top of page

खांब शिबीर २००६.

Nov 15
16 min read

मार्च महिना संपत आला की लगेच

शिबिराचे वेध लागायचे. परीक्षेच्या अगोदर एक आठवडा तरी मुलांना तसा निरोप द्यावा लागे. मुक्तांगण ग्रुपचे उपक्रम मार्चच्या शेवटच्या रविवारपर्यंत चालत असत. तारीख व ठिकाण निश्चित झाले की मग मुलांना माहिती द्यायची हे नेहमीच ठरलेलं असायचं. कार्यकर्त्यांची उपलब्धता महत्वाची असायची.सुरवातीच्या शिबिरामध्ये फक्त मुले असायची. त्यामुळे जागा अगदी देवळात असली तरी प्रॉब्लेम नसायचा.पण मुलींच्या तक्रारी यायच्या की त्या नियमित रविवारी उपक्रमाला हजर असतात मग शिबिराला त्यांना का नेत नाही. त्यामुळे शिबिरासाठी सुरक्षित जागेचा शोध घ्यायला सुरवात लवकर करावी लागे. आमचा हुकमी एक्का म्हणजे तनुचे बाबा , सावंत साहेब यांची ओळख नसेल अशी गावे आसपासच्या दोनतीन तालुक्यात सापडणार नाहीत.त्यामुळे त्यांना विचारले की काम फत्ते झाले म्हणून समजा. बऱ्याचदा मी काही पालक, कंपनीतील मित्र ज्यांची घरे समुद्रकिनारी आहेत किंवा एखाद्या किल्ल्याच्या पायथ्याशी आहेत अशा लोकेशनला प्राधान्य द्यायचो. शक्यतो हॉटेल, लॉजिंग टाळायचो. कुणाचे रिकामे घर किंवा सामाजिक हॉल निवड करायचो. गावात थोडी ओळख असेल अशा व्यक्तीला प्राधान्य द्यायचा प्रयत्न असायचा.

तनुच्या बाबांनी खांब हे ठिकाण सुचवले. जवळच सुरगड किल्ला आहे, डोलवाहाल नावाचे धरण तिथून पाचसहा किलोमीटर अंतरावर आहे.ते बँक ऑफ महाराष्ट्र खांब शाखेत काम करत त्यामुळे आसपासच्या बऱ्याच गावात ओळख होती. खांब हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. खांडेकर यांची खास ओळख होती.मग त्यांनी एकदा बँक सुटण्याच्या वेळेत या असे सांगितले.मग संध्याकाळी मी बाईकवर खांब येथे गेलो. गावातच खांडेकर गुरुजींचा बंगला आहे. दोघेजण त्यांच्या बंगल्यावर गेलो. बंगला एकदम सुसज्ज आणि गावाच्या बाहेर आहे. शिबिरासाठी छान जागा होती. एवढा मोठा बंगला कॅम्प साठी द्यायचा म्हणजे खरं तर मोठी गोष्ट होती.पण त्यांनी तो दिला. आसपासची थोडी माहिती घेतली. कोणत्या गोष्टी बघता येतील , काय काय उपक्रम घेता येतील यावर सविस्तर चर्चा केली.ते स्वतः शिक्षक असल्याने त्यांना उपक्रमाची जाणीव फार होती.त्यांनी सांगितले आठवडाभर अगोदर सांगा म्हणजे व्यवस्था करता येईल .मग कॉलनी मध्ये परत आल्यावर बाकीच्या कार्यकर्त्यांना सांगितले. कोणकोण यायला इच्छुक आहे. कुणाला एप्रिल महिन्यात कोणत्या दिवशी यायला जमेल याची माहिती घेतली.

अंजली येण्याचे नक्की झाले .ती म्हणाली आम्ही सर्वजण तिन्ही दिवस असू.मी निर्धास्त झालो कारण मोठा प्रश्न सुटला. रत्नाकर ठाकूर याला जाऊन भेटलो.तो म्हणाला काहीतरी जुळवाजुळव करून दोन दिवस येईन. रविवारच्या मुक्तांगण उपक्रमात मुलांना पुढील शिबिरा संदर्भात माहिती दिली.सुट्टी सुरू झाली की शिबिराला जायचे हे त्यांना हवे असायचे मग कुठेही जायची तयारी असायची. बऱ्याचदा पालक लोकांना आम्ही कुठे गेलो हेही माहिती नसायचे. मीटिंगला मुलेच यायची.काही मुले तर शिबिराला जाताना व येताना तुम्ही स्टॉप पर्यन्त  सुद्धा येऊ नका असे सांगत. काही मुले चार पाच कॅम्पला येऊन गेली होती त्यांनां सर्व लिस्ट पाठ असायची. बऱ्याचदा पालक सांगायचे शिबिराबद्दल फक्त आम्हाला सांगत जा कारण मुले परीक्षेच्या वेळी कँपची चर्चा करतात.तर काही पालक याचा उलट उपयोग करून घेत ते त्यांना सांगायचे जर एवढा अभ्यास केला नाही तर तुझा कॅम्प कॅन्सल. अशा बऱ्याच गोष्टी घडायच्या.काही पालकांना फक्त कॅम्प पुरते पाठवायचे असायचे. त्यांना मात्र सांगायचो शक्यतो रविवारी येणाऱ्या मुलांना पाहिले शिबिरात घेण्यात येईल जर जागा शिल्लक असेल तर विचार करू .

मग नियोजन करायला बसलो. कागदावर तिन्ही दिवस उपक्रम कसे राबवायचे हे लिहून काढले.दोन रात्रीचा मुक्काम असल्याने नियोजन त्यानुसार करायचे होते.सुरगड किल्ला, कोलाडचे धरण, कोलाड मधील रमेश ढोणे यांचे काष्ट शिल्प संग्रहालय, भवानी मंदिर इत्यादी गोष्टी पहायच्या ठरवल्या होत्या. नेहमीच्या मुलांची नावे लिहून काढली. जेवण आणि नाष्टा याची जबाबदारी सावंत यांनी घेतली होती फक्त सर्व साहित्य आणून ठेवायचे होते. त्यांनी स्वयंपाकासाठी कुणालातरी गावात सांगून ठेवले होते. त्यांचे जे काही पैसे होतील ते द्यायचे . त्यामुळे मुख्य कामाचे टेन्शन दूर झाले.

