आमच्या डिपार्टमेंट मधील विनोद दळवी यांचे हे गाव. नांदगाव हे तेथील गणपती मंदिर आणि स्वच्छ सुरक्षित समुद्र किनारा याबाबत प्रसिद्ध आहे. त्यांना शिबिरा बद्दल विचारणा केली. ते म्हणाले एक दिवस गावी येऊन जा.मग त्यांच्याकडे जायचे ठरले. त्यांना विचारले की आम्ही ज्या दिवशी गावी येऊ त्या दिवशी मला गावात मुलांसाठी एखादा कार्यक्रम घेता येईल काय. म्हणजे गाव बघायला जातोच आहे तर तिथल्या स्थानिक मुलांचा एखादा उपक्रम तरी घेऊया. आम्ही कोणकोणते कार्यक्रम घेऊ शकतो यावर सविस्तर चर्चा दळवी यांच्याशी केली. मग दहावीच्या मुलांसाठी एखादा उपक्रम घ्यायचे ठरले.
रविवारच्या मुक्तांगणच्या कार्यक्रमाला शंतनु राणे याला बोलावले. त्याला शिबीर आणि कार्यक्रम याची थोडक्यात माहिती सांगितली. त्याला कॉलेजला सुट्टी असल्याने तो यायला तयार झाला.तो लोणेरे येथे इंजिनिअरिंग करत होता. कोणता उपक्रम घेता येईल यावर चर्चा केली. अभ्यासाचे नियोजन आणि करीयर या दोन विषयावर चार तासांचा उपक्रम घ्यायचे ठरले. त्याच्या काही नोट्स तयार केल्या आणि शंतनु राणेला दाखवल्या.
एक दिवस निश्चित ठरवून दळवी यांना कळवले.त्यांनी मग गावाकडे जाऊन पुढची तयारी सुरू केली. त्यांनी गावात जाऊन मुलांना निरोप दिले. गावातील काही प्रमुख लोकांना कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. मुलांना सकाळी दहा ते संध्याकाळी चार पर्यंत कार्यक्रम होईल असे सांगितले.
दळवी गावावरून आल्यानंतर भेटले. त्यांना आम्ही नक्की काय उपक्रम घेणार आहोत त्याची माहिती दिली. साधारण मुलांची संख्या,ती मुले कोणत्या आर्थिक स्तरातून आली आहेत याची माहिती घेतली. त्यांना या कार्यक्रमातून कोणते फायदे होऊ शकतात याची कल्पना दिली. कार्यक्रमाला येणारी सर्व मुले शेतकरी कुटुंबातील असतील असे गृहीत धरले. त्यामुळे त्यांना काही पूरक पुस्तके देता येतील का ?म्हणजे जसे गाईड, प्रश्नपत्रिका संच असे देता येतील काय यावर दळवी यांच्याशी चर्चा केली.मग १० वी ते १२ वी यांची पूरक पुस्तके कार्यक्रमात दळवी यांना द्यायचे ठरले. दळवी यानी जबाबदारी घेतली की त्यांच्या घरातील लोक त्या पुस्तकांचा लायब्ररी सारखा वापर मुलांकडून करून घेतील.दर रविवारी पुस्तके मुले येऊन बदलून जातील.मग सह्याद्री मित्र मंडळाकडून २००० रुपयांची आणि माझ्याकडून २००० रुपयांची पुस्तके द्यायचे ठरले.त्या दहावी व बारावी यांच्या सर्व पूरक पुस्तकांचे दोन संच विकत आणले. करीयर मार्गदर्शन करण्यास वोकेशनाल गाईड नावाचे पुस्तक मुबईतील सेंट झेवियर्स ऑफिस मधून घेऊन आलो. अभ्यासातील स्वावलंबन याविषयी काही पुस्तके लेख वाचून काढले. ग्रामीण भागात राहणाऱ्या मुलांना गृहीत धरून काही लिखाण केले. त्यांच्याशी संवाद साधल्यावर काही विचारांची देवाण घेवाण करता येईल का याचा शंतनु सोबत बसून विचार केला , चर्चा केली. आपल्या चार तासाच्या कार्यक्रमाने काही मोठा बदल होईल अशी अपेक्षा धरता येईल असे आम्हाला वाटत नव्हते.पण आपण काही नवीन माहिती,काही नवीन मार्ग तरी दाखवू शकतो यावर विचार केला.त्यांच्याकडून एक प्रश्नावली भरून घ्यायचे ठरले. त्यात पंचवीस मुद्दे मांडले. त्याची उत्तरे पर्याय स्वरूपात लिहिली होती.ती फक्त टीक करायचे. एका प्रश्नाचे विविध पर्याय असू शकतात.या प्रश्नावली मधून आम्हाला प्रत्येक मुलाची एकंदरीत माहिती,कल कळणार होता.कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रश्नावली त्यांच्याकडून भरून घेतली की मग पुढचा कार्यक्रम सोपा जाणार होता.
कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी सात वाजता बाईकवर निघालो. रोहा येथून चनेरा मार्गे रस्ता पकडला.हा रस्ता म्हणजे एकदम सुनसान, ज्यास्त वाहने नाहीत.मग चणेरा टाकल्यावर फणसाड अभयारण्यच्या दिशेने गाडी वळवली.तिथून नांदगाव फक्त १५ किलोमीटर अंतरावर आहे.पण मध्ये घाटरस्ता आहे. दाट जंगल रस्त्यात लागते.खूप सुंदर रस्ता आहे.चढण मात्र खतरनाक आहे. सुरवातीच्या काही वळणांचा त्रास होतो.एका वळणावर अचानक एक ट्रक समोर आला.चढणीवर असल्याने तारांबळ उडाली. कसेतरी बाजुला झालो.एक मोठी चढण संपली की मग चांगला पाच किलोमीटर रस्ता अगदी सरळ आहे.वरून रेवदंडा खाडी आणि रोह्याची कुंडलिका नदीचे पात्र एकत्र मिळताना दिसते. जंगलातून जाणारा रस्ता अजून भयाण वाटायला लागतो. कारण दाट झाडी होती आणि त्यात तिकडे बिबट्या असतात असे एकले होते. त्यामुळे जरा भीती वाटली. नंतर आम्ही उतरणीला लागलो. आता चित्र उलटे दिसते. आता छान नारळी पोफळीच्या बागा दिसायला लागल्या. लांबवर समुद्र किनारा दिसू लागला.पण या बाजूला प्रचंड उतार सुरू होतो. पंधरा मिनिटात आम्ही उतार संपऊन नांदगाव फाट्यावर पोहचलो. हायस्कूल समोरून गाडी नांदगाव कडे वळवली. गावात शिरल्यावर दळवींचे घर शोधले. त्यांच्याकडे एकदोनदा गेलो होतो पण तिकडे सर्व घरे वाडी एका ओळीत आणि सारख्याच प्रमाणात दिसतात.मग थोडे विचारत गेल्यावर घर मिळाले. नऊ वाजले होते थोडा चहापाणी झाल्यावर त्यांच्या समाजाच्या हॉलवर गेलो. माळी समाज हॉल गणपती मंदिराच्या समोरच आहे.
