२००० सालात दिवाळीच्या सुट्टीमध्ये रायगड कॅम्प घेतला होता. त्यावेळी फक्त मुलेच येणार होती. कार्यकर्ते संख्या सुद्धा कमीच होती कारण पूर्ण तीन दिवस सुट्टी टाकावी लागणार होती. सुखदेव बर्गोले आणि मी असे दोघेच कार्यकर्ते होतो. सर्वजण मिळून आम्ही सतरा लोक होतो. मोठ्या गटातील शंतनु राणे हा मदतीला होता. कॅम्पची तयारी म्हणून आमच्या डिपार्टमेंट मधील साळवी यांच्याकडे पाचाड गावात राहण्याची व्यवस्था होईल काय याची चौकशी केली.त्यांचे एक नातेवाईक पाचाड मध्ये सरकारी कर्मचारी होते. त्यांना देण्यासाठी साळवी यांनी एक चिठ्ठी दिली. त्यात त्यांनी आमची राहण्याची व्यवस्था करावी असे लिहिले होते. महाडच्या रवी वैद्यला भेटलो. त्याला गडावर राहण्याची व जेवणाची व्यवस्था होईल काय याची चौकशी केली. त्याने पाचाड मध्ये राहत असलेले एक शेडगे नावाचे गृहस्थ ज्यांचे तिथे एक छोटे खानावळ वजा हॉटेल आहे त्यांचे नाव सुचवले. आणि रवीने सांगितले की त्याच नाव सांगा ते तुम्हाला मदत करतील . नंतर रायगड म्हटले एक मोनोपोली नाव म्हणजे देशमुख हॉटेल. गडावर आणि पाचाडला गेली कित्येक वर्षे ते हॉटेल चालवतात. त्यावेळीं शक्यतो शिबिरात आम्ही स्वतः जेवण बनवत असू.पण गडावर ते शक्य नव्हते.रवीने बरीच माहिती दिली. गडावर जिल्हा परिषदेचे एक गेस्ट हाऊस आहे. तिथे जाऊन भेटा. मुक्तांगण ग्रुप मधील पुष्कर अधिकारी याचे पाचाडचे हॉटेल मालक देशमुख हे मामा लागतात.हे मला कळल्यावर मी अधिकारी यांच्या घरी गेलो. त्यांनी मग एक चिठ्ठी लिहून दिली. अशी माझी पूर्वतयारी चालली होती. दिवाळी दरम्यानचे दिवस असल्याने गडावर गवत असेल असे गृहीत धरून काळजी घ्यावी लागेल असे वाटत होते कारण त्या भागात विषारी विंचू आणि साप खूप आहेत. त्यासाठी काही खबरदारी घेता येईल काय याची माहिती घेत होतो. थोडा डॉक्टरांचा सल्ला घेतला. नंतर आपल्या येथील पालीच्या एका मेडिकल असिस्टंटला विचारले की जर साप किंवा विंचू चावल्यास तर अशावेळी प्रथमोपचार काय करावा असे विचारले असता अतिशय उर्मटपणे उत्तर दिले काहीही करू नये अर्थात मरू द्यावे. अतिशय रुक्षपणे त्याने सांगितले.पण रिटायरमेंटला आलेला गृहस्थ होता पाचसहा महिने बाकी होते त्यामुळे हा परिणाम झाला असावा असा विचार करून निघून आलो .मग मला साळवी यांनी सांगितले की पाचाडला प्राथमिक आरोग्य केंद्रात साप आणि विंचू यावर इंजेकशन उपलब्ध आहेत.तसे काही झाल्यास सरळ रोपेवे मधून खाली या आणि पाचाडला जा.मग मला हायसे वाटले.तीन दिवस वर मुक्काम असल्याने बऱ्यापैकी साहित्य लागणार होते. नागोठणे येथे जाऊन मेडिकल मधून काही , क्रीम, कापडी पट्ट्या,ताप, सर्दी यावरील गोळ्या हे सर्व घेतले.
पेण वरून वरद जोशी येणार होता.कॉलनी मधून विक्रांत, सुमित, स्वप्निल, शंतनु, नेवसे असे बरेच जण येणार होते.कॅम्प मधील मुख्य विषय होता रायगड किल्ला निरिक्षणातून अभ्यास. रायगड किल्ल्याला धरून लिहिलेल्या पुस्तकांचे तीन दिवस वाचन करून त्यावर डायरी लिहिणे. त्यासाठी लायब्ररी मधून आनंद पाळंदे,गो.नी. दांडेकर अशा लेखकांची पुस्तके आणली होती.
आम्ही दुपारी दोन नंतर महाडला जायला निघणार होतो. स्टँडवर जाऊन अगोदर चौकशी करून आलो होतो.अडीच नंतर एक महाड गाडी आहे ती साडेचार पर्यंत महाडला पोहचते. तिथून रायगड करिता पाच वाजता गाडी आहे ही सर्व माहिती मिळवली होती.वरद जोशी दोन वाजताच्या शिफ्ट बसने येणार होता. त्याला घेऊन आम्ही सगळे जण दुपारी अडीच वाजता नागोठ्ण्यात गेलो.संध्याकाळच्या जेवणाचे डबे सोबत घेतले होते. नागोठणे स्टँड वर लगेच मुंबई – झांजवड गाडी मिळाली.ही गाडी पोलादपूर मार्गे प्रतापगड जवळील झांजवड गावाला जाते.दोन तासात महाडला पोहचलो.महाड स्टँडवर चौकशी केली असता कळाले की सव्वा पाच वाजता रायगड गाडी आहे.महाड ते रायगड किल्ला हे अंतर २५ किलोमीटर असावे. मला वाटले तासाभराच्या आत पोहचू.पण घाट रस्ता असल्याने आम्हाला दीड तास लागला. पाचाडला उतरलो. पाचाड स्टॉप समोर असलेले शेडगे यांचे हॉटेल दिसले. तिथे जाऊन रवी वैद्यचे नाव सांगितले. त्यांना गडावर जेवणाची व्यवस्था होईल काय विचारले. त्यांनी सांगितले रोपवेने जेवण घेऊन येतो फक्त तिथे न्यायला आले पाहिजे.मग चपाती आणि भाजी आणायला सांगितली.ते म्हणाले दुपारी देशमुख हॉटेल मध्ये जेवण करा. देशमुख यांना द्यायला अधिकारी यांच्याकडून चिट्टी घेतली होतीच. त्यामुळे गडावरच्या जेवणाची व्यवस्था झाली. मग साळवी यांनी सांगितलेल्या व्यक्तीला भेटलो. त्यांना चिट्टी दिली. चिट्टी वाचल्यावर थोडी चौकशी केली आणि त्यांनी लगेच तिथला एक हॉल आम्हाला दाखवला. त्याच्या चाव्या दिल्या. जिजामाता कम्युनिटी हॉल हे त्याचे नाव होते.हॉल साठी एक मोठा लोखंडी सरकता दरवाजा होता. शाळेचे कसे ग्रिलचे गेट असते तसे. लांबच्या लांब हॉल होता.पण वापर फार कमी असावा. कारण बरीच धूळ होतो. आतमध्ये एक स्वतंत्र खोली होती.पण बाहेर हवेशीर बसू त्यामुळे मुलांना बॅगा बाहेरच ठेवायला सांगितल्या.