top of page

दापोली शिबीर वृतांत...

Updated: Dec 24, 2022

दरवर्षी विज्ञान प्रदर्शनाच्या वेळी शासनाकडून जे काही विषय दिले जायचे त्यामध्ये हमखास कृषी तंत्रज्ञान हा टॉपिक असायचाच.मग असे वाटायचे एकदा आपल्या मुक्तांगण ग्रुपचे या पद्धतीचे शिबीर आयोजित करता येऊ शकते का ते पाहुया. नंतर दापोली कृषी विद्यापीठ शिबीर आयोजित करता येईल का असा मनात विचार आला. मग बनायत सर व अभिजीत दोघांना याबाबत विचारलं. त्या दोघांनीही लगेच होकार दिला.मग बनायत सरांनी त्यांचे एक नातेवाईक दापोली कृषी विद्यापीठात मोठ्या पदावर काम करत होते त्यांच्याशी सम्पर्क साधून पुढची तयारी सुरु केली.मी कृषी विद्यापीठ डायरी मधून त्यांच्या ट्रेनिंग सेंटरचा पत्ता व त्यांचे प्रमुख यांचे नाव शोधून काढले.त्यांना एक पत्रही लिहिले.मुक्तांगण कार्यक्रमांची थोडी माहिती दिली.सोबत माझा घरचा फोन नंबर दिला आणि आमचा येण्याचा उद्देश कळवला.

काही दिवसांनी त्यांचा मला फोन आला.तुम्ंही यायची वेळ कळवा योग्य ती व्यवस्था करु.मग आम्ही सुध्दा तयारीला लागलो.प्रथम अंजली सावंतला सविस्तर माहिती दिली.तिने सुचवले आपण केळशी मार्गे जाऊ आणि तिथे एक मुक्काम करु . केळशी गावात तिचे एक नातेवाईक रहातात. त्यांचेकडे राहण्याची व्यवस्था होईल असे ती म्हणाली. गावात काही उपक्रम सुध्दा घेता येतील असे तिने सुचवले.मग मी माझा भाऊ संदीप याला फोन केला. त्याचा मित्र महेश पाटील केळशी येथे राहतो हे मला माहीत होते. माझा भाऊ दापोलीला मेडिकल कॉलेज मध्ये शिकत असताना मी त्यांच्यासोबत महेशच्या घरी गेलो होतो. त्याला केळशीची सविस्तर माहिती काढायला सांगितली.त्याने महेश बरोबर बोलून नंतर मला फोन केला . त्याने मला महेश पाटील कडे रहायची सोय होऊ शकते असे सांगितले .मी त्याला केळशी येथे काही शिबिराचे उपक्रम घेता येतील का याबाबतचा महेशच्या घरी विचारायला सांगितले . संदीपने सर्व माहिती काढली आणि तसा मला निरोप दिला. महेश पाटीलचा बंगला केळशी येथे आहे.सर्व सोय होईल आणि शाळेत उपक्रम घेता येतील. त्या गावात फार जुनी शाळा आहे. महेशचे वडील तिथे मुख्याध्यापक होते.क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे एक चित्रमय दालन या शाळेत आहे.अशी थोडी माहिती मिळाली.

