top of page

जांभोशी शिबीर २०००

1 day ago
9 min read

मुक्तांगण उपक्रमाच्या सुरवातीच्या काळात शिबिर म्हंटले की विनोद सावंत यांची मदत ही ठरलेली असायची. समर कॅम्प कुठे घ्यावा यासाठी अंजलीकडे गेलो.मग सावंत यांनी पाबल हे गाव सुचवले. आपण जाऊन येऊ असे सुचवले. त्या गावात त्यांच्या ओळखीचे एक डॉक्टर राहत होते. डॉ. मोकल हे रायगड जिल्ह्यातील हशिवरे गावातील होते त्यांचा जांबोशी गावात दवाखाना होता.ते त्याच गावात राहत होते.एक दिवस पाच वाजता बाईकवर गावात जाण्याचे ठरवले. पाबळ हे गाव नदीच्या तीरावर वसलेले आहे त्याच्या पलीकडे नदीच्या दुसऱ्या बाजूला जांबोषी गाव आहे.या गावांना दोन ठिकाणाहून रस्ता येतो.एक रस्ता निगडे पुल ओलांडुन गेल्यावर लगेच उजव्या बाजूस वळल्यावर लागतो. दुसरा रस्ता आमटेम गावा पासुन निघतो. हा रस्ता त्यावेळी कच्चा होता. मात्र निगडे पुल रस्ता डांबरी होता. त्यामुळे तोच रस्ता निवडला.या रस्त्यावर लगेच रेल्वे फाटक लागते. फाटक ओलंडून पुढे गेलो की दोन छोट्या टेकड्या दिसतात.त्या मधुन ही नदी वाहते. खरंतर हिथे ती खाडीच आहे. पुर्वी या ठिकाणी बोटी येत असाव्यात , नदीच्या एका बाजूला पायऱ्या दिसतात.छान घाट बांधलेला दिसतो. प्रशस्त जागा असून इथे एका छोट्या बंदरासारखी जागा दिसते. भरतीचे वाळू मिश्रीत पांढरट रंगाचे पाणी दिसते. टेकड्या पार केल्यानंतर पुढे गेल्यावर उजवीकडे एक छोटा बंधारा आहे. डावीकडे महलमिरा टेकड्या लागतात. थोडे पुढे गेल्यावर देवमाळ कडे जाणारा रस्ता लागतो. तिथून आपण व्याघ्रेश्वर मंदिर पाहायला जाऊ शकतो. साधारण दोन अडीच तास  अंतर चालावे लागते. आजूबाजूला जंगल लागते. सागाची भरपुर झाडे होती. रस्ता मात्र तसा निर्जन. नदीच्या किनारी कोंबड्यांचा आवाज येऊ लागला.या परिसरात पोल्ट्री फार्म खूप आहेत.पण बरेचशे एकाच मालकाचे आहेत. साधारण आठ किलोमीटर अंतरावर पाबळ गाव लागले.मग नदी ओलांडुन गेल्यावर जांबोशी गाव लागले. तिथं डॉक्टर मोकल यांना भेटलो .त्यांच्याशी गप्पा मारल्या तेंव्हा कळाले की ते दापोलीच्या मेडीकल कॉलेज मध्ये शिकले होते.मग डॉ. चंद्रकांत मोकल यांची ओळख निघाली. त्यांना सविस्तर आमच्या ग्रुप विषयी सांगितले. शिबिराचे उद्दिष्ट सांगितले. त्यांनी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.राहण्याची जागा, जेवणाची सोय करतो असे सांगितले.जे घर देणार होते ते पाहून आलो. गावातली काही माणसे भेटली त्यांना आमचे येण्याचे उदिष्ट सांगितले. त्यांना १२,१३,१४ एप्रिल ही तारीख कळवली. त्यांच्याकडे इथे ट्रेक साठी कोणती जागा योग्य आहे हे विचारले असता त्यांनी काकडकोंडी नाव सुचवले.मग सविस्तर चर्चा करून आम्ही घरी परतलो.

