top of page

किहीम -अगस्या इंटरनॅशनल सायन्स सेंटर भेट.

परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात संपणार होत्या. लगेच दहा तारखेपर्यंत रिझल्ट लागणार होते.पण त्याच आठवड्यात होळी, रंगपंचमी असल्याने बरेच जण बाहेरगावी जाणार होते त्यामुळे दोन दिवसांचा कॅम्प घेणं शक्य नव्हते.त्यात करोना रोगाच्या बातम्या यायला नुकतीच सुरवात झाली होती. पुढे त्याचे गांभीर्य एवढं वाढणार होते याची कल्पना त्यावेळी नव्हती.सुमित अचानक भेटला तो म्हणाला मी सुद्धा येतो.एक कार्यकर्ता वाढला आणि तो सुद्धा जुना सर्वात सिन्सियर मेंबर. जास्तीत जास्त मुक्तांगण मधील कॅम्प केले असतील त्यांपैकी तन्वी,विक्रांत आणि सुमित हे होत. त्यामुळे शिबीर ही त्यांना लागलेली वर्षानुवर्षे सवय.सर्व रूटीन एकदम तोंडपाठ. कार्यक्रमाची रूपरेषा सांगायची गरज नाही फक्त ठिकाण आणि तारीख कळाली की आपोआप प्रोग्रामचा अंदाज त्यांना येतो .जवळ जवळ प्रत्येक शिबिरात डायरीचे उत्तम लिखाणाचं बक्षीस अगदी सुमितचे फिक्स असायचे. सहकारी वृत्ती, ज्ञान मिळवायची आतुरता आणि त्यावेळी तन्वी, विक्रांत यासारख्या मात्तब्बर मेंबर्स च्या सानिध्यात वाढलेली ही मुले. त्यांच्यात प्रशांत, स्वप्नील सारखी मुले ही सुध्दा त्याच कॅटेगरीत मोडणारी.कुठेही वेळेचा व पैशाचा अपव्यय न करणारी अशी काही मोजकीच मुले.यांची जडणघडण अशी झाली आहे की ही जिथे जातील तिथे सगळ्यांना आपलेसे करून घेतील. मिळेल ती जबाबदारी स्वीकारतील. बऱ्याचदा कॉलनीत आले की कुठे कार्यक्रम करूया का? आसपासच्या बऱ्याच गावात यांच्यासोबत कार्यक्रम केले. त्यांना एक जाणीव आहे आपणही काही समाजाचे देणे लागतो. त्यामुळे त्यांच्या सहवासात आपले नवीन मेंबर आले की आपोआप त्यांचं मार्गदर्शन मिळते. दिवसभराच्या उपक्रमात त्यांच्या अनुभवाचा लाभ इतर मुलांना मिळतो. आम्ही ठरवले की एक दिवसाची ट्रीप काढुया.मग ठिकाण कोणते ठरवावे सुचत नव्हते.मग अचानक अगस्या ग्रुपची आठवण झाली. त्यांचा नेमका नंबर मिळत नव्हता.मग मी अलिबाग जेएसएम कॉलेज मधील प्राध्यापक तानवडे सराना फोन केला आणि त्यांच्याकडून नंबर घेतला. सायन्स सेंटरला फोन केला. रविवार पर्यन्त ते बिझी आहेत असे ते म्हणाले.मी त्यांना सविस्तर सांगितले की पुढच्या आठवड्यात सण असल्याने आम्हाला शक्य नाही.जर आमच्यासाठी सहा तारखेला शक्य होत असेल तर बघा. त्यांचे उपक्रम आपण बऱ्याचदा केल्यामुळे आपल्या ग्रुप विषयी त्यांचे चांगले मत होते.यात आपला कुठलाही व्यवसायी स्वरूपाचा हेतू नसल्याने ते काही अडजस्ट होते का ते पाहूया म्हणाले .त्यांची मीटिंग सहा तारखेला होती त्यादिवशी आम्ही जाणार होतो.मी त्यांना सांगितले की तुमची मीटिंग सकाळी लवकरच बोलवून आम्ही दुपारी बारा वाजता येतो.मग पाच वाजेपर्यंत आम्ही थांबू.त्यांनी मग त्यांच्या ग्रुप सोबत चर्चा करून आम्हाला यायचे आमंत्रण दिले. मुक्तांगण ग्रुपवर कार्यक्रमाची पूर्ण रूपरेखा पोस्ट केली.

