top of page
Writer's pictureSanjay Gole

वाघोशी शिबीर २०१८

या शिबिरासाठी तयारी म्हणून एक दिवस गावात जाऊन आलो. गावातील शाळा तशी परिचित असल्याने त्यांनी वर्ग देण्यास तयारी दर्शवली. गावातील मुलांना सहभागी करून घेऊ असेही सांगितले. कर्मचारी वर्ग ओळखीचा असल्याने ते मदत करायला येणार होते. शाळेतील शिपाई आणि क्लार्क हे त्या गावातच राहणारे असल्याने त्यांनी सविस्तर माहिती दिली. स्वतः मुख्याध्यापक राजेश सर शिबिराला येणार होते. शाळेकडून पूर्ण सहकार्य मिळेल याची ग्वाही दिली.

शिबिराचा पूर्ण कार्यक्रम तयार केला. सकाळी नऊ वाजल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यंत व दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजल्यापासून ते संध्याकाळी सात पर्यंत कार्यक्रम तयार केला. मुक्तांगण ग्रुप वर पोस्ट केला. माझ्या अपेक्षित २५ सभासद आणि ५ कार्यकर्ते एवढे होते. गावातील २० मुले अपेक्षित होती. परंतु ही संख्या १८ सभासद आणि ४ कार्यकर्ते एवढेच तयार झाले. परंतु शिबिराची तयारी बरेच दिवस करत असल्याने थोडा उत्साह कमी झाला कारण शिबीर ही गोष्ट असते की बऱ्याच उपक्रमाची रेलचेल असते, खूप सोर्सेस एकत्र मिळत असतात. वर्षभराचे एकूण आठवडी कार्यक्रमा त केलेली मेहनत इथे कामी येते. त्यामुळे आमची अशी अपेक्षा असते की सर्व मुले जी प्रत्येक रविवारचा कार्यक्रम नियमित अटेंड करतात

त्यांनी शिबिराला यावे. त्यांच्या दृष्टीने ही एक संधी असते.यात ते त्यांना स्वतःला व्यक्त करू शकतात.मग ते चित्रकला असो , नाटक असो, कविता, निसर्गात रमने असो ही सर्व माध्यमे एकाच वेळी उपलब्ध होतात.यात त्यांना जे एक्सपोजर मिळते ते एक पालक म्हणून प्रत्येकजण देऊ शकत नाही. याची किंमत ओळखणे फार अवघड असते. पुणे मुंबई सारख्या शहरात आपण जागरूक पालकत्व, सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्व कसे घडवावे यांची व्याख्याने ज्यावेळी आपण ऐकतो त्यावेळी आपल्याला याचे महत्त्व पटते. शहरात याची अवाच्यासवा स्वरूपात किंमत आकारली जाते. पालकांचे खिसे आपोआप हे लोक रिकामे करतात. त्याला एक व्यवसाय चे स्वरूप आले आहे. खरतर त्या पालकांनाही ते हवे आहे. बऱ्याच पालकांना वेळ नाही किँवा बऱ्याच जणांची ती तयारी नाही. त्यामुळे ते बऱ्याचदा स्टेटस साठी या उपक्रमात, शिबिरात पाठवतात.मी स्वतः मुंबईत शिक्षण घेतले असल्याने बऱ्यापैकी कल्पना आहे.