पेण वरून जोशींची दोन्ही मुले वरद आणि अक्षय येणार होते. त्यामुळे ते आदल्या दिवशी रात्री माझ्याकडे येऊन राहणार होते. मुलांमध्ये श्रिया सातगोंडा, समिधा गांधी, घोलप, पुष्कर अधिकारी, सम्हिहान लोहित, प्रणाली रोडे, सुमित गायकवाड, तन्वी,विक्रांत मोटे, सारिका शेट्ये, तन्मय ठाकूर, संकेत भोसले, संजय कुंभार, सुजित थोरात, शर्वरी मोडक, खोमणे, सुनिधी सगरे, मंदार कांदळगावकर, सिध्दी गुरव, प्राजक्ता राऊत, मनाली पवार, नेहा मोरे, ओंकार राऊत, सुमेध वाघमारे, पाटील अशी बरीच नावे आली होती. नेहमीप्रमाणे वाघमारे या पालकाने एका मुलाची तक्रार केली ते नाव नेहमीचेच.पण त्यांना सांगितले काळजी करू नका आम्ही त्याला बरोबर सांभाळून घेतो. खरंतर काही मुले प्रत्येक रविवारी नियमित कार्यक्रमाला उपस्थित असतात त्यांनाच शिबिराला न्यायचे असे आम्ही ठरवले होते.याचे कारण म्हणजे शिबीर हे मागील चार महिन्यात झालेल्या कार्यक्रमाची उजळणी असायची. त्यात सर्व त्या उपक्रमांचा समावेश असायचा त्यामुळे नवीन मुलगा शिबिरात रमत नसे आणि तो इतरांना तापदायक ठरायचा.पण नियमित आहे पण तापदायक आहे त्याला सांभाळून घेणे हे आमचे कामचं आहे असे आम्ही समजायचो.

शिबिराची तारीख खांडेकर सर यांना कळवली. शिबिराच्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत पोहचू असे सांगितले. मुलांना नेहमीची यादी दिली.वॉटर बॉटल,कॅप, टॉर्च, डायरी अशा बऱ्याच महत्वाच्या वस्तू मुलांना सांगितल्या.

शिबिराच्या आधीच्या रात्री माझ्याकडे वरद आणि अक्षय आले होते. त्यामुळे सकाळी आम्ही बस स्टॉप पर्यन्त चालत गेलो. गार्गी तनुच्या आईसोबत येणार होती. त्यावेळी ती चार वर्षाची होती. सर्वजण सातच्या बस साठी शॉपिंग सेंटर बस स्टॉपवर जमा झालो.वरद डायरीत मुलांची नावे घेऊ लागला. काही पालक आले होते. येण्याची वेळ विचारून घेतली. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी सात वाजता परत येऊ असे सांगितले.काही जण कार्यकर्त्ये डायरेक्ट खांबला येणार होते. नागोठणे मार्केटिंग बस सात वाजता आली. स्टँडवर साडेसात वाजता पोहचलो. तिथे नाष्टा केला. कोलाड बसचे वेळापत्रक विचारले. त्यांनी आठ नंतर बस येईल असे सांगितले.मग विक्रम रिक्षा कोलाड साठी जातात. त्यांना विचारले.मग तीन रिक्षात सर्वजण बसलो. पाऊण तासात आम्ही खांब येथे पोहचलो. नऊ वाजता आम्ही खांब येथे होतो. सरांचे घर स्टॉप पासून पाच मिनिटाच्या अंतरावर आहे. काही सामान तिथल्या किराणा दुकानातून विकत घेतले. बंगल्यावर गेल्यावर मुलांना बाहेरच सर्व चपला बूट काढायला सांगितले. बॅगा व्यवस्थित ठेवल्या नंतर मुलांना एकत्र बसवले. पाच ग्रुप पाडले.कॅम्पचा लीडर वरद असेल आणि कॅम्पचा उप प्रमुख समिहन असेल. समीहनचे नाव घेतले की मुलांच्या चेहऱ्यावर आटी पडली. कॅम्प लीडर आणि उपलीडर यांची कामे सांगितले.वरदचे काम एवढेच की त्याने सर्व ग्रुप्सच्या कामाचे निरीक्षण करणे आणि सम्हिहनला सोबत ठेवायचे.मात्र सम्हिहानची कामे अशा प्रमाणे असतील कुणाला लागले तर औषध उपचार करणे, शिबिर ठिकाणच्या बाहेर जाताना किंवा एखाद्या ठिकाणी गेल्यावर सर्वात शेवटी राहून काही वस्तू राहिल्या आहेत काय ते पाहणे, मुलांना वेळोवेळी सूचना देणे,जेवण नाष्टा झाल्यावर स्वच्छता केली आहे का ते पाहणे अशी .सर्वांनी जोरात टाळ्या वाजवल्या. सम्हीहन खूप खुश झाला. त्याला आता मुलांना ऑर्डर्स द्यायला मिळणार होत्या. वरदने डोक्यावर हात मारून घेतला. उरलेले दिवस त्याला सम्हीहनला बरोबर घेऊन राहावे लागणार होते.

