top of page

वाघोडे बांधन शिबीर 2000

मुक्तांगण उपक्रमाच्या सुरवातीच्या काळात बऱ्याचदा जे काही कार्यक्रम आम्ही राबवायचो ते बहुतेक काही मान्यवर संस्थाचे अनुकरण केलेले असायचे. बहुदा आमचा प्रयत्न तसाच असायचा.मग त्यातील काही गोष्टी अनुभवल्या नंतर आम्ही आमची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला. खूपदा या गोष्टी लोकांच्या पचनी पडत नाहीत आणि विशेषतः ज्यांचे आपण अनुकरण करतो त्यांना तर अजिबात पटत नसते. खरंतर त्यांना तुमची स्वतंत्र ओळख होऊ द्यायची नसते. जसे राजकीय पक्षात कार्यकर्ता हा जमिनीवरच राहिला पाहिजे तो नेता होता कामा नये याची पुरेपूर काळजी घेतली जाते. काहीजण किंवा काही पक्ष याला अपवाद असतील सुध्दा पण सहसा हीच संकल्पना सर्वत्र असते.प्रत्येक क्षेत्रात सामजिक, राजकीय किंवा नोकरी धंदा यात व्यक्ती जेंव्हा पडतो त्यावेळी काहीतरी मिळवणे हा हेतू असतो. त्यामुळे काय मिळवणे हे स्पष्ट असले की आपोआप मार्ग सापडत जातात.पण या प्रवासात चढ उतार, कधी पायवाट, कधी डांबरी रस्ता, कधी पाण्यातून अशा अनेक मार्गातून जावे लागते.कधी आपण दिशाहीन होतो. मार्ग सापडत नाही .या गोष्टी होत रहातात. बऱ्याचदा काहींचा प्रवास त्यामुळे अर्ध्यावरच संपतो.या प्रवासात कोण कोण भेटतं,कोण कोणत्या परिस्थिती उद्भवतात यावर सर्व अवलंबून आहे. खूप वेळा इतरांच्या दृष्टीकोनातून तुमचा प्रवास पार पडलेला असतो, तुम्ही चांगले काही साध्य केले आहे असे त्यांना वाटत असले तरी आपण काय घालवून बसलो किंवा खरोखरच आपल्याला हवे ते मिळाले काय हा प्रश्न आपल्या बाबतीत गूढ राहतो.



पण आपल्या रोजगाराच्या , व्यवसायाच्या  किंवा सामाजिक राजकीय कामाच्या निमित्ताने सतत कार्यरत राहिलो तर मात्र  जरी चढ उतार आले तरी आपल्याला कुठूनतरी वाट मिळतेच. अगदी शंभर टक्के यशस्वी झालो नाही तरी काही तरी मिळूनच जाते.

         दिवाळीच्या सुट्टीत आपण सायकल वर जाऊन शिबीर करुया असे ठरवले.बऱ्याच मान्यवर संस्था असे उपक्रम करायचे. त्यावर भरभरून लेख लिहायचे. करायचे वीतभर आणि दाखवायचे हातभर असाच प्रकार असायचा. यातून ज्या वर्गाला त्यांना इंप्रेस करायचे असते ते आपोआप नतमस्तक होतात. पालकांच्या मानसिकतेचा फायदा कसा उचलायचा यात असे लोक पारंगत असतात. इतरही क्षेत्रात आपण पाहिले तर गिऱ्हाईकाच्या मानसिकतेचा फायदा कसा करून घ्यायचा याचे सखोल ज्ञान व्यवसाय करणाऱ्याला असते. त्यामुळे आम्हीही अशा उपक्रमांना प्रेरित होऊन आपणही असे काही तरी करुया असे ठरवले.

