top of page

Zirad Camp May 2003

Updated: Dec 26, 2022


१९९८ साली मुक्तांगण ग्रुपचे उपक्रम सुरू झाले.त्या दरम्यान काही चांगल्या संस्थांचे मार्गदर्शन लाभले.पण एखाद्या गोष्टीची किंवा संकल्पनेची कॉपी आपण करायला गेलो तर ती चिरकाल टिकत नाही. प्रत्येक गोष्ट ज्यावेळी निर्माण होते किंवा तयार केली जाते त्यावेळीं काही संदर्भ , बाबी लक्षात घेतलेल्या असतात . काही गोष्टींना गृहीतही धरले जाते. त्यामुळे तो फॉर्मुला किंवा ती गोष्ट सर्व ठिकाणी लागू होतेच असे नाही.त्यात थोडा बदल करावा लागतो.आपण जर तसा अट्टाहास धरला की असेच पाहिजे तर मात्र त्या संकल्पना टिकू शकत नाहीत. मुक्तांगण बाबतीत असेच घडले असते पण थोडी लवचिकता ठेऊन आणि आपण उपक्रम कुठे घेतोय हे लक्षात घेऊन आम्ही वाटचाल सुरू केली. आम्ही राहतो त्या परिसरात सर्व जाती,जमाती, धर्म, विविध आचार विचार असलेली माणसे राहतात हे आम्हाला चांगले ज्ञात होते. इथल्या दहा व्यक्तीमागे एक व्यक्ती कशात तरी सक्रिय सहभाग

घेणारी होती. धार्मिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात कामे करणारी बरीच मंडळी इथे होती. त्यामुळे इथे सामाजिक उपक्रम करताना तुम्ही जर काही छुपा अजेंडा किंवा वैयक्तिक फायदा मनात धरला तर तुम्ही टिकू शकत नाही हे स्पष्ट होते.नाहीतर एखाद्या ठराविक स्वरूपाचा किंवा विचारसरणीचा शिक्का तुमच्या उपक्रमावर बसू शकतो. या गोष्टी गृहीत धरून उपक्रम राबवले. अंजली सावंत, साधना गोसावी, बाळा उपनकर्, राजेश सावंत, बानाईत असे निर्व्याज मनाने काम करणारे कार्यकर्ते सुरवातीच्या काळात होते.नंतर कामाच्या किंवा घरातील वाढलेल्या जबाबदाऱ्या मुळे त्यांचा सहभाग कमी झाला.नंतर सुखदेव बरगोले, राजेंद्र पांडे, मेघा पांडे, अलका चौधरी,अभिजित जोशी असे बरेच जण पालक म्हणून आले पण मुक्तांगण ग्रुपचे कार्यकर्त्ये झाले.प्रत्येकजण आपल्या परीने योगदान देत होते. शैलेश गुरव सारखी मंडळी वेळात वेळ काढून शिबिरांना भेट देत असत. शिबिरासाठी लागणारी मदत करत. त्यांची मुले नियमित रविवारी उपक्रमाला हजर असायची. त्यामुळे या पालकांचे एक वेगळे स्थान निर्माण झाले होते. मुलाखती, प्रकल्प भेटी, शिबिरे अशा बऱ्याच बाबतीत पालकांची गरज भासत असे. त्यामुळे शैलेश गुरव यांच्यासारखे पालक मदत करत असत. पाच सहा वर्षे सलग काम झाल्यावर काही मान्यवर संस्थांनी आमच्या सोबत काम करा असे सुचवले अगदी आग्रह सुध्दा धरला . पण त्यांना सांगितले तुमच्या संस्था फार मोठ्या आहेत, तुमचे काम मोठे आहे ते तुम्ही करत रहा. तुमच्या मदतीला कधीतरी म्हणजे तसा आम्हाला पटणारा उपक्रम असेल तर नक्की येऊ असे स्पष्ट सांगितले. त्यांना हेही सांगितले की आमचे काम फार छोट्या आणि मर्यादित स्वरूपाचे असल्याने आम्ही आमचा छंद म्हणून उपक्रम राबवत असतो. विशेष म्हणजे यात मुले आणि त्यांचे पालक यांचा आम्हाला प्रचंड प्रतिसाद आणि मदत मिळते. त्यामुळे आमच्या छंदाचे रूपांतर सामाजिक सेवा या स्वरूपात करायची आमची इच्छा नाही. काही कॉलनीतील गट सुरवातीची वर्षे आमच्या उपक्रमापासून अलिप्त राहिले कारण त्यांना आमचे उपक्रम काय चालतात हे माहिती नव्हते. पण कुणाच्या तरी सांगोवांगी गोष्टीवर विश्वास ठेऊन किंवा एका विशिष्ट भिंगातून पाहिल्यामुळे ते दूर राहिले.आम्ही शक्यतो कुणालाही व्यक्तिशः न बोलता, कोणतीही जाहिरात न करता आमचे उपक्रम चालू ठेवले.काही जणांनी हेटाळणी सुध्दा केली.पण आम्ही कायम दुर्लक्ष केले.

मुलांचे उपक्रम राबवताना पालकांचा सहभाग हा फार महत्वाचा असतो. बरेच पालक वेळ देऊ शकत नाहीत पण कधीतरी वर्षातून एक दोनदा सहभागी झाले तरी त्यांना उपक्रमाची माहिती होते. शैलेश गुरव बऱ्याचदा शिबिराला यायचा. सिध्दी गुरव आणि सारिका शेट्ये या नेहमी रविवारच्या उपक्रमात सहभागी होत असत. शिबिराला त्यांची उपस्थिती कायम असायची. शैलेश गुरव यांनी एक दिवस झिराडला शिबीर घेण्याचे सुचवले. त्याने तिथे काय बघता येईल याविषयी माहिती दिली.

त्यात त्याने कनकेश्वर ट्रेक, प्रभात पोल्ट्री फार्म, मांडवा जेट्टी,सासवने परिसर हे पाहता येतील असे सुचवले. राहण्याच्या दृष्टीने काय करता येईल यावर एकदा गावात जाऊन बघुया असे म्हणाला.

एक दिवस वेळ काढून झिराड येथे गेलो. त्याच्या घरी गेलो. त्याचे आई बाबा शिक्षक होते. त्यावेळी बहुतेक आई रिटायर झाल्या नसाव्यात. त्याचे घर मोठे आहे. घरी गेल्यावर आमच्या उपक्रमाविषयी सांगितले. मग गावच्या सरपंचांना भेटून शाळेत व्यवस्था होते का ते पाहूया म्हणून त्यांच्याकडे गेलो. गावच्या सरपंच एक महिला होत्या. शैलेशला चांगल्या ओळखत असाव्यात.हा परिसर तसा मुंबईला फार जवळ आहे. त्यात बोटीच्या सोईमुळे ते अंतर अजून कमी होते. त्यामुळे इथे पर्यटन व्यवसाय जोरात असतो. दिवसाकाठी जेवण व राहणे हे इथे तसे महागडे असते. त्यामुळे इथे येणाऱ्या पर्यटक किंवा काही कारणास्तव भेट देणाऱ्या व्यक्तींना त्याच हिशोबात इथे

पाहिले जाते.त्यात आम्ही आयपीसील कर्मचारी असल्याने त्यामुळे यांना काय कमी आहे हा विचार केला जाऊ शकतो हे माझ्यातरी डोक्यात नसायचे आणि अगदी त्यावेळी नव्हतेच. त्यामुळे शिबीर म्हटले की लक्झरी नाही, स्वतः जेवण बनवणे,ट्रेक करणे, मुलाखती घेणे, ग्रामीण भागाचा अभ्यास करणे या सर्व गोष्टींना माझ्यातरी मनात फार वेगळे स्थान होते. त्यामुळे त्यापलीकडे जाऊन कधी मी विचार करत नसे.नेमके हेच बऱ्याचदा खूप ठिकाणी खटकायचे.

