मी आणि माझा मित्र दीपक घोडके दोघेजण अमरनाथ यात्रेला निघालो होतो.१९९७ साला तील ही एक आठवण आहे. आम्ही १ ऑगस्ट १९९७ ला सकाळच्या स्वराज एक्सप्रेस ने निघालो .ही ट्रेन बॉम्बे सेंट्रल वरून सुटते. हिला जम्मू तावी एक्सप्रेस असेही म्हणतात. प्रवास सुरू झाल्यावर आम्ही दोघे मॅप काढून बसलो. काश्मीर पर्यटन वर एक पुस्तकही आणले होते. आमचे यायचे आणि जायचे रेल्वे तिकीट बुकींग झालेले असल्याने आम्ही यात्रे व्यतिरिक्त काही पाहता येईल का याची चर्चा करत होतो. आमचा प्लॅन तयार होता त्यानुसार आम्ही प्रथम मुंबई ते जम्मू ट्रेन मध्ये प्रवास, जम्मू ते पहेल गाम बसने, नंतर पाहेलगा म ते चंदनवाडी, चंदनवाडी ते शेषनाग, शेषनाग ते पंच तरीनी, पंच तरिनी ते पवित्र गुफा हा सर्व ४५ किलोमीटर लांबीचा प्रवास पायी जायचे होते.नंतर अमरनाथ गुफा ते बलतल चालत प्रवास.नंतर गुलमर्ग, सोन मर्ग , श्रीनरमधील ठिकाणे बघून परत कतरा येथे वैष्णो देवी चे दर्शन घेऊन परत जम्मू. जम्मू ते मुंबई ट्रेन ने परत. ही चर्चा सुरू झाल्यावर मधेच समोरील एका व्यक्तीने मला विचारले आम्ही तुमच्या सोबत येऊ शकतो का? मग त्यांनी ओळख करून दिली. त्यांचा दादर परिसरातील सहा जणांचा ग्रुप होता. त्यामध्ये समुद्रये पिता पुत्र , तिघेजण गुजराथी मित्र होते.मग त्यांनी आमचा प्लॅन समजून घेतला.
दादर येथील शिवाजी पार्क येथील नामवंत आयुर्वेदिक डॉक्टर केतकर आहेत. त्यांचा अमरनाथ यात्रा करण्याचा हेतू त्यांनी सांगितला.ते म्हणाले काही महिन्यापूर्वी त्यांच्या दवाखान्यात एक साधू आला.त्यांनी साधूला पाहताच टेबलाच्या खणातून थोडे पैसे काढले व त्यांना देऊ केले. परंतु साधूने नकार दिला. त्याने सांगितले की तुझ्यासाठी एक वस्तू घेऊन आलो आहे त्याचा स्वीकार करणे. त्याच्या कफनी मधून एक पितळे चे शिवलिंग काढले आणि डॉक्टरांना देऊ केले. त्यांना आश्र्चर्य वाटले . साधूने त्यांना एक विनंती केली की या मूर्ती चे योग्य ठिकाणी विसर्जन कर.त्यांनी कारण विचारले. नंतर साधूने थोडे पाणी मागितले. पाणी आणावयास डॉक्टर आत गेले.परत बाहेर आले तोपर्यंत साधू निघून गेले होते. आसपास पाहिले परंतु कुणीच नव्हतं.मग त्यानी त्या पितळे च्या मुर्ती ला पाण्याने स्वच्छ करून त्यांच्या देव्हाऱ्यात ठेवले. नंतर त्यांच्या डोक्यात विचार आला की विसर्जन कुठे करावे.मग विचार आला की अमरनाथ गुहे बाहेरील नदी पात्रात करावे.मग त्यांनी अमरनाथ यात्रेची तयारी केली.मला त्यांनी ती मूर्ती दाखवली. खरोखर खूप सुंदर होती.
केतकर आता प्रवासात चांगले मित्र झाले होते. त्यांना बरीच चांगली माहिती होती. जम्मू मध्ये पोहचल्यावर आम्ही रघुनाथ मंदिर परिसरात लॉज निवडला.त्यांनी आम्हाला मंदिर दाखवले.त्यातील तेहतीस कोटी देव दाखवले. तेथील स्फटिक पासून बनवलेल्या शिवलिंग मूर्ती दाखवल्या. प्रत्येक राजाच्या स्मरणार्थ या पिंडी ठेवल्या आहेत.स्फटिक हा दगड सर्व ठिकाणी मिळत नाही. अशी बरीच माहिती सांगितली. दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही सकाळी चार वाजता पोलिस मैदानात आलो. तिथे सर्व बस उभ्या होत्या. आदल्या दिवशी जम्मू येथील बस आगारात यात्रा पास दाखवून बस तिकीट काढून आणली होती.त्यावर बस नंबर लीहले होते. आम्ही त्या बसमध्ये बॅगा चढविल्या. आपल्या बरोबर सर्व आहेत का ते पाहिले. डॉक्टर केतकर गायब होते. दिपकने बस कंट्रोलर ला भेटून नावाची घोषणा केली. केतकर सापडले.मग प्रवास सुरू झाला.सकाळीच जम्मू सोडले.सर्व प्रवासी यात्रेसाठी आलेले होते. आम्हाला सूचना केली होती की मध्ये कुठे ही गाडी थांबवायची नाही. कुणालाही मध्येच घ्यायचे नाही.केतकर तसे धार्मिक प्रवृ्ती चे होते .मध्ये बऱ्याच चर्चा झाल्या. त्यांनी लग्न केले नव्हते. मी त्यांना कारण विचारले नाही.मला त्यांनी नर्मदा परिक्रमा बद्दल माहिती सांगितली. त्यांनी ती परिक्रमा केली होती.त्यातले अनुभव सांगितले. मला त्यांनी एक विनंती केली की तुझ्या प्रोग्राम मध्ये थोडा बदल करशील का? त्यांनी सांगितले की कोणतीही यात्रा , परिक्रमा ही ज्या रस्त्याने आलो त्याच मार्गे रस्त्याने पूर्ण करायची असते. आपण त्याचं मार्गे परत येऊ. श्रीनगर मार्गावरून न जाता परत शेषनाग मार्गे परत पहलगाम येथे परत येऊ.आमची खरं तशी इच्छा नव्हती. पण काय करणार केतकरांच्या मागणीला नाही म्हणता येईना. मग प्रोग्राम बदलला.