मुलांना दिवाळीची सुट्टी मिळाली की आपण निघुया असे ठरले.तीन दिवसांचे शिबिर होते त्यामूळे मुलांना सर्व सुचना दिल्या.अभिजीत,अंजली, बरगोले, शैलेश बरेच लोक येणार होते.आरोही,सौमित्र,अक्षय पोटे,अखिल मेनन,तेजस उपनकर,सुमेध उपनकर,सुजीत थोरात, सिध्दी गुरव,आश्विनी जाधव ,मनाली पवार ,स्वप्निल बरगोले,सुमीत गायकवाड ,तन्वी सावंत,शिल्पा वंजारी, मानसी सुपेकर, सायली कदम, आश्र्विनी जाधव, सेठ,अशी बरीच मुले येणार होती.एक मीटिंग घेऊन सर्वांना सुचना दिल्या.तीन दिवसांचे कपडे, खाऊ, औषधे, वॉटर बॉटल, डायरी,बरेच साहित्य असल्याने बॅग शक्यतो पाठीवरची घ्यायला सांगितली. त्यावेळी अगदी परफेक्ट नियोजन वगैरे असे काही नसायचे. काही गोष्टी गृहीत धरल्या जायच्या. आपल्या सोई नुसार निघायचे,बस स्टँड वर जाऊन मिळेल ती बस पकडून पुढे निघून जायचे असा बिंदास्तपणा खूप होता. पण आपण १५ जण आहोत बस मध्ये जागा मिळेल काय किंवा मुळात बस पण त्या मार्गावर किती वेळाने मिळेल याचा फार विचार न करता बेधडक जायचो. थोडीफार जुजबी माहिती असायची. परंतु अगदी तिही बऱ्याचदा परफेक्ट नसायची. याबाबत मुले कधीच तक्रार करत नसत. काही पालक तर कॅम्पला सोडायला शॉपिंग सेंटरला सुद्धा यायचे नाहीत, मुलेच त्यांना सांगायची तूम्ही येऊ नका. काही पालक तर असे होते की त्यांना कॅम्प लोकेशन सुद्धा माहीत नसायचे कारण मीटिंग मध्ये सहसा मुलेच यायची. त्यामुळे मुले स्वतः सर्व आनंदाने भाग घ्यायची. त्यांना पालक सांगतात म्हणून कधी कार्यक्रमाला यायचे नाहीत. बऱ्याचदा त्यांची भेट झाल्यावर त्यांना या उपक्रमांचा उपयोग कसा झाला हे सांगतात.काही गोष्टीची बीजे ही या वयात रोवली जातात.या शिबिरासाठी एका राजन सेठ नावाच्या पालकाने दापोलीची एक ओळख सांगून ठेवली होती त्याच्या एका नातेवाईकांचा पेट्रोल पंप दापोलीत आहे . काही मदत लागली तर त्यांना भेटा असे सांगितले होते.

शिबिराच्या पहिल्या दिवशी सकाळी सातच्या नागोठाणे बसने निघालो.नागोठाणे स्टँड वरून आंम्ही माणगाव येथे एका लोकल लाल डब्बा गाडी ने पोहचलो. माणगाव स्टँड वर मंडणगड कडे जाणाऱ्या गाड्या थांबतात. मंडणगड हे अंतर माणगाव येथून ४० किलोमीटर आहे. परंतू तिथे रत्नागिरी जिल्हा आहे . त्यामुळे मुंबईहून येणाऱ्या किंवा पुण्याहून येणाऱ्या गाड्यावर अवलंबून राहावे लागते.अंतर कमी असले तरी लोकल गाड्या नाहीत.आमचे तसे नशीब जोरावर होते.तिथे आम्हाला मुंबई केळशी गाडी मिळाली परंतू बसायला मात्र सर्वांना मिळाले नाही.तीन चार जण सोडले तर बाकी सर्व उभे होतो.पण जसजसे आम्ही मंडणगड कडे निघालो तस तसे हळू हळू गाडी रिकामी होत होती.गर्दीत कोण कुठे उभे आहेत ते कळायला मार्ग नव्हता.त्यांत आखिल मेननने गाडीत उलटी केली. अशा वेळी खूप अडचणी येतात. एकाने उलटी सुरू केली की दुसऱ्याला आपोआप तसेच फील होते .बऱ्याच जणांचा एसटीचा हा पहिलाच लांबचा प्रवास असावा आणि तो सुद्धा उभे राहून त्यामुळे त्यांच्या दृष्टी कोनातून ते जरा अवघडच होते. मात्र गोरेगाव ते आंबेत घाटातील प्रवास हा अतिशय सुंदर. घाटमाथ्यावरील रस्त्यातून दिसणारे सावित्री नदीचे पात्र आपल्याला तळकोकणात प्रवेश करत आहोत याची ग्वाही देत असते.