आम्ही दोघेजण सरपंचाच्या घरी गेल्यावर मी त्यांना आमच्या उपक्रमाची माहिती दिली. त्यांनी ज्यावेळी बोलायला सुरुवात केली त्यावेळी मला दिवा गावाची आठवण आली. कळव्यात असताना माझे बरेच मित्र आगरी समाजाचे होते. माझा एक जवळचा मित्र विजय यांच्यासोबत एकदा गणपतीला दिव्याला गेलो होतो. दिवा हे गाव त्यावेळी असे होते की चारीबाजूने प्रकाश आणि मधोमध अंधार असा प्रकार होता.हे गाव ट्रेन सोडून रस्त्याशी कनेक्टेड नव्हते. काही घरे सुध्दा त्यावेळी कुडाची होती. दिवा स्टेशनवरून टॅक मधून चालत त्याचे नातेवाईक रहातात तिथे गेलो. घरात गेल्यावर त्यांच्यात संभाषण चालू झाले. अक्षरशः एवढे जलद बोलत होते की मला तर सुरवात आणि शेवट हेच कळत होते . त्यात भाषा अतिशय शिवराळ.पण कानाला एकदम मजेशीर वाटणारी. त्यांचे संभाषण ऐकत राहावे असे वाटायचे. एखाद्याचे नाव घेऊन बोलताना एकदम सोप्प्या भाषेत बोलायचे म्हणजे उगीचच अरे विजय नाही तर , ये ईजा…किंवा अरे मोहन नाही तर, ये मवन. मस्त ! अगदी दिलखुलास भाषा.

अगदी तशीच भाषा सरपंच मॅडम बोलत होत्या. त्यांना शाळेबद्दल विचारले.त्यांनी सांगितले की शाळेला सुट्टी असल्याने रीतसर शालेय अधिकाऱ्याकडून परवानगी घ्यावी लागेल. खरेतर त्या देऊ शकल्या असत्या पण राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना फार सतर्क राहावे लागते. कुणावरही पटकन विश्वास ठेऊन त्यांना चालत नाही. कदाचित असेही असावे की आम्ही लोक पैसे मोजून राहण्याची व्यवस्था करू शकतो मग यांना फुकट व्यवस्था का हवी अशी त्यांची धारणा असावी .मला आठवत नाही पण त्यावेळी अशी मानसिकता माझी नव्हती .शिबीर म्हणजे टीपीकल शिबीर यापुढे विचार नसायचा. सरपंच बाईंच्या पुढे काही बोलता आले नाही आणि त्या अशा काही अस्सलिखित आगरी भाषेत बोलल्या की माझी तर बोलतीच बंद झाली.पण चला एक अनुभव घेतला.

मग आम्ही प्रभात पोल्ट्री वर गेलो. इथे मात्र छान स्वागत झाले. सुरवातीच्या काळात काही वेळ इथे शैलेश काम करत असे. त्यामुळे मालकांना भेटून आलो. त्यांनी सांगितले एक दिवस अगोदर कळवा मग व्यवस्था करतो असे सांगितले.मग एक उपक्रम नक्की झाला.मग त्याच्या ओळखीचे भोईर म्हणून होते त्यांची आंब्याची बाग होती. तिथे गेलो. त्यांना विचारले. त्यांनी राहण्याची व्यवस्था करतो सांगितले. त्यांनी जेवणाची व्यवस्था करण्याची सुध्दा तयारी दाखवली.मग कार्यक्रम निश्चित झाला. शैलेशने कनकेश्वर ट्रेक एक दिवस करुया असे सांगितले.मग त्याच्या घरी गेलो. थोडीफार चर्चा केली. नंतर कॉलनीत परत आलो. अंजलीच्या घरी एकदा मीटिंग घेतली. अभिजित, उपंनकर, अंजली सर्वजण कॅम्पला येणार असे ठरले. बरगोले सुध्दा तिन्ही दिवस यायला तयार झाले. मुलींची राहण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी शैलेशने घेतली.तो त्याच्या घरी करतो असे म्हणाला. एकंदरीत शिबिराची तयारी सुरू झाली होती.

मुलांना लगेच नावे द्यायला सांगितली. त्यावेळी मी कॉलनीतल्या A टाईप मध्ये रहात होतो. त्यामुळे सर्वांना निरोप देण्यास सोपे होते. अलिबाग वरून पूर्वा दळवी येणार होती. माझे अलिबागचे मित्र दळवी तिला आणि तिच्या एका मैत्रिणीला सोबत घेऊन येणार होते. अभिजित जोशी आणि बाळा उपनकर दोघेही शिबिराला येणार होते.मुले २५ ते ३० जण येणार होती.विक्रांत मोटे, तन्वी सावंत, सिध्दी गुरव, ओंकार जोशी, अंकिता मुसळे, अर्थव मुसळे, आरोही जोशी, प्रशांत पाटील, ओंकार सरदार, अनिकेत सानप, मोहिरे,कोरे बंधू, नुपूर देशमुख, उपंनकर बंधू, संजय कुंभार, सुजित थोरात, संकेत भोसले, निखील मोरे, सुमित गायकवाड, स्वप्निल बरगोले, पूजा खराडे, शिल्पा वंजारी, वेदा कदम, ऋचा कदम, रोहन पाटील, मनाली पवार, पूर्वा दळवी, अक्षय पोटे,गौरी नगरकर , दिग्विजय मोटे, काळगावकर,अशी बरीच मुले येणार होती. रोहन पाटील हा फक्त त्यांच्यातला मोठ्या गटातील होता.बाकी सर्वजण लहान गटात असणारे होते. सुखदेव बरगोले त्याच दिवशी शिबिराला येणार होते. बऱ्यापैकी लोक सहभागी होणार होते.
शिबिराच्या दिवशी आम्ही सकाळी साडेदहा वाजता टाऊनशिप गेटवर जमा झालो.त्या दरम्यान एक बस कुर्डूस मार्गे पाली ते अलिबाग अशी गाडी येते. साधारण पावने अकरा वाजता ती गाडी आली. ही गाडी पोयनाड येथे जाऊन वळसा घालून मग परत अलिबागला फिरते त्यामुळे थोडा वेळ जातो.बारा वाजता आम्ही अलिबागला पोहचलो. तिथून रेवसकडे जाणारी बस पकडली.तिथून अर्ध्या तासात झिराडला उतरलो. शैलेश अगोदरच तिथे पोहचला होता. आम्ही सर्वजण त्याच्या घरी गेलो. तिथे मुलींना जायला सांगितले व आम्हाला घेऊन शैलेश भोईर यांच्या वस्तीवर गेला. गावाच्या थोडे बाहेर घर आहे.मोठी आमराई तिथे आहे. गेल्यावर मुलांना बॅगा व्यवस्थित रांगेत ठेवायला सांगितल्या. जेवणाची वेळ झाली होती. सर्वांनी दुपारच्या जेवणाचे डब्बे आणले होते. त्यामुळे अंगणात सर्व एकत्र बसले. मुलीसुद्धा सर्व साहित्य शैलेश कडे ठेऊन आल्या.मग सर्वजण एकत्र जेवलो. तोपर्यंत दोन वाजून गेले होते.मग पाण्याचे पिंप भरून ठेवले. मुलांचे वेगवेगळे गट पाडले. बैलगाडीत ड्रम ठेऊन मग शैलेश,अभिजित, रोहन आणि इतर काही जणांनी मिळून गाडी ओढून पाणी भरण्यास घेऊन गेले. त्यांनी सर्वांनी मिळून बैलगाडी ओढत आणली. दुपारनंतर शैलेश,शलाका गुरव,अंजली , बरगोले ,उपंनकर कुटुंबीय आणि शैलेशची बहीण या सर्वांनी मुलांना मांडवा जेट्टीवर नेले.मी बाकी नियोजनासाठी कॅम्पवर थांबलो होतो.

