Chilhe Khamb camp…
नेहमी प्रमाणे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा सुरू झाल्या की त्या आठवड्यापासून मुक्तांगणचे रविवारचा कार्यक्रम बंद होत असत. त्यानंतर परीक्षा संपली की लगेच शिबीर हे नेहमीचं ठरलेलं असायचं.मग शिबिराची जागा शोधणे चालू व्होयचे. बऱ्याचदा तनुचे बाबा लोकेशन सुचवायचे.मग सुचवल्यानंतर त्या ठिकाणाला भेट द्यायला जायची नेहमीची पद्धत होती.मग चिल्ले गावात जाण्यासाठी खांब येथे गेलो. तिथल्या महाराष्ट्र बँकेत तनुचे बाबा काम करत असत. मग त्यांच्या सोबत खांडेकर यांच्या घरी गेलो. खांडेकर हे खांब येथील शाळेत मुख्याध्यापक होते. तनुच्या बाबांची इथे आसपासच्या बऱ्याच गावात चांगली ओळख होती.अगदी जेवढे मुक्तांगण ग्रुपचे कॅम्प झाले तिथे एक तरी ओळख त्यांची असायची. त्याचा फायदा नेहमी होत असे.त्यांचा बंगला खांबला आहे. त्याचे गाव चील्ले , हे खांब पासून दोन किलोमीटर अंतरावर आहे .त्या गावात गेलो त्यांचे घर बघितले. त्यांना सांगितले आम्ही तीस जण असू.मग एवढ्या सगळ्याची व्यवस्था त्यांच्या घरात होणार नाही असे दिसले.मग त्यांना विचारले की फक्त मुलींची राहण्याची व्यवस्था तुमच्या घरी करा. बाकीचे सर्वजण गावातील मंदिरात राहु शकतो. मग गावातील हनुमानाचे मंदीर पाहून आलो. तिथं राहायला काही हरकत नव्हती.मग गावात उपक्रम काही घेता येतील का ते पाहिले.सर्व सर्वेक्षण झाल्यावर चिले येथील शिबीर निश्चित केले.
मुलांना निरोप दिले.कारण कोणाला परीक्षा संपली की लगेच बाहेर जायचे असल्यास माहिती असावी. जेणे करून जाणे दोन दिवसांनी पुढे ढकलता येत असे. परीक्षा संपली की लगेच त्याच दिवशी घरी मीटिंग ठेवली. त्यावेळी मी सुरक्षा नगर मध्ये राहत असे.तीस जण मीटिंगला होते.मकरंद कांदळगावकर सुध्दा मीटिंगला आला होता.बऱ्याच जणांची सम्हिहांन बद्दल तक्रार होती . त्यांचे म्हणणे होते की त्याला शक्यतो घेऊ नका. खरंतर त्याचा स्वभाव असा होता त्याला कोणी पटवून घेत नसे.तो नेहमी त्याच्याच तालात असायचा. बरोबरीच्या वयातील मुलांपेक्षा अंगापिंडाने मोठा दिसायचा. पण तो आमचा रविवारच्या कार्यक्रमाचा नेहमीचा मेंबर. जो नियमित रविवारी येतो त्याला शिबिराला प्रथम संधी असा नियम होता.त्यामुळे त्याला नाही म्हणणे जड जायचे. मला मनापासून त्याला घ्यायची इच्छा असायची. मीटिंगला त्याला टाळले तरी संध्याकाळी तो आईला घरी पाठवून कसल्याही परिस्थतीत त्याला शिबिराला घेऊन जा असे सांगावयास लावायचा. त्यावेळी मराठी माध्यमात शिकणारी मुले मुक्तांगण मध्ये जास्त होती.त्यात मंदार कांदळगावकर, पियूष लाड,संकेत भोसले,सुजित थोरात, कल्पना भारंबे, प्रणाली रोडे, समिधा गांधी, अक्षय पोटे, शर्वरी मोडक, सारिका शेट्ये तर इंग्रजी माध्यमातून तन्वी सावंत, सिध्दी गुरव, प्रतीक कुंभार, अश्विनी जाधव, सायली कदम, पुष्कर अधिकारी, घोलप,आरोही, भूषण गायकवाड, सम्हीहण लोहित असे बरेच जण असायचे. आरोही च्या आत्याची मुले अंकिता मुसळे आणि अथरव मुसळे,नागाव हून जुईली यायची. त्यामुळे कार्यक्रम भरगच्च असायचा. गार्गी, सौजु त्यावेळी खूप लहान होते.पण शिबिरात आमची सहकुटुंब वस्ती असायची.

