पेडली निवासी शिबीर डिसेंबर २२.
Updated: 5 days ago
मुक्तांगण विंटर कॅम्प म्हणजे एक वेगळी मजा असते. पुर्वी बऱ्याचदा दिवाळीची सुट्टी लागली की लगेच शिबिराला जायचो.पण नंतर थोडे सोईनुसार ठरवायला लागलो.पण हिवाळी शिबीर हे सर्व दृष्टीने सोईचे असते. बऱ्यापैकी हिरवळ असते.पाणी मुबलक असते. उनाचा तडाखा बसत नाही. एक तर या काळात वातावरण थंड असते त्यामुळे शिबिरा दरम्यान जवळपासचा एखादा दुसरा किल्ला सहज करता येतो. बऱ्यापैकी पाण्याची सोय अगदी सुध्दा जंगल भागात सुध्दा असते. सगळ्यात मोठा प्रश्न असतो कॅम्प कुठे घ्यायचा.
पूर्वी बऱ्याचदा आमची एक ठरलेली व्यक्ती होती की ज्याची रायगड भागात कुठेही जा ओळख असणारच ती व्यक्ती म्हणजे आमच्या तनुचे बाबा विनोद सावंत. बरीच शिबिरे त्यांनी सुचवलेल्या गावात आणि त्यांच्या मदतीने झाली. त्यावेळी कॅम्प म्हणजे आमच्या चार पाच जणांची फॅमिली टूर असायची. अभिजित जोशी, राजेंद्र पांडे, अलका चौधरी असे सर्व जण सहकुटुंब शिबिरात असायचो.अंजली सावंत आणि पांडे काका म्हणजे मुलांचे एकदम फेवरेट.. पांडे काका म्हणजे उत्साहाचा खळाळता धबधबा.. जेवण, नाष्टा, कॉफी यात अगदी मुलांची चंगळ. मुलांना अगदी भरवायचे फक्त बाकी असायचे.संध्याकाळी शिबिरातील गावातील देवळात जाऊन आरती वगैरे करून धम्माल उडवून द्यायचे. सकाळी पाचला सुरु झालेला दिनक्रम पण रात्री अकरा कधी वाजायचे समजायचे नाही. कॅम्प फायर म्हणजे शिबिराचा मुख्य भाग. तेंव्हा तीन दिवसाचे शिबीर असायचे. त्यामुळे तिसऱ्या दिवशी मुले हमखास म्हणणार आपण अजून एक दोन दिवस राहूया का?
यावेळी शिबीर पाली परिसरात घ्यायचे ठरवले.पाली म्हटलें की दिपक, कदम ही नावे लगेच पुढे येतात. त्यामुळें त्यांच्या कानावर घातले. शिबिरात सहभागी होणारे कार्यकर्त्ये नवीन असल्याने थोडे नियोजन वेगळया प्रकारे करने भाग होते.फार पूर्वी आम्ही अगदी जंगलातील गावात देवळात सुध्दा फक्त मुलांना घेऊन घेऊन शिबीर घेतले आहे पण आता थोडा विचार करावा लागतो. लोकेशन पाहिल्या नंतर कोणते उपक्रम घेता येतील, सोई सुविधा आहेत का ते पाहावे लागते. अगदीच हॉटेल किंवा हाय फाय ठिकाणी न राहता गावातील एखादे घर बघण्याचा प्रयत्न करत असतो. गावात ओळखी शिवाय जायचे नाही हा शिरस्ता मात्र कायम. .जिथे इतरांना कुणाला त्रास होणार नाही असे गावात लोकेशन बघणे हे आलेच. मुलांना उपक्रम व्यवस्थित राबवता येतील याची काळजी घ्यावी लागते. यासाठी थोडे पूर्व नियोजन आवश्यक असते.
यासाठीच संतोष कदम आणि मी दोघेजण पेडली, कोंडगाव आणि जांभुळपाडा या ठिकाणी भेट द्यायला गेलो.काय काय उपक्रम घेता येतील याची थोडी माहिती घेतली. वाटेत वावे गावा नाजिक असलेला श्री. लहाने यांचा एक पर्यटन प्रकल्प कदम यांनी दाखवला. खास मुंबईकर आणि पुणेकर डोळ्यासमोर यांना डोळ्या समोर ठेऊन बनवलेला.नदीच्या बाजूला असलेला परिसर, छान रिव्हर राफ्टिंग, बोटिंग यांची मोठ मोठी होडींग्ज लावली होती. आत शिरताच वीस पंचवीस जणांचे दोन ग्रुप दिसले. एकंदरीत भाषा आणि त्यांचा वावर यावरून मुंबईचे असावेत असे वाटत होते. लहाने हे संतोष कदमचे मामा असल्याने तो प्रकल्प व्यवस्थित पाहायला मिळाला . लहाने कुटुंबातील सर्व सदस्य जेवणा पासून सर्व काम करताना दिसत होते. घरातील सर्व मुले पदवीधर आहेत.पण पडेल ते काम करायची तयारी दिसत होती. टेंट साठी वेगळं नियोजन दिसत होते . पर्यटक लोकांसाठी स्विमिंग ॲक्टिविटी करता नदीचा उपयोग करतात .रिव्हर राफ्टिंग साठी त्यांना ते कुंडलिका नदीवर घेऊन जातात.तो बारा किलोमिटर पाण्याचा रूट आहे.एकाचे पंधराशे रुपये तरी घेतात.पण कोणीतरी हिमाचल टुरिझम सारखे करत आहे ही चांगली गोष्ट आहे.बाकी लोकल किल्ल्यांचे ट्रेकिंग प्रोग्राम अरेंज करतात. एकंदरीत छान वाटले. नंतर पेडली जवळच एक छोटा प्रकल्प आहे तो पाहायला गेलो. तो निशांत देशमुख याने सुरू केला आहे. यात खराब टायर पासून ऑईल निर्मिती करतात.कच्चा माल तो इम्पोर्ट करतो लोकल मार्केट मध्ये त्याचे प्रॉडक्ट विकतो.तो आपला एक जुना मुक्तांगण मेंबर आहे. त्याच्याशी शिबीर भेटी बाबत बोलून घेतले. पेडलीच्या गोळे सरांना भेटून राईस मिल भेट निश्चित केली तर राहण्याची व्यवस्था आपला मेंबर प्रथमेश गोळे आणि सक्षम कदम यांच्या येथे झाली.
