top of page

Umberwadi Camp 2002...

Updated: Dec 26, 2022


२००२ साली मुक्तांगण ग्रुपचे उपक्रम अंकुर नर्सरी हॉल मध्ये होत असत. आमच्या एक कार्यकर्त्या अलका चौधरी नर्सरी समोरच राहायच्या. त्यांच्या बोलण्यात नागोठणे येथे राहत असलेले चित्रे यांचा विषय आला. त्यांना वनऔषधींचे ज्ञान खूप आहे असे त्या म्हणाल्या. लष्करातून रिटायर झालेले आहेत असे समजले. त्यांना एकदा रविवारच्या उपक्रमात सहभागी करून घेऊया असे त्यांनी सुचवले.मग मी त्यांना भेटायला गेलो. नागोठणे येथील रायगड बाझार समोरील बाजूस त्यांचे घर आहे. घरी गेल्यावर बरीचशी चर्चा झाली. त्यांची मुलगी सुद्धा होती.बोलण्यात आले की ती माझ्या भाचीच्या वर्गात शिकत आहे.मग त्यांना मी रविवारी कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. त्यांची थोडी माहिती घेतली.ते कर्नल या पदावर निवृत्त झाले होते.

रविवारी दुपारी तीन वाजता मुक्तांगण ग्रुपचे उपक्रम असतात. त्यामुळे चित्रे अडीच वाजता गेट वर आले. त्यांना घेऊन मी अंकुर नर्सरी हॉल मध्ये आलो. तोपर्यंत सुखदेव बर्गोले, मेघा पांडे, श्री. व सौ. चौधरी असे आमचे कार्यकर्ते अगोदर अंकुर नर्सरी हॉल मध्ये पोहचले होते. मुलेही जमा होत होती. मुलांनी नेहमीप्रमाणे हॉलची साफसफाई करून सर्वजण गोलात बसले . आल्यावर नेहमीप्रमाणे मुलांनी दोन तीन गाणी गायली. त्यातील मर्द आम्ही मराठे खरे..हे गाणे चित्रे यांना फार आवडले. त्यांनी या गाण्यात विशेष असे काय आहे ते विचारले.हे गाणे खरेतर अभिजीतने लिहून दिले होते. त्याची चाल सांगितली होती. नंतर आम्ही प्रत्येक उपक्रमात हे गाणे गात असू. त्याविषयी इतर माहिती नव्हती.

चित्रे यांनी सांगितले की हे मराठा रेजिमेंटचे गीत आहे.हे गीत तिथे गायले जाते. आणि योगायोग असा की चित्रे स्वतः त्याच रेजिमेंट मध्ये होते. आम्ही नकळत ते गायलो पण त्यांना फार बरे वाटले. मग त्यांनी १९६५ आणि १९७१ या दोन्ही युद्धातील काही प्रसंग शेअर केले. युद्धाच्या गोष्टी ऐकायला खूप बऱ्या वाटतात. त्यांनी बर्मा ब्रीज ची गोष्ट सांगितली. आपल्या जवानांनी रस्सीचा ब्रीज बांधून नदी कशी पार केली. खेमकरण लढाई बद्दल सांगितले. मुलांनीही बरेच प्रश्न विचारले. त्यावेळी तन्वी सावंत, तेजा गोसावी, स्वाती गुरव, सुमित गायकवाड, स्वप्नील, रोहित कांबळे, स्वप्नील चौधरी, वैभव , हर्षदा, दिक्षा सूरावकर , पद्मसिंह चव्हान, विश्वजित शिंदे, अशी बरीच मुले उपस्थित होती. बर्गोले यांनी चित्रे यांचे आभार मानले. त्यांना एक पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. मुले गेल्यानंतर सर्वांनी चर्चा केली. त्यांनी शिबिरासाठी एक जागा सुचवली. उंबरवाडी गाव…वाकन पासून समोर जो डोंगर दिसतो त्या डोंगरावर तीन गावे आहेत. उंबरवाडी, नंबरवाडी आणि धनगरवाडी. वनऔषधीने समृध्द असलेली गावे असे चित्रे यांनी सांगितले. त्यांना एक दिवस काढून वर जाऊन येवूया असे सांगितले.

एक दिवस पाच वाजता मी आणि अभिजित दोघे चित्रे यांच्याकडे गेलो. शिबिरात काय घेता येईल आणि लोकेशन बघायला कधी जाता येईल याबद्दल विचारले. त्यांनी थोडीफार गावाबद्दल माहिती दिली आणि सांगितले संध्याकाळी गेलो तर गावातील लोकांना भेटून चर्चा करता येईल. मग ते म्हणाले आताच जाऊया. येताना रात्र होईल असे आम्हाला वाटले त्यांना तसे सांगितले.पण ते म्हणाले ते बऱ्याच वेळा रात्री येतात. मग आम्ही सुद्धा लगेच तयार झालो .त्यांनी सोबत एक टॉर्च घेतला.मग आम्ही बाईकवर निघालो.त्यांना डोंगरावर जायला एक शॉर्ट कट ठाऊक होता. वाकन आणि राबगाव यांच्या मध्ये एक दगडाची खाण आहे. तिथपर्यंत गाडी जाते. तिथून चालत उंबरवाडी गावात जायला अर्धा तास लागतो. साडेपाच वाजता आम्ही खाणीपाशी पोहचलो. तिथून अर्ध्या तासात वर गावात गेलो. तिथे हंबिर आडनावाचा व्यक्ती भेटला. त्याने गाव दाखवले. परिसर आम्हाला खूपच आवडला. साडेसहा वाजून गेले होते. थोड्या वेळाने अंधार पडेल म्हणून आम्ही लगेच उतरायला सुरुवात केली. खाली लवकरच पोहचलो.मग चित्रे यांना घरी सोडून आम्ही कॉलनीत परत आलो.