या सेंटर मध्ये आतापर्यंत बऱ्याच फेऱ्या मारल्या आहेत.त्यांच्या इथे आपण निवासी शिबिर आयोजित केले होते. परंतु यातील एक दोन मुले सोडली तर बाकी कुणीही इथे भेट द्यायला आले नव्हते. राज, सानिका, सारंग,अरविंद, वर्देश, दुबे ही नववी तील मुले आणि सहावी सातवीत शिकणारी विधी, श्रीजीत, बल्लाळ, सौमित्र, सृष्टी अशी त्यातल्यात्यात मोठी मुले. त्यामुळे विज्ञान प्रदर्शन बघण्यासाठी आणि त्याचा लगेच फायदा होणारी मुले ग्रुप मध्ये कमी आहेत.पण काहीतरी प्रमाणात अगदी जादूचे प्रयोग म्हणून की होईना त्यानिमित्ताने बरेचशे प्रयोग डोळ्या खालून जातील या दृष्टीने एक दिवसाचे शिबीर आयोजित केले.

मग मुलांना नावे द्यायला सांगितले. गाडीची व्यवस्था करायची होती. अनुराधा मॅडम यांची गाडी होती,एक गाडी अरविंद ची होती आणि अजून एक रिक्षा केली. सकाळी आठ वाजता बालगंधर्व येथे जाण्यासाठी जमा झालो.एक दिवसाचे शिबीर असल्याने जेवणाचा डबा, डायरी, ड्रॉइंग साहित्य एवढेच साहित्य सांगितले होते. बीचवर जाणार असल्याने एक्स्ट्रा कपडे.