    दहा वाजून गेले होते.तनुचे बाबा तेवढ्यात आले.मग आम्ही कोलाड धरणावर जायचे ठरवले.पण रस्त्याने न जाता खांब गावात जो कालवा धरणातून येतो त्या कालव्याच्या बाजूने चालत जायचे.हे अंतर पाच सहा किलोमीटर असावे.मग मुलांना फक्त डब्बे, डायरी आणि पाण्याच्या बॉटल घेऊन यायला सांगितले.याची सूचना सम्हिहन याने सर्वांना दिली.त्याला एवढं प्रचंड आनंद झाला होता की तो छान गालाततल्या गालात मिश्किल हसत होता.काही मुले त्याला ही जबाबदारी का दिली म्हणून थोडे चिडले होते.पण खरी गम्मत आता सुरू होणार होती. सर्वात शेवटी राहून सर्व व्यवस्थित गोष्टी घेतल्या आहेतका ते पाहणे, सर्वात शेवटी राहून मॉनिटर करणे हे त्याला जड जाणार होते. सतत लीडर बरोबर राहणे आलेच.खांडेकरांच्या बंगल्याच्या थोड्या दुरून कालवा चालला होता. तिथपर्यंत आम्ही गेलो.मी , रत्नाकर ठाकूर आणि तनुचे बाबा सावंत साहेब मुलांच्या सोबत होतो.तो कालवा डोंगराच्या पायथ्याशी वळणे घेत धरणाच्या भिंतजवळ पोहचतो. बाजूला उन्हाळी भात शेती लावलेली होती. त्यामुळे परिसर हिरवागार होता. मद्ये कुठलेच गाव , वस्ती, घरे नसल्याने निर्धास्त कालव्याच्या कडेकडेने चाललो होतो. मस्त गाणी म्हणत गप्पा मारत ट्रेकिंग चालू होते. मध्येच एका ठिकाणी उतरून भिजण्याची हौस आली त्यावेळीं त्यांना सांगितले की धरणाजवळ पोहचलो की मग उतरूया. सुजित थोरात, संजय कुंभार, अक्षय पोटे, संकेत भोसले असे काही जण होते ज्यांना कॅम्प म्हणजे फक्त दोनतीन दिवस मनसोक्त उंडारने, कोणतीही गोष्ट सिरीयसली न घेता फक्त मजा करणे हेच वाटायचे. त्यांनी कुठल्याही शिबिरात पूर्ण डायरी लिहिली नाही पण शिबिराची ते आवर्जून वाट बघत असत. त्यातल्या एकाने म्हणजे डॉक्टर अक्षय पोटे याने सात आठ वर्षांपूर्वी असाच मला फोन केला आणि सांगितले काका मी कॉलेजच्या शिबिरात आहे आणि मला उत्तम लीडर व उत्तम डायरी लेखन याचे पाहिले बक्षीस मिळाले, दहा दिवसांचे आदिवासी भागात शिबीर चालू आहे, बक्षीस वितरण समारंभातून सद्या बोलत आहे. मुक्तांगण शिबिराला कधीही गोष्टी पूर्ण केल्या नाहीत परंतु ती एक सवय लागली होती. त्यामुळे माझी शिबिरातील प्रत्येक बाबतीत ठळक पणे कामे दिसत होती. आपल्या शिबिरातील सवई नुसार मी काम करत होतो परंतु इतर मुलांना सर्व नवीन होते. मुलाखती घेणे, डायरी लिहणे, जेवण करणे, ग्रुप लीडरशिप करणे या गोष्टी आपल्या बऱ्याच उपक्रमामुळे अंगवळणी पडल्या होत्या.पण या गोष्टी आमच्या लोकांना विशेष म्हणजे प्रोफेसर लोकांना फार आवडल्या आणि शिबिराची सर्व सूत्रे अचानक माझ्या हातात दिली.

हा लाईव्ह अनुभव अक्षयने सांगितला फार बरे वाटले कारण हे जर सुमित , विक्रांत यांनी सांगितले असते तर एवढा आनंद नसता झाला पण या विशेष गटातील मुलांकडून ऐकल्यावर फार बरे वाटले.याचा अर्थ चांगल्या गोष्टींचा परिणाम आणि फायदा फक्त हुशार आणि सिन्सिअर मुलांनाच होतो असे नाही याची प्रचिती अक्षयच्या निमित्ताने झाली.

     कालव्याची वाट सुरगडाच्या पायथ्याशी जाऊन वळणे घेत घेत धरणापाशी कधी पोहचली समजलेच नाही.दीड तास पोहचेपर्यंत लागला. आम्ही मध्ये बऱ्याचदा थांबलो होतो. बारा वाजले होते जेवणाची वेळ झाली होती. त्यामुळे सर्वांनी जेवण करण्यास एक चांगली जागा पाहिली.जेवण करायला एका झाडाखाली बसलो.वनभोजन झाले. नंतर धरण बघुन आलो. धरणाची उंची वाढवण्यासाठी कामगार काम करत होते. त्यामुळे धरणाच्या भिंतीवर जायला बंदी घातली होती. आम्ही सरकारी गेस्ट हाऊस आणि पॉवर हाऊस  यांच्या विरूद्ध बाजूला होतो. आम्हाला त्या ठिकाणी जायला तेव्हढा वेळ नव्हता त्यामुळे मुलांना नंतर पाण्यात खेळायला घेऊन गेलो. तिथे कमी खोलीच्या पाण्यात मुले डुंबत बसली. अचानक कुणाला तरी पाण्यात पायाला लागले. जाऊन बघितले तर समिधा गांधीच्या पायाला जखम झाली होती. पायातून थोडे रक्त येत होते. माझ्या बॅगेत मेडिकल कीट होती. सम्हीहनला बोलावले. लीडरचे काम आहे ते करायचे.मग त्याने कापसाने जखम पुसली. मलम पट्टी स्वतः केली.हे काम तो अगदी आनंदाने करत होता कारण ते लीडरचे काम होते. बाकी सर्वजण आश्चर्याने बघत होते की हा पोरगा इतरांना मदत कसा करत आहे. पाण्यात डुंबून झाल्यावर मुलांना बाहेर बोलावले. तिथून कोलाड पर्यन्त चालत गेलो.तिथून खांबला विक्रम रिक्षा करून गेलो. शिबिराच्या ठिकाणी पोहचे पर्यंत चार वाजत आले होते. बऱ्यापैकी चालणे झाले होते. सर्व मुलांना थोडावेळ विश्रांती घ्यायला सांगितली. नंतर नाष्टा तयार केला. जेऊन तीन तास झाले होते त्यामुळे मुलांना भूक लागली होती.पोहे, शिरा किंवा भेळ या प्रकारचा नाष्टा शिबिरात बनवत असू. सर्व मुलांमध्ये चहा आठ दहा मुलेच घ्यायची.