रविवारच्या उपक्रमात शिबिराविषयी चर्चा झाली.या शिबिरात फक्त मुलेच सहभागी होऊ शकतात असे सांगितल्यावर मुलींचा ग्रुप नाराज झाला. राहण्याची चांगली सोय नव्हती. पाणी एक किलोमीटर लांब असलेल्या हात पंपाने पाणी आणावे लागते, नाहीतर दोन किलोमीटर अंतरावर एक गावाची विहीर आहे तिथून पाणी आणतात.मग मुलांना नावे द्यायला सांगितले. पंचवीस नावे आली. त्यात स्वप्नील चौधरी, सुजित सातपुते अशी मोठ्या गटातील मुले येणार होती. लहान गटात विक्रांत मोटे, सुयोग अबनावे, कौशिक नाईक, निखील निंबाळकर,सूदनेश रणवरे, सुशील सातपुते, वैभव सुरावकर, निखलेश सुरावकर, हर्षद सुरावकर, प्रशांत पाटील, भावेश भेंडाले, आशुतोष चौधरी, वाघमारे, तन्मय ठाकूर, सुमित गायकवाड, स्वप्नील गायकवाड,नयन महाजन, अक्षय पोटे, विश्वजित शिंदे, दिनेश सावळे, स्वप्नील बर्गोले, चंकी नांगरे अशी बरीच नावे आली होती. कार्यकर्त्ये म्हणून अभिजित जोशी, संजय गोळे, मेघा पांडे, राजेंद्र पांडे, श्री. व सौ. उपनकर, श्री. व सौ. धजेकर, आर. बी.ठाकूर, बर्गोले, बानाईत सर सहभागी होणार होते. कँपचा मुख्य विषय ठरवला होता लहान मुलांचे आरोग्य आणि लसीकरण. त्या दरम्यान आदिवासी गावामध्ये लहान मुलांचे लसीकरण यावर जागरूकता कमी होती. महाराष्ट्रात बऱ्याच दुर्गम भागात बालमृत्यू प्रमाण बरेच होते. शिक्षणाचा अभाव, रस्ते नाही, वीज नाही, पाणी नाही अशा परिस्थतीमध्ये त्यांचे जीवन निसर्गावर अवलंबून असे. शाळेत जायचे म्हणजे दररोज कमीतकमी दहा किलोमीटर पायपीट करावी लागायची. आदिवासी निवासी शाळा आसपास असल्या तरी त्यांचीही दुरवस्था असे. त्या अनुषंगाने एखादा उपक्रम घेऊया असे ठरले.मी आठ दहा मुलांना घेऊन नागोठणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेलो. तिथल्या स्थानिक डॉक्टरांना आमचा उपक्रम सांगितला. वेगवेगळ्या साथीचे आजार ,लहान मुलांचे लसीकरण यावर बरीच माहिती तिथून जमा केली. काही पोस्टर्स तिथून घेतले. मुलांनी लसीकरण चार्ट त्यांच्याकडून घेतला. कॉलनीत असलेल्या हॉस्पिटल मध्ये एका ग्रुपला घेऊन गेलो. तिथे रंजन डॉक्टरांना भेटलो त्यांना आमच्या कॅम्प विषयी माहिती दिली. त्यांना रविवारच्या उपक्रमात यायला सांगितले. रविवारी त्यांची मुलांनी मुलाखत घेतली. त्यांनी लहान मुलांचे आरोग्य या विषयावर छान माहिती दिली. त्यांनी आदिवासी भागात मिळणाऱ्या वेगवेगळ्या वनस्पती आणि तिथे होणाऱ्या पिकाविषयी माहिती दिली. त्यांनी तिथलेच मिळणारे पदार्थ घेऊन चांगले आरोग्य कसे राखता येईल याविषयी चार्ट बनवा असे सुचवले. मुलांनी मुलाखत छान एन्जॉय केली.ही सर्व कॅम्पची पूर्वतयारी सुरू होती. मुलांना शिबिराला लागणाऱ्या सर्व वस्तूंची यादी दिली. टॉर्च, बॉटल, कॅप,ताट , ग्लास ,वाटी, चादर, कानटोपी अशा बऱ्याच वस्तू सांगितल्या होत्या.

शिबिराच्या दिवशी सकाळी सात वाजता शॉपिंग सेंटर बस स्टॉपवर जमा झालो. सातच्या नागोठणे मार्केटिंग बस मधून स्टँड वर गेलो. उंबरवाडी गावात त्यावेळी वीज पुरवठा नव्हता. गावात दुकान सुध्दा नव्हते. त्यामुळे सर्व किराणा सामान आदल्या दिवशी आणून ठेवले होते. मटार, कांदे,पोहे, बटाटे, तेल, मसाले, लोणचे, पापड, तांदूळ, फरसाण, ड्रॉइंग साहित्य, काथ्या, चुरमुरे , मेणबत्ती बॉक्स, टॉर्च, मेडिकल कीट असे बरेच साहित्य घेऊन ठेवले होते. माझी सॅक पूर्ण भरली होती. प्रत्येकाला अंथरून पांघरुन घ्यायला सांगितले होते. दोन मुलांना शेअरिंग करायला सांगितले होते. बॅग जड होऊ नये म्हणून बरेच साहित्य त्यांना कॉमन घ्यायला सांगितले होते. तिन्ही दिवस जेवण आम्हाला करायचे होते त्यामुळे तशी तयारी केली होती. पाहिल्या दिवसाचा दुपारच्या जेवणाचा डब्बा मात्र सर्वांनी घेतला होता. मुलांना सुका खाऊ आणायला सांगितला होता. मुले शक्यतो चिवडा, फरसाण, बिस्कीट असे पदार्थ आणायचे. काही मुले क्रीम बिस्कीट घेऊन यायचे. आम्ही शक्यतो सोबत फरसाण , लाह्या ठेवायचो.

नागोठणे स्टँडवर साडेसात वाजता पाली गाडी मिळाली. राबगावच्या अलीकडे दगडाच्या खाणी जवळ उतरलो. तिथून आमची रपेट सुरू झाली.सकाळचे वातावरण असल्याने डोंगर चढ ज्यास्त जाणवत नव्हता. मध्ये काही ठिकाणी रत्नाकर ठाकूरने फोटो काढले.हा व्यक्ती राहतो पोयनाडला पण शिबिराला हजेरी नेहमी असायची.स्वतः उत्तम फोटोग्राफर, ट्रेकर असल्याने आमची शिबिरात अर्धी काळजी मिटायची. त्याचा मुलगा सुद्धा सोबत असायचा. कॅम्पचे जुने फोटो बघताना कुठंही कंटाळा येत नाही याचे मुख्य कारण म्हणजे रत्नाकर ठाकूर.

