मुक्तांगण सदस्य…. शंतनु राणे.
सदा हसतमुख चेहरा असलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे शंतनु.मुक्तांगण सुरू झालं त्यावेळी हा आठवीत असावा. त्याच्या घरी माझे जाणे येणे असल्याने त्याच्या आई वडिलांची नेहमी आम्हाला साथ असायची. शंतनुची बहीण गायत्री ही माझी भाची निशा हिच्या कॉलेजमध्ये शिकत असल्याने तशी आमची चांगली ओळख होती .शाळेत किंवा बाहेर त्याची इमेज अगदी हुशार, सिन्सियर मुलगा वगैरे अशी नव्हती. बऱ्याचदा तक्रारीच असत. एकदा शाळेत मला पालक, शिक्षक आणि एक मान्यवर व्यक्ती यांच्यासोबत मीटिंगचे भाग्य लाभले. तसा माझा त्या मीटिंगशी काहीही संबंध नव्हता. परंतु निव्वळ एक मोठ्या माणसासोबत होतो म्हणूनच बसायला मिळाले. त्यावेळी बरेच मुद्दे चर्चिले गेले. त्यात एक मुद्दा शंतनु बद्दलचा होता. एका शिक्षिकेने त्याच्या सतत विनाकारण हसण्याबद्दल तक्रार केली.मी पण नको त्या ठिकाणी आगाऊपणा करत त्याची बाजु घेतली आणि त्याची स्तुती केली. अर्थात मला त्यावेळी त्या शिक्षिकेने लाखोली वाहिली असेल. बऱ्याचदा या ॲक्टिविटी करताना असा रोष ओढवून घ्यावा लागला होता.पण मुले खूप चांगला आदर करत असल्यामुळे कोणाचे काही चालत नसे. शंतनु बद्दल मी बोललो कारण मी त्याच्या मध्ये खूप चांगले गुण पाहिले होते.तो सूरवातीला प्रत्येक रवीवारी उपक्रमांना येत असल्याने त्याच्याशी चांगला सवांद साधला जात असे. त्यामुळे माझा त्यावेळी विश्वास होता की तो नंतर भविष्यात खूप चांगली प्रगती करेल. त्याच्या ग्रुप मध्ये काही हुशार मुले होती त्याचा त्याला फायदा झाला. साधारण वर्षभर रविवारचा कार्यक्रम तो अटेंड करायचा.पण इतर गट पाचवी सहावी मधला असल्याने त्याचे येणे कमी होत गेले. शिबिरात मात्र त्याची उपस्थीती असायचीच .त्याची खरी गरज भासत असे ती शिबिरा दरम्यानच . तो पुढील अभ्यासक्रमाच्या तयारीला लागल्यामुळे, त्याचे रविवारच्या उपक्रमात येणे कमी झाले.मात्र शिबीर,एक दिवसाच्या भेटी, पावसाळ्यातील सहली या मात्र तो चुकवायचा नाही. आमचा एक कार्यकर्ताच तो झाला होता. त्याच्याकडे नेतृत्व गुण चांगले होते.विशेष म्हणजे लहान मुलांना चांगले जुळवून घेण्याची त्याची तयारी असायची. कोणत्याही कामात मदतीला तो नेहमी पुढे यायचा.
खरंतर शाळेत दहावीपर्यंत खास हुशार मुलांमध्ये तो गणला जायचा नाही. आई शाळेत चित्रकला शिक्षक होती .मात्र दहावीत शिकत असताना त्याच्यात खूप चांगला बदल झाला. त्याला अभ्यासाची गोडी लागली. त्याच्या आठवी ते दहावी या दरम्यान पाच सहा कॅम्प झाले. तीन दिवसाचे रायगड किल्ला शिबीर,आवास सासवने शिबीर, पाबळ खोरे शिबीर, कॉलनी ते बांधन सायकल ने जाऊन वाघोडे येथे शिबीर अशा बऱ्याच ठिकाणी तो आला.पण त्याचे नेतृत्व गुण मात्र त्यात दिसून यायचे. त्याच्या सोबत पेण येथील वरद जोशी नेहमी असायचा.ते दोघे जण सर्व ग्रूप छान सांभाळत असत.
इयत्ता दहावीत त्याला सत्तर टक्के मार्क मिळाले.हा मात्र त्याच्या आयुष्यातील मैलाचा दगड होता कारण इथुन त्याने मागे वळुन पाहिले नाही. त्याची प्रगती ही वाढतच गेली. त्याला बारावीत ७५ टक्के मार्क मिळाले होते. त्यानंतर त्याने लोणेरे येथे कॉम्प्युटर सायन्स या शाखेत प्रवेश घेतला.मग त्याचे कॉलनीत येणे कमी झाले.पण तो सुट्टीवर आला की मात्र एक दिवसाची ट्रिप किंवा पावसाळयात धबधबा सहल आयोजित करायचो.