जम्मू ते पहेल गाम प्रवास हा पोलादपूर ते वाई प्रवास करण्यासारखेच आहे .फरक फक्त एवढाच वाडा ते महाबळेश्वर हा प्रवास २२ km आहे त्याच्या ऐवजी तो १०० किमी होईल.तशीच वळणे चढ उतार. सभोवताली फक्त झाडे निराळी.तिथे करवंदाच्या जाल्या प्रमाणे सफरचंदाची झाडे. अंजन, कंजन, अर्जुन, बेहडा प्रमाणे देवदार, सुरू या झाडांची रेलचेल. पटणी टॉप हा तर आपल्या प्रतापगड सारखाच म्हणा हवं तर. परंतु जसं आपण पावसात आंबेनळी घाटातून प्रवास करताना धुक्यातून जातो तसे इथे थंडीत बर्फातून जावे लागते.पण प्रवास खूपच सुंदर. जवाहर टनेल हा एकमेव मार्ग जो जम्मू आणि काश्मीर ल जोडतो. जवाहर टनेल सोडलं की काश्मीर सुरू होतो. मिलिटरी चा बंदोबस्त एवढा जबरदस्त होता की प्रत्येक पाच गाड्यांमध्ये एक मिलिटरी ट्रक . ट्रकवर AK ४७ घेऊन सैनिक उभे होते.काही ठिकाणी रस्त्यावर चेकिंग चालू होती काश्मिरी लोकांच्या रांगा लागल्या होत्या. जवान सर्वांची झडती घेत होते. कोणतीही घातपात घडवून आणला जाऊ शकतो त्यामुळे कुणालाही सोडत नव्हते.खरतर सुक्याबरोबर ओलही सुद्धा जळते तसा प्रकार वाटला. निरपराध लोकांनाही त्याचा त्रास होतो. परंतु लोकांची सुरक्षा महत्त्वाची हे ब्रीदवाक्य असल्याने ते घडत होते.आम्ही पटनी टॉप,राम बन गाव येथे ट्रकच्या टपावर बसून फोटो काढले. जवाहर टनेल सोडलं आणि अगदी खोपोलीच्या घाटातून पावसाळ्यात कर्जतला आल्यासारखं वाटलं. आजूबाजूला भातशेती दिसते तशीच रस्त्याच्या दुतर्फा खाच्रे दिसत होती. घाट उतरल्यावर प्रथम अनंतनाग शहर लागले. तिथून एक रस्ता श्रीनगर कडे जातो तर एक पहेलगाम येथे जातो. गावाजवळ पोहचल्यावर सर्व गाड्या थांबल्या .गाड्या चेक करून पाठवत होते . रस्त्याच्या बाजूला एका मोठ्या नदीचे पात्र दिसत होते. लिदर नदी.पाण्याचा प्रचंड मोठा प्रवाह, पाण्याचा रंग अगदी नेहमी सिनेमात काश्मीर पाहतो तसा बेताब , नुरी मध्ये पहिला होता अगदी तसाच. केतकर खूप खूष झाले. पाण्यात उतरायची इच्छा झाली परंतु पाण्यात हात घातला तर अतिशय थंड पाणी.मग काय कसली डेअरिंग होतेय पाण्यात उतरायची.साधारण अंधार पडल्यावर तिथे पोहचलो. उतरल्यावर एका जागी जमा झालो.हॉटेल शोधुया असे ठरले.समुद्रे कुटुंबाचे समान घेण्यासाठी एक हमाल बोलावला.मी येताना स्वेटर आणला नव्हता. तिथं बाहेरच स्वेटर वाला बसला होता. त्याच्याकडून विकत घेतला.मग आणि शोध मोहीम सुरू केली.मध्येच केतकर म्हणाले आपण गावात कुणाच्या तरी घरी राहू.मला कल्पना आवडली.मग तसा शोध सुरू झाला. वाटेत तो हमाल तिकडे त्याला पित्थू बोलतात तो म्हणाला साहेब तुम्ही माझ्या घरी या ,जर माझे घर आवडले तर माझ्या घरी राहा.मग आम्ही बरीच चर्चा केली. पिथू मुस्लिम समाजातील असल्याने जेवण वगैरे वगैरे विषयावर चर्चा झाल्या.मग असे ठरले की प्रथम घर पाहून निर्णय घेण्यात येईल. त्यानं त्याचं घर दाखवले.एक मजली लाकडी वास्तू होती. घरात गालिचा अंथरलेला होता.घरात गेल्यावर त्याने त्याच्या बायकोची ओळख करून दिली. अगदी काला बुरखा घालून वगैरे नव्हती. अगदी टिपिकल काश्मिरी स्त्री. घर एकदम स्वच्छ. स्वयंपाक संदर्भात चर्चा केली. त्यांच्या कडे सणामध्ये,लग्नामध्ये जे काही शाकाहारी पदार्थ तयार होतात ते करता येतील का याची चौकशी केली.सर्वजण तयार झाले. त्याची हॉटेलमधून जेवण आणावयाची तयारी होती. परंतु मी केतकर डॉक्टरांना सांगितले इथले स्थानिक जेवण टेस्ट करण्यात काय हरकत आहे.मग सर्वजण तयार झाले फक्त शाकाहारी या अटीवर. त्याला आम्ही पैसे देऊ लागलो तो म्हणाला शेवटी जाताना द्या. तुम्हाला योग्य वाटतील तेवढे द्या.
त्या गावात शिरताना सीआरपीएफ ची एक चौकी लागली. आम्ही गप्पा मारत चाललो होतो. तेवढ्यात कुणितरी हाक मारली' ओ गाववाले' खास सातारी ठेचात हाक मारली असल्याने मागे वळून पाहिले. त्यांनी चौकशी केली.मी नाव विचारले. त्याने कणसे असे सांगितले. मी लगेचच आंगापुरचे का असे विचारले.अंगापुर हे गाव जगप्रसिद्ध आहे ते फक्त मिलिटरी मधील त्यांच्या सहभागाबद्दल.इथे एक घर असे नाही ज्यात मिलिटरी मधील कोणी नाही.फार वर्षा पूर्वी तर इथं गावात रात्री सात वाजल्यापासून गाव बंदी असायची. कारण गावात फक्त वयोवृद्ध , मुले आणि स्त्रिया असायच्या. अंगापुर शुरांचे गाव आणि सातारा शुरांचा जिल्हा ओळखलं जातं. कणसे नी आम्हाला भेट घ्यायला या असे सांगितले. त्या पिठू कडे गेल्यावर थोडावेळ विश्रांती घेतली.नंतर सीआरपीएफ कॅम्प बर गेलो. केतकर खूप त्रासले होते. त्यामुळे त्यानी नाही म्हटलं.मग मी आणि दीपक दोघेजण कॅम्प वर गेलो. गेटवर आमची चौकशी केली. आयडी विचारले , तेव्हा आयपीसीएल चे कर्मचारी असल्याने लगेचच आत सोडले.आत वेगवेगळ्या बराकी होत्या. तंबू होते. तेवढ्यात आम्हाला कणसे दिसले. आतमध्ये घेऊन गेले सर्वांची ओळख करून दिली. एवढ्या लांबवर जेव्हा आपला माणूस भेटतो तेंव्हा जो आनंद होतो तो कणसे यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.मग त्यांनी काही सरबत वगैरे घेता का विचारले. आम्ही नको सांगितले. सरबत साठी स्पेशल लाकडी देवदार वृक्षाची बनवलेली ग्लासे होती.मग कणसे नी आम्हाला फिरायला नेले. मिलिटरी जीप मध्ये फिरायला निघालो. आम्हाला वाटले कणसे ड्रायव्हर असेल. आम्ही त्याला विचारलं.तो म्हणाला ब्लॅक कॅ ट कमांडो असून तिथल्या मेजर चां अंगरक्षक आहे. छोटीसी पिस्तूल दाखवली. आम्ही जीपमधून फिरत एका मोठ्या बंगल्याच्या आवारात प्रवेश केला. थोडा अंधार पडला होता.त्याने गाडी बंद करून हातातील टॉर्च ने तीन वेळा उघडझाप केली. आम्हाला काही कळत नव्हते.पण ती code language होती.मग बंगल्यात शिरलो. एका मोठ्या झोपाळ्यावर एक हट्टा कट्टा , गोरापान आणि सहा फूट उंच गडी बसला होता. कणसे ला काही न विचारता आम्हाला म्हटले कुटून आलात. यांची भेट कुठे झाली.आम्ही खरं काय ते सांगितले.मग नाष्टा दिला. कुठं ही एकटे फिरू नका असे सुचवले.मग आम्ही परत निघालो.कणसे ने आम्हाला गावात सोडले.तोवर जेवणाची तयारी पूर्ण झाली होती. केतकरांनी मुलाखत घेतली. त्यादिवशी प्रवास खुप झाला होता त्यामुळे लवकर झोप लागली.