अर्ध्या तासात उंबरवाडी गावात पोहचलो. जेमतेम तीस चाळीस घरांचे हे गाव.पण कमालीचे स्वच्छ. कुठेही कचरा नाही की वाहते गटार नाही. समोरासमोर असलेल्या घरांच्या दोन रांगा. मध्ये साधारण पन्नास साठ फुटाचे अंतर. दोन्ही रांगाच्या मधोमध एक मोठा हॉल म्हणजे कौलारू छप्पर असलेला. लोकांना बसण्यासाठी किंवा कार्यक्रमासाठी तयार केलेला हॉल. आम्ही तिथेच राहणार होतो. गावातील काही माणसांनी लगेच मदत केली. बरीच माणसे बोलायला थोडे बुजत होती. काही भांडी जमा केली. मुलांना दोन वॉटर बॉटल प्रत्येकी आणायला सांगितल्या होत्या.


दहा वाजून गेले होते. गावात काही गोष्टी उपलब्ध होतात का पाहिले. तांदळाचे पीठ गावात असेल असे गृहीत धरले होते. परंतु तसे झाले नाही.मग त्यांना विचारले उद्या मिळेल काय. त्यांनी सांगितले खाली जाऊन गिरणी मधून दळून आणू.त्या दिवशी रात्री फक्त भात भाजी सर्वांना खावी लागेल हे निश्चित झाले . मुलांना बॅगा व्यवस्थित थोड्या थोड्या अंतरावर पण मधोमध ठेवायला सांगितल्या. आजूबाजूला जंगल असल्याने भिंतीला लागून बॅगा ठेवणे जरा धोकादायक होते. गावात लाईट नसल्याने काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक होते.

वर येईपर्यत मुलांनी पाणी प्यायला सुरवात केली होती त्यामुळे मुलांच्या पाण्याच्या बॉटल संपत आल्या होत्या. पाण्याची अगोदर चौकशी करून ठेवली होती. गावातील लोकांनी त्यांची सामाईक भांडी आणून दिली. त्यात जेवणाचे टोप, हंडे अशी बरीच भांडी होती. सर्व भांडी हॉल मध्ये आणून ठेवली.त्यातील हंडे आणि टाकी पाण्यासाठी बाजूला काढून ठेवले. पाणी भरून ठेवणे गरजेचे होते .मग मुलांचे चार गट पाडले.प्रत्येक गटाला जेवण करणे, साफसफाई , भांडी धुणे, मुलाखती घेणे, नाष्टा करणे अशा बऱ्याच कामासाठी वेळा निश्चित केल्या. त्यातील एका गटाला पाणी भरण्यास सांगितले.एक कार्यकर्ता त्यांच्यासोबत असेल असे सांगितले.मग दोन तीन हंडे , बॉटल घेऊन ओढ्यापलीकडे असलेल्या हातपंपा कडे गेलो. त्याची देखभाल नीट नसल्याने पाणी उपसणे थोडे जड जात होते. स्वप्नील, सुजित यांनी हंडे घेतले होते. बाकी सर्वजण आपल्या बॉटल घेऊन गेले होते. अर्ध्या किलोमीटर अंतरावर ही हापशी होती. तासभर पाणी आणण्यात गेला. आल्यावर सर्वांनी चार्ट पेपर व ड्रॉइंग साहित्य काढले. प्राथमिक आरोग्य केंद्रात जमा केलेली माहिती एकत्र करून सर्वजण चार्ट बनविण्यास बसले. पाहिल्या दिवशी,उपंनकर अभिजित, ठाकूर आणि मी असे चौघेजण कार्यकर्त्ये होतो. मुलांचे अगोदरच गट पाडले होते. प्रत्येक गटाला काम दिले होते. लसीकरण तक्ता यात बाळ जन्मल्यापासून ज्या लसी दिल्या जातात त्याची माहिती दिली होती. पावसाळ्यात होणारे आजार यावर चार्ट बनविण्यास मुलांना सांगितले. दिवाळी ग्रीटिंग कार्ड्स हा एक मुलांना ग्रुप मध्ये प्रोजेक्ट दिला होता. संध्याकाळी गावातील लोकांच्या मुलाखती घेण्याचा एक प्रकल्प होता. येताना वाटेत आम्ही थोडा नाष्टा केला होता त्यामुळे भूक लागली नव्हती पण तासाभराने मुलांची चुळबुळ चालू झाली.मग सर्वांना बॅगेतून डबे काढायला सांगितले .साडेबारा वाजता सर्वजण जेवायला बसलो. सर्वांनी घरून डब्बे आणले होते. त्यामुळे भरपूर जेवण होते. शक्यतो मुलांना भाज्या संपवायला सांगितल्या. टिकणारा पदार्थ मात्र टाकू नका असे सांगितले. संध्याकाळी खाता येईल अशी सूचना केली. जेवणानंतर खेळ घ्यायचे ठरले.