हे सर्व होईपर्यंत सात वाजून गेले होते. बाहेर अंधार पडला होता.. रात्री लवकर झोपून सकाळी लवकरच सहा वाजता निघायचे होते. त्यामुळे साडेसात वाजता आम्ही जेवायला बसलो. पाण्याची व्यवस्था तिथे होती. जेवताना आम्ही भिंतीला टेकून न बसता हॉलच्या मध्यावर बसलो.बाहेर वारा सुटला होता.जेवत असताना मी सहज मागे वळून पाहिले तर दोन काळे विंचू फिरत आहेत. मुलांना काहीही न कळू देता त्यांना बुटाचे फटके टाकून मारले.जेवण झाल्यावर थोडे बाहेर पडू असे ठरले. सर्वांनी टॉर्च घेतल्या. इतक्यात कुणाला तरी मोठा साप दिसला. आत मात्र मी मनातून घाबरलो. सरळ सर्वांना परत बोलावले बॅगा जरा झाडून घ्यायला सांगितल्या. हॉल मधील स्वतंत्र खोली उघडली.आतील दिवे लावले.रूम स्वच्छ केली. भिंतीला जिथे कुठे होल असतील तिथे वर्तमानपत्राचे कागदी बोळे करून त्यात टाकले.या रुमला खिडकी एकदम वरच्या बाजूला होती त्यामुळे थोडे सुरक्षित वाटले. हॉलचे दरवाजे बंद केले. रूमचा दरवाजा बंद करून घेतला. रुममध्ये सर्व ठिकाणी चेक केले की कुठे विंचू वगैरे दिसत आहे का.नंतर सर्वांनी मधोमध सतरंजी टाकली. त्या रूम मध्ये पंखा नव्हता.रूम बंद केल्याने गरम व्हायला सरूवात झाली. तेवढ्यात वीज गुल झाली. आता मोठीच पंचाईत झाली. लाईट मध्ये काही दिसत तरी होते.मग मेणबत्त्या बॅगेतून काढल्या. सर्व कोपऱ्यात लावल्या. मुलांना झोपायला सांगितले.मला मात्र झोप लागत नव्हती. सारखे विंचू आणि साप डोळ्यासमोर दिसत होते. खरंतर मला पूर्वी विंचू तीनचार वेळा चावला होता त्यामुळे त्याने दंश केल्यावर होणाऱ्या वेदना मला माहीत होत्या. सापही मला एकदा शाळेत असताना चावला होता.चार दिवस हॉस्पिटल मध्ये भरती होतो.ते सर्व परिणाम माहीत असल्याने थोडी मुलांची काळजी वाटत होती. माझ्या सोबत बर्गोले सुद्धा जागे राहिले. रात्रभर त्या मेणबत्त्या लावीत बसलो. पहाटे पाच ते सहा अशी थोडी झोप घेतली.
दुसऱ्या दिवशी सकाळी सहाला उठलो. मुलांना आवरायला सांगितले. सकाळीच निघाल्यावर प्रथम जिजाऊ समाधी स्थळ बघुन आलो. प्रथम समाधीचे दर्शन घेऊन मगच किल्ल्यावर जायचे आमचे ठरले होते. पाचाडवरून एक रस्ता हिरकणी वाडी कडे जातो आणि एक रस्ता जंगलातून चीत दरवाज्यापाशी जातो.चित दरवाज्यापाशी अर्ध्या तासात पोहचलो. पलीकडे रायगड वाडी गाव दिसते. डाव्या बाजूला काळ नदीचे खोरे दिसते. लांबवर पसरलेला कावळ्या बावल्याचा डोंगर दिसतो. उजव्या हाताला एक डोंगर रांग दिसते . त्याच्या पलीकडे माणगाव, इंदापूर गावे आहेत. चीत दरवाज्यापाशी पायऱ्या सुरू होतात.समोर उंच कडा दिसतो. किल्ला चढण्यास सुरुवात केल्यावर आपल्याला अंदाज येत नाही की नक्की कोणत्या दिशेला जायचे आहे. थोड्या वेळानंतर पायऱ्या सहज दिसत नाहीत. शत्रूला सहजपणे रस्ता दिसू नये यासाठी नियोजन असावे. वरद ने पायऱ्या मोजायला सुरुवात केली. जसजसे उंच जात होतो तसतसे किल्ल्याची रौद्रता दिसून यायला लागली होती. म्हणून या किल्ल्याचे महत्व अनन्यसाधारण होते. जावळीचा वाघ म्हणुन ओळखला जाणारा चंद्रराव मोरे बरेच वर्षे अजिंक्य त्यामुळेच राहु शकला होता. शिवाजी महाराजांनी मोठमोठ्या कर्तबगार घराण्याशी सोयरिक केली त्यामागचा हेतु एवढाच होता की राज्यकारभार सुरळीत चालावा. अगदी नेताजी पालकर, हंबीरराव मोहिते, शिर्के अशी कितीतरी घराणी आहेत त्यांना आपलेशे करून घेतले. त्यापैकी एक मोरे घराणे होते. महाराजांनी त्यांच्याशी सुद्धा नातेसंबंध जुळवण्यासाठी आपले दुत पाठवले होते. परंतु तो स्वतः आपण त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत असे मानून त्यांनी महाराजांच्या मागणीला धुडकावले.पण बराचसा इतिहास सांगितला जात नाही.आपण जर विजयदुर्ग किल्ला बघायला गेलो तर त्या किल्ल्याच्या बाजूच्या गावात एक मोठा वाडा आहे. त्याला धुळपाचा वाडा म्हणून ओळखला जातो. आता हे धुळप नाव का पडले .तर या किल्ल्याचे किल्लेदार होते मोरे तेही संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत.त्यांचे घोडदळ तिकडे ज्यावेळी येत असत त्यावेळी या परिसरातील लाल मातीची खूप धूळ उडत असे.असे नेहमी होत असे त्यामुळे या मोरे सरदाराला धुळप नावाने ओळखले जात असे. यांचे काही वारसदार अलिबाग मध्ये सुद्धा राहतात. बऱ्याचदा इतिहास हा लिहिणाऱ्या व्यक्तीच्या किंवा त्याच्या आप्त परिवार यांच्या सोईने लिहिला जातो. बऱ्याचदा ओढून ताणून खूपशा लोकांना हीरो बनवले जाते. इतिहासात बरीचशी अशी पात्रे आहेत ज्यांना कधीच न्याय मिळाला नाही.यात सर्वात अग्रणी असतील तर संताजी, धनाजी आणि बहिर्जी. यांच्या सारखी स्वराज्याची सेवा कुणी केली नसेल. मुगल सम्राट किंवा मुगल शाही संपवायला यांचे योगदान मोलाचे होते. संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांना तर महाराजांसारखे पाठबळ सुद्धा नव्हते पण आपल्या राजाला मारल्याचा सूड त्यांनी उगवला.पण त्या दोघांचा कट्टर मित्रांचा काटा काढणारे कोण होते? त्यांच्यात वैर तयार करणारे कोण होते? इतिहास तो लिहिला गेलेला नाही.कारण तो कुणाच्या तरी सोयीचा नव्हता.
