कुलाबा ,कोरलाई आणि विद्या. पाटील मुलाखत.
गाडी सर्विसिंगला अलिबागला गेलो होतो . नवनीत मध्ये गाडी देऊन थोडे फिरून येऊ असे ठरले.मी , गार्गी आणि विजय तिघेच होतो. रेवदंडा येथील दीपक म्हात्रे या मित्राचं नवीन रेस्ट हाऊस बघायचे होते मग आलोच आहोत तर मारुया फेरी असा विचार करून आम्ही तिघेजण रेवदंडा येथे गेलो. रामेश्र्वर मंदिरापासून जवळच त्याचे घर आहे.हे मंदिर फार पुरातन असले पाहिजे. आपल्याकडील इतिहासातील प्रसिद्ध चौल राजघराणे होऊन गेले त्याची ही राजधानी होती. सर्वात जुने बंदर आणि श्रीमंत बंदर म्हणून ओळखले जात होते. आसपासच्या परिसरात त्याच्या खाणाखुणा उत्खनन करताना सापडतात. परदेशी पर्यटक पूर्वी डायरी लिहायचे त्यात बऱ्याच ठिकाणी याचा उल्लेख आढळतो. ज्यू लोक अजूनही या भागात राहतात. त्यांना स्थानिक लोक तेली म्हणतात. इस्राएल सरकारने मागे एकदा घोषित केले होते भारतात जे ज्यू राहतात त्या सर्वांनी परत आपल्या मायदेशी परतावे.त्यांची सर्व व्यवस्था सरकार करेल. त्यावेळी बरेचजण सोडून गेले पण काहींनी याच देशाला आपले मानत इथेच राहिले. इथल्या सर्व गोष्टी ,चालीरिती यांच्यावर सर्व धर्मियांचा पगडा आहे. कोरलई गावात काही भागात भाषा मिश्र प्रकारात .सर्वात मोठे बंदर म्हणून ओळखले जाई. या गावाचा परिसर पाहिल्यावर आपल्याला अंदाज येतो.गावातील बाजारपेठा, मंदिरे ,आगरकोट किल्ला पुरातन वैभवाची साक्ष देतात.मंदिरासमोरील दीपमाळ, पुष्करणी यातर लाजवाब. याभागात आपण फिरलो तर जवळ जवळ दहा बारा पुष्करणी दिसतील. मंदिर मात्र स्वच्छ ठेवलेली दिसतात.हे एक छान असते.गावात खरतर या गोष्टींना कुणाला फारसा वेळ नसतो. त्यामुळं बऱ्याच गावात पुरातन मंदिरे आहेत पण त्याकडे लक्ष देण्यासाठी कुणालाही वेळ नाही .ही गोष्ट मुंबई पुण्यातील हुशार मंडळीनी ओळखून जवळ जवळ सर्वच मंदिरे आपल्या ताब्यात घेतली आहेत.गावातील मंडळी काही ट्रस्ट वर असतात पण आपली नावापुरतीच. बाकी यात्रेला वगैरे यात्रा कमिटी असतेच ती तेवढ्यापुरती. म्हणजे यात्रेतील कष्टाच्या कामा पुरती म्हणा हवे तर.पण जाऊद्या कठून तरी मंदिरे स्वच्छ राहत आहेत. त्यानिमित्ताने पर्यटक सर्व परिसर बघतात. इतिहासाची ओळख होते.
तर या मंदिराच्या पाठीमागील भागात मित्र राहतो तिथे गेलो. त्याच्याकडे चहा नाष्टा झाल्यावर त्याच्या रेस्ट हाऊसवर गेलो. अगदी समुद्र किनारी त्याचे घर आहे. एका मोठ्याशा प्लॉट वर मधोमध चार रूम बांधल्या आहेत . पाठी नारळ , सुपारी यांची झाडे आहेत. छोटा टँक बांधला आहे.मागे एक मोठा बॉयलर दिसला. आपले टेक्निकल नॉलेज जागोजागी वापरलेले दिसत होते. बीचवर जाऊन आलो समोरच कोर्लाई किल्ला दिसत होता.आगरकोत किल्ल्याची तटबंदी अजुनही गत वैभवाची साक्ष देते.ती किनाऱ्या लगत दिसत होती.मग परत फिरलो वाटेत उंच उंच ताडा माडाची झाडी दिसत होती.या परिसरात ताडगोळे खूप चांगले मिळतात.मग परत त्याच्या घरी आलो. त्याच्या अंगणातील परिसर पाहिला. त्याच्याकडील काही नारळ त्यांनी दिले. बाजारात असे नारळ क्वचित मिळतात कारण ते आकाराने खूप मोठे होते.नंतर परत अलिबागला आलो.मयुर बेकरीत जाऊन विद्या पाटील मॅडम बरोबर गप्पा मारता येतील का ते पाहूया.मग मयुर बेकरी मध्ये गेलो. तिथे काऊंटर वर मॅडमची चौकशी केली. मॅडम घरी होत्या.. थोड्या वेळाने वेळाने या असा निरोप आला. त्यांचा निरोप आल्यानंतर आम्ही बेकरी लगतच्या बंगल्यात शिरलो.