top of page

VARVATHANE CAMP

एखादे शिबिर आपल्या कॉलनी परिसरात घ्यावे अशी काही कार्यकर्त्यांची इच्छा बोलून दाखवली.मग अंजली, साधना गोसावी, पांडे , उपणकर एकत्र जमा झालो. अंजलीने मेन ऑफिस मध्ये राहून आपण तिथला परिसर पाहूया असे सुचवले. अंजलीची एक मैत्रीण मेन ऑफिस मध्ये काम करत होती. तिला अंजलीने एक लेटर लिहून दिले. त्यात आम्ही कोणत्या गोष्टी, उपक्रम करणार आहोत याची माहिती दिली. येणाऱ्या मुलांची आणि कार्यकर्त्यांची संख्या सांगितली. कार्यकर्ते आणि मुले मिळून तीस पर्यन्त आकडा जाईल असे सांगितले. रविवारच्या उपक्रमात मुलांना शिबिरा संदर्भात  माहिती दिली. जवळच शिबीर असल्याने संख्या जास्त होणार होती.

उपक्रम कोणते घ्यावेत याबद्दल थोडी चर्चा केली. यामध्ये बनाईत सरांची मदत घेतली. एमआयडीसी जल शुध्दीकरण प्रकल्प बघायचे ठरले. बानाईत सरांनी एमआयडीसीच्या इंजिनिअरला भेटून त्यांची अपॉइंटमेंट घेतली. राहण्याची व्यवस्था गेस्ट हाऊस मध्ये करण्यासाठी मुलांची व कार्यकर्त्यांची नावे अंजलीने दिली. तसे पत्र दिले. जेवणाची व्यवस्था तिथेच केली. गावात कोणते उपक्रम घ्यायचे हे ठरवले. गावाच्या बाहेर असलेल्या तलावाशेजारी एक पुरातन शिवमंदिर आहे तिथे दिवसभर उपक्रम करण्याचे ठरले.कारण गेस्ट हाऊस मध्ये राहून शिबिराची मजा येणार नव्हती. गावातील लोकांना भेटून मंदिराच्या चावीची व्यवस्था केली. शंतनु राणे नेहमीप्रमाणे मदतीला होता. तन्वी सावंत, विक्रांत मोटे, श्रिया सातगोंडा, आरोही जोशी, संकेत भोसले, सुजित थोरात, संजय कुंभार,बोरमानीकर, वृषभ मुधाले, तन्वी मुधाले, आश्र्विणी जाधव, जागृती पाटील, हरिता चौधरी, समिधा गांधी, सुप्रिया बर्गोळे, स्वप्नील बार्गोले, सुमित गायकवाड, स्वप्नील गायकवाड, घोलप, वरद जोशी, अमोल नेवसे, दिग्विजय मोटे, शुभम शिंदे, आखिल मेनन अशी बरीच मुलांची नावे आली होती. जवळच शिबीर असल्याने आणि गेस्ट हाऊस मध्ये राहणार असल्याने खूपसे सामान लागणार नव्हते. तरीसुध्दा आवश्यक असणाऱ्या गोष्टी मुलांना सांगितल्या. ड्रॉइंग साहित्य, पेपर्स , डायरी, टॉर्च वॉटर बॉटल , कॅप सारख्या गोष्टी सांगितल्या.