त्यानंतर मग प्रोग्राम आखुन ग्रूपवर टाकला. डिसेंबर अखेरीस RFD चे विविध कार्यक्रम असल्याने मुलांची नावे कमी आली.पण नंतरच्या आठवड्यात शिबीर घेणं जमणार नव्हते. जानेवारी महिन्यात परीक्षा असल्याने ठरल्याप्रमाणे शिबीर घेण्याचे ठरवले. त्यामुळे जी मुले यातील त्यांना घेऊन जायचे असे ठरवले. एखादा दुसरा जर पार्टली येऊ इच्छित असेल तर त्याला घ्यायचे असे नियोजन केले. शिबिरात कार्यकर्ते दीपक थळे, पूर्वा दातार, संतोष कदम ही नावे निश्चित होती.सर्वजण मिळुन पंधरा जण होत होते. येणाऱ्या सर्वांना शिबिरविषयी सूचना दिल्या.
चोवीस डिसेंबरला सकाळी पावणे सात वाजता शॉपिंग सेंटर बस स्टॉप वर जमा झालो. संतोष कदम बाईक घेऊन आले होते. दिपक थळे त्याची फोर व्हीलर घेऊन येणार होता .श्लोका थोडी उशिरा येणार होती त्यामुळे कदम मागेच थांबले.आम्ही मार्केटिंग बसने पुढे निघून गेलो. नागोठ्ण्याला पोहचलो तेंव्हा दिपक आमच्या पाठोपाठ आला होता.मग अनिका मिश्रा, रूद्र स्वामी, रूद्र देशमुख आणि श्लोका हे दिपक बरोबर कारने गेले.बाकी सर्व जण पाली एसटीने पुढे गेलो. दिपकचा बंगला पाली -पुणे फाट्यावर आहे. त्याच्या घरी सर्व जण जमा झालो. दिपकचे बाबा घरी होते. सर्वजण घरात गेलो. मुलांनी लगेच घराचा ताबा घेतला. डायरी, बॉटल काढून ठेवली.सर्वांनी बॅगा तिथेच ठेवल्या. फक्त एक दोन बॅगा घेतल्या त्यात पाणी बॉटल घेतल्या. त्याच्या घरापासून प्रथमेशला कॉल केला.ते दोघे तयारच होते. त्यांना दिपकच्या बंगल्यावर यायला सांगितले.

तिथून किल्ल्याची वाट एक दीड किलोमीटर लांब असल्याने तिथपर्यंत कारने गेलो. प्रथमेशने आणि दिपकने कार तिथ पर्यंत घेतली होती. देवळा जवळील एका स्टॉल मधुन वडा पाव घेतले. बल्लाळेश्वर मंदिराच्या थोडे पुढे गेल्यावर किल्ल्यांवर जायला वाट आहे. किल्ल्याचा नकाशा आणि ऐतिहासिक माहितीचा बोर्ड तिथं लावला आहे. आम्ही तिथे पोहचलो तेंव्हा अलीबागच्या डेव्हिड स्कूल मधील मुले ग्रुपने उभी होती.त्यांच्या मॅडम त्यांना सूचना देताना दिसत होत्या. आपल्या ग्रुप मधील मुलांनी माहिती वाचुन काढली. काही ऐतिहासिक दस्त ऐवजात या माहितीच्या नोंदी आहेत. बहामनी शासनाच्या अधिपत्य खाली हा किल्ला होता. १६५०च्या दरम्यान महाराजांनी स्वराज्यात आणला. नंतर जयसिंग बरोबरच्या तहात मुघलांच्या ताब्यात होता.त्यावेळी सेनापत सिंह नावाचा किल्लेदार होता. त्याने तुंग तिकोना किल्ला मुघलांना मिळवुन दिल्याची नोंद सापडते.त्याच्या मुलास मनसबदारी त्या बदल्यात दिली गेली. याला पगडीचा किंवा पालीचा किल्ला म्हणुन सुध्दा ओळखले जाते.राजाराम महाराजांच्या काळात परत मुघलां कडून घेण्यात आला. त्याकाळी लगतच्या गावाला मामलेपाल देखील म्हणत असत. दुसऱ्या बाजीरावाच्या काळात सरदार रास्ते यांच्या मुलास कैदी म्हणुन या किल्यावर ठेवले होते.या किल्ल्याची टेहळणी साठी उपयोग केला जात असे. ब्रिटिश काळात याचा कारभार भोर संस्थान कडे होता.