आत गेल्यावर त्यांनी येण्याचं कारण विचारले.प्रथम मी तिघांची ओळख करून दिली.बरीच वर्षे अलिबाग शहरात येतो त्यामुळे या बेकरी बद्दल खूप कुतूहल होते. विद्याताई बरोबर छान गप्पा मारायची इच्छा होती. अशी कर्तबगार व्यक्तिमत्त्व आपल्या परिसरात आहेत त्यांच्याशी गार्गी , विजय आणि मुक्तांगण ग्रुप ची ओळख व्हावी या उद्देशाने बेकरीत गेलो होतो. विद्याताई यांनी मला काही कंपनीतील अलिबाग मधील एक दोघांबद्दल विचारले.ती व्यक्तिमत्वे माझ्या परिचयाची होती पण त्यांची कामे मला चांगली माहीत होती.मी त्यांना ती फार मोठी माणसे आहेत असं सांगून माझा तसा काही संबंध नसतो असे सांगितले.मयुर बेकरी आणि विद्या ताई या बद्दल बरीच माहिती मिळाली .मग थोड्या गप्पा मारताना मॅडम ने सांगितले त्यांचा नातू सुद्धा बारावी मध्ये आहे. त्यादिवशी त्यांना कुठेतरी बाहेर जायचं होतं त्यामुळे त्या म्हणाल्या तुम्ही मुलांना घेऊन अक्षीला बंगल्यावर या.मग मी त्यांचा नंबर घेतला.नंतर तिथून निघालो.
कॉलनी मध्ये आल्यावर सर्व कार्यकर्त्यांना सांगितले असा विद्याताई यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम करायचा आहे.सर्वजण तयार झाले. उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली की लगेच आपण दुसऱ्या दिवशी जाऊया असे ठरले.
व्हॉट्सअँप वर सविस्तर कार्यक्रम टाकला. आमदोशी येथील भोसले यांना त्यांच्या रिक्षा साठी बुक केले.अरविंद त्याची गाडी घेऊन येणार होता. आणि अनुराधा मॅडम त्यांची गाडी घेऊन येणार होत्या. एकंदरीत जाण्याची व्यवस्था पूर्ण झाली. मुलांची यादी केली. मुलांना कुलाबा किल्ला, कॉर्लाई किल्ला आणि विद्या पाटील या विषयी माहिती पाठवली. मुलाखतीचे प्रश्न काही मुलांना तयार करायला सांगितले. सकाळी सात वाजता जमा होण्यास सांगितले कारण दिवसभरात तीन प्रोग्राम पार पाडायचे होते. सर्वांना तशा सूचना केल्या.

सकाळी लवकरच उठून तयारी केली . सकाळी सात वाजता बालगंधर्व येथे पोहचलो.मुले साडेसात वाजता बरीचशी आली.पण रिक्षा चालकांनी जरा उशीर केला.मग फाळके यांना पुढे जाऊन कुर्दुसला वडा पाव ची ऑर्डर द्यायला सांगितली. वेळ वाचावा हा उददेश होता.मग साधारण साडे आठ वाजता कॉलनी मधून निघालो.काही मुलांनी यायला उशीर केला. नऊ च्या अगोदर पोहचायचे नियोजन होते कारण साडेदहा नंतर भरती चालू होणार होती.भरतीचे पाणी अलिबाग बीचवर बरेच वर येते. किल्ला ते किनारा हे अंतर साधारण एक किलोमीटर च्या आसपास आहे. त्यामुळे भरती आली तर किल्ल्यात चालत जाऊ शकत नाही.काही जणांच्या उशिरा येण्यामुळे पुढील नियोजन बिघडणार होते.मग पंधरा मिनिटात कुर्दुस येथे पोहचलो. पन्नास वडा पाव ची ऑर्डर असल्याने तिथे थोडा वेळ अजून गेला.मग नाष्टा घेऊन आम्ही गाडीत बसलो. पेझारी नाका पोलिस चौकी च्या थोडे मागे थांबलो. त्याठिकाणी सर्व वडापाव वाटप केले.मग त्यात दहा मिनिटे गेली. नंतर अलिबागला निघालो. साडेदहा वाजता बीचवर पोहचलो. भरतीचे पाणी चढायला सुरुवात झाली होती. थोडा वेळ चालत जायचा प्रयत्न केला पण पाणी वेगाने वाढू लागले. आम्ही बावीस जण होतो. किल्ल्यात घेऊन जाणाऱ्या बोटी उभ्या होत्या. त्यांचे लोक फिरत होते. जाण्यासाठी व परत येण्यास प्रत्येकी दोनशे रुपये सांगत होते.ते जरा जास्त सांगत होते.एकाने आम्हाला सांगितले शंभर रुपये देतो सांगा तुमची संख्या ज्यास्त आहे.