सर्वजण जमा झाल्यावर आम्ही निघालो.फाळके आणि देशमुख यांच्या कार नंतर येणार होत्या.करले बाईकवर येणार होते. .त्यांनाही डायरेक्ट किहीमला यायला सांगितले. नेहमीप्रमाणे आम्ही कुर्डुस येथे नाष्टा घेतला.नंतर पुढे निघालो. पेझरि येथून कार्लेखिंड मार्गे किहिमच्या दिशेने आम्ही निघालो. वाटेत कनकेश्वर देवस्थान फाटा लागला. सकाळी सायन्स सेंटर मध्ये त्यांच्या कर्मचाऱ्यांची मीटिंग होती.ती साधारण बारा वाजेपर्यंत चालणार होती.मग किहीम बीचवर जायचा विचार केला. बीचवर पार्कींग , कपडे बदलण्यासाठी छोट्या खोल्या, प्रसाधन गृहे अशा विविध सोयी सुविधा आहेत. तेथील स्थानिक ग्रामपंचायत याची देखभाल करते. पार्कींग व इतत्र चार्ज घेतले जातात.तिथं गेल्यावर पाहिले तर तुरळक पर्यटक होते. सकाळचे साडेनऊ वाजले होते त्यामुळे एवढे ऊन नव्हते.मग आम्ही सुरूच्या झाडांखाली सर्वजण एकत्र जमलो. सर्वांना ड्रॉइंग साहित्य काढायला सांगितले. सर्वांनी मग चित्र काढायला सुरुवात केली. प्रत्येकाला समोर जे काही दिसत आहे ते काढा असे सांगितले. समोरच खांदेरी उंदेरी किल्ले स्पष्ट दिसत होते.हे दोनही किल्ले समुद्रात आतमध्ये आहेत ,पण थोडे बरेचशे आत असलेले किल्ले अगदीं जंजिरा किल्ला आहे तसेच.पण हे किल्ले फक्त टेहळणी करिता वापरायचे आणि जहाजांच्या सुरक्षित प्रवासासाठी येथे उभारलेला उंच दीपस्तंभ अजुनही कार्यरत आहे दीपस्तंभ व त्यांची ठिकाणे समुद्रातील जहाजमधील लोकांना परिचित असतात. त्यानुसार ते आपली दिशा ठरवतात. मुलांना चित्र काढायला बरेच विषय तिथे होते. मुलांनी वेगवेगळ्या प्रकारची चित्र काढली.काही पर्यटक मुलांची चित्रे बघायला येत होते. बरेचशे मुंबईकर होते.मुले बीचवर पाण्यात न डुंबता शांतपणे चित्र काढत आहेत ती गोष्ट त्यांच्या मनाला कुठेतरी खटकत असावी. त्यामुळे ही मुले नक्की कशासाठी आली आहेत ,आणि काय काढत आहेत यांचे त्यांना कुतूहल होते. .काहींनी समुद्रातील किल्ले,तर काहींनी परिसरात असणारी सुरुची झाडे, नारळाची झाडे काढली. काहींनी पर्यटक काढले. नंतर चित्रे जमा केली.बरेचजण वाळूत किल्ले करत बसले होते. वरद, आर्चीता, अदिती, रुद्र, विश्वाम हे मात्र मस्तपैकी वाळूत खेळत होते मध्येच चित्र काढत. तसे अर्चित आणि अदिती यांनी त्यांचे चित्र काढून लवकर संपवले होते..नंतर त्यांना ग्रुप करून प्रत्येकाला एका विषयावर चर्चा करायला सांगितली.हा खरंतर सर्वात कंटाळवाणा विषय पण त्यानिमित्ताने नवनवीन गोष्टी ऐकायला मिळतात.प्रत्येक ग्रुपला एक कार्यकर्ता दिला होता. सुमित, उन्मेष यांचे मार्गदर्शन त्यांना लाभतं होते. आम्ही झाडांखाली बसलो होतो परंतु ती जागा नारळ पाणी विकणाऱ्यांची होती त्यामुळे ते सतत कटकट करत होते. मुद्दामहून कचरा करू नका वगैर सांगत होतो.मग आम्ही थोडे दूर बसलो. कचरा जसा होईल तसा योग्य ठिकाणी टाकत होतो मुलांना खरंतर पाण्यात जायचे होते परंतु त्यावेळी गेलो असतो तर कपडे खराब झाले असते शिवाय अंगाला वाळू लागली असती. तसे भिजलेल्या स्थितीत सायन्स सेंटरला जाणे शक्य नव्हते..मग मुलांना येताना आपण फेरी मारू असे सांगितले.दोन प्रोग्राम होईपर्यंत बारा वाजत आले. प्रसून, वर्डेश या मुलांसारखी मेहनती आणि सायन्स मध्ये आवड असणारी मुले सोबत असल्याने बराच फरक पडतो..अरविंद सारखी मुले खरंतर कुठलीही गोष्ट फार चांगली करू शकतात पण त्यांना मनापासून या गोष्टी आवडत नाहीत.. त्यामुळे सतत त्यांच्या पाठी राहावे लागते.सतत काही तर वेगळे करण्याच्या वागण्यामुळे कित्येक वेळा आपण काय करतो याचे भान नसते.राज सारखी मुले मात्र दोन्ही प्रकारात पारंगत असतात आणि त्यांना टार्गेट दिल्याशिवाय काहीही करणार नाहीत ,पण एकदा मनात आले मग एकदम शंभर टक्के यशस्वी. सुमितला त्यांच्यासोबत मुद्दाम ठेवले होते. किहिमला येताना थोड्या खोड्या केल्या असे समजले.मग त्यांना थोडेसे रागावून सांगावं लागलं की सोबत असणाऱ्या व्यक्तीचा फायदा करून घ्या.मग प्रसूनला ही गोष्ट लगेच समजली.मग राहिलेल्या दिवसात मोकळ्या वेळेत त्या सर्वांनी सुमितबरोबर चर्चा केली.

