top of page

Muravadi Kondgav camp

हल्ली या चार पाच वर्षात मुक्तांगण उपक्रमातील रविवारी येणाऱ्या मुलांच्या वयोगटात जरा बदल झाला आहे.त्याचे मुख्य कारण म्हणजे फार पूर्वी म्हणजे CBSE येण्याअगोदर आपल्याकडे येणारी मुले सहसा १० वर्षांवरील असायची. CBSE आल्यापासून आठवी च्या पुढील कोणीही कार्यक्रमाला मुले येत नाहीत आणि पूर्वी मराठी माध्यमात टाऊनशिप मधील मुले होती परंतु त्याचे प्रमाण आता झीरो झाले आहे. त्यामुळे आता आपण १ ली पासूनच मुलांना कार्यक्रमात सहभागी करून घेऊ लागलो. कार्यक्रमाचे स्वरूप पूर्णपणे बदलावे लागले. त्यामुळे सर्वात जास्त फटका बसला तो शिबिराला आणि किल्ले भटकंती यांना.कारण या वयोगटातील मुलांना बाहेर अशा ठिकाणी घेऊन जाणे म्हणजे थोडे अवघड पडते त्यात मदत करणाऱ्या सहकाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.काही रिटायर झाले काहींना कंपनीच्या कामामुळे सवड मिळत नाही. शिबीर आणि भटकंती हा आपल्या कार्यक्रमाचा गाभा आहे.इथे आपण जे वर्षभर उपक्रम राबवत असतो त्याचे खरोखर इम्पलिमेटेशन होत असते. सर्व कार्यक्रमाची खऱ्या अर्थाने पूर्तता यावेळी होत असते. मुलांच्या आयुष्यातील पुढील कारकीर्द जर खऱ्या अर्थाने इतरांपेक्षा वेगळी करावयाची असेल तर शिबिरे, भटकंती, प्रदर्शने बघणे,वेगवेगळे प्रकल्प करणे या गोष्टींची फार आवश्यकता आहे. यावर वेगवेगळी मतमतांतरे असू शकतात. पण मला असे वैयक्तिक पातळीवर असे वाटते.ज्या मुलांना मी चांगले वाढताना , त्यांची उत्तम प्रगती होत असताना प्रत्यक्षात पाहिले आहे अशा मुलांवर या गोष्टींचा फार परिणाम झालेला आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे विक्रांत मोटे. तशी लिस्ट मोठी आहे पण एकच उदाहणादाखल दिले आहे.त्याचे नाव घेण्याचे कारण आपल्या कार्यक्रमाला तो तिसरी पासून ते दहावी पर्यंत आणि पुढेही आजपर्यंत वेळ मिळेल त्यावेळी कार्यक्रमात भाग घेतो , शिबिराला हजेरी लावतो. मुलांना मार्गदर्शन करतो.तो सद्या पुण्यातील ससून रुग्णालयात काम करतो.

तर विषय होता की मुलांचा वयोगट कमी झाल्याने शिबिराचे आयोजन करणे अवघड पडते. तरीसुध्दा शॉर्ट ट्रीप काढून आपण प्रयत्न करत असतो.काही पालक पुढे येऊन मदत करत आहेत.ही एक महत्त्वाची बाजू आहे.नवीन पालक गट वेगळ्या विचाराचा आहे. पूर्वी पालक शक्यतो मुलांना कार्यक्रमाला पाठवायचे परंतु तिथं गेल्यावर काय होते यावर फार आग्रही नसायचे. त्यांना मुलांचा आनंद हा ज्यास्त महत्वाचा होता. पण आताचे पालक मुलांच्या इतर गुणात सुद्धा वाढ झाली पाहिजे याविषयी आग्रही असतात.ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. त्यामुळे जे कोणी पालक असा विचार करून मुले पाठवतात आणि त्यांची संख्या जरी कमी असली तरी ते इतरांवर खूप परिणाम करतात.

अशाच विचारात मुरवडी कोडं गाव हा कॅम्प ठरवला.अरविंद बुरुमकर हा त्या गावातील एक व्यक्ती. कंपनीच्या सीएसआर विभागात कार्यरत आहे. मागील एका ट्रेक च्या वेळी ओळख झाली. अनुराधा मॅडम यांच्या परिचयातील असल्याने काम सोपे झाले. त्याला भेटलो आणि चर्चा केली. त्याने एक दिवस घरी या असे सांगितले.मग थोडा वेळ काढून गावात जाऊन आलो. शाळा बंद असल्याने शाळेत कार्यक्रम घेऊ शकत नाही असे समजले. आसपास डोंगर दऱ्या खूप आहेत.ट्रेक करता येईल असे गृहीत धरले. रान पाखरे शाळा त्या गावापासून १० किलोमीटर होईल असे त्याने सांगितले. राहण्याची व्यवस्था गावचे सरपंच श्री. वाघ करतील असे सांगितले. गाडी बद्दल त्याने सांगितले तो जबाबदारी घेइल.