कॅम्पच्या दिवशी सकाळी नागोठणे मार्केटिंग बस मध्ये बसून  स्टँड जवळ उतरलो. तिथून डाव्या बाजूला रस्ता वरवठणे गावाकडे जातो. तिथे एक जुना पूल आहे. यावरून एकच वाहन जाऊ शकते. पुलाचे बांधकाम फार जुने आहे. जागेची निवड ज्या कुणी केली असेल त्याला पूल बांधकाम क्षेत्रात प्रचंड ज्ञान असावे. एकतर तिथे पुलाची उंची बरीच आहे. इथे नदीचे पात्र बरेच रुंद आणि खोल आहे .पात्रा मध्ये काळा पाषाण दगड लांबवर पसरलेला दिसतो. पुलाला दोन्ही बाजूला मजबूत आधार असलेला पाहायला मिळतो.पण फक्त एखादे वाहन यावरून जाऊ शकते. बैलगाडी, घोडे किंवा लोकांच्या येण्या जाण्यासाठी हा पूल बांधला गेला असावा.या नदीला दरवर्षी पूर येतो.  बऱ्याचदा पुर आला की या पुलावरून पाणी जाते. याचा अर्थ असा होतो की एवढ्या प्रचंड पाण्याचा दाब हा पुलाचे खांब सहन करू शकतात. कारण पुराच्या वेळी पाण्याचा वेग प्रचंड असतो. पुलाच्या  अगदी जवळ खाडीचे पाणी येऊन थांबते. अंबा नदीचे गोडे पाणी पुलाजवळ खाडीला मिळते.१९९० च्या अगोदर हा एकमेव पूल पोयनाड पर्यन्त सर्व गावांना नागोठणे या गावाला जोडणारा एकमेव दुवा होता. नंतर आयपीसीएल कंपनीने नागोठणे गावाच्या पलीकडे एक नवीन पूल बांधला.

या जुन्या पुलावरून आम्ही वरवठणे गावापाशी पोहचलो. तिथल्या  शंकर मंदिरात गेलो. शिबिराचे सर्व उपक्रम तिथेच होणार होते. झोपण्यासाठी व जेवण करण्यासाठी फक्त गेस्ट हाऊस मध्ये जायचे होते. दुपारच्या जेवणाचे डब्बे आणले असल्याने संध्याकाळ पर्यन्त गेस्ट हाऊस मध्ये जायचे नव्हते. कॉलनी ते कॅम्प साईट अंतर दहा किलोमीटर असल्याने यायला तसे सोपे होते. देवळात बसायला प्रशस्त जागा असल्याने कार्यक्रम घ्यायला अडचण नव्हती.