                     आमची मीटिंग झाली. त्यात अंजली, साधना गोसावी, नंदा आणि मी असे चार पाच जण सुरवातीला तयार झालो. ठिकाण ठरवायचे याबद्दल एक मीटिंग झाली. विनोद सावंत यांनी बांधन परिसरात वाघोडे म्हणून गाव आहे तिथे घेता येईल का बघा असे सुचवले. सिनकर आडनावाचे त्यांचे एक स्नेही त्या परिसरात रहात होते.त्यांच्याच ओळखीने वाघोडे गावात राहण्याची सोय होईल असे सांगितले. त्यानंतर एक दिवस बाईकवर जाऊन गाव बघुन आलो. टाऊनशिप वरून   जवळ जवळ बावीस किलोमीटर अंतर होत होते. गावात दोन ठिकाणी राहण्याची सोय होईल असे कळाले.एक आश्रमशाळा आणि एक जिल्हा परिषद शाळा अशी दोन्ही ठिकाणे बघितली. त्यातील आश्रमशाळा चांगली होती परंतु प्रचंड कचरा आणि घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसले.मग जिल्हा परिषद शाळा हा पर्याय निवडला. तिथल्या शिक्षकांना भेटलो.ते म्हणाले राहण्याची व्यवस्था होईल. शाळेसमोर एक कुटुंब रहात होते . त्यांचा मळा बाजूलाच होता. त्यांना जेवण तयार करण्यात मदत होईल का ते विचारले. त्यांनी मदतीची ग्वाही दिली.मग टाऊनशिप येथे परत आलो. सर्व कार्यकर्त्यांना माहिती दिली. रविवारच्या उपक्रमात मुलांना शिबीर घेण्याबद्दल सविस्तर सांगितले. त्यावेळी चैत्राली पोटे, भावना गोसावी, पल्लवी थोरात, अभिषेक शिंदे, दिग्विजय मोरे, पवन महाजन, भूषण नेवसे, अमृता कुळकर्णी, श्वेता भोसले, सुशील सातपुते, सुजित सातपुते अशी बरीच मुले येणार होती.काही छोटी मुले सुध्दा मागे लागली होती.यात पाहिले नाव होते विक्रांत मोटे.पण ही ट्रिप सायकलवर बसुन जाण्याची असल्याने बऱ्याच जणांना नाही म्हणावे लागले होते. रविवारी शिबिराचा विषय झाल्यावर मुलांना मी सायकल दुरुस्त करून घ्यायला  सांगितल्या.विक्रांत मला दोन तीन दिवसाने रस्त्यात एका छोट्या सायकलवर दिसला. दोन्ही बाजूला साईड व्हील असलेली सायकल होती. मला त्याने विचारले की तो शिबिरात आला तर चालेल काय.मला वाटले याला काय घरचे पाठवणार नाहीत. मग  त्याला सहज म्हणालो,' विक्रांत  तू असे कर दररोज एक फेरी सायकलने कॉलनीला मारत जा,नंतर चार पाच दिवसाने दोन फेऱ्या मार.त्याची सायकल बघुन आणि त्याचे एकंदरीत वय, शरीर बघता त्याला बावीस किलोमीटर अंतर सायकलने पार पाडणे शक्य नव्हते असे मला वाटत होते. नंतर तो विषय मी विसरून गेलो.

इकडे मुलांची सायकल दुरुस्ती किंवा शिबिरविषयी तयारी सुरू होती. जवळ जवळ ४५ किलोमीटर अंतर सायकलने पार पाडायचे होते.एक विशेष बाब म्हणजे मला एकही पालक भेटून गेला नव्हता की तुम्ही कसे जाणार आहात,कुठे राहणार आहात याची चौकशी नाही. मला पण कधी वाटले नाही की पालकांना एकत्र बोलावून सर्व गोष्टीं सांगाव्यात. त्यावेळी आमचा ग्रुप अनुकरण स्थितीत असल्याने एखादी मान्यवर संस्था हा उपक्रम करत आहे मग आपल्याला करायलाच पाहिजे असा आग्रह असायचा. बऱ्याचदा त्याच्यातील धोके किंवा येणाऱ्या अडचणी याबाबत विचार सुध्दा यायचा नाही.मुले आणि आम्ही कार्यकर्त्ये हाच काय तो हिशोब असायचा. मला आठवतंय की माझ्या वाचनात एक  वाचनकौशल्य नावाचे पुस्तक आले. रविवारच्या उपक्रमात त्यातील गोष्टी घ्यायला वेळ पुरत नसे म्हणून दर रविवारी सकाळी माझ्या घरी चार मुलांना बोलवायचो .दिग्विजय मोरे, भूषण नेवसे, पवन महाजन आणि अभिषेक शिंदे हे चार जण त्या उपक्रमासाठी यायचे. जवळ जवळ दोन महिने हा उपक्रम मी घेतला असेल.पण यांच्या पैकी एकाही पालकाने भेटून मला कधीही विचारले नाही.हे पालक कधीही ढवळाढवळ किंवा फार काही करायच्या भानगडीत पडत नसत. ज्यांना आमच्या गोष्टी पटत नसत किंवा कुत्सितपने याकडे बघत त्यांच्या वाटेला आम्ही जायचो नाही.काही अशी लोकं सुध्दा होती की हे सर्व आम्ही आमच्या स्वतःच्या  फायद्यासाठी करत आहोत असे त्यांना वाटत असे.काही  मित्र होते ते जगास सांगताना बोलणार अरे माझा मित्र मुलांसाठी चांगले काम करतो पण आपल्या स्वतःच्या मुलाला मात्र अजिबात पाठवणार नाही.हे मित्र आमच्या उपक्रमा पासून चार हात लांबच राहायचे. उपक्रमाच्या सुरवातीच्या काळात मी ज्यावेळी बॅचलर होतो त्यावेळी एका मित्राने मला सांगितले होते की तू पुढली तीन वर्षे या तुझ्या अॅक्टिवीटीत राहून दाखव मग माझ्याशी बोल.दोन तीन वर्षांनी ज्यावेळी आमचे बोलणे झाले त्यावेळी त्याने सांगितले की अशी कामे करायला आतून एक ऊर्जा लागते ती सर्वांमध्ये नसते ती तुझ्याकडे आहे म्हणून तू कार्यरत आहेस.मी त्याचे बोलणे अगोदर किंवा नंतरही फार मनावर लाऊन घेतले नव्हते कारण मला  त्याला काहीही सिद्ध करून द्यायची आवश्यकता वाटत नव्हती. प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते ही गोष्ट मला मान्य असल्याने दोन्ही वेळेस त्याचे विचार मी मान्य केले होते .