मग थोडे घासाघीस करून शंभर रुपये प्रत्येकी तयार झाला.बोटीने प्रथमच कुलाबा किल्ल्याच्या आत जात होतो. मुलांनाही बोटीची मजा लुटता येईल म्हणून आम्ही तयार झालो. सर्वांना सेफ्टी बेल्ट बांधण्यात आले. फाळके यांच्या सोबत एक ग्रुप,मी ,करले मॅडम यांचा एक ग्रुप, अरविंद चा एक ग्रुप,असे सगळेजण निघालो. पाणी तोपर्यंत बरेच वर आले होते. लाटा उसळत होत्या त्यामुळे बोट अगदी हेलकावे खात होती. अंतर तसे जवळ होते . परंतू मुलांनी छान एन्जॉय केले. उसळत्या लाटा मध्ये किल्ल्याचं रूप वेगळेच दिसत होते.आपण कुठल्या वेळेत येतो त्या त्या वेळी समुद्र किनारा, कुलाबा किल्ला हा वेगळा भासतो.. सूर्यास्ताच्या वेळी , भरतीच्या वेळी, ओहोटीच्या वेळी अगदी रात्रीच्या वेळी सुद्धा वेगळाच अनुभवता येतो. आतापर्यंत खूपदा या किल्ल्यावर गेलो.पण प्रत्येक वेळी वेगळे काही दिसते का ते पाहण्याचा प्रयत्न करतो. कधी तटबंदी,तर कधी किल्ल्यातील मंदिरे,तर कधी त्यातील तळी ,अगदी जुन्या घरांचे अवशेष यांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक गोष्टीचं असे एक वेगळेपण दडलेले आहे. प्रवेद्वाराजवळील दरवाज्यावर असलेले कोरीवकाम, त्याच्यावरच असलेला सुंदर बुरुज, बुरुजावर असलेल्या तोफा देखण्यालायक आहेत.मुख्य दरवाज्यापाशी पाणी संथ वाटते.पण पाठीमागच्या दरवाज्याला समुद्राचे रौद्र रूप दिसते. किल्ल्याची उभारणी करताना किती विचार केला असेल हे प्रत्येक गोष्ट नीट पाहिल्याशिवाय कळतं नाही.कमी जागेत प्रत्येक आवश्यक बाबींचे खूप सुंदर नियोजन केले आहे. पिण्याच्या पाण्याची अवाढव्य पायऱ्यांची विहीर तीसुद्धा गोड्या पाण्याची. जिथे चारी बाजुला समुद्र आहे, खारे पाणी आहे तिथं गोड्या पाण्याची विहीर खरंच अदभुत.चमत्कारच म्हणावा लागेल.. गणपतीचे मंदिर नीट पाहिले तर गाभाऱ्यात आतमध्ये प्रवेश करताना चौकटीवर आणि दगडी खांबावरील नक्षीकाम एकदम जबरदस्त. त्या दगडावर वानर एकावर एक बसलेले कोरलेले आहेत.त्या प्रतिकृतीचा अर्थ नक्कीच काहीतरी असावा. गडावरील दक्षिण दिशेकडे असणारा दरवाजा आणि त्यावरील बुरुज एकदम मस्त.तिथून दूरवर अथांग पसरलेल्या समुद्राचे दर्शन होते. गडावरील तटबंदी अजून चांगली आहे. पर्यटकांची वर्दळ इतर कोणत्याही सागरी किल्ल्यापेक्षा ज्यास्त्त आहे कारण अजूनही किल्ल्यात लोक रहात आहेत.काही ठिकाणी तटबंदीवरुन जाताना वाट फार बारीक आहे.थोडे सांभाळून जावे लागते. मुलांचा उत्साह इथे उफाळून येतो त्यामुळे त्यांना थोडे समजाऊन न्यावे लागते.दक्षिण दरवाज्यास लागून असलेल्या किनाऱ्यावर सर्वजण एकत्र बसलो.मग तटबंदीवर चढून त्या सर्वांचे फोटो काढले. तिथे बाजूलाच झेंडा रोवण्यासाठी उंच चबुतरा तयार केलेला आहे. तिथं उभे राहून मुलांचे काही फोटो घेतले. मुलांशी चर्चा केली.मुलांना थोडा किल्ल्याचा इतिहास सांगितला. पाहिल्या गेट जवळ पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी जो बोर्ड लावला आहे त्यावरील माहिती मुलांनी अगोदरच वाचली होती. बारा वाजेपर्यंत किल्ला बघून झाला.मग सर्वजण परत पाहिल्या गेटवर आलो.बोटीत चढताना मात्र जरा थोडी कसरत करावी लागते कारण पाण्याच्या लाटांनी बोटी हलत असतात आपल्याला वर चढताना अंदाज येत नाही.त्यात मुलांना खोड्या सुचतात.पण मुलांनी हा दोन किलोमीटर लांबीचा बोटीचा प्रवास चांगलाच एन्जॉय केला.किनाऱ्यावर आल्यावर लगेच आम्ही अक्षी गावाकडे निघालो.