मुलांना मग मुक्तांगण व्हॉटसअप ग्रुप वर कार्यक्रमाची रूपरेखा सांगितली. राजेंद्र पांडे आणि मेघा पांडे दोघेही यायला तयार झाले. आमच्या कंपनीतील पवार साहेब यांचा मुलगा महेश पुण्याहून आला होता. त्यांनी त्याला घेऊन जायला सांगितले.लाडकर ने फोन केला तो येऊ शकतो का ? खरतर शक्यतो पालकांना मी टाळतो परंतु त्याच्या मुलाबाबत त्याला खूप काळजी वाटते कारण त्याच्या मुलाला मागे इन्फेक्शन झाले होते. म्हणून त्याला थोडीशी सावधगिरी बाळगावी वाटते.मला त्याच्या मुलाला सहभागी व्हायचे आहे हे जास्त महत्वाचे वाटत होते त्यामुळे त्याला ये म्हटले.अडचण अशी असते की आम्ही कार्यकर्ते एका ठराविक विचाराने शिबिराची रूपरेखा बनवत असतो.त्या सर्व गोष्टी पालकांना पटतील याची खात्री नसते. त्यामुळे एखादा ट्रेक करावयाचा आहे मग त्यात रिस्क फॅक्टर येतोच. त्यासाठी मुलांना तयार करावे लागत.ही गोष्ट काही पालकांच्या पचनी पडत नाही त्यामुळे भीतीपोटी ते असे कार्यक्रम टाळतात किंवा दुसऱ्या भाषेत बोलायचे झाल्यास ते आमच्याकडे मुलांना पाठवत नाहीत.असे माझे कित्येक चांगले मित्र आहेत जे कधीही एवढ्या वर्षात मुलांना कोणत्याही आमच्या कार्यक्रमात त्यांच्या मुलांना सहभागी होऊन देत नाहीत.ते सर्वजण अशा गोष्टी द्यायला स्वतः सक्षम आहेत आणि तशी वेळ आलीच तर तर त्यांच्या ओळखीच्या आमच्यापेक्षा उत्तम काम करणाऱ्या संस्था त्यांच्या माहितीत आहेत. त्यामुळे मी कधीही शक्यतो त्यांना तसा आग्रह धरत नाही.

शिबिराच्या आदल्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता फुटबॉल मैदानावर मीटिंग घेतली. त्यात पालक व मुले आली होती. सर्वांनी आपापली मते मांडली. पाण्याची व्यवस्था कशी असेल.कोण कोणते कार्यक्रम घेणार आहोत याची माहिती सांगितली.वरद देशमुख च्या पालकांनी त्याच्या विषयी विचारले.तो आमच्या ग्रुप मधील नवीन सम्हीहान लोहित असल्याने मला त्याबतीत विशेष वाटत नाही.वरद सारखी मुले अतिशय हुशार असतात.त्यांचे डोके सतत कुठल्यातरी विचाराने कृतीने भारलेले असते.त्यामुळे ते सतत काहीतरी उद्योग करत असतात. त्यांना एखादी गोष्ट करायची असल्यास किंवा हवी असल्यास बेधडक करतील किंवा मागतील. बऱ्याच वेळा त्यांच्यामुळे इतर मुलांना त्रास होतो.त्यांची इमेज या ना त्या कारणाने वेगळी पडली जाते. पालकांना शक्यतो आईला अशा मुलांची बाजू सतत मांडणे भाग पडते. त्यामुळे काही वेळा त्यांच्यातल्या स्मार्ट पणाचा उपयोग होत नाही.सतत हेटाळणी झाल्याने ते अजून आक्रमक होत जातात.या मुलांना सतत प्रश्न पडत असतात . यांच्या इतके शॉर्ट कट इतर मुलांना माहीत नसतात.फार कमी वयातच त्यांना ते अवगत होते. त्यांच्या वयोगटातील मुलांच्या ते नेहमीच पुढे असतात. त्याचा परिणाम बरा वाईट त्यांच्या शालेय शिक्षणावर सुद्धा होतो. यांना हॅण्डल करणे मोठे जिकरीचे काम असते. त्यांची जबाबदारी मोठी असते.पण अशी मला स्वतःला फार आवडतात कारण ती मुले अजाणतेपणे आव्हान देतात की मला हॅण्डल करून दाखवा.मग त्यांच्याबाबत विचार करून जेवढे शक्य असेल तेवढे प्रयत्न करायचे. यासाठी वरद देशमुख याच्या पालकांना त्याला पाठवायला सांगितले. प्रत्येक पालकांनी आपापले विचार मांडले.गेली दोन वर्षे सतत नियमित येणाऱ्या मुलांमध्ये विधी आणि उर्वी या मुली प्रामुख्याने आहेत.यांचे पालक गुजरात वरून आले आहेत.परंतु या उपक्रमाविषयी त्यांचा दृष्टीकोन हा फार वेगळा आहे.यात विशेष म्हणजे महाराष्ट्रात येऊन पटकन येवढ्या लवकर मिक्स होणे आणि सर्वांवर विश्वास ठेवणे ही फार मोठी बाब आहे. आतापर्यंत या दोघींनी एकही शिबिर, एकदिवसीय कार्यक्रम सोडले नाहीत. विधी तर जामनगर येथून इथे आल्यावर दोनतीन महिन्यातच चांगले मराठी बोलू लागली. बघोशी शिबिरात तर या मुलीने कमालच केली हिच्या ग्रुप मध्ये सुजाता टीचर होत्या.ती सतत त्यांच्याशी मराठीत बोलत होती. त्यांना कॅम्प संपेपर्यंत कळले नाही की तिची मातृभाषा गुजराथी आहे.ज्या मुलांना जास्त भाषा अवगत असतात त्यांच्या वागण्या बोलण्यात वेगळा स्पार्क निर्माण होऊ शकतो. त्यांच्या पालकांच्या दृष्टीने हे सर्व उपक्रम फायद्याचे वाटले असावे. सोळा सतरा जनाचा गट तयार झाला.प्रथमेश आणि पार्थ दोघेही कॅम्पला येणार होते.आवश्यक त्या सूचना दिल्या. सकाळी सात वाजता बाळ गंधर्व येथे यायला सांगितले.