नकाशा वाचुन झाल्यावर आम्ही ट्रेक चालु केला.एक दोन घरे सोडल्यावर लगेच चढण चालु झाली. सकाळची वेळ असल्याने अशा चढणीचा कमी त्रास होतो. नेहमीप्रमाणे रुद्रला किल्ल्याचे वरचे टोक खुणावू लागले. त्याला पायांनी सूचना द्यायला सुरवात केलेली असते.मग हळुवार पणे याचे मार्गक्रमन सुरु होते. पण प्रत्येक किल्ल्याची सहलीची पोस्ट टाकली की याचे नाव पहिले असते.हे त्याचे वेगळे पण आहे. थोडे अंतर गेल्यावर पहिला टप्पा लागला तिथे वडा पाव खाण्यास थांबलो. काही फोटो काढले. समोर आता वरदायिनी डोंगर रांग दिसत होती. दाट झाडी संपवून आता कड्याची वाट सुरु झाली होती त्यामुळे झाडी नव्हती. खाली पाली वडेर हायस्कूलचे भले मोठे मैदान दिसत होते. क्रिकेट स्पर्धा चालु होती. अगदी बाल्कनीत उभे राहुन खाली मॅच बघत आहे असे वाटत होते. कॉमेंट्री स्पष्ट ऐकू येत होती. थोडा वेळ लाईव्ह मॅच बघण्याचा आनंद घेतला. ग्रामीण भागात कॉमेंट्री तर ऐकण्यास वेगळीच मजा असते. बोलणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक टीम बद्दल, खेळाडू बद्दल खुप माहिती असते. दूरवर शाळेचा ग्रुप अगदी पटापट पळत येताना दिसत होता. अचानक तीव्र चढ असल्याने दमछाक होत होती. सूर्य थोड्या वेळात डोक्यावर येणार असल्याने खडक तापू लागले होते. त्यामुळे घामाच्या धारा सुरु झाल्या होत्या. बाटल्या संपायला सुरवात झाली होती. खाली पाहिले तर आता पाली शहर आणि लांबवर असनारा भिरा परीसर दिसत होता.
आता किल्ल्याच्या चोर वाटे जवळ पोहचलो होतो.दोन मोठ्या गोल कड्या मधुन पायऱ्यांची वाट कोरली होती.ही वाट मात्र जवळ पोहचलो तरी दिसत नाही. .त्याच्या जरा अगोदर दोन रॉक पॅच होते. पलीकडे दरी दिसत असल्याने काहींना भीती वाटत होती.रूद्र नेहमीप्रमाणे थोडा वेळ विचार करून चढत होता. अगदी सरपटत जाता आले तरी चालेल पण अजिबात रिस्क घ्यायची नाही .कुणी काहीही बोलू देत आपण आपल्या चालीने चालायचे हे नेहमी त्याचे धोरण.पण उत्साह दांडगा प्रत्येक वेळी म्हणणार मागच्या वेळची चढण सोपी होती ही मात्र अवघड आहे. फोटोची मात्र भारी हौस. पुढे श्लोका दीपक बरोबर चालली होती. दीपकला प्रश्न विचारून हैराण केले होते. तिची बडबड सतत चालूच होती.तिचे प्रश्न एकदम निरागस असतात. तिची हिंदी तेलगु टोन मध्ये असलेली. इतर तिच्या बरोबरीच्या मुलांच्या मानाने थोडी कमी समज असल्याने बऱ्याचदा तिला सांभाळून घ्यावे लागते.पण तिचे नेचर मात्र एकदम केयरींग असल्याने छोट्या गटातील मुलांना ती सहज मदत करते.
कपारीत केलेल्या पायऱ्या एकदम स्टीप असल्याने दमछाक होत होती. थोड्या उंच पायऱ्या असल्याने पाऊल टाकताना थोडा त्रास होता.एका बाजूला डोंगराचा भाग तर दुसऱ्या बाजूला खोलगट भाग होता. त्यामुळे दगडाला धरून जावे लागत होते. कदम मात्र बाकी सर्वांना घेऊन आमच्या अगोदर वर पोहचले होते. सौमित्र,देशमुख , शेंडे, अर्णव ही मुले आज पुढे होती .पायऱ्या चढून गेल्यावर खाली बघीतले तर लांबच्या लांब उतार दिसतो. पायऱ्या संपल्या की एक प्रवेश द्वार लागते. तिथे वरच एक बुरुज आहे. पहारेकरी लोकांसाठी खोल्या दिसतात. बाहेर किती तरी ऊन होते पण तिथे मात्र गारवा कसा निर्माण होतो कळत नाही.काही माहिती नाही पण हवा खेळती ठेऊन मुख्य दरवाजे आणि जिने यांचे विशिष्ट आकार ठेऊन तापमान बरोब्बर मेन्टेन राहत असावे. याचा सुध्दा अभ्यास करायला हवा. किल्ल्यावरील प्रत्येक वास्तू ही विशिष्ट हेतूनेच बांधलेली असते .त्यात कल्पकता , कोशल्य , तंत्र असते.