अतिशय रमणीय असे दृश्य आंबेतकडे उतरताना दिसते. आंबेतचा नदीवरचा पूल खूप छान वाटतो.हा पूल म्हणजे जिथे रत्नागिरी जिल्हा आणि रायगड जिल्हा यांच्यां हद्दीवर आहे. आंबेत हे गाव माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांचे गाव त्यामुळे अगदी खेडे जरी असले तरी स्टँड मात्र अगदी सुंदर आणि आटोपशीर आहे. तेथील स्थानिक लोकांचा या पुलाला विरोध होता कारण त्यांचा फेरी बोटी मधून लोकांना नेआण करण्याचा धंदा होता आणि त्यात अंतुले यांच्या समाजाची लोक त्यात खूप होती.परंतु रस्ता हा विकासाची वाट आणतो हे माहीत असल्याने त्यांचा विरोध पत्करून या पुलाचे बांधकाम त्यांनी केले असे लोक सांगतात. आंबेतला मुलांना बसायला जागा मिळाली. आंबेत नंतर तासाभरात मंडणगडला पोहचलो. मंडणगड हे गाव किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले आहे. तालुक्याचे ठिकाण आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पाहिलं मोठे गाव जे रायगड जिल्हा हद्द सोडल्यानंतर लागते. इथून एक मार्ग दापोली कडे जातो आणि एक मार्ग केळशी कडे जातो .आमच्या नागोठणे येथूनच्या प्रवासात वाटेत प्रत्येक स्टँडवर एक बाईक आमच्या पाठोपाठ येताना दिसत होती.ते आमच्यावर पाळत ठेऊन असल्या सारखे वाटत होते. आम्ही तिकडे तसे लक्ष दिले नाही. परंतु ते आमच्या पाठोपाठ केळशी पर्यन्त ते आले होते. एक वाजता केळशीला पोहचलो. केळशी हे गाव अतिशय सुंदर आहे. भारजा नदीच्या जवळ हे गाव आहे ..हे गाव एका छोट्या टेकडीवर वसले आहे. इथे डोंगरातून एक नदी येते.या गावचे महत्व पूर्वापार आहे. काही वर्षांपूर्वी इथे पुरातत्व खात्याने काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला होता .केळशीच्या टेकडीचे पुरातत्व खात्याने वीस मीटर खाली उत्खनन केले होते. त्या दरम्यान त्यांना काही वस्तू त्यांना तिथे मिळाल्या होत्या. त्यावरून पूर्वी तिथे एखादे मोठे गाव असावे . ई.स.१२०० सालात असणाऱ्या काही त्यांना वस्तू मिळाल्या. कार्बन dating करूंन हे पुरातत्व खात्याने शोधले. पूर्वी ते एक व्यापारी शहर असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली होती.जवळच्या डोंगरमाथ्यावरून आपण खाली उतरताना गावाचा मागमूसही लागत नाही.अगदी जवळ जाईपर्यंत सुध्दा नाही.नारळ,पोफळी,आंबा यांच्या बागामध्ये गाव लपून जाते.गावा मध्ये घरांची रचना अतिशय सुरेख आहे.लांबच्या लांब घरांची रांग समोर उतार त्यावरच फुलांच्या बागा नंतर रस्ता. पावसाळ्यात मात्र यावर पाणी असावे .समोरच पुढे परत त्यावर बागा नंतर घरांची रांग.या प्रकाराला तिकडे पाखाडी आणि बिदी असे म्हणतात . रेल्वे प्लॅटफॉर्म सारख्या भागाला पाखाडी म्हणतात आणि ज्यातून पावसाळ्यात पाणी निघून जाते त्या भागाला बीदी म्हणतात. पाखाडी हा भाग जांभ्या दगडाच्या उपयोगाने बांधलेला असतो .तिथे महाडिक नावाचे अंजली सावंतचे नातेवाईक खूप वर्ष झाली तिथे राहतात. त्यामुळे आमची काळजी मिटली होती. त्यांनी स्वतः हुन मदत करण्याची तयारी दाखवली होती.या भागात मासे चांगल्या प्रकारचे मिळतात. जेवणाची पद्धत सुद्धा वेगळी आहे. त्यांची मसाले करण्याची पद्धत सुध्दा थोडी बदलते.