विद्या पाटील मॅडमला फोन करून सांगितले तासाभरात पोहचू. आदल्या दिवशी रात्री त्यांना तसे कळवले होते. अलिबाग सोडल्यावर नागाव च्या दिशेने आमच्या चारही गाड्या निघाल्या. अक्षी गावाच्या सुरवातीला एक स्तंभ आहे तिथून एक रस्ता नागाव कडे आणि एक रस्ता अक्षी गावात जातो. आत गेल्यावर विचारत जावे लागले कारण त्यांचे घर समुद्रालगत आहे. शोधत शोधत पर किनाऱ्यापर्यंत पोहचलो मग एक छानसे जांभा दगडाचे घर दिसले.घर जमिनीपासून उंचावर असल्यामुळे लांबूनच त्यांनी आम्हाला पाहिले. गेटमधून गाड्या आत पार्क केल्या.. सर्वांना बाहेर रांगेत चपला काढायला सांगितल्या..बाहेर ओसरीवर आम्ही सर्वजण बसलो. विद्या पाटील आणि त्यांचे कुटुंबीय यांच्याशी ओळख करून घेतली. त्यांच्याकडे थोडाफार चहापाणी झाला.मग त्यांच्याशी चर्चा करावयाची होती.मॅडम म्हणाल्या आपण त्यांच्या लायब्ररी मद्ये जाऊया. त्यांच्या नारळ सुपारी च्या वाडी मध्येच ही लायब्ररी आहे. तिथं एक हॉल आहे.तिथं चटई टाकून गोलाकार बसलो. समोरच पुस्तकांनी भरलेली कपाटे दिसत होती.
मुक्तांगण मधील नवीन ग्रुप मध्ये चवथी खालची मुले ज्यास्त असल्याने मुलाखत वगैरे जरा त्यांना अवघड प्रकार वाटतो . एकतर ते एका ठिकाणी बसू शकत नाहीत आणि त्यांच्या कडून आपण तशी अपेक्षा सुद्धा शकत नाही. त्यामुळे मोठ्या गटातील राज, सानिका, सारंग, विनीत, विधी, श्रीजित सारख्या मुलांना मुलाखतीसाठी बसवले. मुलांनी खुप सुंदर प्रश्न विचारले. विद्या ताईंनी सुद्धा खूप चांगली माहिती दिली. बालपण कसे गेले ? या प्रश्नावर खूप छान प्रसंग शेअर केले.त्या शाळेत असताना बारामती येथे रहात होत्या. त्यावेळी बारामती फार मोठे शहर नव्हते. त्यांचे वडील बँकिंग क्षेत्रात काम करायचे. त्यावेळी असलेल्या प्रशस्थ कुटुंबा पैकी त्यांचे कुटुंब होते. साठच्या दशकात सुद्धा त्यांच्या घरी मुलींच्या शिक्षणाची किंमत चांगलीच ज्ञात होती. त्यांनी सांगितले त्यांच्या घराच्या हॉल मध्ये त्यांचे वडील बसत असतं व त्यांची कामे करत असत . तिथं त्यांच्यासाठी एक पंखा होता. तो फक्त त्यांनीच वापरायचा असा नियम होता . त्यावेळी खेड्यात कुणाकडे पंखा असणे ही सुध्दा फार मोठी गोष्ट होती. एकदा वडील बाहेर गेल्यावर पंखा चालू केला म्हणून त्यांना ओरडा खावा लागला होता. एकदा त्यांना पुण्याला जायचे होते. वडिलांना ट्रेन ने जाण्यासाठी पाहिल्या वर्गाचे तिकीट मिळे . त्यांना विद्याताई सोबत जायचे होते.पण वडिलांनी विद्या ताईंना साधारण डब्यात जायला सांगितले.नियम म्हणजे नियम. त्यांचे बालपण अशा चौकटीत गेले. त्यांना नंतर शिक्षण घेण्यासाठी पुण्याला पाठवले.पुण्यात त्यांचे सायन्स ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण झाले. नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करिता त्या मुंबईत आल्या. मुंबईतील प्रसिद्ध अशा SNDT कॉलेजात त्यांचे पुढील शिक्षण झाले. होम सायन्स हा त्यांचा एक त्यातील विषय होता. लग्न झाल्यानंतर त्या अलिबाग येथे आल्या. त्याकाळी म्हणजे सत्तर च्या दशकात अलिबाग हे फार मोठे शहर नव्हते. परंतु शैक्षणिक दृष्ट्या पूर्ण भागातील एकमेव ठिकाण होते.तिथं आल्यावर त्यांनी काहीकाळ शिक्षक म्हणून नोकरी केली.पण त्यांच्यातील वेगळे करण्याची वृत्ती जात नव्हती. एकदा एका वर्तमानपत्रात छोटीशी जाहिरात पाहिली त्यात त्यांनी बेकरी व्यवसाय प्रशिक्षण यावर एक कार्यशाळा आयोजित केली होती.