काही बैठे खेळ घेतले. बाहेर बऱ्यापैकी खेळायला जागा होती. मुलांना प्रत्येक घराच्या वळचणीला सागाची पाने अंथरली होती. मुलांनी त्यांना कारण विचारले असता त्यांनी सांगितले पाऊस आल्यावर घराच्या कौलातून येणाऱ्या पाण्यामुळे घरासमोर खड्डे पडू नये म्हणून सर्वात सोपा खबरदारीचा उपाय केला होता. संध्याकाळी बाहेर काही मुलांचे खेळ घेतले.गावात वीज नसल्याने जेवणाची तयारी उजेडात करणे गरजेचे होते. त्यामुळे मुलांना परत पाणी भरून आणायला सांगितले. भाकरीचे पीठ कुणाकडे मिळते का ते पाहूया म्हणून विचारले पण आम्ही तीस जण होतो. एवढे पीठ कुणाकडे नव्हते. दुसऱ्या दिवशी एका माणसाला खालून आणायला सांगितले. गावातील लोकांनी मोठे टोप, भांडी वगैरे साहित्य अगोदरच दिले होते. लाकूडफाटा खूप उपलब्ध असल्याने चिंता नव्हती. मुलांनी जमा करून ठेवला होता. भात,भाजी, डाळ करायची होती. मुले पाणी घेऊन आल्यावर तयारी सुरू केली. मुलांनी भाज्या निवडून दिल्या. दगडांची चूल बनवली होती. अंधार पडायच्या आत आम्हाला जेवण पूर्ण करायचे होते. गावातून कंदील आणून ठेवले होते. मुलांची फार मदत झाली.जेवण तयार झाल्यावर काही लोकांच्या मुलाखती घेतल्या. गावात घेतले जाणारे पीक, दैंनदिन जीवन , शिक्षण अशा बऱ्याच गोष्टी मुलांनी विचारल्या. प्रत्येकाने आपल्या डायरीत नोंद केली. तोपर्यंत साडेसात वाजले होते. गावात लाईट नसल्याने लोक लवकर झोपतात. त्यामुळे आम्हीही साडेसातला जेवायला घेतले. हॉल बऱ्यापैकी मोठा असल्याने सर्वजण व्यवस्थित बसलो. फक्त भात, भाजी, डाळ , लोणचे पापड हाच मेनू होता.पण सर्वानाच भूक लागली होती त्यामुळे सर्व जण छान जेवले. भांडी वगैरे सकाळी धुण्यासाठी ठेवली. रात्री नऊ पर्यन्त अंधार होता पण दुसऱ्या दिवशी पौर्णिमा असल्याने चंद्राचा प्रकाश छान पडला होता.या गावात असे राहताना असे चुकूनही वाटत नव्हते की इथे जवळपास हायवे असेल आणि जवळच एखादे शहर पाच किलोमीटर अंतरावर असेल. कोणताही आवाज नाही गोंगाट नाही. सर्वत्र शांतता पसरली होती. बाहेर कचरा वगैरे नसल्याने डास हा प्रकार तिथे नव्हता. हवेत गारवा चांगलाच होता. दिवसभर पाणी भरायला दोनतीन फेऱ्या , सकाळी चारपाच किलोमीटर ट्रेक केल्याने मुलांची तशी दमछाक झाली होती. लाईट नसल्याने तसा इतर काही स्कोप नव्हता. गावात सर्व लोक लवकर झोपतात त्यामुळे आम्हीं सुद्धा कार्यक्रम लवकरच उरकले. डोंगराच्या पलीकडे मोठा पिवळा प्रकाश झोत दिसत होता. आयपीसीयल कंपनीच्या फ्लयेर मधून येणारा आगीचा लोट तो प्रकाश देत होता. जमिनीपासून १०० मीटर उंच चिमणी असल्याने त्याचा प्रकाश दूरवर पसरतो. डोंगरावर अंधार आणि पलीकडे उजळलेला प्रकाश हे सर्व तिथल्या परिस्थितीचे द्योतक आणि एक वास्तव प्रकट करत होता. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून सर्व आवरायचं होते. त्यामुळे झोपी गेलो.सकाळी नेहमीच डोंगरातील गावे इतरांच्या तुलनेत अगोदर जागी होतात. पक्षी , प्राणी यांचे आवाज त्यांच्या लवकर कानी पडतात. सूर्य इतरांच्या मानाने लवकर दिसतो.आंघोळीचा काही प्रश्न नव्हता. नाष्टा व चहा याची तयारी सुरू केली. चूल पेटवली. गावात एकाला दूध सांगितले होते.त्याने दूध आणून दिले.त्याच माणसाला दुपारपर्यंत खालून तांदळाचे पीठ दळून आणायला सांगितले. गावातील सर्वचजण बोलायला बूजत होते. शक्यतो आम्हाला टाळत होते. तिथे एक नर्सिंग करत असलेली मुलगी होती तिने मग सगळ्यांना समजावले. काही लोक बोलू लागले.त्याच मुलीने एका घरातील स्त्रीला भाकरी बनवायला सांगितले. आम्ही त्या मुलीला त्याबद्दल पैसे देऊ असे सांगितले.पण त्यांनी नकार दिला.मग वेगळ्या स्वरूपात त्यांचे पैसे देऊया असे ठरले.संध्याकाळी पाणी भरून ठेवले असल्याने चहा नाष्टा करण्यास सूरवात केली. पोहे हा सर्वात चांगला आणि लवकर तयार होणारा नाष्टा. चहा तयार झाल्यावर मुलांनी आपापले पेले आणि डिश आणल्या.पोहे वाटप करण्यात आले. त्या दिवशीच्या नियोजनात मुलांनी आदल्या दिवशी तयार केलेले पोस्टर्स घेऊन गावात घरोघरी जाऊन माहिती द्यायची होती.पण अगोदर काही कामे उरकायची होती. कालची भांडी धुऊन आणायची होती.दीड किलोमीटर लांब एक ओढा होता तिथे जायचे होते. ओढया लगत नंबरवाडी गाव आहे. त्या गावात सुद्धा जाऊन माहिती द्यायची होती.मग सकाळीच त्या गावाकडे निघालो.दहा वाजेपर्यंत काही कार्यकर्त्ये कॉलनी मधून येणार होते.