              मुलांचे वेगवेगळे गट पाडले. प्रत्येक गटाला नाव दिले. त्यांचे गट प्रमुख सांगितले. पूर्ण कार्यक्रमाचे लीडरशिप शंतूनु याच्याकडे दिले. मुलांना ड्रॉइंग पेपर वाटून दिले. वाढदिवस आणि सिझनल ग्रीटिंग कार्ड काढण्यासाठी बसवले. हा एक गटातील उपक्रम होता. प्रत्येक गटाने एकत्र बसून पूर्ण करायचा होता. मुलांनी तो उपक्रम सुरू चालू केला. तासाभराने एका ठिकाणी भेट द्यायला जायचे होते. त्यामुळे  त्या उपक्रमाला फक्त एक तास दिला होता .          त्यावेळी मी सुरक्षा नगर मध्ये राहत असे. माझ्या शेजारी सुरेश मेनन राहायचा. त्याचा मोठा मुलगा अखिल रविवारच्या प्रोग्रमला बऱ्याचदा येत असे. आखिल सुद्धा या शिबिराला आला होता. दुपारी गार्गी, आखीलची आई,हे  शिबिराला भेट द्यायला आले होते. सौजण्य त्यावेळी खूप लहान होता. नंदा आणि सौजण्य दोघेही अखीलच्या आई सोबत कॅम्प बघायला आले होते. मुलांसोबत गार्गी आणि अभिजित मेनन दोघेही चार्ट पेपर घेऊन मुलांसोबत ड्रॉइंग करत बसले. जेवल्यानंतर दुपारी एमआयडीसी जलशुध्दीकरण प्रकल्प बघण्यासाठी जायचे होते. अभिजित, बरगोले, पांडे, अंजली असे बरेच कार्यकर्ते हजर होते. तासाभराने मुलांना बॅगेतून डबे काढायला सांगितले. सकाळी घरून येताना सर्वांनी दुपारच्या जेवणाचे डबे आणले होते. सर्वजण एकत्र पंगत करून बसले.  जेवण  करून घेतले. जेवण उरकल्यानंतर मुलांना एमआयडीसी कडे जायच्या सूचना दिल्या. आपल्या गटात राहण्यास सांगितले .जलशुध्दीकरण प्रकल्प बघण्यासाठी सोबत कॅप , पाण्याची बाटली, डायरी पेन सोबत घ्यायला सांगितले. काही प्रश्न काढून डायरीत लिहून घेतले. त्यामुळे डायरी लिहायला सोपे जाते. शंतनु, वरद यांना मुलांवर लक्ष ठेवायला सांगितले.ते दोघे जण बऱ्याचदा ग्रुपचे लीडर म्हणून चांगले काम करायचे.वरवठणे गावापासून चालत निघालो. तीन किलोमीटर अंतर आहे. गाव ओलांडल्यावर तीन रस्ते फुटतात एक रोहा येथे जातो, एक अलीबागच्या दिशेने जातो आणि एक प्रकल्पाकडे जातो. मध्ये कोंकण रेल्वे ट्रॅक लागतो. पलीकडे सुप्रीम पेट्रोकेमिकल्स दिसते. त्याच्या पलीकडे भिसे खिंड आणि वळणावळणाचा घाट रस्ता दिसतो. अर्ध्या तासात आम्ही  जलशुद्धीकरण प्रकल्प ठिकाणी पोहचलो. तिथे गेल्यावर गेटवर आम्ही आमची ओळख सांगितली.मग वॉचमेन आत ऑफिस मध्ये गेला. आम्हाला आत यायला परवानगी दिली. आत गेल्यावर आम्ही प्रथम ऑफिस मध्ये गेलो. तिथे ऑपरेटर आणि इंजिनिअर भेटले. त्यांना बनाईत साहेबांचा निरोप दिला. त्यांनी फोनवर बोलणे झाल्याचे सांगितले.नंतर हॉल मध्ये एकत्र जमा झालो. ऑपरेटर ने काही सुरक्षेच्या दृष्टीने सूचना दिल्या.मगत्याने आम्हाला इमारतीच्या खालच्या बाजूला आणले.तिथे जिन्यापाशी एक मोठा साइन बोर्ड लावला आहे. त्यावर LED दिव्यांचा वापर करून पूर्ण प्लांटचा नकाशा दाखवला आहे. प्लांट ऑपरेटरने प्रथम पाण्याचा मुख्य स्त्रोत कुठून येतो आणि कुठे कुठे पाणी सोडले जाते या दरम्यानचा प्रवास सांगितला. माहिती सांगताना मुले डायरीत लिहून घेत होती. मध्येच काही जण प्रश्न विचारत होते.