त्यांनी राहण्यासाठी मोठा वाडा दिला होता. वाड्यातील खोल्या मोठ्या होत्या. अशा ठिकाणी एवढ्या लोकांची राहण्याची सोय होणे म्हणजे मोठी गोष्ट होती.दुपारचे जेवणाचे डब्बे आम्ही आणले होते त्यामुळे जेवण झाल्यानंतर लगेचच आंम्ही याकुब दर्गा बघायला गेलो.हे ठिकाण पर्यटकांचे आकर्षण आहे कारण एकतर हे थोडे उंचावर आहे आणि इथून समुद किनाऱ्याच्या अथांगतेचे दृश्य दिसते. याच सरळ रेषेत गेलो तर वेळास, बागमंडला, राजापुरी , दिघी, मुरुड ही किनारपट्टी वरील बंदरे लागतात. इथल्या समुद्राच्या पाण्याचा रंग सुद्धा वेगळा आहे.शिवाजी महाराज यांच्या इतिहासाशी सुध्दा निगडित हा दर्गा आहे.या ठिकाणी शिवाजी महाराज या दर्ग्यातील साधूला भेटले होते .दाभोळच्या स्वारी दरम्यान याकुब या अध्यात्मिक गुरुला महाराज भेटायला गेले होते. केळशी गावा समोरील टेकडीवर हा दर्गा आहे.नंतर आम्ही केळशीच्या किनारा भागात गेलो.अतिशय शांत किनारा,स्वच्छ पांढरी शुभ्र वाळू पसरलेली, बाजूला असलेल्या नारळी पोफळी च्या बागा.कुठलीही गडबड नाही की घाई नाही.सगलेच कसे निवांत.एकंदरीत खूप रमणीय वातवरण होते .परत घरी सर्व गाव उंडारत फिरत संध्याकाळी घरी परतलो.मग आल्यावर जेवणाची तयारी सुरु केली.मुलांचे काही उपक्रम घेतले. केळशी गावातील एक समाजसेवक आणि लेखक घैसास गुरुजी त यांना भेटायला गेलो. त्यांनी केळशी गावावर पुस्तक लिहिले आहे. त्यांची मुलाखत घेतली. त्यांच्या पूर्ण शालेय जीवनापासूनची मुलांनी माहिती गोळा केली. त्यांचा एक उपक्रम मला खूप आवडला त्यांनी मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून गावात त्यांच्या वाड्यात एक लायब्ररी सुरू केली.दर रविवारी मुलांना ते पुस्तक बदलून देत. याचा कोणताही ते चार्ज घेत नव्हते. अतिशय उत्तम ते काम करत होते. त्यांच्याशी छान गप्पा मारल्या. त्यांनी एक विशेष गोष्ट सांगितली ती म्हणजे त्यांच्या घरी गांधीजी येऊन गेले होते . त्यांचे आभार मानून आम्ही घरी परतलो.





शैलेश गुरव संध्याकाळी तिथे पोहचला.नंतर काही वेळाने महेश पाटीलच्या घरी जाऊन आलो.नंतरच्या दिवसाचे नियोजन करून आलो.मुलांनी दिवसभर खूप मजा केली. शिबिराच्या ठिकाणी जेवण शक्यतो आम्ही शाकाहारी करतो. परंतु महाडिक यांनी तसे विचारलेसुद्धा की मांसाहारी जेवण चालेल काय. पण आम्ही ते शिबिरात टाळले. पुर्वी शिबिरात शक्यतो आम्ही सगळे जण जेवण स्वतः करायचो.एक टीम हेच काम करायची.त्यामुळे वेळ कसा संपायचा कधी कळत नसे. बऱ्याचदा जे काही स्थानिक पातळीवर मिळेल त्यावरच अवलंबून असायचो. रात्री जेवण मात्र खास कोकणी पद्धतीचे होते. आमच्यात मासे खाणारा दर्दी माणूस शैलेश गुरव होता. त्याच्यासाठी खास त्यांनी प्रोंझ आणले होते. मुलांनी मात्र सर्व शाकाहारी जेवण घेतले. रस्त्यात भेटलेल्या त्या बाईक स्वारांचा विषय निघाला.ते अगदी आम्ही राहतो तिथपर्यंत आमच्या मागावर होते. बराच वेळ गप्पा गोष्टी झाल्या.मुलानी काही उपक्रम सादर केले.दिवस तसा फार खडतर होता कारण प्रवास खूप झाला होता.चालणेही बरेच झाले होते.मुले कंटाळली होती त्यामूळे लगेच झोपी गेली.