समुद्रे आजोबांचे पाय दुखत असल्याने सकाळीच तो काश्मिरी युवक त्यांचे तेलाने मसाज करत होता.सकाळी सर्व आटोपल्यावर त्याला पुढील प्रवासाची तयारी करायला सांगितली.त्याने एक निरोप आणला की फक्त २००० लोकांना दररोज सकाळी सोडणार आहेत.तर उद्यासाठी आजच नोंद करा.मग केतकर आणि मी जाऊन नोंदणी केली.तो दिवस तिथेच काढला. लीदर नदीचे पात्र जवळून पाहिले.गावातील शंकराचे मंदिर पाहिले. केतकर व आम्ही सर्वजण त्या काश्मिरी युवका कडून खूप काही जाणून घेतलं. तिथल्या स्थानिक प्रश्नापासून ते तिथल्या राजा पर्यन्त सर्व चर्चा झाल्या. लष्कर विषयी कडवटपणा, पर्यटनात जेवढे पैसे मिळतील तीच मालमत्ता. सतत ची कर्फ्यु ची वादळे, अतिरेकी वा सैनिक दोघांकडून होणारी प्रतारणा. मुलाचं ना शिक्षण ना काही काम यामुळं ते सर्वजण अगदी पीचलेले होते.सर्व पुढारी, व्यापारी त्यांची मुले एक तर जम्मूत नाहीतर दिल्लीत.सर्व जमिनीही पंडीत किवा गब्बर पुढाऱ्यांच्या, राजघराण्यातील लोकांच्या नावे होत्या. काश्मिरी लोकांच्या भाषेत भारत देश म्हणजे खूपच परका. फक्त सिनेमात काय तो भारत पहायचा.बऱ्याच जणांना तर राज्ये किती , केंद्र सरकार काय काम करते…काहीही माहिती नाही. मुंबई मात्र सर्वांची लाडकी कारण तिथं सिनेमातले कलाकार राहतात. आम्हाला असे विचारायचे की आम्ही अमिताबच्या बंगल्या शेजारीच राहतो. अतिशय आकर्षण ते मुंबईचे.
दुसऱ्या दिवशी सकाळी आमचा प्रवास सुरू झाला . चंदनवाडी मार्गे निघालो. वाटेत बेताब सिनेमा मधील जो काश्मीर चां भाग दाखवला आहे तो दिसतो. त्याला इथ बेताब व्हॅली च म्हणतात. सुरवातीपासूनच आमच्या बरोबच्या लोकांनी पिथु सोबत घेतल्याने ते अगदीं मजेत चालले होते. माझ्या बॅगेत जवळ जवळ ६० लाडू होते. माझी एवढी बाग बघुन परत फिरणाऱ्या लोकांनी वजन कमी करा असे सांगितले.मी त्यांचं एकले नाही.नंतर माझी दमछाक झाली. डॉक्टर केतकर आणि दीपक दोघेजण माझ्यासोबत होते. समुद्रे आजोबांचे पाय दुखत होते त्यामुळे घोड्यावर बसून प्रवास करत होते.चंदन वाडी नंतर पिस्सू टॉप नावाचा एक भाग येतो.तिथे एक दरी आहे. पिसू टॉप येथे एका राक्षसाला मारले होते. त्यावरून हे नाव पडले आहे. तसेच शेषनाग तलावाचा उल्लेख बरयाच पौराणिक कथा मद्ये आहे. थितून जाताना दिपकने फ्रूट जुस पॅकेट पायाने फोडले. मोठा आवाज झाला. दरीत तो आवाज घुमला..दोन मिनिटात सर्व शांतता. घोडे वाले, हमाल यांनी जमिनीवर लोळण घेतली. आम्हाला काही कळत नव्हते. कुणी काय केले कुणालाही समजलं नव्हतं. आम्ही जागेवर ठाम उभे. गास्तीच्या जवानांनी लगेच बंदुका सज्ज केल्या. कधीही अतिरेकी कारवाया होऊ शकतात त्यामुळे ते सज्ज झाले.नंतर आमच्या पितूने सांगितले परत असे करू नका. त्याचा त्रास आम्हाला होईल.मग दरीतून वर आलो. वरच्या टप्प्यावर जवान आमच्यासाठी पाणी घेऊन उभे होते.समोरच हल्दीराम ग्रुप यांचा नाष्टा तयार होता.तो आम्हीं खात असताना मी केतकर यांना विचारले आपण माझ्याकडचे लाडू जवान टीम ला देऊया.वजन सुद्धा कमी होईल.मग लगेच सॅक उघडली व सर्व ६० लाडू समोर ठेवले.ते दहा जण होते. सर्वांनी लाडू फस्त केले. मला आनंद वजन कमी झाल्याचा ज्यास्त होता.मग आम्ही शेषनाग ची दिशा पकडली. साधारण चार वाजता तिथे पोहचलो. पोहचल्याची नोंद केली. आम्हाला सहा जणांना एक tent दिला होता.समान वगैरे ठेवले. बाहेर आलो तर दूरवर पाऊस पडत होता. सूर्य दर्शन सुद्धा होत होते. त्यामुळे छान इंद्रधनुष्य पसरला होता. आम्ही पर्वतावर होतो.खाली दरीमध्ये शेषनाग तलाव दिसत होता.तलावातील पाणी म्हणजे असे दिसत होते की डिश मध्ये icecream तेसुध्दा निळसर झाक असलेले. त्यात इंदरधनुष्याचा असलेला भाग.एकदम झकास.. समोरील पर्वत बर्फाचे आवरण घातले ली टोपी दिसत होती. त्याचे काही फोटो काढून आम्ही तंबु कडे परतलो. हिमालयाच्या प्रेमात लोक का पडतात. परदेशी पर्यटक महिनोन्महिने इथे का भटकतात हे जोपर्यंत आपण भटकत नाही तोपर्यंत नाही कळणार. एखादे दृश्य, प्राणी, पक्षी पाहण्यासाठी हे लोक एवढ्या लांब येतात. खरतर आपल्या लोकांना या गोष्टी नवीन नाहीत परंतु दृष्टीकोन वेगळा असतो.पण एक नक्की दऱ्या खोऱ्या फिरल्याने आपल्या आठवणीच्या कप्प्यामधे त्यांची कायमची जागा तयार होते.
शेषनाग येथे जवळ जवळ दीडशे तंबु होते. शेषनाग समुद्रसपाटीपासून १४००० फुटावर आहे. जून ते ऑगस्ट महिन्यात इथे उन्हाळा असतो. उन, वारा, पाऊस , गारा असे समिश्र वातावरण असते. इथे मेंढपाळ यांच्या व्यतिरिक्त कुणी येत नसावे. मेंढ्या साठी काही अंतरावर दगडाची घरे केलेली दिसली. काही ठिकाणी मोठे गोल खड्डे तयार केले होते . पाळीव प्राण्यांची शिकार होऊ नये यासाठी योजना केली असावी. मेंढपाळ लोकं वेगवेगळ्या उंचीवर वेगवेगळ्या वेळी येतात. जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात हे लोक शेषनाग परिसरात किंवा साधारण १२००० फुटावर भटकतात.यांना वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. मेंढपाळ हा त्या त्या ठिकाणचा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्या त्या परिसरात फिरल्याने बऱ्याच घडामोडी जैविक विविधते मध्ये घडत असतात. यांना कुठे रायका, कुठे धनगर म्हणतात. आपल्याकडे मेंढपाळ लोकं पूर्ण महाराष्ट्रात हिंडतात . परिसर पाहून झाल्यावर बरीच भूक लागली होती.मग अंधार पडल्यावर लंगर कडे गेलो. डॉक्टरांनी फक्तं स्वीट डिश खाल्ली. भाजी भोपळ्याची होती.अजून एक भाजी सारखं काहीतरी दिसले . मी चपाती बरोबर ती भाजी खाल्ली. थोडी आंबट होती. खरंतर ते काय होते मला कळले नव्हते.जेवण झाल्यावर तंबुकडे परतलो. बाहेर बऱ्यापैकी थंडी सुरू झाली होती. परंतु तंबु मध्ये विशेष जाणवत नव्हते. दिवसभर जवळजवळ सतरा किलोमीटर चालल्यामुळे शरीर थकले होते. पटकन झोप लागली.
