगावेगळे व्यक्तिमत्त्व. शांत, विचारी , सभोवतालच्या लोकांकडे थंडपणे बघण्याचा दृष्टीकोन असे कित्येक गुण ठासुन भरलेले वेगळे व्यक्तिमत्त्व. शाळेत असताना याच्या बाजूला कोण बसला आहे आणि त्याच्यापासून त्याला फायदा होईल की तोटा,तो अभ्यासात हुशार आहे की नाही याचा कधीही विचार न करता निरपेक्षपणे वागणे हा त्याचा स्थायीभाव. समोरची मुले जरी फारशी किंमत देत नसतील आणि अगदी मत्सर द्वेष करत असतील तरीही त्याच्याकडे दुर्लक्ष करीत इतरांकडे काय चांगले आहे याचा निर्विकार चेहऱ्याने विचार करणे हे विक्रांतचे वैशिष्ट्य. नवनवीन वाटा शोधुन काढणे, एखादा प्रकल्प हाती घेतला तर तो  तडीस लावणे या त्याच्या विशेष खुबी.

अगदी दुसरी तिसरी पासुन मुक्तांगण मध्ये यायला लागला. नियमित रविवारचे उपक्रम अटेंड करायचा. शिबिरांमध्ये तर त्याची उपस्थिती  विलक्षण अशीच असायची .याने अगदी अकरावी पर्यंत दिवाळी व उन्हाळा या दोन्ही कँपला कधीही दांडी मारली नाही.एक दिवसाचे शिबीर असो वा पावसाळी सहली असोत हा नेहमी पुढे असायचा. शाळेतील विज्ञान प्रदर्शने, कॉलनीतील विविध स्पर्धा अगदी गाण्याची असू देत नाहीतर एकपात्री अभिनय स्पर्धा असू देत याचे त्यातील भाग घेणे ठरलेले असायचेच. एखादा सायन्स प्रोजेक्ट करायला सांगितला आणि त्याला चर्चा करायची असेल तर तो कधीही घरी येणार. एकदा अशाच एका प्रदर्शनाच्या वेळी माझी सेकंड शिफ्ट होती आणि मी रात्री दहा वाजता घरी येणार होतो . त्यावेळी मी कॉलनीत थोडे बाहेर सुरक्षा नगर मध्ये राहत होतो. तिथं हा रात्री दहा वाजता येऊन थांबला.मग तासभर चर्चा करून मी त्याला गाडीवरून घरी सोडला.  त्याच्या एकदा मनात आले की तो झपाटून जात असे. एकदा वेळेचे नियोजन आणि दैनंदिनी लिहायची असे रविवारच्या कार्यक्रमात ठरले.मी मुलांना एक एक वही मुक्तांगण तर्फे दिली. बऱ्याच मुलांनी काही दिवस लिहिली नंतर बंद केले.याने मात्र एक संपली की सर आता दूसरी वही द्या असे सांगितले.

त्याला गाण्याची आवड होती. त्यासाठी तो कधी कधी वाशी- पेण येथे जायचा.एखादया कार्यक्रमात तो गायला उभा राहिला की तनु, शिल्पा नेहमी टवाळ्या करत. मुले बहुतेक त्याची टर उडवायला बघत.पण हा कधीही विचलित व्हायचा नाही. त्याला नाटकाची सुध्दा आवड होती. सह्याद्री मित्र मंडळाच्या एका कार्यक्रमात स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्र हा विषय होता. त्यात त्याला क्रांतिसिंह नाना पाटील यांचा रोल दिला होता . त्यांचा पोलिसांना गुंगारा देण्याचा नाट्यप्रसंग त्याने अफलातून वठवला होता.या कार्यक्रमाच्या शेवटी ज्यावेळी स्वातंत्र्य दिन उजाडतो त्यावेळी नाना पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण होते हा प्रसंग छान केला होता. अशाच एका कार्यक्रमात त्याला डॉक्टर अब्दुल कलाम यांचा मी रोल त्याला दिला होता आणि त्यात त्याने कलमांचे हैद्राबाद येथील प्रसिद्ध भाषण केले होते.