रायगड किल्ला चढत असताना महाराजांच्या आयुष्यातील बरीच पात्रे आसपास फिरत असल्यासारखी वाटतात.एका वैभवशाली राजाच्या दिमाखदार राजधानी मध्ये प्रवेश करताना त्याकाळात याच मार्गावर कितीतरी लोकांची वर्दळ असणार. इंग्रज, फ्रेंच, डच असे कितीतरी परदेशी लोक याच मार्गे गडावर आले असतील. सर्वात हुशार होते ते इंग्रज कुणाला कसे फसवायचे, कुणाला मिंधे करायचे त्यांच्या इतके हुशार कुणीही नव्हते.जो वर्ग बऱ्यापैकी शिक्षित आहे त्यांना नोकरी देऊन, राजे सरदारांना त्यांच्या नातेवाईक लोकांकडून लढवून आपले ईप्सित साध्य केले .आणि मग उरलेले आपोआप त्यांच्या अधिपत्याखाली आले. सर्वांचा बीमोड झाल्यावर त्यांनी एक गोष्ट केली.ज्या गोष्टीतून प्रेरणा मिळेल अशा सर्व गोष्टींचा बीमोड करणे. त्यांनी बहुतांशी किल्ल्यांचे महत्त्व कमी करून वेळ आल्यास त्यांच्या पायऱ्या, दरवाजे यांच्यावर तोफा डागल्या. फक्त एवढ्यासाठीच की त्या ठिकाणी जाऊन शिवरायांचं स्मरण करून हे लोक बंड करून उठू शकतात हे जेवढं ब्रिटिशांनी जाणले ते इतर कुणालाही जमु शकले नाही. आपण जर पश्चिमेकडे. पाहिले तर आपल्याला दिसते लेनिन सारखा समाजवादी नेता ज्याने जगाला नवीन मार्ग शिकवला, कष्टकरी जनतचे राज्य आणले पण त्याच्या मृत्यूची पन्नास वर्ष पूर्ण व्हायच्या आत त्याचे पुतळे लोकांनी पाडले. बलाढ्य हिटलर, मुसोलिनी,, नेपोलियन यांचे अस्तित्व कथा कादंबऱ्या पलीकडे नाही. खैबर खिंडीतून हजोरो लुटारू आले अब्जावधी रुपयांची संपत्ती पळवून नेली त्याचे पुढे काय झाले किंवा त्यांना जग काय म्हणून ओळखते किंवा त्यांच्या प्रांतात त्यांचे अस्तित्व काय आहे हे आपल्याला ज्ञात आहे..या सर्व बाबी आपण पाहिल्या तर महाराजांचे नाव आजतागायत लोकांच्या स्मरणात आहे.हे विशेष जगाला मान्य करावे लागेल.
चित दरवाजा टाकून पाहिल्या सताठशे पायऱ्या ओलांडल्या की डावीकडे रस्ता वळतो तिथे वालसुरे खिंड लागते.आपल्या डोक्यावर भला मोठा तुळतुळीत काळा पाषाण दगडाचा पहाड दिसतो. एका बाजुला खुबलढा बुरूज दिसतो तर दुसऱ्या बाजूला अक्राळविक्राळ टकमक टोकाचा कडा . नंतर दोन दरवाजे लागतात मशीद मोर्चा आणि महादरवाजा. प्रत्येकाच्या मागे वेगवेगळ्या कथा आहेत. चीत दरवाजा टाकल्यावर आपल्याला नाना दरवाजा लागतो त्यानंतर हे दोन दरवाजे लागतात. नाना दरवाजा म्हणजे छोटा दरवाजा.या दरवाज्यास एक मोठी कमान आहे. आत दोन खोल्या आहेत. बहुतेक पहारेकऱ्यांसाठी असाव्यात. दरवाज्याच्या बाजुला खोबणी दिसतात .या दरवाज्यातून ब्रिटिश पाहुणा राज्याभिषेकाच्या वेळी आला होता.मशीद किंवा मदार मोर्चा या ठिकाणी एका मदन शहा नावाच्या साधूची कबर आहे. तिथे दोन पडक्या इमारती आहेत. त्यातील एक दारूगोळा कोठार असावे आणि दुसरे शिपायांसाठी असावे. तिथे एक तोफ सुद्धा आहे. समोरच दगडातील गुहा दिसतात. ..नंतर येतो तो महादरवाजा.यातून मोठमोठी दरबारी लोक येत जात असत. या दरवाजाची बांधणी वैशिष्टपूर्ण आहे. दरवाज्याच्या खांबांवर कमळ कोरली आहेत. त्याचा अर्थ होतो की सुख आणि समृद्धी. दरवाज्यावर दोन बुरुज आहेत त्यांची उंची पन्नास फुटांपेक्षा जास्त आहे.त्या बुरुजाच्या दोन्ही बाजूने तटबंदी केलेली दिसते. एका बाजुला हिरकणी टोकापर्यंत आणि दुसऱ्या बाजूला टकमक टोकापर्यंत तटबंदी आहे. अशाच प्रकारचा दरवाजा सुधागड किल्ल्यावर नाडसूर मार्गे गेल्यास लागतो. अगदी हुबेहूब तसाच आहे. रायगडच्या महादरवाजा बुरुजावर जाऊन पाहिले तर खाली वाट नागमोडी आकाराची दिसते. महादरवाजा ते खुबलढा बुरूज पर्यन्त तसाच आकार आहे. सहजपणे वाट लक्षात येऊ नये यासाठी नियोजन केले असावे. अगदी राजगड किल्ल्यांची आठवण झाली .राजगड किल्ल्यावर जाण्यास आपण तोरणा मार्गा वरून आलो तर आपल्याला पद्मावती माची लागते.पण त्याच्या बुरुजाची रचना अशी अफलातून आहे की किल्ल्यावर जाण्यास वाट कशी असेल याची कल्पना करू शकत नाही.जर तुम्ही अंधारात किल्ला चढत असलात तर मग वाट सापडणे कठीण असते. तोरण्याची टेकड्याची माळ जिथे संपते तिथे एक खिंड लागते. त्या खिंडीतून वर एक मोठा चढ लागतो तो पार केला की पद्मावती माचीचा अवाढव्य बुरुज दिसतो. असे वाटते गडावर आलो पण परंतु रस्ता दिसत नाही. वाटाड्या नसेल तर रस्ता मिळणे कठीण.ही आताची गोष्ट पूर्वी इथे घनदाट जंगल असणार. त्यामुळे तर ही वाट शोधणे म्हणजे अशक्य. जवळ जवळ अर्धा किलोमीटर सुवेळा माचीच्या दिशेने जाऊन मग एक कपारी दिसते .त्या कपारीतून वर गेले की अजब दिसते माची पर्यंतचा दुतर्फा तटबंदी असलेला रस्ता दिसतो.