सकाळी साडेसात वाजता सर्वजण बालगंधर्व येथे सर्वजण जमा झालो. पांडे त्यांच्या गाडीने उशिरा येणार होते. लादकर त्याची गाडी घेऊन येणार होता.अरविंद त्याची गाडी घेऊन आला. त्यात नऊ जन बसले. बाकीचे पालकांच्या गाडीत बसले.मी टू व्हीलर घेतली.माझ्यासोबत पवार साहेब यांचा मुलगा महेश बसला.मग नऊ वाजेपर्यंत आम्ही गावात पोहचलो. गावाच्या बाहेर नदीच्या जवळच एक मंदिर आहे तिथेच पहिल्यांदा जायचे होते. तिथे दुपारच्या सत्रात जो उपक्रम रान पाखरे शाळेत राबवायचा होता त्याची तयारी करायची होती. त्यासाठी जे साहित्य लागणार होते ते आदल्या दिवशी मी खरेदी केले होते.

गावाच्या बाहेर हे मंदिर असल्याने कुणाची तशी अडचण नव्हती. वाटेत ओढ्यावर तशा बायका धुणे धुत असताना दिसत होत्या परंतु तिथून आम्ही दूर होतो. त्यामुळे त्यांना आमचा काही त्रास नव्हता. शक्यतो ज्या गावात आपण शिबीर आयोजित करतो त्या गावातील लोकांना कुठल्याही बाबतीत त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी लागते. आपल्या उपक्रमामुळे त्यांच्या कुठल्याही कामात अडथळा येऊ नये याची खबरदारी घ्यावी लागते.२५ मुले एकत्र जमली की थोडा फार गोंधळ हा होणारच. मंदिराच्या बाजूला पाण्याची व्यवस्था होती.परंतु मुलांनी चार चार बाटल्या आणल्या होत्या.मी क्लोरिवेत आणले होते. लाडकर ने मोठा पाच लिटर चा डब्बा पाण्याने भरून आणला होता. येताना वाटेतील एका हॉटेलमध्ये नाष्टा घेतला होता. आल्या आल्या तो संपवला.मग दिवसाचे उपक्रम चालू झाले. रान पाखरे शाळेत दुपारी जायचे होते. तिथे नियोजित कार्यक्रम करावयाचे होते. वेगवेगळे गट तयार केले. त्यांना काय काय उपक्रम घ्यायचे त्याबद्दल सांगितले.नंतर एक ड्रॉइंग आणि ग्रिटींग कार्ड बनवण्याचा उपक्रम घेतला. मध्येच संजय देशमुख सृष्टी आणि रुद्र यांना घेऊन आले, त्यांच्या पाठोपाठ उर्वी आणि विधी सुद्धा आल्या.पांडे फॅमिली बारा वाजता आले.मग आम्ही सर्वजण जेवायला बसलो.


