top of page

मुक्तांगण कॅम्प डायरी - कोंडगाव पेडळी शिबिर

1 day ago
8 min read

दिवाळी सुट्टी किंवा उन्हाळी सुट्टी जवळ आली की शिबिराचे वेध लागतात. मग शिबिराचे लोकेशन शोधायला महिनदोन महिने अगोदरच जागा हेरायला सुरवात करायची ही आमची नेहमीची सवय. कोणी कोणी आपल्या कार्यक्रमाला प्रतिसाद देते याची नोंद घ्यावी लागते. त्यातूनच मग शिबिराची जागा शोधायला मार्ग मिळतो. यात ज्या मुलांचा आठवड्याच्या रविवारी असणाऱ्या कार्यक्रमांना हजेरी जास्त असते त्यांचे पालक यात खूप मदत करायला तयार असतात. आमच्या इथे प्लांट मध्ये संतोष कदम नवीनच रुजू झाले होते. त्यांचे माझे याबतीत बरेच विचार पटत असतं. त्यांचा मुलगा त्यावेळी लहान होता. अशीच चर्चा करत असताना एकदा कॅम्पचा विचार त्यांच्या गावी करता येईल का असे मी विचारले. मग त्यांनी सांगितले तुम्ही एकदा गाव बघा मग आपण विचार करू. मग एक दिवस त्यांच्या गावी चक्कर मारली. पाली पुणे रस्त्यापासून सहा किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. डोंगराच्या पायथ्याशी निसर्गाच्या सान्निध्यात असलेले गाव, बाजूलाच मातीचे धरण आहे. धरणाचा वर्षभर पाणी असते. बाजूलाच भले मोठे उंचउंच डोंगर. अगदी कॅम्प साठी हुकमी असे ठिकाण.

ठिकाण बघून मी मनोमन निश्चित केले की इथे मुलांना घेऊन यायचे.मग राहायची व्यवस्था पाह्यली कदम यांचे घर रिकामेच होते. तिथे राहायचे ठरले. मग उपक्रम काय घेता येतील यावर चर्चा सुरू झाली. शाळेच्या परीक्षेच्या तारखा बघितल्यानंतर डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात शिबिर आयोजित करायचे ठरले. डिसेंबर महिन्यात त्यावेळी खेळाच्या स्पर्धा आणि स्नेह सम्मेलन असायचे.त्यामुळे मुले बऱ्याचदा मोकळी असायची. फक्त दहावी बारावी यांच्या मात्र सराव परीक्षा असायच्या. नंतर असे ठरले की सुटीच्या अगोदरचा शनिवारी व रविवारी घेऊया. मग शिबिराची तारीख ठरली. मुलांना तशा सूचना

दिल्या. कार्यकर्ते कोणकोण येणार आहेत त्याची चौकशी केली. राजेंद्र पांडे, मेघा पांडे, अभिजित, मनीषा

सुपेकर, अलका चौधरी, अरुण चौधरी असे बरेचसे लोक यायला तयार झाले. मुलांना शिबिरात काय काय

करायचे आहे त्याबाबत तयारी करायला सांगितले. मुलांची एक मीटिंग घेऊन शिबिराच्या खर्चाची चर्चा केली.