खरंतर मला स्वतःला अजुनही नीट सायकल चालवता येत नाही आणि त्यामुळे सायकल ट्रिप तीही बावीस किलोमीटर याचे गांभीर्य किंवा हा प्रवास बऱ्यापैकी मुलांना जड जाऊ शकतो हे मला कळणे शक्य नव्हते. ज्याने सायकल चालवली नाही तो काय काय सांगणार असा प्रश्न होता.पण आमच्या कार्यकर्त्या साधना गोसावी मात्र यासाठी तयार होत्या. त्या सायकलवर येणार होत्या. शंतनु राणे आमचा मेंबर कम कार्यकर्ता होताच.मग ठरले अंजली स्कूटर वरून मागे राहणार , मी बाईकवर पुढे असणार मधोमध साधना गोसावी असणार. शंतनु सर्वांना गाईड करणार. मुलांना थोडीफार सायकलवर प्रॅक्टिस करायला सांगितली. मुलांना दोन दिवसाचे कपडे, खाऊ , पाण्याच्या बाटल्या , पाठीवरची सॅक या वस्तू जमा करायला सांगितल्या.

शिबिराच्या दिवशी दुपारी दोन वाजता कॉलनीत  गेट वर सर्व मुले जमा झाली. गेट बाहेर मुलांना रांगेत सायकल उभ्या करायला सांगितल्या. ज्यांनी नावे दिली होती ती सर्व मुले आली आहेत का याची खात्री करून मगच निघायचं ठरले. साधारण अडीच वाजता सर्व मुले जमा झाली. आम्ही निघणार एवढ्यात बबन मोटे गाडीवर येताना दिसले. मला विचारले कुठे चालला आहात,मी सांगितले कॅम्पला.ते म्हणाले विक्रांत तयारी करून बसला आहे. मला खरेतर शिबिराला त्याला न्यायचे नव्हते. एकतर त्याची सायकल साईड व्हीलची होती.त्यात सायकल बरीच छोटी होती.बावीस किलोमीटर अंतर चौथी मध्ये शिकणाऱ्या मुलाला थोडे अवघड होते. त्याला मुद्दाम मी एवढे राऊंड मार तेवढे राऊंड मार असे सांगत होते ज्यामुळे तो कंटाळून येणार नाही.पण झाले उलटेच तो दररोज दोन फेऱ्या कॉलनीला मारत असे.

मग त्याच्यासाठी थोडा वेळ थांबलो. त्याला सगळ्यात शेवटी राहायला सांगितले.साधना गोसावी यात मुख्य भूमिकेत होत्या. मुलींची संख्या खूप होती.त्या स्वतः आणि त्यांच्या मुली सायकलवर येणार होत्या.

 साधारण अडीचच्या सुमारास आम्ही सर्वजण गेट वरून निघालो. रस्त्याच्या एका बाजूने कुणालाही ओव्हरटेक न करता सायकल चालवा असे सांगितले होते. अंजली तिच्या स्कूटर वरून पुढे चालली होती. प्रथम शिहू गाव लागले. शिहु सोडल्यावर एमआयडीसी पाइप लाईन रस्त्याच्या बाजूने जाताना दिसते. दिवाळीच्या अगोदरची वेळ असल्याने नुकतीच भात काढून लोकांनी शेतात वाल ,पापड्या लावलेल्या दिसत होत्या. बऱ्यापैकी हिरवेगार शेती दिसत होती. उजवीकडे अंबा नदीचे पात्र समुद्राकडे निघालेले दिसते. वाटेत प्रसिद्ध धरमतरची खाडी लागते. तिथे जाऊन नदीचा प्रवास संपतो. डावीकडे डोंगर रांगा दिसतात. डोंगरावर बऱ्याच  वाड्या वस्त्या आहेत.नावे पण मजेशीर आहेत जशी कागदावाडी, बोरावाडी, गंगावणे, काळकाई वाडी,बंगालवाडी, धनगरवाडी . जवळ जवळ दहा किलोमीटर पर्यंत या वाड्या डोंगर पठारावर पसरलेल्या आहेत. आम्ही वर्षातुन दोनतीन वेळा वर भटकायला जातो. मे महिन्यात खास आंबे,काजू,फणस, करवंदे खायला या भागात जातो. डोंगरावरची  माणसे खूप चांगली आहेत. आमची त्यांच्याशी आता ओळख झाली आहे. आम्ही तिकडे गेलो की बसायला टाकणार , पाणी आणून देणार ,एक जण तर आंबे सुध्दा मुलांना आणून देतो. खरंतर आम्हाला लाज वाटते कारण हीच माणसे खाली कनक, काकडी, रानभाज्या , फळे विकायला खाली येतात त्यावेळी आपल्या लोकांचे त्यांच्याशी वागणे हे फार विचित्र असते. त्यांच्याकडे माणूस म्हणून बरेच लोक पहात नाहीत. बरेच जण त्यांची टवाळी करतात.काही हुशार व्यापारी त्यांनी आणलेल्या रानभाज्या, फळे, कंद फार कमी किंमतीत विकत घेतात एकार्थी त्यांना लुटतात. बिचारे एकतर  ते एक दीड तास चालत  डोंगरावरून आलेले असतात त्यांच्या मालाची योग्य किंमत न देता त्यांना लुटणे हे फार वाईट आहे.