घरी आल्यावर एक कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यात उपनकर, बनाईत सर, बरगोले यायला तयार झाले. कार्यक्रम आखला गेला.यात गावात मुलाखती घेणे, काकडकोंडी ट्रेक , परिसरातील विविध उद्योग धंद्यांना भेटी देणे अशा स्वरूपाचा कार्यक्रम आखला होता. त्यावेळी एवढा अनुभव गाठीशी नव्हता. सोई सुविधा, गैरसोय, मुलांना काही गोष्टी झेपतील का? , लाईट त्या गावात नव्हती , अशा बऱ्याच गोष्टी त्यावेळी माझ्या तरी डोक्यात त्यावेळी कधीच येत नसत. फक्त एवढंच की मुलींना शिबिराला नेऊ शकत नाही ही एकमेव गोष्ट पक्की होती. कार्यक्रम ठरल्यावर मुलांची नावे घ्यायला सांगितले. कंपनीत जाऊन आरबी ठाकूरला भेटलो.तो लगेच यायला तयार झाला.तो असल्याने माझे बरेचशे काम हलके होणार होते. बरगोले गाडी घेऊन तिथे येणार होते. बानाईत सर कार घेऊन येतो असे बोलले होते.गोवा हायवे वरून गावाचे अंतर पाच सहा किलोमीटर होते. मुलांची नावे यायला सुरवात झाली होती.स्वप्नील बरगोले , सुमित गायकवाड, सुशील सातपुते, सुग्नेश रणवरे, दिग्विजय मोरे, गवळी बंधू, स्वप्निल चौधरी अशी बरीच नावे आली होती.तीन दिवस लागणाऱ्या वस्तूंची यादी मुलांना दिली. त्यावेळी पालक मीटिंग वगैरे काही प्रकार नव्हता. बऱ्याच पालकांना तर कुठे जाणार याची कल्पना नसायची.एक दोन पालक सोडायला यायचे बाकी सर्व मुले स्वतः स्टॉप वर येत असत.या अशा ॲक्टिविटीला काही जण मात्र फटकुन वागत असत.पण मला आता आठवत नाही पण त्यांचा विचार मी कधी केला नाही.एक थोडे आमच्यात वयाने मोठे असलेले केसरकर नावाचे एक्स सर्व्हिसमन होते ते एकदा मला म्हणाले की तू मुलांना घेऊन जातोस तुला रिस्क वाटत नाही का ? हेच पालक जे आता काही बोलत नाहीत पण काही झाले तर तुला जड जातील. खरंतर त्यांना काय उत्तर द्यावे मला सुचेना पण त्यांना मी एवढेच म्हणालो की मी वाईट घडेल असा विचारच करत नाही,पण तुमच्या सल्ल्याची नक्की आठवण ठेवीन चांगले नियोजन करण्याचा प्रयत्न करेन.मग एकदा नागोठणे एसटी डेपोत जाऊन जांभोशी गाडीची वेळ विचारून घेतली. नंतर राजेश सावंत आणि मी दोघेजण पाबळ येथे जाऊन आलो.जवळ पास भाजीपाला, पीठ, आणि ईतर किराणा कुठे मिळेल याची माहिती घेतली. गावात सामुदायिक भांडी होती ती भाडयाने घेण्याचे ठरविले. ज्यांच्या मुलाखती घ्यायच्या होत्या त्यांना भेट देऊन आलो. बऱ्याच ट्रेक अगोदर राजेश सोबत ट्रेक पाहणी करायला यायचा.या उपक्रमात असंख्य लोकांच्या डायरेक्ट इनडायरेक्ट मदती होत असत.असे उपक्रम एकटयाने कधीच होत नसत. सुखदेव बर्गोले ,आर बी ठाकुर उपनकर अशा लोकांचे योगदान खूप मोठे होते.वेळ काढणे, मुलांमध्ये मिसळणे ही तेवढी छोटी गोष्ट नाही. ठाकुर असला की डोंगर असो वा दरी असो हा कधीच घाबरत नसे. फोटोग्राफीची कमालीची आवड असल्याने आम्हाला खूप फायद्याचे होते.जे काही जुने फोटो अल्बम आहेत त्यातील नव्वद टक्के फोटो त्यानेच काढलेले आहेत. माझ्याकडे डिजिटल कॅमेरा आल्यानंतर सुध्दा बऱ्याचदा त्याने फोटो काढले होते.

तर अशी तयारी झाल्यावर मुलांना सकाळी सात वाजता बस स्टॉपवर यायला सांगितले. सर्व साहित्याची यादी दिली.बनाईत सरांस निरोप दिला.ते दुसऱ्या दिवशी सकाळी कारने येणार होते.बरगोले पहिल्या दिवशी संध्याकाळी पोहचणार होते. माझ्यासोबत उपनकर येणार होते.