शिबिराच्या आदल्या दिवशी निरनिराळे पेपर्स विकत घेतले.काही चित्र काढण्यासाठी तर काही हस्तकला , मॉडेल बनवण्यासाठी लागणार होते. फेविकॉल, कैची, स्केल सर्व वस्तू घेतल्या . मेडिकल किट, क्लोरिवेट घेतले. उन्हाळा त्या भागात फार कडक असतो. तीनही बाजूंनी डोंगर असल्याने आणि बराचसा भाग कातळ खडकाचा बनलेला असल्याने प्रचंड प्रमाणात उष्णता वाढते.गरम हवेचे झोत येतात. पाणी खूप प्यावे लागते. त्यानुसार तयारी केली. अभिग्नाला शिबिराला यायचे होते. अनुराधा मॅडमने तसा फोन केला. त्यांनी यायची ईच्छा व्यक्त केली. त्यांना मी राहण्याची व्यवस्था खूप साधि असेल. गावात लाईट येजा करते , उन्हाळा आहे तुम्हाला चालत असेल तर या असे सांगितले. स्वरूप ची आई सुद्धा येणार होती. त्यामुळे त्यांना सुद्धा सोबत झाली. शिबिराचे नियोजन मग त्यानुसार केले.

१४ एप्रिल २०१८ रोजी सकाळी सात वाजता बालगंधर्व रांगभवंन येथे जमा झालो.सर्वजण मिळून सोळाजन झालो होतो. मग अरविंद घोरपडे, बोत्रे, जोशी यांच्या कार होत्या ते म्हणाले पाली पर्यन्त सोडतो. सुजाता टीचर कडून पाली येथे रिक्षा ची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे कोणतीही इतर गाडी न करता आम्ही पालकांच्या गाडीतून पालीला पोहचलो. तिथे अरविंद घोरपडे ला पुढे जाऊन मुलांचा नाष्टा तय्यार करून ठेवण्यास सांगितले. सुजाता टीचर यांनी अगोदरच त्यांच्या मुलांसोबत रिक्षा तयार ठेवल्या होत्या. राजेंद्र पांडे आणि मेघा पांडे दोघेही नंतर येणार होते.ते दोघे असले की मुलांची धमाल असते.पांडे सतत मुलांना बिझी ठेवतात. त्यांची मुलांची भट्टी चांगली जमते. मुलांच्या सोबत ते लवकर रंगतात त्यामुळे शिबिराला उत्स्फूर्त पणा येतो. शिबिरात सर्व प्रकारची माणसे असतील तर वेगळी मजा येते. मुलांना आपलेसे करावयाची पद्धत मात्र जमली पाहिजे.माजी मुलगी तर ट्रेकला पांडे काका आहेत का असे पाहिलं विचारायची.

पाली येथे पोहचल्यावर साधारण ८.३० वाजले होते. शिबिर नऊ वाजल्यापासून सुरू करायचे होते.मग अनुराधा मॅडम यांना मी पुढे जाण्यास सांगितले. सोबत अरविंद बुरुमकर होता त्यामुळे त्याला ती शाळा माहीत होती. काही मुले आणि मॅडम पुढे निघून गेली. नाष्टा घेण्यास थोडा विलंब झाला. कार्यक्रम वेळेत सुरू होणे गरजेचे होते.प्रत्येक तासाचे नियोजन केले होते. त्यामुळे वेळेत पोहचणे आवश्यक होते. साधारण ८.४५ ला आम्ही थितून निघालो. रिक्षा उन्हेरे कुंडा च्या दिशेने निघाल्या.उद्धर रामेश्वर मार्गे वघोशी हा रस्ता पकडला होता. खूपच सुंदर रस्ता आहे. एवढ्या जंगलात चांगला रस्ता कसा याचे कोडे जाताना सुटले. रस्त्याच्या दुतर्फा सर्व बंगले फार्महाऊस दिसत होते. मुंबई पुणे येथील लोक इथे येऊन राहू लागले होते. त्यांच्यासाठी या पायघड्या अंथरल्या आहेत. अन्यथा या डोंगराळ भागात रस्ता तोही असा गुळगुळीत हे स्वप्नवत आह. कवडीमोल भावाने येथील जागा विकत घेऊन आता मुंबई पुणे येथील गडगंज संपत्ती असलेले लोक इथे आता राज्य करीत आहेत. तिथला शेतकरी त्याच्याच शेतात वॉचमन म्हणून नोकरी करत आहे. स्वतः राबत असलेल्या शेतात आता दुसऱ्यासाठी काम करत आहे.