या डोंगर रांगा पहात आम्ही चोळे गाव सोडले. पुढे गांधे पाडा गाव लागले. तिथे थोडा वेळ थांबलो. तिथल्या राममंदिरात जाऊन दर्शन घेतले. तिथून सांबरी खिंड लागते. थोडा चढ लागला आणि थोडा वळणावळणांचा रस्ता असल्याने मुलांना सायकल हळू चालवायला सांगितल्या. शंतनु मध्येच ओव्हरटेक करून मुलांवर लक्ष देत होता. सांबरी खिंड ओलांडली की थोडे वळण लागले आणि नंतर उतार सुरू झाला. मग सांबरी गाव लागले.या गावा पासून उजवीकडे पाहिले तर इस्पातचा प्रकल्प दिसतो. निळसर ज्योत,लाल रंगाचा धुळीने माखलेला परिसर, बाजुला कुठेतरी स्टीम बाहेर पडताना पांढरा झोत असे एकंदरीत दृष्य दिसते. उजवीकडे दूरवर कुठेही वस्ती दिसत नाही.पण रसत्याच्या दोन्ही बाजूस हिरवीगार भात शेती दिसत होती.या भागात भाताचे दुबार पीक घेतात. डोंगर भागात एक धरण बांधले आहे. त्यातून पाणी मिळते. धरणाची भिंत तीन चारशे मीटर तरी लांब असेल. पावसाळ्यात इथे खूप गर्दी असते.

सांबरी गाव टाकले की सपाट रस्ता लागला. इथून सायकल चालवत असताना मुलांना थकवा  जाणवत नव्हता. थोडे अंतर पार केल्यावर कुर्डूस गाव लागले.या गावात बाळकृष्ण पिंगळे नावाचे शिक्षक राहतात ते मला ठाण्यात रहात असताना आमच्या शाळेत शिकवत असत. त्यांचे घर रस्त्यावरून जाताना दिसते.या गावातील तीन चार जण आमच्या कंपनीत नोकरी करतात.हे गाव तसे फार मोठे आहे. इथे कोकण एज्युकेशन सोसायटीची शाळा आहे.गाव संपल्यावर जी चढण लागते तिथे ती शाळा दिसते.त्या चढणीला आम्ही थांबलो. थोडावेळ मुलांनी नाष्टा पाणी केले.मग परत सायकल प्रवास सुरू केला. दहा किलोमीटर अंतर पार केले होते. विक्रांतला थोडा त्रास जाणवत होता. अर्थात तो दमलाच होता.मग शंतनु राणे त्याला मदत करत होता.बाकी मुले मात्र सुसाट चालली होती. थोड्या थोड्या अंतरावर थांबत चाललो होतो. कुर्डूस गाव सोडल्यावर थोडा वळणावळणाचा रस्ता लागतो. नेमका यावेळेस थोडा वारा सुटला आणि सायकल चालवायला थोडा त्रास होऊ लागला. त्यामुळे थोडा वेळ थांबलो .नंतर थोडा चढ उतार आणि जंगलाचा भाग आहे.या भागातून इस्पात प्रकल्प अगदी जवळ दिसतो. उजवीकडे दूरपर्यंत कांदळवन पसरलेले दिसते.या मँग्रू वनस्पती खाडीला लागून आणि अगदी खाडीच्या मुखाशी पसरलेल्या असतात.या वनस्पती म्हणजे निसर्गाची मोठी दैवी देणगी म्हणावी लागेल.या वनस्पती असंख्य प्राणी ,पक्षी , मासे यांना लाभदायक असतात.भरती ओहोटी सुरू झाली की त्यांच्या लाटांचे तडाखे या झाडांच्या मुळांना बसत असतात.  शहरातील प्रचंड घाणीचे पाणी या वनस्पती सहन करतात. फ्लेमिंगो पक्षी अशा परिसरात वास्तव्याला येतात. मात्र हल्ली यांच्यावर बिल्डर लॉबीची वक्र दृष्टी आहे. यांचे अस्तित्व  संपविण्याचा त्यांनी जणू विडाच उचलला आहे. जवळ जवळ अर्ध्याहून अधिक जंगल त्यांनी नष्ट केले आहे . उरलेले अर्धे जंगल येत्या दहा पंधरा वर्षात नष्ट करतील यात शंका नाही.याचे परिणाम दिसू लागले आहेत पण सर्वजण डोळ्यावर पट्टी बांधून आहेत.प्रत्येक पावसाळ्यात पुराची तीव्रता वाढत चालली आहे.