असे बरेच प्रसंग असतील ज्यात त्याची जडणघडण झाली.तो तिसरीत असताना एक सायकल शिबीर आयोजित केले होते. साधारण वीस बावीस किलोमिटर सलग सायकल चालवायची होती.त्याच्या वयानुसार त्याला आम्ही नाही म्हणूनच सांगितले होते. परंतु हा माझ्याकडे घरी सायकल घेऊन आला आणि सांगितले की दर रविवारी कार्यक्रमाला येतो आणि त्यामुळे मला शिबिराला यायचे आहे.त्याची सायकल पाहिली तर साईड व्हील वाली होती.ही सायकल घेऊन हा एव्हढे अंतर पार करू शकत नाही असे वाटले.मग त्याला मुद्दामच मी सायकलने टाउनशिपला दोन राऊंड मारत जा असे सांगितले.मला तो तसे करेल असे वाटले नाही.पण त्याने नियमितपणे कँपच्या दहा दिवस आधी दररोज राऊंड मारले. त्याला शिबिराला घ्यायचे नाही हे ठरले होते. जाण्याची वेळ त्याला सांगितली नव्हती.पण दुपारी दोन वाजता ज्यावेळी आम्ही कॉलनीत गेट वर जमा झालो आणि निघणार एवढ्यात विक्रांतचे आई वडील गाडीवरून येताना दिसले. त्यांनी विचारले शिबिराला निघाला काय ? विक्रांत तुमच्या निरोपाची वाट बघत आहे असे सांगितले.मी त्यांना समजावले की ते त्याला झेपणार नाही.पण त्यांनी सांगितले तो गेले दहा दिवस सायकलने चकरा मारतोय. त्याला तुम्ही घेऊन जा.मग त्याला घरून बोलवले आणि सायकल ट्रीप सुरु झाली.वाटेत मात्र त्याची दमछाक झाली.दहाबारा किलोमीटर नंतर त्याला सायकल चालवेना .मग शंतनु त्याला मदत करत हळु  हळू घेऊन आला.पण शिबिराच्या ठिकाणी याला ताप आला.मग गोळी दिली.तो खूप दमला होता.मग आराम केला .पण त्यादिवशी बावीस किलोमीटर अंतर मात्र पार केले. परतीच्या प्रवासात त्याला एस्टीत बसवून आणि सायकल टपावर टाकून पाठवले.

रायगड किल्ला शिबीर दरम्यान तो पाचवीत होता . आम्ही किल्ल्यावर जाताना काही पुस्तके नेली होती. रायगडाची माहिती देणारी होती. सह्याद्रीचा सांगाती, किल्ले रायगड, आणि त्याशिवाय गोनिदा,आनंद पाळंदे यांची काही पुस्तके नेली होती. तिथे मुलांना गटात ही वाचायला दिली होती.काहींचे सामूहिक वाचन करून घेतले होते. आमचा शिबिरातील प्रकल्प होता की प्रत्येकाला स्वतः च्या नजरेतून रायगड कसा वाटला ते लिहायचे होते.सोबत आणलेल्या पुस्तकातील माहितीचा आधार घेऊन त्यात अजून काही भर घालता येईल अशा तऱ्हने लिखाण करायचे होते. मुलांनी छान लिहीले होते.त्यावेळी सर्व मुलांमध्ये तो एकटाच इंग्रजी माध्यमात शिकणारा होता. सर्व गडाचा परीसर पाहिल्यावर , निरिक्षण केल्यावरच मुलांनी त्यांच्या भाषेत रायगडावर लिहीले. त्याचे प्रेंझेंटेशन संध्याकाळी केले त्यावेळी खूप धमाल आली.विक्रांतने डायरी वाचायला सूरूवात केली. त्याने वाचताना काही शब्द मावळा- मावला, कावळ्या बावळ्या डोंगर - कावल्या बावल्या डोंगर अशा बऱ्याच ठिकाणी गडबड केली.तो वाचत होता बाकी मुले खो खो हसत होती.पण त्याने एकदाही भाषण थांबवले नाही आणि त्याचं संपेपर्यंत त्याच्या कपाळावर रेष सुध्दा हलली नाही.तर हे विक्रांतचे वैशिष्ट्य. तुम्ही कितीही चर्चा करा वा टर उडवा ते माझ्यासाठी नाही असे गृहीत धरून आपली वाटचाल चालू ठेवायची.