ते शिबीर विद्याताईनी अटेंड केले . त्यानंतर त्यांनी बेकरी पदार्थ व्यवसाय सुरू करावा असे ठरवले. त्यांच्या सासऱ्यांची त्यात साथ मिळाली. पैसे कसे उभे करायचे,बँक कर्ज वगैरे सर्व बाबी पूर्ण केल्या. सुरवातीला शाळेतील , कॉलेजातील मुले व सरकारी कर्मचारी हे मुख्य गिऱ्हाईक असतील या दृष्टीकोनातून किंमत ठरवून व्यवसाय करायचा असं त्यांनी ठरवले. बेकरी सुरू करण्यास लागणारी जागा त्यांच्या घरातील लोकांनी उपलब्ध करून दिली. त्याची योग्य ती प्रमाणपत्रे सरकारी कार्यालय मधून मिळवली.लागणारे सर्व साहित्य मुंबई किंवा पुणे येथून आणावे लागायचे. त्यामुळे स्वतः जाऊन तेल वगैर साहित्य आणावे लागे.प्रत्येक गोष्ट चांगल्या दर्ज्याची असावी असे त्यांना वाटायचे. कामगार वर्ग त्यांना खूप कष्ट करणारा मिळाला. बेकरीचे मुख्य काम म्हणजे भट्टी चे ब्रेड चे भाजणे.सर्वात स्कील चे काम त्यावर ब्रेडचे मूल्यांकन केले जाते. त्यामुळे त्याच्या कारागिरांची. नितांत गरज होती. त्याचबरोबर प्रामाणिक कर्मचाऱ्यांची आवश्यकता होती . भट्टी मध्ये योग्य त्या प्रमाणात उष्णता निर्माण करण्याची,योग्य वेळा पाळून उत्पादन करावे लागते. काही ठिकाणी तांत्रिक बाबी खूप महत्त्वाच्या असतात. योग्य प्रमाणात सामानाचा वापर, त्याचे प्रक्रियेच्या दरम्यानचे तापमान व्यवस्थित ठेवणे याबाबत माहितगार माणसाची नितांत गरज होती. बऱ्याच बेकरी त्यासाठी त्यांनी पालथ्या घातल्या.एका ठिकाणी तसे सांगून ठेवलं की अशा बेकरीतील पारंगत व्यक्ती भेटला तर सांगा. अशाच एका दिवशी एक व्यक्ती आला आणि म्हणाला चला बेकरी मध्ये तुम्हाला ज्या माणसाची गरज तो मीच आहे. विद्याताई यांना एकदम आश्चर्याचा धक्काच बसला. आलेल्या व्यक्तींनी म्हणजेच चाचा ने अगदी बेकरी चा ताबाच घेतला. अगदी बारीकसारीक वस्तू विकत घेण्या पासून ते रिकाम्या झालेल्या डब्या पर्यन्त नियोजन कसे करावे याच ज्ञान या माणसाने दिले.छोटीशी एक गोष्ट पण मजेदार सांगितली त्यांच्या कामगाराने कचऱ्यात पडणारे टाकाऊ साहित्य विकून ते पैसे बँकेत जमा करून ठेवले. त्याचे पैसे पुढे अडचणीच्या वेळेला वापरले .विद्याताई यांना कामगार वर्ग खूप चांगला मिळाला. अर्थात त्या स्वतः त्यांच्या सोबत बरोबरीने काम करत असायच्या. नुसते मालकीण म्हणून न रहाता काम करत असत. त्यांनी कामगार कुटुंबासाठी खूप चांगले योगदान दिले. कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत, त्यांच्यासाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली.प्रत्येक दिवाळी मध्ये त्यांना देशात विविध ठिकाणी सहलीला घेऊन जायचे , त्यांच्या कुटुंबातील स्त्रियांना काही पदार्थ घरी करून विकण्यास प्रेरणा दिली असे कित्येक कार्यक्रम त्यांनी त्यांच्या कामगारांसाठी केले. रविवारी अलिबाग मध्ये पर्यटकांची वर्दळ असते परंतु मयुर बेकरी आजतागायत रविवारी बंद असते.मयुर हे नाव त्यांच्या अलिबागमध्ये असलेल्या परिचित व्यक्तीने सुचवले होते. मोराचा पिसारा जसा पावसाळ्यात फुलतो तसा बेकरी उद्योगाची भरभराट व्हावी म्हणून मयुर बेकरी हे नाव सुचवले.त्या स्वतः होम सायन्स पोस्ट ग्रज्युएट असल्याकारणाने त्यांना बऱ्यापैकी यातील ज्ञान होते. सुरवातीच्या काळात सर्व कुटुंब आणि कामगार सर्वचजण अगदी दिवसभर काम करत असत.शाळेची मधली सुट्टी आणि सरकारी कर्मचारी लोकांची जेवण , चहा नाष्टा यांची वेळ त्यांना खूप महत्त्वाची असायची. त्या कालावधीत सर्व वस्तू तयार करून ठेवाव्या लागत. त्यांच्या अहोरात्र मेहनिते चे फळ म्हणजेच अजुनही एवढ्या विस्तारलेल्या शहरात त्यांचे मार्केट मध्ये नाव टिकून आहे. त्यांनी त्यांना भेटलेल्या,मदत केलेल्या प्रत्येक माणसाची तशी कदर केली. सगळ्यात जास्त फायदा करून देणारे चाचा हे त्यांचे आदरणीय पण अशा व्यक्ती पूर्ण काल कुठेही राहु शकत नाहीत.ते जसे अचानक आले तसेच एक दिवस अचानक निघून गेले.