किराणा सामान सर्व गावातील दुकानातून आणून दिले. चोंढी नाका म्हणजे इथला मुख्य बाजाराचे ठिकाण. भाजी,मासे यासाठी आसपासचे लोक इथे येत असतात. किहीम या प्रसिद्ध बीच वर जायला चोंढी नाक्यावरून रस्ता जातो. इथे जवळच एक मोठी शाळा आहे.या नाक्यावर दिवसभर वर्दळ असते. मालगाडी ट्रेनचा ट्रॅक सुध्दा आरसीएफ कडे इथूनच जातो.या भागाला खूप महत्त्व आहे. नाक्यावरून काही सामान आणले.त्यावेळी मोबाईल तसे फारसे नव्हते. BSNL चे घरातील फोन वापरात जास्त होते. त्यामुळे PCO STD बुथ अजून त्यावेळी कालबाह्य झाले नव्हते.ते त्यावेळी फार गरजेचे होते. तिथून घरी एक फोन केला. शिबिराबद्दल थोडे सांगितले.नंतर सर्व साहित्य घेऊन कॅम्पवर दिले. सात वाजेपर्यंत मुले परत आली. तिकडे त्यांनी मांडवा बीचवर धमाल केली. कोणी पाण्यात खेळत होते तर कोणी किल्ले बनवत बसले होते. काही मुले शंख शिंपले गोळा करत होती .त्यांनी मांडवा जेट्टी पाहिली.मुले बोटी येताना प्रवासी चढताना उतरताना पाहून आले. तिथे मस्त फोटो काढले. विनोद दळवी सुध्दा तिथे आले होते. मुलांची शिबिराची सुरवात छान झाली होती.


परत आल्यावर प्रत्येकाला ग्रुप नुसार कॅम्प फायर साठी काही तरी तयारी सुरू करायला सांगितली. मुलांमध्ये गौरी नगरकर, तन्वी, सिध्दी, संजय कुंभार असे बरेच जण होते हे अशा कार्यक्रमात मात्तब्बर होते. जेवण बनवण्यास भोईर यांना दिले असल्याने त्यांना फक्त लागेल ती मदत करत होतो.ते कुटुंब फार प्रेमळ होते. त्यांच्या घरात एक वयोवृद्ध आजी होत्या. बाकी लहान मुले सुध्दा होती. जेवणास मदत करण्यास बरीच लोक आमच्या ग्रुप मध्ये तयार होती.जेवण साधारण नऊ वाजता आटोपले. नंतर कँप फायर साठी सर्व मुलांना बसवले. कार्यक्रम बघण्यास गावातील आसपासचे वीस पंचवीस जण उपस्थित होते.


मुलांचा गट मोठा असल्याने कार्यक्रम चांगला रंगला. प्रशांत पाटील हा मुलगा खुर्चीवर बसला होता. अचानक तो जोरजोरात हलू लागला. त्याला थंडी वाजत होती की काय कळेना.मग त्याला थोडे पाणी दिले. प्रचंड थकवा आल्याचे जाणवत होते.भर उन्हात प्रवास आणि दिवसभर नुसते हिंडत राहिल्याने त्याची अवस्था झाली होती.जेवण पण त्याने पूर्ण घेतले नसावे.मग त्याला थोडे खायला सांगितले.त्या गडबडीत कार्यक्रम आटोपता घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रभात पोल्ट्री फार्म हाऊसवर जायचे होते. मुलींचा ग्रुप अंजली बरोबर शैलेश कडे गेला. उन्हाळा असल्याने सर्व मुलांची झोपण्याची व्यवस्था बाहेर ओसरीवर केली होती. दिवसभर बरीच पायपीट, धावपळ झाल्याने मुले लवकर झोपी गेली.

सकाळी लवकरच मुलांना उठवले. मुलांनी पटापट आवरले. नाष्टा चहा तयारी सुरू झाली.मुले सुध्दा मदत करत होती. मुलींच्या ग्रुप सोबत अंजली असल्याने तिने मुलींना लवकरच उठवून शैलेशच्या बाबांच्या सोबत चर्चा करत झिराड परिसर आणि कनकेश्वर देवस्थान याबद्दल बरीच माहिती घेतली.ते स्वतः शिक्षक असल्याने मुलांशी संवाद सहज साधू शकले. कनकेश्वर देवस्थान या बद्दल ते आत्मीयतेने बोलले कारण त्यांचा जन्म हा तिथलाच.लहानपणापासून तो परिसर हा त्यांच्या पायाखालचाच असल्याने मुलींना खडानखडा माहिती दिली. त्यांच्या काळात या देवस्थानचे गावासारखे स्वरूप होते. तिथे पोस्ट ऑफिस , शाळा अशा बऱ्याच सोई होत्या. बऱ्यापैकी वस्ती वर होती .आठ वाजता मुलींचा ग्रुप आला मग सर्वांनी नाष्टा केला.नंतर आम्ही प्रभात पोल्ट्री फार्म हाऊसवर गेलो. गेटवर पोहचल्यावर शैलेश आत ऑफिस मध्ये गेला. त्यानंतरच आत येण्याची परवानगी दिली. ऑफिसमधून काही सूचना दिल्या. शक्यतो शेडमध्ये आतापर्यंत जाऊ नका कारण यातील कोंबड्या (पक्षी) फार संवेदनशील असतात. त्यांना इन्फेक्शन लवकर होते. मुलांना हात पाय स्वच्छ करून जायला सांगितले. शक्यतो पिल्लांच्या जवळ जाऊ नये असे सांगितले. इथे कोंबड्यांना पक्षी या नावाने बोलले जाते. जवळ जवळ शंभर एकर जागेत ही पोल्ट्री पसरलेली आहे. प्रभात हा तसा एक जुना प्रसिद्ध ब्रँड होता. .प्रभात हे नाव फार जुने आहे. या पोल्टीचे मालक म्हात्रे कुटुंबीय आहेत. यांचा पूर्वी पेन बनवण्याचा व्यवसाय होता. बाजारात जे प्रभात ब्रँडचे पेन मिळायचे त्यांचे मालक म्हात्रे कुटुंबीय होते.