थोड्या वेळाने मी अरविंद याच्या घरी जाऊन आलो त्याने संध्याकाळच्या जेवणाचा , दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर नाष्टा व दुपारचे जेवण यांचे मेनू विचारले. त्याला मटार बटाटा, तांदळाची भाकरी, भात,पापड, डाळ रात्री, दुसऱ्या दिवशी सकाळी पोहे आणि दुपारी लग्नात जे या परिसरात जे जेवण करतात ते करायला सांगितले. त्याला दोन हजार रुपये दीले आणि सामान आणायला सांगितले. त्याला दोन रिक्षांची व्यवस्था रान पाखरे येथे जाण्यासाठी करायला सांगितली. तिथला रस्ता तसा ओबधोबड आहे त्यामुळे ड्रायव्हिंग चांगले असले पाहिजे. आणि गाडीला पण धोका संभवतो त्यामुळे दोन विक्रम रिक्षा ठरवल्या. रेट बद्दल थोडी घासाघीस झाली परंतु आम्हाला दुसरा पर्याय नव्हता.मग आम्ही दुपारी तिकडे निघालो. अर्ध्या तासात तिथं पोहचलो. शाळेतील मुख्याध्यापक नाईक सर यांना अगोदरच सांगितले होते. त्यांची तशी परवानगी काढली होती.

ही शाळा पूर्ण डोंगराळ भागात आहे. चारही बाजूने डोंगर पसरलेले आहेत.एका मोठ्या ओढ्यालगत शाळेचा परिसर आहे.या शाळेची अचानक पने मला एकदा गाठभेट झाली. खरतर १९९८ साली उन्हाळ्यात इथे जांबोशी ला आलो होतो. इथे तीन दिवसाचा कॅम्प घेतला होता. त्यावेळी ही शाळा ओझरती पाहिली होती कारण त्यावेळी आम्ही कोलेटी गावातून हायवे वरून आठ किलोमीटर चालत

गेलो होतो. त्यावेळी ती शाळा पहिल्यांदा पाहिली होती. त्यावेळी एकदम साधी सरळ खेड्यातील शाळे सारखी होती.पण काही वर्षांपूर्वी मी सहज गाडीवर त्या भागात फिरायला गेलो होतो. जाताना एक रिसॉर्ट सारखे काय दिसते आहे म्हणून आत वळलो.मोठे लोखंडी गेट दिसले.रान पाखरे शाळा हे नाव दिसले.ती इमारत बघुन चाट पडलो.खूप सुंदर इमारत. अगदी पाचगणी महाबळेश्वर मधील निवासी शाळा असतात तशीच हुबेहूब. गेट मध्ये मला अडवले आणि यायचे कारण विचारले.मग अचानक डोक्यात विचार आला चला इथे मुलांसाठी काही प्रोग्राम घेता येईल का ते पाहूया.मग मी त्या व्यक्तीला सांगितले की मला मुख्याध्यापक यांना भेटायचे आहे.त्यांनी माझे नाव विचारले व आत जाऊन विचारून आले.मग मला आत सोडले. आत गेल्यावर एक गेट लागले.मग पुढे एक छोटे लॉन होते. त्याच्या दोन्ही बाजूला वर्ग दिसत होते. मध्येच लॉन संपल्यावर दोनही इमारती एका छोट्याशा हॉल ने जोडल्या होत्या. सरांच्या केबिनमध्ये गेलो तर सर कुठेतरी बाहेर गेले आहेत असे कळले. मॅडम होत्या छोट्या पाटीवर सौ. कुंदा नाईक लिहीले होते. मॅडमला विचारून आत गेलो. त्यांना मुक्तांगण ग्रुप बद्दल थोडी माहिती दिली. उपक्रम सांगितले आणि कधीतरी इथे कार्यक्रमाची संधी द्या अशी विनंती केली.त्यांनी मला समोरचा फलक दाखवला त्यात पूर्ण वर्षाचे नियोजन लिहून ठेवले होते.त्यात एकही दिवस मोकळा नव्हता.मग त्यांना विचारले एखादा सुटीचा दिवस आम्हाला द्या.मग त्यांनी मला फी विचारली. त्यांना काहीही घेत नाही असे सांगितले.मग मॅडमने फोन नंबर दिला आणि सांगितले फोन करून या.मग त्यांनी शिपायाला पाठवून शाळा पूर्ण बघुन या असे सांगितले. शाळेतील सर्व रूम्स त्याने दाखवल्या. अद्यावत अशा लॅब ,आर्ट रूम, मोठा हॉल, जेवणासाठी स्वतंत्र विभाग आणि इमारत,R O फिल्टर चे पाणी, स्वतंत्र जनरेटर, स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर सर्व गोष्टी दाखवल्या. साधारण आठशे मुले इथे शिकतात असे सांगितले.इथे एडमिशन साठी वेटींग लिस्ट असते. अशा फार कमी आश्रमशाळा असतील जिथे प्रवेशासाठी वेटींग लिस्ट लागत असेल.मग मॅडमला जाताना भेटलो.फोन करतो असे सांगितले. जाताना सहज गेटच्या बोर्ड खाली लक्ष वेधले गेले कारण त्यावर लीहले होते पवार चॅरिटेबल ट्रस्ट. आता मात्र सर्व उलगडा झाला.तर एकंदरीत गणित असे आहे.तरी मी विचार करत होतो की एखाद्या आश्रमशाळेत एवढ्या सुविधा कशा काय आहेत कारण आमच्या इथली नेल्सन मंडेला आश्रमशाळा मी पाहिली होती त्याला धड छप्पर नव्हते, कंपनी पूर्वी त्यांना जेवण वगैरे देत असे , शेजारी असलेल्या कंपनीने त्यांना शाळा बांधण्यासाठी रक्कम सुद्धा देऊ केली होती.बऱ्याच मंडळ आणि परिसरातील लोकांनी ताट, वाट्या, सतरंजी, पंखे दिले होते.पण तर सर्व कुठे गेले माहीत नाही.अगदी साने गाव येथील शाळेला देखील मी भेट दिली होती तिथे याच्या निम्म्याने सोई सुविधा नाहीत.मी रान पाखरे शाळेविषयी आमच्या इथल्या लोकांना विचारले अगदी पवार साहेबांच्या कार्यकर्त्यांना विचारले असता कुणालाही या शाळेबद्दल फारसे माहीत नव्हते आणि तिथे जायचे तर लांबच राहिले.ज्या युगात व्हॉटसअप वरून आपली विचारधारा बनली जाते त्यातील पन्नास टक्के मेसेज हे आयटी क्षेत्रातील लोक बनवत असतात. एखाद्याला बदनाम करणे किंवा कमी कर्तृत्व असणाऱ्या व्यक्तींना वर आणणे,धार्मिक विद्वेष पसरवणे , अराजकता पसरवणे अशी बरीच कामे आजकाल हे लोक पैसे घेऊन करत असतात अशा वेळी मला हे शाळेचे कार्य महान वाटते.त्यांच्या जेवणाचे आठवड्याचे मेनू मी मोट्याशा फलकावर पाहिले.त्यात दूध, अंडी, भाज्या, मांसाहार सर्व प्रकार लिहून ठेवले होते.प्रत्येक बाबतीत शिस्त दिसत होती.ही कामे बघुन व्हॉटसअप वरून आपण टाकू शकत नाही कारण आपली तिथपर्यंत जाण्याची झेप नसते.