बारा वाजता आम्ही आगरसुरे येथे पोहचलो. त्यांच्या गेट च्या बाजुला झाडाखाली गोल करून बसलो.मी आत जाऊन चर्चा करून आलो. स्टाफ बराच नवीन होता.पण काही जुनी लोकं होती त्यांनी मला ओळखले. सर्वांना आत बोलावले. पण मी सांगितले की प्रथम सर्व मुले बाहेरच व्हरांड्यात जेवतील मग आम्ही आत येऊ. आतमध्ये खरकटे सांडू नये याची खबरदारी घेतली.मग आतमध्ये हॉल आहे तिथे सर्वांना बसवले. कार्यकर्त्याची ओळख करून दिली.मग प्रत्येक मुलाने स्वतः च्या बाबतीत सांगितले.मग आगस्या सायन्स सेंटर विषयी त्यांच्या लोकांनी माहिती दिली. बंगलोर मध्ये जवळ जवळ दीडशे एकर जागेत सायन्स सेंटर उभारले आहे.त्यात होतकरू तरुण पिढीला प्रशिक्षण देण्यात येते . त्यानंतर त्यांना भारतात त्यांच्या स्वतः च्या भागात असणाऱ्या शाळांमध्ये मुलांना विज्ञान प्रयोग सादर करून मुलांमध्ये गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांनी नंतर त्यांच्या लॅबविषयी सविस्तर सांगितले. प्रत्येक मुलांना तेथील सर्व उपकरणे दाखवली. तिथे चार लॅब आहेत. केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी आणि अगदी गणिताची देखील लॅब आहे. बरेचशे प्रयोग मुलांची जिज्ञासू वृत्ती वाढवणारी आहेत. आपल्या दैनदिन जीवनात वापरात असलेली वाहने कशी चालतात, त्यातील इंजिनच्या प्रकारची माहिती देणारी उपकरणे.ती कशी चालतात त्याची केलेली सुंदर रचना.असतील भाग अर्धा कापून हवा,इंधन कसे जाते , त्याला इग्निषण कसे मिळते हे सर्व प्रयोगात छान दाखवले आहे. अगदी टू स्ट्रोक, फोर स्ट्रोक् प्रकार कसे असतात ते सहज समजतील अशी मांडणी केली आहे. नंतर एक चुंबकत्व विभाग आहे त्यात अगदी विद्युत जानित्र कसे त्यापासून ते अगदी चुंबकीय गुणधर्म इथपर्यंत त्यांनी मुलांना माहिती दिली. त्यांच्या बायो लॅब मद्ये शरीराचे वेगवेगळे भाग चार्ट आणि मोल्ड स्वरूपात ठेवले आहेत. केमिस्ट्री लॅब मध्ये वेगवेगळे चार्ट आणि प्रयोग मांडण्यात आले आहेत. गणिताच्या लॅब मद्ये अबॅकस, वैदिक गणित पद्धत यावर काही माहितीपर चार्ट आहेत. नंतर सहावीच्या खालच्या मुलांना त्या ग्रुप मधून वेगळे काढले त्यांना एकदा सर्व प्रयोग दाखवले आणि त्यांना बाहेर आणले. त्यांना मग ग्रिटींग कार्ड्स बनवायला दिली. सर्वांना रंगीबेरंगी कागद, फुले, पाने, प्लास्टिकचे मणी, गोल, चौकोनी तुकडे दिले. कागदाचे रंगीत तुकडे कापून दिले.मग आतमध्ये दोन तीन मोठे ग्रुप वेगवेगळी कामे करत होते. एका ग्रुपला ग्रहण कशी होतात त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवत होते. एका ग्रुपला प्रिझम, आरसा यांच्या प्रतिमा , त्यांचा व्यवहारातील उपयोग अशा बऱ्याच गोष्टीवर प्रत्यक्ष प्रयोग करून आणि प्रत्येक मुलांना प्रयोग तो करायला लावत होते. स्थितिक विद्युत (static electricity) यावर विविध प्रयोग होते. मुलांना सहज कळेल या भाषेत तक्ते समोरच टांगले होते.न्यूटनचे गती विषयक नियम, गुत्वाकर्षण नियम याचे प्रत्यक्ष प्रयोग मुलांना बघायला मिळाले..प्रसून ,राज, वरदेश यांनी रोबोटिक्स या विषयावर छान चर्चा केली. त्यांचे सर्व सहकारी खूप खुश होते कारण प्रश्न विचारणारे, प्रत्येक बाबतीत पुढाकार घेऊन काम करणारी मुले त्यांना सहसा दिसत नाहीत. त्यामुळे अशी मुले दिसली की त्यांना सांगायला हुरूप येतो. लहान मुले मात्र याकडे मस्त जादूचे प्रयोग बघावे तसे पहात बाहेर निघून गेली. त्यांचे सुद्धा बाहेर अगदी तीन तीन ग्रीटिंग कार्ड्स काढून झाले.मग त्यांच्या एक कार्यकर्ता आला व त्यांनी अग्निबाण उड्डाण कसे करतात त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.लहान मुलांना हा प्रयोग खूप आवडतो. त्यामुळे त्यांनी तासभर त्यात घालवला. करंट इलेक्ट्रिसिटी वर सीरिज, प्यारलल सर्किट यावर मोठ्या मुलांनी प्रयोग केले. वेगवेगळी युनिट्स , भौतिक राशी यावर चर्चा झाली. दोलकाच्या मदतीने वेळ मोजणे असे छान छान प्रयोग करून दाखवले.