तो सहावीत असताना घडलेला प्रसंग. टाउनशिप मध्ये कारगील युद्धावर व्याख्यान देण्यासाठी त्यावेळचे लोकसत्ताचे संपादक कुमार केतकर येणार होते. एवढा मोठा व्यक्ती येणार म्हणजे तयारी चांगली चालू होती. सदर कार्यक्रम एम्प्लॉइज क्लब मार्फत होणार होता. रविवारच्या कार्यक्रमात याविषयी मुलांसोबत चर्चा झाली. मुलांना कुमार केतकर, कारगील या विषयावर माहिती दिली.आपण कुमार केतकर यांची मुलाखत घ्यायची काय यावर चर्चा झाली.मग चार पाच मुलांची त्याकरिता निवड केली. त्यात सुदनेश रणवरे, विक्रांत मोटे, प्रणव अवताडे, अशी मुले होती. त्या सर्वांना मी संध्याकाळी घरी या आपण मुलाखतीची तयारी करूया असे सांगितले.मग मी परवानगी साठी तयारी सुरू केली..मुलाखत घेण्यासाठी क्लब सेक्रेटरी यांची परवानगीसाठी गेलो. त्यावेळी सेक्रेटरी शेट्ये होता. त्याने तुम्हाला वेळ देणे शक्य होणार नाही असे सांगितले.मग काही तरी पर्याय मुलांसोबत काढू असे मनात ठरवले .संध्याकाळी भरपूर पाऊस पडत होता. त्यामुळे फक्त दोनच मुले आली. विक्रांत आणि प्रणव.मग आम्ही प्रश्नावली तयार केली. परवानगी न मिळाल्याने आपण थेट आनंदवन गेस्ट हाऊस येथे जायचे असे ठरवले. कुमार केतकर त्या गेस्ट हाऊसला दुपारी तीन ते चार या दरम्यान येणार होते. व्याख्यान साडेसहा वाजता सुरु होणार होते. त्यांना तिथेच गाठून गप्पा मारायच्या असे ठरवले. माझी जनरल शिफ्ट असल्याने मी पाच वाजता येणार होतो.मी मुलांना आनंदवन गेस्ट हाऊस येथे पाचच्या अगोदर यायला सांगितले होते. गेटवर काय बोलायचे , तिथे कुणी विचारले तर काय काय सांगायचे अगोदरच ठरवले होते.त्या दिवशी सुध्दा पाऊस पडत होता.मी कामावरून सुटल्यावर सरळ गेस्ट हाऊस कडे निघालो वाटेत मला कर्नल चित्रे भेटले. ते लेक्चर ऐकण्यासाठी आले होते. त्यांना नाट्यगृहात सोडले. नंतर आनंदवनला गेलो मला पाच मिनिटे उशीर झाला होता. विक्रांत आणि प्रणव सिक्युरिटी गार्डला सांगुन आत गेले.मी त्यांच्या पाठोपाठ पोहचलो. मला ते दिसेनात म्हणून मी गार्डला विचारले.त्याने ते पाच मिनिटापूर्वी गेले असे सांगितले.मग आत गेलो. त्यावेळी काही मान्यवर मंडळी दिसली.मला बघितल्यावर एकाने विचारले मुलांना शोधत आहात काय .मी हो म्हणताच त्याने सांगितले तुम्ही मुलांना चांगलेच पढवून पाठवले होते .मला काय उत्तर द्यावे कळेना.मग त्यांनी सविस्तर माहिती दिली. मुलांनी छान उत्तरे देऊन केतकरांच्या मदतनिसाची परवानगी घेतली. आतमध्ये त्यांच्या गप्पा चालु आहेत.मग मी त्यांची वाट पाहत बसलो. साधारण अर्ध्या तासाने मुले बाहेर आली.खूप खूष दिसत होते.मग आम्ही हॉल कडे गेलो. वाटेत सविस्तर चर्चा केली.त्यांनी सर्व तयार केलेले प्रश्न विचारले.मग त्यांनी काही प्रश्न मुलांना विचारले. त्यात एक प्रश्न मोठा गहन होता. केतकर यांनी त्या दिवशीच्या वर्तमानपत्रात एक फोटो छापून आला होता त्यात एक मुलगा एक मेंढा खांद्यावर घेऊन चालला होता आणि दुसरा मुलगा दप्तराचे ओझे घेऊन चालला होता. त्यावर मुलांची प्रतिक्रिया विचारली. मुलांनी त्यावर छान उत्तरे दिली. एवढ्या मोठ्या व्यक्ती सोबत तासभर चर्चा करण्याचे भाग्य मुलांना लाभले तेही एवढ्या लहान वयात.हा खरंतर त्यांच्या आयुष्यातील मोठा क्षण होता.