कोणकोणत्या वस्तू लागणार आहेत त्याची यादी तयार केली. विजय त्यावेळी दहावीत होता. त्याच्या परीक्षेच्या वेळापत्रकात गणिताचा पेपर सोमवारी होता आणि आपले शिबिर शनिवार रविवार होते. मग कसे काय करायचे असे त्याने विचारले. त्याला शिबिर अटेंड करायचे होते. तो नियमित स्वतःचे वेळापत्रक लिहायचा त्यामुळे त्याने त्यात अभ्यासाचे तास वाढवून शिबिराला यायचे निश्चित केले. खरतर त्याच्या पालकांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे कारण मुलगा दहावीत असताना, सहामाही परीक्षेचा पेपर असताना शिबिराला जाण्याची परवानगी देणे ही विशेष बाब होती. आणि अशी मुले ज्यांना ज्ञान हे चुंबक सारखे खेचून घेण्याची वृत्ती आहे अशी मुले शिबिराला फार आवश्यक असतात. बरीच मुले तयार झाली. संतोष कदम आणि त्यांचे कुटुंबीय सुद्धा शिबिरात सहभागी होणार होते. पेडलि येथील शाळेत भेट देण्याचा विचार होता. तसा निरोप मी देण्यास सांगितला. शिबिराच्या आदल्या दिवशी मुलांची एक मीटिंग घेतली. सर्व सूचना दिल्या. शनिवारी सकाळी सातच्या मार्केटिंग बसने नागोठणे येथे जायचे ठरवले. शिबिराच्या दिवशी सकाळी सात वाजता सगळे स्टॉप वर जमा झालो. अभिजित कार मधून नंतर येणार होता.आम्ही सगळे जण सकाळीच निघणार होतो. कॅम्प लीडर अगोदर ठरवले होते. त्यांनी मुलांची यादी तयार केली.

नंतर बस कार्डस आणली आहेत का ते चेक केले. नंतर बस आल्यावर सर्वजण बस पास दाखवून आत शिरले.नागोठणे स्टँडवर पंधरा मिनिटात गाडी पोहचली. उतरल्यावर सर्वांना स्टँड मध्ये बाकड्यावर बसायला सांगितले. हॉटेलमधून लगेच नाष्टा आणला. मुलांना सकाळीच काही खायला दिले की मग दोन तास निश्चिंत असतो. वडापाव हा मुलांचा वीक पॉइंट असतो. त्यामुळे नागोठणे स्टैंड म्हणजे वडापाव हे गणित आमचं पक्क असते. स्टँडवर लगेच पाली बस मिळाली. पंधरा वीस मिनिटात पालीला पोहचलो. तिथून पेडल्ली येथे जायला गाडी लगेच मिळाली. पाली येथून डॉक्टर दोषी यांची मुलगी तेजल आणि मुलगा येणार होता. त्यांनी आमच्यासोबत त्यांना सोडले. त्यांच्यावर संध्याकाळची एक जबाबदारी दिली होती. त्यांना पाली तून भाकरीची ऑर्डर आणावयाची होती. आम्ही भाकरी ची ऑर्डर पाली मध्ये दिली होती.. साधरण नऊ च्या सुमारास तिथे पोहचलो. शाळा गावाच्या थोडी बाहेर असल्याने प्रथम तिथे गेलो. शाळेतील स्टाफ आम्ही आल्यावर बाहेर आला. मग आम्ही काय काय उपक्रम घेणार ते सांगितले. आम्ही तीन टीम तयार केल्या होत्या. एका टीम मध्ये राजेंद्र पांडे, मेघा पांडे आणि मनीषा, दुसरी टीम मुले आणि नंदा गोळे यांची व तिसऱ्या टीम मध्ये मी आणि संतोष कदम होतो. पांडे यांची टीम ९ व १० यां मुलांसाठी मास मीडिया कम्युनिकेशन या विषयावर मैदानात कार्यक्रम करणार होती. मुले व नंदा गोळे यांची टीम सातवी आणि सहावीच्या मुलांना विज्ञान प्रयोग करून दाखवणार होते. मला आठवीच्या वर्गातील मुलांसोबत करीयर संदर्भात चर्चा करावयाची होती.शाळेतील शिक्षक सर्वजण यात सहभागी झाले होते. प्रत्येकाने आपले कार्यक्रम सुरू केले. मैदानात मात्र खूप गर्दी होती परंतु पांडेनी प्रोग्राम छान तडीस नेला. माझ्या वर्गात जरा गडबड होती कारण एक तर मुलांची सुटीची वेळ झाली होती आणि इतर मुले बाहेर आम्ही आत का असा एक प्रश्न होता. तरी काही मुलांनी खुप चांगली चर्चा केली. त्यांचे काही फॉर्म भरून घेतले त्यातून त्यांचा बराचसा कल कळणार होता. माझ्या मदतीला संतोष कदम होते. विज्ञान प्रयोगाची टीम मात्र जोरात होती कारण त्यांचे प्रेझेंटेशन खूप सुंदर झाले होते. नंतर जरावेळ