त्यांनी त्यांचा एक जर्मनीमधील एक छान किस्सा सांगितला. त्यांचा भाऊ जर्मनीत राहतो. त्यांचेकडे विद्याताई गेल्या होत्या.तिथं त्यांनी बेकरी विषयी कोर्स केला. ब्रेड बनवताना जो गहू वापरतात म्हणजेच मैदा वापरतात त्यात ग्लूटेन नावाचं एक रसायन असते. त्याच्या प्रमाणावर आणि गुणवत्तेवर ब्रेडची गुणवत्ता ठरते. जगामध्ये जर्मनीमध्ये तयार होणाऱ्या गव्हा मध्ये ब्रेड साठी लागणारे सर्वात चांगले गुण असतात. मुलांनी यावर बरेच प्रश्न विचारले .त्यात बाजारात जो पांढरा आणि तांबडा असे दोन प्रकार कसे ठरतात. त्यातील ग्लूटेन चे प्रमाण ते ब्रेडचे प्रकार ठरवते पण त्यांच्या मते दोघांमध्ये फारसा फरक नसतो.ती एक व्यवसायाची रित आहे. आपली भाकरी चपाती याबद्दल खूप महत्त्वाची सांगितली. त्यांनी सांगितले जगामध्ये भारत उपखंड हा असा भूभाग आहे जिथे घरात दररोज ताजा ब्रेड खाल्ला जातो. तव्यातून चपाती किंवा निखाऱ्या वरून भाकरी ताजी खायची दिली घरोघरी दिली जाते. आपण फार भाग्यवान आहोत यासाठी की उर्वरित सर्व जग हा शिळा ब्रेड नियमितपणे खात असतो.
व्यवसायातील स्पर्धेबदल विचारले असता त्यांनी सांगितले की काही वर्षांपूर्वी उरणमधील एका मोठा बेकरी वाला अलिबागमध्ये बेकरी टाकणार होता. साहजिकच मोठा बेकरी वाला मयुर बेकरी सारख्या छोट्या उद्योगांना दाबून टाकेल.मग अलिबाग मधील खानविलकर म्हणून एक राजकीय नेते होते त्यांच्याकडे तक्रार घेऊन विद्याताई गेल्या.त्यांनी ताईंना समजाऊन सांगितले की बाजारपेठेत एका रांगेत सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यांची दुकाने असतात.पण एवढे महाग असणारी वस्तूची दुकाने सर्वच्या सर्व चालतात याच अर्थ असा की तुम्ही तुमच्या मालाची गुणवत्ता कायम ठेवलीत तर तुम्हाला कुणाचीही भीती नाही. त्यामुळे ताईंनी खानविलकर यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या सर्व उत्पादनांची गुणवत्ता कायम राखीत उरणच्या बेकरीचे आव्हान परतवून लावले.विद्याताई यांच्या दोन्ही मुली चांगल्या शिकल्या.त्यातील एक MBBS झाली. दोघींची लग्न झाली आहेत. त्यांच्या बेकरीचे सर्व व्यवहार आता त्यांचे पुतणे व सुना सांभाळतात. त्यांना सामाजिक कार्य सुद्धा आवडते. वेगवेगळ्या समित्यांवर त्या आहेत. त्यांच्या वाडीत एक छान लायब्ररी आहे. त्यांना ट्रेकिंगची फार आवड आहे.खूप वर्षांपूर्वी त्यांची मुलगी MBBS असताना म्हणजे १९९३ साली मी त्यांच्यासोबत भीमाशंकर हा दोन दिवसांचा ट्रेक केला होता.