नववीत असताना त्याची एका स्कॉलरशिपची इंटरव्ह्यू होती. शाळेत तीन लोकांची टीम येणार होती.त्याची पूर्वतयारी करायची आम्ही ठरविले.त्याला प्रथम कॉलनीत ज्यांची ज्यांची त्या प्रकारची मुलाखत झाली यांची नावे काढली.त्यात निहार मुंबईकर, स्वाती शिंदे अशी बरीच नावे होती. विक्रांतला मग त्यांच्या घरी जाऊन त्यांना विचारलेल्या प्रश्नांची यादी करून आणायला सांगितले.मग आम्ही बसून ते प्रश्न एकत्र करून साधारण तीस प्रश्न तयार केले.मग त्याला त्याचे सर्व पाहिली पासूनचे रिझल्ट आणि प्रमाणपत्रे गोळा करायला सांगितले.नंतर त्याने मुक्तांगण शिबिरांची डायरी शोधुन ठेवली. नंतर सर्व मुलांना एकत्र करून सर्वांनी त्याची मुलाखत घेतली. जमा केलेले प्रश्न विचारले. मुलाखतीच्या दिवशी सर्व जमा केलेले साहित्य घेऊन तो शाळेत गेला.त्याला पुण्याहुन येणारी टीम आल्यावर बोलवले. त्याचे लेखी परीक्षेतील गुण चांगले असल्याने त्यांनी अवांतर प्रश्नांवर जोर दिला होता. त्याला काही भौतिक शास्त्रावर आधारित प्रश्न विचारले. त्या ग्रुप मधील दोघांनी त्याने आणलेले साहित्य चेक करायला सुरवात केली.एकाने त्याची डायरी वाचली.मग मात्र त्यांनी त्याला ट्रेकिंग, शिबिरे या विषयी विचारायला सुरुवात केली.शिबीर काळात जी सामाजिक कामे केली त्यावर बरेच प्रश्न विचारले.अगदी तासभर त्याच्याशी गप्पा मारल्या.मग त्याला जायला सांगितले.काही वेळाने ते परीक्षक ऑफिस मध्ये गेले. त्यांचा रिझल्ट तयार केला. विशेष बाब म्हणजे ज्या वर्गात विक्रांत बसला होता तिथे जाऊन सर्व मुलांसमोर त्याला अभिनंदन केले आणि असा मुलगा असावा अशी त्याची वाहवा केली.त्याची खूप स्तुती करत त्यांनी त्याची शिष्यवृत्ती तिथेच जाहीर केली.

 

बऱ्याचवेळा आम्ही काही सामाजिक उपक्रम राबविले होते.त्यात आजूबाजूच्या परिसरात किंवा कॉलनीत वाया जाणारे पाणी, ओला कचरा, सुका कचरा याविषयी प्रबोधन करणे.गड किल्ल्यांवर गेल्यावर प्लास्टिक कचरा गोळा करून योग्य विल्हेवाट लावणे आणि स्वतः अगदी चॉकलेटचा कागद देखील कुठेही न फेकता कचरा कुंडीत फेकने. यामुळे कधी कधी वेगळ्याच गोष्टी घडायच्या. एकदा विक्रांत आणि कुटुंबीय एस्टीतुन गावी चालले होते.बस स्टँड वर त्याच्या वडिलांनी काहितरी विकत घेतले.तो खाद्य पदार्थ प्लास्टिक मध्ये गुंडाळलेला होता. तो भाग त्याच्या वडिलांनी  टाकण्यासाठी हात बाहेर काढत होते तेंव्हा विक्रांतने थांबवले आणि त्याविषयीचा दोन शब्द सूनविले.ही गोष्ट त्याच्याच वडिलांनी मला सांगितली होती.