हॉल वर काही मुले अगोदरच पोहचली होती. शंतनुने त्यांच्याकडून प्रश्नावली भरून घेतली. दहाच्या सुमारास सर्व मुले पोहचली होती.गावातील काही मान्यवर यावेळी आले होते. त्यांची ओळख करून दिली. काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संबधित होते तर काही सुपारी संघ,ग्रामपंचायत सदस्य होते. त्यांच्याशी चर्चा करून आम्ही कार्यक्रम सुरू केला. प्रश्नावली अगोदरच घेतल्यामुळे सर्व डेटा तयार होता. त्यानुसार कार्यक्रम थोडा मोल्ड केला.
प्रथम छान गाणी घेतली.मग सर्वांशी संवाद साधण्यासाठी काही खेळ घेतले. मुलांना फक्त भाषण ऐकायला आवडत नाहीत तर चर्चेतून नवीन गोष्टी शिकायला आवडतात. पहिल्यांदा करीयर हा विषय घेतला. बहुतांशी मुलांना बऱ्याच वाटा माहीतच नव्हत्या.पुणे मुबईत आरामात बसून तिथल्या मोजक्या शाळा व मुले यांचा विकास डोळ्यासमोर धरून किंवा तिथल्याच अनुषंगाने अभ्यासक्रम ठरवला जातो. ग्रामीण भागाचा विचार फार केला जात नाही आणि चुकून एखाद्याने तसा प्रयत्न केल्यास त्यांची वृत्तपत्र किंवा तत्सम माध्यमातून येथेच्छ टवाळी करण्याची अक्षरशः सुपारी दिली जाते. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे प्राध्यापक रामकृष्ण मोरे हे शिक्षणमंत्री असताना इयत्ता पहिली पासून सुरू केलेली इंग्रजी विषयाची अंमलबजावणी.या माणसाला मुंबई पुण्यातील प्रतिष्ठित धेंडाणी अक्षरशः वेड्यात काढले.पण या माणसाच्या दूरदृष्टीने सर्व कायापालट होण्यास प्रारंभ झाला. खरंतर इंग्रजी माध्यमातील शाळांची पायाखालची वाळू सरकली होती आणि तळागालात इंग्रजी पोहचली तर स्पर्धा वाढेल या अनामिक भीतीपोटी विरोध झाला. पण त्याचे अनुकरण ग्रामीण भागात होऊ नये यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले गेले.पण सुरवातीची काही वर्षे गेल्यानंतर मात्र सर्व चांगले बदल झाले.
शंतनु आणि मी मुलांचे दोन गट करून स्वतंत्र चर्चा केली. नंतर सर्वांचे चार गट पाडले. काही गटकार्ये करायला सांगितली. त्यासाठी भिन्न भिन्न प्रकारचे विषय दिले. त्यात अभ्यासातील स्वावलंबन आणि नियोजन याविषयी त्यांना काही पूरक माहिती पुरवुन प्रत्येक गटाला त्यांचे स्वतः चे विचार मांडायला सांगितले. एका गटाला फक्त अभ्यासात येणारे अडथळे व त्यावर उपाय यावर मते मांडायला सांगितले.मुले सुरवातीला बावरत होती. परंतु आम्ही कोणतीही परीक्षा वगैरे न घेता त्यांच्या कलाने घेत होतो त्यामुळे त्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. साडेबारा वाजले कधी वाजले कळाले नाही.मग मुलांची जेवणाची वेळ झाली हे लक्षात आले.गावातील प्रतिष्ठित मंडळी त्यांच्या मार्गे निघून गेली होती. आमचे सत्र चालू झाले की ते लगेच निघून गेले. मग जेवण्यासाठी एक तासभर सुट्टी दिली. आम्ही सुद्धा देवळात जाऊन आलो. नंतर दळवी यांच्या घरी जाऊन जेवण करून घेतले. त्यांना थोडा फीडबॅक विचारला. त्यांना कार्यक्रमाचे स्वरूप खूप आवडले. काही सदस्य बाहेर बसून एकत होते. त्यांनी येऊन भेटून दळवी यांना सांगितले आणि कार्यक्रमाबद्दल आभार मानले. आम्हाला जरा बरे वाटले . याचे कारण म्हणजे आम्हाला ते अपेक्षित नव्हते.