चिले येथील शिबिरात विषय होता विज्ञान व भाषा या दोन विषयां वर आधारित , चार्ट लेखन, सोपी शैक्षणिक साहित्य तयार करणे.यात अगदी मुळाक्षरे , अंक यांचे तक्ते, स्पेलिंग चे तक्ते, विविध नकाशे , बहिणाबाई चौधरी यांनी लीहलेल्या कवितांचे चित्ररूप असलेले तक्ते हे सर्व त्यात होते.. सर्वात मोठ्या ड्रॉइंग शीट वर कवितेला अनुसरून चित्र मुलांना शिबिरात काढायची होती. मुलांना कार्यक्रमाची पूर्ण रूपरेखा सांगितली. तसे सर्व साहित्य आणायला सांगितले. सारिका शेट्ये, अंकिता , आरोही, भूषण यांनी काही विज्ञानाचे प्रयोग करण्याचे ठरविले होते. तनु, शिल्पा, अक्षय आणि ज्युली यांनी मिळून अगोदरच काही चित्रे काढून ठेवली होती. त्या मापाचे जाड कार्ड बोर्ड पुट्ठे आणून ठेवले होते. शिबिराला बर्गोले कुटुंबिय, रोडे, रामदास घोलप असे बरेच पालक येणार होते.काही पालक भेट द्यायला येणार होते त्यात देशमुख, लाड, कांदळगावकर होते. शिबिरात मुले नक्की काय करतात हे त्यांना बघायचे होते. आम्ही सर्व सहकुटुंब,अभिजित जोशी , अंजली सावंत सर्व फॅमिली असे बरेच कार्यकर्ते येणार होते.
शिबिराच्या दिवशी सकाळी शॉपिंग सेंटर बस स्टॉप वर सगळेजण जमा झालो. नागोठणे शॉपिंग बसने नागोठणे येथे उतरलो. तिथे नाष्टा वडा पाव विकत घेतला. खांबला विक्रम रिक्षा करून पोहचलो.खांब पासून चालत चिले गावात जायचे होते.वाटेतील एक भात गिरणी जाताना बघितली.आत जाऊन साळ ते भात हा प्रवास पाहिला. पॉलिश करून तांदूळ बाहेर कसे पडतात ते पाहिले. अर्ध्या तासात आम्ही चिले येथे पोहचलो. तिथे खांडेकर यांच्या घरी जाऊन तेथे सर्व बॅगा व्यवस्थित ठेवल्या.मग आम्ही सर्वजण हनुमान मंदिरात गेलो. तिथे सर्वजण आपापल्या दिलेल्या जबाबदारी नुसार काम करू लागले.लहान मुलांसाठी पाढे तक्ते, मुळाक्षरे मराठी, इंग्रजी भाषेत तक्ते,तयार करत होते. काहीजण थोर नेत्यांची चित्रे काढून त्यावर माहिती लिहीत होते. थोड्या वेळाने सर्वजण कालव्यावर गेलो. गावाच्या बाहेरून एक पाण्याचा पाट जातो .हा पाट पुढे अंबा नदीला मिळतो. मुले लगेच पाण्यात शिरली. पाण्यात जाण्यासाठी अगोदरच मुलांनी कपडे आणले होते. तासभर पाण्यात मनसोक्त डुंबले नंतर मग त्यांना कसेतरी बाहेर काढले.या कालव्यातून आजूबाजूच्या शेतीला पाणी पुरवले जाते. जिथे शेतीसाठी पाणी सोडले जाते तिथे लोखंडी गेट लावले होते. तिथे भोवरे तयार होत होते.प्रकाश आमटे यांच्या प्रकाशवाटा हे पुस्तक मध्यंतरी वाचनात आले होते त्यात एक प्रसंग असा लिहिला आहे की ते ज्या जंगलात राहत होते तिथे एक नदी आहे पावसाळ्यात ती दुथडी भरून वाहत असते.