भांडी घासणे आणि झाडलोट हे एका ग्रुप साठी काम दिले होते.त्यात कौशिक नाईक, अक्षय पोटे, विक्रांत मोटे, सुदनेश रणवरे, भावेश भेंडाले, नयन महाजन, हर्षद सुरावकर यांचा गट होता. सर्वजण नंबरवाडी गावाकडे निघालो. अर्ध्या तासाच्या आत ओढ्यावर पोहचलो. ओढ्यात एक दगडाची बांधलेली विहीर आहे. तिथे पाणी भरायला गावातील लोक येतात. मुलांनी तिथे ओढ्यावर भांडी धुतली. विहिरीतील पाण्याने आंघोळी केल्या. तोपर्यंत दहा वाजले होते. इकडे शिबिराच्या ठिकाणी बनाईत सर, मिसेस उपनकर, मेघा पांडे, धजेकर कुटुंब,हे कार्यकर्त्ये आले होते. अभिजित आणि उपनकर तिथे होतेच.मी आणि ठाकूर दोघेजण ओढ्यावर गेलो होतो. परत शिबिराच्या ठिकाणी आलो.मग सगळे जण जेवणाच्या तयारीला लागलो. खालून पीठ दळून आणले नव्हते. त्यामुळे सकाळी सुद्धा भात,भाजी ,डाळ हाच मेनू असणार होता. दुपारनंतर पीठ दळून येईल असे सांगितले. सर्वजण कामाला लागले. बनाईत सरांनी एका गटाला मार्गदर्शन करायला सुरुवात केली. मुलांना पाणी नियोजन, आग, आगीचे प्रकार आणि विजवण्याच्या पद्धती, जंगलातील वनस्पतींचा अभ्यास, प्रथमोपचार , लसीकरण असे बरेच विषय विभागून देण्यात आले होते.सुजित सातपुते, स्वप्नील चौधरी ही मोठी मुले त्यांना मदत करत होती. अभिजित , मी आणि मेघा पांडे सर्वजण प्रत्येक गटापाशी जाऊन चर्चा करत होतो. ठाकूरचे फोटो काढण्याचे काम चालू होते. येताना आम्ही मटकी भिजवून आणली होती त्याला मोडे आले होते त्यामुळे त्याची भाजी करणार होते.दोन चुली केल्या होत्या त्यामुळे भाजी आणि भात लवकर तयार झाला, नंतर डाळ केली. दुपारी कार्यकर्त्ये बरेच असल्याने वेळ कसा निघून गेला कळाले नाही. बनाईत सर प्रणव अवताडे, विश्वजित शिंदे, सुयोग अबनावे, अक्षय पोटे यांना काही शंका होत्या त्याबद्दल सांगत होते. मेघा पांडे यांच्या सोबत मानसी सुपेकर, गौरी पांडे या आल्या होत्या. त्या बऱ्याच लहान असल्याने मुलांच्या उपक्रमात सहभागी होऊ शकत नव्हत्या पण त्यांचे अवलोकन चालू होते. बारा वाजेपर्यंत जेवण तयार झाले. सर्वांना ताट, वाट्या, पेला आणायला सांगितला. शिबिरात बऱ्याचवेळा मुलांना भाज्या आवडत नाहीत म्हणून थोडे लोणचे पापड डाळ असली की मुले जुळवून घेतात.जी मुले नियमित कॅम्पला यायची त्यांना मात्र तशी सवय होती.तसे त्यावेळीं मुक्तांगण ग्रुपचे सात आठ कॅम्पच झाले होते. पण प्रत्येक वर्षी मुलांचे गट आणि मुले बदलत होती. जेवण झाल्यावर मुले गावात प्रत्येक घरी जाऊन माहिती सांगू लागली. इथल्या लोकांचे वैशिष्ट म्हणजे लोक खूप स्वच्छ रहात होते. रंगाने गोरेपान होते. ठाकूर आदिवासी समाजाचे लोक होते. या भागात कातकरी समाजाचे लोक सुद्धा राहतात परंतु त्यांच्या व या ठाकूर समाजाच्या राहणीमानात प्रचंड फरक आहेत. कातकरी समाज म्हणजे खरेखुरे जंगलाची लेकरे वाटतात. रंगाने थोडे कृष्णवर्णीय आणि काटक बांधा, शिकारीत अग्रेसर अगदी जैत रे जैत सिनेमातील दाखवलेल्या कलाकारांसारखे. त्यांची घरे सुद्धा शक्यतो कुडाची असायची.या गावातील लोकांना आता थोडीफार शिक्षणाची गोडी लागल्यासारखी वाटत होती. परंतु सर्व पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने अडचणी होत्या. मुक्तांगण ग्रुपचे सदस्य मात्र त्यांच्यात रमले होते. एका ओळीच्या घरांची रांग मुलांनी पूर्ण केली.मग आम्ही सर्वजण नंबरवाडी गावात गेलो. तिथे गावात प्रत्येक घरी मुले फिरली . लहान मुलांचे आरोग्य , लसीकरण, प्रथमोपचार यावर प्रत्येक घरात जाऊन चर्चा केली. प्रत्येक गटाला घरे वाटून दिली होती. एका ग्रुप बरोबर मी होतो. दुपारच्या जेवणाची जरा चौकशी करावी म्हणून मुलांना विचारले. सर्वांनी सांगितले छान जेवण झाले होते.पण त्यातील एक जण म्हणाला कालपासून भाकरी नव्हती. त्याला समजावले इथे चक्की नसल्याने थोडा प्रॉब्लेम झाला.त्याने परत विचारले तुम्ही येथे येऊन गेला होता ना. मला थोडे वाईट वाटले पण ठीक आहे पुढच्या वेळी नियोजनात कोणतीही गोष्ट गृहीत धरायची नाही असे ठरवले.पण मी लगेच त्याला सांगितले पुढच्या कॅम्पला तुला मेन लीडर बनवतो .मग आपण दोघेजण शिबिराचे नियोजन करू.मग तो म्हणाला मी कसे करू शकणार.जसे तू आता त्रुटी काढलीस ना मग पुढच्या वेळेस अजून एखादी चूक होऊ नये आणि तुला याचे ज्ञान चांगले आहे त्यामुळे पुढच्या वेळेस तयार रहा. बाजूलाच एक मुलगा सर्व बोलणे ऐकत होता. थोड्या वेळाने मला त्याने सांगितले काका त्याच्याकडे लक्ष देऊ नका काही फरक पडत नाही एक दिवस भाकरी चपाती नाही खाल्ली तर.तो म्हणाला तुम्हाला एक मजा दाखवतो फक्त मला नाष्टा करताना आठवण करा. मुलांचे एवढे बारीक लक्ष असते.प्रत्येकजण कसे वागतो. कुणाला वेगळी वागणूक मिळते काय, कुणाला ज्यास्त फेवर करते का, कुणाच्या खाण्याच्या, वागण्याच्या सवयी याबद्दल खडानखडा माहिती मुले ठेवतात. त्यामुळे मुलांना कधी कमी समजू नये. मला खरतर माझ्या नियोजनात त्रुटी वाटली परंतु त्याच्या पलीकडे जाऊन मुलांनी मला माहिती दिली. एकाने मला लगेच आठवण करून दिली मागे तुम्ही वाघोडे येथे कॅम्पला गेला होता त्यावेळी आल्यानंतर ज्यावेळी पालकांना तुम्ही विचारले शिबीर कसे झाले ? त्यावेळी याच मुलाच्या पालकाने तक्रार केली की नियोजनानुसार तुम्ही सागरगड किल्ल्यावर वरपर्यंत गेला नाहीत.तो मुलगा त्या कॅम्पला होता त्याने सांगितले एकतर आदल्या दिवशी बावीस किलोमीटर सायकल चालवून पाय भरून आले होते आणि किल्ल्यावर जायला दोन तासांची पायपीट करावी लागणार होती त्यामुळे तो कार्यक्रम रद्द केला होता.अर्ध्या पर्यंत गेलो होतो. पंचवीस मुले घेऊन सायकल चालवून ४४ किलोमीटर अंतर येताना व जाताना पर पाडणे हे फार जबाबदारीचे काम होते .तो मुलगा म्हणाला त्याबद्दल बोलायचे सोडून फक्त चुका काढायच्या सुचतात. विषय जरा ट्रक सोडून चालला असे वाटू लागल्याने मी त्या मुलांना समजावले अरे अशी लोक आपल्या आसपास असणे गरजेचे आहे नाहीतर आपण चांगले बदल घडवून आणू शकत नाही.'निंदकाचे घर असावे शेजारी' अशी म्हण आहेच ना.असे काही तरी सांगून विषय मिटवला.