        नाष्टा झाल्यानंतर मुलांना डायरी लिहायला सांगितली. कॅम्प फायर साठी विषय लिहून दिले. जाहिरात , शाळेतील काही प्रसंग, विडंबन असे बरेच विषय विभागून देण्यात आले होते. संजय कुंभार,सुजित थोरात, संकेत भोसले यांचा एक गट, प्राजक्ता राऊत, पुष्कर अधिकारी, ओंकार राऊत यांचा गट,नेहा मोरे, सारिका शेट्ये, पाटील यांचा गट, प्रणाली रोडे, समिधा गांधी, श्रिया सातगोंडा असे गट पाडले होते. आपापल्या ग्रुप प्रमाणे प्रॅक्टिस चालू केली.जेवण मदतीचा गट पाणी भरून ठेवणे, भाज्या चिरणे, स्वच्छ करणे अशी कामे करत होते.वरद आणि सम्हिहन यांना देखरेखीचे काम दिले होते. अंजली आणि अक्षय बरोबर जेवणाचा ग्रुप होता.मनाली पवार,पूजा, सिध्दी यांच्या गटाने छोट्या नाटकाची तयारी केली होती.आठ वाजेपर्यंत जेवण तयार झाले होते.मग जेवण वाटपचा एक गटात मी,वरद, सम्हिहन, रत्नाकर होतो.गार्गी या शिबिराला होती.तिचे हे पहिलेच शिबीर होते.त्यावेळी ती ज्युनियर केजीत होती. सर्वांची जेवणं आटोपल्यावर आवरा आवर करण्याचे काम सम्हीहन कडे होते. त्याआधी त्याला सूचना द्यायला सांगितल्या.तो लगेच खुश झाला. त्यानंतर त्याने त्याचे काम केले.रात्री साडेआठच्या सुमारास कॅम्प फायर अॅक्टिविटी सुरू झाली.मुलांनी जाहिराती, छोटी नाटके छान सादर केली. बंगल्याच्या आवारात थोडी जागा होती तिथे मुलांनी सादरीकरण केले. सारिका, सिध्दी, नेहा ,संजय कुंभार याबाबतीत एकदम एक्स्पर्ट कलाकार. सारिका म्हणजे अगदी जीव ओतून तयारी करणार, प्राजक्ता राऊत म्हणजे कुठलीही गोष्ट परफेक्ट झालीच पाहिजे असा अट्टाहास असणारी, पुष्कर वगैरे सहज सर्व उपक्रम करणारी मुले,पण सर्वांना काहीतरी करावेच लागे त्यामुळे काहीतरी नवीन गोष्टी शिकायला मिळायच्या.वरद खूप चांगली लीडरशिप करायचा.कॅम्पचे सर्व दिवस सम्हिहन सोबत राहिला.रात्री दहा वाजेपर्यंत कार्यक्रम चालला. नंतर मुलांना झोपायला सांगितले कारण दुसऱ्या दिवशी सकाळी उठून सुरगड किल्ला बघायचा होता. खांडेकर सर गाईडचे नियोजन करणार होते.

·     दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता मुलांना उठवले सर्वांना पटापट आवरायला सांगितले.नाष्टा रस्त्यात करू असे ठरले. सोबत फरसाण, लाह्या घेतल्या.सकाळी अगदी साडेसहा वाजता घर सोडले. वाटेत वैजनाथ हे सूरगडाच्या पायथ्याशी गाव लागते.त्या गावातील एक व्यक्ती गाईड म्हणून येणार होता. गावात गेल्यावर त्यांना भेटलो आणि गडाच्या दिशेने निघालो.या परिसरातील डोंगरांचे आकार थोड्या प्रमाणात मिळते जुळते आहेत. पावसाचे प्रमाण खूप जास्त असल्याने उंच कड्यावर फक्त काळा पाषाण दगड दिसतो. काही ठिकाणी तर गवताचे सुद्धा नाव नसते.गाव सोडल्यावर थोडा चढ लागतो.वाटेत पाहिल्या चढाईत जंगल लागले. त्यामुळे छोटी पायवाट धरून चालत गेलो. अर्ध्या तासात पाहिला टप्पा पूर्ण केला.मग लांबच्या लांब पठार लागते सर्वत्र काळा दगड काही ठिकाणी वाळलेले गवत . उन्हाळा सुरू असल्याने दगड लवकर तापतो. त्यामुळे आम्हाला उन डोक्यावर यायच्या आत किल्ला वर चढायचा होता.मोठ्या सपाटी नंतर उंच कडा दिसतो आणि किल्ल्याची तटबंदी स्पष्ट दिसते. कड्याला वळसा घालून निघालो. किल्ल्यात शिरण्यासाठी दोन दरवाजे लागतात. आम्ही जाताना चोर दरवाज्याने निघालो.हा चोर दरवाजा हुबेहूब सुधागड, सरसगड या किल्ल्या सारखाच आहे.चोर दरवाजा पाशी उंच कडे लागतात.दोन कड्यामध्ये पायऱ्या कोरून वाट केली आहे.परंतु अगदी जवळ जाई पर्यन्त वाट अजिबात दिसत नाही.वाटेच्या दोन्ही बाजूला दोन बुरुज आहेत. खालपर्यंत अगदी ताशीव कडा आहे. पायऱ्यांच्या बाजुला एक छोटी वाट कड्याच्या बाजूने जाताना दिसते.त्या वाटेने गेलो तर कड्याला खूप मोठे भुयार कोरले आहे आणि आत गेल्यावर दिसते की पाण्याचे मोठे टाके आहे.तिथून खाली सायफन पद्धतीने पाणी काढण्यासाठी पाइप लावलेला दिसला. पाण्याचा साठा टिकून राहण्यासाठी खूप चांगले तंत्र वापरले आहे. कड्याला भूयार पाडून आतमध्ये खड्डा केला आहे. त्यामुळे बाष्पीभवन होत नाही, दगडामध्ये  पाणी मुरत नाही. कदाचित तिथे लेण्या सुद्धा काढण्याचा प्रयत्न झाला असेल कारण ती जागा खूप योग्य होती.ते ठिकाण बघुन आम्ही चोर वाटेकडे निघालो. एवढा मोठा चढ बघुन नेहा मोरेने भोकाड पसरले,मी वर येत नाही.तुम्ही किल्ल्यावर जाऊन या असे बोलायला सुरुवात केली.मग तिला जरा समजावले.त्यात घोलप म्हणाली कड्यावर एवढ्या छोट्या वाटेने मला चढता येणार नाही.चोर वाटेवर एक कडा होता त्याला पाय राहील एवढी जागा कोरली होती. बाजूला काही ठिकाणी खोबण्या केल्या होत्या.त्या खोबण्यामध्ये हात ठेऊन एक एक पाय वर टाकत चढायचे.पण त्यावेळी खाली बाजुला पाहायचे नाही कारण खाली दरी दिसते.मग पहिल्यांदा सर्वांच्या बॅगा, चपला खाली ठेवायला सांगितल्या.एक बॅग रिकामी करून सर्व चपला त्यात भरल्या आणि उरलेल्या बॅगा सकट सर्व वरच्या बाजूला मी,ठाकूर आणि वरद यांनी साखळी करून वर कड्यावर टाकून आलो.मग वरदला वर थांबवले.ठाकूर आणि गाईड खाली कड्याच्या तळाला थांबले. मी मधल्या पायरी जवळ उभा राहिलो.मग एकेकाला कड्यावर पाठवले. पायाची ग्रिप दगडावर चांगली बसते. त्यामुळे घसरण्याची भीती कमी होती. घोलप आणि नेहा यांना वर जाताना मात्र फार काळजी घ्यावी लागली.त्या दोघी खूप घाबरल्या होत्या.पण चढ पार केल्यावर मात्र खूप खुश झाल्या.चोर वाट संपली की लगेच  गडाचा परिसर दिसतो. खालून पाहिले तर गडाचा परिसर एवढा असेल असे वाटत नाही.. परंतु त्याला घेरासुरगड का  म्हणतात याची खात्री पटली.