दुपारच्या सत्रात सर्व जमा केलेली माहिती आणि प्रत्येक क्रमिक विषयात येणाऱ्या अडचणी यावर चर्चा झाली. फक्त उपदेश किंवा लेक्चरबाजी करून काही उपयोग होतो असे मला तरी वाटत नाही. तीच गोष्ट मुलांकडून आली तर त्याचे महत्त्व वाढते. त्याचे पालन करणे सहज शक्य होते. लादलेले वेळापत्रक नेहमीच यशस्वी होईल याची खात्री नाही पण स्वतः तयार केलेले मात्र यशस्वी होते. फक्त एखादे टारगेट निश्चित करायला पाहिजे. मुलांच्या प्रश्नावलीच्या माध्यमातून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांच्या चेहऱ्यावर ते दिसत होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेवणाच्या सुट्टीनंतर सर्व मुले परत उपक्रमासाठी परत आले. याचा अर्थ त्यांना पुढे भाग घ्यायचा होता. आल्यावर मनातील प्रश्न हा एक गमतीदार खेळ घेतला. मनात एक वस्तू धरायची आणि दुसऱ्या गटातील मुले फक्त वीस प्रश्न विचारून त्याचे उत्तर शोधायचे.प्रश्न हो किंवा नाही या स्वरूपातील असावेत असा नियम होता.खूप धमाल आली. त्यानंतर एक त्यांची क्विझ घेतली.मग मुळ विषय सुरू केला. प्रत्येकाला स्वतः चे वेळापत्रक बनवायला लावले. त्यातील अडचणी लिहण्यासाठी चर्चा केली.प्रत्येक गटाने आपले मत यावर मांडले.उपाय सुचवले. आपण आपलेच प्रश्न उपस्थित करून सगळ्यांनी मिळून उत्तरे शोधायची पद्धत मुलांना फार आवडली. शंतूननें यात फार मदत केली.चार वाजून कधी गेले कळाले नाही.मग दळवी यांना बोलावून घेतले. त्यांच्या सोबत अजून त्यांचे कार्यकर्ते आले. मुलांसाठी आणलेली गाईड, पुस्तके दाखवली.१० वी ते १२ वी या वर्गांसाठी दर रविवारी माळी समाज हॉल मधून ती पुस्तके घेऊन जायला सांगितले.प्रत्येक रविवारी ती पुस्तके बदलावित असे ठरले. कार्यक्रमाची सांगता केली. दळवींच्या घरी गेलो .काही पालक येऊन भेटले. आमच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. काही पालकांनी शिबीर गावात घ्या असे सुचवले.तसे दळवी यांना अगोदर मी विचारलेच होते.मग गावात कोणकोणते उपक्रम घेता येतील असे विचारले.काही गोष्टी त्यांनी सुचवल्या.मग शिबिराची तारीख नक्की करून कळवतो असे सांगितले. त्यांचा समाजाचा हॉल त्यावेळी बुक करायला सांगितले.मग शंतनु आणि मी बाईकवर परतण्यास निघालो. परत जाताना आम्ही विक्रम इस्पात मार्गे गेलो.फणसाड मार्गे जायचे टाळले.मग पुलाजवळील मंदिर बघुन आम्ही रोहा मार्गे निघालो. रस्ता पूर्ण मोकळा असल्याने तासाभरात तिथून घरी पोहचलो.
दिवाळी शिबिर ठिकाण निश्चित झाल्यावर सर्व कार्यकर्त्यांना प्रथम सांगितले. अंजली, पांडे, बर्गोले,उपणकर या सर्वांना ठिकाण आणि काय कार्यक्रम घेता येतील यासंदर्भात माहिती दिली. राहण्याची व्यवस्था आणि जेवणाची व्यवस्था दळवी करतील असे सांगितले. जेवण आपण बनवायचे असे ठरले. मुलांना निरोप दिले. पंचवीस मुले येणार होती. कार्यकर्ते पाच सहा आणि काही पालक भेट द्यायला येणार होते. शुक्रवारी सकाळी निघून रविवारी रात्री अलिबाग मार्केटिंग बसने परत यायचे ठरले. मार्केटिंग बसची तिकिटे काढायला सांगितली. मुलांची यादी केली तन्वी सावंत, विक्रांत मोटे, स्वप्निल बर्गोले,सुमित गायकवाड,स्वप्नील गायकवाड, प्रसन्ना अवताडे, प्रणव अवताडे, शिल्पा वंजारी, मानसी सुपेकर, तेजस्विनी गोसावी,वरद जोशी, तेजस उपणकर, सुमेध उपणकर, गौरी पांडे, संकेत भोसले, प्रियांका मोरे, सुयोग आबनावे, अक्षय पोटे,सुजित थोरात, स्मृती पवार, दुबे, सिध्दी गुरव, अमोल नेवसे, वैभव मोहीरे, वैभव सुरावकर,आश्विनी उमाळे, काळगावकर अशी बरीच नावे आली. मुलांना तीन दिवस लागणारे साहित्य सांगितले.
शुक्रवार सकाळी सात वाजता सर्वजण शॉपिंग सेंटर बस स्टॉपवर जमा झालो. काही कार्यकर्ते नंतर येणार होते. मुलांची यादी केली. वरद जोशी पेण वरून आला होता. सर्व मुलांची यादी केली. सात वाजता नागोठणे मार्केटिंग बस आली. त्या बसने स्टँडवर गेलो. रोहा बस आठ वाजता होती. नागोठणे येथे थोडा नाष्टा केला. आठ वाजता बस आली. सर्व बॅगा व्यवस्थित वर चढविल्या. बसने रोह्याला साडेआठ वाजता पोहचलो. नऊ वाजता बस लागणार होती. स्टॅण्डचे बांधकाम चालू असल्याने खूप गोंधळ होता.बस कुठेही लागत होत्या. कंट्रोलर मोठ्याने ओरडत होता पण त्याचा आवाज ऐकू येत नव्हता. आम्हाला ज्या मार्गे जायचे होते त्या मार्गे दिवसातून दोन वेळा गाड्या आहेत असे कळाले होते. त्यामुळे ती गाडी मिळणे गरजेचे होते.मग मुलांना एका ठिकाणी बॅगा ठेऊन उभे केले.तीन चार जणांना रिकाम्या बसच्या बाजुला उभे केले आणि फणसाड मार्गे मुरुड गाडी हा बोर्ड लावला की लगेच सगळ्यांना बोलवायचे असे ठरले.बस लागल्याबरोबर सर्वजण वर चढले. सकाळची बस असल्याने फारशी गर्दी नव्हती.हा मार्ग तसा आडवळणाने डोंगरातून जात असल्याने सकाळी रोहा येथून जाणारी लोकं कमी होती. मात्र परत येताना ही बस बाजारहाट करायला भरून येते. तेवढ्यात एकजण सांगत आला बस लागली मग सगळेजण धावत गेलो. बसमध्ये पटापट मुले चढली. आम्ही पंचवीस जण होतो. त्यामुळे आमची संख्या बरीच होती.मग मुलांनी जाईपर्यंत गाणी म्हणत धम्माल केली. तासा भराचा प्रवास कधी संपला तेच कळाले नाही. फणसाड अभयारण्य सोडल्यावर लगेच नांदगाव फाट्यावर उतरलो. समोरच शाळा दिसते आणि उजव्या बाजूला एक मंदिर दिसते. सर्वजण त्या मंदिरात गेलो.बाहेर बसायला बऱ्यापैकी जागा आहे. तिथे सर्वांना बॅगा ठेवायला सांगितल्या. मग डबे संपवायचे ठरले. मुलांना भूक लागली होती. जेवण झाल्यावर चालत नांदगाव कडे निघालो. दहापंधरा मिनिटात दळवी यांच्या घरी पोहचलो.मग त्यांनी हॉलचे गेट उघडले. आत गेल्यावर मुलांना सर्व हॉल दाखवला. मुले थोडी फ्रेश झाली. त्यांचे ग्रुप पाडले . त्यांचे लीडर नेमण्यात आले.या शिबिरातील हा तसा सर्वात मोठा आणि आठवणीत राहील असा ग्रुप होता.