रायगड किल्ला चढत असताना मुले अनेक प्रश्न विचारत होती. सर्वांची उत्तरे येत नव्हती.पण कॅम्पचा खरा उद्देश होता की मुलांच्या नजरेतून रायगड टिपणे. बऱ्याच जणांनी त्यावर लिहिले आहे पण अशी गोष्ट मिळते आहे का जी अगदी गोनिदा, सुरेश वाडकर, आनंद पाळंदे यांच्या नजरेतून सुटली असेल. गोष्ट फार अवघड आहे कारण तीन दिवसात ते अशक्य होते. तरीपण आपण तो उद्देश ठेवायला काय हरकत आहे असा त्यावेळी विचार होता.
महादरवाजापाशी काही मुले ताक घेऊन बसली होती. त्यांच्याशी गप्पा मारल्या.त्यांच्याकडून ताक विकत घेतले. पदमा आणि पृथ्वीराज चव्हाण दोघे भाऊ आमच्यासोबत होते.पद्मा आणि त्या पोरांची चांगली गट्टी जमली. जवळच्या चार पाच किलोमीटर असलेल्या गावातून ताक विकायला ही मुले येतात. शाळेला दिवाळीची सुट्टी असल्याने आली होती. शाळेसाठी सुद्धा त्यांना दररोज दोन तास चालावे लागते असे त्यांनी सांगितले. पुढचे दोन्ही दिवस ती मुले आम्हाला भेटली. आपण त्यांच्यासाठी काही करू शकतो का याचा विचार सुद्धा चाटून गेला. त्यांनी आम्हाला त्यांचा पत्ता दिला होता. दिवाळीनंतर त्या मुलांचे पत्र पद्माला आले होते.पण आमच्याकडून त्यांच्यासाठी काही करता आले नाही ही खंत राहिलीच. दरवाज्यापाशी आम्ही बराच वेळ रेंगाळलो. महादरवाजा बनवताना हिरोजी इंदलकर यांनी आपले कसब पणाला लावलेले दिसते. त्याची दिशा, त्याला दिलेले S आकाराचे वळण, शत्रूवर मारा करण्यासाठी केलेली दगडाची विशिष्ट रचना,तिथल्या सैनिकांसाठी केलेली सोय,एवढ्या वर्षाच्या नंतर सुद्धा बऱ्यापैकी स्थितीत असलेले बांधकाम अशा अगणित गोष्टी यात दिसतात. महादरवाजा ओलांडला की थोड्यावळाने आम्ही किल्ल्यात प्रवेश केला. समोरच हत्ती तलाव दिसतो. गडाचे कामकाज चालू असताना लागणारा दगड काढताना होणारा मोठा खड्डा आणि मग त्याचे केलेले तलावात रूपांतर. तलावातील पाणी बाहेर जाऊ नये म्हणून विशिष्ट रचना केलेली आहे. डब्बल वॉल पद्धत वापरली आहे.दोन दगडांच्या भिंती व त्यात चुना, भाजलेल्या विटांचे तुकडे, बेलाची फळे आणि तत्सम चिकट रस असणारी फळे यांचे मिश्रण त्यात ओतले जायचे त्यामुळे दगडांमद्ये ज्या मोकळ्या जागा रहात असत त्यात ते रसायन घट्ट बसत असे.. याच्यामुळे पाणी साठा टिकून राही.असे बरेच तलाव किल्ल्यावर आहेत. हत्ती तलाव ओलांडून आम्ही प्रथम बाजूच्या देशमुख हॉटेलमध्ये गेलो. त्यांना अधिकारी यांनी दिलेली चिट्टी दिली. चिट्टी वाचताच त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की ती चिट्टी का आणली याचा राग आला. खरंतर त्यांचेही काही चुकले नसेल कारण एवढ्या वर हॉटेल चालवायचे म्हणजे फार जिकरीचे काम आहे आणि आमच्यासारखे नोकरदार लोक जर सुट मागत असतील तर इतरांनी काय करायचे. त्यावेळी मला रागच आला होता पण आता मात्र आपली चूक झाली होती असे वाटते. ट्रेकिंग, शिबिरे हे कमी खर्चात करायचे असा अट्टाहास असायचा. त्यामुळे अशा गोष्टी घडून जायच्या. आता मात्र बराच बदल केला आहे. अगदी पिकनिक सारखे नियोजन नसले तरी थोडे काळाप्रमाणे बदलायला हवेच ना !.
मग देशमुख हॉटेल मध्ये जेवलो. त्यांचे प्लेट नुसार बील दिले. नंतर आम्ही रायगड जिल्हा परिषदेचे जे विश्रामगृह हत्ती तलावाच्या बाजुला आहे तिथे गेलो.१९८० साली महाराजांच्या ३०० व्या जयंती निमित्त पंतप्रधान इंदिरा गांधी आल्या होत्या, नंतर राष्ट्रपती ज्ञानी झैलसिंग गडावर येऊन गेले होते.त्या काळात गडावर एक VIP सूट बांधला होता. तिथेच एक आश्रमशाळा आहे. आम्ही त्या गेस्ट हाऊस वर गेलो. तिथला वॉचमन म्हणाला की सध्या तुम्ही समोरच्या शाळेत बॅगा ठेवा. संध्याकाळी सात पर्यन्त कोणी सरकारी पाहुणा वा बुकींग केलेला कुणी आला नाहीतर तुम्हाला गेस्ट हाऊस देता येईल..मग आम्ही बॅगा व्यवस्थित ठेवल्या. आणि किल्ला बघायला बाहेर पडलो. जवळचा भाग नंतर बघू म्हणून टकमक टोकाच्या दिशेने निघालो.