रात्री अचानक एका एकी छातीत दुखायला लागले. मला उठता बसता किंवा उभे राहता येत नव्हते. प्रचंड दुखत होते.मला वाटले इथेच आपले संपले. येताना पिस्सु टॉप पाशी एक पाटी बघितली होती त्याबद्दल पिठूने मला सांगितले होते की इथे एक जण संपला त्याच्या इच्छेनुसार त्याचा शेवटचा विधी तिथं पायथ्याशी केला होता. आपल्या बरोबर असेच घडणार असे वाटले. कुणाला उठवावं कळेना. दीपकला उठवले .त्याने मग डॉक्टरांना हलवले.मला त्यांनी चेक केले. नक्की कुठे दुखत आहे ते विचारले.मग त्यांनी जेवताना काही आंबट खाल्ले काय ते विचारले.मग त्यांनी दोन गोळ्या दिल्या आणि सांगितले हा एक अॅसिडी टी सारखा प्रकार आहे. लगेच बरे वाटेल. तेवढ्यात शेजारीच एकाच्या पायाला दुखू लागले.तो मोठ्याने ओरडत होता.दीपक कडे एक स्प्रे होता.त्याने लगेच काढला आणि त्याच्या पायावर मारला. माझे दुखणे तर मी विसरलोच. आम्ही दोघं मिळून त्याचे पाय चोळत होतो. आणि खरोखर जादू झाली. दोघांचेही दुखणे पळाले. लगेच झोप लागली.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच उठून महागणी मार्गे पंच तरीनी गाठायचे होते.हा तसा सोपा मार्ग होता अगदी आपल्या हरिश्ंद्रगडावरील पठारावर चालण्यासारखे. थोडी सपाटी थोडा चढ उतार पण मजेशीर प्रवास. समुद्रे आजोबांचे घोडे असल्याने बऱ्याच वेळा ते मध्ये थांबत कारण घोड्यावर बसून अवघडल्यासारखं हॉयचे. अर्ध्या किलोमीटर पाणी, नाष्टा यांचे स्टॉल लावण्यात आले होते.काही लष्कराचे तंबु होते.तिथं चोवीस तास सैनिक तैनात होते.एक हेलिकॉप्टर मध्येच फेरी मारत होते. महागानी पासून पंचातरणी पर्यन्त उतार आहे.समोर नदीचं पात्र दिसते. नदीचे नाव पंच तरिणी असावे. नदीच्या तीरावर तंबु वसवलेले दिसले. येथून दिवसाला फक्त दोन हजार जणांना सोडतात.मग आम्ही पवित्र गुफे कडे निघालो.साधारण दोन वाजले होते. तिथून सहा किलोमीटर अंतरावर ठिकाण आहे. केळकर यांनी आजच जाण्याचा हट्ट धरला. मग आम्ही सर्व सामान तंबूत टाकून निघालो. थोडेशे काही सामान घेतले.हा रस्ता पूर्ण बर्फातून होता. चिखल वजा बर्फ तुडवत चाललो होतो. गुफेच्या परिसरात वातावरण फार वेगळे होते.एका दरीत वसलेलं ठिकाण आहे.दोन कड्यामधून एक नदीचे पात्र होते. त्यात घट्ट झालेला बर्फ होता. कुठेतरी मध्येच पाणी बर्फाच्या खालून येत होते.लांबूनच एक प्रचंड मोठी गुहा दिसत होती. लोकाची गर्दी लांबूनच दिसत होती. डॉक्टर केतकर प्रचंड खूष झाले. मला सांगितले चल नदी कडे जाऊया. नदीकडे गेल्यावर डॉक्टर केतकर म्हणाले ईथे आंघोळ करून मगच दर्शन घ्यायचे . बर्फाचे खालील पाणी बघुन मला तर लांबूनच भीती वाटली. दीपक सुद्धा तयार झाला. कपडे काढून पाण्याच्या किनारी बसलो.पाण्यात फक्त हात घातला. विजेचा झटका बसल्यासारखे झाले. परंतु डॉक्टरांचं म्हणणं एकायचे ठरवले. पाण्यात उतरलो . जेवढा भाग पाण्यात होता तो बधीर झाला होता. पूर्ण शरीर पाण्यात टाकल्यावर झटका बसल्यासारखे बाहेर आलो. थोडावेळ कुठे आहोत तेच कळत नव्हते.मग मात्र जरा बरे वाटू लागले.त्या वातावरणाशी आता समरस झालो होतो. नदीच्या तीरा पासून साधारण पाचशे मीटर अंतरावर पवित्र गुहेचे द्वार आहे. गुहेमधये बर्फाचे शिवलिंग तयार होते.ते साधारण जुलै महिन्यात दिसते.तसा इथे वर्षभर बर्फ असतो. सभोवताली सर्व ठिकाणी डोंगर रांगा आहेत. भीमाशंकर सारख्या दऱ्या इथे आहेत.
गुहेत शिरताना ट्रॅकिंग चे बूट बाहेर काढून ठेवले. गुहेतील बर्फाचे पाणी होऊन वाटेतून वाहत होते.त्यातून जाताना प्रचंड गर लागत होते.पाय अवयव आहे की नाही कळत नव्हते. दर्शनाला पाच मिनिटाच्या वर थांबू शकत नव्हते. गर्दी सुद्धा होती. इथले स्थानिक लोक शंकराला बाबा नावाने उच्चारतात. फक्त हिंदूच नाही तर मुस्लिम समाजातील लोक सुद्धा भेट देतात. घोडेवाले, हमाल, तंबुवले, जवळ जवळ सर्वच जण मुस्लिम आहेत.पण मी माझ्या डोळ्यांनी पाहिले की सर्व जण व्यवसाय करणारे दर्शन घेऊन गेले ले दिसले. अमरनाथ यात्रेची कहाणी आहे.यात देवाला कबुतरांच्या जोडीमद्ये पाहतात. विशेष म्हणजे या अशा निर्जन, बर्फाळ प्रदेशात कबुतरे कशी काय तिथं असतात हे गूढच आहे. तिथं एकही झाड नाही साधे गवत सुद्धा दिसत नाही. अशा ठिकाणी पूर्वी लोक कसे काय येत असतील.सर्वच इथे गूढ वाटते. केतकरांनी त्यांना साधू ने दिलेले शिवलिंग तिथे अर्पण केले. त्यांचा निश्चय पूर्ण केला.मग आम्ही परतीच्या वाटेवर चालत निघालो. पंच तरिनी जाईपर्यंत अंधार पडला होता. तिथं जेवणाची व्यवस्था चांगली होती. विशेष म्हणजे तिथे लष्कराने एसटीडी ची सोय केली होती. त्यावेळी मोबाईल ची सोय नव्हती त्यामुळे एसटीडी हेच एक माध्यम होते. तिथं खूप रांग होती. फोन करून झाल्यावर आम्ही तंबु मध्ये परतलो. जवळच लंगर मध्ये जेवलो. त्यादिवशी सुद्धा बरीच पायपीट झाली होती. त्यामुळे सर्वच जण दमले होते.समुद्रे आजोबांची गळ्यातील चैन कुठेतरी पडली होती. त्यामुळे ते जरा चिंतेत होते. त्यांना म्हटलो कदाचित पहेल गाम् मध्ये पिठ्यु कडे राहिली असेल.मग त्यांना जरा बरे वाटले.
दुसऱ्या दिवशी आम्ही ठरवले की एक दिवस वाचवण्यासाठी महगणी चढ घोड्याने चढायचं आणि मग उतार च उतार. त्याप्रमाणे आम्ही सर्व जण पहाटेच उठलो आणि अगदी सूर्य उगवताना आम्ही महागनी येथे पोहचलो. जाताना काही पॉइंट बघायचे राहिले होते ते आवरजुन पाहिले. मध्ये एक छानसा धबधबा लागला होता. तिथं आम्हाला स्थानिक कुटुंब भेटले होते. त्यांच्यासोबत फोटो काढले.सर्व उतार असल्याने आणि अगदी हरिश्ंद्रगडावरील पठारावरील उतारा सारखे. शेषनाग मार्गे पिसु टॉप वरून आम्ही चंदनवाडी ल उतरलो. सर्वांची वाट पहात तासभर गेला. चंदनवाडी हे म्हणजे आपल्या पोलादपूर सारखे.वर प्रचंड डोंगर दऱ्या, खळा खला वाहणारी नदी.इथे मात्र बारमाही वाहणारी. सनी दओल आणि अमृता सिंग यांच्या बेताब सिनेमातील सर्व चित्रीकरण याच परिसरात झाले होते. चंदनवाडी येथे एक प्रायव्हेट बस मिळाली आणि पहेल गाम येथे पोहचलो.प्रथम त्या पिथू चे घर गाठले. त्याला आम्ही चैन मिळाली आहे का विचारले.त्याने सांगितले त्याच्या बायकोला मिळाली. खरतर तो खोटे बोलून चैन लंपास करू शकत होता. त्याच्या परिवाराच्या प्रामाणिक पणाचे कौतुक करावे तितके कमीच होते. समुद्रे आजोबांची गळ्यातील चैन मिळाली . त्यांनी त्यांना बक्षीस देऊ केले. त्या काश्मिरी कुटुंबाने नाकारले
त्याने सांगितले परत आलात की त्याच्याकडेच रहा.मग आम्ही त्या दिवशी त्याच्या कडेच मुक्काम केला. काही खरेदी केली. स्वेटर , शाल विकत घेतल्या. त्या काश्मिरी कुटुबप्रमुखा ला त्यांचे राहण्याचे, खाण्याचे पैसे किती दयाचे विचारले.तो म्हणाला साहेब तुम्ही तुमच्या इचछेनुसार द्या. आम्ही त्याला सांगितले तू तुझ्या हिशोबाने हवं तर तुझ्या बायकोला विचारून सांग .त्या दोघांनी सहाशे रुपये द्या सांगितले. हे पैसे कमी वाटले म्हणून आम्ही त्यांना हजार रुपये दिले. दोघेजण खूप खूष झाले. त्यानी त्या दिवशी त्यांचेकडे लग्नात करतात त्या काश्मिरी डिशेस केल्या होत्या. जेवण आटपून आम्ही परत निघालो. तिथून जम्मू कडे निघालो. जाताना सुद्धा जागोजागी चेकिंग चालू होते. लष्कराच्या गाड्या गाड्यांच्या ताफ्यात मागे पुढे चालत होत्या. त्यांच्या टेम्पोत गन रोखून नियंत्रण चालू होते. जम्मूत संध्याकाळी परतलो.