सर्वांना एकदा समुद्रावर घेऊन गेलो. त्यांना न विचारता कुठेही जाऊ नका असे बजावले. नांदगाव बीच माळी समाज हॉलच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे मुलांना तशा सूचना केल्या.पांडे आणि उपनकर फॅमिली तिथे पोहचले. नंतर सर्व मुलांना बीचवर घेऊन गेलो. बीचवर काही मुले किल्ले करत बसले तर काही जण जवळच एक वाळूची टेकडी आहे तिथे उड्या मारत बसले. किनारा तसा खोल नसल्याने आणि ओहोटी असल्याने मुलांना खेळायला वाव होता. काहीजण शंख शिंपले जमा करत बसले. नंतर मग पाण्यात मनसोक्त भिजले. तिथे दोन तीन तास कसे गेले समजले नाही. नंतर नाष्टा ग्रुप ला घेऊन पुढे आलो. उपणकार बाकीच्यांना घेऊन आले. जेवणाची व्यवस्था दळवी यांच्याकडे होती. त्यांनी गावातील काही लोक मदतीला घेऊन सर्व नाष्टा व स्वयंपाक करण्याचे नियोजन केले होते. त्यांना मदतीसाठी पांडे आणि मुलांचा एक गट असे ठरविले होते. दळवींनी आमच्या मदतीला धारवे नावाचा कॉलेज मधील मुलगा दिला होता.तो आमच्या सोबत तीनही दिवस असल्याने बऱ्याच गोष्टी करता आल्या.हॉलच्या मागे चूल पेटवली. मुलांना भांडी वगैरे साहित्य दळवी यांच्याकडून आणायला सांगितले. नाष्टा आणि जेवण यांची तयारी सुरू करायची होती. किराणा सामानाची यादी करून दळवी यांनी सांगितलेल्या दुकानातून आवश्यक त्या वस्तू मुलांनी आणल्या.मग नाष्टा चहा सर्वांनी मिळून केला. त्याची तयारी आणि वाटप एका गटाकडे होते .पांडे सोबत असल्याने मुलांची जेवणाची धमाल होती. जेवण , नाष्टा, आवराआवर ही सर्व कामे गटामध्ये विभागण्यात आली. मदतीला स्वप्निल गायकवाड, अवताडे बंधू ही मुले अगदी तत्पर असत. वरद, तनु, तेजा, अक्षय म्हणजे आम्ही धमाल करायला आलो आहोत असाच काही त्यांचा मूड असायचा. विक्रांत, सुमित सारखी मुले मात्र एकदम सीन्सियर, संकेत, सुजित सारखी मुले तर निव्वळ मजा मस्ती यासाठी यायची.पण सर्वजण मिळून धमाल करायचे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातील एक दोन जण सोडले तर बाकी सर्वजण चांगल्या ठिकाणी आपले करीयर करत आहेत. तनु, तेजा, शंतनु अमेरिकेत आहेत. विक्रांत, अक्षय, स्मृती, सिध्दी हे डॉक्टर झाले. सुमित आर्किटेक्ट झाला. आबनावे याने मुंबई आयआयटी मधून शिक्षण घेऊन कलकत्ता येथे आयआयएम केले . बाकी सर्वजण इंजिनिअर झाले. एकंदरीत मुलांनी खूप चांगले करीयर केले. शिबिराच्या सर्व सूचना दिल्यानंतर तीन दिवसाचे उपक्रम सांगितले. कार्यकर्ते व मुले सर्वांना प्रत्येकाला आपले काम सांगण्यात आले.. पाहिला उपक्रम गावातील एका छोट्या सोडा फॅक्ट्रीला भेट हा होता.
नांदगाव मध्ये गावातीलच श्री. रमाकांत खोत यांची एक सोडा फॅक्टरी आहे. दळवी यांनी त्यांची अपॉइंटमेंट अगोदरच घेतली होती. सर्व उपक्रमाबाबत सांगितले होते. हॉलच्या जवळच त्यांची फॅक्टरी आणि जोडून त्यांचे हॉटेल आहे. त्यांच्याकडे राहण्याची व्यवस्था टुरिस्ट साठी केली जाते. तिथे गेल्यावर सर्व मुलांची ओळख करून दिली. खोत आणि त्यांच्या पत्नी दोघेही माहिती देण्यास आले होते. एवढ्या लांब मुले शिबिराला आली आहेत आणि त्यांना काहीतरी आपल्याला काहीतरी सांगायला मिळत आहे याचा एक आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यामुळे प्रत्येक गोष्ट छान सांगत होत्या. त्यांच्या ऑपरेटर कडून बाटली भरली कशी जाते याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. .सोडा मशीन, त्याची टेक्निकल माहिती दिली. लागणारा कच्चा माल कोणकोणत्या प्रकारचा लागतो. त्याची गुणवत्ता कशी बघतात याची माहिती दिली.सोड्यामधील वेगवेगळे प्रकार दाखवले. बॉटलींग प्लांट दाखवला.प्रत्येक बॉटल कशी भरली जाते. त्याचे पॅकिंग कसे होते. या सर्व गोष्टींची माहिती खोत कुटुंबाने दिली.