पोल्ट्री फार्मचे वेगवेगळे विभाग आहेत.यात पक्षांच्या म्हणजे कोंबड्यांच्या वयानुसार विभागणी केली आहे.यात तीन मुख्य तीन विभाग आहेत .छोटी पिल्ले, थोडी मोठी पिल्ले आणि तिसऱ्या विभागात मोठ्या कोंबड्या. हे तीन विभाग मोठ्या शेडमध्ये विभागले आहेत. कोंबड्याच्या प्रकारात अंडी देणाऱ्या कोंबड्यांना लेअर्स आणि मांसासाठी असणाऱ्या कोंबड्याना ब्रायलर म्हणतात. दोन लाख अंडी देणाऱ्या कोंबड्या आणि पाच लाख ब्रॉयलर कोंबड्या त्यावेळी होत्या असे सांगितले .मुले प्रत्येक शेड मध्ये जाऊन माहिती घेत होते. तिथले एक डॉक्टर आमच्या सोबत दिले होते. त्यामुळे आम्हाला सर्व छान माहिती मिळत होती.मुले प्रश्न छान विचारत होती.काही मुलांना त्याचा वास सहन होत नव्हता.ती मुले बाहेर थांबत होती. पाहिल्या पिल्लांच्या विभागात भाताची तुस म्हणजे भाताची टरफले अंथरली होती. त्यात १६००० पिल्ले होती. शेडचा फक्त अर्धा भाग पिल्लांसाठी होता अर्धा भाग रिकामा होता. पूर्व पश्चिम बाजूला शेड बंद होते. पूर्व बाजूस मोठी बारदने अडकवली होती.त्यावर पंपाने पाणी टाकले जात होते. पश्चिम बाजूला पाच मोठे पंखे लावले होते.ते एगझोस्ट फॅन होते. त्याच्यामुळे थंड हवा पुर्ण शेड मध्ये खेळती राहते.यात अजून भरपूर सोई होत्या. तिथे हवेतील बाष्प किती आहे, त्या ठिकाणचे तापमान कीती आहे हे पाहण्यासाठी काही सेन्सर लावले होते.ते सर्व सेन्सर कम्प्युटरला जोडलें होते.मग तापमानातील किंवा बाष्पातील फरकानुसार पंखे चालू बंद व्हायचे . तिथे हॉल मधील मोकळ्या जागेत आठ दहा फूट उंचावर ओळीने स्पिंकलर लावले होते. शेड मधील तापमान व आद्रता याचे मापन सेन्सर करतात त्यामुळे त्यांच्या हवेतील प्रमाणा नुसार पंखे व स्पिंकलर सिस्टम चालू होत असे. ते सुध्दा रीडिंग प्रमाणे आवश्यकतेनुसार कॉम्प्युटर मधून चालू बंद व्हायचे.हा प्रकार कंपनीत पाहताना विशेष वाटत नाही. परंतु एवढा अत्याधुनिक पोल्ट्री प्रकल्प मी पहिल्यांदाच पाहत होतो. मुलांनी मग त्यांच्या खाद्याविषयी विचारले. त्यांनी याची पूर्ण माहिती दिली. त्यांच्या डायेट विषयी चांगली माहिती दिली. त्यांचा माल मोठ मोठ्या फाईव स्टार हॉटेल मध्ये जात असल्याने त्यांना त्यांच्या उत्पादनात म्हणजे अंडी आणि मांस यात कोणते घटक आहेत आणि किती प्रमाणात आहेत हे लेखी द्यावे लागते. त्यामुळे या पक्षांच्या आहाराचे नियोजन त्यानुसार करावे लागते.त्यांच्या आहारात असणारे घटक अतिशय महत्वाचे असतात.प्रत्येक पक्षाची वाढ ज्यात्या प्रमाणात झाली पाहिजे. त्यांना कोणताही आजार होता कामा नये याबाबत सतत जागरूक राहावे लागते. त्यांची खाद्य वितरण व्यवस्था सुध्दा फार महत्त्वाची आहे. कुणाच्या सुध्दा हाताला स्पर्श न होता त्यांना खाद्य पुरवले जाते .लहान पिल्लांची खाण्याची व्यवस्था वेगळी असते .पण थोड्या मोठ्या पिल्लांना मात्र एक ऑटोमॅटिक प्रणाली जोडली आहे. कोंबड्याच्या हॉल मध्ये काही अंतरावर चार पाच इंच व्यासाची प्लास्टिक पाइप टाकली आहे. जमीनी पासून दोन तीन फूट उंचावर आहे त्या प्रत्येक पाईपचे टोक एका बाजूला एका हॉपरला जोडले आहे.त्या पाईप मद्ये एक लांब स्क्रू बसवलेला आहे.हा स्क्रू मोटर्सच्या मदतीने फिरवला जातो .पाईपला काही अंतरावर खालच्या बाजूस होल पाडून त्याच्याखाली एक प्लास्टिकचे भांडे जोडून लावले आहे.हे सर्व एक ऑटोमॅटिक मशीनला जोडले आहे.त्या पाईपच्या होल मधून खाद्य खाली भांड्यात पडते. ठराविक वजनाने ते होल परत बंद होते.ही प्रक्रिया सर्व खाण्याची भांडी भरेपर्यंत चालू रहाते.या प्रणाली मध्ये ठराविक वजन निर्धारित केले आहे ते भांड्यात भरले की आपोपाप खाद्य येण्याचे बंद होते. खाद्याच्या पाईप जवळ एक पाण्याचा पाईप आहे त्यातसुद्धा अशी योजना आहे की पाईप सोबत जोडलेलं भांडे ठराविक प्रमाणात पाणी पुरवते. फक्त कोंबड्यानी चोच मारली तरच त्यात पाणी येते. अतिशय शिस्तबद्ध रचना. खाद्याचा आणि पाण्याचा एकही थेंब वाया न घालवता तयार केलेली संरचना. तिथल्या स्थानिक डॉक्टरांनी खूप चांगली माहिती दिली. काही मुलांनी खाली जे फ्लोरिंग होते ते वेगळे का दिसत आहे याविषयी विचारले.मग त्यांनी सांगितले की हे फ्लोरिंग बऱ्याच प्रक्रिया करून तयार केलेले असते.यात राहणारे पक्षी अतिशय संवेदनशील असतात. त्यांना रोगराई होण्याची फार शक्यता असते त्यामुळे ते शेड मध्ये पिल्ले ठेवण्या अगोदर ती जमीन कॉस्टिक युक्त पाण्याने धुतली जाते. नंतर कोरडी झाल्यावर त्यावरून गॅस कटरच्या पेटत्या आगीने ती जमीन भाजली जाते. यानंतर त्यात पिल्ले किंवा पक्षी ठेवले जातात. रोगराई पसरू नये यासाठी नियोजन केलेले असते. मुलांच्या विविध प्रश्नांना उत्तरे मिळत होती. मध्येच फोटो सेशन चालू होते. अंजलीच्या भाचीचा वेदाचा एक मस्त फोटो पिल्लासोबत काढला होता. काही मुलांना तिथला वास सहन होत नव्हता त्यामुळे ते दूरच राहत होते.तिन्ही दालने पक्षांनी भरलेली होती.रोहन पाटीलने प्रत्येक शेड मध्ये एकूण पक्षाची संख्या किती आहे विचारले. त्यांनी सांगितले १६००० पक्षी एका शेड मध्ये असतात.तीन शेड बघुन झाल्यावर आम्ही पुढच्या विभागात गेलो. तिथे दोन मोठे लोखंडी प्लॅटफॉर्म असलेले पिंजरे होते.त्यात पक्षी दिसत होते.त्यांनी सांगितले एका शेड मध्ये अंडी घालतात त्या कोंबड्या आहेत आणि पलीकडच्या शेड मध्ये फक्त मटण किंवा चिकन साठी लागणाऱ्या कोंबड्या होत्या. मुलांना पिंजरयाखाली पानी दिसले. एकाने विचारले असता त्यांनी सांगितले की पक्षांची विष्टा पाण्यात पडते किंवा पिंजरा पाण्याने स्वच्छ केल्यावर खाली पाणी जमा होते. कोंबडीच्या विष्टेचे खत खूप महाग असते.ते खत युक्त पाणी विकले जाते किंवा तिथल्या शेतीसाठी वापरले जाते. मुलांना एका पिंजऱ्यात अंडी घरंगळत येत एका मोठ्या भांड्यात पडताना दिसत होते. अंडी जमा करण्यास जाण्याची गरज लागत नाही.ही अंडी तिथून पॅकिंग विभागात नेली जातात.

लगतच्या पिंजऱ्यात असणारे पक्षी जे मांस या प्रकारात मोडत होते. त्याबद्दल मुलांनी विचारणा केली. त्यांनी सांगितले कोंबडीच्या प्रत्येक भागाचे वेगवेगळे पॅकिंग करून त्यावर शिक्के मारून मुबई येथील मोठमोठ्या हॉटेल्सना पुरवठा करतात.हे सर्व बघताना काही मुलांना सभोवतालचे वातावरण आणि वास सहन झाला नाही.मला पुरेसे आठवत नाही पण बहुतेक अभिजित जोशी याच्या भाचिने उलटी केली होती.बऱ्याच शाकाहारी मुलांचे मात्र हाल झाले होते.