तिथूनच कट रा येथे पोहचलो. हॉटेल शोधले .तिथं सामान ठेवले. मग वैष्णो देवी येथे जाण्याचे नियोजन केले. डॉक्टर व त्यांचा ग्रुप चालण्याच्या बाबतीत थोडा ढील असल्याने. आम्ही बऱ्याच वेळा पुढे निघून जायचो. आम्ही सकाळी चालायला सुरुवात केली. सर्वांचं चेकपोस्ट ला तिकिट काढून रस्त्याने तर कधी पायरी ने वाटचाल सुरू झाली.या देवस्थानचे वैशिष्ट म्हणजे येथे जवळ जवळ १२ किलोमीटर अंतर चालत जावे लागते आणि या दरम्यान रस्त्यामध्ये पाणी, प्रसाधन गृहे , विश्रांती थांबे याची उत्तम व्यवस्था देवस्थानने केलेली आहे. अगदी सुरवातीलाच गुलशन कुमार यांचे मोठे लंगर होते. सर्व रस्त्यात दुतर्फा लाईट ची सोय केलेली आहे. त्यामुळे २४ तास कधीही येजा होते. लाखो भाविक वर्षभरात भेट देतात.
मी आणि दिपक पटापट अंतर पार करून अर्धकुमारी मंदिरात पोहचलो. तिथे मोठ्या गुहेत मंदिर आहे.जाडजूड माणसांचे येथे हाल होतात.या मंदिरापर्यंत चढ आहे . नंतर मात्र पूर्ण कड्याच्या रस्त्याने जावे लागते. वाटेत जिथे भूस्खलन हॉयची शक्यता आहे तिथे गर्डर लावले आहेत. भाविकांची सुरक्षा , सुविधा फार महत्त्वाची मानली आहे. साधारण चार तासात वरपर्यंत पोहचलो.मंदिरात प्रवेश पासेस शिवाय होते नाही. येताना खाली नोंदणी करावीच लागते. तिथं यालष्कराची माणसे तैनात होती. त्यामुळे काटेकोर पालन होत होते. मंदिरात प्रवेश करण्यापर्वीच सर्व चामडी वस्तू, बॅग बाहेर ठेव्वाव्या लागत होत्या. देवीचे स्थान एका गुहेत आहे त्यामुळे गुहेतून जाताना फार सांभाळून जावे लागते. डोके फार सांभाळून जावे लागते.एका वेळी एकच व्यक्ती जाऊ शकतो. गुहेतून बाहेर यायला मात्र एक बोगदा बनवलेला आहे. दर्शन घेतल्यावर लगेचच उतरण्यास सुरुवात केली. रस्त्यात डॉक्टर केतकर आणि ग्रुप भेटला. आम्ही हॉटेलवर जाऊन थांबतो असे सांगत खाली निघालो. साधारण दोन तासात खाली उतरलो. आम्ही पोहचल्यानंतर जवळ जवळ चार तासांनी केतकर आले.
रात्री जेवण्यासाठी बाहेर पडलो . डॉक्टर केतकर जेवताना म्हणाले पुढचं प्लॅनिंग कसे आहे.मी त्यांना सांगितले उद्या सकाळी अकरा वाजता आम्ही मुंबई ला जाणार. आमचे बुकिंग आहे.डॉक्टर म्हणाले नोकरीवर रुजू कधी होयाचे आहे.मी सांगितले अजून चार द दिवसांनी. डॉक्टर म्हणाले दोन दिवस वाढले तर चालतील काय , माझ्यासोबत ग्वाल्हेर येथे चला.दीपक म्हणाला आमचे बुकिंग कॅन्सल करावे लागेल.परत बुकिंग करावे लागेल.डॉक्टर म्हणाले चला आपण सर्व करूया.काय माहिती नाही परंतु आम्हीही हो म्हंटल खरतर आमच्या मुळ प्रोग्राम ची वाट लावली होती.उलट आम्ही अक्षरशः डॉक्टर केतकर म्हणतील तसे भटकत होतो.मग बुकिंग एजंट कडून ही तिकिटे रद्द करून नवीन तिकिटे काढली.
दुसऱ्या दिवशी आम्ही जम्मूत आलो .तिथून अमृतसर साठी ट्रेन पकडली. पहाटे स्टेशन आले. आमचे सर्व सामान एका मोठ्या साखळीने बांधले होते. लॉक करून ठेवले होते. नेमकी चावी चा जुडगा केतकरकडून ट्रेन खाली पडला. अंधारात कुठे पडला कळत नवते .मी खाली उतरलो.पण आता सामान कसे उतरवायचे प्रश्न पडला. दिपकने जोरात लाथ घातली कुलूप वर . कुलूप तोडले. बॅगा खाली उतरवून घेतल्या. डॉक्टर एक किलमीटरच्या परिसरात किल्ली शोधत होते.मला तर वाटले हा माणूस गायब झाला.कारण फक्त लुंगी वरच बाहेर पडला होता. मग आम्ही त्यांना शोधले.मग जवळच असलेल्या लॉज वर गेलो. सकाळी एक रिक्षावाला गाठला. त्याला दिवसभर अमृतसर व बाघा बॉर्डर ट्रीप फिक्स केली. नाष्टा केल्यानंतर सकाळच्या सत्रात अमृतसर फिरलो. जालियनवाला बाग, सुवर्णमंदिर, प्रती वैष्णोदेवी , बागितले.
अमृतसर शहर तसे खूप गजबजलेले . हजारो लोक दिवसभर या शहरात येत असतात.मंदिर परिसरात कमालीची स्वच्छता आहे. शीख समुदाय तसा खूप कडवा आहे. आपण जर मंदिर परिसरात असलेल्या प्रदर्शन ला भेट दिली तर आपल्याला त्याची प्रचिती येईल. जवळ जवळ सहा फूट लांब रुंद असलेले पोस्टर्स लावली आहेत. त्यात त्यांच्या गुरुंच्यावर झालेले अत्याचार, त्यांनी दिलेली जुंज दाखवली आहे. स्वर्गीय इंदिरा गांधी यांचाही फोटो तिथे आहे. त्याखाली जो मजकूर लिहिला आहे तो खरं तर आक्षेपार्ह आहे.कारण ब्लू स्टार ऑपरेशन का केले होते हे जगजाहिर आहे. त्यामुळे काही त्यातील अधिकारी वर्गाची हत्या झाली, बीयांत सिंग , इंदिराजी, जेनराल वैद्य सारख्यांचे बलीदान हे सर्व घडल्यावर तिथला मजकूर खटकला.