स्टाफ बरोबर गप्पा मारल्या. ते सर्वजण मुलांच्या ॲक्टिविटी वर खूप खुश होते.

त्यानंतर आम्ही गोळे सरांच्या राइस मिल वर गेलो. त्यांनी सांगून ठेवले होते. गेटवर गेल्यावर तिथे सर्वजण

झाडाखाली बसलो. बारा वाजले होते. जेवण्याची वेळ झाली होती. मग सर्वांनी तिथेच डबे उघडले. तिथेच

आम्ही जेवलो. मग राइस मिल मध्ये गेलो. तिथल्या मिल ऑपरेटर कडून सर्व माहिती घेतली. त्याने तांदूळ कसा वेगळा काढला जातो. वीज किती लागते. वेगवेगळ्या प्रकारे कसा पॉलिश केला जातो. मशीन ची निगराणी कशी करायची याबद्दल माहिती दिली. त्यातून निघालेल्या कोंडा, टरफले यांचा बाजारात कसा खूप डिमांड आहे त्याविषयी बरीच माहिती सांगितली. त्यानंतर आम्ही जवळच असलेले शंकराचे मंदिर बघितले. मागेच मोठे तळे आहे. नदी सुद्धा जवळच आहे. हे मंदिर पूर्वी खूप प्रसिद्ध असावे. यांच्या पायऱ्या, मंदिरामागे असणारा परिसर याच्या खाणाखुणा सांगतो ते इतिहास प्रसिद्ध असावे. मंदिरां नंतर आमचा मोर्चा नवगाव कडे वळवला. त्या ठिकाणी आम्हाला तिथल्या सरपंचाची मुलाखत घ्यायची होती. कदम अगोदरच भेटून आले होते. त्यांचे नाव सुतार असे होते. एका बंगले वजा घरात गेलो. सरपंच यांनी आम्हाला बागितले आणि एकदम खुश झाले. त्यांनी त्यांचे शिक्षण, गावात असणाऱ्या गैरसोय बाबत सांगितले. ते सरपंच असलेल्या काळातील केलेल्या कामाची माहिती दिली. त्यांनी रस्ते कसे बांधून घेतले. रायगड जिल्हा परिषद ने त्यांचे कामाचे कौतुक सुद्धा केले. गावातील लोकांनी त्यांना कसा सपोर्ट केला याबाबत सविस्तर सांगितले. ओंकार काळवीट चलबिचल करत

होता त्याला खुर्ची देऊन त्या सरपंचाची छबी कागदावर उत्रवायला सांगितली. विजय, चैत्राली छान प्रश्न

विचारत होते. काहीजण कंटाळून पेंगत होते. तसे पाहिले तर शेड्युल फार हेक्टिक होते त्यामुळं या गोष्टी

नैसर्गिक होत्या.. जवळ जवळ तास भर कार्यक्रम चालला. नंतर आभार प्रदर्शन मुलांनी केले. मग गावातून

शिबिराच्या ठिकाणी निघालो. चार वाजून गेले होते. पाच पर्यन्त गावात पोहचलो. मग संध्याकाळच्या