गरम पाण्याची कुंडे गेल्यानंतर दोनतीन दगडाच्या खाणी लागल्या. नंतर रस्त्याच्या बाजूला एक सुंदर कमलाच्या फुलांनी बहरलेले तळे दिसले. पुढे उध्दर गाव लागले .या गावात एक शंकराचे मंदिर आहे. एका छोट्या ओढ्यालगत गाव आहे.या गावातून वर डोंगरात गेल्यावर एक पुरातन शंकर मंदीर आहे. त्याला रामेश्वर मंदिर म्हणतात. अशी एक आख्यायिका आहे की रामाने वनवासात या ठिकाणी भेट दिली होती.

पूर्ण जंगल भागात हे मंदिर आहे. उध्दर सोडल्यानंतर लगेच एक फाटा लागतो थितुंन एक रस्ता रामेश्वर वैभव कडे जातो आणि एक वाघोशी कडे जातो. गावात शिरलो आणि तिथे मॅडम भेटल्या.मग आम्ही गावाच्या वेशीवर असलेल्या शाळेत गेलो. सह्याद्री शिक्षण संस्थेची ही शाळा आहे.या शाळेत मुक्तांगण कार्यकर्त्यांनी सलग तीन वर्षे इयत्ता दहावी साठी कार्यक्रम आयोजित केले होते. त्यांच्या मुलांना अभ्यास, करीयर याबाबतीत मार्गदर्शन केले होते.यात आपले मुक्तांगण सभासद डॉक्टर मोटे, विजय गोळे,सुमित पाटील यांचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे ही शाळा आम्हाला परिचित आहे. शाळेतील शिपायापासून ते मुख्याध्यापक महोदयापर्यंत आपले मुक्तांगण नाव परिचित आहे.सर्व स्टाफ सहकार्य नेहमीच करतो.

मुले सुद्धा सर्व आदिवासी भागा मधून येत असल्याने इथे कामाची एक वेगळी ऊर्मी येते.प्रत्येक जण पाचसहा किलोमीटर दररोज चालत येत असतो. आईवडील अशिशिक्षित असल्याने त्यांना मार्गदर्शन करण्यात ते असमर्थ आहेत.ही पिढी जवळील शहराकडे मोठ्या आशेने बघत असते. परंतु त्यांच्या दृष्टीकोनातून ते खरतर अस्पृश्य असल्यासारखे आहेत. शहराचा डामडौल त्यांना आकर्षित करतो. अशा बऱ्याच गोष्टही उपक्रम राबवताना जाणवल्या.पण अतिशय काटक, तल्लख बुद्धी असलेली मुले आहेत परंतु त्यांची बुद्धी ही त्यांच्या परिसरातील घडामोडींशी निगडित असलेल्या गोष्टीशी वापरली जाते.ते बेचकी चा वापर करून अचूक वेध घेऊ शकतात. जंगलात निर्भिडपणे फिरू शकतात. सहजपणे डोंगर चढउतार करतात,झाडावर लीलया चढू शकतात. त्यांच्याशी संवाद साधला असता बऱ्याच गोष्टी समजल्या.