खोत यांच्या पत्नी सुद्धा चांगल्या माहिती सांगत होत्या. आमच्याच कंपनीतील प्रवीण झेमसे यांनी हा बॉटलिंग प्लांट बनवून दिला होता. त्यांच्याकडे कोका कोला, मँगोला सारखे सुद्धा ब्रँड होते. मुलांना सर्व प्रत्यक्षात पाहायला मिळाले. मुलांना काही ब्रांडची टेस्ट घ्यायला सांगितले. आम्ही सुद्धा सरबत टेस्ट केले. बाजारात मिळणाऱ्या कोल्ड ड्रिंक्सच्या तुलनेत याची क्वालिटी चांगली वाटली. त्यांनी अगदी एक कोल्ड ड्रिंकची बाटली तयार करण्यास किती खर्च येतो हेही सविस्तर सांगितले.. मुलांनी बरेच प्रश्न विचारले.दोन तासाच्या वर वेळ तिथे गेला..सर्व मुलांनी आणि आम्ही खोत कुटुंबाचे आभार मानले. खरतर दळवी असल्यामुळे आम्हाला हा उपक्रम बघता आला .मग आम्ही हॉलवर परत आलो.मुलांना पुढील कार्यक्रमाचे नियोजन सांगितले. संध्याकाळचे सहा वाजले होते. त्यामुळे सर्वांना घेऊन देवळात जाऊन आलो. दुसऱ्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती. त्यामुळे तिथे गर्दी असते म्हणून आदल्या दिवशी दर्शन घेतले. आल्यानंतर जेवण करणारा गट पांडेंच्या ताब्यात दिला. बाकीचे सर्वजण इतर उपक्रम करू लागले. डायरी लिहायला सर्वांनी घेतली.बाकी गटाला कॅम्प फायरची तयारी सुरू करायला सांगितली. गावातील बरीच माणसे रात्री प्रोग्राम बघण्यासाठी येणार होती. प्रत्येक ग्रुप आपआपली तयारी करत होते. जेवणाचा गट पांडे यांच्या हाताखाली काम करत होता. हॉल बराच मोठा असल्याने मुलांना मोकळीक होती. भाकऱ्या बनवायची ऑर्डर गावात दिली होती. मंदिर समोर असल्याने पांडे सर्व मुलांना घेऊन गेले. मुलांकडून आरत्या म्हणून घेतल्या. नंतर सर्वजण परत आल्यावर जेवण करायला बसलो. जेवण वाढणारी टीम तयार होती. जेवणानंतरची साफसूफ आणि जेवण वाढणे हे काम त्या गटाकडे होते.जेवण चालू असताना काही पालक तिथे आले.मग त्यांनी सुद्धा जेवण केले.मग कॅम्प फायर प्रोग्राम सुरु झाला.प्रत्येक ग्रुपने आपापल्या अॅक्टिवीटी सादर केल्या. अकरा वाजेपर्यंत कार्यक्रम चालला.मग सर्वांना झोपायला सांगितले.
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी लवकरच उठून सर्वांना आवरायला सांगितले. नाष्टा करणारा गट पांडे यांच्यासोबत दिला.मग सकाळी पोहे आणि चहा मेनू होता. हॉलच्या मागे चूल केली होती. दळवींनी गावातील मोठी भांडी आणून दिली होती. सर्वांनी आवरल्यानंतर नाष्टा ग्रुप सोडून सर्वजण रांगोळी साहित्य घेऊन सहा वाजता मंदिरात गेलो. मंदिराच्या समोरच असलेल्या जागेत लांबलचक रांगोळी काढायला सुरुवात केली. आत शिरताना जो छोटा रस्ता लागतो तिथे मुलांनी छान रांगोळीची बॉर्डर काढली वीस पंचवीस जण रांगोळी काढत होते.लोक दर्शनाला यायच्या अगोदर आमची रांगोळी काढून तयार होती. दीड तास मुले रांगोळी काढत होते. गावातील लोक मात्र कौतुकाने पहात होते.मग सर्वजण नाष्टा करायला परत आलो. दहा वाजल्यानंतर सुपारी संघ नांदगाव पंचक्रोशी या ठिकाणी जायचे ठरले होते. त्याचवेळी गावातील मुलांसाठी दोन उपक्रम ठेवले होते.दोन कार्यकर्ते मुलांबरोबर जाणार होते. दळवी सोबत जाणार होते. सुपारी संघाचे सचिव देशपांडे मागील कार्यक्रमाला आले होते. त्यामुळे त्यांनी मदत केली. दळवींनी मुलांना सुपारीच्या लागवडीपासून ते बाजारात विक्री पर्यन्त माहिती दिली. सुपारीचे विविध प्रकार. त्याची काढणी,वाळवण, सुपारी वेगळी करणे, रोटा म्हणजे काय, त्यांच्या दर्जानुसार विभागणी करणे, प्रतवारी नुसार त्यांचे पॅकिंग करणे. सुपारीच्या व्यापाऱ्यांशी दराबाबत चर्चा करणे अशा बऱ्याच गोष्टी चर्चेत आल्या. सुपारी संघाच्या सर्व सदस्यांनी मुलांना मार्गदर्शन केले. मुलांनी डायरी मध्ये सर्व लिहून ठेवले. मुलांनी तेथील कर्मचारी व सदस्य यांना बरेच प्रश्न विचारले. दरम्यान हॉल मध्ये गावातील मुलांसाठी कार्यक्रम चालू होता. काही बैठे खेळ, चर्चासत्र, गटकार्य असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. साडेबारा वाजता त्यांना जेवणाची सट्टी दिली. दुपारी परत कार्यक्रमासाठी बोलावले. दुपारी. तोपर्यंत मुले सुपारी संघातून परत आली होती. जेवणाची तयारी सकाळी थोडी केली होती. धारवे यांच्या सोबत गावातील काही महिला जेवणासाठी मदतीला होत्या. कार्यक्रमाचे स्वरूप असल्याने दुपारच्या जेवणाला मुलांची मदत लागली नाही.