पुढे एक चढण लागते मग गडाची तटबंदी चालु होते. बालेकिल्ला पायथा सुरु होतो.इथे लागोपाठ सात तळी कपारीत खोदलेली दिसतात. त्याला वेगवेगळी नावे दिली आहेत. एक दोन ठिकाणी शंकराच्या पिंडी दिसतात. पाण्याच्या बाटल्या मुलांनी संपवत आणल्या होत्या. जरा मोकळी जागा असल्याने रुद्र पळत सुटला आणि आपटला. माती असल्याने चांगलाच मळला होता.पण त्याचे आपले नेहमी प्रमाणे एकदम शांत एक्स्प्रेशन.एकदा तरी त्याचे पडणे कम्पल्सरी असते . बाले किल्ल्याला अर्धा फेरा मारून झाला. आता खोपोलिकडील भाग दिसू लागला. रासळ एमआयडीसी मधील काही प्रकल्प दिसू लागले. मुंबई पुण्यातील लोकांचे बंगले रोड लगत असलेले दिसत होते. वीकेंड होम हा नवीन ट्रेंड आहे. त्यामुळे अगदी रामेश्वर वैभव डोंगर भागात सुध्दा बंगले आहेत.काही फोटो तिथे काढले. आता आमची बालेकिल्ल्याला प्रदक्षिणा चालली होती. पुढे एक तळे लागले. पाणी एकदम स्वच्छ आणि नितळ होते. थोडा उपसा असावा .त्याच्या समोरच एक दरवाजा होता.किल्ल्याला दोन दरवाजे आहेत. एक दक्षिण दरवाजा आणि एक उत्तर दरवाजा. पाली गावाच्या विरुद्ध टोकाला हे दरवाजे आहेत.पाण्याच्या टाक्याच्या वर जागा सुरक्षित असल्याने काही ठिकाणी दगडांना मधाची पोळी दिसत होती. कर्नाळा किल्ल्याची आठवण आली. तिथं अशाच प्रकारची सुळक्याला खाली पाण्याची टाकी कोरली आहेत. त्याच अंगट्याच्या आकाराचा सुळक्यावर बरीच मधाची पोळी आहेत. इथे मात्र सुळक्या ऐवजी बालेकिल्ला आहे. पाण्याची सोय असल्याने पार्ट्या होत असाव्यात.तळ्या समोरच दिपकला एके ठिकाणी धूर येताना दिसला. त्याला लगेच ती थोडी रिस्क वाटली. म्हणुन जिथे थोडी आग आहे असे वाटत होते तिथे जरा निरीक्षण केले.मग सर्वांनी तिथे पाणी टाकण्याचे ठरवले.एक तेलाचा डब्बा होता . त्याने पाणी काढून ती आग विझविली. धुराने काही वेळा मधाची पोळी उठतात आणि माशा चिडून हल्ला करतात. त्यामुळे बऱ्याचदा अपघात होण्याची शक्यता असते .आता छान वारा सुटला होता. पलीकडे सुधागड परीसर स्पष्ट दिसत होता. जंगल बरेच दाट दिसत होते. वन्य प्राण्यांचा वावर असावा कारण जागा तशी निर्मनुष्य दिसत होती. डाव्या बाजूला पाली गाव दिसत होते. दोन तीन कंपन्या वरुन दिसत होत्या. मुख्य दरवाजा याच बाजूला असल्याने तिथे तटबंदी दिसत होती. सहज नजरेत पडेल असा कोणताही गडाचा दरवाजा नसतो. साधारण इंग्रजी S आकाराचे वळण देऊन वाट असते. मुख्य वाट वापरात नसल्याने सध्या बंद आहे. त्यामुळे शक्यतो चोर वाट वापरात आहे.
सरसगडाला बालेकिल्ला आहे. फार उंच नाही पण बऱ्यापैकी आहे. बालेकिल्ल्यावर एक तळे आहे. त्याच्या बाजूला एक शंकराचे मंदिर आहे. जुन्या घरांचे पाये दिसतात.काही घरांचे अवशेष दिसतात. गडावरून खालच्या बाजूला घनगड, सुधागड आणि कोरीगड हे किल्ले दिसतात. पलीकडे लांबवर लोणावळा येथील टायगर हिल दिसते तर थोडे दूर माणिक गड, कर्नाळा हे किल्ले आहेत. बालेकिल्ल्याच्या शंकर मंदिरात आम्ही नाश्ता करायला बसलो. बिस्कीट, चिवडा खाल्ला. बाजूच्या तळ्यात मोरपंखी रंगाची कमळ पुष्प दिसत होती. आजू बाजूला जुन्या इमारतींची जोती दिसत होती.रीतसर बालेकिल्ला असलेल्या जागेत अशा वास्तू नेहमी आढळतात. तळ्यात शेवाळे साठले होते.पाणी तसे स्वच्छ होते. मंदिराचे जुने बांधकाम पडले असल्यामुळे एक पत्र्याचे खुले शेड बांधले आहे.
डिसेंबर महिन्यात गड किल्ल्यांच्या सहली भरपूर असतात. त्यामुळे लोकांचे गडावर ग्रुप भेटत राहतात. बाराच्या सुमारास खाली उतरण्यास सुरुवात केली. जाताना खोपोलीच्या दिशेने उतरायचे ठरवले होते.परंतु तो रस्ता वापरात नसल्याने तिथून जाण्याचे टाळले. बालेकिल्ल्याची वाट थोडी उताराची असल्याने थोडी काळजी घ्यावी लागली.रूद्र आता बऱ्यापैकी सरावला आहे त्यामुळे आता व्यवस्थित उतरतो.सर्व खडकात खोदलेली तळी परत एकदा बघत मुख्य दरवाजा पाशी पोहचलो. दरवाज्यात काही जण व्हिडिओ शूटिंग करत होते. त्यांना बगल देत आम्ही उतरायला सुरुवात केली. .चोर वाटेला ज्या पायऱ्या खोदल्या आहेत .त्या अतिशय उंच आहेत. उतरताना तसा त्रास होतो.कदम यांनी रूद्र स्वामीचा चार्ज घेतला होता.