जवळ जवळ तास दीड तास गप्पा मारल्या.लहान मुलांची फार चलबिचल होत होती. त्यांच्या बाहेर मस्त्या चालूच होत्या परंतु कार्यकर्ते पण बरेच असल्याने सर्व गोष्टी व्यवस्थित पार पडत होत्या. प्रवीण फाळके मुलाखतीदरम्यान बाहेर छोट्या गटाला हॅण्डल करत होते.छोट्या गटातील शौर्या, अदिती, अर्चीता, शलोका , ईश्वरी ही मुले जरी लहान असली तरी सुद्धा त्यांची अशा कार्यक्रमात ऐकण्याची, प्रश्न विचारायची तयारी असते. सृष्टी , विधी , सारंग यासारख्या मोठ्यामुलांना मनापासून जरी हे कार्यक्रम आवडत नसले तरी सर्वांबरोबर ते भाग घेतात. त्याचा त्यांना फायदा होतो.काही वेळा मुलांचे पालक सोबत असले की इतर काही रुद्र सारख्या संवेदनशील मुलांना थोडे असुरक्षित वाटते.पण अशा मुलांना धीर द्यावा लागतो .जर सोबत पालक असणारी मुले चुकली तर त्यांनाही इतरांसारखे वागवावे लागते. नाहीतर त्यांच्यावर वेगळा परिणाम होऊ शकतो.अशा खूप बारीसारीक प्रसंगांना बघावे लागते. त्यावेळी तुमच्या बद्दल सुरक्षेची भावना तयार होते. वरद, विश्र्वंम सारखी बरीच अस्थिर मुलं असतात त्यांना एका ठिकाणी बांधून ठेवणे अवघड असते पण लहान वयातच त्यांच्या आवडी निवडी त्यांचा कल यांचे बारकाईने निरीक्षण केले तर काही त्यांच्यावर प्रयोग करू शकतो.या मुलांच्या एवढी काहीतरी सतत करण्याची, सतत बिझी राहण्याची तयारी, धाडसी वृती इतरांमध्ये कमी असते. त्यांचा उपयोग करून घेता येऊ शकतो पण खूप तयारी करायला लागते. .विद्या ताईंनी मात्र छान सर्व गोष्टी शेअर केल्या. मुलांना समजून अगदी त्यांच्या लेव्हल प्रमाणे उत्तरे दिली. त्यांच्या बेकरी व्यवसाय, सामाजिक क्षेत्र अशा विविध क्षेत्रातील कार्याचा अभिमान सर्वांना असला पाहिजे.एका स्त्रीने स्वबळावर व्यवसाय उभा करणे, सांभाळणे तेही सामाजिक बांधिलकी जपत अशी अवघड कामगिरी पार पाडणे हे सर्वासाठी अभिमानास्पद आहे .त्यांचे सर्वांनी आभार मानले. नंतर सर्व मुलांना एकत्र हिरवळीवर जेवायला बसवले.या ट्रीप मध्ये कार्यकर्ते बरेच असल्याने विशेष काळजी घ्यावी लागत नव्हती. अभिग्नचे वडील,अरविंद , फाळके फॅमिली, शोर्याची आई असे बरेच जण असल्याने सर्वांची चांगली मदत झाली. नंतर जेवण झाल्यावर साधारण साडेतीन चार वाजले होते.मग आम्ही कोर्लई किल्ला बघायचे ठरवले. साडेचार वाजता आम्ही कोरलै गावात पोहचलो.या गावात ज्यू, पोर्तुगिज लोक फार पूर्वी रहात असत. त्याचा परिणाम त्यांच्या बोलीभाषेत दिसून येतो. काही ख्रिश्चन लोक ईथे अजुनही राहतात.मोठा चर्च इथे आहे.या गावात मासेमारी आणि विक्री हा प्रमुख व्यवसाय आहे. गावाच्या बाहेर सिमेंटचे ओटे तयार करण्यात आले आहेत. त्यावर मासे सुकत ठेवलेले दिसतात. लांबवर त्याची खळी पसरलेली आहेत. गावाच्या टोकाला शेवटी किल्ल्याचा पायथा लागतो.तिथून एक छोटा रस्ता किल्ल्याच्या मध्यभागी जातो. आता हा रस्ता रुंद आणि सिमेंटचा केला आहे. पूर्वी फार अवघड रस्ता होता. आता तिथे गाडी पार्किंग केले आहे. तिथे किल्ल्याच्या मध्यभागी पायऱ्या तयार करण्यात आलेल्या आहेत. बाजूलाच एक दीपस्तंभ आहे. पूर्वीच्या काळी याचे महत्व अनन्यसाधारण होते. म्हणूनच बऱ्याच कहाणी,कादंबरीमध्ये दीपस्तंभ या शब्दाचा वापर केलेला असतो.यात थोडे उंचावर रात्रीच्या वेळेस लाल दिवा चमकत असतो.यातील विशिष्ट प्रकारच्या काचाच्या नियोजन मुळे त्याचा प्रकाश लांबवर पडतो. समुद्र किनाऱ्यावर, समुद्रात आतमध्ये जिथे खडक लागतो त्याठिकाणी हा स्तंभ असतो. त्यामुळे जहाजांना सुरक्षित ठिकाणी जाता येते. दीपस्तंभ ज्या ठिकाणी असतो त्यानुसार दिशा, जवळील शहरे यांचा अंदाज घेता येतो. पूर्वी रात्रीच्या वेळेस जहाजं समुद्रात फिरताना बऱ्याचवेळा खडकावर आपटून फुटत असत. त्यासाठी सुरवातीला जवळील डोंगर भागात काहीतरी पेटत ठेवत असत. नंतर त्याची जागा दिव्यांनी घेतली.पण पावसात त्याचा उपयोग होत नसे.मग कंदील वगैर यांचा उपयोग करू लागले.पण नंतर मात्र प्रिझम काचेच्या तुकड्यांचा उपयोग करून मधमाशा पोळे सारखी रचना गोल आकारात केली गेली. त्यामळे दूरवर किरण पसरू लागले आणि त्याच्या आतमध्ये चरबीच्या तेलाचा दिवा लावला जात असे.नंतर बॅटरी चा शोध लागला तेंव्हा पासून मात्र त्याचाच वापर चालू आहे. दिव्याच्या ऐवजी आता बल्बचा वापर करतात. आता चुंबक लहरींचा वापर सुद्धा केला जातो.