अंबा नदीवर वाकन जवळ एक छोटे धरण बांधले आहे.यात पाली - जांभूळटेप या डोंगर रांगांच्या परिसरातून जमा झालेले पाणी येते. परंतु हे पाणी वर्षभर टिकत नाही त्यामुळे डोलवहाल धरणातून एक कालवा काढला आहे तो खांब मार्गे सुकेळी खिंडीत सोडला आहे . त्यातून पाणी नियमित अंबा नदीला मिळते. मुळशी धरणाच्या पाण्यावर  भिरा येथील टाटा हाइड्रोपॉवर स्टेशन चालते . त्यातून जनित्र फिरवल्यानंतर जे पाणी बाहेर पडते ते पाणी एका कालव्याद्वारे डोलवहाल धरणाला पुरवले जाते.  रवाळजे गावापासून निघालेले पाणी एका छोट्या कालव्याद्वारे तीस किलोमीटर प्रवास करत कोलाड जवळील धरणात येते. त्या धरणातून एक कालवा काढला आहे .तो कालवा डोंगराच्या कडेने सुरगड किल्याच्या पायथ्या पासून ते खांब पर्यंत येते. तिथे गोवा हायवेच्या खालून तो चिले गावातून पुढे डोंगरातून टणेल द्वारे सुकेळी खिंडीत येतो.. मुळशी धरण ते वाकन धरण हा लांबवरचा प्रवास करत पाणी एमआयडीसी जलशुध्दीकरण  प्रकल्प येथे एका पंपाद्वारे पोहचते.या पंपासाठी डिझेल जनरेटर ठेवण्यात आला आहे. नदीची लेव्हल मॉनिटर केली जाते. मुलांनी प्रत्येक LED दाखवून त्याबाबत बरेच प्रश्न विचारले. प्रत्येकजण डायरीत नोंद करत होते. तनु, विक्रांत , सारिका असे बरेच जण होते जे प्रत्येक टेक्निकल बाबींची माहिती घेत होते.             पाणी नदीतून पंपाद्वारे प्रकल्पात आले. तिथून पुढच्या प्रवासा साठी. आम्हाला सर्वांना वर टाक्यावर चढवले. एका जिन्याने वर गेल्यावर एका लोखंडी प्लॅटफॉर्म वर सर्वांना उभे केले. दोन मोठ्या गोलाकार टाक्या दिसल्या. त्यातील एकात काहीतरी फिरताना दिसले.सुमितने याबाबत प्रश्न विचारले असता त्या ऑपरेटरने सांगितले त्याला क्लेरिफोकेटर म्हणतात. यांच्या मधोमध एक गोलाकार टाकी दिसली. मोटरने कलेरिफोकेटर फिरवतात. त्यामुळे पाण्यातील गाळ ढवळून मध्यभागी जमा होतो. विक्रांत मोटेने याचे कारण विचारले.मग सैनट्रीपीटल फोर्स मुळे पाण्यातील गाळ मद्यभागाकडे ओढला जातो जसे दही घुसल्यावर लोणी मध्यावर येते. मधोमध एक पाइप आहे ज्यातून तो गाळ बाहेर पडतो. उर्वरित पाणी ओव्हरफ्लो होऊन पलीकडील गोलाकार टाकी मध्ये जमा होते. प्रतिकने प्रश्न विचारला या पाण्याचे काय करतात. मग त्याने एक पाइप दाखवला तिथून तुरटी सोडली जाते.तुरटी मुळे उर्वरित गाळ खाली बसतो. तिथे अजून एक पाइप दाखवला त्यातून पाण्यात क्लोरिन सोडले जाते. एकाने क्लोरीन का सोडतात याविषयी विचारले असता निर्जंतुकीकरण करण्यासाठी वापरले जाते असे सांगितले. त्या टाकीतील पाणी ओव्हरफ्लो करून फिल्टर सेक्शन ला पाठवले जाते.मग क्लोरिंन टाकीचा भाग दाखविला. समिहांनने यावर प्रश्न विचारला की याला असे वेगळे का ठेवले आहे.मग बाजूचा चार्ट सर्वांना वाचायला सांगितला. त्यात सर्व माहिती दिली होती. क्लोरींन वायू विषारी असल्याने त्याची योग्य तऱ्हेने हाताळणी करावी लागते. त्यासंबंधी सर्व सूचना लिहिल्या होत्या. दीड तास होऊन गेला होता मग थोडा वेळ काही खाऊन मग परत प्रकल्प बघावा असे ठरले मग आम्ही त्यांच्या पहिल्या मजल्यावरील हॉलवर गेलो. तिथे एक कॅन्टीन आहे. तिथे चिवडा, भेळ खाल्ली.मग परत पुढचा सेक्शन पाहिला. तिथे बाजुला त्यांची लॅब होती.ती पहिली त्यात पाण्यातील विविध घटक शोधण्यास काही उपकरणे होती. त्यावर मुलांनी प्रश्न विचारले. तिथल्या इंजिनिअरने PH मीटर, ऑक्सीजन मीटर इत्यादी उपकरणे दाखवली. मग आम्ही फिल्टर सेक्शन मध्ये गेलो.हा पूर्णपणे छप्परबंद असलेला भाग आहे. यात पाच सहा चौकोनी ओपन टँक दिसले. जसे आपल्या घरातील पाण्याच्या फिल्टरला भाग असतात तसे हे भाग आहेत. पाहिल्या भागात मोठे गोलाकार दगड, नंतर कोळसा असलेला टँक ,मग छोटे दगड, त्यानंतर  वाळू अशा विविध भागातून गेल्यावर ते पाणी पंपाने दोन मोठ्या गोलाकार बंद टाक्यांमध्ये जमा करतात मग तिथून ते पाणी एक अवाढव्य पंपाद्वारे आपल्या इथे आणले जाते. तिथे अजून दोन पंप आहेत त्यातून पाणी शुध्दीकरण न करता आरसीएफ आणि इस्पात कंपनीला पाठवले जाते. हा जलशुध्दीकरण प्रकल्प आशियातील श्रीमंत प्लांट पैकी एक म्हणून ओळखला जातो.