मग नंतर अधून मधून या शाळेत जात असतो . तिथे बऱ्याचदा रेंगाळतो. काही उपक्रम राबवत असतो.कॅम्प मधील हाच तो एक भाग. शाळेत गेल्यावर रेक्टर आणि एक क्रीडा शिक्षक आम्हाला भेटले. त्यांना मुख्याध्यापक मॅडम सांगून गेल्या होत्या.मग त्यांनी सर्व मुलांना एकत्र केले.मग आम्ही चार गटांत विभागणी केली.एक गट पांडे आणि राज घोरपडे याचा गट, माझ्यासोबत सानिका चा गट,महेश सोबत छोटा गट , मेघा पांडे यांच्याकडे मुलींचा एक गट दिला. प्रत्येकाने आपापले काम सुरू केले.एका ग्रुपने मुलांना ग्रिटींग कार्ड काढायला शिकवले, एका ग्रुपने खेळ शिकवले.मी मुलांशी छान गप्पा मारल्या, त्यांना बोलते केले. त्यांच्याशी काही गोष्टी शेअर करता आल्या होत्या कारण ही मुले शहरातील मुलांशी संवाद साधत नाहीत त्यांना कमीपणाची भावना असते.पण गप्पा मारताना मग ते रमतात.पांडे यांनी छान खेळ घेतले. एकावेळी अगदी साठ सत्तर मुलांना एकत्र खेळवले. आपल्या मुलांनाही त्यात सहभागी करून घेतले. सगळ्यात कमाल केली ती वरद ने

वरद आमच्या सर्व अॅटिविटी बघत होता .त्याने दहा मुलांना एकत्र जमले.गोल करून बसला.ती मुले पण त्याने सांगितले ते ऐकून बसले.हा इयत्ता दुसरीत शिकतो आणि पाचवितील मुलांना एकत्र घेऊन बसला.त्यांना सांगितले तुम्ही मला मराठी शब्द सांगा मी इंग्रजी शब्द सांगतो.आणि असे त्याने पंधरा मिनिटे घेतले.तसे पाहिले तर ही फार कौतुकास्पद बाब आहे की स्वतःहून सुचने आणि ती गोष्ट अमलात आणणे. त्यासाठीच या मुलांना आम्ही घेण्यासाठी आग्रही असतो. बाकी मुले तर सर्व गोष्टी करतात पण असे वेगळे करणारी मुले ही नेहमीच वरद सारखी, समिहान सारखी असतात.दोनतीन तास कसे गेले समजले नाही. नंतर मग शाळेने चहा नाष्टा मुलांसाठी तयार करून दिला. खेळाचे शिक्षक आणि हॉस्टेल चे सर यांच्याशी चर्चा केली. त्यांच्यासोबत काही फोटो काढले.