इथे एक गाईड ठेवला आहे तो ही सर्व माहिती देतो. यांच्या बाजूलाच एक मोठा छत्री सारखा अंतेना लावला आहे. नाविक दल याची निगराणी करतो. त्यांच्या कामकाजात याचा वापर केला जातो. दीपस्तंभ बघुन झाल्यावर एका निमुळत्या शिडी ने खाली उतरलो.यातून एका वेळा एकच जण खाली किंवा वर जाऊ शकतो.
नंतर आम्ही कोर्लयी किल्ल्यावर चढून वर गेलो. किल्ल्यावर तटबंदी अजूनही शाबूत आहे. किल्ल्याची रुंदी तशी फार कमी आहे. लांबी एक किलोमीटर पर्यंत होईल. किल्ल्यावर पोर्तुगिज बांधणीचे अवशेष दिसतात. काही दगडावर पोर्तुगिज भाषेतील अक्षरे कोरली आहेत. काही शिलालेख बऱ्याच ठिकाणी दिसतात.एक मोठे चर्च दिसते अगदी वसईच्या किल्ल्यात असलेल्या चर्चसारखं हुबेहूब.काही घरांचे अवशेष दिसतात.वर एक विहिर आहे.त्यात गोडे पाणी असते. खरंतर किल्ला बराच उंचावर आहे. तीनही बाजुला समुद्र आहे तरीसुध्दा किल्ल्यावर गोडे पाणी विहिरीला भरपूर आहे. किल्ल्याच्या पलीकडच्या बाजूला एक वाट खाली जाते. छानपैकी पायऱ्या आहेत.पण त्या सरळ समुद्राच्या पाण्याशी मिळतात. दरवाज्याची खूप सुंदर रचना आहे.वरून एका बाजूला निळा समुद्र दिसतो. दुसऱ्या बाजूला रेवदंडा खाडी दिसते. खाडीवर असलेला ब्रीज खूप छान दिसतो. समोर रेवदंडा येथील आगर कोट किल्ला दिसतो. रेवदंडा गाव नारळी पोफळीच्या बागेत गुडूप झाल्यासारखं वाटतं. पाण्याचा उथळ भाग उठून दिसतो.असे म्हणतात की पूर्वी या किल्ल्यातून एक भुयार आहे जे डायरेक्ट आगरकोटात जाते. शक्यता नाकारता येत नाही कारण दोन्ही किल्ल्यांच्या दरम्यान एक उथळ भाग स्पष्ट दिसतो. मागील बाजूस गाव दिसते. काही ठिकाणी तोफा पडलेल्या आहेत. एका ठिकाणी दारू गोळा कोठार आहे.मग किल्ला पाहून झाल्यावर खाली उतरायला सुरुवात केली. उतरताना काहीजण आपटले कारण उतरताना स्वतः ला सावरणे कठीण असते. सहा वाजत आले होते.पण सर्वांना समुद्रात भिजायचे होते.मग सर्व गाड्या घेऊन चांगले ठिकाण शोधत बसलो. गावा मधून गेल्यावर मग कोरलाईं गावाचे बीच सापडले. तिथे गाड्या उभ्या करून मुले पाण्यात घुसली. अर्ध्या तासाने आम्ही सर्वजण बाहेर आलो.सात वाजत आले होते. बराच वेळ झाला होता. त्यामुळे मुलांनी पटकन आवरले. परतीचा प्रवास सुरू झाला. तासाने आम्ही सर्वजण चहासाठी थांबलो.

मुलांना प्रचंड भूक लागली होती.मग वडा पाव घेतले. नाष्टा चहा घेतला.साने गाव मार्गे नागोठणे आम्ही निघालो. रस्ता तसा निर्जन होता. समोरील डोंगरावर लाईट दिसत होत्या. तिथे देवीची यात्रा होती. त्यामुळं सर्व पायरी वर लायटिंग केली होती. अर्ध्या तासाने आम्ही रोहा रोडवर पोहचलो.घरी जाईपर्यंत साडे नऊ वाजले होते.
अशी एक धमाल एक दिवसाची ट्रीप ..
_edited_edited_edited.jpg)



Comments