जेवणाची तयारी सुरू झाली.सर्वजण कार्यकर्ते कामाला लागले होते. भाजी भात वरण करावयाचे होते. घराच्या मागच्या बाजूला जेवण बनवायचे चालू होते. पांडे यांचा यात खूप पुढाकार असतो. कदम कुटुंब सर्वच्या सर्व मदतीला होते. शेजारच्या घरात एक गोंडस बाळ होते सर्व मुले त्याच्याकडे आकर्षित होत होती. त्यांना घेऊन मग धरण बघायला गेलो. आल्यानंतर कॅम्प फायर ची तयारी सुरू केली. मुलांनी खुप सुंदर नाटके बसवली होती. गावातील बराच समाज

तिथे बघायला येणार होता. घराच्या बाजूला पाण्याची विहीर होती तिथून मुलांनी पाणी आणले. सर्वांनी

मिळून जेवण केले होते. मुले त्यांच्या उपक्रमात गुंतलेली होती. आठच्या सुमारास डॉक्टर दोषी कुटुंब आले त्यांनीयेताना पाली मधून भाकरी आणल्या. मुलांसाठी बुंदीचे लाडू आणले. लोणचे, पापड, डाळ, मटार, भात,तांदळाची भाकरी, लाडू अगदी मस्त जेवण झाले होते. मुले घरी बऱ्याचदा हट्ट करतात पण इथे मात्र उलटे असते. जी मुले नियमित कॅम्पला येतात त्यांना तर सवय झालेली असते. नवीन मुलांना जरा अवघडल्यासारखेहोते. स्वरांगी गोंधळेकर ला थोडा रात्री ताप भरला त्यामुळे थोडी नाराज होती. घराची आठवण येत होती मग मिहिर च्या आईने थोडे समजाऊन नाराजी दूर केली. घराच्या पलीकडे लग्नाच्या मुंडावळ्या बनवण्याचा एक छोटा गृह उद्योग होता. तिथे मुलांनी जाऊन माहिती घेतली. जेवण झाल्यावर सर्व जण घरासमोरील ओट्यावर बसले. तिथं मुलांनी छोटी नाटके सादर केली. गावातील लोकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला. दिवसभर बरीच धावपळ झाल्याने मुले पेंगु लागली होती. त्यामुळे झोपण्याची व्यवस्था केली. तरी काहीजण बडबड करत बसली होती. रात्री अकरा वाजता मी, विजय व अजून दोघेजण गावा बाहेर आलो. रात्री बराच वेळ निवांत धरणाच्या भिंतीवर बसलो. पौर्णिमा असल्याने सर्व ठिकाणी चांगला उजेड होता. बाकी मुले झोपली होती. तासभर आम्ही धरणाच्या भिंतीवर बसलो होतो. नंतर परत गावात आलो. तसे भिंत आणि घर यात फार अंतर नाही. घरातून भिंत दिसते. मग आम्ही सुद्धा झोपी गेलो.सकाळी पाच वाजता उठलो मुलांना उठवले. सर्वांना तयारी करायला लावली. नाष्टा व चहा यांची तयारी सुरू केली. गावातून एकाला ताजे दूध आणायला सांगितले. मग सर्व कार्यकर्ते कामाला लागले. चहा पोहे तयार केले.मुलांना ग्रीटिंग कार्ड्स बनविण्यास सांगितले. मुले मग सर्व साहित्य घेऊन कार्ड बनवत बसले. जवळच एक छोटेसे हरणाचे छोटे पिल्लू ठेवले होते. चुकून जंगलातील हरीण गावात आले होते. त्याला काही होऊ नये म्हणून गावात त्याला सुरक्षित ठेवले होते. मुलांच्या दृष्टीकोनातून ही मोठी गोष्ट होती. ते हरिनीच्या पिल्लाशी खेळत बसले होते. सात वाजेपर्यंत नाष्टा चहा मुलांनी घेतला होता. मग आम्ही एका ट्रेकसाठी निघालो. धरणाच्याजलाशयाला पूर्ण फेरी मारायची असे ठरले. पूर्ण जंगलातून ही वाट पाण्याच्या कडेकडेने जाणारी होती. अगदी स्वच्छ पाणी, कुठलाही प्रदूषणाचा लवलेश नसणारा हा जलाशय. जलाशयाच्या तिन्ही बाजूंनी उंच उंच डोंगर रांगा अगदी स्वप्नवत असे दृश्य होते. पाण्याच्या कडेने वाट काढत कधी ओढ्यातील प्रवाहातून जात होतो. मधेच दोन छोटी बेटे लागली. त्यांच्या बाजूला कमळाची फुले, पाने अगदी हिरवा पांढरा गालिचा अंथरलेला असल्यासारखे भासत होते. बाजूला गवत बऱ्यापैकी सुकले असल्याने त्याचा रंग सकाळच्या सूर्य प्रकाश सोनेरी रंगाने चमकत होता. पाण्यावर सूर्याचे प्रतिबिंब चमकताना दिसत होते. जसजसे आम्ही चालत होतो तसतशी धरणाची भिंत लांब जाताना दिसत होती. धरणाच्या कडेला खूप पक्षी झाडावर मासे टिपण्यासाठी बसले होते.मधेच एखादा खंड्या पक्षी सुर मारत मासा उचलत होता. दूरवर ठणाली लेणी, तैल बैला चे डोंगर वाकुल्या