अंधार पडत चालला होता. त्यामुळे निघण्याची तयारी सुरू केली. रिक्षा ने मुले पुढे निघाली,मी बाईकवर महेश सोबत निघालो. महेशकडे वरद ची जबाबदारी दिली होती.त्याने ती अगदी मस्त पार पाडली. दिवसभर वरद ची तक्रार येऊ दिली नाही.वाटेतच त्याच्या बाबाचा फोन आला.ते जवळच असलेल्या पळस हॉटेल मध्ये पार्टीसाठी येणार होते.मग मी त्याला हायवे वर सोडले आणि कॅम्पवर परतलो.दुपारीच आम्ही सर्व बॅगा सरपंच वाघ यांच्या घरात ठेवल्या होत्या. मोठा हॉल होता. त्यात आम्ही सर्वजण एकत्र जमलो. काही वेळाने मग आम्ही अरविंद च्या घरी गेलो. तिथं जेवणाची सोय होती.जेवण होण्यासाठी वेळ होता त्यामुळे मी मुलांना कॅम्प फायर साठी नाटक बसवायला सांगितले. मुलांनी गटाने ते सुरू केले. तेवढ्यात दोन पालक येऊन गेले सनिकाचे आई वडील येऊन गेले.त्यांचे काही नातेवाईक तिथे राहतात त्यांना भेटून गेले.मग जेवायला मुले बसली. अरविंदला सांगितले होते की जरी टाऊनशिप मधली मुले असली तरी कॅम्पमधील जेवण च्या बाबतीत ही फार सराव लेली आहेत. अरविंद च्या घरातील मंडळीनी खूप सुंदर जेवण बनवले होते.पापड त्यांनी जवळ जवळ टोपलिभर बनवले होते. एक दोन नवीन मुले सोडली तर बाकीचे हे खूप एन्जॉय करतात. कुठेही लाजणे वगैरे काही नाही अगदी किचन मध्ये जाऊन गप्पा मारून खायची पण त्यांची तयारी असते.मुलांचे जेवण चालू असताना वरद चे आईबाबा आले .वरद कडून त्रास झाला का ते विचारले. त्यांना सांगितले काळजी करू नका. त्यांनाही जेवण करून जायला सांगितले. त्यांना तिथे त्रास देताना दिसला त्यामुळे त्यांनी मला विचारले त्याला घेऊन जाऊ का? मला चांगली खात्री होती की हा पोरगा कॅम्प सोडून जाणार नाही.मी त्यांना सांगितले की मला त्याचा काहीही त्रास नाही तुम्ही त्याला विचारा तो स्वतः येत असेल तर जरूर न्या.तो जायचे नाही म्हणाला.मग त्यांचा नाईलाज झाला. नंतर त्यांना मी कॅम्प फायर चा प्रोग्राम बघुन जायला सांगितले.मुलांनी लगेच जेवल्यानंतर कॅम्प फायर ची तयारी सुरू केली. मुलांनी खुप सुंदर छोटी छोटी नाटके बसवली होती. वरद मध्ये मध्ये मुलांचे डायलॉग बोलत असे. त्याच्या आईवडिलांनी प्रत्यक्ष त्याच्या खोड्या पाहिल्या. शेवटीं मीच त्याला माझ्या बाजुला घेऊन बसलो. कार्यक्रम संपायला जवळ जवळ अकरा वाजले.वरद चे आईबाबा कॉलनीत परत गेले. नंतर लगेच आम्ही झोपण्याच्या ठिकाणी गेलो. मोठा हॉल होता. त्यात भली मोठी सतरंजी अंथरली होती. मुलांना त्या दिवशी विशेष असे दमछाक करणारा एकही कार्यक्रम नव्हता त्यामुळे लवकर झोपणे अवघड होते. सकाळी सकाळी लवकरच उठून समोरील टेकडीवर जायचे ठरले होते.उन होण्याच्या आत मंदिरात परत यायचं होते. त्यामुळे त्यांना झोपायला सांगितले.तरी सर्वजण उशिराच झोपले. पांडे रात्रीच निघून गेले होते त्यामुळे मोठ्यापैकी मी आणि लाडकर दोघेच जण होतो.तो सकाळी लवकर जाणार होता.