त्या नदीत एका ठिकाणी भोवरा आहे.त्या भोवऱ्यात कुणी गेला की परत येत नाही. प्रकाश आमटे यांनी तिथे प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सोबतीला एकाला घेतले आणि त्या भोवरा आहे त्या ठिकाणी पोहचले. भोवऱ्यात उडी मारली तर गोल गोल फिरवत भोवरा तळाशी नेऊन समोर फेकून देतो .जर आपण श्वास कोंडून ठेवला तर आपण सुद्धा पाण्याच्या बाहेर येऊ शकतो. असा त्यांचा मानस होता. फक्त घाबरून न जाता श्वास कोंडून ठेवता आला पाहिजे. त्यांच्या सोबत्याला त्यांनी सांगितले की मी आता उडी मारत आहे काही वेळ मी आत असेन नंतर मी समोर निघेन.मग त्या भोवऱ्यात त्यांनी उडी घेतली. आणि खरोखरच ते पा पाण्यातून बाहेर सुद्धा आले. अर्थात तो त्यांचा अनुभव तसा मला व्यक्तिशः पटत नव्हता. मग असा प्रयोग आपल्याला छोट्याशा भोवऱ्यात करता येईल का ते विचार करत होतो.मग कँपच्या वेळी आम्ही छोट्याशा कागदी होड्या तयार केल्या आणि त्या होड्या आम्ही भोवऱ्यात टाकून बगितल्या.त्या बोटी गोल गोल फिरत मध्ये जाऊन बाहेर पडत होत्या.पण तसा अंदाज येत नव्हता..पण आम्ही प्रयोग मात्र करून पाहिले.

नंतर परत मंदिरात परतलो. मुलांचे ग्रुप तयार करण्यात आले होते. सर्वांना काही उपक्रम दिले होते. मोठा ग्रुप ज्यामध्ये कल्पना, सायली, प्रशांत, स्वप्नील, सुमित, दिनिका, भूषण, संकेत, सुजित, ही मुले होती त्यांना अब्दुल कलाम , कार्व्हर,किरण बेदी यांची पुस्तके दिली होती. वीणा गवाणकर यांचे एक होता कार्व्हर, किरण बेदी यांचे आत्मचरित्र,कलमांचे अग्निपंख व आत्मचरित्र ही पुस्तके वाचून त्यावर पोस्टर काढून माहिती लिहून गावातील लोकांना दुसऱ्या दिवशी सांगायचे होते. तनुच्या ग्रुपला प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कविता संग्रहातील काही मोजक्या कविता पोस्टर वर लिहून त्याला साजेशे चित्र रेखाटण्यास सांगितले होते. अनघा बेलकडे, सुप्रिया , प्राजक्ता बोरमनिकर, प्रणाली रोडे, समिधा गांधी, श्रिया सातगोंडा, मृणाल पाटील, सुप्रिया बर्गोले या सर्वांना सोप्या भाषेत पाढे ,लहान मुलांच्या कविता यांची चित्रे काढून त्याला कलर करून त्यांची पोस्टर करावयाची होती. सायन्स प्रोजेक्ट नावाचे एक पुस्तक मुलांसाठी आम्ही आणले होते . त्यात इलेक्ट्रिसिटी, चुंबकत्व, प्रेशर, फोर्स, घनता अशा कितीतरी वैज्ञानिक संकल्पना असणाऱ्या गोष्टीचे प्रयोग करून दाखवले आहेत. सारिका शेट्ये हिने आर्किमिडीज च्या तत्वावर आधारित प्रयोग केला होता, आरोहिने क्रोमोटोग्राफी , अंकिताने मीठ , पाणी आणि घनता या विषयावर प्रयोग केला होता, सम्हीहान लोहित याने बल्ब चे सर्किट कसे चालते, शर्वरी आणि समिधा यांनी प्रेशर चे विविध गुणधर्म प्रयोगाने दाखवले होते, सिद्धी गुरवने ज्वालामुखी केमिकल वापरून करून दाखविला होता.