परंतु सुवर्णमंदिर नावाप्रमाणे सुंदर सोनेरी आहे.त्यात दिवसागणिक सोन्याचं प्रमाण वाढत चालले आहे.लोक दान धर्म करत असतात. त्यांची जेवणाची सोय तर एकदम स्वच्छ आणि सुंदर होती. दररोज हजारो लोक इथे प्रसादाचा लाभ घेतात. इथे आसपास खरेदीसाठी फार वाव मिळतो. चांगल्या प्रतीचे स्वेटर, पंजाबी ड्रेस इथे मिळतात. जलियान वाला बाग बघुन मात्र धस्स होते. जनरल डायर ने केलेला गोळीबार हा मात्र डोळ्यासमोर उभा राहतो. विहीर आणि विहिरीत पडलेल्या लोकांवर केलेला गोळीबार याचे आपण फक्त जरी डोळ्यासमोर आणला तरी थरकाप उडतो.हे स्थळ मात्र आठवण म्हणून पाहिले च पाहिजे.
दुपारी एक वाजेपर्यंत लॉज वर पोहचलो. जेवण केले . थोडा आराम केला.नंतर संध्याकाळी बागा बॉर्डर बघायला गेलो. ही एक मस्त पर्वणी असते.सर्वच सहा फूट उंच जवान परेड करताना अफलातून वाटतात. पाकिस्तान हद्दीत त्यांचे जवान परेड करताना दिसतात. समोरून तेथील नागरीक हा सोहळा पहात असतात. सूर्यास्त होताना हा समारंभ आयोजित करतात. दोन्ही देशांचे झेंडे फडकत असतात. त्याला मानवंदना देण्यासाठी येथे सर्वजण उभे राहतात. प्रत्यक्ष दोन्ही देशांचे सैन्य व नागरिक एका गेटच्या विरूद्ध बाजूला उभे राहतात. मोठमोठ्याने घोषणा करण्यात येतात. काही लोक उगीच हुल्लडबाजी करताना दिसतात. हजोरो वर्षापासून येजा असलेल्या भागातून एका फाळणी ने वेगळे केले. अगदी महाभारतकालीन संदर्भ , सम्राट अशोकाच्या तक्षशिला , आपल्या काबुली वाला कथेपर्यंत ज्या भागाशी संबंध होता तो फक्त एका फाळणी मुळे तुटला. त्याचा खरतर फायदा कुणालाच झाला नाही उलट दोन्हीं भागाचे नुकसानच झाले. पाकिस्तान ची अवस्था तर खूप वाईट झाली.ज्या पायावर तुमचा देश उभा असतो तोच कुचकामी असला की तुम्ही नीट उभे राहु शकत नाही. बऱ्याच लोकांचे योगदान असावे लागते. समाजात सर्व क्षेत्रात , थरात चांगली व्यक्तिमत्त्व तयार होण्यासाठी पूरक वातावरण असावे लागते. कालबाह्य गोष्टी पकडून त्याचे तुस्टी करणं करत बसत्त राहिल्यामळे मागे फेकले जातो.
तर बागा बॉर्डर ची ट्रीप मस्त झाली. रात्री आठ वाजता लॉजवर पोहचलो. समुद्रे व इतर दोघेजण तिथून मुंबईला जाणार होते. मी, दीपक आणि डॉक्टर ग्वाल्हेर ला जाणार होतो.जेऊन झाल्यावर आम्ही त्यांना सोडायला गेलो .आमची ट्रेन दुसऱ्या दिवशी सकाळी होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही मध्यप्रदेश कडे निघालो.ती ट्रेन पुढच्या दिवशी पहाटे तीन वाजता ग्वाल्हेर स्टेशन ला पोहचली.तिथून रिक्षाने डॉक्टरांच्या घरी आलो.
हे गाव तसे आपल्याला अभिमान वाटावे असेच आहे कारण हे आपल्या मराठी माणसाने वसविले ले गाव.या गावात अजूनही मराठी वस्ती खूप आहे.सकाळी अगदी पहाटे घरात उंबरठ्यावर पोहचल्यावर थांबलो. डॉक्टरांनी हाक मारली. नव्वदी पार केलेले एक जोडपं समोर आले. आम्हाला बाहेर थांबायला सांगितले. आमचे पाय गरम पाण्याने धुतले.हे जरा थोडे वेगळं असल्याने थोडे बावरलो.ते दोघे जण आमच्या पाया पडले. तीर्थक्षेत्र भेट दिल्यानंतर आलेल्या यक्ती च्या पाया पडायला लागते. ही एक प्रथा आहे. त्याला वयाचे बंधन नसते. असला प्रकार पूर्वी अनुभवला नसल्यामुळे थोडे विशेष वाटले. आमची चौकशी केली. मुळात महाराष्ट्रीयन माणूस पाहुणा म्हणून आपल्याकडे आला आहे याचे त्या दोघांना खूप कौतुक होते. त्यांच्या देहबोली मध्ये ते दिसत होते. घर म्हणजे एक मोठा वाडा. अगदी आपल्या कडे दगडी वाडा असतो तसा परंतु इथे मात्र तो दगड थोडा तांबूस पांढरा रंगाचा होता. कदाचित बाजूचे घर मिळून वाडा असावा. कारण दरवाज्यातून आत शिरल्यावर समोरच मोकळा भाग दिसत होता . आणि मग खोल्या दिसत होत्या. आपल्याकडे वाड्याच्या पाठीमागे विहीर असायची.ती दिंडी दरवाजा ओलांडून पलीकडे परसदारी असायची.इथे मात्र मुख्य दरवाज्यासमोर छोटी बावडी दिसली. दगडाने बांधलेली. घरामध्ये लाकडाचा वापर केला होता.वर लाकडी माला होता.घरात दोघेचजन असल्याने सर्व मोकळे मोकळे होते. आंघोळ झाल्यावर चहा नाष्टा केला. डॉक्टरांच्या वडिलांशी गप्पा मारत बसलो. मध्य प्रदेशमध्ये आम्ही मराठी संस्कृती कशी तिकुऊन ठेवली आहे याबददल बरेच बोलले. त्यांच्या भागाला लष्कर भाग म्हणून ओळखतात . इथे मराठी वस्ती खूप आहे.बरेच सण साजरे करायला सांगली , पुणे सातारा इथे लोक जातात.बरीच लग्न सुद्धा महाराष्ट्र भागात च ठरवतात. त्यांनी आपली मराठी संस्कृती शी नाळ तुटू दिली नाही. त्यादिवशी त्यांनी पुरणपोळी केली होती. जेवताना टोपले समोर ठेवले होते. आम्ही दोघांनी अंदाज घेत थोडे थोडे घेतले. दीपक चा प्रॉब्लेम जास्त झाला.मग आम्ही ग्वालियर चा राजवाडा बघायला गेलो. राजवाडा खूप सुंदर आहे. सध्या परदेशी पर्यटक येथे राहतात. त्याचे रूपांतर फाईव स्टार मध्ये केले आहे. त्यामुळे याचे छान नियोजन केले आहे. राजवाड्यातील डायनिंग टेबल फार वेगळा आहे. छोटी ट्रेन टेबलवर आहे. रुळ सुद्धा आहेत. त्यातील डब्यामध्ये डिशेस ठेवलेल्या असतात. ती ट्रेन फिरते .मग त्यातून हवे ते घ्यायचे असते.एक आगळा वेगळा प्रकार. हॉल जवळच लांब रुंद खोली दिसली आत शिरल्यावर समोरच देवघर दिसले.समोर देव्हारा दिसला.तो बघतच होतो तेंव्हा गावच्या देव्हाऱ्याची आठवण झाली. याचा अर्थ शिंद्यांनी सुद्धा महाराष्ट्राची संस्कृती जपली.
