नागाव शिबिर
परीक्षेनंतर सुट्टी पडली की दोन तीन दिवस शिबिर करायचे मग गावाला किंवा मामा कडे जायचे असे मुलांचे ठरलेले असायचे. त्यामुळे महिनाभर अगोदर आम्हाला लोकेशन ठरवावे लागत असे. त्यावेळी अभिजित जोशी याने त्याच्या स्वतःच्या गावी नागाव येथे शिबिर घेऊया असे सुचवले.राहण्याची व्यवस्था त्याच्या घरासमोरील शाळेत होऊ शकते असे सांगितले. त्या शाळेच्या ट्रस्टमध्ये त्याचा भाऊ होता. त्यामूळे त्याची परवानगी घेऊन शाळेत राहण्यास मिळणार होते.
मग उपक्रम कोणते घेता येतील यासाठी मीटिंग अंजलीच्या घरी घेतली. रेवदंडा येथील प्रसिद्ध उद्योगशील व्यक्ती राजाभाऊ राईलकर यांची मुलाखत आणि त्यांच्या विविध प्रकल्पांची माहिती घेणे, साताड बीच स्वच्छ्ता मोहीम, परिसरातील विविध मंदिरांना भेटी, बीच स्वच्छ्ता यावर पोस्टर्स बनवणे , ती सर्व पोस्टर्स बीचवर असलेल्या झाडांवर लावणे असे बरेच उपक्रम चर्चेत आले. मग कार्यकर्ते कोण कोण येणार यावर चर्चा झाली. अंजली,मी, उपनकर, अभिजित तिन्ही दिवस शिबिराला राहण्याचा प्रयत्न करतील असे ठरले. शिल्पा वंजारी आणि तन्वी सुपेकर यांची आई कँपला येणार होती. शंतनु राणे आणि वरद जोशी दोघेजण आमचे कार्यकर्ते कम मेंबर येणार होते. त्या दोघांच्याही मुळे आमचे अर्धे काम हलके होई. दोघेही मुलांचे छान नेतृत्व करत. मुलांना सर्व उपक्रमात मदत करत.
त्या महिन्याच्या रविवारच्या उपक्रमात आलेल्या मुलांना सर्व माहिती दिली.वीस पंचवीस मुलांची नावे आली. मुलांची यादी तयार केली. संख्या पंचवीसच्यावर गेली होती. जाताना साडेदहाच्या पाली अलिबाग एस्टी बसने जायचे आणि येताना रविवारी अलिबाग वरून रात्री साडे सात वाजता सुटणाऱ्या कंपनीच्या अलिबाग मार्केटिंग बसने यायचे ठरले.त्या काळात दर रविवारी दुपारी चार वाजता अलिबाग मार्केटींग बस असे. त्याच बसचे तिकीट बुकींग करून ठेवले.जेवणाची व्यवस्था अभिजित जोशी याच्या घरी त्याच्या वाडीत करायची ठरली. एकंदरीत शिबिराचे नियोजन पुर्ण झाले.