शाळेत पोहचल्यावर शाळेचे शिपाई आणि क्लार्क दोघेही हजर होते. त्यांनी पाणी व इतर सर्व व्यवस्था केली होती.गावातील दहा पंधरा मुले आली होती. मुख्याध्यापक दहा वाजता येणार होते. शाळेच्या हॉल मध्ये सर्वजण गोलाकार बसले.मग सर्वांनी आपला परिचय दिला. त्यानंतर एकूण विद्यार्थी संख्या ३० झाली होती. त्यानुसार गट तयार केले. गटाची विभागणी मुलांच्या वर्गा नुसार केली. गावातील मुले मुक्तांगण मुलांमध्ये मिसळली.त्या शाळेचे काही शिक्षक आले .सर्व कार्यक्रमाची रूपरेखा सांगितली.पहीले सत्र ड्रॉइंग चे होते त्यात मुलांना दोन गाणी एकवली आणि त्या गाण्यावर सर्व ग्रुप मिळून एक छानसे चित्र काढायचे. सर्वांनी मिळून करण्याचे काम होते.ही एक स्पर्धा होती. याचे परीक्षक नेमले होते. यात कोलाज, कलर, काही वस्तू गम वापरून चिकटवले तरी चालतील अशी स्पर्धा होती.मराठी मधील झुक झुक् आगिन गाडी आणि किलबिल किलबिल पक्षी बोलती ही गाणी एकवली होती.प्रत्येक गटाला मदतीला शाळेतील शिक्षक, नीलम मॅडम, अनुराधा मॅडम होत्या.खूप सुंदर चित्र मुलांनी काढली. त्यावर कापूस, पाने, फुले यांचा वापर केला गेला. पांडेनी मुलांना खूप प्रो्साहन दिले. सर्वजण मुलांसोबत स्वतः सुद्धा रमले होते . तासाभरात हा उपक्रम संपला.नंतर लगेच कविता मुलांना गटांनी देण्यात आल्या. प्रत्येक गटाला त्या कवितांना चाली लावायच्या होत्या. नंतर त्या सर्वांसमोर बोलून दाखवायची होती. शाळेतील एक शिक्षक यात खूप रमले कारण तो त्यांच्या आवडीचा विषय होता.त्यांच्याकडेच परीक्षण देण्यात आले होते. शाळेचे मुख्याध्यापक त्याचवेळी आले मग त्यांनी सर्व उपक्रम राबवताना पाहिले. आल्यावर त्यांच्या लक्षात आले की पाणी बोअरवेल चे होते मग त्यांनी जवळील गावात पाणी सप्लाय करणाऱ्या दुकानातून चार ड्रम आणायला सांगितले.हे पाणी थंड आणि फिल्टर केलेले होते. प्रोग्राम बघून खूप खुश झाले पण शाळेतील मुलांची उपस्थिती कमी का याची विचारणा त्यांच्या शिक्षकांना केली.

कवितांना चाली लावणे ही तशी सोपी गोष्ट नाही. त्यातच मुलांना याची फार गोडी नसते. तरीसुध्दा सहा ग्रुप मधून दोन गट मधील मुलांनी फार सुंदर चाली लावल्या होत्या. थोडी स्पर्धा असली की प्रतिसाद मिळतो.



साधरण साडेबारा वाजता आम्ही जेवण करण्याची सुट्टी घेतली. सर्वांनी घरून डबे आणले होते. गावातील मुले आपापल्या घरी जाऊन जेऊन आली. डोंगरातील गावातील मुलांनी डबे आणले होते. शिबिरातील जेवणाची मजा काही औरच असते. काही मुले डबा काढत नाहीत,lays, Kurkure हळूच काढतात, त्यांना सांगून मग डबा संपवला जातो.काही मुले ज्यांनी खूपसे कॅम्प केले आहेत ते मात्र सरावलेले असतात. त्यांना याच गोष्टीचा आनंद कसा घ्यायचा बरोब्बर माहीत असते. बाहेर कडक उन आणि गरम हवेचे झोत येत होते त्यामुळे पाणी खूप लागत होते.