प्रत्येक जण त्यांना दिलेले काम करण्याची तयारी करत होते. त्यावेळी सर्वात चांगला गट, सर्वात चांगला गट नेता, बेस्ट डायरी,, आज्ञाधारक सभासद, चांगले सहकार्य करणारा विद्यार्थी, प्रश्न मंजुषा विजेता गट अशी बरीच बक्षीस ठेवलेली असत. त्यावेळी सहा तरी कार्यकर्ते असायचे त्यामुळे कामाची विभागणी चांगली व्हायची.तीन दिवसाच्या शिबिरात चांगल्या पुस्तकांचे वाचन तेही नामांकित व्यक्तींचे चरित्र वाचन हे आमच्या कँपचे एक उद्दीष्ट होते. लहान गटाला गणित व भाषा यांचा पाया मजबूत कसा करावा यासाठी अगदी पाढे अगदी सोप्या पद्धतीने सांगणे,चित्र काढून इंग्रजी, मराठी भाषेतील कविता लेखन हे विषय मुद्दामहून दिले होते.. आणि सर्वात शेवटी शिबीर संपताना गावातील लोकांना सर्व समजून सांगायचे होते.नंतर सर्व लिखित साहित्य आणि प्रयोग त्या गावातील हायस्कूलला भेट द्यायचे होते.असे आपल्या चिले कॅम्पचे उद्दीष्ट होते.

आम्ही गेलो त्याच्या दुसऱ्या दिवशी हनुमान जयंती उत्सव होता. त्यामुळे रात्री देवळात कीर्तन होते. जन्म सोहळा , पालखी असे विविध कार्यक्रम होते. यात्रेच्या वेळी एक मिरवणूक चालली होती समोर ताशा, पिपाणी वाजवत चालत होते . त्याच्या पाठी काही बायका घुमत चालल्या होत्या. त्यांच्या अंगात आले होते.हा प्रकार बहुतांशी मुलांना माहीतच नव्हता त्यामुळे ते उत्सुकतेने पाहत होते.पण अचानक एक मुलगा त्या बायकांसोबत त्यांच्यासारखा नाचत त्यांच्यामद्ये मिसळला.त्यांच्यासारखा तोही घुमू लागला. हुबेहूब तसे करण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. कुठंही तो त्यांची टिंगल करतोय असं वाटतं नव्हतं.. त्याला हा पालखीतील नृत्याचा प्रकार वाटला असेल म्हणून तो करत असावा.तो एकदम मन लाऊन नाचत होता. शिवाय बाहेर आपल्याला कोणी पहात वगैरे आहे याची त्याला फिकीर नव्हती .आम्ही तो प्रकार पहात होतो काय करावे कळत नव्हते.पण थोड्या वेळाने तो मुलगा परत आला.अस वागणारा एकमेव नमुना आमच्यात होता तो म्हणजे अर्थातच सम्हिहान लोहित. प्रचंड गुणवत्ता भरलेला कायम अस्थिर असणारा मुलगा, कशालाही न घाबरणे , आपल्याला इच्छेला येईल ते करणे हा त्याचा स्वभाव. त्याच्यावर कशीही नजर ठेवा तो काही तरी घोळ करणारच.पण त्यामुळे सतत अलर्ट राहावे लागे .सर्व मुक्तांगण ग्रुप गावच्या यात्रेत सामील झाला होता.