पेण वरून वरद जोशी आणि अक्षय जोशी येणार होते.ते आदल्या दिवशी रात्री माझ्याकडे कॉलनीत मुक्कामी येणार होते. शिबिरामध्ये काही जण यावेळी नवखे सुध्दा होते. आमच्या मुक्तांगण ग्रुप सोडुन चारपाच मुले नवीन होती. खरंतर शक्यतो रविवारच्या उपक्रमात सहभागी होणाऱ्या मुलांसाठीच शिबिरे आयोजित करायची असा आमचा एक अलिखित नियम होता.पण काही वेळा थोडीसी लवचिकता दाखवावी लागते. त्यामुळे निखील मोरे, निकिता मालुसरे, समृध्दी पाटील अशी काही मुले येणार होती. तशी ही मुले आमच्या रविवारच्या उपक्रमात येत नसत पण काही वेळा काही कारणास्तव अशांना शिबिराला घ्यावे लागते.पण त्यावेळी मुक्तांगण ग्रुपची मुले मात्र हमखास यावर प्रश्न विचारत असत. त्यांचे कारणही रास्त असायचे. आम्ही नेहमी त्यांना सांगायचो की दर रविवारी होणारे उपक्रम आणि त्यावर आधारित असणारी शिबिरे हे एक अलिखित सूत्र होते. या नवीन मुलांना मात्र त्यामुळे शिबिरांत अवघडल्यासारखे होत असे. नेहमीचा ग्रुप कुणाची मुलाखत घे, जेवणास मदत कर, गावातील लोकांशी संवाद साध,गड, किल्ले मंदिरे बघ या सर्व गोष्टीमध्ये अगदी एक्स्पर्ट होता. नवख्या मुलांची त्यामुळे तारांबळ उडायची मग ते एकतर दुसऱ्यांना उगीचच अडथळे आणायचे किंवा परत कधी या भानगडीत पडायचे नाही असे मनोमन ठरवायचे. एकंदरीत ऑड मॅन आऊट असा प्रकार त्यांचा होत असे. शिबिराच्या आधी माझ्याकडे वरद आणि अक्षय आले होते. माझ्या सोबत ते येणार होते.मुक्तांगण ग्रुपच्या मुलांची त्यांची चांगली गट्टी होती. वरद नेहमी मुलांशी मिसळून रहात असे.तो सर्व उपक्रमात सहभागी होऊन चांगले नेतृत्व करायचा. त्यामुळे जरी तो आमचा रविवारच्या उपक्रमातील नसला तरी मुलांना चालत असे.

शिबिराच्या दिवशी सकाळी दहा वाजता कॉलनी गेटवर जमा झालो.तीस जण होतो. नागोठणे स्टॅण्डला घरून निघताना फोन केला होता. अलिबाग बस येणार आहे की नाही याची माहिती घेतली. नागोठण्याच्या कंट्रोलरने पालीला फोन करुन विचारले. त्यावेळी पाली अलिबाग गाडी पालीला उभी होती असे त्यांना सांगीतले. नागोठणे पेझारी या मार्गावर फार मर्यादित बसेस उपलब्ध आहेत त्यामुळे घरातून निघताना काळजी घेतली होती.बस बरोब्बर साडेदहा वाजता गेटवर आली.फारशी गर्दी नव्हती. टाऊनशीप स्टॉपवर एवढी गर्दी बघून कंडक्टरला मात्र आश्चर्य वाटले. सर्व जण गाडीत बसलो. बारा वर्षाखालील बरीच मुले होती त्यामुळे कंडक्टर त्यानुसार मुलांना इयत्ता विचारत होता.मी त्याला एकदम अर्धी तिकिटे किती आणि फुल टिकीट किती याचा हिशोब सांगितला.पण त्याने मात्र मुलांना विचारून खात्री करून घेतली.ही गाडी कुर्डुस मार्गे जाते. पेझारी- पोयनाड वरून मग अलिबाग कडे जाते. साधारण तासा सव्वा तासात अलिबाग स्टँड वर पोहचलो. मुरुडकडे जाणारी एक बस समोरच लागलेली होती. रिकामीच होती.मग आम्ही पटकन त्या बसमध्ये चढलो. नागाव हे अलिबाग वरून आठ किलोमीटर अंतरावर आहे.त्यामुळे अर्ध्या तासात आम्ही नागाव येथे पोहचलो. आमची व्यवस्था ज्या शाळेत केली होती त्या शाळेसमोर असलेल्या बस स्टॉपवर उतरलो. शाळेला सुट्टी असल्याने सर्व वर्ग रिकामे होते. शाळेचे मैदान बरेच मोठे होते. मुलांना खेळायला मोकळीक होती. बारा वाजून गेले होते.जेवणाची वेळ झाली होती. अभिजीतचे घर समोरच होते. त्याच्या घराच्या मागील बाजूस खूप मोकळी जागा बसण्यासाठी होती. तिथे बसुन सर्व मुलांनी घरून आणलेले डब्बे संपवले. नंतर दुपारच्या सत्रात नियोजित केलेले कार्यक्रम सुरू केले. त्यात नागाव बीचवर जी पोस्टर लावायची होती ती काढायला मुलांनी सुरवात केली. मुलांचे वेगवेगळे गट पाडले. शंतनु राणे आणि वरद यांना ग्रुप लीडर केले. बीच वरील कचरा व्यवस्थापन आणि बीचवर येणाऱ्या पर्यटकांची जबाबदारी या विषयावर चार्ट बनवण्यासाठी मुले गटानुसार बसली.प्रत्येक गटाने चर्चा करुन कोणती चित्र काढायची, कोणकोणते स्लोगन लिहायचे हे मुलांनी ठरवले. त्यानंतर काहींनी चित्रे काढली तर काहींनी ती रंगवली. काही मुले फक्त स्लोगन लिहीत होती. प्रत्येक जण ग्रुप लीडर सांगेल ते काम करत होते.