टकमक टोक हे गडाचे नाक असल्यासारखे. त्या टोकापर्यंत जायचे म्हणजे जीव मुठीत घेऊन जाण्यासारखे आहे. भयाण वारा सुटला तर हिथे जाणे अशक्यप्राय. असे म्हणतात की महाराज एकदा टकमक टोकाकडे गेले असता एक अशी घटना घडली की कड्यावर पोहचल्यावर अचानक जोरदार वारा सुटला आणि त्यांच्यासोबत एक छत्री धरून माणूस उभा होता तो त्या वाऱ्याच्या वेगाने वर उडाला. खाली पूर्णपणे खोलवर दरी असल्याने उडत तो खालच्या निजामपूर गावात उतरला. म्हणून त्या गावाला छत्री निजामपूर म्हणून ओळखले जाते.ते नाव आजही प्रचलित आहे. पावसाळ्यात तर या ठिकाणी जाणे अवघड आहे. हल्ली लोखंडी रेलिंग लावलेले आहे.या ठिकाणचा उपयोग कडेलोट करण्यासाठी व्हायचा. ज्याने मोठा अपराध केलेला असायचा त्याला या कड्यावरून ढकलण्यात यायचे. म्हणून हा कडा एक मोठा साक्षीदार आहे ज्याने इतिहासातील गुन्हेगार शेवटचा श्वास घेताना पाहिले , त्यातील काही निरपराधी पण असतील. टकमक टोक हे फार चिंचोळे आहे . टोकाला लहान होत जाते. त्यामुळे खूप सांभाळून जावे लागते नाहीतर खाली २६०० फूट दरीत फकेले जाण्याची भीती असते. वाटेत रायगड वाडी बाजूला एक चोर दरवाजा आहे इथून खाली जाऊ शकतो पण दरवाजा पर्यंतच नंतर पूर्ण कातळ आहे . तिथून दोर टाकून खाली उतरू शकतो.हा दरवाजा सहज कुणालाही दिसत नाही त्याची रचना अशी केली आहे की गडावरील माणसाला किंवा गडाखालच्या माणसाला आपण उतरताना दिसणार नाही. त्याची प्रतिकृती पहायची असल्यास सुधागड किल्ल्यावर एक चोर दरवाजा आहे.तो अजून पाहण्याजोगा आहे. संकटकाळी या दरवाज्याचा वापर केला जाई. सुधागड किल्ल्याचे बांधकाम व रायगड किल्ल्याचे बांधकाम यात बऱ्याच प्रमाणात साम्य आहे.
टकमक टोक ओलांडून आम्ही पुढे भवानी टोकाच्या दिशेने गेलो. सर्वजण आपापल्या डायरी मध्ये त्यांना थोडक्यात नोंदी करत होते. विक्रांत, पद्मा सारखी मुले मध्येच प्रश्न विचारीत होती. शंतनु राणे बरोबर असल्याने तो सर्व मुलांना बरोब्बर सांभाळून घेत होता. थोडे पुढे गेल्यावर जुन्या घरांचे अवशेष दिसतात आणि पुढे एक तळे लागते. सैनिकांच्या किंवा शिबंदी च्या वसाहती असाव्यात.पुढे गेल्यावर बारा टाकी लागतात. किल्ल्यावर पाण्याचे नियोजन फार सुंदर केले आहे. आपण राजगडावर गेलो तर रायगड एवढी सपाटी तिथे नाही. उलट प्रत्येक माचीला समोरील बाजूस उतार आहे. त्यामुळे पाणी साठवणे तसे अवघड होते.पण तिथेही अतिशय सुरेख तांत्रिक दृष्ट्या उत्तम तळी बांधली आहेत.पण रायगडावर प्रत्येक टोका पर्यन्त भरपूर तळी दिसतात. भवानी टोकाला फेरफटका मारेपर्यंत बराच उशीर झाला होता. आम्हाला अजून दुसरा दिवस बाकी असल्याने परत विश्रामगृहा कडे निघालो. तिथे पोहचल्यावर मुलांनी जरा आराम केला. आम्ही गेस्ट हाऊस च्या समोरील धर्मशाळेत थांबलो होतो. संध्याकाळी सात वाजता रोपवे जवळ जायचे होते. तिथे पाचाड वरून शेडगे चपाती भाजी घेऊन येणार होते. सकाळपासून बरीच धावपळ झाली होती. आम्हाला किल्ला बघायला तसा बराच वेळ होता. आमचे वाचन सुद्धा बाकी होते. सहाच्या दरम्यान गेस्ट हाऊस मधील कर्मचाऱ्याला भेटलो.तो म्हणाला साडेसहा नंतर या. अगदी समोरच आम्हीं थांबलो होतो त्यामुळे साडे सहा वाजता तिथे गेलो.त्याने लगेच रूम उघडून दिली.पाहतो तर काय आत खरोखरच अगदी लक्झरीयस रूम्स आहेत. फर्निचर वगैरे एकदम जबरदस्त.पण त्याने बजावले सकाळी आठ वाजता सामान समोर धर्मशाळेत ठेवायचे. आम्हाला ये मान्य होते कारण गेस्ट हाऊसची खरी गरज आम्हाला रात्रीचीच होती.मग मुलांना डायरी लिहायला सांगितली.सात वाजता जेवण येणार होते त्यामुळे मी आणि शंतनु टॉर्च घेऊन रोपवेच्या दिशेने निघालो. अंधार पडत चालला होता. सातच्या रोपवे मधून शेडगे आले. त्यांनी मटकीची उसळ आणि चपात्या आणल्या होत्या. नंतर आम्ही गेस्ट हाऊस मध्ये परतलो.लगेच जेवण करून घेतले कारण सर्वांना भूक लागली होती. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून किल्ला बघायला जायचे ठरले होते.सूर्योदयाच्या वेळी पूर्वेकडील भाग आणि सूर्यास्ताच्या वेळी किल्ल्याचा पश्चिमेचा भाग बघण्यात मजा येते.सपाटून भूक लागल्याने मुलांनी काहीही न कुरकुरता पटापट जेवण संपवले. आठ वाजता आम्ही पुस्तक वाचण्यास सरुवात केली. मोठ्याने वाचायला सांगितले किल्ल्याची माहिती वाचल्यानंतर किल्ला बघण्यात वेगळी मजा येते. लेखकाने लिहिलेले, वर्णन केलेल्या सर्वगोष्टी पडताळून पाहता येतात. कदाचित नवीन गोष्टी पण दिसतात.तसा दृष्टीकोण ठेऊन किल्ला पहायचा असे आम्ही अगोदरच ठरवले होते..गोनीदा म्हणजे आप्पा यांच्यासारखी माणसे म्हणजे गडकिल्ल्याला वाहून दिलेली,सुरेश वाडकर हा गृहस्थ १००० वेळा रायगडावर गेला आहे याचा तर हिथल्या प्राणी, पक्षी, वनस्पती यावर अभ्यास आहे. त्यांच्यामध्ये माणूस रमतो.पण खरंतर गडाचे दर्शन नित्यानियमने घेणारे इथले डोंगर दरीत राहणारे लोक जे आपल्या उपजिविकेसाठी नित्यानियमाने पावसाचे काही महिने सोडले तर येथे येत असतात. त्यांना भलेही इतिहास सांगता येणार नाही पण गडाचा कानाकोपरा त्यांचा पाठ असतो म्हणूनच गडाचे खरे मानकरी तर तेच आहेत. अजुनही दररोज पाच दहा किलोमीटर सहज चालत येऊन दूध दह्याचा धंदा कित्येक वर्षे करत आहेत. आम्हाला तीनही दिवस त्या खोऱ्यातील मुले भेटली. आपल्या मुलांमध्ये मिसळली. सांगाती सह्याद्रीचा हे झिंगोरो ग्रुपचे पुस्तक आणले होते. त्यात सर्व किल्ल्यांचे वर्णन नकाशासह दिले आहे. दहा वाजून गेल्यानंतर सगळेजण झोपायला गेलो. पाचाडमद्ये झोपेचं खोबरं झालं होतं पण इथे सर्व सुरक्षित असल्याने छान झोप लागली..