नागाव येथे आपण एक शिबीर आयोजित केले होते. अभिजित जोशीच्या घरीच सर्व नियोजन होते.त्याच्या घरा समोरील शाळेत आमचे तीन दिवस वास्तव्य होते.या शिबिरात आम्ही बीच स्वच्छ्ता अभियान आणि त्यावर आधारित पोस्टर्स बनवून ठिकठिकाणी लावली होती.त्यात शंतनु , वरद जोशी,तन्वी सावंत या ग्रूपने खूप मेहनत घेतली होती.आम्ही चाळीस जण होतो.जवळ जवळ एखादी ट्रॅक्टर ट्रॉली सहज भरेल एव्हढे प्लास्टिक कागद, काचेच्या बाटल्या जमा केल्या होत्या. सुरुच्या बनात एक मोठा खड्डा बघून त्यात सर्व कचरा जमा केला होता. शंतनु कॅम्प लीडर असल्याने आमचा त्रास जरा कमी होत असे.
एक चांगली आठवण म्हणजे आम्ही दोघांनी मुरूड नांदगाव येथे दोन दिवसांचे तिथल्या मुलांसाठी शिबीर घेतले होते. माझे मित्र विनोद दळवी यांच्या गावी हा उपक्रम घेतला होता.यात अभ्यासातील स्वावलंबन, वेळेचे नियोजन, येणारे अडथळे, करियर अशा बऱ्याच विषयावर चर्चासत्र आयोजित केली होती. आम्ही दोघेही यात कुठेही मार्गदर्शक किंवा शिक्षक या भूमिकेत न राहता ,त्यांच्याकडूनच माहिती घेऊन त्यांनाच त्यांच्या समस्या सोडवायला लावल्या. यासाठी आम्ही विविध खेळ , स्पर्धा यांचा आधार घेतलेला होता.चार दिवस अगोदर कार्यक्रमाची पूर्ण तयारी केली होती. आम्ही ज्यावेळी कार्यक्रम सुरू केला त्यावेळी गावातील मान्यवर नेते, नागरिक हजर होते. आम्हाला दोघांनाही त्याची कल्पना नव्हती. त्यामुळे आम्ही कार्यक्रम मोकळेपणी करत होतो.यात नाविन्य पूर्णता होती.सर्वात प्रथम आम्ही ज्यावेळी मुलांचा डेटा गोळा केला त्यात नावाचा उल्लेख करू नका असे लिहिले होते.ते खुप परिणामकारक होते. फॉर्म भरण्यासाठी साठी जी प्रश्नावली दिली होती त्यात बरीच उत्तरे पर्याय वाचक होती.ती फक्त टिक करायची होती. नाव उघड न करता माहिती लिहायची असल्याने खरी माहिती मिळाली.ते काम शंतनु कडे होते. फॉर्मची माहिती खूप उपयोगी पडली. मुलांचा कल, आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक स्थिती असे बरेच मुद्दे समजल्यामुळे आम्हाला त्याविषयी स्पर्धा, खेळ घेता आले.एक वेगळया प्रकारचा उपक्रम असल्याने दुसऱ्या दिवशी सांगता समारंभात तिथल्या लोकांनी उल्लेख केला. त्याच कार्यक्रमात दळवी यांनी मुलांची लायब्ररी सुरू करण्याचे ठरविले होते.पण तो कार्यक्रम स्मरणात राहील असाच होता. आम्ही दोघेही जण बाईकवर तिकडे गेलो होतो. गावातील लोकांची उपक्रमाबद्दल असलेली जाणीव, महत्त्व वाखणण्याजोगी होती. समोर ,बाजूला प्रेक्षक वर्ग बसलेला आहे याची कल्पना नव्हती आम्ही फक्त मुलेच टार्गेट ठेवल्याने कार्यक्रम सुंदर झाला.
यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या आईवडिलांनी असे माझ्या सोबत विनाकारण फिरणे , काहीही मोबदला न मिळता हिंडणे. शिबिरांना पैसे खर्च करुन जाणे याला कधीही विरोध केला नाही. मागे वळून पाहताना मला नेहमी वाटते की पालक माझ्यावर विश्वास टाकायचे.मीही या मुलांना घेऊन कुठेही भटकायचं , कधी जंगलात तर कधी किल्ल्यांवर . माझ्या मनात कधीही भिती चाटून गेली नाही. त्यामुळेच उपक्रम राबविता आले. मुलांची, पालकांची आणि सहकाऱ्यांची साथ नेहमी लाभली. शंतनु नोकरी लागेपर्यंत ज्यावेळी शक्य होते तोपर्यंत शिबिराला यायचा प्रयत्न करत असे.