साधारण नववी  नंतर विक्रांत शिबिरांचे नियोजन, लीडरशिप करू लागला.तो स्वतः अभ्यासात हुशार असल्याने मुले त्याला चांगला प्रतिसाद देत. बऱ्याच प्रमाणात त्याच्याशी मुलांच्या चर्चा सुध्दा होत असत. तळा, खांब, मुठवली, चिल्ले आणि सुधागड या शिबिरांचे नियोजन करताना माझ्यासोबत असायचा.अगदी शिबिरास जाण्यापूर्वी त्या ठिकाणाला भेट देऊन पाहणी करून तिथल्या सर्व गोष्टींचे योग्य ते व्यवस्थापन करायला त्याची मदत  होत असे.त्यामुळे बऱ्याचदा आम्ही दोघे खुप हिंडत असू.पण एक मात्र खरे की त्याच्या आई वडिलांची याबाबत कधीही तक्रार नसे. कार्यक्रमाची आखणी करताना कोणते उपक्रम घ्यावेत, त्यात नवीन काही करता येईल का याविषयी त्याच्याशी चर्चा होत असे.त्याच्या दहावीनंतर मी त्याच्या वडिलांना आपटे प्रशाला पुणे येथे प्रवेश घेण्यासाठी सुचवले.त्यावेळी क्लासेस पेक्षा शाळांना महत्व खूप होते. तिथे मुलांना चांगले मार्गदर्शन मिळत असे.त्या शाळेत पुर्वी महाराष्ट्रातील वेगवेगळया भागातील हुशार मुले त्या शाळेत येत असत.त्याच्या वडिलांनी सुध्दा तिथे त्याला प्रवेश घेतला. नंतरची दोन वर्षे खुप बिझी गेली. तरी तो कधी कॉलनीत यायचा त्यावेळी बऱ्याच गोष्टी शेअर करायचा.हॉस्टेल मधले मित्र त्याच्या सोबत यायचे.ही मुले सुध्दा जगावेगळी होती. काहितरी वेगळे ठरवुन आलेली. यांच्या बरोबर कॉलनीतील मुलांशी संवाद साधत असू. त्याची मित्र मंडळी मुलांना खूप चांगले मार्गदर्शन करत. विक्रांत MBBS साठी अभ्यास करत होता त्याचे ध्येय KEM मेडिकल कॉलेज आणि परीक्षेत २०० पैकी १८० च्यावर मार्क मिळवायचे.त्याने त्याच्या हॉस्टेल मधील ब्लॅक बोर्डवर हे टार्गेट लिहिले होते.त्याच्या मेहनतीला फळ मिळाले. त्याला तेव्हढे मार्क सुध्दा मिळाले आणि KEM मध्ये प्रवेश मिळवला.तो आपल्या कॉलनीतील पहिला होता ज्याला  सरकारी मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश मिळाला. मुक्तांगण ग्रुपच्या दृष्टीकोनातून खुप अभिमानाची गोष्ट होती शिवाय इतर सदस्याना तो एक आदर्श तयार झाला होता.पण त्याचे वागणे नेहमी साधेच असायचे.

मुंबईत कॉलेजला गेल्यानंतर मात्र तो मध्ये सुटीत कॉलनीत येऊ लागला. मेडिकल कॉलेज मधील बऱ्याच गोष्टी तो शेअर करत असे.त्याच्या कॉलेज मधील वेगवेगळ्या उपक्रमामध्ये असणाऱ्या सहभागविषयी नेहमी चर्चा करत असे.त्याच्या मित्राबद्दलच्या बऱ्याच गोष्टी सांगत असे.त्याच्या कॉलेज समोरील एका नाट्यगृहात एकदा एका प्रख्यात माणसाची मुलखात होती त्यावेळीं तो आला होता. कधीं कधीं मुलांना घेऊन मुंबईला प्रदर्शन किंवा कार्यक्रमाला आलो की तो तिथे हमखास यायचा  .त्यामुळे  विशेषतः राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन असेल तर आपल्या मुलांच्या ग्रूप मध्ये  तो आम्हाला जॉईन होत असे. बऱ्याचदा तर घरी न जाता शिबिराला डायरेक्ट येत असे एकदा मुबईहून पहाटे निघुन इंदापूर येथे शिबिराला आला होता.तो सुटीत आल्यावर आम्ही बऱ्याचवेळा डोंगर दऱ्या भटकत असू.एकदा आम्ही पेडलीला एका कार्यक्रमाच्या आयोजनासाठी गेलो होतो. पेडलीचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे संस्थापक जयसिंगराव गोळे यांची मुलाखत घेण्याच्या दृष्टीकोनातून त्यांच्या घरी गेलो होतो.त्यांच्या रायगड जिल्ल्यात पाच सहा शाळा आहेत,एक राईस मिल आहे. तिथेच मुलाखत आणि एक शिबीर घेण्याचे नियोजन करायचे होते. त्यांची रीतसर वेळ मागून घरी गेलो. तिथे गेल्यावर आमच्या उपक्रमाची माहिती दिली.आमच्या येण्याच्या उद्देशबद्दल सांगितले.पण बोलता बोलता असे झाले की ते एव्हढे खूष झाले की त्यांनी आमच्या बरोबर दोन तास गप्पा मारल्या. विक्रांत कडून मेडिकल प्रवेशा बद्दल खूप महिती घेतली.त्यांच्या नाती साठी मार्गदर्शन घेतले. आम्ही आलो होतो वेगळया कारणासाठी आणि झाले वेगळेच. विक्रांतचीच मुलाखत त्यांनी घेतली.