दुपारच्या जेवणानंतर मुलांना बीचवर घेऊन गेलो.दोन तास तिथे मुले रमली. संध्याकाळी चार वाजता मच्छीमार संघ मुरुड नांदगाव यांची भेट घ्यायला जायचे होते.मग मुलांना बीच वरून तिकडे घेऊन निघालो. या संघटनेत काम करणारे श्री. गिदी आणि श्री बैले यांची खूप मदत झाली. दळवी यांची त्यांच्याशी चांगली ओळख असल्याने आमचे काम सोपे झाले होते .समुद्रातील मासेमारी , सुकी मासळी, यावर बरीच माहिती सांगितली. मासेमारीचा पारंपरिक व्यवसाय कसा चालतो यावर चर्चा झाली. समुद्रातील मासेमारी बद्दल थोडी माहिती दिली. मासळी कातळावर कशी सुकवली जाते. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी मासळीची चव का असते याबद्दल सांगितले.ही एक प्रकारची समुद्रातील शेती आहे आणि ही सुद्धा पूणपणे निसर्गावर अवलंबून असते.पण यात ताकत , धैर्य आणि निसर्गाशी लढण्याची जिद्द या गोष्टींची नितांत गरज असते असे त्यांनी सांगितले. जगाचा कायापालट हा खरंतर या दर्यावर्दी लोकांनीच घडवून आणला. भारताच्या शोधात कोलंबस निघाला म्हणून अमेरिका सापडली.भारत देश असा आहे की सर्व जगाच्या दर्यावर्दी लोकांचे काही शतकांपूर्वी मुख्य टार्गेट असायचे. त्यांनी मासेमारी करताना जे लोक काम करतात त्यांच्या विषयी सांगितले. तांडेल, खलाशी, नाखवा अशी कितीतरी नावे त्यांनी सांगितली .दिघी मुरुड भागातील सुक्या मासळीची बाजारातील वाढलेली मागणी परंतु पुरवठा कमी असा विचार तेथील संगठ्नेतील लोकांनी सांगितला. समुद हा फॅक्टर फार मोठा असतो त्यावर सर्व अवलंबून असते अगदी देवाप्रमाने स्थान आहे आणि म्हणून नारळी पौर्णिमा या दिवशी ते लोक सोन्याचा नारळ समुद्राला अर्पन करतात असे सांगितले. मुलांना एका नवीन क्षेत्राबद्दल माहिती मिळाली. सहा वाजता सर्वजण हॉलवर परत आलो.
नाष्टा करणारी टीम मदतीला गेली. इतर सर्वजण डायरी लिहायला बसले. नंतर मुलांना संध्याकाळचे उपक्रम सांगितले. कॅम्प फायर ची तयारी गटात करायला सांगितली. नाष्टा वगैरे आटोपल्यावर. मुलांना टाकाऊतून टिकाऊ हा उपक्रम सांगितला. त्यांनी काही जमा केलेले शिंपले, नारळाचे विविध टाकाऊ साहित्य करवंटी, झावळ्या, सुपारीचे विविध टाकाऊ भाग याचा वापर करून मुलांनी वस्तू, ग्रीटिंग कार्ड्स बनवली.
तोपर्यंतच सात वाजत आले होते. मुलांना पांडे देवळात घेऊन गेले. आरती केली. परत आल्यावर जेवणाची व्यवस्था करायला गेले. गावातील वयोवृध्द कलाकार, कारागीर, शेतकरी, निवृत्त कर्मचारी यांचा मुलाखतीचा एक उपक्रम घ्यायचा होता. दळवींनी गावातील अशा मंडळींना भेटून त्यांची रीतसर वेळ मागून घेतली होती. मुलांचे गट त्याप्रमाणे पाडले होते..प्रत्येक गटाला गावातील मान्यवर ज्येष्ठ नागरिक यांच्याशी बोलायचे होते. प्रत्येक गटासोबत एक कार्यकर्ता होता. वेगवेगळ्या ठिकाणी चार गट गेले.एक गट श्री. रामचंद्र ठाकूर,एक गट शाहीर धारवे ,एक गट दळवी यांच्या आत्येभावाकडे गेला आणि उरलेला एक गट एक जुने राजकीय कार्यकर्ते यांच्याकडे गेला. दळवी यांचे आत्येभाऊ श्री. विद्याधर चोरगे हे गावचे माजी सरपंच आणि येथील प्रमुख राजकीय पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्त्ये आहेत. भजन कीर्तन हे त्यांचे फार आवडते प्रकार. त्यांना त्यामुळे विद्याधर बुवा असेही म्हणतात .ते भजन या पारंपरिक प्रकारात रस घेऊन पुढच्या पिढीला मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या मुलाला सुद्धा याची आवड आहे. त्यांचा मुलगा सुद्धा संगीत क्षेत्रात काम करतो आणि संगीत शिक्षक म्हणून काम करतो.त्यांनी मुलांना पेटीवर छान वाजवून दाखवले. वेगवेगळया विषयात चर्चा केली. यासाठी गावातील अशा प्रत्येक व्यक्तीची निवड ही मुद्दामहून केली होती ज्यामुळे प्रत्येक क्षेत्रातील माहिती मुलांना मिळावी.एक गट त्या गावातील शाहीर धारवे यांच्याकडे गेला. त्यांनी शाहिरी कलेविषयी बरेच सांगितले. बऱ्याच शाहिरांच्या बाबतीत त्यांनी माहिती दिली. त्याना विविध वाद्ये वाजवता येत होती. त्यांच्या घरातील सर्वजण मुलाखती दरम्यान उपस्थित होते. त्यानी एक पोवाडा सादर केला.एका मुलाने छान पेटी वाजवून दाखवली. त्यांचा नातू आमच्या सोबत तीनही दिवस मदतीला होता. मुलांनी अगदी घरातल्या सारखे वागून छान माहिती मिळवली .त्या परिसरात भजन या प्रकाराला मान आहे. काही भागात आपण गेलो तर भजन म्हंटले की फक्त वयस्कर व्यक्ती दिसतात. पण इथे मात्र सर्व लहान मुले,तरुण वर्ग पण दिसतो. पेटी, तबला , गाणे यात हे पारंगत असतात. त्यामुळे गावातील एक संगीतातील जाणकार , गावातील प्रख्यात तबला वादक श्री. रामचंद्र ठाकूर यांच्या मुलाखतीला साडेसात वाजता गेलो. ग्रुप मधील तबला, पेटी, गायन याचे बऱ्यापैकी ज्ञान असलेले विक्रांत, अवताडे, स्वप्निल, तनु अशी बरीच मुले होती. त्यांना सोबत घेतले. मुलाखत खूप रंगली. ठाकूर यांना मुलांचे कौतुक वाटत होते कारण मुले तबला पेटी छान अगदी सफाईदार वाजवून दाखवत होते. त्यांनी काही राग विचारले तर मुलांनी बरोबर उत्तरे दिली.मग मुलांनी त्यांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील विविध अनुभवावर आधारित प्रश्न विचारले. त्यांच्या जीवनातील काही न विसरता येणाऱ्या आठवणी बद्दल विचारले. त्यांच्या घरातील लोकांनी मात्र मुलांचे खूप कौतुक केले. दळवी यांना त्यांनी कॅम्प नियोजन केल्याबद्दल गावातील प्रतिष्ठित लोकांनी अभिनंदन केले. त्यात गावातील मुलांना सहभागी केल्याने गावातील सर्व लोकांना ज्यास्त बरे वाटले.ते नेहमी बघतात ज्यावेळी पर्यटक म्हणून शहरी मुले, माणसे गावात येत्तात त्यावेळी त्यांचे वागणे फारसे चांगले नसते किंवा ही खेडूत लोक असा दृष्टीकोन सहसा असतो. त्यांच्याबाबत विचार करणे ,त्यांचा तसा मान राखणे या गोष्टी लांबच राहतात. त्यामुळे आम्ही जवळ जवळ ३५ लोक तीन दिवस राहिलो पण कुठेही वेगळेपणा कुणीही दाखवला नाही. चतुर्थी दिवशी तर सर्वच्या सर्व रांगोळी काढायला सकाळी सहाच्या सुमारास पोहचले होते. रामचंद्र ठाकूर यांची मुलाखत अगदी रात्री नऊ पर्यन्त रंगली.मग आम्ही परत हॉलवर गेलो. जेवण तोपर्यंत तयार होते. जेवण गटाने वाटप सुरू केले.त्याच्यानंतरची आवराआवर सुद्धा त्यांच्याकडेच होती. नंतर कॅम्प फायरचा कार्यक्रम छान रंगला. त्या दिवशी सुद्धा बरीच धावपळ झाली होती त्यामुळे मुले लवकर झोपी गेली.