वाड्यातील वेगवेगळ्या दालनातील वस्तू पाहिल्या. वाडा सुंदर राखला होता. नंतर गावातील बिरला यांनी बांधलेले सूर्यमंदिर बघितले. नंतर घरी परतलो. वाटेत दीपकला भूक लागली .मग खाऊनच घरी गेलो. डॉक्टर घरीच असल्याने आम्ही आल्यावर त्यांनी त्यांच्या बाजूच्या लोकांची ओळख करून दिली. त्यातील एक जण सांगलीच्या होत्या.मग गप्पा रंगल्या.मग आम्ही सर्व वाडा पाहिला. वाड्याच्या वरच्या भागात अंधार पडला होता.मी बटण दाबून बगितले. तेवढ्यात डॉक्टरांचे वडील म्हणाले अरे आमच्या वायर मेनला सुद्धा प्रॉब्लेम सापडेना. मला त्यांनी विचारले तुला जमेल काय. मी म्हणालो प्रयत्न करतो. तुमच्या कडे टेस्टर आहे का ते विचारले. त्यांनी लगेच दिला.एक टेबल घेतला.त्यांना विचारले दोन्ही मजल्याला एकच मीटर आहे का? त्यांनी हो सांगितल्या वर मग मी वर जाणारी केबल शोधली .ती एका फ्युज बॉक्स मध्ये जात होती.तो बॉक्स उघडून फ्यूज बाहेर काढले.तो चेक करू शकत नाही कारण की मीटर चेकर नव्हता. मग फ्यूज अर्धवट लाऊन तेस्टरने दोनही बाजूंनी करंट आहे का ते पाहिले.येत होता.मग मी पूर्ण लाईट बंद करून..फ्यूज कनेक्टर घासले. त्यावर कार्बन चा थर आला होता.तो निघाल्यानंतर मी परत कनेक्ट केले. पॉवर चालू केली . आणि सगळीकडे लाईट चालू झाला. डॉक्टरांच्या वडिलांच्या चेहऱ्यावर मी काही तरी जादू केल्या सारखे वाटत होते.ते एवढे खूष झाले त्यांना अभिमान काय तर माझ्या मराठी माणसाने पटकन प्रॉब्लेम सोडवला.मी म्हणालो अस बरच काही दररोज कंपनीत करत असतो.मग त्यांनी मला त्यांची हिस्टरी सांगितली.ते इंडियन एअर फोर्स मध्ये कामाला होते. टेक्निकल विभागात काम करत. तिथून रिटायर्ड झाल्यावर मुंबईत unichem लॅबोरेटरी या मोठ्या कंपनीत मॅनेजर म्हणून काम पाहिले. तिथून रिटायर्ड झाल्यावर ग्वाल्हेर ल राहिले. टेक्निकल व्यक्ती असल्यानं आमचे सुर जुळले. दुसऱ्या महायद्धा दरम्यान फायटर विमाने कशी होती. त्याची देखभाल कशी करायचो याची बरीच माहिती सांगितली माझ्याकडून प्लांट संदर्भात खूप माहिती विचारली. असं वाटतं नव्हतं की ही व्यक्ती नव्वदीच्या वरची आहे. अगदी लहान मुले प्रश्न विचारतात तसे व्हायचे. त्यांचा उत्साह हा सगळ्यांनाच लाजवील असा होता. त्यांनी मला इलेक्ट्रिक प्रॉब्लेम चे सोल्युशन कसे सुचले विचारले. त्यांना प्रत्येक बाबतीत माहिती घेण्याचा अमाप उत्साह होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही ग्वालियर चा प्रसिद्ध किल्ला पहिला. आपल्या मराठीपणाची झलक दिसत होती. आपल्याकडील किल्ल्यासारखेच दरवाजे, बुरुज दिसत होते.वर एक मोठा गुरूद्वारा आहे.वर एक इंटरनॅशनल स्कूल आहे.वरून सर्व शहर दिसते. मल्हारावांनी या भागात तसेच अगदी मुगल बादशाह वर सुद्धा इथूनच राज्य केले. आपल्या मराठी माणसाने जवळ जवळ सर्व देश आपल्या मुठीत आणला होता. हाच तो किल्ला . पानिपतच्या लढाईत सहा भाऊ धारातीर्थी पडले. त्यांचे स्मारक त्यांच्या मूळ गावी सातारा जिल्ह्यातील खेड येथे आहे. बऱ्याचदा अनामिक वीरांचा इतिहास लिहिला जात नाही किंवा तो लीहण्याचा टाळला जातो. काही समकालीन इतिहास त्यामुळे लपवता येत नाही. जसं आपण ज्यावेळी अटके ची लढाई याबद्दल वाचतो तेंव्हा तो लढा खरा कुणी लढला हे आपल्याला कधी कळते ज्यावेळी त्याचे काही जुने कागद फारशी भाषेमध्ये मिळतात.ते सुध्दा हरलेल्या सेनापतीच्या लेखणीतून उतरलेल्या पुराव्याने. त्यात त्यांनी तुकोजी पायगुडे नावाचा उल्लेख केलेला आहे. त्याच्या अतुलनीय पराक्रमाची गाथा त्या मुस्लिम सरदाराने लिहिली होती..मग आपण इतिहासाच्या पुस्तकात हे नाव वाचतो काय? नाही कारण त्याचा इतिहास वेगळा लिहिला गेलेला आहे. बऱ्याचदा लेखक आपल्या सोईनुसार लिहितो. अजूनही या गावात मराठी कुटुंबे खूप राहतात. किल्ला पाहिल्यानंतर आम्ही घरी येण्यास निघालो. वाटेत थोडा नाष्टा केला कारण त्या वयस्कर मंडळी ना त्रास द्यायला नको वाटायचा. परत त्यांचे जेवण म्हणजे अगदी मापात.ते काही दीपकला जमायचे नाही.मग परत बाहेर जाऊन काहीतरी हदडा. त्यापेक्षा पोट भरून बाहेर खाऊन मग घरात जायचो.ते दोघेजण आमची चांगली उठबस करत होते. आम्हाला थोडे ओशाळ ल्यासारखे होयचे. गप्पांची मैफिल परत जमली. संध्याकाळी इडलीचा बेत होता. दिपकने टोपल्या कडे बगितले त्यानुसार प्लॅनिंग केले.तो दिवस फार मजेत गेला.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच निघालो.तिथून आग्रा फक्त साठ किलोमीटर आहे.बस स्टँड वर गेलो. तिथं आगरा येथे जाणारी बस मिळाली. लोकल बस होती. तिथं दोन तीन स्टँड आहेत. नक्की कुठे जायचे माहीत नव्हते.मग कंडक्टर ने आम्हाला आगरा फोर्ट जवळ सोडले. तिथं खूप रिक्षा उभ्या होत्या. वेगवेगळे दर सांगत होते. तेवढ्यात एक सायकल रिक्षावाला भेटला.तो म्हणाला सर्व ठिकाणे फिरवायचे ७० रुपये घेईन. त्याच्यकडे बघुन आम्ही त्याला आम्ही पेलू काय जरा शंका आली.पण चला त्याचा दिवसभराचा धंदा होईल म्हणून आम्ही हो म्हणालो.मग सायकल रिक्षाने आग्र्याची सैर झाली. ताजमहल प्रथम बघितला. तसा तिसऱ्या वेळी बघत असल्याने थोडी माहिती होती.त्या काळात डिजिटल कॅमेरा नव्हते. त्यामुळे कोडाक क्रोमा नावाचा कॅमेरा होता.त्यात फोटो अगदी मोजून मापुन काढायला लागायचे. ताजमहल ही वास्तू खरंच अप्रतिम आहे. आग्रा फोर्ट व ताजमहल या वास्तू पाहताना ज्या कुणी व्यक्ती ने याचे डिझाईन तयार केले असेल त्याचा इथला परिसर, वातावरण,लोक , राजा यांचा फार बारकाईने अभ्यास केला असणार.यातील कलाकृती, पाण्याचे व्यवस्थापन , वापरलेले दगड याच्यावर जयपूर शैली चा खूप इम्पॅक्ट आहे. कुणी कितीही लिहिले की ही शैली तिथल्या स्थानिक राजाची होती तर खोटे वाटते. जयपूरच्या महालाचे प्रवेशद्वार आणि राजवाडा नीट बघितला तर आपल्याला कळते की हुबेहूब काही गोष्टी कॉपी आगरा फोर्ट मध्ये केलेल्या दिसतात. शहाजहान च्या मुलींच्या लग्नाची डोलि च्या गोष्टी सांगितल्या जातात त्या खोट्या वाटतात. राजस्थान सरकारचा जो सिम्बॉल आहे त्यात याच प्रकार च्या आकाराचा समावेश आहे. बाकी कारंजे तर हुबेहूब जयपूर सारखेच. यमुनेचे पाणी जे किल्ल्यात घेतले आहे व त्याचे पूर्ण किल्ल्यात जे पसरवले आहे ते मात्र अफलातून . तिथले वातावरण जसं आहे त्याप्रमाणे सर्व वास्तू निर्माण केल्या आहेत. संगमरवर दगडाचा वापर केला गेला त्यामुळे त्याच्या सौंदर्यात भर पडली आहे.