वर आल्यानंतर दिसते ते मारुतीचे मंदिर. फक्त मुर्ती आणि भग्नावस्थेतील दगड, पायाचे बांधकाम दिसते. हनुमान एका राक्षसास पायदळी तुडवत असलेले दिसते, शेपूट वरपर्यंत दिसते.पुढे गेल्यावर आसपासचा परिसर दिसतो.त्यात अवचितगड, घोसाळगड परिसर, वरदायिनीचा डोंगर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे डोलवहाल धरणाचे पसरलेले पाणी. आदल्या दिवशी आमचा ट्रेक खांबपासून ते धरण क्षेत्रापर्यंत कसा झाला हे वरून दिसत होते.वर पाणी साठविण्याची पाच सहा तळी आहेत. किल्ल्यावरील असलेल्या वेगवेगळ्या वस्ती नुसार तळी दिसत होती. एका ठिकाणी मात्र एकत्र पाच तळी दिसली.दोन पडीक कोठारे दिसतात. दारूगोळा आणि धान्य साठवत असावेत. मध्यभागी थोडा उंचवटा दिसतो अगदी बालेकिल्ला दिसतो तसा. एका ठिकाणी शिलालेख दिसतो. फारसी भाषेत असावा. गाईडने सांगितले त्यात किल्ला ज्याने बांधला त्याचे आणि किल्लेदार यांची नावे आहेत. त्यापैकी किल्लेदारचे नाव तुकोजी हैबत होते आणि किल्ला बांधकाम करणाऱ्याचे नाव सूर्याजी असे होते. शिलालेखात असा उल्लेख आहे असे सांगितले. धरणाकडील बाजूस दोन बुरुज दिसतात आणि वरदायिनी डोंगराच्या दिशेने बुरुज आहेत.त्याबाजूने खाली जायला एक वाट आहे.या गडाचे महत्व हे व्यांपारी मार्गा मुळे होते.पुर्वी रेवदंडा हे बंदर जगप्रसिद्ध होते. प्रसिद्ध चौल राजाची ती राजधानी होती.या बंदराजवळ आगरकोट आणि कोरलई हे दोन किल्ले खाडीच्या मुखावर आहेत, तिथेच कुंडलिका नदीचे पात्र येऊन मिळते.ही नदी सुरगडाला वळसा घालून रोहा शहराकडे जाते. पूर्वी बंदरावर येणारा माल या पात्रातून पुढे आणला जायचा आणि घाट ओलांडून पुढे नेण्यात यायचा. त्यामुळे या किल्ल्याचा उपयोग व्यापारी दृष्ट्या चांगला होता.या किल्ल्याचा उपयोग कैदी ठेवायला सुद्धा करत असत. राजाराम यांच्या कारकिर्दीत याचा उल्लेख आढळतो आणि ब्रिटिश अधिकारी रॉबर्ट प्राथर याने १८१८  साली जिंकल्याची नोंद दिसते. गडावर पूर्वी बऱ्यापैकी वस्ती असावी कारण खूप मोठ्या प्रमाणात तळी आहेत. त्यातील एका तळ्याचे कनेक्शन कड्यात कोरलेल्या गुहेशी आहे. गाईडने सांगितले या गुहेत   कोरलेल्या तळ्यात जर आपण काठी टाकली तर ती किल्ल्याच्या माथ्यावर असलेल्या पाचपैकी एका तळ्यात बाहेर पडते. कदाचित ती एक चोरवाट सुद्धा असू शकते. किल्ल्यावर एक शंकराचे मंदिर दिसते. फक्त पायाचे दगड दिसतात.जवळच कुणाची तरी एक समाधीची जागा दिसते. किल्ल्यातील एका छोट्याशा झाडाखाली सर्वजण पंधरा वीस मिनिटे बसलो. आणलेला नाष्टा संपवला. थोड्या वेळाने वरदायिनी डोंगराच्या दिशेने निघालो. किल्ल्याच्या या टोकाकडे आल्यावर एक खोल दरी दिसते आणि पुढे दुसरा डोंगर चालू होतो. तिथून खाली उतरू लागलो की एक बुरुज लागतो आणि एक छोटीशी पाऊलवाट दिसते .ही वाट फार वळणावळाची आहे. तिथे एका प्रकारची काटेरी झुडपे लागतात. प्रचंड उतार असल्याने गोलाकार दगडाचे प्रमाण खूप आहे त्यामुळे  दगड घसरण्याचे प्रमाण खूप आहे. याचा अंदाज मला आणि ठाकूरला आल्यावर आम्ही सूचना दिल्या आणि चालताना अंतर ठेवण्यास सांगितले .पण तेवढ्यात एका ठिकाणी दगड निसटला आणि नेमका अंजलीच्या बाजूने निघून गेला. तिला काही कळायच्या आत दगड गडबडत खाली गेला. सर्वांना मग जागेवर थांबा असे सांगितले. खालच्या बाजूस असणाऱ्या लोकांना पुढे सरकण्यास सागितले बाकीच्या मुलांना जागेवरच उभे केले. खालचा ग्रुप सुरक्षित पुढे गेल्यावर मग पाच पाच जणांचा गट करून सगळेजण पुढे गेलो कारण एकतर काटेरी झुडपे ज्यामुळे अंगाला ओरखडे पडत होते आणि त्यात दगड सतत पायाने सुटत होते त्यामुळे निश्चित इजा होऊ शकते. कड्याला वळसा घालून निघालो. आल्यावर पुढे चोरवाट असलेला कडा दिसला. त्याच्या खालच्या बाजूला आम्ही होतो. तिथे वाटेत एक जुने मंदिर दिसले. पडीक होते, एखाद्या वनदेवतेचे असावे. फक्त मुर्ती दिसत होती आणि काही भग्न अवशेष दिसत होते.आपल्याकडे या भग्न अवशेष वस्तूंना फार महत्त्व देत नाहीत.जर खरोखरच गडप्रेमिनी मनावर घेतले तर या सर्वांचे जतन केले जाऊ शकते.याची एकप्रकारे जनगणना करावी आणि त्याच परिसरात किंवा जिल्ल्याच्या ठिकाणी मोठे संग्रहालय करावे, त्यावर रीतसर प्रत्येक मूर्तीचे डिटेल्स लिहावे. याबाबतीत मात्र एका राज्याने एक गोष्ट चांगली केलेली  दिसते ती म्हणजे आपण जर हिमाचल प्रदेशात फिरायला गेलो तर त्या ठिकाणी भग्नावस्थेतील सर्व मुर्ती एकत्र जमा करून त्याला रसायन लाऊन बंद काचेच्या पेटीत ठेवतात. त्यावर ती मूर्ती कुठे सापडली त्याचे अंदाजे  कधी घडवली असेल याचे प्रमाण लिहिलेले असते. त्याभागात जे मोठे शहर असेल तिथे त्याचे प्रदर्शन लावतात त्याला पाहण्यासाठी तिकीट सुद्धा असते. यातुन दुहेरी फायदा होतो एक तर  जुन्या वस्तूंचे जतन आणि दुसरे म्हणजे पर्यटक येतील त्यांना तिथल्या ऐतिहासिक गोष्टीची माहिती  मिळेल.