नंतर चिखली हे गाव लागले.या गावाच्या वरच्या बाजूस दोन डोंगर दिसतात. त्यांच्या मधील भागात एक मोठा ओढा लागतो. तिथे आसपास भाताची शेती दिसते.एक दोन किलोमीटर अंतर पार केल्यावर   हेमनगर गाव लागले. तिथे एका ठिकाणी झाडा खाली सर्वजण थांबलो.एक मोठे तळे तिथे होते. त्याच्या जवळ सायकली उभ्या करून थोडावेळ मुलांनी विश्रांती घेतली. आता बऱ्यापैकी जवळ पोहचलो होतो. थोडे अंतर बाकी होते. विक्रांतची अवस्था थोडी बिकट होती.पण त्याची जिद्द फार मोठी होती. त्याला कुठूनही शिबिराला यायचे होते आणि सायकलने अंतर पार करायचे होते. बराच वेळ रेंगाळत , थांबत चालल्यामुळे पाच वाजून गेलेले कळालेच नाही . आम्ही हेमनगर येथे असताना समोरून कंपनीच्या बसेस जनरल शिफ्ट संपल्यावर अलिबाग पेण कडे कामगारांना घेऊन चालल्या होत्या. आमचा ग्रुप बराच मोठा असल्याने  बस मधून बऱ्याच लोकांनी आम्हाला ओळखले. आम्ही सुध्दा त्यांना हात दाखवून प्रतिसाद दिला.

हेमनगर सोडल्यावर कुसुंबळे गाव लागले. इथे थोडा उतार असल्याने पटकन अंतर पार केले. पुढे श्रीगाव लागले.या गावातून एका टाइल्स फॅक्टरी कडे रस्ता जातो.या गावात जरा वेळ थांबलो.या गावाच्या वर तीन किलोमीटर अंतरावर एक धरण बांधले आहे. मातीचे बांधकाम आहे. अर्धा किलोमीटर भिंत आहे. पाण्याचा साठा बराच आहे .पण उंची कमी आहे. डोंगरातून गाळ बराच वाहून येत असावा.इथे एकदा एक दिवस शिबीर घेतले होते.परिसर खूप चांगला आहे.

श्रीगाव ओलांडल्यावर लगेच डाव्या हाताला एक वळण लागते.तो रस्ता जलशुध्दीकरण प्रकल्पाकडे जातो. तिथून वाघोडे येथे जायला रस्ता आहे.पण इथे खूप मोठा चढ आहे. मुलांनी इथे हातात धरून पुढे सायकली रेटल्या.विक्रांतला शेवटच्या टप्प्यात फार त्रास झाला. त्याची सायकल शंतनु घेऊन आला. सहा वाजून गेले होते.एक किलोमीटर अंतर उरले होते. अंजलीची स्कूटर सुध्दा चढावर बंद पडली. साडे सहा वाजता आम्ही वाघोड्याला पोहचलो. तिथल्या प्राथमिक शाळेत राहण्याची व्यवस्था केली होती.एक वर्ग मुलींसाठी आणि एक मुलांसाठी दिला होता.समोर एक जाधव नावाचे कुटुंबीय रहात होते. त्यांच्याशी सावंतांची ओळख होती. बांधन येथे सावंत कुटुंबाचे एक सिनकर आडनावाचे गृहस्थ रहात होते.ते बऱ्याचदा टाऊनशिप येथे येत असत. त्यामुळे माझी सुध्दा ओळख होती. किराणा सामान आणायला बांधन गावात जाऊन आलो. भाज्या आणि किराणा सामान घेऊन जाधव यांच्या घरी दिले.आम्ही सर्वांनी त्यांना मदत केली. पाणी तिथे बऱ्यापैकी होते. दिवसभर मुलांना सायकल चालवून कंटाळा आला होता. तरीसुध्दा गोंधळ चालूच होता. भूषण नेवसे, दिग्विजय मोरे, अभिषेक शिंदे, पवन महाजन, पल्लवी थोरात, चैत्राली पोटे अशी बरीच मुले होती जी वाचन,खेळ या सर्वात नेहमी पुढे असलेली होती. विक्रांतला अंगात ताप भरला. एवढी सायकल चालवून त्याचे खूप एक्सरशन झाले होते. सोबत मेडिकल कीट होते. त्यामुळे लगेच गोळ्या दिल्या. त्याची काळजी साधना गोसावी यांनी फार घेतली. आमच्या सर्व कार्यकर्त्या मध्ये एकदम धढाडीच्या कार्यकर्त्या होत्या. बिनधास्त नेतृत्व आणि कुणालाही घाबरणे नाही की कामात कुचराई नाही. नंतरच्या काळात त्या पनवेल मध्ये शिफ्ट झाल्याने आमचा चांगला कार्यकर्ता गेला. 