दिवसभर देवळात प्रदर्शनाची तयारी मुले करत होती.गावातील मुले,मान्यवर,तसेच इतर गावकरी प्रदर्शन बघण्यासाठी येणार होते. रात्री पालखी सोहळा पार पडला. खांडेकरांच्या घराच्या पटांगणात आम्ही कॅम्प फायर प्रोग्राम घेतला. रात्रीचा पालखी सोहळा सर्वांना बघता आला. त्यांच्या अंगणासमोरून पालखी नाचत गेली होती. रात्रि बारा वाजेपर्यंत सर्वजण जागे होते.सकाळी लवकर उठायचे होते. शेवटच्या दिवसाचे शेड्युल खूप बिझी होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी आमचा ट्रेक जाणार होता. चिले गावाच्या बाहेर शाळा आहे. त्या शाळेच्या समोरून रस्ता डोंगराकडे जातो. सकाळी लवकरच उठून आवरून आम्ही त्या डोंगराकडे निघालो. रस्त्यात दोन मोठे ओढे लागले. त्यानंतर एका जमीन खनलेली दिसली. तिथे थांबून मुलांना त्यातील जमिनीचे थर बघायला सांगितले. त्यावर पुष्कर, सम्हिहन , सिध्दी, सायली कदम यांनी माहिती शेअर केली. अभिजीतने हियुमस थर कसा तयार होतो सांगितले,मी मेघालयात सापडणाऱ्या खडकांच्या गुहा ज्या चुनखडक मुळे निर्माण झाल्या आहेत आणि जगातील बरेच पर्यटक खास त्या गूहा बघायला येतात. ओढ्याच्या पात्रात मिळणारे रंगीबेरंगी दगड, गारगोटी,काही दगडांमध्ये असणारे चमकणारे स्फटिक. बऱ्याच गोष्टी मुलांनी अनुभवल्या. नंतर टेकडीवर निघालो. रस्त्यात आंब्याची झाडे लागली. भेळ करण्यासाठी थोड्या कैऱ्या घेतल्या.मग उंचावर जाऊन एका ठिकाणी बसलो. तिथून रोह्या पर्यन्त भाग दिसत होता. लांबवर सूरगड डोकावत होता. दाट जंगल असल्याने कुंडलिक नदीचे पात्र दिसत नव्हते. कालवा मात्र अगदी नागमोडी वळणे घेत डोंगराकडे येताना दिसत होता.वर गेल्यावर भेळ केली.नंतर ग्रुप फोटो काढले.थोडा परिसर पाहिल्यानंतर परत निघालो. बारा वाजत आले होते.नंतर खाली जाऊन जेवल्यानंतर गावातील लोकांसाठी सर्व प्रोजेक्ट, तक्ते यांचे प्रेझेंटेशन करायचे होते.