जलशुध्दीकरण प्रकल्प बघितल्यानंतर आम्ही बाहेर आलो. तिथून आम्हाला आमडोशी गावात जायचे होते.त्या गावात जाऊन काही उपक्रम करायचे होते. तिथून दोनतीन किलोमीटर अंतरावर हे गाव आहे.त्या गावासमोर सुप्रीम पेट्रोकेमिकल कंपनी आहे. अर्ध्या तासात आम्ही गावात पोहचलो. गावातील मध्यभागी असलेले राम मंदिर बघितले तिथे सर्वजण एकत्र जमा झालो. मुलांना आपल्या गटात बसायला सांगितले. नंतर प्रत्येक गटाला एक कार्यकर्ता दिला. प्रत्येक गटाने पाणी नियोजन या विषयावर माहिती जमा केली होती. त्याविषयी गावात जाऊन चर्चा व मुलाखती घ्यायच्या होत्या. गावात माझ्या ओळखीचा जांभेकर होता. त्याला शोधले आणि त्याची मदत घेतली. प्रत्येक गटाला गाव विभागून दिले. मुलांना काही ठिकाणी थोडे कडू अनुभव आले तर काही ठिकाणी त्यांचे लोकांनी स्वागत केले. मी ज्या ग्रुप मध्ये असाच अनुभव आला. आयपिसीयल कंपनी बद्दल त्यांचे मत वाईट होते. त्यामुळे त्यांनी अक्षरशः आम्हाला हाकलून दिले.पण काही ठिकाणी खूप चांगली माहिती दिली. चर्चा रंगल्या.काही ठिकाणी मुले सरबत , खाऊ खाऊन आली. वेगवेगळे अनुभव आले. तासभर गावात फिरल्यावर परत रामाच्या देवळात परत आलो. सर्वजण एकत्र जमा झालो. गावातील इतर दोन मंदिरे पाहिली. तोपर्यंत चार वाजून गेले होते. आजचा उपक्रम संपला होता. सर्वजण आमडोशी गावातून निघालो. मग आम्ही सर्वजण परतीच्या वाटेला लागलो. पाऊण तासात देवळात पोहचलो. थोडावेळ आराम केल्यावर. मुलांना ड्रॉइंग पेपर दिले. प्रत्येक ग्रुप मध्ये  काही चार्ट बनविण्यास सांगितले. एमआयडीसी भेटीची काही चित्रे व माहिती यांचे चार्ट बनविण्यास सांगितले. काहींना ग्रीटिंग कार्ड्स बनविण्यास सांगितले. प्रत्येकाला वेगवेगळे विषय देण्यात आले होते. काही बैठे खेळ घेतले. संध्याकाळ झाल्यावर दोन तीन मुले घरी जाण्यासाठी एका कार्यकर्त्याला सांगू लागली. त्यातील एका मुलीला म्हणजे बोरमानिकर हिला जरा समजावले.ती जरा रडकुंडीला आली होती पण नंतर तिच्या बरोबरीच्या  श्रिया, प्रणाली यांनी तिला बरोब्बर सांभाळून घेतलं. दिलीप जाधव नावाचा मित्र आठ वाजता घरी चालला होता. त्याच्या मुलीला भेटून तो निघाला होता.ते आरोहीने बघितले आणि मोठ्याने भोकाड पसरलं. मला अभिजीतने अगोदरच सांगून ठेवले होते की ती असे मध्येच करेल शक्य असेल तर दुर्लक्ष करून बघ. त्यामुळे तिकडे पाहिले नाही.पण अलका चौधरी या आमच्या कार्यकर्त्या यांना राहवले नाही त्या म्हणाल्या आरोहीच्या पोटात दुखत आहे आपण तिला जाधव सोबत पाठऊ. माझा नाईलाज झाला.मग अभिजितला फोन केला त्याने तिला सांगितले की तुला आल्यानंतर हॉस्पिटल मध्ये घेऊन जाणार मगच घरी यायचे. त्याला नक्की ठाऊक होते की ती नाटक करत होती.मग घरी गेल्यानंतर तो पोटात दुखायचे थांबले पण अभिजीतने तिला दवाखान्यात नेले. इकडे मुलांचे कॅम्प फायर साठी प्रत्येक गटाचे सदस्य तयारी करत होते.प्रत्येक जण काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करत होते. जाहिरात सादर करणे हा एकविषय त्यापैकी होता. काहींनी कॉम्प्युटर हा विषय घेतला होता. कार्यक्रम छान रंगला. नंतर सर्वजण टॉर्च घेऊन गेस्ट हाऊस जाण्यासाठी तयार झाले.