त्यावेळी मी कॉलनीत A १०१ मध्ये रहात असल्याने मी चालत साडेसहाला बाहेर पडलो. वाटेत मला काही मुले भेटली. पावणे सात वाजता सर्व जण जमा झाले होते.सर्व यादी चेक केली. सातच्या सुमारास नागोठणे मार्केटिंग बस आली. सव्वा सात वाजता नागोठणे एसटी स्टँड वर पोहचलो. जांबोशी बस साडे नऊ वाजता असल्याने आम्ही पेण बसने प्रवास करण्याचे ठरविले. आठ वाजता पेण बस मिळाली. आम्ही आमटेम येथे उतरलो. इथला रस्ता माहीत नव्हता.मी दोन्ही वेळेस निगडे पुल मार्गे गेल्याने हा रस्ता विचारावा लागला. गोवा हायवे पासून सात किलोमिटर अंतरावर जांबोशी गाव आहे एवढे माहीत होते. थोडे अंतर चालल्यावर रेल्वे फाटक लागले. अर्धा तास चालल्यावर एक खिंड लागली आता हायवे दिसेनासा झाला. आम्ही आता जंगल भागात शिरलो होतो. रस्त्यात आंब्याची बरीच झाडे होती. मुलांनी काही कैऱ्या खायला घेतल्या. मध्येच थोडा नाष्टा केला. मुलांनी दुपारचे जेवण सोबत आणले होते. रस्ता कच्चा होता. ठिकठिकाणी खड्डे पडलेले होते. वर्दळ तशी कमीच होती. वाटेत काही पोल्ट्री फार्म लागले. मध्ये एक दोन ओढे लागले. विशेष म्हणजे त्या ओढ्यात पाणी देखील होते.तसा एप्रिल महिन्याचा मध्य होता.पण त्यावेळी तिथे वनसंपत्ती खूप होती. हा म्हणजे अगदी काश्मीर मधील पहेलगाम सारखा आहे. उंच डोंगर मधून गोल गोल दगड गोट्यातून वाहणारी लीदर नदी. इथे फरक एवढाच आहे की ती नदी बारमाही वाहते ही फक्त पावसाळ्यात भरभरुन वाहते. पावसाळ्यातील इथले सौंदर्य म्हणजे खरोखरच अवर्णनीय.पण उन्हाळ्यात देखील वाईट नाही पण नदीचं पाणी आटलेले असते. ओहळ चालु असतात. कुठे कुठे साठलेले पाणी असते.पण अतिशय स्वच्छ आणि सुंदर परीसर.काही भाग तर अतिशय निर्जन. आम्ही मात्र रमत गमत चाललो होतो. त्यामूळे आम्हाला तीन तास जाण्यास लागले. गावात पोहचल्यावर पहिल्यांदा रिकाम्या ड्रम मध्ये पाणी भरून घेतले. डॉक्टर मोकल यांनी घर उघडुन दिले. मुलांनी सर्व बॅगा व्यवस्थित ठेवल्या. दुपारचे जेवण बाकी होते. त्यामूळे सर्वांनी जेवून घेतले.

जेवल्यावर मुलांना एकत्र बसवले. त्यांचे ग्रुप पाडले. ग्रुपचे लीडर्स ठरवले.या गटात स्वप्नील चौधरी, सुजित सातपुते, गवळी, बिरंजे, रनवरे, दिग्विजय मोरे, दिनेश सावळे हे एका वयोगटातील मुले. चहा, नाष्टा आणि जेवण यासाठी सुध्दा कामाची विभागणी केली होती. पाणी भरणे, भांडी स्वच्छ करून ठेवणे, जेवणास मदत करने हे काम वेगवेगळ्या गटाला आलटून पालटून दिले होते. प्रत्येक लीडरचे काम होते की त्याचे योग्य नियोजन करणे. बरगोले आणि बनाईत सर हे दोघेजण त्यांना मुलाखती घेणे , त्यांचे काही चर्चासत्रचे कार्यक्रम घेणे यात मदत करत होते. उपनकर आणि ठाकुर हे स्वयंपाक नियोजन करत होते.