त्यानंतर आम्ही पॅकिंग भागात आलो. इथे पूणपणे आधुनिक प्रणाली वापरली आहे. पूर्णपणे कॉम्प्युटरवर चालणारी यंत्रणा आहे. इथे अंडी किंवा मांस यावर पॅकिंग करतात. मुलांनी प्रत्येक अंड्यावर मार्किंग कसे होते याचे प्रत्यक्ष कृतिसत्र पाहिले.प्रत्येक अंड्यावर त्याची एक्सपायरी डेट लिहिलेली असते. नंतर अंड्यांचा बॉक्स आपोआप पॅकिंग होतो आणि कोल्ड स्टोअर मध्ये सरकत जातो. त्यांना मुलांनी उत्पादन किती होते यावर तेथील कर्मचाऱ्याने सांगितले एक लाख अंडी तयार होतात असे सांगितले. जवळ जवळ शंभर कामगार कार्यरत होते.

अतिशय चांगला प्रकल्प बघण्यास मिळाला. आशिया खंडात असणाऱ्या सर्व पोलट्री फार्म मधील दोन नंबरचा असणारा प्रकल्प आम्ही पाहून आलो.पण एवढा जवळ प्रकल्प असून सुद्धा अलिबाग मधील कित्येक लोकांना याची माहिती नाही.एक तर एक मराठी माणूस अशा धंद्यात उत्तुंग शिखरावर जाऊन पोहचणे ही फार अभिमान वाटणारी बाब आहे. जवळ जवळ चार तास हा उपक्रम बघत होतो.

दुपारचे एक वाजत आले होते. जेवणाची वेळ झाली होती त्यामुळे झिराडला परत आलो. भोईर यांच्याकडे जेवणाचे नियोजन असल्याने आम्ही निर्धास्त होतो. तिथे शैलेशची गावातील काही माणसे मदतीला होती. दुपारच्या जेवणाची वेळ निघून गेली होती.पण पोल्ट्री फार्म हाऊसवर एवढे गुंग झालो की वेळेचे भान राहिले नाही. स्वतः पोल्ट्रीचे मालक सुद्धा भेटले होते.पण भेटीचे सर्व श्रेय शैलेशला जाते. झिराड शिबीर आयोजित केल्यामुळे हा आपल्या देशातील मोठा प्रकल्प बघता आला.

दुपारचे जेवण झाल्यावर मुलांना शिबिरातील नियोजनानुसार सोलर कुकर तयार करायचे होते. त्यासाठी सर्व साहित्य आणले होते.जुने बुटांचे बॉक्स, जाड कार्ड पेपर, अल्युमिनियम फॉइल, जाड पुठ्ठे, कैची, फेविकॉल, काळा रंग,अल्युमिनियमची भांडी असे बरेच साहित्य जमा केले होते.प्रत्येक ग्रुपने मिळून हे करावयाचे होते. रोहन पाटील बऱ्याच मुलांना मदत करत होता.काही मुलांनी सोलर शेगडी गोल अँटेनाच्या आकाराची बनवली. यात ज्यास्ती ज्यास्त प्रकाश किरणे परावर्तित होतात आणि एका ठिकाणी एकत्र येतात. जिथे किरणे एकत्र येतात तिथे जेवणाचे भांडे अडकवलेले असते.दोन तासात मुलांनी सोलर उपकरणे बनवली. जुन्या बॉक्सेसचा चांगला उपयोग करून मुलांनी काही सोलर कुकर बनवले. काहींनी त्याचे लगेच प्रात्यक्षिक करून पाहिले. भात, डाळ आणि शेंगदाणे त्यात ठेऊन पाहिले. एकाच्या सोलर कुकर मध्ये तासाभरात भात आणि डाळ शिजली होती. भाताची आम्ही चव सुध्दा घेतली.छान लागत होता. सर्वांनी सोलर कुकर सोबत ग्रुप फोटो काढला. या सर्व गोष्टींना पाच कधी वाजले कळाले नाही. त्यादिवशी गावात हनुमान जयंती उत्सव होता. त्याची तयारी गावात चालली होती. पालखी सर्व गावात फिरणार असल्याने सजावट चालू होती. फुलांच्या माळा, हार इत्यादी गोष्टी वापरत होते.


संध्याकाळी थोडे पाणी भरण्याचे काम मुले आणि कार्यकर्ते करत होते. शलेश आणि मी तीसऱ्या दिवशीच्या नियोजनाला गावात गेलो. तिसऱ्या दिवशी कनकेश्वर देवस्थान बघण्यासाठी जायचे होते. मंदिर डोंगरावर आहे. झिराड ते कनकेश्वर पायथा हे अंतर बऱ्यापैकी आहे. शैलेश म्हणाला आपण बैलगाडीची व्यवस्था होते का ते पाहूया.तीन बैलगाड्या लागणार होत्या. गावात शैलेशने ती सोय केली.

संध्याकाळी मुलांनी कॅम्प फायर साठी तयारी सुरू केली. पालखी गावातून नाचत जाणार असल्याने कॅम्प फायर साठी वेळ कमी होता. तरीसुध्दा मुलांनी जोरदार तयारी सुरू केली.तनु , गौरी यांनी नुकतेच एका एकपात्री अभिनय स्पर्धेत भाग घेतला होता.त्यात त्यांनी छान अभिनय केला होता. त्यानुसार त्या दोघी तयारी करत होत्या. वैभव मोहिरे,संजय कुंभार, नुपूर देशमुख, मनाली पवार असे बरेच चांगले अभिनय करणारी मुले ग्रुप मध्ये होती. विक्रांत दरवेळी चांगलं गाणं म्हणायचा प्रयत्न करायचा. साधारण आठ वाजता जेवण तयार झाल्यावर मुलांनी जेऊन घेतले. लगेच आम्ही कॅम्प फायर प्रोग्राम घेतला कारण पालखी सोहळा मुलांना बघायचा होता. मुलांनी फार छान अभिनय, गायन करत कार्यक्रम एन्जॉय केला.रात्री भोईर यांच्या घरासमोर पालखी आली. तिथे त्यांच्या घरातील लोकांनी पूजन केले.मग तिथे जरावेळ पालखी नाचवल्यावर आतमध्ये गावात पालखी गेली. हे सर्व आटोपल्यानंतर जवळ जवळ साडे दहा वाजले होते. दिवसभर बऱ्यापैकी पायपीट झाली होती.चार तास तर उभे राहून पोल्ट्री बघत होतो. सर्वांना कंटाळा आला होता. त्यानंतर मुलींचा ग्रुप शैलेश कडे गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच कनकेश्वर देवस्थान बघण्यासाठी जायचे होते. मुलांना लवकर झोपायला सांगितले.

सकाळी लवकरच पाच वाजता सर्वांना उठवले. सर्वांना लवकरच उरकून घ्यायला सांगितले. बैलगाडी चालकांना सकाळी सात वाजता यायला सांगितले होते. बर्गोले, शैलेश,शैलेशचे वडील असे बरेच जण येणार होते.शैलेश आणि त्याचे गुरव कुटुंब यांच्याकडे देवळाच्या देखभाल करण्याचा मान आहे. देवळाचे पुजारी असणे हा मोठा मान आहे. पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे. चक्रीय पध्दतीने सर्व गुरव कुटुंबात हा मान मिळतो. त्यादरम्यान त्यांना तिथे दररोज पुजाअर्चा करावी लागते. त्यांना तिथे राहण्यासाठी जागा दिलेली आहे. सकाळी नाष्टा झाल्यावर आम्ही देवस्थानाला निघालो. तीनही बैलगाडीत मुले बसली. पाहिल्या गाडीत ओंकार, जोशी, वेदा कदम, सिध्दी गुरव, अंकिता मुसळे, पूजा खराडे, मनाली पवार, दुसऱ्या गाडीत संजय कुंभार, संकेत भोसले,उपणकर बंधू, कोरे बंधू, सुजित थोरात आणि तिसऱ्या गाडीत प्रशांत पाटील, निखील मोरे, विक्रांत मोटे, वैभव मोहीरे, रोहन पाटील, अनिकेत सानप, ओंकार सरदार हे बसले होते.तनु , शिल्पा आणि गौरी यांना अंजली तिच्या कारने घेऊन येणार होती. आम्ही बरेच जण बाईक वर जाणार होतो. आठच्या सुमारास सर्वजण कनकेश्वर कडे निघालो.