तिसरा दिवस हा कोस्टल ट्रेक आणि काही मुलाखतींसाठी राखीव ठेवला होता.सकाळी पाचनंतर सर्वांना उठवले. नाष्टा ग्रुपला तयार होऊन मदतीला जायला सांगितले.बाकीच्या मुलांना डायरी लिहायला सांगितली आणि काहींनी मुलाखतीची पूर्वतयारी सुरू केली. किराणा सामान दुकान जवळच होते. त्यांना दळवींनी सांगून ठेवले होते. त्यामुळे बरेच सामान त्यांनी अगोदरच बांधून ठेवले होते. मुले तिथून घेऊन यायची. नाष्टा झाल्यानंतर गावातील सर्व मंदिरांना भेटी द्यायला सर्वजण निघालो. येताना दोन तीन लोकांच्या मुलाखती घ्यायच्या होत्या. गाव तसे बरेच मोठे असल्याने. चारपाच मंदिरे आहेत. त्यात गणपती मंदिर, भवानी मंदिर, बापदेव मंदिर, हनुमान मंदिर, महादेव मंदिर ही मंदिरे बघायची होती. गणपती मंदिरापासून सुरवात केली. सर्वच मंदिरे पुरातन आहेत. बाहेरील बांधकाम मात्र काळानुसार आर्थिक उपलब्धततेनुसार केलेले दिसले.तसे शंकराचे मंदिर मात्र ज्यास्त पुरातन वाटले. वाटेत गावात चांगला पाणीसाठा असलेली तळी दिसली. प्रत्येक घराच्या मागील बाजूस विहीर वाडी हे इथे कॉमन आहे. मंदिर, तळी, विहिरी, घरांच्या रचना गावचा इतिहास सांगतात. त्यामुळे या गोष्टी शिबिरात मुद्दामहून करण्यात आल्यात होत्या . गणपती मंदिराच्या बाबतीत काही गोष्टी ज्या शक्यतो पेपरमध्ये किंवा पुस्तकमद्ये लिहीत नाहीत अशा गोष्टी सांगितल्या. गणपती मंदिर हे दळवी यांच्या माळी समाज हॉल च्या समोरील जागेत बांधले आहे. एका मुंबईतील एका ट्रस्टने त्यांची जागा मंदिराला देऊ केली. सोबत आजूबाजूचा परिसर पण दिला होता. त्यांच्याकडे देवळाच्या तेल पाणी करण्याचा हक्क दळवी यांच्या घराण्याला देण्यात आला होता.तसे कागदपत्र त्यांचेकडे आहे असे सांगितले.पण बरेच लोक इतिहास पुसून नवीन इतिहास लिहण्याची नेहमीच चेष्टा करतात. सामान्य माणसाला अशा गोष्टी करण्यास वेळ नसतो त्यामुळे जाणकार विशेषतः मुंबई पुण्यातील हुशार मंडळी याचा गैरफायदा घेतात. भवानी मंदिर हे सुध्दा खूप पुरातन आहे असे सांगितले. तिथे खूप मोठी यात्रा नवरात्रात भरत असे. मुरुड परिसर सर्व या यात्रेला लोटत असे. आता या मंदिराचा जिर्णोद्धार दळवी व त्यांचे सहकारी करत आहेत. त्याला एक चांगले पर्यटन स्थळ करण्याचा त्यांचा विचार आहे असे सांगितले. योग्य माणसांकडे जर चांगले काम आले तर त्याचे ते समाज उपयोगी कामे करू शकतात. कारण सामाजिक काम म्हटले लोक नाके मुरडतात कारण बरीचशी मंडळी त्यातून आपला पोटोबा त्यात पहात असतात.पण दळवी यांना स्वतः हून गावातील लोकांनी जबाबदारी दिली आहे. त्यांची टीम त्यासाठी चांगले काम करत आहे. .नंतर ग्रामदैवत असलेल्या मंदिरामध्ये वाघोबा मंदिर, बापदेव मंदिर आणि हनुमान मंदिर यांचा समावेश आहे. मंदिर भेटी हा उपक्रम पर पडला.