जेवणानंतर लगेच ग्रीटिंग कार्ड तयार करण्याचा उपक्रम होता. वेगवेगळे विषय देण्यात आले होते. काही शुभेच्चा कार्डस शाळेतील कर्मचारी वर्ग यांच्यासाठी तयार करण्यात आली होती. नीलम मॅडम चे, सुजाता टीचर चे यात खूप योगदान होते. सानिका, मित्रा,हे तर एकदम एक्स्पर्ट. यांची कार्डस शाळेतील कर्मचारी वर्गाला दिली.राज , अरविंद, सानिका ही मुले नियमित सर्व कार्यक्रम अटेंड करतात त्यामुळे त्यांना विशेष काही सांगावे लागत नाही. त्यांना बऱ्यापैकी सर्व प्लॅन माहीत असतात .गाव असो वा शहर त्यांना प्रत्येक ठिकाणी कसे वागावे, मुलाखती कशा घ्याव्या, निसर्गात कसे रमावे यांची पुरेपूर कल्पना आहे.त्यांची छाप बाहेरील येणाऱ्या लोकांवर लगेच पडते. अर्थात त्यांच्या पालकांच्या योगदानाची जोड असते. मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ते सतत प्रयत्न करतात. कार्डस बनवण्यासाठी साधारण दोन तास गेले.

नंतर एक गोष्ट तयार करण्याचा उपक्रम होता. काही शब्द मुलांना दिले होते त्यानुसार गोष्ट तयार करायची होती.सर्व गटांनी सुंदर गोष्टी तयार केल्या. तोपर्यंत पाच वाजले होते.बहुतेक शाळेतील उपक्रम संपले होते.मग आम्ही गावात जायचे ठरवले. एका रिकाम्या घरात राहण्याची व्यवस्था केली होती.घर मोठे होते.त्यात सर्व सुविधा होत्या. मुलांना सर्व साहित्य नीट ठेवण्यास सांगितले.मग नाष्टा, जेवण ज्यांना करण्यास दिले होते त्यांना जाऊन भेटलो. थिते मुलांना ज्यांना चहा आणि नाष्टा घ्यायचा होता त्यांना तिथे घेऊन गेलो. त्यांना हव्या त्या वस्तू आणून दिल्या. यासाठी गावातील लोकांनी बरीच मदत केली.यात शाळेचे शिपाई आणि क्लार्क यांचे सहकार्य लाभले.



मुलांना मग डायरी लिहायला सांगितली. संध्याकाळी त्यांना कॅम्प फायर साठी होणारा कार्यक्रम व त्यात करण्याचे उपक्रम दिले.प्रत्येक ग्रुपला नाटक करावयाचे होते. विषय दिले होते असे एका गटाला पालक विद्यार्थी यातील विसवांद व उपाय, एकाला चुकीचे ड्रायव्हिंग आणि त्यातून होणारे अपघात यावर नाटक, एका ग्रुपला पर्यावरण, एका ग्रुप साठी 'मी कोण होणार' यावर नाटक. याला बराच वेळ जाणार होता. मुलांनी प्रॅक्टिस सुरू केली.

मग जेवण आणि कॅम्प फायर साठी देशमुख यांच्या घरासमोरील अंगण ही जागा निवडली. त्यांनी सुद्धा काही हरकत घेतली नाही.आठ वाजता जेवण साहित्य आम्ही घेऊन आलो. तांदळाची भाकरी, मटार, भात, लोणचे, पापड, डाळ हा मेनू होता. विनीत पाटील चे आई बाबा तेंव्हा आले.मग त्यांनाही जेऊन जायला सांगितले. कार्यक्रम बघून जा असे सांगितले. काही नवीन मुले सोडली तर बाकीचे राज ,अरविंद,सानिका यांच्यासारख्या मुलांना मेनू सुद्धा माहीत असतात.नवीन मुले बाहेर जरा बिचकत असतात.काही वेळा धमाल येते. मागच्या पावसाळ्यात आम्ही ज्यावेळी काळकाई गावात गेलो होतो त्यावेळी भिसे खिंडीपर्यंत एस्टी बसने गेलो होतो. कंडक्टर कडे मी एकदम २५ तिकीट मागितली. तेवढ्यात अभिग्न उठला आणि म्हणाला, उंकल मेरे पास इस बस का कार्ड नही है! इतर मुले सर्व हसायला लागली.त्याने पहिल्यांदाच एस्टी चा प्रवास केला होता.असे मजेदार प्रसंग बरेच घडतात.