अर्ध्या तासाच्या आत आम्ही पायथ्याशी पोहचलो.वर देवस्थान कडे जायला ती चार वाटा आहेत.त्यातील दोन वाटा पायऱ्यांच्या आहेत आणि इतर पायवाटा आहेत. त्यातील एक पायवाट फोपेरी गावाकडून येते तर दुसरी आगरसुरे येथून येते. इतर दोन ठिकाणी पायऱ्या आहेत.तिथे पायथ्या पासून ते वरपर्यंत पायऱ्या आहेत. झीराड व बहिरोळी मापगाव या दोन गावाच्या बाजूने जाताना पायऱ्या लागतात. बहिरोली- मापगाव कडून जाताना बऱ्याच पायऱ्या चांगल्या स्थितीत आहेत. जुन्या पायऱ्या जांभ्या दगडाच्या आहेत. सुरवातीच्या पायऱ्या मात्र काळ्या दगडाच्या आहेत.ही वाट छान वळणावळणाची आहे. एका बाजुला अथांग समुद्र दिसतो. दुसऱ्या बाजूला डोंगर रांगा दिसतात. समोरच आरसीएफ कंपनीचा परिसर दिसतो . पायऱ्या अतिशय लांबरुंद आहेत त्यामुळे एकावेळी सहज दहा वीस जण सहज जाऊ शकतात.पण झीराडकडची वाट मात्र त्यामानाने छोटी आहे. बऱ्यापैकी जंगल दिसते. आम्ही पायथ्याशी पोहचल्यावर सर्वजण येईपर्यंत थांबलो.मग बर्गोले, शैलेश आणि मी प्रत्येक जण मुलांचे ग्रुप छोटे ग्रुप करून डोंगर चढायला सुरुवात केली. मुलांचा स्पीड आणि उत्साह हा खूप असल्याने ते पटापट पायऱ्या चढून जात होते. मध्येच त्यांना थांबवून एखाद दुसरा ग्रुप फोटो काढत थोडीफार माहिती देत चाललो होतो. पायऱ्या चढताना एक जाणवले की दोन्ही बाजूला खूप झाडी आहे पण खूप वेली दिसल्या. वेलींचा आकार खूप मोठा होता.अजगरासारख्या या वेली जिकडे तिकडे पसरलेल्या दिसत होत्या.ज्या झाडांचा त्यांनी आधार घेत स्वतः ची वाढ करून घेतली ती झाडे मात्र बारीक झाल्यासारखी वाटत होती. खरंतर वेलींचेच जंगल दिसत होते. काही दिवसांनी मात्र या जंगलात मूळची झाडे राहणार नाहीत फक्त वेलीच राहतील. जसजसे उंच जात होतो तसतसे मागील बाजूस समुद्र अगदी नजरेसमोर दिसत होता. पश्चिमेकडे उजव्या बाजुला मुंबईच्या इमारती डोकावत होत्या.काही वेळा इंडियन नेवीची विमाने घिरट्या घालताना दिसत होती. किनारपटटीवरील असलेल्या नारळी पोफळीच्या झाडांमुळे गावे मात्र दिसत नव्हती. अंदाजे बीचच्या रचने नुसार किहीम, सासवने ओळखून येत होते. लांबून काही ठिकाणी समुद्र आत आल्यासारखा कुठे थोडे दूर गेल्यासारखा वाटत होता. दूरवर खांदेरी ,उंदेरी समुद्री किल्ले दिसत होते.इतिहासातील दर्यावरील मराठा आरमाराच्या साम्राज्याचे ते साक्षी आहेत. सरखेल कान्होजी आंग्रे यांनी त्याकाळात अंदमान निकोबार बेटांवर भगवा फडकवला होता आणि ज्यामुळे तो भूभाग भारताच्या ताब्यात आहे. अशी अभिमानास्पद गोष्ट या भागात घडली .या भागात राहून कान्होजी आंग्रे यांनी इतिहास रचला. यथा राजा तथा प्रजा ही म्हण एका व्यक्तीला परफेक्ट लागू होते.ती म्हणजे शिवाजी महाराज. या व्यक्तिमत्त्वांचे पैलु मोजू शकत नाही एवढे आहेत.या माणसाने जन्म घेतला शिवनेरीवर आणि बरेचशे आयुष्य मावळ खोऱ्यात घालवले या व्यक्तीला समुद्राचे महत्व माहीत असणे , त्यासाठी किल्ले बांधणे, आरमार उभे करणे या सर्व गोष्टी स्वप्नवत वाटतात.पण महाराजांची खरी शक्ती ही त्यांची जिवाभावाची माणसे हीच होती. कुठलेही चांगले काम हातात घेतले तर जोडीला चांगली माणसे असतील तरच काम परिपूर्ण होऊ शकते. म्हणून आमची मुक्तांगण ग्रुपची मुले नेहमी एक गाणं म्हणतात

क्षितिज नवे रे क्षितिज नवे

क्षितिज नवे मज सतत बोलवी

साथीला सन्मित्र हवे….

आमच्या रविवारच्या उपक्रमात नेहमी काही चांगली गाणी म्हणायचा प्रयत्न करतो. ज्यातून काही प्रेरणा मिळू शकेल अशी गाणी निवडतो. शिबिराच्या निमित्ताने ही गाणी आवर्जून गायली जातात.