नंबरवाडी गावात दोन तास थांबलो. तिथे एक तरुण मुलांचा ग्रुप भेटला त्यांनी रात्री बेंजो वर नाचायला मुलांना बोलावले. मुलांशी छान गप्पा मारल्या. परत निघालो कारण बनाईत आणि इतर काही जणांना घरी जायचे होते.बनाईत सर कार घेऊन आले होते. त्यांच्या सोबत मेघा पांडे,उपंनकर आणि धजेकर कुटुंबीय, गौरी, मानसी जाणार होते. नाष्टा तयार करून झाल्यावर सर्वांना वाटला. नंतर ते सर्वजण खाली जायला निघाले. दिवसभर फार मदत या सर्वांनी केली. त्यांना सोडण्यासाठी थोडे अंतर चालून गेलो. परत आल्यावर पंधरा मिनिटाने पांडे आणि स्वप्नीलचे वडील आले. त्यांची थोडी चुकामूक झाली. पांडे आल्यामुळे मुलांमध्ये उत्साह वाढला आणि आम्हाला एक्स्पर्ट कुक आल्यासारखे वाटले.पण त्यांना रात्री घरी परत जायचे होते. दिवसभर बरेच उपक्रम झाले होते. त्यामुळे सर्वांना पाणी भरायला पाठवले सोबत ठाकूर गेला होता. पांडे आणि अभिजित रात्रीच्या जेवणाची तयारीला लागले. मदतीला चौधरी होतेच .भाकरीचे पीठ दळून आणले होते.ते नर्स मुलीने एका कुटुंबाकडे दिले. पन्नास भाकरी बनवायला सांगितल्या.दोन वेळा पुरेल एवढे पीठ त्यांना दिले होते. दुसऱ्या दिवशीच्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था पण करून ठेवली होती. मुलांच्या मदतीने स्वयंपाक सुरू केला. दुपारीच कार्यकर्त्यांनी बऱ्यापैकी संध्याकाळची जेवणाची तयारी करून ठेवली होती. त्यामुळे काम सोपे झाले होते आणि पांडे आल्यामुळे कामाला वेग आला होता. मुलांनी वॉटर बॉटल भरून आणल्या होत्या. स्वप्नील आणि सुजित यांनी हंडे भरून आणले होते. दुपारी येताना कार्यकर्त्यांनी ताजा मटार आणला होता. मटार बटाटा हा मेनू ठरवला होता.आज तांदळाच्या भाकरी असल्याने भात थोडा कमी टाकला होता. सात वाजता आमचे जेवण तयार झाले होते. थोडा उजेड होता त्यामुळे पांडे आणि स्वप्नीलचे वडील दोघेजण घरी जायला निघाले. त्यांना दुसऱ्या दिवशी पाहिल्या शिफ्टला जायचे होते त्यामुळे ते निघाले होते. भाकरी बनवण्यास थोडा वेळ जाणार हे गृहीत धरले होते. त्यामुळे आठ वाजता जेवायला बसलो. त्यादिवशी पौर्णिमा असल्याने चंद्राचा प्रकाश भरपुर होता.जेऊन झाल्यानंतर नऊ वाजता नंबरवाडी गावात जायचे होते. त्यामुळे जेवण आटोपले. सर्वांना टॉर्च काढायला सांगितल्या. आम्ही रात्री त्या परिसरातून जाणार होतो. पाऊलवाट होती परंतु अनोळखी ठिकाणी थोडी भीती वाटते.सोबत मुले सुद्धा होती. ठाकूरला पुढे राहायला सांगितले मी आणि अभिजित सर्वात मागे होतो. तसा प्रकाश चांगला असल्याने वाट व्यवस्थित दिसत होती.छान गार वारा सुटला होता. मुलांना प्रत्येकाला कानटोपी घालायला सांगितली होती. नाचायला मिळणार म्हणून मुले खूप खुश होती. अर्ध्या तासात त्या गावात पोहचलो.गावातील मुले वाट बघत होती. लग्न, वरात, पालखी यात बेंजो वाजवतात. मुलांनी ठेका धरला. गावातील मुलांबरोबर धमाल केली. सर्व गावातील लोक बघण्यासाठी आले होते. जवळ जवळ बारा वाजेपर्यंत कार्यक्रम चालला.नंतर मुलांना कसेतरी बाहेर काढले.त्या गावातील मुलांचा निरोप घेतला.