दरम्यान काही पालक सेंटरला भेट द्यायला आले. बाजीराव पाटील, मित्रा जोशीचे आई वडील , नंतर फाळके सुद्धा आले.मग बाहेरच पटांगणात मुलांना बसवले. कार्यक्रमाबाबत चर्चा केली. मुलांच्या प्रश्न उत्तर साठी वेळ देण्यात आला.

मुलांनी खुप सुंदर प्रश्न विचारले.विश्वंम ने एक सुंदर प्रश्न विचारला गेटवर एक बोर्ड लावला होता त्यावर एक ब्रीद वाक्य होते.WELCOME TO THE WORLD OF Aah!!…Aha!!!..Ha. Ha!!!...

याचा अर्थ विश्वंमने विचारला. खरंतर हा मेसेज सहज दिसण्यातील नव्हता.पण तो पाहून अचानक प्रश्न क्लिक होणे फार महत्वाचे आहे.याचा अर्थ फार गहन आणि मजेदार आहे.हे ब्रीद

वाक्य अगस्त्य ग्रुपची विचारधारा सांगते. याच्यातले तीन एक्के म्हणजे A A A…पाहिलं अक्षर सांगते तुम्ही ज्यावे

ळी एखादा नवीन प्रयोग, सुंदर पेंटींग, सुंदर मुर्ती , अशी नवीन गोष्ट बघता त्यावेळी तुमच्या तोंडून निघते ते आह.. Aah. याचा अर्थ तुम्हाला ती संकल्पना भावली, पुढचा A. म्हणजे संकल्पना ती भावल्यानंतर ती कशी तयार झाली असेल, त्याच्यामागे काय कारण असावे, कोणती संकल्पना असेल त्यावर विचार करतो आणि तुम्ही इतरांशी संवाद साधल्यावर त्याचे मर्म कळते म्हणजे जसे डॉक्टर रामन यांनी ज्यावेळी समुद्राचे निळे पाणी पाहिले त्यावेळी त्यांना पहिला A आठवला त्यानंतर त्याच्यावर त्यांनी रात्रंदिवस अभ्यास केला आणि रामन इफेक्टचा शोध लावला त्यानंतर दुसरा A आठवला Aha…नंतर त्यांना जगाने गौरवले मग तिसरा A म्हणजे Ha Ha..

अशी छान माहिती प्रश्नोत्तरात मिळाली. काही लहान मुलांना आभार मानायची संधी सोडली नाही श्लोकाने चक्क मोडक्या तोडक्या हिंदीत आभार मानले. यावेळी मुलांसोबत पालक हजर होते त्यांनी प्रत्यक्षात मुलांच्या अॅक्टिवीटी पाहिल्या. प्रसून आणि वरडेश यांनी सुंदर प्रश्न विचारले आणि आभार प्रदर्शन केले.

त्यांच्या रजिस्टर वर सर्वांनी फीडबॅक लिहिला. तोपर्यंत पाच वाजले होते.मग आम्ही त्यांचा निरोप घेतला.मग येताना ठरल्या प्रमाणे किहीम बीचवर परत निघालो.