रात्री कॅम्प फायर झाल्यानंतर झोपायला मेन ऑफिस गेस्ट हाऊस मध्ये जायचे होते. गावाच्या बाहेरून एक रस्ता आहे ज्यातून तिथे पोहचता येत असे. गेस्ट हाऊस मध्ये व्यवस्था छान होती. तिथे हॉलमध्ये एक ग्रुप फोटो काढला. सर्वांना रूम विभागून दिल्या होत्या. आम्ही जवळ जवळ ३० जण होतो. पाच सहा कार्यकर्ते असल्यामुळे सर्व मुलांवर व्यवस्थित लक्ष देता आले.

       दुसऱ्या दिवशी सकाळी नाष्टा आटोपल्यानंतर देवळात गेलो. टाऊनशिप वरून श्रीकांत रोडे, गुणवंत पाटील, बरगोले, राजेंद्र पांडे असे बरेच कार्यकर्ते आणि पालक आले होते . मंदिरात मुलांनी काही चार्ट, ग्रीटिंग कार्ड्स ची कामे केली. रेल्वे स्टेशन भेट हा त्यादिवशी ठरलेला उपक्रम होता. मग सर्वजण डायरी पेन घेऊन स्टेशनकडे निघालो. वरवटने ते स्टेशन हे अंतर दोन किलोमीटर आहे. अर्ध्या तासात नागोठने स्टेशन वर पोहचलो. तिथं गेल्यावर स्टेशन मास्टर यांना भेटलो. तिथले कामकाज कसे चालते. सिग्नल यंत्रणा कशी काम करते, प्रत्येक सिग्नलचा अर्थ काय असतो.असे बरेच प्रश्न मुलांनी विचारले. सिंगल लाईन असल्याने अपघात होऊ नये म्हणून कोणती  खूप काळजी घेतली जाते. सिंगल लाईन वरील स्टेशन वर ज्यावेळी गाडी येते त्यावेळी एक रिंग टाकली जाते व एक रिंग परत त्या ट्रेनमध्ये टाकली जाते. एक स्पेशल नैल बॉल मशीन प्रत्येक स्टेशन वर असते.ती एक इलेक्टरोमॅकॅनिकल सिस्टम असते  . त्या मशीन प्रत्येक स्टेशनला जोडलेल्या असतात. लागोपाठच्या दोन स्टेशन मधून ज्यावेळी ट्रेन जाते त्यावेळी क्लिअरन्स मिळतो. अशा तऱ्हेने सिंगल लाईन वरील येणाऱ्या व जाणाऱ्या ट्रेन सुरक्षित येजा करतात. हल्ली ती सिस्टम वापरात नाही. हल्ली इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे आल्यामुळे जुनी सिस्टम वापरात नाही. जुन्या काही सिनेमा मद्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने सिस्टम दिसतात.काही पुस्तकातील कथा स्टेशन या विषयावर फिरताना दिसतात. भारतीय रेल्वे म्हणजे आपल्या शरीरातील रक्तवाहिन्या सारख्या वाटतात. त्यांचा प्रवाह थांबला की सर्व ठप्प होण्याची शक्यता आहे. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि मुंबई पासून बोंगाई गाव पर्यन्त अहोरात्र रेल्वेची धडधड चालू असते. त्यांचे कर्मचारी प्रत्येक सेकंदाला कार्यरत असतात. त्यासाठी रेल्वेचे कामकाज समजून घेणे गरजेचे ठरते. सामान वाहतूक तर अत्यावश्यक सेवा. कितीतरी गोष्टी फार कमी वेळेत रेल्वे सर्वदूर पोहचवत असते. आता कंट्रोल पॅनल आले आहेत त्यात प्रत्येक गाडीचे लोकेशन दिसते. सर्व माहिती कॉम्प्युटर वर दिसते. प्रवाशांच्या नावापासून ते प्लॅटफॉर्म वरील उभ्या असलेल्या लोकांपर्यंत सर्वकाही स्क्रीनवर दिसते.पण हे सर्व नसताना  गेली दीडशे वर्षे कर्मचारी दररोज आपली कामगिरी पार पाडत होते.