सकाळी आम्ही गावातच एका ठिकाणी मुलाखत घ्यायला गेलो. आम्हाला सांगितले होते की हा एक आधुनिक शेतकरी आहे. आमच्या गटातील बहुतेकांचा हेतू नवीन काहीतरी शिकायला मिळते का ते पाहणे असेच असायचा. एका मोठ्या वाड्यात पाऊल टाकले. एका झोपाळ्यावर मस्त रुबाबात एक व्यक्ती बसला होता. त्यांनी आमची चौकशी केली त्याला समजले की ही शहरी माणसे आहेत.मग मुलांनी काही प्रश्न विचारले. त्याच्या घरात समोरच आपल्याकडे पालीला मिळतात तसे सर्व पापड, फणस पोळ्या, आंबावडी वगैरे पदार्थ विकायला ठेवले होते.मी पालीला राहत असताना पाहिले होते की ते सर्व पदार्थ ते आदिवासी नोकरांकडून करून घेतात . मुळात सर्व कच्चा मालं आदिवासी जमाती कडूनच फार स्वस्त भावात घ्यायचा आणि मग त्यांच्याकडूनच पदार्थ तयार करून घ्यायचे. नंतर मग घरगुती आणि तेही आम्ही बनवलेले पदार्थ म्हणून विकायला ठेवायचे हे मी पाली मध्ये पाहिले होते. कुठंही कपड्याची इस्त्री किंवा डाग न लागता फक्त व्यवस्थापन करणे आणि गोड बोलून माल खपवने हे त्यांचे मुख्य सूत्र असायचे.त्याच पठडीतले हे व्यक्तिमत्त्व. अर्थात माझ्या ग्रुप मधील सर्व जणांना त्याने एवढं इंप्रेस केले की उद्या याला कृषिरत्न म्हणून सन्मान करावा असा ठराव मांडतील असे वातावरण झाले होते. त्याने शेतीविषयक अशी माहिती सांगितली की एखादा सातारा सांगली कडील शेतकरी एकतर त्याला ठार वेडा समजेल किंवा पुणेरी भामटा असा उल्लेख नक्कीच करेल. त्याने लोकल मार्केट मध्ये त्याच्या मालाला उठाव नाही यावर एक मजेशीर कथा सांगितली.तो म्हणाला, “माझ्या शेतात मी वांगी लावली होती ,त्या वांग्याचा दर निव्वळ इथले प्रॉडक्ट होते म्हणून दर स्थानिक लोक देत नव्हते”.मग त्याने एक आयडिया केली अशी की प्रत्येक वांग्यावर कोड मार्किंग केले आणि नंतर तो माल पुणे येथील गुलटेकडी मार्केट मध्ये पाठवला. नंतर तोच माल म्हणे परत कोकणात केळशी येथे आला आणि तिथल्या लोकल मार्केट मध्ये खुणा केलेली वांगी या आधुनिक शेतकऱ्याने शोधून काढली.तोच माल म्हणे चार पटीने विकला गेला. आता ऐकणारा इंप्रेस ..वा रे पठ्या, अक्षरशः लोणकडी थाप. तरी खरी मजा तर पुढेच आहे .पण त्याची ही पुढची स्टोरी जर कुणी बावधन भागात वांगी पीक घेणाऱ्या शेतकऱ्याने ऐकली तर याची ते वरात काढतील कारण गेली कित्येक वर्षे या गावातील काटेरी वांगी मार्केट मध्ये फेमस आहेत.तर गोष्ट वांग्याची. सदर गृहस्थ म्हणाला,” मी माझ्या वांग्याच्या शेतात एक नवीन प्रयोग केला”.त्याने आम्हाला सर्वांना विचारलं ,आपण जेवणात तूप का टाकतो?. त्यातून काही जीवनसत्व मिळावीत, पचन व्यवस्थित होते म्हणून आपण वापरतो असे साहजिक उत्तर आले.मग तसाच प्रयोग म्हणे याने शेतात केला. एक टोपलिभर शेण घेतलं त्यात दोन चमचे तूप टाकले.शेण व्यवस्थित मिक्स केले आणि शेतात सर्व ठिकाणी टाकले. असं पूर्ण शेतात केले.मग त्यात वांगी लावली. आता वांगी लावताना व्यवस्थित नांगर फिरवून त्यात वरंभे करून , पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल अशी रचना करण्यात येते.तसे केले असावे. आता आम्ही सर्व लोक पारायण ऐकल्यासारखे करत होतो कारण तसे आम्हा सर्वांचे याविषयातील ज्ञान म्हणजे यथा यथा असेच होते .मग त्याने सांगितले की शेतातील वांगी मस्त वाढली आणि काय चमत्कार म्हणे याचा प्रयोग यशस्वी झाला.त्या प्रत्येक वांग्याला म्हणे तुपाचा वास यायला लागला. सगळे अवाक्. टाळ्या वाजवल्या नाहीत नशीब.तर त्याने अजून एक लोनकढी ठोकली की आता त्याला याचे पेटंट सुद्धा मिळू शकते. डॉक्टर स्वामिनाथन यांच्यानंतर बहुतेक याचाच नंबर लागणार असे मला तर वाटले होते.पण एक प्रचंड व्यवसाय शास्त्र जाणणारा माणूस सापडला. एवढी वर्षे गरीब बिचारे शेतकरी काबाड कष्ट करून कसेतरी जीवन जगायचे.हे मात्र काहीही कष्ट न करता फक्त थापा मारून इथून पुढे शेतीचा धंदा तेजीत करणार. वेगवेगळी माहिती , गोष्टी मीडियात पेरून अवाच्या सव्वा दरात शेतमाल विकणार. आणि कदाचित दुर्दैव असे असेल की हा शेतकरी इथला नसेल.तर मुंबई पुण्याहून आलेला कुणीतरी व्यवसाय करणारा असेल आणि इथला स्थानिक शेतकरी शेतीला कंटाळून शहरात रोजगारासाठी गेलेला असेल किंवा याच मुंबई पुणेकराकडे हरकाम्या गडी असेल. कदाचित त्याच्या स्वतः च्या विकलेल्या शेतात तो शेतमजूर म्हणून काम करत असेल.तर अशी मजेशीर मुलाखत संपली. आम्ही परत शिबिराच्या ठिकाणी आलो. नंतरचा कार्यक्रम शाळेतील होता. तिथे सर्वजण निघालो. दापोलीला तिथूनच जाणार होतो त्यामुळे बॅगा घेऊन निघालो.




आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे मुळ गाव केळशी. त्यांचा जन्म रायगड जिल्यातील पनवेल नाजिक असलेल्या शिरढोण गावाचा परंतु त्यांचे आजोबा कर्नाळा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या शिरढोण या गावात स्थलांतरित झाले होते असे इतिहास सांगतो. .त्यांच्या स्मरणार्थ येथील शाळेला त्यांचे नाव दिले आहे. त्या शाळेला भेट द्यायला गेलो. शाळेत नव्या कॉम्प्युटर लॅब चे उद्घाटन त्याच दिवशी होते. मुबईचे प्रसिद्ध उद्यागपती कॅम्लीन कंपनीचे मालक दांडेकर यांचाही शाळेला फार मोठा आधार आहे.शाळेबाबत बरीच माहिती मिळाली.महेश पाटीलचे वडील येथे प्रिंसिपल असल्याने शाळेत उपक्रम घेता आला.वासुदेव फडके यांचे सचित्र माहिती देणारं दालन तिथे आहे. शाळेची व्हिजिट झाल्यावर मग आम्ही तिथे जवळच एक दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या उतांबर गावातील महालक्ष्मी मंदिर दर्शनास गेलो. घुमटाकार पद्धतीचे मंदिर आहे.या परिसरातील हे प्रसिद्ध देवस्थान आहे. इथले स्थानिक मुंबईकर भाविक इथे वर्षातून एकदा तरी फेरी मारतात. मंदिर परिसरात बरेच फोटो काढले .अतिशय सुंदर मंदिर आहे.नंतर सर्वजन महेश पाटीलच्या बंगल्यावर गेलो.तिथे त्यानी पुढच्या प्रवासाविषयी विचारले . मग त्यानी शाळेच्या बस बद्दल सांगितले .शाळेची एक बस दापोली येथे चालली होती.ती जाताना रिकामी चालली होती.त्यातून जायची आमची सोय केली.जातानां आम्हाला टायगर प्रोन्जचा(कोळंबी) प्रकल्प दाखवायला बस ड्रायव्हरला संगितले. दापोली रस्त्यावर असलेल्या या प्रकल्पा जवळ आम्ही उतरलो. आत थोडे चालत गेलो. प्रकल्पाच्या दोन्ही बाजूला डोंगर आहेत. समुद्राकडे जाणाऱ्या नदीच्या पात्रा जवळच आहे. खाडीचे पाणी मात्र पंपाने घ्यावे लागते. साधारण दोनतीन एकरात हा प्रकल्प आहे.जर आपण लांबुन हा भाग बघितला तर असे वाटेल या खारफुटीत कोण काय करू शकेल . अगदी वर्षानुवर्षे ही जमीन खाडीतील नाकामी म्हणून गणली गेली असणार पण कुणाला कुणाचे महत्व कळेल हे सांगता येत नाही.या भूमीचे सोन्यात रूपांतर या लोकांनी केले आहे. डोंगर दरीत येणारा समुद्राकडून येणारा वारा इथे स्पष्ट जाणवतो. तळ्याची स्वच्छता अगदी वाखाणण्यासारखी होती . त्या तळ्याचे मालक तिथेच भेटले. त्यांनी आम्हाला विचारले कुणी इथे यायला सांगितले. मग महेशचे नाव सांगितले. महेशचा तो मित्र होता.त्या दोघांनी इलेक्ट्रिकल इंजीनियरींग शिक्षण घेतले होते. काही वर्षे नोकरी केल्यावर असे त्यांना वाटले की कोणतातरी धंदा करावा.मग यावर बराच अभ्यास करून यात पाडायचे ठरवले.हा निर्णय तसा सोपा नव्हता.एक तर त्यांच्या कार्यक्षेत्रा बाहेरील हा धंदा होता. याचे काहीही ज्ञान नव्हते.पण धडाडीने काम सुरू केले. हा प्रकल्प बांधला. आम्हा सर्वांना खूप वेगळे वाटले.ते दोघेही नाशिकचे होते.