दोन तीन तास चालल्यावर मुले कंटाळली होती.सलग उन्हात चालण्याची मुलांना सवय नव्हती.मग तासभर मुलांनी आराम केला. दुपारच्या सत्रात मुलांना काही प्रश्न काढायला सांगितले जे मुलाखतीला लागणार होते. प्रत्येक गटाने ते तयार केले.काही बैठे खेळ घेतले.चार वाजता आम्ही परीसर पाहण्यास निघालो. नदीवर जाऊन आलो. काही ठिकाणी शेतीसाठी पाणी अडवले होते. तिथून पंपाने पाणी मळ्या साठी वापरत होते.त्या शेताला भेट देऊन आलो. वांगी ,टोमॅटो लावली होती.दोन रुपये किलो भावाने आम्हाला वांगी टोमॅटो दिली होती. नदीच्या पलीकडच्या बाजूला शेती केलेली होती.गावात एक मंदीर आहे तिथे भेट देऊन आलो.जेवणाची भांडी एकाच्या घरी होती ती त्यांच्या गावकीची होती . त्याचे थोडे फार भाडे होते ते दिले. जेवणाचे तीन टोप , मोठी पळी, उलथने, जेवण वाढन्याची भांडी असे साहित्य घेतले. गावातले काही लोक मदतीला आले.काही जण आमच्या कॉलोनीच्या आसपासच्या गावातील लोकांचे नातेवाईक होते. त्याचा फायदा पण आम्हाला झाला शिवाय डॉक्टर मोकल होतेच .

चहासाठी दूध लागणार होते मग काही मुलांना गावात पाठवुन दुध कुणाकडे मिळू शकेल का याची माहिती घ्यायला सांगितले.संध्याकाळी मुले समोरच्या मोकळ्या जागेत खेळत होती. संध्याकाळी डॉक्टर मोकल यांनी तळ्यात मासे पकडायला येता का विचारले.पण संध्याकाळचा नाष्टा आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करायची होती त्यामूळे त्यांना नाही म्हणूनच सांगितले. गावात तसा रात्री अंधराच पडणार होता कारण पोलच्या लाईट गावात नव्हत्या. स्वयंपाक बाहेर चुलीवर म्हणजे तीन मोठे दगड ठेवून लाकूड जाळून करनार असल्याने अंधार पडायच्या आत जेवण उरकायचे होते. मुलांची जेवणाची टीम काम करत होती. इतर काही मुले डायरी लिहीत बसली होती तर काही जण खेळत होती. त्यावेळी कॅम्प फायरचे नियोजन नसायचे कारण वेळ पुरत नसे. उपक्रम नवीन असल्याने कोणकोणते कार्यक्रम घ्यावेत याचा उडअनुभव कमी होता.एक छानसा ट्रेक , परीसर अभ्यास, निसर्गात आणि तिथल्या माणसात रमने एवढेच उद्देश असायचे .तो सहज साध्य होत असे. जसजसे आमचे शिबिरांचे प्रमाण वाढले तसतसे त्यातील उपक्रम वाढत गेले.ठाकुर आणि उपनकर दोघे कूकची भुमिका पार पाडत होते आणि त्यांच्यासोबत मुलांचा एक ग्रुप होता. तास दीड तास बनवण्यास गेला.आठ वाजेपर्यंत जेवणं आटोपली.मग मुलांना सर्व आवराआवर करून लवकर झोपण्यास सांगितले कारण दुसऱ्या दिवशी पाच वाजता उठून सर्व चहा नाष्टा आवराआवर करून साडेसहा वाजता काकडकोंडी ट्रेकला निघायचे होते.गावातील एक जाधव नावाचे गृहस्थ आमच्या सोबत येणार होते. दिवसभर तशी बरीच पायपीट झाली होती त्यामूळे मुले सुध्दा दमली होती.

दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता मुलांना उठवले. पटापट आवरायल सांगितले. पाण्याच्या बाटल्या आणि  सुका खाऊ घेऊन निघायचे होते. सकाळी गावातून मुलांनी दुध आणले. चहा नाष्टा तयार केले.सर्व मुलांना वाटप केले. मग आम्ही सातच्या सुमारास निघालो. बनाईत सर, उपनकर,ठाकुर , बरगोले सोबत होते. गावातील गाईड वेळेत आले होते. त्यांना या जंगलाची आसपासच्या भागाची चांगली माहिती होती.