स्टेशन वरून आम्ही परत वरवठणे येथे परत आलो. सर्वांनी मिळून जेवण केले. त्यानंतर काही पालक आले होते. त्यांना भेटलो. दुपारचा कार्यक्रम रेल्वे फाटक भेट हा होता. त्यानंतर भिसे खिंडीतील रेल्वे टनेल बघायचा होता. दुपारी रेल्वे फाटक बघण्यासाठी निघालो .चार किलोमीटर अंतर चालायचे होते. एमआयडीसी रोडने गेलो तिथे पुढे चालत गेल्यावर ट्रेन ट्रॅक लागतो. तिथून चालत आम्ही आमडोशी फाटक पाशी पोहचलो. तिथे एक रेल्वे कामगार कार्यरत होता. त्याला विचारले तुम्हाला थोडा वेळ असेल तर सिग्नल यंत्रणा बद्दल माहिती मिळेल काय? त्याने सांगितले की आता येणाऱ्या ट्रेनला तसा तासभर वेळ आहे तरी तुम्ही प्रश्न विचारा.मग त्याने त्याच्या कामाची माहिती दिली. ट्रेन ज्यावेळी येणार असते त्यावेळी त्यांना तसा सिग्नल मिळतो.मग ट्रेन यायच्या अगोदर पंधरा मिनिटे ते फाटक बंध करतात. त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण कमी होते. पूर्वी हे फाटक हाताने फिरवावे लागे आता ते मोटर्सने ऑपरेट होते. त्याने काही नवीन गोष्टी सांगितल्या. चुकून मेसेज मिळाला नाही आणि ट्रेन येत असेल तर आपत्कालीन परिस्थितीत ते ट्रेन थांबवू शकतात. त्यासाठी लाल रंगाचा मोठा बॅनर त्यांच्याकडे असतो. त्यांच्याकडे एक अशी वस्तू असते जी ते रुळाला लाऊन ठेवतात.मग ज्यावेळी ट्रेन त्याच्यावरून जाते त्यावेळी ती वस्तू फुटते आणि भला मोठा आवाज होतो ज्याने ड्रायव्हरला धोक्याची सूचना मिळते. मुलांनी ती वस्तू पाहायला मिळते का ते विचारले.मग त्याने तो वस्तू दाखवली त्याला कसे रुळाला लावतात ते सांगितले. तासभर गप्पा मारल्या आणि मग एक ट्रेन येण्याची सूचना मिळाली.मग त्याने आम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवले.. नंतर आम्ही भिसे टनेल कडे निघालो. वाटेत एका ठिकाणी आमच्या सोबत असलेले गुणवंत पाटील यांनी त्यांच्या कविता वाचून दाखवल्या.हा शिबिरातील भाग नव्हता परंतु त्यांनी उस्फूर्तपणे मुलांचे मनोरंजन केले.मग आम्ही टनेल मध्ये शिरलो. सुरक्षित अंतर ठेऊन आम्ही तनेलच्या भिंतीना टेकून उभे राहिलो. आतमध्ये खूप थंडगार वाटत होते. अगदी एसी मद्ये बसल्यासारखे.एक ट्रेन या वेळेत येणार होती.