रात्री बारा वाजता तेही पौर्णिमेच्या रात्री आजूबाजूला वस्ती काही नाही आणि त्या डोंगर भागातून पाऊलवाटेने चाललो होतो. बरेच विचार चाटून जायचे पण मुलांचा उत्साह इतका जबरदस्त असायचा की बाकी गोष्टी सांगितल्या प्रमाणे ठरायचा. एकदा टाऊनशिप मधील एक गृहस्थ लष्करातून निवृत्त होऊन आलेले त्यांनी मला विचारले होते की संजय तुम्ही शिबिराला मुलांना घेऊन जाता तुम्हाला रिस्क वाटत नाही का? त्यांना सांगितले मी शक्यतो निगेटिव्ह विचार करत नाही कारण तसे पाहिल्यास पावलोपावली रिस्क आहे. त्यामुळे त्या विचारात मी गुरफटत नाही पण नियोजन काटेकोर करण्याचा प्रयत्न करतो आणि विशेष म्हणजे मला नेहमी खूप चांगली माणसे मिळतात. त्यामुळे शिबिरे यशस्वी होतात.

त्या रात्री मात्र त्या माणसाची मला आठवण झाली होती. मनात देवाचे नामस्मरण करत वाट काढत मुलांना खाली टॉर्च धरून पाय आपटत चला असे सांगितले होते.साप, विंचू, रानडुक्कर अशा सर्वांचा माझ्या भीतीच्या लिस्ट मध्ये समावेश होता. भीती चेहेऱ्यावर दिसण्याचा काही संबंध नव्हता कारण फक्त आजूबाजूला फक्त चंद्रप्रकाश होता. कसेतरी गावात पोहचलो. पटापट अंथरून पांघरुन मुलांना काढायला सांगितले. गावात आल्यावर मात्र निर्धास्त झालो. दिवसभर बरीच मेहनत झाली असल्याने मुले सुद्धा लवकर झोपी गेली.


नेहमीप्रमाणे पहाटे पाच वाजता जाग आली. मोठ्या मुलांना उठवले. तयारी करायला सांगितली. चूल पेटवली. त्या दिवशी शिरा करायचा होता त्यामुळे त्याचे भांडे धुऊन घेतले. अभिजित ,ठाकूर यांनी रवा भाजून घेतला . तोपर्यंत सहा वाजत आले होते. डोंगरावर लवकर उजेड पडतो. रात्री झोपायला उशीर झाला होता. त्यामुळे मुलांना थोडे उशिरा उठवले. सहा वाजता गावातून दूध आणले. चहा आणि शिरा तयार झाला होता. मुले ब्रश वगैरे करून फ्रेश झाली होती. सर्वांनी नाष्टा केला. नंतर थोडे डायरी लिखाण केले. त्यादिवशी उरलेल्या घरात जाऊन माहिती द्यायची होती आणि पोस्टर्स चीटकावयची हो ही कामे बाकी होती. मुलांनी गटाने ती तयारी सुरू केली. तासाभरात ते उरकनार होते. सातच्या सुमारास सर्वजण नंबरवाडी ओढ्याकडे जायला निघालो. आज भांडी घासणे ग्रुप दुसरा होता. त्यांनी सर्व भांडी घेतली. मुलांना सोबत कपडे घेऊन यायला सांगितले. ओढ्यावर पोहचल्यावर पहिल्यांदा भांडी घासणे झाले. नंतर सर्वांना विहिरीच्या पाण्याची आंघोळ घातली. ठाकूर एक एक बादली काढून मुलांच्या अंगावर ओतत होता.. नंतर आम्ही ओढा वर कुठे जातो हे पाहायला त्या पात्रातून पुढे गेलो.पण काही अंतरावर फक्त दगड दिसू लागले. परत फिरलो. वाटेत एक आदिवासी दाम्पत्य भेटले. जरा त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्यांनी मग आम्हाला थोडे जंगलात नेले आणि मचान दाखवले.त्या मचानावर मुले चढली. शिकारीसाठी बनवले होते. ओढ्याच्या जवळ प्राणी पक्षी येतात त्यामुळे ही शिकारीची जागा निवडली होती. कधी कधी रात्री शिकारीला येतो असे त्यांनी सांगितले. मुलांना मचान फार आवडले. तिथून मग खाली निघालो. जाताना नंबरवाडी गावात लोकांना भेटलो. तिथल्या युवा ग्रुपने मुलांना परत कधीतरी या असे सांगितले. मुलांची दोन दिवसात चांगली ओळख झाली होती. साडेनऊ वाजता परत आलो. आल्यावर आम्ही जेवण बनवण्याचे काम सुरू केले. येताना पाणी भरून आणले होते. आज उरलेलं सर्व साहित्य वापरून जेवण बनवायचे होते. मुलांनी त्यांचे शिल्लक काम सुरू केले. त्यांनी दुसऱ्या बाजूला असलेल्या घरात जाऊन माहिती द्यायची सुरवात केली.काही मुलांनी पोस्टर लावायला घेतली. स्वप्नील , सुजित, स्वप्नील गायकवाड हे तिघेजण मदतीला होते. जेवण झाल्यावर दुपारी आम्ही खाली जायला निघणार होतो. जेवणात काही उरलेल्या भाज्या टोमॅटो, वांगी बटाटे वापरून मिक्स भाजी बनवली. डाळ आणि भात बनवला. भाकरी बनवून बारा मिळणार होत्या. भाकरीचे पैसे अंदाजे त्या नर्स मुलीकडे दिले. ज्यांनी भाकरी बनवायला घेतल्या होत्या त्यांनी पैसे घ्यायला नकार दिला होता त्यामुळे त्या नर्सला नंतर देण्यास सांगितले. गावातील लोकांनी सुद्धा मदत केली. मुलांचे उपक्रम तासाभरात संपले.मग मुलांना थोडे डायरी लिखाण करायला सांगितले. तोपर्यंत जेवणाची वेळ झाली होती. मुलांना मध्येच भूक लागली मग सर्वांच्या बॅगा रिकाम्या करायला सांगितल्या. सर्व खाऊ एकत्र करायला सांगितले. बराच खाऊ जमा झाला. मला एका मुलाने हळूच खूण केली.मी त्याच्या जवळ गेलो तो म्हणाला कालच्या तुम्हाला प्रश्न विचारणाऱ्या मुलाच्या बॅगेतून फक्त चुरमुरे निघतील .त्याने हळूच सांगितले हा मुलगा नेहमी हाच खाऊ आणतो आणि शेवटपर्यंत काढत नाही. आमचा खाऊ संपवतो. मग मी त्याला सांगितले त्यात त्याचा काय दोष घरून दिले ते आणले. घरातील लोकांनी सुद्धा जाणून बुजून केले नसणार. नाहीतरी नाष्टा,जेवण या सोई सुविधा शिबिरात असतात त्यामुळे वेगळे काही द्यायला नको. माझ्या उत्तराने त्याला काही समाधान झाले नाही.जेवणाची तयारी चालली होती. तासाभरात जेवण उरकले.मग सगळेजण जेवायला बसलो. शिबिराचा शेवटचा दिवस होता परंतु मुलांचा उत्साह वाढत चालला होता.अजून एक दिवस राहूया का असे एकाने विचारले.बरीच मुले पहिल्यांदाच घरातून लांब आणि तेही पालकांच्या शिवाय आली होती ही गोष्ट मोठी होती. उपक्रम फारसे घेता आले नाहीत पण एक दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या पंपातून पाणी आणणे यातून पाण्याची असणारी निकड आणि त्यासाठी लागणारे कष्ट थोड्या प्रमाणात का होईना कळाले.वीज नसल्याने काय होते हे तीन दिवस विजेविना काढल्यावर कळाले. रस्ते नाहीत,वीज नाही, पाणी नाही सर्वांसाठी झगडणे आले. ओढ्यावर भांडी घेऊन जाऊन स्वतः तिथे जाऊन घासल्यावर कळते त्याचे किती महत्व आहे. गावात कोणतेही दुकान नाही त्यामुळे इतर पदार्थ आणून खाऊ शकत नाही. त्यामुळे भूक लागल्यावर जे उपलब्ध आहे ,जे ताटात आले आहे ते संपवने हे ओघाने आलेच. त्याला काही पर्याय नाही. गावात फिरताना त्यांच्याशी बोलताना नकळत आपल्या आयुष्याशी मुले संबंध लाऊन बघतात आपण कोणत्या परिस्थितीत राहतो चोवीस तास लाईट, पाणी, जायला यायला गाडी, चकाचक रस्ते यापासून दूर गेल्यावर त्याचे महत्त्व कळते.पण यातून मुले आनंद शोधू लागतात म्हणून मोठी माणसे व मुले यात फरक आहे. मुलांनी त्या आदिवासी मुलांशी संवाद साधत त्यांच्याकडून बँजो पार्टीचे निमंत्रण मिळवले आणि डान्सचा मनमुराद आनंद लुटला. गावातील लोकांच्या मुलाखती घेतल्या त्यांचे जीवन जाणून घेतले. त्यांनी जमा केलेली सर्व माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानिमित्ताने त्यांनाही प्रथोमपचाराची माहिती मिळाली. आमच्या कंपनीतील फायर विभाग प्रमुख श्री.बानाईत यांच्या सोबत चर्चा करण्याची संधी मिळाली.