                गाव सोडल्यावर नदी लागते . नदी ओलांडून गेल्यावर थोड्या अंतरावर एक वाडी लागते.या वाडीतल्या एका घराजवळ जरा थांबलो. तिथल्या परिसराची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. छान माहिती सांगितली. गावा पलीकडे दोन टेहळणी किल्ले होते. शिवकाळा नंतरची गोष्ट असावी. याचे किल्लेदार दोन मराठा सरदार होते. त्यांचे नाव दाभाडे आणि जाधव असे होते. त्या दोन सरदारा मधील लढाईचे त्रोटक वर्णन त्या गाईडने केले. ऐतिहासिक वारसा न जपणे आणि कोणतीही गोष्ट प्रत्येक पुढच्या पिढीला न सांगने , कोणत्याच गोष्टी संवर्धन न करने ही बाब आपली ओळख संपवणारी होती हे कधी लोकांस कळाले नाही. याचाच फायदा इतिहास खोटा लिहिण्यास करतात. लेखणी अगदी झीरोला हिरो सुध्दा करू शकते.

सकाळी उठल्यावर लगेचच निघाल्याने रस्ता भरभर उरकत होता. आम्ही ओढ्याच्या पात्राला धरून चाललो होतो.मध्ये कूठे कूठे पाणी दिसत होते.उन्हाळ्यातील एप्रिल मध्याचे दिवस असल्याने डोंगराळ भागात एवढे पाणी असणे ही सुध्दा मोठी गोष्ट होती.काही वेळाने ओढ्याने एक मोठा वळसा घातलेला दिसला म्हणुन आमच्या गाईडने एका माळरानतून नेले. तिथं एक झोपडी आणि गुरांचा गोठा दिसला एक बऱ्यापैकी वय असलेले व्यक्तिमत्त्व बाहेर आले. उन्हा तान्हात रापलेले निरोगी शरीर स्पष्टपणे दिसत होते. त्याच्याशी गप्पा मारल्या.त्यांच्या कुटुंबीयांबद्दल माहिती विचारली. एकटे राहायला भीती वाटत नाही का विचारलं. जंगली प्राणी दिसतात का याबद्दल माहिती घेतली. निसर्गात वावरलेल्या माणसांना निसर्ग नियम माहीत असतात.त्यांनी खूप छान माहिती सांगितली. बिबळे, हरीण, धिप्पाड काळवीट अगदी गाई एव्हढे, विवीध पक्षी त्यांच्या विषयी बरीच चर्चा केली.

मग आम्ही एक टेकडी पार करून एका छोट्या दरीत उतरलो. दाट जंगल होते. फक्त गुरांच्या वाटा होत्या.पण स्थानीक माणूस सोबत असल्यानं काही काळजी नव्हती. काकडकोंडी एवढे दुर असेल असे वाटले नव्हते. पुरती दमछाक झाली होती. सकाळी साडेसहा वाजता गाव सोडलं होते. अकरा वाजून गेले होते. नुसते चालत होतो. शेवटी एक मोठी दरी दिसली, पाण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. आजूबाजूला भयाण शांतता असल्याने पाण्याचा आवाज स्पष्ट येत होता.दरी उतरुन खाली गेलो तर ओढा वाहताना दिसत होता.पाणी तर एव्हढे स्वच्छ होते की आपण हाथ घालुन खराब होईल की काय असे वाटत होते. आजूबाजूला बांबु, आंबे, साग, काटेसावर, कदंब, पळस अशी कितीतरी झाडे दिसत होती. काटेसावरला लाल गर्द रंगाची फुले लगडली होती. आंब्याला अगणित कैऱ्या लागलेल्या दिसत होत्या. अगदी पोहता येण्या इतपत पाणी जरी नसले तरी आरामात पाण्यात बसण्याजोगे पाणी होते त्यामुळे मुले त्याची मजा घेत होते. बर्गोले , ठाकुर आम्ही सगळ्यांनी मिळून कैऱ्या काढल्या मस्तपैकी भेळ करण्यास सुरू केली. एका मोठया खडका शेजारी एक छोटेसे मंदिर दिसले. इथले स्थानिक लोक देवीला पूजतात. काकडकोंडी या देवीचे नाव आहे. इथले स्थानिक खूप मानतात. इथला मुख्य व्यवसाय हा गाई म्हैस,बैल सांभाळणे हा असल्यानं त्यांना या वन देवीचा आधार असतो. भात लावणी नंतर पावसाळ्यातील चार महिने तर इथे गुरे या परिसरात लोक सोडून जातात. त्यावेळचे वातावरण, मिळणारा चारा यामुळे त्यांची चांगली वाढ होते.