मंदिरातून परत येताना एका वाडीत शिरलो.ती वाडी दळवी यांची स्वतःची आहे. त्यांचे वडील तिथे होते.मग त्यांची मुलाखत घेतली. त्यांच्याशी भात लावणी, सुपारी, नारळ यांची निगरानी अशा बऱ्याच गोष्टी मुलांनी विचारल्या. प्रत्यक्ष नारळ सुपारीच्या बागेत उभे राहून शेतकऱ्याची मुलाखत घेणे आणि गोष्टी प्रत्यक्ष करून बघणे ही गोष्ट शहरात उपलब्ध होत नाही. त्यामुळे मुलांच्या ज्ञानात मोलाची भर यामुळे पडली. त्यांना याचा उपयोग पुढील आयुष्यात नक्कीच होतो. बऱ्याच वाड्यामध्ये पिवळ्या रंगाच्या सुपाऱ्या वाळत ठेवलेल्या दिसत होत्या. काही ठिकाणी शिंपणे चालली होती.जेवणाची वेळ झाली होती त्यामुळे परत हॉलवर गेलो. जेवण झाल्यावर आम्ही सर्वजण उपनकर फॅमिली, अंजली, दळवी आणि मुले कोस्टल ट्रेक साठी निघालो. नांदगाव बीच पासून ते दोन तीन किलोमीटर अंतरावर असलेले एका शिवमंदिरा पर्यन्त समुद्राच्या कडेकडेने जायचे होते. मुलांनी मस्त वाळूत खेळत शंख शिंपले जमा करत ते अंतर पार केले. समुद्राच्या अगदी किनाऱ्यावर असलेले हे शिवमंदिर पुरातन असावे. मंदिरात दर्शन घेऊन झाल्यावर परत एका ठिकाणी मुलाखतीसाठी जायचे होते. दळवी यांचे नातेवाईक कोतवाल गुरुजी यांच्या बंगल्यावर जायचे होते. गावाच्या बाहेर त्यांची मोठी शेती वाडी होती. तिथे नारळ, सुपारी , आंबा अशी बरीच झाडे लावलेली दिसली. त्यांच्याशी बऱ्याच गप्पा गोष्टी झाल्या. तिथले ते बऱ्यापैकी चांगले प्रतिष्ठित नागरिक असल्याने वेगवेगळ्या विषयांवर मुलांशी त्यांनी चर्चा केल्या. मुलांनी तीन दिवस केलेल्या विवीध उपक्रमाबद्दल त्यांनी मुलांचे कौतुक केले. त्यांच्या वाडीतून आम्ही निघालो. परत समुद्र मार्गे न जाता रस्त्याने सरळ भवानी मंदिराकडून आलो. वाटेत दळवींचे घर लागले. त्यांच्या घरी थोडावेळ थांबलो. नंतर हॉलवर गेलो. मुलांना आवराआवर करायला सांगितली. दळवींनी बोलावले आणि त्यांना सोबत रमाकांत खोत व शाहीर धारवे आणायला सांगितले. मुलांसाठी काही बक्षिसे आणली होती.या मद्ये विविध स्पर्धा , उपक्रम राबवले होते त्यात चांगली कामगिरी करणाऱ्या मुलांना एक त्यांचा उत्साह वाढवा यासाठी बक्षीस द्यायचे ठरवले होते.त्या निवडीचे अधिकार वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना दिले होते.त्यांनी आपापली नावे माझ्याकडे दिली. .मुलांचे थोडे डायरी वाचन घेतले. चांगले गट, चांगला लीडर, सर्वात चांगला वागणारा मेंबर, चांगली डायरी वगैरे नावे सांगायची होती. छोटासा निरोपाचा आणि आभार मानायचा कार्यक्रम घेतला. रमाकांत खोत , दळवी यांना थोडे बोलायला लावले. दळवी यांनी सांगितले की शिबिराच्या माधयमातून त्यांना एक संधी मिळाली त्यातून गावातील मुलांना त्याचा फायदा झाला. गावाचा इतिहास सद्य परिस्थिती याबद्दल मुलांनी तीन दिवस मुलांनी अभ्यास केला त्यांच्यासोबत त्यांनाही काही गोष्टी समजल्या. लायब्ररी सारखा एक चांगला उपक्रम गावासाठी मिळाला. तीन दिवस कसे गेले समजले नाही. शिबिरातील मुलांचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले. मग बक्षीस वाटप श्री. खोत आणि धारवे यांच्या हस्ते करण्यात आले. समारोप आणि आभराच्या भाषणात आम्ही काही गोष्टी नमूद केल्या. त्यात प्रामुख्याने तीनही दिवस गावात जो प्रतिसाद,जी मदत मिळाली यातच गावाची संस्कृती दिसते. तीनही दिवस मुलांना उत्तम जेवण नाष्टा, पाणी याची अगदी बडदास्त ठेवली होती. कुणालाही तीनही दिवस कोणताही त्रास झाला नाही. माळी समाज हॉल उपलब्ध करून दिल्यामुळे शिबिराला रंगत आली. खरेतर ही पर्यटन स्थळे आहेत त्यामुळे सहज एवढी जागा उपलब्ध होत नाही. गावातील प्रमुख व्यक्तींच्या मुलाखती, विविध संघटना भेटी या खूप चांगल्या पद्धतीने पार पडल्या. यात दळवी आणि त्यांचे सहकारी यांची मदत झाली. नंतर काही मान्यवर लोकांना मुलांनी केलेली ग्रीटिंग कार्ड्स दिली. मग कार्यक्रम संपला असे जाहीर केले.मग बॅगा घेऊन सर्वजण मंदिरापाशी स्टॉपवर उभे राहिलो. आम्ही अलिबागला निघालो. अलिबाग येथे संध्याकाळी साडेसात वाजता कॉलनीत जायला बस असल्याने थोडे लवकर निघालो.मुरुड वरून सुटणारी बस मिळाली. सर्वांना बसण्यास जागा सुद्धा मिळाली. दीडतासा मध्ये आम्ही अलिबागला पोहचलो. तिथून अलिबाग बीचवर गेलो. बीचवर मुले जरा थांबली. थोड्याच वेळात अलिबाग मार्केटिंग बस आली. आमची बुकिंग सर्व असल्याने बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम झाले कारण आमचे परतीचे बुकिंग होते. अलिबागला येताना बस मध्ये जागा होती जाताना मात्र आमच्यामुळे फुल्ल होती.तीन दिवस बऱ्याच गोष्टी मुलांनी अनुभवल्या पण त्यांना काही विशेष कंटाळा आल्यासारखा वाटला नाही. कार्यकर्त्यांनी मात्र खूप महेनत घेतली. सर्वांचे जेवण, आवराआवर, उपक्रम सलग तीन दिवस राबवणे यात खूप वेळ दिला. दळवी कुटुंबाची खूप मदत झाली. पांडे,उपनकर हे सहकुटुंब आले होते. तनुचे आई बाबा सुद्धा होते.काही पालक भेट देऊन गेले. एकंदरीत छान कॅम्प झाला. रात्री नऊ वाजता टाऊनशिप येथे पोहचलो.
Comments