सकाळी पाचला उठलो . सर्वांना उठवून तयारी करायला सांगितली. लवकरच टेकडीवर जायचे होते. लाडकर जाताना त्याने मुलाला विचारले येतोस काय ? त्यानेही नकार दिला. त्याला सर्वांसोबत यायचे होते.मग आम्ही सुद्धा ट्रेकला निघालो. अरविंद च्या घरा कडून हा रस्ता जातो त्यामुळे त्याला जाताना दहा वाजता नाष्टा घेऊन जायला येतो असे सांगितले. त्याने सोबत गावातील दोन मुले दिली होती.गावातून नदीच्या तीरावरील रस्त्याने पुढे चालत जात होतो. मंदिराच्या बऱ्याच पुढे गेल्यावर टेकडीवर जायची वाट सुरू झाली.नवीन कच्चा रस्ता तिथे तयार करण्याचे चालू होते.पण टेकडी खूप उजाड होती. पूर्वी अशी कदाचित नसावी.जंगल तोडीचा परिणाम असावा. अर्ध्या तासात आम्ही टेकडीवर पोहचलो. तिथे एका घरात ओटीवर बसलो. तिथे एक वयस्कर व्यक्ती बसली होता. त्याची मुलाखत घ्यायला मुलांनी सुरू केली. त्याच्या बोलण्यातून हे लोक जगापासून तसे दूर असल्याची जाणीव होत होती. त्यांना काकडकोंडी ला जाणारा रस्ता विचारला.त्यांनी तिथूनच तासभर अंतर आहे असे सांगितले. त्यांच्या बाजारहाट , रोजच्या जीवना विषयी माहिती विचारली. मुलांनी चोखंदळ पणाने प्रश्न विचारले. आमच्या सोबत अरविंदने जी दोन शाळेतील मुले पाठवली होती त्यांच्या सूचनेनुसार आमचा ट्रेक चालला होता.गावातील त्यांना चांगली माहिती असल्याने मुलाखत चांगलीच रंगली. नंतर आम्ही लगेच खाली उतरायला सुरुवात केली. वाटेत बऱ्याच ठिकाणी फोटो काढले.टेकडी वरून कंपनी , कॉलनी सर्व दिसत असल्याने मुले ते दृश्य कॅमेरा मध्ये टिपण्याचा प्रयत्न करत होती.सगळेजण खाली पटापट उतरून गेले.खाली गेल्यावर एक ट्रॅक्टर दिसला. त्याला थांबवले . सर्वजण त्यात बसले. देवळाच्या अलीकडच्या ओढ्या लगत मुले थांबली. रस्त्यात छोट्या फुलांची खूप झाडे लागली होती. काहींनी ती गोळा करून आणली होती. ओढ्यात मुलांची पोहण्याची इच्छा होती पण पाणी तसे अस्वच्छ वाटत होते आणि काही ठिकाणी खोल असल्यासारखे वाटत होते. त्यामुळे त्यांना मंदिराकडे घेऊन गेलो. नंतर पोह्यांचा टोप अरविंद कडून आणला. कालच्या मुलांच्या जेवणाच्या अंदाजाने मोठा टोप भरून दिला होता. लाडकर व अजून दोघांनी पोहे नको म्हणून सांगितले. डोंगरावर थोडी बिस्किटे खाल्ली होती.पण मुलांना भूक लागली होती.सर्वांनी खायला सुरुवात केली.मला वाटले टोप अर्धा तसाच राहील पण झाले उलटेच .ज्या तिघांनी पोहे नको म्हणून सांगितले चव तर बघा.पण ज्यावेळी त्यांनी एक प्लेट खाल्ली त्यानंतर चार प्लेट तरी उडवल्या.बघत बघत तो पूर्ण टोप सर्वांनी रिकामा केला. लाडकर ने मला जाताना सांगितले होते की त्याचा मुलगा पोहे खात नाही.पण प्रत्यक्षात अगदी वेगळेच घडले.ही गोष्ट वरवर जरी छोटी वाटली तरी हा एक छोटासा बदल असतो. मुलं स्वतः मध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतात. नंतर काही काळ मुले उरलेली ग्रिटींग काढत बसली. काही जणांनी डायरी लिहायला घेतली. तोपर्यंत बारा वाजून गेले होते.