पाऊण तासात आम्ही गडाखाली उतरलो.उतरल्याबरोबर समोर एक सुंदर घर दिसले.समोर मोठी पडवी होती. छान सारवलेली जमीन होती. सर्वजण त्यावर बसलो. त्या घरातील लोकांनी लगेच हंडाभर पाणी मुलांसाठी आणून दिले.हा मोठा फरक असतो शहर आणि गावात. लोक तुमची विचारपूस तरी करतात आणि कमीतकमी पाणी तरी तुम्हाला न विचारता देतात. पाण्याचा स्टॉक कधीच संपल्याने मुलांनी सर्व हंडा संपवला.त्या गावातून आम्ही खांब कडे निघालो. साडेबारा वाजून गेले होते. जेवणाची वेळ झाली होती. एकच्या सुमारास खांडेकर यांच्या घरी पोहचलो.जेवणासाठी मदतीला गावातील  एक दोन जणांना घेतले होते. त्यामुळे जेवण तयार होते.जेवण वाटप वरद , मी , ठाकूर आणि सम्हिहन यांनी केले. जेवण संपेपर्यंत दोन वाजले होते. बऱ्यापैकी धावपळ मुलांची झाली होती परंतु उत्साह वाढत चालला होता. त्यांना डायरी लिहायला सांगितली.या डायरी लेखनावर बराच जोर असायचा कारण एखादे पान जरी लिहिले तरी पालकांना शिबिरात काय झाले ते तरी कळायचे. आमच्या रविवारच्या उपक्रमात एकदा आम्ही मुलांना दोनशे पानी वह्या दिल्या होत्या. प्रत्येकाने त्यावर आपली दैनंदिनी लिहायची असे  सांगितले,प्रत्येक रविवारी नियमित कार्यक्रमाला घेऊन यायचे .हा एक उपक्रमाचा भाग होता. बऱ्याच मुलांनी प्रयत्न केला परंतु दोन चार जण सोडले तर कुणालाही पूर्ण दोनतीन महिने लिहिणे शक्य झाले नाही. सर्वात सिन्सिअर मेम्बर होता विक्रांत. त्याची वही भरल्यावर माझ्याकडे आला आणि सांगितले त्याची वही संपली. सर्वात प्रामाणिक आणि सिन्सियर व्यक्तिमत्त्व. अजुनही मुलांसाठी त्याचे योगदान असते.

चारच्या सुमारास आम्ही सर्वजण कालव्यावर गेलो. तिथे मुले पाण्यात येथेच्छ डुंबली. पाण्याचा प्रवाह तसा जोराचा नव्हता त्यामुळे काळजी नव्हती.तिथून सहा वाजता परत आलो. संध्याकाळच्या जेवणाची तयारी सुरू झाली.एक गट मदतीला गेला. नेहमीप्रमाणे सूचना देण्याचे काम सम्हिहन कडे होते.

संध्याकाळी मुलांनी कॅम्प फायर साठी तयारी सुरू केली. थोडी गडबड गोंधळ सुरू झाली. प्रणाली रोडे माझ्याकडे येऊन सम्हिहन मध्येच येऊन डोक्यात टपली मारून जातो अशी तक्रार केली. त्याचे हे उद्योग चालूच असायचे. यावेळी तो पुरता बांधला गेला होता आणि वरद सोबत राहायला लागायचे. त्यामुळे मस्ती करायला फारसा स्कोप मिळत नव्हता.बर त्यांचे  बऱ्याचदा असे असायचे की तो मुद्दामहून एखादी गोष्ट करेल असे नाही पण तो त्याच्या दुनियेत मग्न असल्यामुळे त्यामुळे त्याच्याकडून काही गोष्टी घडायच्या. त्याला मग काही तरी युक्ती करून ताळ्यावर आणावे लागे.