मुलांनी गट नुसार सादरीकरण सुरू केले. सानिकाच्या ग्रुपने करीयर चे सुंदर नाटक केले.पालक व विद्यार्थी हे नाटक मैत्रेय च्या गटाने मस्त केले. सगळ्यात कडी केली तो अपघाता वर केलेली कथा आणि त्याचे सादरीकरण.गोष्ट आपल्या इथे घडलेली घेतली. चुकीच्या पद्धतीने ड्रायव्हिंग करून अपघात झाला होता.हे सर्व विषय देण्यामागे काही कारणे होती.पालक व विद्यार्थी यासंबंधी ज्यावेळी मुले लिहतात आणि सादर करतात त्यावेळीं त्यांच्यातले असलेले सुप्त विचार बाहेर पडतात . त्यातून नवीन काही एकायला मिळते. अपघाताच्या बाबतीत मुलांकडून असे ऐकले होते की त्यातील मुलांच्या बाबतीत भीती ऐवजी कुतूहल निर्माण झाले होते.ती घटना परत घडली नाही पाहिजे यावर भर देण्याऐवजी त्याचे आकर्षण निर्माण होईल की काय ही एक भीती वाटत होती. म्हणून मुलांच्या कडून ते नाट्य लिहून आणि करूंन घेतले.त्याच्यावर त्यांना प्रत्येकाला बोलायचे होते. त्यामुळे हा विषय चांगल्या रितीने ३० -४० लोकांसमोर मांडता आला. सगळ्यात छोटा त्यांच्यात अन्वय पाटील होता,त्याने सांगितले मुलांनी आई वडिलांना फसऊ नये. प्रत्येकाने आपापल्या परीनं भाग घेतला.

काही पालकांनाही ते प्रत्यक्षात बघता आले.गावातील काही मंडळी सुद्धा मुलांचे प्रोगाम पाहत होती. मुलांचे खूप कौतुक त्यांनी केले. प्रोग्राम संपत असतानाच गावात एक मिरवणूक चालली होती.ती मिरवणूक बघताच मुलांनाही नाचायची हौस आली.मला विचारले , आम्ही जॉईन होऊ का? त्यांना लांबूनच नाचायला सांगितले कारण काही वेळा प्रॉब्लेम येऊ शकतो. मुलांनी मग मस्त डान्स एन्जॉय केला.मग अकरा वाजता देशमुखांच्या घरातून निघालो. दिवसभर तसे खूप कार्यक्रम झाल्याने मुले लवकर झोपी गेली.