तासाभरात मुलांनी कनकेश्वर गाठले होते. वर गेल्यावर मुलांना माकडांपासून सावध राहायला सांगितले. हातात खाण्याची वस्तू ठेऊ नका असे सांगितले. मंदिरासमोर हात पाय धुण्याची सोय केलेली आहे. मंदिराच्या मागील बाजूस एक सुंदर अवाढव्य आकाराची पुष्करणी आहे. पूर्ण जांभा दगड त्यात दिसतो. मधोमध एक मोठी लाकडाची उभी कांभ आहे. दक्षिण उत्तर बाजूस पुष्करणीत उतरण्यास पायऱ्या आहेत. संपूर्ण पुष्करणीला काठावर मोठी त्याच आकाराची भिंत आहे. पुष्करणी देवळाच्या गाभाऱ्याच्या बरोब्बर मागील बाजूस आहे. आकार आष्टकोनी आहे. बांधकाम अतिशय सुंदर आहे. हल्ली आपण काही ठिकाणी विहिरी पाहतो त्यात आजूबाजूला माती असेल तर सिमेंटचे गोलाकार कडी टाकतात.त्या कड्यामुळे माती विहिरीत जात नाही.या पुष्करणी मध्ये तळापासून काठापर्यंत गोलाकार कडी कोरली आहेत. प्रत्येक कड्यानंतर पाचसहा फूट खोल गेल्यावर परत पुढे पाचसहा फूट सपाटी असे काठा पासून तळा पर्यन्त कोरले आहे. सपाट जागेवर पायऱ्या कोरल्या आहेत. त्याचा आकार हल्ली बाजारात अल्युमिनियमच्या शिड्या मिळतात त्यांना दोन्ही बाजूने चढता उतरता येते आणि मधोमध सपाट प्लॅटफॉर्म असतो त्यावर आपण उभे राहून काम करू शकतो अगदी तशाच प्रकारचे उतरते जिने पुष्करणी मध्ये दिसतात. आठव्या शतकात याचे बांधकाम झाले असे म्हणतात .कनकेश्वर मंदिर जवळ जवळ ५४ फूट उंच आहे.यादव घराण्यातील रामदेवराय या राजाने ते बांधले आहे. याला कर्नाटकी मंदिरांची शैली वापरली आहे. याला होयशाली पद्धत म्हणतात. काहीजण याला हेमाडपंथी बांधकाम आहे असेही म्हणतात.मंदिर जर आपण नीट पाहिले तर प्रत्येक दिशेला काही मूर्ती दिवळी मध्ये बसवलेल्या दिसतात. काही मूर्ती धनुर्धारी आहेत तर काही घोड्यावर स्वार असलेल्या आहेत. जमिनी पासून वर बारा फुटापर्यंत काळा पाषाण दगड दिसतो.त्या दगडात मंदिराचे बांधकाम दिसते. खालच्या बाजूला एका काळ्या खडकात पाया कोरलेला दिसतो. त्यावर कोरीव काम केलेले दिसते. दगड घडवत पायाचे बांधकाम केलेले दिसते.या डोंगरावर मात्र बऱ्याच ठिकाणी जांभा दगड दिसतो. अगदी बाजुला अख्खी पुष्करणी जांभ्या दगडात कोरलेली आहे. गाभारा किंवा गर्भगृह याचे बांधकाम पूर्णपणे काळ्या दगडात.मंदिर जरा नीट पाहिले तर यावर बहुतेक आक्रमणे झाली नसावीत. बऱ्यापैकी जंगलात असणारी वास्तू असल्याने कुणाची नजर गेली नसावी. कळसाचे बांधकाम मात्र विटा, चुना आणि मातीत केल्याचे दिसते. कळस फार रेखीव आहे. चारही भिंती ज्या ठिकाणी संपतात किंवा जिथून कळसाचे बांधकाम सुरू होते थितून जगन्नाथ पुरी सारख्या मंदिरतील कळसाप्रमाने रचना सुरू होते. पाहिल्या गोलाकार भागात जोडून जोडून असलेल्या कळसाच्या प्रतिकृती दिसतात. त्याच्यावर परत हुबेहूब तशाच प्रतिकृती परंतु आकाराने कमी.प्रत्येक वर्तुळाकार भागात व्यास कमी होत जातो आणि प्रतिकृतीची संख्या कमी होत जाते. सगळ्यात शेवटी झेंडा येतो.पण हेच जर आपण आतून पाहिले तर बरोब्बर गोलाकार असतो. झेंड्याच्या बरोबर खाली सरळ रेषेत शिवलिंग असते. थितून जर आपण पाणी सोडले तर मूर्तीला अभिषेक होऊ शकतो. खालून आपण जर नीट मंदिर पाहिले तर खाली काळा दगड वरच्या बाजूस रंगरंगोटी केलेली वास्तू.असे थोडे विजोड कॉम्बिनेशन दिसते. मंदिरावर बरीच शिल्पे कोरलेली आहेत,मूर्ती आहेत. कळसाच्या भागावर एक माणूस वर चढताना दिसतो, त्याच्या पायात दगडी वाळा दिसतो.तो गोल फिरतो सुध्दा. मागील बाजूस पुष्करणी कडे गोमुख दिसते. वर एका बाजूस गौतम बुद्ध दिसतात तशीच अगदी सं मुर्ती पाय दुमडून मांडी घालून बसलेली दिसते. झीराड कडून येणाऱ्या पायऱ्यांच्या रस्त्या समोर मंदिराचे प्रवेशद्वार आहे.तिथे दरवाजाच्या दोन्ही बाजूला मूर्ती दिसतात.पण त्या हल्लीच्या काळात बसवलेल्या वाटतात. सभा मंडप बऱ्यापैकी मोठा आहे.हा सभा मंडप १९५६ साली बांधला अशी माहिती विश्वनाथ गुरव यांनी दिली. ठाण्याच्या कोपिनेश्र्वर मंदिर सारखा आहे. गाभारा प्रवेशद्वार अगदी ठाण्यातील मंदिरा प्रमाणे आहे. शंकराच्या प्रसिद्ध मंदिराप्रमानेच इथेही पिंड आठ दहा फूट खाली आहे. आपण अगदी अंबरनाथचे शिवमंदिर किंवा भीमाशंकर शिवमंदिर या दोन्ही मंदिरात आलो आहोत असे वाटते.गाभारा प्रवेशद्वार काळ्या दगडातील खांबात आहे.या खांबावर विविध मूर्ती कोरल्या आहेत. वरच्या खांबावर गणपतीची छोटी मूर्ती दिसते.यातून वाकून जावे लागते. खाली जाताना काळ्या दगडाच्या मोठ्या पायऱ्या लागतात. आत गेल्यावर अगदी गूढ वातावरणात आल्यासारखे वाटते. पिंडीच्या वरच्या भागात बांधकाम अर्ध गोलाकार वाटते. कमळ फुल अगदी पिंडीच्यावर छताचा जो अर्धगोल आहे त्याच्या मधोमध टोकावर कोरलेले आहे. या मंदिरात पुजारी म्हणून गुरव कुटुंबीय काम करतात. त्यांचा तो मान आहे. शेलेशने मुलांना मंदिर आणि परिसर याबद्दल माहिती दिली. तिथे असलेली विशिष्ट प्रकारची मयुरपंखी समई त्याने दाखवली. त्याच्यामध्ये तेल कोणत्या भागात साठवले जाते, वात कशी लावतात,तेल वातीकडे कसे चढते अशा बऱ्याच गोष्टी त्याने सांगितल्या.

तिथे आसपास बऱ्याच भागात काही समाध्या दिसतात.या भागात किंवा मंदिर परिसरात बरेच लोक जे संन्यास घेऊन यायचे ते आसपास राहत असावेत. त्याच्या खाणाखुणा दिसतात.मापगाव वरून येताना दोन समाध्या सुरवातीलाच लागतात. त्यांची नावे सुध्दा मोहनगिरी व बालगिरी होती असे म्हणतात. गोसावी समाजात गिरी गोसावी नावाचा एक प्रकार आहे तो कदाचीत डोंगरावरील देवस्थानाला राहणारे त्यांच्या समाजातील लोकांबाबत असावा.
कनकेश्वर देवस्थान या नावात सोने आहे. त्यामुळे याला तसे नाव का पडले असावे याबद्दल वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. या जंगलात कनक नावाचा एक कंद मिळतो. हा चवीने थोडासा बटाटा कंदा सारखा पण आकार रताळे फळभाजी सारखा असतो. त्याच्या निगडित नाव असू शकते. सोन्याचा डोंगर असेही असू शकते. शैलेशच्या बाबांनी मुलांना एकत्र बसवून त्या देवस्थानचा परिसर , इतिहास , त्या संबधित काही पौराणिक कथा सांगितल्या. त्यांचा जन्म तिथलाच असल्याने त्यांच्या इतकी सखोल माहिती दुसरे कोणी नक्कीच सांगू शकले नसते.

आसपास आपण फिरलो तर आजही काही झोपडी बांधून लोक तिथे राहताना दिसतात.एक दोघांना जाऊन आम्ही भेटलो होतो.त्यात आमच्या परिचित असलेल्या एका व्यक्तीचे वडील तिथे सन्यस्थ झाले होते. मंदिरातील परिसर अतिशय शांत आहे . अगदी मंदिराजवळ जाई पर्यन्त परिसर दिसत नाही. आजूबाजूला काही लोकांनी छोटी मंदिरे बांधली आहेत. गणपतीचे मंदिर तिथे आहे.पुष्करणी पासून थोडे पुढे गेल्यानंतर परत पायऱ्या लागतात. त्या मापगावच्या दिशेने वाट जाते तिकडे जातात.त्या वाटेवर हनुमान मंदिर, विष्णु मंदिर, शंकर मंदिर लागतात.तिथे गायमुख पण लागते.त्यातून पाणी पडत असते. हनुमान मंदिर परिसरात एक तळे आहे. त्याला ब्रह्मकुंड म्हणतात.अतिशय नितळ आणि स्वच्छ पाणी असते .वरून तळाची बाजू स्पष्ट दिसते. पावसाळ्यात या कुंडात पोहणे म्हणजे एक अवर्णनीय अनुभव. त्यावेळी कुंड भरून वाहत असते.वरून उड्या मारता येतात. कुंडाच्या थोडे पुढे गेल्यावर गायमुख, देवाची पायरी, जांभळीची पायरी हे भाग लागतात. आणि मग अगदी नागमोडी आकरात पायऱ्यांची उतरण लागते.समोर रामधरणेश्र्वर, सागरगड हे डोंगर दिसतात.