एकदा मी ,गार्गी आणि विक्रांत सुकेळी येथे एक निवासी शिबिराला गेलो होतो.चार दिवसाचे शिबीर होते.त्याने नवीन कॅमेरा आणला होता.खूप सुंदर फोटो काढले होते. सुकेळी परीसर म्हणजे मंत्रमुग्ध करणारा.प्रचंड धबधबा , बाजूला किर्र झाडी,रात्री तर भयाण शांतता , दाट अंधार,या भागात आम्ही ३ दिवस राहिलो. गार्गी मुलींच्या टेंट मध्ये असल्याने आम्ही मुलांच्या उपक्रमात सहभागी होत असू.ते शिबीर एक अविस्मरणीय झाले होते.     

सगळयात मजा आली होती ती म्हणजे मनाली ट्रेकिंगच्या  वेळी.हा त्यावेळी दिल्लीत लोहिया हॉस्पिटल मध्ये काम करत होता.त्याच्या मार्गदर्शनाने आम्ही दिल्लीतील नियोजन करू शकलो. त्याने आम्हाला फोनवरून  दिल्लीत कुठे उतरा, कोणती मेट्रो पकडा  अशा सूचना  दिल्या.आम्ही ज्यावेळी काश्मिरी गेट स्टेशन वर पोहचलो त्यावेळी तो सुध्दा तिथे आला. काश्मिरी गेट बस स्टँड हे अतिशय चांगले आहे आणि तिथे फार चांगल्या सोई सुविधा आहेत हे त्यानेच सुचविले. त्याने एवढेही सांगितलें की चार पाच तासासाठी हॉटेल न बुक करता त्याच मेट्रो स्टेशनला या. आंघोळी पासुन त्या बस स्टँडवर सोई आहेत आणि अतिशय स्वच्छ परीसर ठेवला आहे. संपूर्ण वातानुकूलित यंत्रणा तिथे आहे. त्यामुळे बाहेर चाळीसच्या वर तापमान असले तरी आम्हाला जाणवले नाही. त्याने मुलांशी छान गप्पा मारल्या. त्यांना पिझ्झा शॉप मध्ये छोटीशी पार्टी दिली. परतीच्या प्रवासात सुध्दा तो भेटायला आला होता. बाहेरच्या राज्यात ज्यावेळी आपली कोणी व्यक्ती भेटते त्यावेळी एक वेगळाच आनंद होतो. 