सकाळी पाच वाजता सर्वांना उठवले. पटापट आवरायला सांगितले . कसल्याही परिस्थितीत समाधीच्या इथून सूर्य उगवताना पहायचा होता. थोडा उजेड पडायला सुरवात झाली की लगेच निघालो.प्रथम जगदीश्वर मंदिरात गेलो . लांबून कळस पाहायला गेलो तर घुमटा सारखा भासतो. आपण जर जेजुरी सारखी देवस्थाने पाहिली तर वरचे आकार मुद्दामहून घुमटासारखे केल्यासारखे वाटतात.बऱ्याच ठिकाणी तळातले बांधकाम आणि वरचे बांधकाम कुठेच मेळ खात नाही. अगदी कोल्हापूर क्षेत्रातील महालक्ष्मी मंदिरात कळस आणि पाया यात कुठेही साम्य नाही.पाया मधील दगडी खांब बघितल्यावर मंदिर पूर्वी केवढे अवाढव्य असावे याची कल्पनाही करवत नाही.. मध्ये नृसिंहवाडी जवळील एका मंदिरात जायचा योग आला ज्या परिसरात सचिनच्या कट्यार काळजात चे शूटिंग झाले होते.हे मंदिर एवढे अफलातून आहे की डोळ्यांचे अक्षरशः पारणे फिटले.पण प्रत्येक मंदिराची तोडफोड झालीच आहे.
मुलांना जगदीश्वर मंदिर नीट पाहायला सांगितले. सूर्य उगवायला थोडा अजून थोडा अवकाश होता. त्यामुळे आम्ही निवांत परिसर पाहून घेत होतो. गडावरील दगडी खाणीतील तोडींचा पुरेपूर उपयोग करून घेतला होता. काही वेगळ्या गोष्टी मुलांनी अनुभवल्या. विक्रांतने मंदिरातील बाजूच्या भिंतीवरील झरोखे दाखवले. त्याच्या आकराबद्दल विचारले. थोडा विचार केला असता कळाले की याचा कड्याकडचा भाग निमुळता होत जातो आणि किल्लाकडील भाग लांब होत जातो. म्हणजे हवा येताना छोट्या भागातून येणार आणि झरोका इंग्रजी J अक्षराच्या आकाराचा असल्याने वारा घासत जोरात बाहेर पडणार त्यामुळे त्याचे तापमान कमी होणार आणि थंड हवा झरोक्यातून येणार अगदी उन्हाळा असेल तरी. अफलातून . चला एकतरी गोष्ट नवीन कळली की जी वाचनात आली नव्हती.मग कुणाचे तरी लक्ष पाण्याचा निचरा कसा होतो यावर गेले.मग सगळेजण पाहू लागलो आणि खरोखर फार सुंदर नियोजन केले आहे ज्यामुळे पाणी कुठंही साठून राहणार नाही.मंदिरात असलेले नंदी आणि कासव यांच्या मूर्ती पाहिल्यानंतर जगदीश्र्वराचे दर्शन घेतले आणि समाधी जवळ येऊन थांबलो.याच समाधीचे आजवर लाखो लोकांनी दर्शन घेतले असेल.पार ज्योतिबा फुले टिळक यांच्यापासून ते अगदी हल्लीच्या राष्ट्रपती पंतप्रधान यांच्यापर्यंत या सर्वांनी दर्शन घेतले असेल.पण उगवत्या सूर्याला साक्ष ठेऊन सkमाधीचे दर्शन घेणे, समोर राजगड तोरणा किल्ल्याची माळ दिसणे व त्यातून सूर्य उगवताना पाहणे हे अगदी भाग्याचे. येताना थोडा सुका खाऊ आणला होता. तिथे मंदिरापाशी थोडे खाऊन घेतले कारण किल्ल्याचा बराचसा भाग अजून बघायचा होता.
नंतर अजून मंदिर व्यवस्थित पाहिले. शिलालेख पाहिले, सेवेशी ठायी तत्पर हिरोजी इंदलकर ही पाटी बघितली. एखाद्या माणसामध्ये किती गुण असतील ज्यामुळे अशी हिरे माणिक याहून श्रेष्ठ माणसे सापडली. अशा माणसांना सांभाळणे ही फार मोठी गोष्ट असेल. यांना साजेशी कामगिरी देऊन त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांच्याकडून काम करून घेणे ही अशक्यप्राय गोष्ट महाराजांनी करून दाखवली. अगदी तानाजी, प्रतापराव यांच्या सारखे कित्येक शूरवीर धारातीर्थी पडले. महाराजांच्या शब्दाखातर आपले प्राण पणास लावले काहींनी आहुती दिली.