कनकेश्वर परिसर पाहताना तास दोन तास कसे निघून जातात कळत नाही. मंदिराच्या पलीकडे रेवस बाजूस आपण अर्धा किलोमीटर चालत गेल्यास एक कुंड लागते. तिथे सुध्दा गोमुख आहे.त्यातून पाणी पडत असते.ते पाणी पिण्यायोग्य असते. तिथून पुढे गेल्यावर मुंबई येथील टोलेजंग इमारती दिसतात. वातावरण धुरकट असल्यास स्पष्ट दिसत नाही.या गोमुखच्या बाजूने खाली जायला एक पायवाट आहे. मात्र ओढ्याच्या मार्गाने जावे लागते.ही वाट सारळ गावाकडे मिळते. पाण्याच्या बऱ्याच जागा इथे शोधलेल्या दिसतात.मंदिर परिसर सोडून थोडा उंच अजून डोंगर आहे. समुद्रसपाटी पासून डोंगर १३५०फूट उंच असावा. मात्र मापगाव मार्गे ही चढण ५००० फूट होईल आणि जवळ जवळ ७५० पायऱ्या आहेत. पेशव्यांचा काळात पायऱ्या बांधल्या असे म्हणतात. पण या देवस्थानाला लोकाश्रय आणि राजाश्रय दोन्ही असावा. बऱ्याच ठिकाणी मात्र अशी ठिकाणे बऱ्याच अपरिचित लोकांनी लाटलेली दिसतात. उलट सुलट गोष्टी करून त्या आपल्या अधिपत्याखाली आणतात. स्थानिक समाज बऱ्याचदा आपल्या बदलत्या परिस्थितीशी झगडत असताना स्वतःचे स्वामित्व गमावून बसतो.आणि आपोआप इतिहासाची पाने बदलली जातात, पुसली जातात.ही गोष्ट आताच्या जमान्यात होऊ शकते तर पूर्वी अशा असंख्य गोष्टी घडून गेल्या असतील.

जुलै ऑगस्ट महिन्यात हा भाग पूर्णपणे धुक्याची चादर ओढून बसलेला असतो.वरून पाऊसाची रिपरिप सुरूच असते. आपण सात आठशे पायऱ्या कधी चढून जातो कळत नाही आणि तरीसुध्दा थकवा जाणवत नाही.मुंबईकरांचे हे आवडते ठिकाण आहे.

कनकेश्वर परिसर बघताना माहिती देणारी आणि माहिती घेणारी माणसे ही जर एकमेकांच्या तारा जुळणारी असतील तर मजा असते. देणारा भरभरून देत असतो आणि घेणारा मनसोक्त त्याचा आनंद लुटत असतो. आमच्या मुक्तांगण ग्रुपचे हे वैशिष्ट आहे की ती सर्व मुले याला संधी म्हणून पाहतात.सर्व परिसर पाहून झाल्यावर आम्ही एका ठिकाणी बसून नाष्टा केला.मुलांनी आपल्या डायरी मध्ये काही गोष्टी लिहून काढल्या.मग आम्ही खाली उतरण्यासाठी सुरवात केली. अंदाजे गाडीवान लोकांना सांगून ठेवले होते की पायथ्याशी ठराविक वेळेत येऊन वाट बघा. उतरताना मात्र मुलांनी खूप वेग घेतला.आम्ही सर्व जण खाली पोहचण्याच्या अगोदर अर्धा तास ते पोहचले होते. येताना शैलेशचे बाबा, शैलेश, बर्गोले यांनी बरेच ग्रुप फोटो काढले. त्या गावातील एका मुलासोबत झाडावर बसून आणि उतरल्यावर सर्व मुलांना एकत्र उभे करून एक छान फोटो काढला. कनकेश्वर ट्रेक अशा रीतीने मस्त पार पडला. बैलगाड्या तयारच होत्या.मुले गाडीत बसली. दुपारपर्यंत आम्ही झिराडला पोहचलो.

भोईर कुटुंबीयांनी तीन दिवस आमच्यासाठी खूप मेहनत घेतली.अगदी घरच्यासारखे मुलांना वागवले. घराबाहेर असणाऱ्या अंगणात मुलांनी तीन दिवस धमाल केली. मुलींचा व्यवस्था शैलेश कडे असल्याने आणि अंजलीने तिन्ही दिवस वेळ दिल्याने उपक्रम चांगले राबवता आले. अंजली, बरगोले , शैलेश आणि मी आम्ही मिळून भोईर कुटुंबीय, गाडीवान या सर्वांना किती पैसे द्यायचे ते ठरवले. त्यांनाही विचारले पण तुमच्या इच्छेनुसार द्या असे ते सर्वच जण म्हणाले.मग शैलेशने थोडी इकडे तिकडे विचारपूस करून त्यांना योग्य ते पैसे ठरवले. सर्वांना पैसे दिले.तसे अगदीच व्यावहारिकपणे पाहिले तर आम्ही ठरवलेले पैसे तसे कमीच होते. परंतु आमचा एकंदरीत हेतू आणि जमेल तेवढे केलेले सहकार्य यामुळे आम्ही दिलेल्या रकमेवर ते सर्वजण खुश होते.

शिबिरामध्ये वेळेवर जेवण आणि नाष्टा ते सुध्दा घरगुती पद्धतीने हे तेवढे सोपे काम नाही आणि जवळ जवळ चाळीस लोकांचा स्वयंपाक करायचा होता. एकंदरीत शिबिरातील सर्व उपक्रम खूप चांगल्या पद्धतीने पार पडले.

मुलांना सर्व बॅगा व्यवस्थित भरून आवरून ठेवायला सांगितले. कुणाच्या काही वस्तू राहिल्या आहेत काय याची खात्री करून घेतली.मग सर्वजण शैलेशकडे गेलो तिथे त्याच्या घरी सर्वांना भेटून स्टॉप वर आलो. संध्याकाळी सहाची बस अलिबाग स्टँड वर मिळणार होती. त्यानुसार आम्ही झीराड वरून निघालो. रेवस- अलिबाग गाडी मिळाली. साडेपाच वाजता अलिबागला पोहचलो. अर्धा तास स्टँडवर थांबल्यावर नागोठणे गाडी लागली. विशेष गर्दी नव्हती. पण आम्ही पंचवीस जण होतो त्यामुळे आमचीच गर्दी वाटत होती. अंजली सोबत काही जण कार मधून गेले.ही बस पोयनाड मार्गे नागोठणे येथे जाते. तेंव्हा ही गाडी या मार्गावरची शेवटची गाडी असल्याने नंतर थोडी गर्दी झाली. रात्री आठ वाजता टाऊनशिप गेटवर उतरलो. बराच अंधार पडला होता. काही पालक मुलांना घ्यायला आले होते.ती मुले त्यांच्या सोबत गेल्यावर माझ्या सोबत काही मुले उरली होती. त्यावेळी मी कॉलनीत अे टाइप रहात होतो. उरलेले आम्ही सर्वजण मग चालत कॉलनीत गेलो. असे एक छान शिबीर पार पडले.
13 views0 comments

Recent Posts

See All
bottom of page