ती यायची वाट बघत बसलो. काही वेळाने ट्रेन आली.एक वेगळा अनुभव बघायला मिळाला. टनेलमधून बाहेर आलो. वरच्या बाजूला जिथे भिसे टनेल लिहिले आहे तिथे एक मोठा सिमेंटचा कट्टा बांधला आहे तिथे सर्वजण बसलो.तिथून छान फोटो काढले.मग बाजुला एका झाडाखाली बसलो तिथे भेळ केली. सर्वांनी गप्पा मारत आजूबाजूला असलेल्या जंगल भागाचे दर्शन करीत , समोर दिसणारा सुप्रीम कंपनीचा परिसर, पालीचा सरसगड किल्ला या सर्वांचा आनंद घेतला. नंतर आम्ही डोंगरात थोडे वर चढून वर गेलो. तिथे छान सपाटी लागली . डांबरी रस्ता होता. मागे व पुढे गेल्यावर दोन्हीकडे उतार सुरू होतो. पुढे रस्ता रोह्याकडे जातो व मागे तो नागोठणे येथे जातो. तिथून वर डोंगरात असलेल्या गावाकडे पायवाटा दिसतात. या ठिकाणी गर्द झाडी आहे. या भागाचे चित्रीकरण काही सिनेमात केले आहे. अमिताभ बच्चन यांच्या तुफान सिनेमातील ट्रेनचा सीन या टनेल मध्ये आणि बाहेरील बाजूस चित्रित केलेला आहे.हे ठिकाण उंचावर असल्यामुळे ट्रेन येतं असताना खूप सुंदर दृश्य दिसते. तिथे थोडा वेळ थांबल्यावर आम्ही नागोठणे रस्त्याच्या दिशेने उतरायला सुरुवात केली. अगदी वरवठणे गावा पर्यंत तसा उतारच आहे. फक्त समोरून येणाऱ्या वाहनांची काळजी घेतली तर फार कमी वेळेत अंतर पार पडते. आमचा ग्रुप तसा मोठा असल्याने सर्वजण रांगेतच रस्त्याने गेलो. तासाभरात आम्ही मंदिरात पोहचलो.काही चार्ट आणि डायरी पूर्ण करायच्या होत्या. पाच वाजता परत गेस्ट हाऊस मध्ये गेलो. सर्व साहित्य बॅगेत भरायला सांगितले.सर्व रूम चेक करून घेतल्या.हॉल मध्ये सर्वजण जमा झालो.मग वरवटणे गावातून चालत नागोठणे येथे गेलो. पूर्वी बसेस पुलापासून सुटत असतं त्यामुळे तिथल्या एका झाडाखाली पारावर बसलो. साडेसहा वाजता एक बस होती.त्या बसने कॉलनी मध्ये पोहचलो.

 

9 views0 comments

Recent Posts

See All

व्यक्ती आणि वल्ली....... डॉक्टर केतकर

मी आणि माझा मित्र दीपक घोडके दोघेजण अमरनाथ यात्रेला निघालो होतो.१९९७ साला तील ही एक आठवण आहे. आम्ही १ ऑगस्ट १९९७ ला सकाळच्या स्वराज एक्सप्रेस ने निघालो .ही ट्रेन बॉम्बे सेंट्रल वरून सुटते. हिला जम्मू

Comments


bottom of page