चर्चा करता करता समजले की ते आमचे कंपनीतील मित्र नितीन महाजन यांचे भाचे आहेत.ते बरेच वेळा कॉलोनी मध्ये येऊन गेले आहेत.विशेष म्हणजे त्याच्या घरात मांसहार करणारे कुणीही नव्हतं.पाणी खाडीतून घेण्यापासून ते मच्छी बाजारात पोहचेपर्यंत सर्व कहाणी सांगितली. ऑक्सिजन,सामू (PH) यांची पाण्यातील मात्रा मोजणे,इतर कोणत्याच प्रकारचे मासे तळ्यात येऊ देता तळ्याकाठी सतत नजर ठेउन राहणे. पाण्यात ओक्सिजन मिसळता रहावा म्हणून काही उपकरणे पाण्यात बसवली आहेत. पंपाने पाणी ज्यावेळी खाडीतून तळ्यात घेतात त्यावेळी त्याच्या डिस्चार्ज पाईपला एक मोठी भली मोठी जाळी लावतात. त्यात कचरा , मासे अडकतात. अशी बरीच कामे सांगितली.एका एका प्रोन्ज (कोळंबी) चे वजन 200 ग्रामच्यावर असते.सर्व माल विदेशी जातो.बरीच तांत्रिक माहिती त्यांनी सांगितली. त्याठिकाणी बरेच फोटो काढले.नंतर आम्ही हर्णे बंदरा कडे निघालो.वाटेत हर्णे बंदराच्या अलीकडे असलेला कडाचा गणपती बघीतला.आंर्जले गाव इथेच आहे.या गावाचा गणपती म्हणून ओळखला जातो. पूर्वी इथे २०० पायऱ्या चढून जावे लागे आता मात्र गाडी मंदिरा समोरच जाते. पूर्वीचे मंदीर काळ्या दगडातील आहे परंतु आता त्याला बाहेरून गिलावा करून संगमरवर लावलेला आहे. इथे दोन मंदिरे आहेत एक शंकराचे आणि दुसरे गणपतीचे. देवालयाची उंची अंदाजे साठ फूट तरी असावी . मंदिरावर .इथून अथांग समुद्राचे दर्शन घडते. या ठिकाणी झालेल्या ब्रीज मुळे दापोली ते केळशी हे अंतर एकदम कमी झाले आहे. पूर्वी या बंदर भागाला खूप महत्त्व होते. आतासुद्धा ताज्या मास्याबद्दल हाच भाग प्रसिद्ध आहे. इथले गणपती मंदिराचे वैशिष्ट म्हणजे समोर असलेल्या समुद्रा कडे पहात असलेला कडाचा गणपती आणि नाका समोरच असलेला सुवर्णदुर्ग किल्ल्ला. तिथेच रंगीबेरंगी झेंड्यानी गर्दी केलेल्या होड्या आणि गलबतानी भरलेला हर्णेचा किनारा आहे. मच्छीमारी,खरेदी विक्रीस सर्वाना आवडते असे ठिकाण.लोक येथे खास ताजी मच्छी खायला दुर दुर ठिकाणा वरून येतात.तिथे थोडे रेंगाळलो.नंतर दोपोली कडे निघालो. वाटेत मुरुड किनारा लागला. पुढे डोंगरावर शंकराचे देवस्थानचा परिसर लागला


.संध्याकाळी दापोली कृषी विद्यापीठ किसान भवन येथे पोहचलो.तिथे गेल्यावर ट्रेनिंग सेंटर प्रमुखांना भेटलो.त्यांनी लगेच राहण्याची सोय केली.सर्व मुलांची मोठ्यांची व्यवस्था केली होती.जेवण नास्ता कुठे मिळतो ते ठिकाण दाखवले.मग आम्हांला ट्रेनिंग सेंटरची भेट घडवली.तिथे पशू संवर्धनच्या विविध प्रकल्पांची माहिती दिली.एक वेगळे व्याख्यान आयोजित आमच्या साठी करण्यात आले होते.स्लाइडशोच्या माध्यमातून माहिती आम्हाला देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अल्फा लावल या मोठ्या कंपनीची दूध काढावयाची मशीन दाखवली. त्याचे पूर्ण प्रात्यक्षिक दाखवले. लोकांच्या मनात याबाबत काही गैरसमज आहेत त्याविषयी माहिती दिली .