जेवण तयार झाल्यावर भाकरीची चौकशी करून आलो. दहा मिनिटात या असे सांगितले. तोपर्यंत मुलांना ताट, वाट्या,पेला आणि बॉटल घेऊन बसायला सांगितले. स्वप्नील, सुजित जेवण वाढायला थांबले. तोपर्यंत भाकरी आल्या. मुलांनी जेवण सुरू केले. उरलेला शिधा गावातच देऊन टाकला. सर्वांची जेवणं उरकल्यावर मुलांना पंपावर जाऊन भांडी स्वच्छ करून आणायला सांगितली.इतर मुलांकडून शिबिराचा हॉल स्वच्छ करून घेतला.इतर मुलांना आपापल्या बॅगा रिकाम्या करून डायरीत नोंद करून ठेवलेल्या वस्तू आहेत का ते चेक करून घ्या नंतर मग बॅगेत भरा असे सुचवले. तासभर आवरा आवर करण्यात गेला. मुलांनी भांडी घासून आणल्यावर गावात देऊन टाकली. गावातील लोकांचे त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. मुलांनी सुद्धा गावातील ओळख झाली होती त्यांना भेटून पुन्हा येऊ असे सांगून आले.गावातील त्या नर्स मुलीने खूप मदत केली.ती असल्यामुळे इतर माणसे मुलांशी संवाद साधू लागली.तिने स्वतः येऊन गावात आल्याबद्दल धन्यवाद दिले. सर्व शिबिराची जागा चेक केली. काही वस्तू मुले विसरली होती त्यांना परत दिल्या. दोनच्या सुमारास खाली उतरू लागलो. अर्ध्या तासाच्या आत पाली रोडवर पोहचलो. पंधरा मिनिटात पाली नागोठणे एस्टी बस मिळाली. अडीच वाजता नागोठणे येथे पोहचलो तीन वाजता कॉलनी मध्ये जायला बस होती. पुलाच्या बाजुला बस थांबत असल्याने तिथे झाडाखाली बसलो. थोड्या वेळाने बस आली आणि आम्ही साडेतीन वाजता कॉलनीत पोहचलो.


76 views0 comments

Recent Posts

See All

Drama journey on Maharashtra Freedom Fighters

In our township every clubs, groups arranged many programs .We always involved in their activities. We always helped them and took lot of benefits like interviews of big personalities , infrastructure

Comments


bottom of page