दाखवत होते. त्यांची टोके चढ उतार यामुळे कधी दिसत होती तर कधी नाही. दूरवर कोणताही आवाज नाही.फक्त पक्षी प्राण्याचा काय तो आवाज, त्यांचेच राज्य. अर्ध्या तासात आम्ही धरणाच्या टोकाला पोहचलो.

तिथं एक मोठा ओढा लागला. तो त्या धरणाचा मुख्य स्त्रोत असावा. तो पार करून पलीकडे गेलो. समोर दहा बारा घरांचे गाव दिसले. आत शिरल्यावर एक दाम्पत्य आमची चौकशी करू लागले. कदम यांची ओळख असल्याने विचारले. ज्यांनी कुणी जैत रे जैत सिनेमा पाहिला असेल त्यांचे कॉस्च्युम आठवत असतील तर हुबेहूब तशीच.गाव सुद्धा तसेच. मग आम्ही त्यांच्याशी अगदी तासभर गप्पा मारत बसलो. त्यांचं दैनंदिन जीवन याविषयी माहिती घेतली. डोंगरावर त्यांचे दोन गुरांचे गोठे आहेत असे सांगितले. पालीला दूध, खवा, तूप याची विक्री ते करतात. जंगलातील बिबटे, हरीण वेगवेगळे पक्षी पाहायला मिळतात असे सांगितले. त्यांच्या मागच्या पिढी बद्दल काही विशेष माहिती सांगता आली नाही. त्यांना त्यांचे नाव विचारले असता त्यानी बावधने आडनाव सांगितले. येथील स्थानिक लोक त्यांना धनगर म्हणतात. मग त्यांना मी विचारले भोराई देवीच्या परिसरात जे बावढणे राहतात त्यांचे तुमचे काही संबंध आहेत काय. त्यांनी सांगितले की ते आमचेच लोक आहेत मग मला उलगडा झाला. पञ्चापुर शिबिरामध्ये आम्ही एका ९५ वर्षाच्या व्यक्तीची मुलाखत घेतली होती त्यावेळी त्यांनी सांगितले होते की ज्यावेळी औरंगझेब चा मुलगा सुधागड किल्ल्यांवर होता त्यावेळी त्याच्या सेवेसाठी बारा बलुतदार आणले होते. त्यातील गवळी समाजातील लोक बावधन वाई येथून आले होते. त्यांना लोक बावधने असे उच्चारतात.