मंदिर बघितल्यानंतर आम्ही राजवाड्याच्या दिशेने निघालो. रस्त्यात कुशावर्त तलाव लागला. पुढे वाघ दरवाजा आहे.हा सुद्धा गुप्त दरवाजा असला पाहिजे कारण या दरवाज्यातून सहज खाली उतरू शकत नाही. पूर्वी हे दरवाजे कदाचित लपवून ठेवत असतील कारण अगदीं अडचणीच्या प्रसंगी याचा वापर करावा लागत असावा.जवळच एक महादेवाचे पडीक मंदिर दिसले.नंतर आम्ही बाजारपेठेतून निघालो.घोड्यावरून खरेदी करता येईल अश्या उंचावर दुकाने आहेत.दोन दुकानांच्या रांगा समोरासमोर आहेत. मधोमध भरपूर जागा आहे. रचना खूप सुंदर आहे. बाजारपठे पासून वर आलो की समोर बालेकिल्ल्यात शिरल्यासारखे वाटते. पलीकडे शिरकाई देवी मंदिर दिसते.हे शिर्के घराण्याचे कुलदैवत. पूर्वी या किल्ल्याचे अधिकार बरेच वर्षे या घराण्याकडे होते. त्यातील मुर्ती फार जुनी वाटते. पलीकडे गंगासागर तलाव दिसतो.या तलावात राज्यभिषेक झाला तेंव्हा सर्व नद्यांचे व समुद्राचे पाणी यात अर्पण केले होते. आपल्याकडे ज्यावेळी वास्तूपुजा ज्यावेळी करतात त्यावेळी घराच्या एका कोपऱ्यात छोटा खड्डा करून त्यात नद्यांचे पवित्र जल ओततात. गंगासागर हे नाव त्यामुळे प्रचलित आहे.यांच्या बाजूस एक मनोरा स्तंभ दिसतो . तिथे गेल्यावर गोलाकार जागा आहे. त्यात मध्यभागी लाकडी भाग दिसतो. असे म्हणतात की इथे बसले की खालच्या तलावाचे पाणी वर ढकलले जायचे व तिथे गारवा निर्माण तयार होण्यासाठी ती व्यवस्था होती. जसे आग्र्याच्या किल्ल्यात यमुनेचे पाणी आत घेऊन ते भिंती मध्ये सोडून आता गारवा निर्माण करण्यासाठी वापरले जायचे.
पाचाडवरून किल्ल्यावर येताना जी मुले महादरवाजा जवळ भेटली होती ती समोरून येताना दिसली. त्यांच्याकडून ताक विकत घेतले आणि त्यांच्यासोबत गप्पा मारत बालेकिल्ल्याकडे निघालो. बाजापेठेतून वर आल्यावर बालेकिल्ल्याची थोडा चढ लागतो.मग नगारखाना व राजभवन लागते.समोर शिवाजी महाराजांचा सिंहासनावर बसलेला पुतळा दिसतो. राजभवन यांचे फक्त पायाचे बांधकाम दिसते.पण त्याचा पसारा पहाता त्याच्या एकंदरीत भव्यतेची कल्पना येते. सिंहासन नाजिक सुध्दा कोणीही बोललेले ऐकू जावे अशी योजना केली आहे. हल्ली नाट्यगृह किंवा सभागृहामध्ये बऱ्याचदा साऊंड प्रुफिंग प्रणाली असते त्याचे बजेट लाखो रुपयांच्या वर असते. त्यासाठी प्लास्टर, लाकूड, विशिष्ट प्रकारच्या शीट वापरल्या जातात. अगदी प्रगत तंत्रज्ञान वापरतात. तीनशे वर्षांपूर्वी असे तंत्रज्ञ आपल्याकडे होते.जे फक्त दगडी बांधकामात ही किमया घडवून आणू शकले. सिंहासन आणि दरबारी सदस्य, जनता यांच्या करिता तयार करण्यात आलेले खास सभागृह. बाजूला लागून खोल्या बहुतेक कचेऱ्या असाव्यात.राजभवनच्यामागे दोन दरवाजे आहेत एक पालखी दरवाजा आणि दुसरा मेणा दरवाजा. पालखी दरवाजा मोठा आहे आणि त्याला गंगासागर तलावाच्या दिशेने पायऱ्या आहेत. राणीवसा सहा भागात विभागला आहे. त्याचे पायाचे बांधकाम शिल्लक राहिले आहे. पलीकडे राजभवनाला लागून दोन मोठे खड्डे दिसतात.वरून बंद केलेले आहेत फक्त एक चोकोनी मोकळी जागा आहे.अस म्हणतात की तिथे कैदी ठेवायचे पण तेवढे पटत नाही. कदाचित नंतरच्या काळात तसे केले असावे.कारण राजवाडा त्याच्या भिंतीला लागून कैदखाना आणि त्यात राणी महाल जवळ थोडे पटत नाही. त्यात असे बोलले जाते की त्याला लागून प्रधान मंडळ निवासस्थान होते. असे बोलले जाते रायगड किल्ल्यांवर छत्री निजामपूरच्या बाजूच्या डोंगरावरून तोफा डागल्या होत्या. किल्ला पूर्णपणे जाळून टाकण्याचा प्रयत्न केला होता. किल्ल्यावरील कचेऱ्या आणि त्यातील कागदपत्रे जवळ जवळ महिनाभर जळत होते असे सांगितले जाते.आपण खऱ्या अर्थाने इतिहास जो महाराजांच्या काळात लिहिला असेल त्याला मुकलो. नंतरच्या काळात जो इतिहास लिहिला गेलेला आहे तो प्रत्येकाच्या सोईनुसार लिहिला गेलेला आहे.काही परदेशी पर्यटक लोकांनी काही त्रयस्थ बुध्दीने लिहिलेला इतिहास अस्तिवात नसता तर मात्र काही खरे नव्हते. पोर्तुगिज, डच, आणि ब्रिटिश अधिकारी यांनी मात्र बराच इतिहास लिहून ठेवला आहे.
हे सर्व बघताना अकरा वाजले मग आम्ही परत धर्मशाळेत आलो. गेस्ट हाऊस मधून बॅगा काढून धर्मशाळेत ठेवल्या होत्या. सरकारी कर्मचारी तसे सांगून गेला होता.सकाळीच कोणी आले तर प्रॉब्लेम येऊ शकतो.मग तिथे तासभर आराम केला. बारा वाजता देशमुख हॉटेल मध्ये जेवण करायला गेलो. कालच्या सारखी ओळख सांगत बसलो नाही. ऑर्डर दिली आणि जेवायला बसलो. जेवण तसे मुलांना आवडले नव्हते पण आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मात्र रात्रीचे जेवण चांगले होते. रात्रिसाठी सुद्धा पाचाडलाच शेडगे यांनाच ऑर्डर दिली होती. जेवण झाल्यावर धर्मशाळेत परतलो. दुपारी परत पुस्तकांचे वाचन केले. परत किल्ल्याचे नकाशे वाचन केले.जो भाग बघायचा राहिला होता तो आजच्या दिवसात पूर्ण करायचा होता. मुलांनी नंतर डायरी लिहायला घेतली. सकाळपासून जे पाहिले ते सर्व लिहायला बसले. आमच्याकडे बराच वेळ होता. संध्याकाळी पाच ते सात या वेळेत आम्हाला किल्ला बघून पूर्ण करायचा होता. त्यामुळे वाचन आणि लिखाण दोन्ही तोपर्यंत करायचे होते. रात्री जेवल्यानंतर सर्वांना लिहिलेले प्रेझेंटेशन करायचे होते. त्यामुळे प्रत्येक जण काळजीपूर्वक लिहीत होते.