किल्ला व ताजमहल बघुन स्टँड वर रिक्षावाल्याने सोडले. तिथून रात्री पर्यंत ग्वालियर येथे पोहचलो. केतकर परिवार वाट पहात होता.जेवण वगैरे झाल्यानंतर मस्त गप्पा मारल्या. त्यांनी दोघांनी मला पत्र लिहिण्यास सांगितले. त्यांच्या चार दिवसांच्या आदरतिथ्य मुळे आम्ही दोघेजण पुरते भारावून गेलो होतो. एखादा जुना मित्र भेटावा आणि त्याच्याशी किती गप्पा मारू समजत नाही तसे केतकरांच्या वडिलांचे झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता ट्रेन होती. त्याची आठवण झाल्यावर झोपायला गेलो..
सकाळी लवकरच उठून तयार झालो. आम्ही नको नको म्हणत असतानाही पोळी भाजी बांधून दिली. चार दिवसांच्या आमच्या पाहुणचार मुळे त्यांना खूप त्रास झाला असेल असे वाटत होते.स्टेशनला पोहचल्यावर ट्रेनची चौकशी केली.ट्रेन वेळेत आहे असे सांगितले. बाहेर एक उंचपुरी व्यक्ती उभी होती.चेहरा ओळखीचा वाटला . मध्यप्रदेश मद्ये असल्याने कोणी मराठी माणूस ओळखीचा असणं अपेक्षित नव्हते.लगेच आठवले अरे हे तर डॉक्टर गिरीश ओक. सरळ जाऊन नमस्कार केला. विचारले इकडे कुठे. त्यांनी सांगितले' कुसुम मनोहर लेले व आमच्या या घरात' या दोन नाटकांचे प्रयोग होते . त्याची सर्व टीम होती. तेवढ्यात समोरून सोनाली कुलकर्णी येताना दिसली. ट्रेन ची वेळ झाली होती. त्यामुळे सामान घेऊन प्लॅटफॉर्मवर गेलो. ट्रेन आल्यावर चटकन आत घुसलो. आणि आश्चर्याचा धक्काच गिरीश ओक, सोनाली कुलकर्णी, बाळ कर्वे, सयाजी शिंदे, संजय मोने,विनय आपटे आणि कितीतरी कलाकार चक्क आमच्या बाजूला. अगोदर आम्हाला वाटले की ते फर्स्ट क्लास मध्ये असतील परंतु आमच्यासोबत सेकंड क्लास मध्ये होते.आम्ही काही हाक मारली नाही. डब्यामध्ये इतर प्रवासी मात्र एकपण त्यांना ओळखत नव्हते. त्यामुळे कलाकार चा वावर अगदी मुक्त होता.त्यातील गिरीश ओक यांच्याशी थोडी ओळख झाली होती.परंतु त्यांनी तसे काही दाखवले नाही. आपल्याला कोनही ओळखत नाही यामुळं त्यांच्या चर्चा जोरात चालू होत्या. सयाजी शिंदे पुढच्या डब्यात होता त्यामुळे मध्येच फेरी मारायचा.गिरीश ओक शांतपणे वरच्या बर्थवर बसले होते. सुकन्या कुलकर्णी सुद्धा जास्त न बोलता शांत बसून होती. वंदना गुप्ते मात्र गप्पा मारताना. दिसत होती. स्टेशन वर सयाजी शिंदे
आणि दोघे जण फेरी मारत.एक मात्र होते की डब्यातील इतर लोक त्यांचेकडे इतर प्रवाशा सारखेच पहात होते. त्यामुळे सेलिब्रिटी असण्याचे काही जाणवत नव्हते. आमच्या डब्यात आमच्या दोघां शिवाय कुणालाही त्यांच्याविषयी माहीत नसावे. आम्ही त्यांच्या गप्पा एन्जॉय करत होतो. बाळ कर्वे म्हणजे चिमणराव या प्रसिद्ध सिरीयल मधला गुंड्याभाऊ आपल्या पलीकडे बसून चक्क गप्पा मारताना दिसतात. नाटकाविषयी सुद्धा मध्येच बोलत होते. रात्री आठ पर्यन्त बरे चालले होते. परंतु नंतर एक त्यातील बाई मला तिचं नाव माहीत नव्हते परंतु त्यातील एक कलाकार असावी तिने बरलण्यास सुरवात केली. तिचा रोख कदाचीत गिरीश ओक यांच्या वर असावा. तिने चक्क शिव्या देण्यास सुरुवात केली. मला जरा हे अनपेक्षित असल्याने थोडा धक्का बसला. माहीत नाही परंतु अचानक कलाकार , खेळाडू या लोकांचे स्थान आपल्या आयुष्यात थोडे विशेष असते. आपण त्यांना मोठा वा वयाने लहान असो त्यांना आपण एकेरी नावाने उल्लेख करतो. अरे सचिन काय खेळला रे... कपिल चा कॅच भन्नाट होता.... नाना पाटेकर काय मस्त करतो... त्यामुळे जरा थोडे वाईट वाटले. कलाकाराचे सुद्धा व्यक्तिगत आयुष्य असते इतकी परिपक्वता त्यावेळी नसावी. त्यांचे बोलणे एकूण एन्जॉय करावेशे वाटले नाही थोडी लाज वाटली कारण त्यांना कलाकारांना वेगळे असे स्थान आपल्या आयुष्यात असते.
अचानक साधारण आठ वाजता त्यातीलए एक कलाकार स्त्री ने अचानक पणे शिव्या द्यायला सुरुवात केली होती .तिने कदाचित नशा केली असावी. पण ती खूप चिडल्यासारखी बोलत होती. ती कुणाचेच एकत नवती. तिचा रोख डॉक्टर आणि सुकन्या यांच्यावर असावा. तिला बाळ कर्वे समजावीत होते. त्यांना म्हणाली, ए तू कोन रे. गप्प बस.. बाळ कर्वे नंतर गिरीश ओक यांच्याकडे बघुन म्हणाली..तू मला फसवलास .. आता तू कुणाच्या मागे लागला आहेस माहिती आहे.. आणि शिव्याची लाखोली वाहत होती. डब्यात इतरांना मराठी येत नसावी,मग सयाजी शिंदे यांना बोलावलं . त्यानंतर थोडी शांतता पसरली. सयाजी गेल्यानंतर साधारण अकरा वाजता परत सुरू झाले.नंतर तिने वंदना गुप्ते हिला सुद्धा बोलायला सुरुवात केली. माझ्या अंदाजे तिने काही तरी नशा केली असावी कारण हा गोंधळ अचानक घातला होता. दिवसा सगळे शांत होते.. अगोदरच्या दिवशी म्हणजे १४ ऑगस्ट १९९७ ला ग्वाल्हेर येथे रात्री त्यांचे प्रयोग झाले होते. आणि नाटकाची टीम म्हणजे एक मोठ्या कुटुंबा सारखीच असते.रात्री थोडे वाढल्यानंतर माझ्या मित्राला राहवले नाही त्याने जरा दमच टाकला . रात्र झाली आहे गप्प झोपा…त्याचा थोडा परिणाम झाला. पहाटे इगतपुरी सोडल्यावर मात्र वंदना गुप्ते वगैरे कल्याणला उतरणारे उठले.त्यांची उतरण्यापूर्वी ची तयारी सुरू झाली.मग मात्र काल रात्री काहीही झाले नाही अशी परिस्थिती होती. आम्हीही कल्याणला उतरलो. तिथून लोकलने कलव्याला पोहचलो……
Bình luận