जे गवळी समाजातील लोक भोराई देवीच्या गडावर बादशहाच्या सेवेसाठी आणले होते त्यांना लोक बावधने या नावाने उच्चारात असत. त्यामुळं कालांतराने त्यांचे तेच नाव पडले. किल्ल्याचं महत्व कमी झाल्यावरही त्यांनी दूध दुभते यांचा व्यवसाय चालूच ठेवला परंतु सतत डोंगराळ भागात राहिल्यामुळे त्यांना लोक धनगर समजू लागले आणि आताही तेच चालू आहे. आतातर धरणामुळे आणि त्याच्या जलाशयामुळे ते अजून जगाच्या दूर गेले आहेत. कारण पावसाळ्यात त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. इथून पुढच्या पिढी किती त्या गावात राहतील याबद्दल माहिती नाही पण इतिहास पुसायला वेळ लागत नाही.

आपल्याकडील कित्येक लोक वसाहतीच्या राज्यात आफ्रिका, वेस्ट इंडिज अशा कितीतरी बेटांवर मजुरी करिता घेऊन गेले. तिथल्या स्थानिक प्रतिकूल परिस्थितीत ते तिथे तगले, कोणताही संपर्क त्यांना मायदेशात करता आला नाही त्यामुळे आतातर त्यांना त्यांचे मुळ माहितीच नाही.आम्ही ज्या दांपत्याची मुलाखत घेतली त्यांच्या गावात वीज नाही, रस्ता नाही जगातल्या कोणत्याही सुखसोयी नाहीत परंतु कोणतीही तक्रार न करता ते आपले आयुष्य चांगले कंठत आहेत. त्यांनी त्या वातावरणाला समरस

करून घेतले आहे. त्यांचा निरोप घेऊन आम्ही परत निघालो. वाटेत परत एक मोठा ओढा लागला तो बहुतेक ठणाली लेणी कडून येत असावा. ओढा ओलांडल्यावर जंगल लागले. जंगलात उंच उंच झाडी होती अलीकडे पालिकडे फक्त झाडाचे बुंधे आणि वर आकाश. साधारण अर्ध्या तासात आम्ही धरणाच्या भिंतीवर पोहचलो. पाणी बघताच मुलांना पोहण्याची हौस आली. मग मी सगळ्यांना कपडे

आणायला सांगितले. बाकी सर्व कार्यकर्ते जेवणाच्या तयारीला लागले. मी मुलांसोबत थांबलो. पाण्यात

शिरल्यावर मुलांना बाहेर काढणे जरा अवघड असते. तरी तासभर घालवला. मग परत सगळ्यांना घेऊन

गावात आलो.

घराच्या मागील बाजूस स्वयंपाकाचे काम चालले होते. बरेचजण मदतीला होते. पांडे या कामात

खूप अग्रेसर. त्यांच्या फार आवडीचे काम. सकाळी त्यांनी मुलांना ताज्या दुधाची कॉफी करून दिली होती. कॅम्प मध्ये पूर्वी कार्यकर्ते खूप असल्याने भाकरी चपाती सोडता बाकी सर्व पदार्थ आम्हीच करायचो. बऱ्याचवेळा त्यामुळे कार्यकर्त्यांना कार्यक्रमात सहभागी होता यायचे नाही. जेवण वगैरे आटोपल्यावर आम्ही आवराआवर केली. गावात जरा मुले फिरून आली. हरिणी चे पिल्लू हे मुलांच्या आकर्षणाचे केंद्र होते. आम्हाला पेढली पर्यन्त चालत जायचे होते. त्यामुळे दुपारी तीन वाजता निघालो. रमत गमत पेडली येथे चार पर्यंत पोहचलो. तिथून संतोष कदम यांनी टेम्पोची व्यवस्था केली होती. त्यामुळे त्यांच्या पेडली येथील घरात भेटून

मग पाच वाजता गावातून निघालो. सहा वाजता कॉलनी मध्ये पोहचलो.

Comments


Follow

  • Facebook

©Raigad Muktangan

bottom of page