दीपक बरोबर श्लोका होती .बाकी सर्वजण आम्ही सोबत होतो.सूर्य डोक्यावर आल्याने उतरताना त्याची जाणीव होत होती. साधारण अर्ध्या तासात खाली उतरलो.मग बल्लाळेश्वर मंदिरात दर्शन घेतले. दिपकच्या घरी जायला निघालो.एक ग्रुप पुढे कारने निघुन गेला.ते परत आम्हाला न्यायला येणार होते.पण त्यांची कार पोहचेपर्यंत आम्ही राम मंदिर मार्गे जवळ जवळ पोहचलो होतो. कोर्ट जवळ पोहचलो तेंव्हा प्रथमेश गोळे आला.मग त्याच्या सोबत काही जण गेले. पाच मिनिटात दिपकच्या घरी पोहचलो.मुले फ्रेश झाल्या नंतर जेवायला बसलो. सर्वांचे डब्बे होते. दीपकने सर्वा बरोबर शेयर केले. प्रथमेश आणि पार्थ त्यांच्या घरी गेले होते.मग साधारण दोन वाजता पाली येथून निघालो. प्रथमेशची आई सुध्दा सोबत आली होती. पेडली फक्त दहा किलोमीटर असल्याने वीस पंचवीस मिनिटात पोहचलो. भाज्या खरेदी केल्या.पाच किलो मटार आणि पावटा घेतला, फ्लॉवर, कोथिंबीर, टोमॅटो, मिरच्या, कांदे घेतले. पोहे, तांदूळ, मसाले, शेंगदाणे,तेल , द्रोण, पत्रावळी आणि काही किराणा घेतला. पार्थचे घर जवळच होते. कँपचे राहण्याचे ठिकाण तेच होते.त्यांच्या कडे पोहचल्यावर मुले थोडी रिलॅक्स झाली. सकाळ पासुन बरीच धावपळ झाली होती.मग त्यांना तूथोडा आराम करायला सांगितला. तासाभरात मग पोपटीच्या तयारीला लागलो.सर्व तयारी मुलांनाच करायची होती.मग एक औषधी पाला ज्याला भांभूर्डी असेही म्हणतात तो जमा केला. प्रथमेशने पोपटीचे मडके एका मित्रा कडून आणले. बऱ्याच पोपटी त्यात केलेल्या दिसत होत्या.मग पावट्याच्या शेंगा , खडे मीठ, बटाटे, वांगी टोमॅटो, मसाला गोळा केला. मुलांनी बटाटे वांगी, कांदे कापून त्यात मसाले भरले.मग मडक्यात सर्व भरले. चांगले हलवून मग त्यावर तो औषधी पाला ठेवला. विटांचे तुकडे आणून चुली सारखेच तयार केले त्यावर मडके उलटे ठेवले. पाला पाचोळा, गवत, भाताचा पेंढा त्यावर टाकला.हे सर्व मुलेच करत होती.दीपक त्यांना मार्गदर्शन करत होता. तोपर्यंत साडेसहा वाजून गेले होते. अंधार पडायला सुरुवात झाली होती.मग पोपटी पेटवली. दीपकला पाली मधुन कोणाचा तरी फोन आला होता त्यामुळे त्याला अर्जंट जायला लागले. आता अंधार झाला कुणीतरी रस्त्यावरून हाक मारत होते. आवाज ओळखीचा वाटला. राजेश गोळे सर कॅम्प कडे येत होते. त्यांनी मुलांची चौकशी केली. दुसऱ्या दिवशी राईस मिल दाखवा असे सांगितले.मुलांना पोपटी कशी केली विचारले. त्यांनी सोबत कुत्रा आणला होता त्याच्या बरोबर मुले जरा रमली होती. दिपक थळेने मदत केली असे सांगितले. सर नंतर निघून गेले .मग दीपकने दिलेल्या सूचनेनुसार अर्ध्या तासाच्या आत पोपटी काढून घेतली. अंगणात मडके आणून रिकामे करायला घेतले. प्रचंड गरम होते. पाला बाहेर काढताना वाफ आणि धूर दिसत होता. प्रथमेश बऱ्यापैकी यात माहितगार होता त्यामुळे त्याने बरोब्बर मडक्यात असलेले साहित्य बाहेर कागदावर ओतले. मग सर्वजण खायला बसले. प्रथमेशच्या आजी आजोबा यांना सुध्दा शेंगा खुप आवडल्या. कांदा, बटाटे, वांगी मस्त रोस्ट झाले होते. छान चवदार लागत होते.
त्यानंतर सर्वजण जेवणाच्या तयारीला लागलो. मटार सोलायला तीन चार जणांनी घेतला. काहीजण कांदा, बटाटा, टोमॅटो कापून देत होते. जेवण करण्याचे प्रात्यक्षिक मुले करत होती. भात निवडण्यास एक दोन मुलांना सांगितले. सौमित्र, श्लोका एकदम उत्साहाने काम करत होते.एक ग्रुप टाऊनशिप वरून RFD ची नृत्य स्पर्धा आटपून येणार होता. संतोष कदम त्यांना घेऊन येणार होते.ते सुध्दा जेवायला इकडेच येणार होते. त्यांचे मध्येच फोन येत होते. गजानन जाधव याचा फोन आला तो त्याच्या मुलाला घेऊन सकाळी सहा वाजता पेडलीला पोहचणार असे सांगीतले. ग्रुप छोटा असल्याने प्रत्येकाला सर्व कामाचा अनुभव मिळत होता. भाजी, भात याची बेसिक तयारी झाल्यावर मुलांनी सर्व किचन मध्ये आणून दिले. या दरम्यान राधा, पूर्वा दातार, संतोष कदम फॅमिली पोहचले. त्यामुळे आता कामाचा वेग वाढला. अंगणात विटांची चूल तयार केली. छोटी लाकडे जमा केली. चुलीवर भाकरी करायच्या होत्या. मुलांना करायला दयायच्या होत्या सौमित्र , रुद्र, राधा, अर्णव सर्वजण तिथे गोल करुन बसले होते. प्रथमेशच्या आईने गावातील एकाला मदतीला घेतली होती.