रायगड किल्ला शिबीर आयोजित केले असताना आम्ही १७ जण होतो. त्यात तीन कार्कर्त्यांसमवेत ट्रीप काढलेली.दोन मुक्काम होते. नागोठ्ण्याहून एसटी प्रवास थेट रायगड किल्ल्यापर्यंत. शंतनु, वरद पदमा, पृथ्वी, स्वप्निल, विक्रांत,वरद अशी काही मुले होती.पण तीन दिवस कसे गेले कळाले नाही.यात शंतनुची खूप मदत झाली होती. सगळयात जास्त मेहनत शंतनुने घेतली ती वाघोडे शिबिराच्या वेळी. सायकल वरून कॉलनी ते वाघोडे हे बावीस किलोमिटर अंतर पार करून मुक्कामी वाघोड्याला जायचे होते.यात विषेश म्हणजे मला सायकल येतच नव्हती.मग नेतृत्व शंतनु आणि साधना गोसावी यांच्याकडे दिले. अंजली तिच्या स्कूटर वर मागे आणि मी बाईकवर पुढे अशी रचना केली होती. शंतनु सर्वांच्या पाठी सायकल चालवत आणि साधना गोसावी सर्वात पुढे ग्रुपचे नेतृत्व करत होत्या. दुपारी दोन वाजता निघाल्यामुळे थोडेफार ऊन होते पण वारा सुटला असल्याने सायकल चालवायला त्रास होत होता.पण शंतनु सर्वांना सांभाळून घेउन चालवत होता. कुणाची चैन निसटली, कोणी थकला तर त्याला मदत करत होता.या शिबिरात येताना व जाताना दोन्ही वेळेत खूप अडचणी आल्या परंतु आमचे दोन्ही लीडर एकदम परफेक्ट असल्याने काही वाटले नाही.
मुलांना उपक्रमाच्या दरम्यान सांभाळून घेऊन सर्वोतोपरी मदत करण्याचा त्याचा स्वभाव हा त्याच्या पुढच्या आयुष्यात सुध्दा कामी आला. त्याने काही वर्षे दिल्लीत नोएडा येथे नोकरी केली. कधी कॉलनीत आला तर भेटायचा. त्यादरम्यान काही वेळा फोनवर बोलणे व्हायचे.दोन वेळा आपल्याच सदस्याना मदत हवी होती. त्यावेळी त्याला मी दिल्लीत असताना संपर्क साधला होता त्याने मदतीसाठी लगेच होकार दिला होता. एकाची दिल्लीत नोकरीसाठी मुलाखत होती.तो किंवा त्याचे वडील कधी जिल्हा सोडुन गेले नव्हते त्यामुळे त्यांना जायला भिती वाटत होती. त्यावेळी त्याने नवी दिल्ली स्टेशनवरून नेण्यापासून ते परत सोडेपर्यंतची सर्व जबाबदारी घेतली होती.नंतर एका आपल्या सदस्याचे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या अभ्यासातून मन उडाले होते आणि तो ते सोडायच्या तयारीत होता.त्याच्या या निर्णयामुळे त्याच्या वडिलांची मानसिक खूप वाईट झाली होती त्यांना स्वतःला खुप वाईट वाटत होते की आपल्या मुलाच्या संगोपनात आपल्याकडून काही चुक झाली तर झाली नाही.मग काही मित्रांनी यासाठी प्रयत्न केले. त्यातलाच एक प्रयत्न म्हणुन मला शंतनुची आठवण आली .त्यावेळी मी त्याला संपर्क साधला होता.त्याने ती जबाबदारी स्वीकारून त्या मुलाला मार्गदर्शन करुन त्याला त्याच्या निर्णयापासुन परावृत्त करण्याचा प्रयत्न .आणि विशेष म्हणजे सर्वांच्या प्रयत्नांना यश आलेआणि त्या मुलाने आपले शैक्षणिक करीयर पूर्ण केले.आज तो मुलगा एका राष्ट्रीयकृत बँकेत IT तज्ञ म्हणून काम करत आहे.तर अशी मदत तो नेहमी करत असे.
अशा बऱ्याच चांगल्या गोष्टीमुळे ,त्याच्या मेहनतीमुळे शंतनु आज अमेरिकेत एक मोठ्या कंपनीत कार्यरत करत आहे आणि तिथे ग्रीन कार्ड होल्डर आहे. त्याची पत्नी MBBS आहे आणि तीसुध्दा तिथे मेडिकल प्रॅक्टिस करत आहे. अमेरिकेतील एका मोठ्या शहरात सध्या त्याचे वास्तव्य आहे. काही सोशल माध्यमातून मुक्तांगण उपक्रमाच्या संपर्कात तो असतो. आपल्या मुक्तांगणच्या वाढीसाठी अशा सदस्यांचा मोठा वाटा आहे.
SANJAY GOLE
_edited_edited_edited.jpg)

Comments