भर उन्हात थंड पाण्यात पाय टाकून बसणे, पाण्यात डुंबने यासारखी आनंददायी गोष्ट नाही. दहा  किलोमीटर तंगड तोड करून आलो पण खूप मजा आली. कैऱ्या त्यात हळद तिखट टाकून भेळीत मिसळून खाल्ल्या. करवंदे नुकतीच लागली होती.काही ठिकाणी काजू बिया सापडत होत्या.हे सर्व नैसर्गिक खाणे म्हणजे एक पर्वणी असते. ठाकूरने बरेच फोटो काढले. त्यावेळी रोल पद्धत असल्याने फोटो काढायला लिमिटेशन असायचे.ट्रीप झाल्यानंतर फोटो पाहण्याची उत्सुकता असायची.

सोबत काही खाऊ आणला होता तो संपवला. थोडे डोंग्राकडील भागात गेलो पण प्रचंड दाट जंगल असल्याने वाट मिळत नव्हती मग आम्ही परतीच्या वाटेवर आलो. परत येताना मात्र जरा बरे वाटत होते. साधरण तीनच्या सुमारास निघालो पण पोहचायला सहा वाजले होते.

भाज्या आणि दुध सकाळीच आणुन ठेवले होते.मग गावातील लोकांच्या मदतीने जेवण सुरु केले. भाकऱ्या गावातील एका कडून आणल्या होत्या आणि भात,भाजी सगळ्यांनी मिळून बनवली. दिवसभरात जवळ जवळ बावीस किलोमिटर चाल झाली होती. आम्ही सगळेच तसे दमलो होतो. डॉक्टर मोकल सांगत होते रात्री लोक इथे शिकारीला जातात. तुम्हाला यायचे आहे काय ? मी नकार दिला. काही मुलांचे पाय दुखत होते.पण त्यांचा उत्साह एवढा प्रचंड होता की त्यांना ते जाणवत सुध्दा नसावे. जेवनंतरची झाडलोट आणि स्वच्छ्ता एका गटाकडे जबाबदारी होती त्यांनी पार पाडली. अंथरुणावर पडल्या पडल्या लगेच झोप लागली.

 दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच उठलो. मुलांना नदीवर आंघोळीला घेऊन गेलो. दोन तीन जणांनी जाऊन दुध आणले. मुलांनी सगळ्यांनी मिळून चहा बनवला. दुकानातून पोहे आणून ठेवले होते. ठाकूरने मग मस्त पोहे बनवले. मुलांना भूक लागली होती. टोप कसा संपला समजले नाही. सकाळचे सत्र हे मुलाखत घेण्याचे होते. यात गावातील लोकांचे दैनंदिन जीवन, शेती, आसपास परिसर  ,सोई  सुविधा याविषयी माहिती घेणे हे प्रामुख्याने होते.  मुलांचे गट पाडले होते. प्रत्येक गटाचे नेते निवडले होते. प्रत्येकाने सर्व डायरी मध्ये लिहायचे होते. त्यावेळी कॅम्प संपताना बेस्ट डायरी, लिडर, सहकारी वृत्ती, बेस्ट चित्र अशी बक्षिसे मुलांना देत असू. बर्‍याच वेळा बक्षिसे सुमित गायकवाड  याला मिळत असत.  मुलांना मदतीला आमच्या मधील एक जण असे.  गावात एका ठिकाणी बांबूच्या कणगी, बास्केट सारखी तयार करताना मुलाना दिसले. तिथे काही माहिती विचारली होती. बांबू तोडण्या पासून  ते  त्याच्या वस्तु तयार करण्या पर्यंत  कसा प्रवास सांगितले. मासे पकडण्यासाठी काही विशिष्ट प्रकारच्या वस्तु ते बनवत होते. मुलानी शेती मध्ये खर्च किती येतो, उत्पादन किती होते, पाण्याचे नियोजन कसे करतात याबद्दल माहिती घेतली. दुपार जेवण तयारी

सुरू झाली. भात, भाजी, डाळ हाच मेनू होता, गावातून भाकरी दिल्या होत्या. जेवणानंतर मुलांच गटां नुसार  माहिती सांगण्यात आली. गावातील  लोकांचे आभार मानले. डॉक्टरांनी शिबिरात सहभागी होऊन खूप मदत केली होती. त्यांचे आभार मानले. चार वाजता जायला परतीच्या प्रवासा साठी बस होती.  बस वेळे वर आली होती..शेवटच्या स्टॉप वर पोहोचल्यावर मग तिथून रिक्षाने कॉलनी येथे पोहचलो.

Comments


Follow

  • Facebook

©Raigad Muktangan

bottom of page