मग तांदळाच्या पिठाचे गोळे करून सर्वांना थोड्या करायला प्रत्येकाला दिल्या.पण भाजत भाजत काही मुलांचे लगेच मुलांचे खाणे सुध्दा चालु होते.एक वेगळा अनुभव मुले आज घेत होते. एका बाजूला भात भाजी शिजत होती. मुलांचे तसे खाणे झाले होते त्यामुळे तशी भूक नव्हती. सक्षमची भाकरी मध्ये एक्सपर्ट असल्याने त्या मुलांना शिकवत होत्या. बाहेर बऱ्यापैकी थंड वातावरण होते.तेवढ्यात मोबाईल वाजला अन्वी पाटीलचा होता.डान्सप्रोग्राम संपला होता तिला आता कॅम्पला यायचेहोते.तिलासांगितले तुझ्या फोनची वाट पाहिली नंतर कदम निघूनआले.सकाळी साडेसहा वाजता उद्या येऊ शकता असे सुचवले.सकाळी लवकर निघायचे असल्याने मला तसे सांगणे गरजेचे होते. इकडे जेवण तयार होत आले होते.अंगणात बाजूलाच झोपाळा असल्याने मुलांना बराच टाईमपास झाला.काहीजण चेस खेळत बसले होते.जेवण पूर्ण झाल्यावर मग सर्व जण जेवायला बसलो.एक दोन मुले सोडली तर शिबिरात मुले कोणतेही जेवण एन्जॉय करतात.काही जणांवर लक्ष ठेवावे लागते ते भूक नाही म्हणून सांगतात नंतर हळूच बॅगेत असणारे लेज, कुरकुरे खातात.काही वेळा तर घरून आणलेला डब्बा तसाच परत घेऊन जातात.मग त्यांना कम्पल्सरी खायला लावतो. जेवण खुप सुंदर झाले होते. भाकरी तर काही मुलांनी करता करताच एक दोन संपवल्या. तांदळाच्या भाकरी मुलांना आवडतात. मटार बटाटा भाजी केली होती. मुलांनी भाकरी जास्त संपवल्याने भात शिल्लक राहिला . तसा भाताचा अंदाज थोडा चुकलाच , सकाळी फ्राय करून खाऊ असे ठरले. बाहेर शेकोटी पेटवली. गप्पा टप्पा करत बसलो. मुले तशी कंटाळली होती त्यामुळे लवकर झोपणे गरजेचं होतं. दुसऱ्या दिवशी पाच वाजता उठून धरणाचा ट्रेक करायचा होता. शेंडे थोडा नरम गरम झाला होता. त्यामुळे तो लवकर औषध घेऊन झोपला. सर्व जण हॉल मध्ये झोपलो.

सकाळी साडेचार वाजता मी उठलो. माझे आवरून झाल्यावर मुलांना उठवले. पटापट आवरायला सांगितले. सूर्योदय होण्या अगोदर आम्हाला कोडंगाव धरण गाठायचे होते.पण गजानन जाधव मुलाला घेऊन येणार होता. त्याच्या येण्यावर ठरणार होते.आमच्या दोघा तिघाचे आवरल्यावर आम्हीं नाश्त्याची तयारी केली. रात्रीचा भात कांदा वगैरे चिरून त्यात मटार टाकून परतून घेतला. पोहे थोडे केले. मुलांना लगेच गरम भात खायला दिला. चहा केला. त्याचे वाटप केले.मग मोकळ्या वेळेत उरलेला पावटा आणि मटार सोलून घेतला. दुपारी पुलाव करू असे ठरले. सहा वाजता मुले तयार झाली. बुट घालून जाधवची वाट पाहत बसलो. सात वाजता तो पोहचला.
आम्हाला अर्धा उशीरच झाला.मग सक्षम कदम आणि प्रथमेश यांची कार घेतली. सर्वजण कोडंगाव येथे पोहचलो.तीन चार किलोमीटर अंतर आहे. गावातून धरणावर गेलो.छान दृष्य दिसत होते. सूर्याची पिवळसर किरणे पाण्यावर पडली होती. पाण्याच्या वर दाट धुक्या सारख्या वाफा जोरात फिरताना दिसत होत्या. त्यांची शर्यत लागल्यासारखी वाटत होते. दृष्य फार विलोभनीय होते. हवेत बऱ्यापैकी गारवा होता. धरणाच्या भिंतीला लागून असलेल्या रस्त्याने पुढे जाऊन एक गोल फेरी मारून भिंतीच्या दुसऱ्या टोकाला यायचे होते.एक ग्रुप फोटो काढून घेतला .ट्रेकला आता सुरवात झाली होती. धरणाच्या बॅक वॉटर कडे जायचे होते. सकाळीच निघाल्याने वाटेवर कोणी दिसत नव्हते. समोर तैल बैला, कोरीगड ,हा लोणावळा परीसर दिसतो.त्यांची डोंगर रांग दिसते. घाट माथ्यावरील भागात जाण्यास इथूनच पुर्वी रस्ते होते. अजूनही आदिवासी लोक हा मार्ग वापरतात. धरणामुळे थोडे अंतर वाढले आहे. पाण्याच्या कडे कडेने चाललो होतो. डिसेंबर अखेर असल्याने पाणी बऱ्यापैकी खाली गेले होते.जिथे पाणी कमी झाले होते तिथे खंड्या सारखे पक्षी एखाद दुसऱ्या झाडावर ठाण मांडून बसलेले दिसत होते. धीवर, बगळे शांतपणे पाण्याच्या कडेला ध्यान लावुन बसले होतें.काही जुनी झाडांची खोडे धरणात आहेत. काही ठिकाणी पाणी ओसरल्याने दगड, जमीन दिसत होती. तिथे मात्र थवे ठवे दिसत होते. काळ्या रंगाचे बरेच पक्षी दिसत होते. बऱ्याच प्रकारचे पक्षी दिसत होते. बगळ्यांच्या माळाच्या माळा दिसत होत्या.