पाच वाजेपर्यंत चार्ट तयार करून रंगवुन झाले. पाचनंतर मग काही मैदानी खेळ घेतले. ज्यामध्ये लगोरी, डॉग अँड बोन, खो खो असे बरेच खेळ घेतले. आम्ही रविवारचा उपक्रमात हे खेळ घेतो. परंतु मुलांनी आणि आम्ही मिळुन दहा बारा नवीन खेळ शोधले आहेत. त्याला काही नावे दिली नाहीत .त्यात काही खेळ डोळ्यावर पट्टी बांधुन मित्रांचे आवाज ओळखणे किंवा त्यांची उभे राहण्याची जागा शोधणे, डिस्क पासिंग खेळ ग्रूप नुसार खेळून त्याचे टायमिंग मोजणे. डिस्क खाली पडल्यास काही गुण कमी करणे.मग ज्या गटाला कमी वेळ लागतो त्या गटाला विजेता जाहीर करायचे. काही खेळ जनरल नॉलेज वाढवण्यासाठी आणि पटकन विचार करून कृती करण्यासाठी तयार केले आहेत. याचा वापर आम्ही ज्यावेळी काही ट्रायबल शाळांमध्ये जातो त्यावेळी तिथल्या मुलांच्या साठी करतो. यातील बरेच खेळ आणि आमचे उपक्रम अशा शाळांमध्ये आम्ही राबवत असतो.खेळातून विज्ञान आणि गणित शिकणे या संकल्पना मुलांच्या मदतीने तयार केल्या होत्या. शिबिरात याचा चांगला उपयोग होतो.नागाव शिबिराचे मुख्य उद्दीष्ट बीच स्वच्छ्ता आणि त्या परिसरात त्या संदर्भात पर्यटकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी जागोजागी पोस्टर्स लावणे हे होते. याला केंद्रस्थानी ठेऊन आमची त्यादिवसाची तयारी चालली होती. रात्रीच्या जेवणाची सोय अभोजितच्या घरी होती. अंजली, शिल्पाची आई, अभिजितचे सर्व कुटूंब सगळेजण जेवणाच्या तयारीला लागले होते.जेवण आठ वाजेपर्यंत तयार झाले होते. रात्री काही पालक शिबिराच्या ठिकाणी भेट द्यायला आले होते . निकिताचे वडील साधूराम मालुसरे, शैलेश गुरव,मोरे अशी बरीच मंडळी हजेरी लावून गेली.पालक गेल्यानंतर लगेच मुलांनी जेवून घेतले. रात्री उशीरपर्यंत मुलांचे पोस्टर्स बनवणे चालू होते. दिवसभर बऱ्यापैकी धावपळ झाली होती त्यामुळे मुले लवकर झोपी गेली.