शाळेत आतमध्ये लाईट व्यवस्था नव्हती. त्यामुळे जेवण लवकर आटोपणे गरजेचे होते.  आठ वाजता आम्ही जेवलो. लाईट नसल्याने साहजिकच पंखा नाही. कॉलनीत कधीही लाईट जाण्याचा प्रसंग जवळ जवळ यायचाच नाही.हा अनुभव मुलांना वेगळा होता. सर्वजण सायकल चालवून थकले होते . मुलांचा गोंधळ चालूच होता परंतु थकव्यामुळे त्यांना झोप कधी लागली हे कळाले सुध्दा नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठवले. विक्रांतची पहिल्यांदा विचारपूस केली. त्याला बरे वाटत होते. अगदी ताजातवाना वाटत होता. नंतर सर्वांना आवरायला सांगितले. नाष्टा तयारी सुरू केली. सकाळी लवकर किल्ला बघायला जायचे होते. गावात एकाला वाट विचारून ठेवली होती. नाष्टा करून झाल्यावर किल्ला बघायला निघालो.यात एक नियोजन चुकले कुणीतरी वाटाड्या घ्यायला हवा होता.मी या किल्ल्यावर गेलो होतो परंतु अलिबाग जवळील खंडाळा गावातून त्यामुळे ही वाट माहित नव्हती.ही गुरांची वाट असल्याने रस्ता चुकण्याची शक्यता नाकारता येत नाही. आम्ही वाघोडे गावातून तासभर चालत डोंगरात गेलो परंतु रस्ता चुकला. किल्ला तसा सहज यामार्गे दिसत नव्हता. मी एकटाच मुलांसोबत होतो. त्यामुळे काय करावे कळत नव्हते. आम्ही वीस  जण होतो.पण वाट चुकल्याने आणि त्यात तो भाग अगदीच निर्मनुष्य असल्याने थोडी भीती वाटली. त्यामुळे परत जायचं ठरवलं. मुलांची अजिबात तयारी नव्हती. सोबत कुणालातरी घ्यायला हवे होते असे वाटले. परत तासाभरात गावात पोहचलो. तोपर्यंत अकरा वाजले होते. जेवणाची तयारी चालली होती. गावात एक फेरफटका मारून आलो. दुपारी एमआयडीसी जलशुद्धीकरण प्रकल्प पाहायला जायचे होते. गावातून काही फारसे दूर नव्हते.

जेवण उरकल्यावर आम्ही जलशुध्दीकरण प्रकल्पाकडे गेलो.या ठिकाणी फिल्टररेशन प्लांट आहे. इथे कोळसा, वाळू, दगड, गुळगुळीत दगड यांचा वापर करतात. तुरटीचा वापर करून पाण्यातील गाळ खाली बसवला जातो. त्यानंतर फिल्टर केले जाते. त्यात क्लोरीन टाकून पाणी निर्जंतुक करतात.या सर्व गोष्टी तिथे पहावयास मिळाल्या. दोन तीन तास एवढ्या सगळ्या गोष्टीना लागले. त्यानंतर शिबिराच्या ठिकाणी परतलो.

थोडे उन असल्याने गटात काही स्पर्धा घेतल्या. शाळेच्या वर्गात घेतल्या. प्रश्नमंजुषा स्पर्धा घेतली. शिबिरातील घटना आणि परिसर याबाबत प्रश्न विचारले. सहा वाजता बाहेरील प्रांगणात मैदानी खेळ घेतले. सात वाजता सर्वजण जेवणाच्या तयारीला लागलो. जाधव यांच्या घराच्या बाहेर चूल केली होती.त्या कुटुंबाच्या मदतीने जेवणाचे काम दोन दिवस चालले होते. शाळेत आतमध्ये लाईट नसल्याने रात्रीच्या जेवणाची व्यवस्था लवकर करायला लागायची. दिवसभर मुलांची पायपीट बऱ्यापैकी झाली होती. शिबीर हा प्रकार आम्हाला त्यावेळी फार नवाच होता. त्यामुळे कोणते उपक्रम घ्यायचे कोणते नाही, मुलांना बिझी कसे ठेवायचे, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त उपक्रम कसे घ्यायचे, सभोवतालच्या परिसराचा तिथल्या स्थानिक लोकांचा उपयोग करून मुलांना नवीन काही शिकता येईल काय,या सर्व गोष्टी  त्यावेळी आमच्या आवाक्यात नव्हत्या. जसजशी आमच्या उपक्रमांची संख्या वाढत गेली तसतसे आमच्या उपक्रमांना धार आली. मुलांचा गट चांगला तयार होऊ लागला.

जेवण होईपर्यंत मुलांशी तिथल्या परिसर संदर्भात चर्चा केली. मुलांना डायरी लेखनासाठी काही मुद्दे सांगितले.आठ वाजेपर्यंत जेवण तयार झाले होते. सर्वांनी जेऊन घेतले.मग मुलांनी गाण्याच्या भेंड्या घेतल्या. मुलांना शिबीर म्हणजे एक छान स्वातंत्र्य जिथे कोणी त्यांना घरातील शाळेतील किंवा आसपासचे टोकायला कोणी नसते.दोन तीन दिवस मस्त एका वेगळ्या वातावरणात राहायला मिळते. आपल्या सर्व मित्रांसोबत छान शेअरिंग करायला मिळते.एक उस्फुर्त उपक्रम करायला मिळतो ज्यात सर्वांगीण विकास होण्यास मदत होते.