एकदा तो मुंबईहुन सुट्टीत आला होता.जून महिना चालु होता. वसुंधरा दिना निमित्त कंपनी कडून वुक्षारोपण समारंभ आसपासच्या गावात चालु होते. अशाच एका कार्यक्रमात मी आणि विक्रांत गेलो होतो.माझे मित्र महेश रणवरे सोबत होते.गांधे पाडा या गावात कार्यक्रम होता.तिथले शाळा कर्मचारी आणि शिक्षक वर्ग उपस्थित होता. वृक्षारोपण झाल्यावर सर्वांची भाषणे झाली.मी सुध्दा भाषण केले. सर्वात शेवटी विक्रांतला थोडेसे बोल असे म्हणालो. आतापर्यंत सर्वांनी झाडांची आपल्याला का गरज आहे तसेच वायू प्रदुषण याबद्दल भाषणात उल्लेख केले होते. विक्रांत भाषण करायला उठला.त्याने सर्वांना एक विचारले की तुम्हा मुलांपैकी सर्वात ज्यास्त आवाजात आरोळी कोण देईल? काही मुलांनी हात वर केले. त्या सर्वांना त्याने सर्वांना जोरात ओरडुन बोलण्यास सांगितले.मुलांनी त्यानुसार कृती केली.मग त्याने जो सर्वात ज्यास्त किंचाळला त्याच्या बाजुच्या मुलांना उठवले आणि विचारले हा मुलगा ओरडल्यावर  तुम्हाला कसे वाटले.त्यांनी सांगितलें कानाला थोडा त्रास झाला.मग त्याने ध्वनी प्रदुषण काय असते आणि त्याचे काय परिणाम असतात हे फार थोडक्यात सांगितले. तिथल्या पालकवर्ग आणि व्यासपीठावरील सर्वांना खूप वेगळया प्रकारचे भाषण वाटले.आणि भाषणाच्या शेवटी त्याने सांगितले की हे सर्व मी आमच्या मुक्तांगण उपक्रमामुळे शिकलो. माझे मित्र रनवरे म्हणाले या मुलाला मानले बुवा आणि आमच्याही मुलांना उपक्रमात भाग घेऊन द्यायला पाहिजे होता.आता यात खरेतर विक्रांतची जी हातोटी होती ती विलक्षण अशीच होती.पण तो माझ्या सोबत बऱ्याच वेळी आदिवासी गावामधील शाळेत होणाऱ्या विविध कार्यक्रमा मध्ये यायचा. तिथल्या मुलांशी एकरूप होऊन उपक्रम घ्यायला लागत असत.त्यांच्याशी करियर किंवा शैक्षिणक विषयावर भाषण न देता बऱ्याचदा आम्ही विविध खेळातून मार्गदर्शन करत असू. त्यामुळे नवनवीन कल्पना निर्मिती होत असे.त्यातूनच मग अशी छान भाषणं जन्म घेतात.

या वर्षी लॉकडाऊन काळात आम्ही विजय आणि गार्गी यांच्या मदतीने गप्पा गोष्टी हा ऑनलाईन उपक्रम चालू केला .त्यात मुक्तांगण सदस्य आपल्याच ग्रुप मधील जुन्या सदस्या सोबत जे विविध क्षेत्रात चांगले करियर करत आहेत त्यांच्याशी वार्तालाप करण्याची संधी मुलांना मिळाली.त्यात पहिलेच सत्र डॉक्टर विक्रांत मोटे सोबत होते.त्याने मुलांशी आणि पालकांशी खूप चांगला सवांद साधला.त्याच्या बरोबर मुलांनी गप्पा मारल्या.त्याने अगदी सहजरित्या मेडिकल करीयर आणि त्यातील गरजा, वाटा, विविध परीक्षा याविषयी चर्चा केली. मुलांनी तसेच पालकांनी सुध्दा त्याचा लाभ घेतला.त्याला मुलांनीही काही अतिशय चांगले प्रश्न विचारले.बरेच प्रश्न त्याची कसोटी घेणारे होते परंतु त्याने फार सुंदर रित्या समजाऊन सांगितले.

हल्ली बऱ्याच वेळी त्याचे मार्गदर्शन घ्यायची वेळ येते.आज प्रत्येक क्षेत्रात मुक्तांगण सदस्य काम करत आहेत. त्यामुळे खूपशा उपक्रमात त्यांच्या त्या क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग होतो. विक्रांत सारखी मुले त्यात नेहमी तत्पर असतात.

SANJAY GOLE

       

 

 


Recent Posts

See All
मुक्तांगण सदस्य…. शंतनु राणे.

सदा हसतमुख चेहरा असलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे शंतनु.मुक्तांगण सुरू झालं त्यावेळी हा आठवीत असावा. त्याच्या घरी माझे जाणे येणे असल्याने त्याच्या आई वडिलांची नेहमी आम्हाला साथ असायची. शंतनुची बहीण गायत्र

 
 
 
तन्वी सावंत (तनु)…. मुक्तांगण सदस्य

तनु म्हणजे आमचा टॉम बॉय.एकदम रोखठोक आणि बिनधास्त्त व्यक्तिमत्त्व.आई बाबांची एकुलती एक जरी असली तरी आईची कुठेही कुठल्याही बाबतीत सूट नसायची. आई एकदम शिस्तप्रिय असल्याने कुठेही अति लाडकोड नाही. एकटी आहे

 
 
 

Comments


Follow

  • Facebook

©Raigad Muktangan

bottom of page