पहाटे पाच वाजता मुलांना उठवले. शाळेत मुलांसाठी पाण्याची व्यवस्था केली होती. मुलांनी तासाभरात आवरले. नाष्टा तयार करायला सुरवात केली होती. मुलांचा एक गट मदतीला होता. मुलांनी सर्व चार्ट्स जमा केले. पोस्टर्स अडकविण्यासाठी दोरीचा बंडल, बारीक चुका घेतल्या. कॉटनचे हातमोजे आणले होते. पाणी , भेळीचे साहित्य घेऊन आम्ही नऊच्या सुमारास साताड बंदराकडे निघालो. शाळेपासून पंधरा मिनिटाचा रस्ता आहे. रेवदंडा बाजुस थोडे पुढे गेल्यावर एक शिवाजींचा पुतळा दिसतो तिथे एक बोर्ड लावलेला होता' साताड बंदराकडे’. पुतळ्या पासुन उजवीकडे वळल्यावर सरळ रस्ता बीच कडे जातो. आम्ही तीसजन होतो. त्यामुळे मोठा ग्रूप होता. बीच वर पोहचल्यावर मुलांना गटा प्रमाणे उभे केले. बीचवर सुरुची झाडे अगदी दुरवर पसरलेली आहेत.या परिसरातील अतिशय सुंदर बीच म्हणुन ओळखला जातो. बीचवर स्थानीक मुलांचे क्रिकेट आणि काही वेळा गाड्यांच्या शर्यती चालु असतात .इथे बऱ्याच लांबपर्यंत वाळू दिसते त्यामुळे खुप सुरक्षित आहे. लगेच खोल भाग लागत नाही.मुलांच्या दृष्टीकोनातून खुप चांगले ठिकाण आहे. लोक किनाऱ्यावर प्रचंड कचरा करतात. प्लास्टिक , दारूच्या बाटल्या, प्लास्टिक कप, डिशेस, उरलेले अन्न याने परिसर खराब करतात. तिथे काही प्राणी कुत्रे, डुक्कर कावळे त्या कचऱ्यावर जमा होतात.या बंदरावर शनिवार रविवारी मात्र पर्यटकांची झुंबड असते.या दोन दिवसात तिथे घाणीचे साम्राज्य तयार होते. यासाठी थोडी जनजागृती व्हावी आणि परिसर जमेल तेवढा स्वच्छ करावा या हेतूने मुलांना तिथे उपक्रमासाठी आणले होते.
प्रत्येक गटाला एक विशिष्ट भाग दिला. त्यांनी तिथला कचरा गोळा करून एक मोठया खड्यात ओतायचा. पाच सहा जणांचा ग्रुप काम करत होता. दोन तासात जवळ जवळ दोन ट्रॅक्टर ट्रॉली भरतील एवढा कचरा गोळा केला. दोन मोठया खड्यात सर्व कचरा जमा केला होता. त्यानंतर आम्ही सर्व जण बीच परिसरात असणारी झाडे, बेंच अशा विविध ठिकाणी पोस्टर्स लावायला सुरुवात केली. काही ठिकाणी दोरीने बांधली तर काही ठिकाणी फेविकॉलने चिकटवली. झाडांच्या खोडावर चुका ठोकून काही पोस्टर्स लावली. मध्ये थोडा वेळ भेळीचा नाष्टा तयार करून सर्वांना वाटला.