त्या रात्री मुलांना काही लवकर झोप येत नव्हती. त्यांना सांगितले सकाळी लवकर उठून आपल्याला बावीस किलोमीटर अंतर सायकलने पार पाडायचे आहे ,जर झोप झाली नाही तर तुम्हाला त्रास होऊ शकतो.मग सर्वजण पटकन झोपले.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मुलांना तयारी करायला सांगितली. सकाळी नाष्टा करून झाल्यावर लगेच निघायचे होते. जेवणाच्या वेळेपर्यंत घरी पोहचायचे होते. त्यामुळे मुलांना पटापट आवरायला सांगितले. मुलांना सायकल चेक करून घ्यायला सांगितल्या. शंतनु राणे मुलांची विशेष काळजी घेत होता. सुशील सातपुते , अभिजित शिंदे या मुलांसारखी अगदी मस्त टाईमपास करण्यास आलेली आणि बिंदास्त मुले अशा अवघड किंवा वेगळ्या गोष्टीना नेहमीच तयार असतात. त्यांना त्यात थ्रील वाटत असते त्यामुळे अशा मुलांना जर योग्य वेळी चांगला ट्रॅक मिळाला तर ते हुशार मुलांच्या तुलनेत कितीतरी पुढे जाऊ शकतात. उदाहरणं द्यायचे झाल्यास. सुशील सातपुते हा आपला मुक्तांगण ग्रुपचा मेंबर. नियमित शिबिरांना , कार्यक्रमांना येणारा पण त्याच्यापेक्षा उजवी मुले त्यावेळी खूप होती. अभ्यासू, कष्टाळू आणि अभ्यासात नेहमीच अव्वल स्थानावर असणारी मुले होती.पण सुशील मात्र साठच्या आसपास रेंगाळनारा विद्यार्थी.पण अकरावीत गेल्यावर अचानक बदल झाला. नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या. अकरावी आणि बारावी दोन्ही वर्षी चांगला अभ्यास करण्याचा प्रयत्न केला.पण शेवटी अचानक मोठा बदल होऊ शकत नाही. त्यामुळे बारावीत नापास झाला पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याला CET च्या परीक्षेत १४० गुण मिळाले आणि शाळेत पाहिला आला. आता नापास झाल्याने मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश मिळाला नाही कारण बारावी पास आणि तेही पन्नास टक्के मार्क हवेत. पुढच्या वर्षी परत तो परीक्षेला बसला चांगल्या मार्कने पास झाला. मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश मिळाला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तो MD सुध्दा झाला. आज एका शहरात त्याची मेडिकल प्रॅक्टिस चालू आहे.

साधारण नऊ वाजता आम्ही वाघोडे सोडले. बांधन कडे न जाता फिल्टर प्लांट कडून निघालो. आता जाताना मोठा उतार असल्याने मुलांना हळू जायला सांगितले. समोरून एखादे वाहन आले तर अडचण येऊ नये म्हणून सर्वांना सूचना दिल्या. उतार संपल्यावर आम्ही श्रीगावाकडे वळलो. धरणावरून येणारा ओढा मध्येच लागला. गावातून एक रस्ता एमआयडीसी पाइपलाइन मार्गे कॉलनी कडे जातो. परंतु आम्ही मोठा रस्ता पकडला. पुढे कुसुंबले गावा बाहेर एकाची सायकल बिघडली. त्याची चैन पडली होती.मग शंतनुने त्याला व्यवस्थित करून दिली. पुढे गेल्यावर एकाच्या सायकलच्या पायडलचा नट खाली पडला. त्यामुळे त्याला सायकल चालवता येईना.मग गावात एक सायकलचे दुकान होते. त्याने एक नट दिला मग काम भागले.मग पुढे प्रवास सुरू झाला. शंतनुची फार दमछाक होत होती. मुलींचा ग्रुप साधना गोसावी सांभाळत होत्या.