हे सर्व एका छोट्या व्हिडिओद्वारे दाखवले. त्यात लोकांच्या मनातील मशीनच्या वापरासंदर्भात भीती घालवण्यासाठी हा छोटासा सिनेमा तयार केला होता. त्यानंतर एका प्राध्यापकाने फळबागा यावर माहिती दिली. मूले कंटाळली होती .त्यामूळे काहीजण चक्क झोपले.त्यात त्यांची काही चूक नव्हती.मुलाना हा विषयच नवा होता.समोरील व्यक्ती PhD होती त्यामूळे समीकरण जमत नव्हते.परंतु काहीजण आवडीने ऐकत होते.मग त्यांच्या उपकरण विभागाला भेट दिली .तिथे नवनविन प्रकारची शेतीची अवजारे दिसत होती. विळे, खुरपी, आधुनिक खुरपणी यंत्र, आंबे फणस काढावयाची सोपी यंत्रे.. अशी कितीतरी प्रकारची उपकरणे होती.. प्रोफेसर नाडकर्णी यानी दुसऱ्या दिवशीचे नियोजन सांगितले.नंतर आम्ही शेतकरी भवन येथे आलो. तसा बराच उशीर झाला होता. त्यांच्या मेस मध्ये जेवण घेतले.मग हॉस्टेल मध्ये गेलो.मोठया लोकांना वेगळी रुम दिली होती परंतु आम्ही मुलांसोबत राहिलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता केल्यानंतर सकाळीच आम्ही रबर प्रकल्प बघायला गेलो. वाटेत त्यांच्या कृषी विद्यापीठाच्या परिसरात असलेल्या इमारती बागितल्या. जवळ जवळ हजार एकराच्या वर जागेत हे विद्यापीठ बसवलेले आहे. नवीन विविध प्रकारचे कोर्स इथे आहेत जसे कृषी अभियांत्रिकी, हॉर्टीकल्चर, फॉरेस्टी .आमच्या सोबत दोन प्रोफेसर होते ते सर्व माहिती देत होते. लाखी बाग नावाचं एक शेत दाखवले. त्यात आंबा नारळ ही झाडे लावली होती. त्याला लाखी बाग म्हणतात कारण याचे उत्पन्न लाखाच्या घरात मिळते. इथे मसाल्याच्या वेलींची काही झाडे दाखवली. वेलची, लवंग दालचिनी, तमालपत्र, रंगाची झुडपे यांचा समावेश होता.रबर रोप लागवडी पासून ते त्याचे ऊत्पादन निघेपर्यंत सर्व इथम्भूत माहिती मिळाली. रबराच्या झाडावर कोरलेले स्पायरल आकार त्याच्यातून बाहेर पडणारा चीक.त्या द्रवाचे रासायनीक दृष्ट्या प्रक्रिया करून तयार केलेलया रबर शीटस दाखवल्या.नंतर तनुचा ग्रुप घेऊन बायोटेक प्रयोगशाळा बघायला गेलो.तनुचा आवडता विषय टिश्यू कल्चर, माइक्रोबायलॉजि.त्यानी तिथे खूप मजा केली .विविध प्रश्न विचारत त्यांना हैराण केले.इतर काही प्रकल्प बघून झाल्यावर आम्ही किसान भवन येथे आलो.नाडकर्णी सरांची भेट घेतली . त्यांनी सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद दिले.नंतर आवरा आवर केली. किसान भवन होस्टेल मेस वर जेवलो .तोपर्यंत दोन वाजले होते. तीन वाजता आमची गाडी होती.शेतकरी भवन पासून स्टँड बरेच दुर आहे.तिथून मग लगेच निघालो.स्टँडवर पोहोचलो तेंव्हा लगेच कल्याण गाडी लागली होती.गाडीत सर्वाना बसायला जागा मिळाली.दापोली नागोठाणे अंतर सुमारे 130 किमी आहे.साडेतीन तासात गाडीने आम्ही परत नागोठाणे येथे पोहचलो...असा हा शिबिराचा प्रवास



11 views0 comments

Recent Posts

See All
bottom of page