येताना मात्र कुठेही रेंगाळत न थांबता आम्ही देवळात पोहचलो. सर्वांनी जेऊन घेतले. नंतर गावच्या लोकांना प्रदर्शन पाहण्यासाठी बोलावले.मुलांनी काढलेली छान छान ग्रिटींग कार्ड्स त्यांना दाखवली. सर्व मुलांनी आपापले प्रयोग दाखवले. त्यामागच्या संकल्पना समजावून सांगितल्या. प्रशांत, स्वप्नील , सुमित यांनी जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर या थोर विचारवंत, शास्त्रज्ञ याची माहिती दिली. शून्यातून विश्व निर्माण करून स्वतः ची प्रगती करणारे बरेच जण भेटतात पण जगाला दिशा दाखवणारा कृषितज्ज्ञ हा एकमेव म्हणजे कार्व्हर. त्याची कथा म्हणजे स्वप्नवत घडणाऱ्या गोष्टी . एक पाच वर्षाचे अनाथ पोर अंगाने कृश आणि त्यात कृष्णवर्णीय , जगेल वाचेल याचा नेम नसलेले परिस्थितीशी संघर्ष करत, लोकांना आपलेसे करून, अक्षरशः कपडे, भांडी धुऊन , बागकाम करून मोठे झाले. चित्रकला, गाणे, शेती कितीतरी विषयात पारंगत असे व्यक्तिमत्त्व. आपल्या ग्रुप मधील मुलांनी त्याचे छान प्रेझेंटेशन केले. तसेच आपले अब्दुल कलाम यांच्या विषयी वेगळे सांगायला नको, जगात भारताचे आपल्या अजोड कामगिरीमुळे, त्यांच्यातील चांगुलपणा गुणामुळे नाव उज्वल केले. त्यांची माहिती मुलांनी छान सांगितली.किरण बेदी यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाची भुरळ मुलींना पडते. त्यांच्यासारखं आपल्याला होता येईल यासाठी त्या प्रयत्न करतात. मुलींच्या गटाने खूप चांगली माहिती दिली.

विज्ञान प्रयोग सादरीकरण तर अफलातून केले. त्यात सिध्दी गुरव, सारिका शेट्ये, अंकिता मुसळे, सम्हीहान लोहित सारखी मुले असल्याने प्रश्नच नव्हता. त्यांच्या दृष्टीकोनातून ही मोठी संधी असायची. त्यांच्या जोरदार प्रेझेंटेशन मुळे बाकी मुलांचा उत्साह वाढत असे. कल्पना, दीनिका, सुजित सारखी बरीच मुले शिबिरात खासकरून शिबिरातील हे उत्साही वातावरण अनुभवायला यायची. विक्रांत आणि तनु हे तर शिबिराचे कायमचे सदस्य. शिबिराची कधीही संधी ते अगदी आजही सोडणार नाहीत. त्यांचे शिबिरातील अस्तित्व मुलांना नकळत मार्गदर्शन करून जायचे. प्रदर्शन झाल्यावर पूर्ण शिबिरात घडलेल्या घटना वर आधारित प्रश्नमंजुषा घेण्यात आली.जे काही दोन दिवसात केले त्याची उजळणी झाली. नंतर डायरी वाचन झाले. नेहमीप्रमाणे सुमितची डायरी सर्वात चांगली होती. नंतर सर्व रिझल्ट तयार केले. बक्षिसे कागदात गुंडाळून ठेवली. दुपारनंतर तो समारंभ होणार होता.
दुपारी चारच्या दरम्यान खांडेकर सर आले त्यामुळे बक्षीस वितरण समारंभ त्यांच्या हस्ते करणार होतो. मुलांना शिबिरातील अनुभव कथन करायला सांगितले. प्रशांत जाधव याने सर्वात चांगले भाषण केले. मी आणि अभिजित यांनी शिबिराबद्दल सविस्तर सांगितले. खांडेकर सर यांनी दिलेल्या योगदनाबद्दल त्यांचे आभार मानले.सर्व चार्ट त्यांना त्यांच्या गावातील शाळेला भेट द्यायला सांगितले.मग खांडेकर सरांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. मुलांचे फार कौतुक केले. खेड्यातील जीवनाची मुलांना होणारी ओळख याबद्दल ते बोलले.ते स्वतः शिक्षक असल्याने शिबिरांची किंमत त्यांना चांगली माहिती होती. उपक्रमाला शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
नंतर सर्वजण खांडेकर यांच्या घरी गेलो. तिथे सर्व बॅगा व्यवस्थित भरल्या. नंतर खांबकडे चालत गेलो. तिथून तासाभरात कॉलनीत पोहचलो.
_edited_edited_edited.jpg)



Comments