एका झाडाच्या खाली सर्वजण बसलो. पोहे , कुरकुरे, चिवडा भेळ करून खाल्ली.अजून एक ग्रुप येताना लांबून दिसला. बहुतेक नजीकच्या एखाद्या रिसॉर्ट मधील लोक सकाळचा फेरफटका मारायला आलेले असावेत. नाष्टा आटोपल्यावर समोरच्या डोंगराच्या पायथ्याशी जायला निघालो. वाटेत थोडा दलदलीचा भाग लागला. मुले पळत सुटली होती.पण लहान झुडपामुळे चिखल दिसत नाही. त्यांना थांबवले. पुढे एका मोठ्या झाडाचे खोड आडवे पडलेले दिसले. फोटोजेनिक लोकेशन होतें.ओंडक्यावर बसून सर्वांनी फोटो काढले.ज्या ठिकाणी पाणी आटले होते तिथे मासे सहज पकडता येत असल्याने खंड्या इकडे तिकडे भटकताना दिसत होता.एक छोटी वाडी समोर दिसत होती. पाच सहा घरे फक्त होती. इथले लोक दुधाचा व्यवसाय करतात. पाण्याच्या कडेला वांगी मिरची लावलेली दिसत होती. धरणाचा अर्धा भाग फिरून झाला होता. आता एक मोठा ओढा क्रॉस करून धरणाच्या सांडव्या कडे जायचे होते. तिथे एका ठिकाणी हुबेहुब भारताच्या नकाशा सारखा पाण्याचा आकार झाला होता. जवळच ओढ्याच्या पात्रात रंगी बिरंगी दगड गोटे दिसत होते. मुलांनी गोळा करायला सुरवात केली. चमकीचे, जांभळे, तांबडी, हिरवे दगड गोटे मिळत होते. गारगोटी प्रकारचे होते.एका पिशवीत मुलांनी भरून घेतले. आम्ही आता खोल पाण्या जवळून जात होतो पक्षी अगदी जवळून एखाद्या उघड्या पडलेल्या जागेवर थवे करून जवळून दिसतं होते.एका मोठया खडकाजवळ आम्ही जरावेळ विश्रांती घेतली आता आम्ही दुसऱ्या तीरावर होतो. परतीच्या मार्गावर होतो. मुले जरावेळ पाण्यात खेळली . आता पाण्या काठचा मार्ग संपला. आता जंगलाचा भाग सुरू झाला. दहा वाजून गेले होते. परंतु जंगलात चालताना अजिबात जाणीव वाटत नव्हती. गर्द झाडी होती. सूर्यकिरण सहज दिसत नव्हते. भयाण शांतता होती. पाला बऱ्यापैकी सुकलेला असल्याने त्याचा आवाज येत होता.काही ठिकाणी लाल रंगाची फुले दिसतं होती. काटे सावर झाडाची लाल रंगाची फुले पडली.काही ठिकाणी पळसाची फुले होती.पांढरा, तांबडा रंग असलेली काही सुकलेले मशरूम झाडांच्या बुंध्याशी दिसत होते. सुकलेली रान केळी मध्येच डोकावत होती.रात्री जर चुकून जंगलात चुकला तर खैर नाही.या भागात बिबळे, भेकर, ससे असे बरेच प्राणी दिसतात. अर्धा तास फक्त सरळ चालत होतो. धरणाचे पाणी दिसत नव्हते. थोड्या वेळाने एक पायवाट वरच्या बाजूला जाताना दिसली आणि खाली धरणाकडे जात होती.ती वाट वर तैल बैला वर जात होती. खाली धरणाकडे चालली होती .पाच मिनिटात सांडव्या जवळ पोहचलो. तिथून धरणाचा लांबवर पसारा दिसत होता.मुलांना पाणी बघून आनंद झाला.मी थोडे आत जाऊन खोलीचा अंदाज घेतला.मग सर्वांना बोलावले. प्रथमेश बऱ्यापैकी पोहणारा असल्याने त्याला सोबत घेतले.मुलांनी लगेच पाण्यात डुंबण्यास सुरवात केली. श्लोका सांगत होती मला पोहायला येते . तिला कोणते स्ट्रोक येतात विचारल्यावर काही सांगता आले नाही. अनीका आणि राधा पाण्यात लगेच आल्या नाहीत. अर्णव बद्दल जास्त माहिती नव्हती. त्यामुळे त्याचे पोहणे चेक केले मग आत सोडले. दहा पंधरा फुटा नंतर खोल पाणी होते त्यामुळे काळजी पूर्वक पोहणारे एका बाजूला राहून बाकीच्यांना आतील बाजूस ठेवले होते. पाणी उडवा उडवीचा खेळ चालु झाला.मनसोक्त डुंबत रहा.तासभर तरी तिथे गेला. सांडव्याच्या भिंती लागत बऱ्याच काचा पडलेल्या दिसतात. लोकांना बाटल्या फोडण्यात काय आनंद मिळतो काय कळत नाही.एक तर पाण्यातून आल्यावर पाय थोडे मऊ असतात त्यामुळे जखम होऊ शकते. त्या काचा तशाच राहिल्या तर पावसाळ्यात जास्त प्रोब्लेम येतो कारण धरणावर लोकांची झुंबड उडते. पायाला लागण्याची शक्यता वाढते. आम्ही काचा गोळा करून एका पिशवीत जमा केल्या. नंतर आम्ही धरणाच्या भिंतीवरून कोंडगाव कडे निघालो. बारा वाजले होते. संतोष कदम त्यांच्या घरी घेऊन गेले.कदम यांचे काका भेटायला आले. त्यांनी त्यांची आंब्याची बाग बघायला घेऊन गेले. केळीची एक बाग होती.खूप उंच केळी होती. घड लागलेले होते. आंब्याची झाडे चांगली पंधरा वीस वर्षांची होती. ऐसपैस जागा होती. अगदी कॅम्प घेण्यासाठी उत्तम होती. मुले त्यांच्याकडून काही माहिती घेत होते. मध्येच कुठेतरी अनिकाचे पैसे रस्त्यात पडले.मग आल्या वाटेने सौमित्र आणि अर्णव यांना पाठवले. त्यांना घरासमोर झोपळ्याजळ पैसे मिळाले. शंभर रुपये होते. त्यांना अनिकाला टारगेट करायला एक संधी मिळाली. बाग फिरून झाल्यावर परत गावात गेलो. कदमच्या काकांनी कॅम्प साठी आमंत्रण दिले. पाण्याच्या बाटल्या भरुन घेतल्या .तिथून दोन्ही कारने प्रथमेशच्या घरी गेलो. चपला, बुट चिखल पाण्याने भरल्या होत्या त्यामुळे बाहेर काढायला सांगितले. सकाळी सुजाता मॅडमला आम्ही सांगितले होते फोडणीचा भात करा.पण पार्थच्या बाबांनी पाव भाजीची तयारी केली. त्यांना उगीच त्रास दिल्यासारखे वाटले.मग सर्वांनी मदत करायला सुरवात केली. सौमित्र पाव भाजायला बसला. कांदा, लिंबू, कापायला काही जण बसले. पार्थच्या आई बरोबर मदतीला पूर्वा दातार होत्या. सगळेच जण मदतीला असल्यामुळे लवकर आटोपले.एक वाजता जेवायला बसलो.पाव भाजी, पुलाव छान जेवण झाले.