सकाळी पाच वाजता सर्वांना उठवले.पटापट आवरून सकाळीच लवकर वरदयानी डोंगरावर चढून जयचे होते.साडेपाच पर्यन्त सर्वांचे आटोपले होते. सकाळी सहाला ट्रेक सुरु करायचा होता. दुपारी प्रचंड ऊन असल्याने अकराच्या आत परत यायचे होते. सुजाता टीचर यांना सकाळी लवकरच यायला सांगितले होते. आम्ही बरोब्बर सहा वाजता शाळेच्या प्रांगणात जमा झालो. बाकी कुणाची वाट न बघता आम्ही सरळ चालायला सुरुवात केली.अजून सूर्य उगवायचा होता.मग थोड्या वेळाने सर्वांनी अनुराधा मॅडम यांची मुलाखत घेतली. त्या हॉर्तिकल्चर विभागात काम करतात त्यामुळे त्यांनी बऱ्याच वनस्पती विषयी माहिती दिली. त्यांच्या स्वतः बद्दल बरीच माहिती शेअर केली. आजच्या उपक्रमात जंगलातील झाडांची फळे, बिया गोळा करून , त्याविषयी अनुराधा मॅडम यांचे सहकार्य घेऊन त्यांची माहिती मिळवणे. डोंगरावर चढून गेल्यावर तेथील पठारावर आणि परत येताना मोकळ्या जागेत बियांची लागवड करण्याचे नियोजन होते.मॅडम ची मुलाखत घेताना अर्धा तास गेला तोपर्यंत सुजाता टीचर पोहचल्या होत्या.मग आम्ही डोंगर चढू लागलो. अर्ध्या तासात वर पठारावर पोहचलो.वर भले मोठे पटांगण आहे . बरोब्बर मध्ये देवीचे मंदिर आहे. सर्वांनी दर्शन घेतले. सोबत नाष्टा आणला होता.तो सर्वांनी मिळून संपवला. मग सर्व परिसर पाहिला. पूर्वेकडे सुधागड किल्ला दिसत होता . अगदी समोर उंच असा सरसगड दिसत होता. पश्चिम दिशेला रामेश्वर वैभव चा डोंगर दिसत होता.वरून मुंबई पुणेकरांचे मोटमोठे फार्महाऊस दिसत होते.बहुतेक भाग त्यांनी गिळंकृत केला आहे. एकाने सांगितले खाली पायथ्याला परेश रावल यांची मोठी शेती आहे.

मग मी बॅगेतून ड्रॉइंग पेपर काढले.त्या पठारावरील कातळावर बसून मुलांना समोर दिसेल ते चित्र काढायचे असे सांगितले.

मित्रा जोशी , स्वरूप यांनी फार सुंदर चित्रे काढली. काहींनी रंगवली तर काहींनी फक्त रेखाटली. त्यावेळी एक जुना प्रसंग आठवला. टॉनिक दिवाळी अंकाचे संपादक मानकर काका एकदा टाउनशिप मदये चित्रकला स्पर्धेच्या परीक्षांसाठी आले होते.ते माझ्या परिचित असल्याने मीच त्यांना निमंत्रण दिले होते. त्यावेळी लहान मुलांची स्पर्धा स्केटिंग हॉल मध्ये घेतली होती आणि आठवीच्या पुढील मुलांसाठी करकरणी च्या आमराईत घेतली होती.मानकर काका म्हणजे चित्रकलेला वाहून दिलेला माणूस. निसर्गाच्या सान्निध्यात चित्रकला, पेंटिंग ही कल्पनाच त्यांना भावली.त्या डोंगराच्या कड्याच्या पायथ्याशी आमराईत सुरू असलेली चित्रकला स्पर्धा पाहूनच त्यांच्यातला परीक्षक आपोपाच गळून पडला आणि एक शिक्षक जागा झाला हातात ब्रश पकडून आपोपाप मुलांना मार्गदर्शन करू लागला.मानकर काका आता आपल्यात नाहीत परंतु आपल्या मुलांना त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला.

वरादयानी टेकडीवर बराच वेळ मुले रेंगाळली पण ऊन डोक्यावर यायच्या आत खाली पोहचायचे होते. रस्त्यात व पर्स परिसरात गोळा केलेल्या बिया लावायच्या होत्या.मग त्या बीया प्रत्येकाला वाटल्या आणि पायवाटेच्या कडेला मोकळ्या ठिकाणी बीया लावत खाली निघालो. अकरा वाजेपर्यंत खाली पोहचलो.हॉलवर सगळे जण जमा झालो. कालचे काही कार्डस मुलांनी पूर्ण केली.नंतर गटा मध्ये विविध स्पर्धा घेतल्या यात सायन्स क्विझ सुद्धा होती, त्याशिवाय शब्दांचे विविध खेळ,जर तर सारखे मजेशीर खेळ मुलांनी एन्जॉय केले.