बरेच पर्यटक मुले काय करतायत ते पहात होते. काही जण टवाळी सुध्दा करत होते. मुलांना अगोदरच थोडी कल्पना दिली होती त्यामुळे मुले आणि कार्यकर्ते सर्वच जण आपापल्या कामात व्यस्त होते आणि बघ्या लोकांच्या प्रतिक्रियेकडे दुर्लक्ष करत होते. कचरा ज्या खड्यात भरला त्यात वर थोडा पाला पाचोळा टाकला.या सर्व उपक्रमाला चार तास लागले. तोपर्यंत जेवणाची वेळ झाली होती.मग आम्ही परत शिबिराच्या ठिकाणी जायला निघालो. काही बैलगाड्या समोरून येताना दिसत होत्या. बैलगाडीची साठी ही घोडागाडी सारखी हलकी दिसत होती. खिलारी बैलांच्या जोड्या होत्या.मग अभिजीतने सांगितले तिथे बंदरावर बैलांच्या शर्यती होतात. वाळूचा खुप भाग मोकळा असल्याने साताड बंदरावर बऱ्याचदा शर्यती होतात. परिसरातील नामांकित बैलजोड्या स्पर्धेला येतात. लाखो रुपये खर्च करून बैलजोड्या घेतलेल्या असतात.या खेळावर आता बंदी घातली आहे. बैलगाडी शर्यत हा महाराष्ट्राच्या परंपरेचा एक भाग आहे परंतु पाळीव प्राण्यांच्या अत्याचाराच्या विधेयकानुसार सद्या या शर्यतींवर बंदी घालण्यात आली आहे.पण बरेच राजकीय पक्ष आणि त्यांचे पुढारी शर्यती परत सुरु व्हाव्यात यासाठी प्रयत्नशील आहेत.
अर्ध्या तासात आम्ही शिबिराच्या ठिकाणी पोहचलो. एक वाजले होते. अभिजितच्या घरी मागच्या बाजुस सर्वजण एकत्र जेवायला बसलो.अंजली, शिल्पाची आई , विनोद सावंत असे बरेच कार्यकर्त्ये मदतीला होते. अभिजित जोशी आणि सर्व कुटुंबीय मदतीला होतेच. चाळीस जण सगळे मिळून होतो. एवढ्या लोकांची व्यवस्था करणे तशी अवघड गोष्ट असते.सर्वांना हवे नको ते पाहणे यात बराच वेळ जातो. त्यात मुलांना हाताळताना त्यांच्याशी समरस होऊन उपक्रम राबवावे लागतात. घरातील लोकांनी तेवढी साथ सुध्दा द्यावी लागते. गावात कार्यक्रम घेताना गावात कुणाला त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी लागते.
आमची एक टीम मात्र जेवणाची व्यवस्था करण्यात दंग होती. अंजली, शिल्पाची आई, अभिजितची आई आणि त्याची वहिनी असे बरेच जण जेवण करण्यास हातभार लावत होते. जेवणात खिचडी भात , भाजी हा मेनू होता. मुलांनी आल्यावर जेवणावर असा काही ताव मारला की जेवण तयार करणाऱ्यांचा अंदाज चुकला.सात आठ लोकांसाठी परत जेवण करायला लागले.बाहेर आणि विशेष करून शिबिरात मुले खुप दमतात , गटामध्ये चढाओढीत जेवण जरा ज्यास्तच होते. त्यामुळे बऱ्याचदा जेवण बनवणाऱ्या लोकांचे अंदाज फसतात.

जेवणानंतर राजाभाऊ राईलकर यांच्या वाडीत गेलो.त्यांच्या वाडीत त्यांनी विविध प्रयोग केले आहेत. मसाल्याची झाडे,नैसर्गिक रंगांची झाडे, नवनवीन प्रयोग करुन तयार केलेली रोपे त्यांनी दाखविली.मुले सुध्दा चांगली महिती गोळा करत होती. राजाभाऊ मुलांना खूप मन लावून सांगत होते. पदमा , शंतनु, वरद, सुयोग,तनु, शिल्पा, सिध्दी अशी कितीतरी मुले होती ज्यांना माहिती काढून कशी घ्यायची याची चांगली जाण होती. राजाभाऊ यांच्या वाडीत मातीची भांडी बनवण्याचे एक छोटे दालन होते. छोट्या कुंड्या, पणत्या, मातीचे पेले अशा बऱ्याच गोष्टी तिथे पाहायला मिळाल्या. राजाभाऊ नवनवीन प्रयोग करून नेहमीच प्रकाश झोतात असायचे.पण मुलांना मार्गदर्शन करताना मात्र त्यांची शेती विषयी असलेली आस्था भरलेली दिसायची.खूप आत्मीयतेने मुलांना प्रत्येक रोप, झाड या विषयी सांगत होते. तासाभराने सर्व मुलांना एकत्र बसुन पूर्ण कार्यक्रमावर आधारित एक कार्यक्रम घेतला. मुलांनी, अभिजीतने राजाभाऊ यांचे आभार मानले.