मग परत अरविंद च्या घरी आलो. तिथे दुपारच्या जेवणाची सोय होती. चवळी बटाटा, भात, वरण, मिरची ,पापड हा इथला स्थानिक लोकांचा लग्नातील पारंपरिक मेनू खास मुलांसाठी तयार केला होता. मुलांची पंगत बसली.मी आणि वरद जवळच सोफ्यावर हॉल मध्ये बसलो होतो.वरद च्या खोड्या मात्र चालूच होत्या. बल्लाळ जेवायला बसला होता. बल्लाळ हा शांत मुलगा.त्याच सर्वांशी चांगले पटते.तो वरद पेक्षा खूप मोठा अंगाने आणि वयाने सुद्धा.पण त्याला याने चिडवायला चालू केले.अरे कमी खा,अजून किती होशील वगैरे वगैरे.बर शांत बस म्हणून हा शांत बसण्याचे नाव नाही. त्याला तेही माहीत असते की तो आपल्या पेक्षा मोठा आहे आपल्याला तो सहज उचलुन आपटू शकतो पण खोड्याना तो आवर घालू शकत नाही. जेवल्यानंतर बल्लाळ ने मला हळूच विचारले याला जरा ठोकू का. त्याला सांगितले थांब जरा सर्वांनी जरा एकत्र या. पाच जण एकत्र आले त्याला मस्तपैकी एक एक पाठीत मारा. सर्वांनी मस्त हात धुऊन घेतला. माझ्या आड कुठेतरी पोरांनी थोकलाच असता.काही वेळा आपल्या चुकीमुळे सर्वांसमोर मार खाल्ला की नंतर चूक करताना विचार करतात. सम्हीहांन अशाच खोड्या करायचा.खांब येथील ट्रेकला तो मुलींची केस ओढ,कुठे टपली मार, कुणाचा तरी पाय ओढ असे चालू असायचे.तो त्याच्या वयाच्या मानाने मोठा दिसायचा त्यामुळे बरेचजण दुर्लक्ष करत. एकदा प्रणाली रोडे त्याची तक्रार घेऊन आली.त्या पाच सहा जनी होत्या .त्यात घोलप , गांधी, श्रिया, मोडक आणि प्रणाली होत्या. घोलप त्यांच्यात जरा हट्टी कट्टी तिला सांगितले की आता त्याने खोडी काढली की तुम्ही एकत्र या तू त्याचे तोंड धर आणि बाकीच्यांनी पाठीत चांगले हाताचे रत्त्ते लाऊन द्या.थोड्या वेळाने समिहन माझ्याकडे आला आणि तक्रार केली त्या पोरीनी मला ठोकले म्हणून. त्याला विचारले तू काय केलेस.तो म्हणाला डोक्यात टपली मारली की असं मारायचं अस्त का? त्याला सांगितले आता परत खोड्या करशील तर परत तोच प्रकार होईल तुझं तू बघ.मग तो प्रकार कमी झाला.

काही पालक त्या दरम्यान आले त्यांनाही जेवण करायला सांगितले. अरविंदने जेवणाची अतिशय उत्तम व्यवस्था केली होती.जेवण झाल्यावर सर्वजण परत वाघ यांच्या घरात आलो. दुपारी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेतल्या. चारच्या दरम्यान मुलांना आवराआवर करायला सांगितले. जाताना अरविंदला भेटलो. अरविंदला त्याच्या एकूण खर्चाच्या बाबतीत विचारले. त्यानंतर त्याचे पैसे दिले.त्याच्या घरातील सर्वांचे आभार मानले.आपण पैसे मोजून हॉटेलात सुद्धा जेवतो पण या खेड्यातील जेवणाची सर कुठेही येऊ शकत नाही कारण पैशापेक्षा जास्त आपण केलेल्या पदार्थांची चव सर्वांच्या जिभेवर रेंगाळत राहिली पाहिजे अशी या अन्नपूर्णे ची अपेक्षा असते. त्यामुळे त्यांच्या मेहनतीचा नेहमीच मान राखला पाहिजे.

नंतर मग अरविंद च्या गाडीत नऊ मुले बसली. बाईकवर माझ्यासोबत एकजण बसला. लाडकर च्या गाडीत काहीजण बसले.प्रथमेश आणि पार्थ नागोठणे येथे उतरले.अरविंद च्या गाडीत वरद होता. त्यामुळे जरा काळजी होती.मी बाईकवर होतो . त्यांच्या पाठोपाठ चाललो होतो. खरतर त्याला पुढच्या सीटवर बसण्यासाठी सांगितले होते पण पुढील मुलाने त्याला मागे जायला सांगितले. याचा तसा काही नेम नसतो कारण हा गाडीचे हॅण्डल पण मध्येच फिरवू शकतो.मागे बसल्यावर कुणितरी त्याची वस्तू बाहेर टाकली.याने चालत्या गाडीचा दरवाजा उघडायचा प्रयत्न केला. तिथे बल्लाळ असल्याने त्याला पकडून ठेवला.मी पाठीच होतो पण मी बाईक वरून काही करू शकत नव्हतो. उतरल्यानंतर राव ची जरा कानउघाडणी केली. त्याच्यामुळे वरद ला मागे बसायला लागले होते.समोर अरविंदने त्याला बरोबर सांभाळले असते. मला शंका होती त्यासाठी पुढे बसवण्याचे नियोजन होते. त्याला अशा चुका महागात पडू शकतात असे समजावले. टाऊनशिप मद्ये पाच वाजता आम्ही पोहचलो. आमच्या अगोदर लाडकर आला होता.


7 views0 comments

Recent Posts

See All

Drama journey on Maharashtra Freedom Fighters

In our township every clubs, groups arranged many programs .We always involved in their activities. We always helped them and took lot of benefits like interviews of big personalities , infrastructure

Comentarios


bottom of page