प्रणाली रोडेला सांगितले तुझ्या ग्रुपमध्ये असलेल्या समिधा गांधी, घोलप, मोडक, श्रिया सातगोंडा, अशा चारपाच मुलींना बोलावं. त्या जमा झाल्यावर त्यांना सांगितले की आता त्याने खोड काढली की लगेच सर्वांनी एकत्र या .घोलपला सांगितले तू त्याची मान धर आणि पाठीत वाकव बाकीच्यांनी त्याच्या पाठीत धपाटे टाकायचे. त्यांच्यात घोलप जरा हट्टी कट्टी असल्याने तिला ते शक्य होते. तसा सम्हिहन अंगाने तसा वयाच्या मानाने लांबरुंद होता.

तासाभरात सम्हीहन माझ्याकडे तक्रार घेऊन आला.त्याने सांगितले या मुलींनी पाठीत धपाटे मारले. त्याला विचारले तू काय केलेस काय? तो म्हणाला मी एकीच्या डोक्यात टपली मारली.मग त्याला सांगितले आता विचार कर पुढच्या वेळेस खोडी करायची की नाही ते.हे परत असेच होणार आणि लीडर अशा गोष्टी करत नसतात.मग त्याच्या तो कामासाठी निघून गेला.जेवण अगदी खास ग्रामीण पद्धतीने बनवले होते. अंजलीने मुलांसाठी तीन किलो श्रीखंड आणले होते. खास ग्रामीण भागात बनले जाणारे पोह्याचे पापड तळून ठेवले होते. कॅम्प मध्ये बहुतेक मुले सर्व भाज्या आवडीने खातात बऱ्याचवेळा घरी त्या खात नाहीत. गावातील ज्यांना जेवण तयार करायला सांगितले होते त्यांनी तिन्ही दिवस खूप छान जेवण बनवले होते.

सर्वांची जेवणं उरकल्यावर एका ग्रुपने आवराआवर केली. नंतर कॅम्प फायर साठी सर्व मुलांना खाली बोलावले.प्रत्येक मुलाने यात भाग घेतला. सर्वांनी गटाने उपक्रम सादर केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या सत्रात होणाऱ्या उपक्रमाचे नियोजन सांगितले. नंतर मुलांना झोपायला सांगितले.

पहाटे पाच वाजता सर्वांना उठवले. तासाभरात सर्वांना आवरायला सांगितले. सकाळी भवानी मंदिर कोलाड येथे जायचे होते.त्या गावातील एकजण सायकलवर कन्याकुमारीला चालला होता त्याच्या बरोबर थोडा वेळ गप्पा मारत बसलो. आठ वाजता नाष्टा झाल्यानंतर विक्रम रिक्षा करून भवानी मंदिरात गेलो. तिथे  भवानी माता मुर्ती, शिवाजी महाराज आणि गजानन महाराज यांचे पुतळे आहेत. खूप छान मुर्ती बनवल्या आहेत. तिथे एक हॉटेल आहे. त्याच्या आवारात मंदिराचा परिसर दिसतो.

त्यानंतर आम्ही रमेश घोणे यांचे काष्टशिल्प संग्रहालय बघायला गेलो.जंगल परिसरात फिरून त्यांनी असंख्य लाकडाच्या वस्तू जमा केल्या आहेत. विविध आकाराच्या अगदी पेन, टेलिफोन, गणपती, भाज्या, बंदुका अशा कित्येक वस्तू तिथे प्रदर्शनात बघण्यासाठी ठेवल्या आहेत. वस्तूंचा शोध घेणे त्यांना आकार देऊन त्याचे रंगकाम करणे आणि अशा हजारो वस्तूंचे जतन करणे ही तशी फार अवघड गोष्ट. त्यांचे संग्रहालय दोन मजल्यांचे आहे. काही महत्त्वाच्या कलाकृती मध्ये येशू ख्रिस्त मूर्ती, माननीय बाळासाहेब ठाकरे यांची कलाकृती उल्लेखनीय आहे.विविध प्राणी हत्ती , साप यांच्या आकाराची काष्टशिल्प खूपच सुंदर आहेत. त्यावेळी अगदी १० रुपये तिकीट होती आणि फोटोग्राफी फ्री होती.हे एक चांगले प्रदर्शन मुलांना बघण्यास मिळाले. गार्गी सुध्दा सारिका सोबत फिरत होती.मस्त ग्रुप फोटो मध्ये झळकत होती . .ठाकूरने मुलांचे आणि विविध कलाकृतींचे खूप फोटो काढले. मुलांनी खुप सुंदर मुलाखत घोणे यांची घेतली. त्यानंतर देश पर्यटन करायला खांब वरून निघालेला सायकल स्वार परत तिथे भेटला  त्या माणसाबरोबर आम्ही गप्पा मारत बसलो .तो माणूस आम्हाला सकाळी खांब येथे भेटला होता. त्याच्या सोबत एक ग्रुप फोटो काढला.