त्यानंतर जवळ असलेल्या रेवदंडा येथील रामेश्वर मंदिराला भेट दिली. रेवदंडा हे चौल राजाच्या काळातील प्रमुख ठिकाण होते. जुन्या काळातील आपल्याकडील प्रसिद्ध बंदरापैकी एक बंदर म्हणून ओळखले जात होते. याच्या पाऊलखुणा मात्र सर्व ठिकाणी दिसत होत्या. जागो जागी असलेल्या पुष्करणी मात्र याची साक्ष देतात. जुनी मंदिरे, किल्ल्याची तटबंदी, जुन्या घरांचे अवशेष, पाण्याची असलेली व्यवस्था अशा बऱ्याच गोष्टी इथल्या सुवर्ण काळाची साक्ष देतात. जवळील काही भागांत असलेल्या गावांमध्ये देश विदेशी भाषा बोलणारे अजूनिही आढळतात. याचा अर्थ असा होतो की जगाशी संपर्क असणारे हे बंदर असावे. इथल्या आसपासच्या डोंगरातून खाली पाहिले तर घरे दिसतच नाहीत फक्त माडाची गर्द झाडी पसरलेली दिसते आणि पलीकडे अफाट पसरलेला निळाशार पाण्याचा सागर पाहायला मिळतो. बरीच माहिती तिथे मुलांनी मिळवली. नंतर चार वाजेपर्यंत शिबिराच्या ठिकाणी पोहचलो. संध्याकाळी अलिबाग कडे सात वाजेपर्यंत जायचे होते.संध्याकाळच्या अलिबाग मार्केटिंग बसचे बुकींग करून ठेवले होते. मुलांना बॅगा वैगेरे आवरून ठेवायला सांगितल्या. नंतर मुलांना मैदानात खेळायला पाठवले. काही जण डायरी लिहित बसले. दिवसभर घेतलेल्या माहितीची नोंद मुलांनी डायरीत केली. बऱ्याच मुलांनी मात्र मैदानात खेळणे पसंद केले .तासभर खेळ झाल्यावर सर्वांना बॅगा घेउन यायला सांगीतले .सर्व मुलांना एकत्र शाळेच्या जवळील बस स्टॉपवर थांबायला सांगितले. रेवदंडा बाजूने येणाऱ्या एस्टी बसने आम्ही जाणार होतो. अर्ध्या तासाने एक बस आली. बऱ्यापैकी रिकामी होती. त्यामूळे सर्वांना बसायला जागा मिळाली. अलिबाग अंतर हे फार तर आठ दहा किलोमीटर आहे. त्यामूळे अर्ध्या तासात आम्ही अलिबाग स्टँड वर पोहचलो.बस अलिबाग बीचवर मुलांना घेउन गेलो. तिथे थोडावेळ घालवल्यावर साडे सात वाजता बस आली. आमचे जायचे बुकींग असल्याने थोडासा गोंधळ झाला.येतानाचे बुकींग कमी जाताना गाडी फुल्ल. येताना काही जण बस रिकामी दिसल्याने असेच आले होते त्यांचे मात्र जाताना प्रोब्लेम झाले.मग आम्हीच जागा त्यांना सांभाळून घेतले. मुलांच्या गप्पा रंगल्या होत्या. प्रवासाचा तास कधी संपला कळलेच नाही. साडेआठ वाजता कॉलनीत पोहचलो.
_edited_edited_edited.jpg)



Comments