मुलांना नंतर थोडा वेळ रेस्ट करुन भाताच्या गिरणी कडे जायला सांगितले.खूप मोठी राईस मिल आहे.ही मिल राजेश गोळे यांच्या मालकीची आहे. भाताची गिरणी अवाढव्य आहे.एका वेळी साधारण चार पोती तरी साळी टाकता येतात. निंबाळकर नावाचे गृहस्थ ऑपरेटर म्हणून काम करत होते. त्यांनी वेगवेगळ्या मोटर्स दाखवल्या. टरफले वेगळी करने, तांदूळ पॉलिश पद्धती सांगितल्या.तीन ठिकाणी कनवेअर बेल्ट लावले होते. तांदूळ वेगवेगळ्या भागातून वर खाली होताना दिसतात. ज्या प्रकारचे पॉलिश हवे त्यानुसार मशीन चालवत असत. सुधागड रायगड भागातील बरेच शेतकरी या मिल मध्ये भात दळून घेत्तात .बाजूला भले मोठे गोडाऊन होते. तिथे सर्व भाताची पोती रचून ठेवलेली दिसत होती. आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या मशिन्स होत्या. हलका कचरा धुळ जाण्यासाठी एक ब्लोअर होता त्यातून पाइप द्वारे हवेत टाकला जायचा. वेगवेगळ्या ग्रेडच्या तांदळाची त्यांनी माहिती दिली. जुन्या नव्या मशीन बद्दल बरीच माहिती त्यांनी दिली.काही फोटो त्यांच्या सोबत घेतले.
राइस मिल बघुन झाल्यावर पार्थच्या घरी आलो. मुलांना सर्व बॅगा बाहेर आणायला सांगितल्या.सर्व वस्तु बाहेर काढून चेक करायला सांगितले.घरून आणलेले डब्बे स्वच्छ केले आहेत का ते पाहायला सूचना केली. नेहमी प्रमाणे एक दोघांचे डब्बे तसेच भरलेले मिळाले. भाज्या खराब झाल्या होत्या. काहींचे कपडे ओले होते.सर्व व्यवस्थीत ठेवायला सांगितले.सकाळी पुलाव केला होता.तो बराच शिल्लक होता.तो प्रत्येकाला डब्ब्यात घ्यायला सांगितला. सर्वांनी बॅगा भरून बाहेर ओळीने ठेवल्या.पार्थच्या सर्व परिवारासोबत मुलांचे फोटो काढले. शिबिरा दरम्यान त्यांची मदत खूप झाली. घरातील आजी, आजोबा , आई वडील सर्वांनी खूप मदत केली. संतोष कदम यांच्या घरी सुध्दा राहण्याची सोय झाली. शिबिरात अशी मदत मिळाली तरच उपक्रम चांगले राबविले जाऊ शकतात.
पाचच्या सुमारास आम्ही टाऊनशिपला जायला निघालो पार्थच्या घरापासून अर्ध्या किलोमिटर अंतरावर पेडली बस स्टॉप आहे. तिथे पोहचल्यावर विक्रम रिक्षा मिळाली. मुलांना गोळा खाण्याची इच्छा होती. पालीला मंदिरापाशी गोळेवाला असतो .त्यांना पालीला घेऊ असे सांगितले पण रिक्षा सरळ नागोठण्याला नेल्यामुळे मुलांचा जरा मुड ऑफ झाला होता.पण आईस्क्रीम घेता येईल असा मी विचार केला. नागोठ्ण्यात पोहचल्यावर पहिल्यांदा गोळेवाला दिसतोय का बघत होतो. तेवढ्यात एक जण गाडा रेटीत चालताना दिसला. लांबून कळत नव्हते.तो जुन्या पुलाच्या दिशेने चालला होता.कदाचित तो बरवठण्याला चालला असावा. गर्दी होती त्यामुळे थोडे धावतच त्याला गाठले. मुलांचा आनंद अगदी गगनात मावेनासा झाला.मग एक काय दोन दोनची ऑर्डर देऊन रिकामे झाले.पण बाजारात रंगी बेरंगी काला खट्टा , मँगो,असे वेगवेगळे फेवर निवांत खाणे म्हणजे एक वेगळी मजा असते. सात वाजून गेले होते. पालकांचे फोन येत होते. साडेसात वाजता पोहचू असे ग्रूपवर टाकले. गोळा खाताना फोटो काढून पोस्ट केला. मुलांसोबत ही एक वेगळी मजा अनुभवायला मिळते.नंतर आम्ही विक्रमस्टॅण्ड वर गेलो. तिथे विक्रम रिक्षा मिळाली. बालगंधर्व जवळ साडेसात वाजता पोहचलो.काही पालक मुलांना घ्यायला आले होते . मी श्लोकास घरपर्यंत सोडले.एक छान शिबीर पार पडले.
_edited_edited_edited.jpg)



Comments