मुलांना पाण्यात खेळायचे होते. आम्ही गेलो तेव्हा पाणी बरेचशे दूरवर गेले होते. तासभर पाण्यात गेला, ओहोटी लागली होती त्यामुळे पाणी थोडे दूरवर गेले होते. काही खडक उघडे पडले होते. खडकावर शिपल्यांचे कवच एकाला एक चिकटल्याने त्यांचे थर काही ठिकाणी जमा झाले होते.तो थर तसा धारधार असतो.पाय चुकून त्यावर पडला तर नक्की इजा होणार. त्यामुळे सांभाळून पाय ठेवायला लागत होते.त्यादरम्यान भरती चालू झाली आणि पाणी वर सरकू लागले. आम्ही सर्वजण त्यामुळे किनाऱ्याकडे परत निघालो पण परत येताना ये धारधार खडक पाण्यात बुडाले होते. त्यामुळे त्यांचा अंदाज येत नव्हता. चपला बूट, कपडे सर्वांनी किनाऱ्याकडे नेले,पण काही मुलांच्या चपला कुठे काढल्या लक्षात राहिले नाही. तेवढ्यात विधीच्या पायाला जखम झाली. तिला दोघांनी धरून किनाऱ्याला आणले.. रक्त यायला लागले त्यात खारे पाणी लागत होते त्यामुळे वेदना होत होत्या.मग कसेतरी तिला गाडीकडे आणले. बाकीच्या मुलांना सुद्धा बाहेर यायला सांगितले. अर्चिता आणि अदिती यांच्या चपला मात्र भरतीच्या लाटेत कुठेतरी गेल्या. त्या दोघी विसरून गेल्या. आम्हाला वाटले कुणितरी सर्वांच्या चपला आणून गाडीत ठेवल्या आहेत. कपडे, बूट भिजले होते त्यामुळे कॉलनी मध्ये गेल्यावर बघू असे सांगितले.
विधीला चांगलीच जखम झाली होती. मुलांना भूक लागली होती मग करले सोबत आले होते त्यांनी पेझारी मध्ये चांगला नाष्टा कुठे मिळतो ते सांगितले मग मी आणि सुमित यांनी जाऊन नाष्टा आणुया असे ठरले.मग तिथेच बांधनला थांबलो, अरविंदची गाडी घेऊन परत पेझरी येथे गेलो. अरविंदने कॅम्प साठी त्याच्या मुलाला आणले होते.पण तो या आपल्या मुलांमध्ये बुजत होता.तरी त्याला मुद्दाम सर्व उपक्रमात सहभागी व्हायला लावले होते. उन्मेष आणि सुमित यांनी दिवसभर मुलांना चांगले सांभाळले. त्यांना बऱ्यापैकी अनुभव असल्याने त्याचा फायदा मुलांना झाला. नाष्टा घेऊन बांधनला परत आलो. तिथेच नाष्टा संपवला.मग कॉलनीत जायला निघालो. आठ वाजून गेले होते.एक छोटीशी एक दिवसाची ट्रीप पार पडली होती………………शाळेचा रिझल्ट लगेच होता आणि सतरा पासून शाळा सुरू होणार होती.पण होळी नंतर करोनाचे प्रस्थ वाढले आणि आख्या जगाला लॉकडाऊन करून टाकले. श्लोकाने तिच्या वडिलांना सांगितले करोनाच्या अगोदर ट्रीप झाली त्यामुळे बरे झाले नाहीतर आमची एक ट्रीप राहिली असती.या ट्रीप मध्ये पालकांना स्वतः ला भाग घेता आला. मुलांनी काढलेली सुंदर ग्रीटिंग कार्ड्स तिथल्या कर्मचाऱ्यांना दिली. मित्रा जोशी हिने बीचवर चित्र छान काढली होती. अभिग्न , सृष्टी, मित्रा, सानिका यांनी नेहमी प्रमाणे सुंदर कार्ड्स बनवली. प्रसून दुबे याचे शिबिरातील वावरणे फार सहज होते. त्याच्यामुळे मुलांनी फार चांगल्या रीतीने प्रयोग केले, प्रश्न विचारले. सुमित व उन्मेष सतत त्यांच्या पाठी असल्याने त्यांना खरोखर चांगल्या गोष्टी आत्मसात करता आल्या.लहान गट मात्र अग्निबाण या एका अॅक्टिवीटी मध्ये छान रमला. तिथे वरदच्या खोड्या चालल्या होत्या.पण एकंदरीतच त्यांची धमाल चालली होती. कार्यकर्ते बरेच असल्याने प्रत्येकाला एकेका गटासाठी वेळ देता येत होता. त्याचा परिणाम म्हणून मुलांना बरेच काही शिकता आले.काही पालकांना या ठिकाणची नव्यानेच ओळख झाली. बऱ्याचदा ते या भागात यायचे पण हे ठिकाण त्यांना माहीत नव्हते.या अशा प्रदर्शनाच्या भेटीमुळे पुढील शिक्षण घेण्यासाठी ज्यावेळी बाहेर पडतो त्यावेळी याचा खूप उपयोग होतो. मुले एखादे प्रेझेंटेशन, नवनवीन प्रयोग करायला मुले घाबरत नाहीत.त्यांनी बऱ्याच गोष्टी अनुभवल्या असल्याने त्यांचा कॉन्फिडन्स या बाबतीत चांगला असतो…….

13 views0 comments

Recent Posts

See All

Drama journey on Maharashtra Freedom Fighters

In our township every clubs, groups arranged many programs .We always involved in their activities. We always helped them and took lot of benefits like interviews of big personalities , infrastructure

Comments


bottom of page