तिथे सम्हिहन म्हणाला त्याचा एक स्वतंत्र फोटो काढा.मी आणि रत्नाकर ठाकूर दोघेच तिथे होतो. ठाकूरला त्याची थोडी मजा घ्यायची होती. संग्रहालयाच्या आवारात माडाची झाडे आहेत.त्यातील एक झाडावर चढायचा प्रयत्न कर असे सांगितले. सम्हीहांनचे एक वैशिष्ट होते ते म्हणजे त्याच्या डोक्यात आले की ही गोष्ट करायची किंवा मिळवायची तेंव्हा तो वाट्टेल ते करायला मागे पुढे बघायचा नाही.त्याने त्या माडावर चढायचा प्रयत्न केला.मग त्याला रत्नाकर ठाकूरने समोर एक पोस्टर दाखवले.ते होते एअर इंडिया विमानाचा महाराजा याचे. त्याची पोझ घेत असशील तर तुझा फोटो काढतो असे सांगितले. त्याने चार ते पाचवेळा त्याला सतावले अशी पोझ घे ,अजून व्यवस्थित उभा राहा.पण शेवटी रत्नाकर मस्करी करून कंटाळला पण सम्हीहन फोटो काढल्याशिवाय शांत बसला नाही.त्याचा आणखी असाच एक किस्सा. त्याचे वडील मला दररोज सकाळी कंपनी कँटीनला भेटत असत. एकदा सकाळी त्यांनी मला विचारले अरे मुलांकडून काही प्रोजेक्ट करून घेत आहेस काय? मला जरा शंका आली आणि त्याला मुद्दाम हो म्हंटले.सम्हीहनचा काहीतरी उद्योग असणार असा अंदाज केला.मग त्याच्या बाबाने विचारले तू बारा वोल्टची मोटार सांगितली आहेस काय? मी काहीही विचार न करता लगेच हो म्हणालो.मग त्याने सांगितले संध्याकाळी नागोठणे येथून त्याला आणून देतो.मग माझ्या प्रकार लक्षात आला सम्हीहन माझे नाव सांगून ती वस्तू त्याच्या बाबांकडून मागितली होती. रविवारी उपक्रमाच्या वेळी तो भेटला. त्याला विचारले असे का सांगितले. सम्हिहन म्हणाला त्याला छोटी मोटर  हवी होती आणि बाबांनी अशी सहज दिली नसती,आणि मला चांगले माहीत होते की तुम्ही बाबांना हो म्हणून सांगणार.सम्हीहनचे कॅलक्युलेशन एवढे परफेक्ट होते की मी पण थक्क झालो. त्याला मात्र सांगितले पुढच्या वेळेस मला अगोदर सांगून ठेव.असा हा आमचा जगावेगळा मेंबर. बऱ्याचदा एखादा विषय किंवा चर्चा चालू असेल तर आपल्याला उगीचच वाटायचे याचे लक्ष नाही म्हणून पण याचे डोळे एकीकडे तर कान एकीकडे काम करायचे.अगदी परफेक्ट काय ते सांगणार.पण त्याचे सहसा कुणाशीच पटले नाही. स्विमिंग पूलवर हा गेला की कुणाचे पाय ओढ काहीतरी खोडी करणार.महिन्या दोन महिन्यात याच्या पायाला हाताला लागलेले असायचे, वर्षातून एखादेवेळी हात गळ्यात अडकवलेला असायचा. एकदा रविवारी उपक्रमात उभा खोखो खेळत होतो.त्यावेळी उपक्रम कॉलनीमधील नाना नानी पार्क येथे होत असत. त्याच्या समोरील पार्किंग आवारात खेळत होतो. खेळताना हा घसरून पडला. तिथे खाली डांबरीकरण केले असल्याने गुढघा सोलवटला होता. रक्त येत होते.मी त्याला दवाखान्यात घेऊन गेलो. त्याला औषध उपचार केले.मग तो घरी गेला.दोन चार दिवसाने मी सहज लोहितला विचारले सम्हिहनचा गुडघा बरा आहे का? तो म्हणाला त्याला लागलेलं माहीतच नाही.याने घरी सांगितलेच नव्हते.असा हा बिलंदर. शिबिराला आला की त्याला त्याच्या आईने सांगितलेले असायचे तुझे कपडे येताना तूच धुऊन आणायचे. म्हणून नंतरच्या बऱ्याच कॅम्पला तो रात्रि कपडे धुऊन ठेवत असे. फोटो मद्ये तो बऱ्याचदा वरद बरोबर किंवा कुणातरी कार्यकर्त्या सोबत दिसेल कारण त्याच्यावर सतत लक्ष ठेवावे लागे.पण त्याच्या शिवाय रविवारचा कार्यक्रम असो की शिबीर असो त्याच्या शिवाय मजा यायची नाही. साडेबारा वाजता संग्रहालय बघुन झाले.मग आम्ही सर्वजण परत खांब येथे गेलो. खांडेकर सर येणार होते. शिबिराचा समारोप समारंभ त्यांच्या हस्ते करण्यात येणार होता. मुलांना काही बक्षिसे देण्यात येनार होती. बऱ्याच शिबिरात स्थानिक लोकांनी खूप मदत केली. सर्वात महत्वाचे म्हणजे एखादा उपक्रम गावात घेताना त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा ठेवावी लागते नाहीतर शिबीर चांगले होऊ शकत नाही. खांडेकर सर यांनी खूप मदत केली. एवढा मोठा बंगला दिला. सर्व उपक्रम , जेवण व्यवस्था यात त्यांचे मोठे योगदान होते.आणि यात विनोद सावंत यांनी महत्वाची भूमिका बजावली ती म्हणजे आम्हाला खांडेकर यांच्या पर्यन्त पोहचवले. बऱ्याचदा कित्येक वर्षे एखाद्या ठिकाणी राहून सुध्दा आपल्याला परिसर ज्ञात नसतो.खूप वेळा तर एखादा दूरवरचा व्यक्ती आपल्या जवळील ठिकाणचे भरभरून वर्णन करतो आणि विशेष म्हणजे आपण ते ठिकाण पाहिलेले नसते. मोठमोठ्या व्यक्तींनी सांगितले आहे की प्रवास आणि पर्यटन हा व्यक्तिमत्व विकासाचा एक  अविभाज्य घटक आहे.

शिबिराचा समारोप समारंभ खूप छान झाला. मुलांनी आपले मनोगत व्यक्त केले.तीन दिवस चाललेल्या शिबिरातील विविध घडामोडींचा मी आढावा घेतला. मुलांनी केलेल्या विविध उपक्रमांना गावातील आणि इतर बऱ्याच जणांची मदत झाली. त्यांचे सर्वांचे आभार मानले. खांडेकर सर यांनी बक्षीस वितरण केले. त्यांनी मुलांसाठी छान भाषण केले. शिबिराची सांगता खूप चांगली झाली.

मुलांना सर्व बॅगा व्यवस्थित भरून आवरून ठेवायला सांगितले. वरद आणि सम्हिहन या दोघांनी सर्व रूम्स चेक केल्या. मुलांना सोबत आणलेले सर्व साहित्य डायरीत केलेल्या नोंदीनुसार आहेत का ते बघायला सांगितले.नंतर सर्वजण खांब स्टॉपवर गेलो. तिथे रिक्षा उभ्या होत्या.तीन रिक्षा चालकांना विचारले . त्यांनी कॉलनी पर्यन्त सोडतो असे सांगितले. पाऊण तासात आम्ही कॉलनीत पोहचलो.

Comments


Follow

  • Facebook

©Raigad Muktangan

bottom of page