साधारण साडेचार वाजता आम्ही परत किल्ला पाहायला निघालो. पालखी दरवाज्याचा पायऱ्या चढून वर राणी महाल बघत. खोल्यांच्या रचना , आखणी खूप वेगळ्या प्रकारच्या होत्या. सर्व वास्तू पूर्वाभिमुख आहेत. महाल बघितल्यावर मेणा दरवाज्यातून हिरकणी बुरुजाच्या दिशेने निघालो. जाताना एक तलाव लागतो. तिथे अलीकडे एमटीडीसीच्या लोकांनी काही खोल्या बांधल्या आहेत.पण त्या बुकिंग कराव्या लागतात. नंतर हिरकणी टोकापर्यंत जाऊन आलो.बुरुज पाहिला. तिथून खाली अगदी सरळ कडा आहे.१९८० ते १९९० या कालावधीत ज्या मोठ मोठ्या लोकांनी इथे भेटी दिल्या त्याची परिणिती म्हणून काही प्रमाणात गडावर लक्ष सर्वांचे लक्ष वेधले.जोग कंपनीला रोपवेचे काम देण्यात आले. हिरकणी बुरूजा नजिक रोपवे बांधण्यात आला. त्याचा परिणाम म्हणून आज लाखो पर्यटक रायगडावर येऊन गेले.
आम्ही हिरकणी बुरजा जवळ असताना एक गाईड एका कुटुंबाला माहिती सांगत होता. आमचा मुलांचा ग्रुप बघुन त्यांनी आमच्याशी संवाद साधला. त्यांना आमचा ग्रुप आवडला.खास किल्ल्याचे निरीक्षण व अभ्यास करण्यास तिथे आलो हे त्यांना विशेष वाटले.मग आम्ही त्यांना थोडी माहिती विचारली.त्या कुटुंबातील एका शाळकरी मुलासाठी ही गडास भेट दिली होती.हे कुटुंब अमेरिका कॅलिफोर्निया येथे रहाते. आपल्या नातवंडाबरोबर आले होते. नातवाला महाराजांचा गड दाखवला पाहिजे या उद्देशाने हे कुटुंब आले होते.ही गोष्ट मात्र मनाला खूप भावली.सातासमुद्रापार जाऊन अशा गोष्टींची आठवण ठेवणे आणि त्याची जपणूक करणे ही अभिमानास्पद बाब आहे. त्यावेळी मी कॅमेरा आणला नव्हता . यामुळे फोटो काढता आले नाहीत.
संध्याकाळ होत आली होती. मावळतीच्या दिशेने आम्ही उभे होतो. गडाची सुंदरता हि सूर्योदय आणि सूर्यास्त या वेळी बघण्यालायक असते. बऱ्याचदा पर्यटक या दोन्हीं वेळेस नसतात.ट्रेक करणारे मात्र या वेळा चुकवत नाहीत. उगवत्या आणि मावळत्या वेळी ढग वेगवेगळ्या रंगात दिसतात. सकाळच्या वेळी रंग उत्साह वर्धक वाटतो. ढगांचे वेगवेगळे आकार मात्र संध्याकाळी दिसतात. रंग थोडा गडद वाटत नाही. याचा अर्थ असा की तुम्ही दिवसभरात थकल्यावर जसे ताजेतवाने नसता तसचं काहीतरी ढगांच्या बाबतीत असावे.पावसाच्या दिवसात या गोष्टी शक्य नाहीत. गडावर प्रचंड वारा आणि पाऊस जोडीला जोरदार धुके असते.ते फक्त अनुभवायचे असल्यास पावसाळ्यात जरूर यावे. प्रत्येक सीझनला गडाचे वेगळेपण बघायला मिळते.
सूर्य मावळल्यानंतर जरा वेळ तिथेच थांबलो. बर्गोले यांना पुढे जाऊन गेस्ट हाऊस मध्ये रहाता येईल का याची चौकशी करायला सांगितली. पाचाड वरून जेवणाचे पार्सल शेडगे घेऊन येणार होते. सातच्या सुमारास रोपवेने ते वर आले. जेवण घेऊन आम्ही गेस्ट हाऊस कडे निघालो. बऱ्यापैकी अंधार पडत चालला होता. आमच्या नशिबाने साथ दिली. त्यादिवशी सुद्धा गेस्ट हाऊस मिळाले. आता निर्धास्त होतो. लगेच जेऊन घेतले. नंतर उरलेली डायरी लिहायला मुले बसली. रात्री प्रत्येकाचे डायरी प्रेझेंटेशन होते. साधारण आठ वाजता आम्ही डायरी वाचन सुरू केले. मुलांनी छान डायरी वाचन केले.यात विशेष म्हणजे त्यावेळी विक्रांत वगळता सर्वजण मराठी माध्यमात शिकणारी मुले होती. त्यामुळे त्याची डायरी आणि त्याचे वाचन म्हणजे हसून हसून पुरेवाट झाली. त्याने स्वतः च्या भाषेत लिहायचा प्रयत्न केला. मग शब्दा उच्चारताना त्याची उडलेली तारांबळ.मुले मस्त हसत होती.पण या पठ्ठ्याने न डगमगता सर्व डायरी वाचन केले. त्याच्या चेहऱ्यावरची रेघ हलली नाही. समोर कीतीही ओरडा करा माझे बोलणे मी संपवणार, तुमच्या हसण्याचा माझ्याशी काडीमात्र संबंध नाही ,या एकमेव भावनेतून त्याने वाचन केले. नेहमीप्रमाणे सुमितचे डायरी वाचन चांगले होते. अशा तऱ्हेने शिबिराचा मोठा उद्देश सफल झाला. दिवसभर बरीच पायपीट झाली होती. सकाळी लवकरच उठून गड उतरून पाहिली महाड गाडी पकडायची होती. त्यामुळे लवकर झोपुया असे ठरले. मुलांना बॅगा व्यवस्थित भरून आवरून ठेवायला सांगितल्या.
दुसऱ्या दिवशी सकाळी पाचला उठलो. मुलांना उठवले.आवरून लगेच निघालो. साधारण एका तासात खाली उतरलो. चित दरवाज्यापाशी बेळगाव महाड गाडी येते.ती सातच्या सुमारास येते. खाली पोहचल्यावर ती गाडी मिळाली. महाडला साडेआठ वाजता पोहचलो. थोडा नाष्टा केला. मुंबई कडे जाणारी एक गाडी मिळाली. दहा वाजेपर्यंत नागोठणे येथे हायवेला उतरलो. कंपनीच्या बसने टाऊनशिप मध्ये पोहचलो.
Kommentare