शंतनु राणे बऱ्याच शिबिरात मुलांचे नेतृत्व करायचा.या शंतनुबाबत सुध्दा अगदी स्वप्नवत गोष्टी घडल्या. इयत्ता नववी पर्यन्त हा खोडकर आणि कुठलेही आभ्यासाचे टेन्शन न घेणारा विद्यार्थी होता. त्याची आई चित्रकला शिक्षक होती. कुठल्याही कोनातून हा पुढे वेगळा होईल असे वाटले नव्हते. एकदा मी एका मोठ्या व्याख्याता सोबत शाळेत गेलो होतो. त्यावेळी त्यांच्या सोबत शाळेत पालक आणि शिक्षक यांची एक मीटिंग ठेवली होती.पण वेगवेगळी होती. मला त्या व्यक्ती बरोबरच होतो म्हणून मीटिंग अटेंड करायला मिळाली.जसे आमदार खासदारां सोबत फिरलो की त्यांच्या एवढा मान आपोआप मिळतो तशी अवस्था माझी होती. तुम्ही कोणाबरोबर असता हे फार महत्त्वाचे असते.तर या मीटिंगमध्ये एका शिक्षिकेने सांगितले की त्यांचा नववीचा वर्ग नेहमीच वर्गात काहीही बोलत नाही. एकाने तक्रार केली की शंतनु राणे हा मुलगा सतत हसत असतो. त्याला कुठलेही गांभीर्य नसते. बराच याविषयी खल झाला. तो व्याख्याता याबद्दल फार बोलला. मीही थोडी तिथे आगाऊ गिरी केली मी शंतनुची बाजू मांडली आणि काही मुलांच्या बाजूने बोललो. तिथल्या लोकांना अजिबात आवडले नाही पण ज्यांच्या सोबत मी होतो त्यामुळे त्यांनी मला सहन केले. पालक मीटिंगला सुध्दा बऱ्याच गोष्टी अशाच घडल्या. तर विषय होता शंतनु राणेचा हा पोरगा दहावी नंतर असा बदलला की बोलायची सोय नाही  .१० वीत त्याला ७०% गुण मिळाले , बारावीत ७५% मिळाले. त्यानंतर त्याने BATU ला प्रवेश घेतला. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पूर्ण केल्यावर एचसीएल या MNC कंपनीत नोकरी मिळाली. त्यात विनोद सावंत यांनी बरीच मदत केली. नंतर अमेरिकेत स्थायिक झाला. मुंबई येथील सरकारी मेडिकल कॉलेज मध्ये शिकलेल्या मुलीशी त्याचे लग्न झाले.या त्याच्या आयुष्यात घडलेल्या स्वप्नवत गोष्टी. त्याची एवढी प्रगती होईल अशी कुणी कल्पना सुध्दा केली नसेल.पण त्याचा स्वभाव हेच मुळी त्याचे मुख्य शस्त्र होते. त्यामुळे तो जिथे गेला व ज्यांना भेटला त्यांना सर्वांना आपलेशे केले. स्वतः मध्ये त्याने घडवून आणलेला आमूलाग्र बदल हेच त्याच्या आयुष्याच्या प्रगतीचे कारण ठरले.

तर आमचा सायकल प्रवास चालू होता.मी पुढे बाईक चालवत होतो. कधीकधी परत मागे फिरून सर्व सुरळीत सुरू आहे का पाहून परत पुढे जात असे. चिखली गावाजवळ थोडा वेळ थांबलो. तिथे मुलां जवळील उरलेला खाऊ काढायला सांगितला. पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या होत्या त्यामुळे थोडा अल्पोपहार झाला. शिबिराला येताना थोडा सायकलचा सराव झाला होता  त्यामुळे परत जाताना मुले थोडी निवांत होती. मुलांनी बघता बघता कुर्डूस सुध्दा पार केले. आता आठ किलोमीटर अंतर राहिले होते. आमची सायकल ट्रिप आता शेवटच्या टप्प्यात होती. शिबिरात बरेच उपक्रम झाले नाहीत पण मुख्य उद्देश सायकल भ्रमण असल्याने काही विशेष वाटले नाही. येताना वाऱ्याचा त्रास जाणवला नाही. सांबरी गावाजवळ थोडावेळ थांबलो. गावातील स्टॉप जवळ झाडाखाली थोडावेळ मुलांनी सायकली लावल्या. आता फक्त चार किलोमीटर अंतर उरले होते. तिथून निघाल्यावर कॉलनीचा भाग दिसू लागला. आता मुलांना आनंद झाला. आपला प्रवास संपत आला याची सर्वांना जाणीव झाली. आपोआपच मुलांचा वेग वाढला . अर्ध्या तासाच्या आत आम्ही गेट वर पोहचलो. आपापल्या इमारती नुसार म्हणजे A,B टाईप नुसार सायकली वळवल्या.

दुसऱ्या दिवशी काही पालक भेटले. काहीजण खूप खुश होते. मुलांनी खुप मजा केली असे सांगत होते.पण एक पालक मात्र नाराज होते, त्यांनी नाराजी व्यक्त करत सांगितले तुम्ही शिबिराचे नियोजन करताना किल्ला बघायला घेऊन जाऊ असे सांगितले होते. तुम्ही मुलांना किल्ला दाखवला नाहीत. अशा काही तक्रारी केल्या. त्यांना सांगितले पुढच्या वेळेस आम्ही हे लक्षात ठेवू असे सांगितले.या शिबिराचा प्रत्येकी खर्च २० रुपये आला होता. यामध्ये दोन दिवसाचा सर्व खर्च धरला होता.

एक वेगळा अनुभव या शिबिराने आम्हाला दिला.

 

 

 

 

 

 

2 views0 comments

Recent Posts

See All

व्यक्ती आणि वल्ली....... डॉक्टर केतकर

मी आणि माझा मित्र दीपक घोडके दोघेजण अमरनाथ यात्रेला निघालो होतो.१९९७ साला तील ही एक आठवण आहे. आम्ही १ ऑगस्ट १९९७ ला सकाळच्या स्वराज एक्सप्रेस ने निघालो .ही ट्रेन बॉम्बे सेंट्रल वरून सुटते. हिला जम्मू

bottom of page