एकच्या सुमारास परत गावात गेलो.थोडे फ्रेश झाल्यावर देशमुखांच्या अंगणात गेलो.तिथे जेवणाची सर्व भांडी घेऊन आलो. ज्यांना जेवण सांगितले होते ते घर जरा लांब होते. पाण्याची व्यवस्था शाळेतील कर्मचारी देशमुख यांनी केली होती. शाळेचे मुख्याध्यापक स्वतः दोनतीन वेळा येऊन गेले.ते गावापासून सत किलोमीटर लांब असलेल्या पेडली गावात राहतात. त्यांचा मुलगा मात्र दोन्ही दिवस आमच्या सोबत होता.जेऊन झाल्यावर जवळच असलेल्या कवेले गावातील धरणाची भेट ठरली होती.एक एस्टी बस त्यादरम्यान येते असे सांगितले.मग बससाठी सर्वजण जमा झालो. एसटीने कवेले धरणाच्या जवळच उतरलो. साधारण अर्धा किलोमीटर लांब मातीची भिंत आहे. धरणाच्या एका बाजूला एक नैसर्गिक रचना पाणी ओव्हरफ्लो होण्यासाठी केली आहे. भिंतीच्या त्या टोकाला मोठा खडक आहे त्यावर एक छोटी भिंत आहे त्याच्यावरून सर्व पाणी ओव्हरफ्लो होते. पाण्याचा साठा खूप मोठा आहे.एक सुंदर रमणीय ठिकाण आहे. पावसाळ्यात इथे प्रचंड गर्दी असते परंतु अतिशय धोकादायक असा हा धरणाचा सांडवा असतो. पाण्याचा प्रचंड वेगाने प्रवाह खाली जात असतो. बऱ्याचदा कातळावर शेवाळे आल्यामुळे घसरण्याची शक्यता वाढते. बऱ्याचवेळा हिथे येण्यास प्रतिबंध असतो. आम्ही गेलो त्यावेळी धरणात पाणी होते परंतु पातळी खाली होती.. सर्व मुले पाण्यात शिरली. धरणाच्या पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नाही. गाळ सुद्धा असतो त्यामुळे मी सुद्धा आत उतरलो.मग अगदी तासभर मुले पाण्यात बसली होती. नंतर बाहेर आलो. रस्त्यावर येईपर्यंत कपडे सुकले होते.एक मोकळा टेम्पो मिळाला त्यात बसून सर्वजण वघोषी येथे आलो. आल्यानंतर गावातील एक टेम्पो देशुमख यांनी अरेंज करून ठेवला होता.मुक्तांगन गटातील खूपदा ट्रेक,शिबिरे केलेली मुले या टेम्पोच्या प्रवासाला सरवलेल्या प्रवाशां सारखी वागतात.इतराना जरा अवघड्ल्यासारखे होते.डोंगराळ भागात जे मिळेल ते वाहन आपले असे समजून प्रवास करायचा .टेंपोत मस्तपैकी खाली प्लास्टिक कागद अंथरला होता.त्यावर बसुन गाणी म्हणत आमचा कॉलोनी कडे प्रवास सुरु झाला.भविष्यात ही मुले विमानाने प्रवास करतील परंतु हा प्रवास विसरणार नाहीत.



शिबिरात ही मुले काही गावतील मुलांशी संवाद साधत मिळुन मिसळून राहिली.कदाचीत त्यांच्याशी बोलताना काही नविन गोष्टींची माहिती मिळाली असेल.त्यांच्या जीवनाचा थोडातरी भाग जवळून अनुभवला असेल.या अनेक गोष्टी शिबिरात शिकायला मिळतात.या प्रत्येक अनुभवाचा पुढील आयुष्यात या मुलाना नक्कीच होतो.टेम्पोने अगदी तासाभराच्या आतच पोहचलो . सर्वजण टाउनशिपमद्ये आठ वाजता पोहचलो.

13 views0 comments

Recent Posts

See All

Comments


bottom of page