
बरेच दिवस कर्नाळा कॅम्प करायचे मनात होते.मागे १९९९ साली एकदा श्वेता भोसले , अमृता कुलकर्णी, भूषण नेवसे, प्राजक्ता हेगडे, करुणा गोसावी, केतकी पांढरीपांडे या त्यावेळच्या पंधरा वीस जणांच्या ग्रुपला घेऊन एक दिवसाचे शिबीर आयोजित केले होते. परंतु या नवीन गटासाठी नियोजन करायचे होते. आसपासच्या भागात राहण्याची व्यवस्था होते आहे का ते पाहत असताना अंकित जोशी या आपल्या मुक्तांगण ग्रुप मधील मेंबरची आठवण आली. त्यांचे तारा हे गाव कर्नाळा अभयारण्य जवळ आहे.त्याचे वडील जगदीश जोशी यांना भेटलो. त्यांनी चौकशी करतो असे सांगितले. त्यांची दोघेही मुले आपल्या कार्यक्रमांना नियमित येत असत. शिबिरे आणि एक दिवसाच्या प्रकल्प भेटी सुद्धा ते कधी चूकवायचे नाहीत. दोनतीन दिवसांत त्यांचा निरोप आला. राहण्याची व्यवस्था होईल असे सांगितले . त्यांच्या गावात एक आश्रमशाळा आहे. शिबिराच्या आम्ही ठरविलेल्या कालावधीत त्या शाळेला उन्हाळ्याची सुट्टी लागणार होती. त्यामुळे साहजिक शाळा रिकामी असणार होती . मग जोशी यांनी शाळेच्या संचालकांना सांगून व्यवस्था केली. आता पुढील नियोजन करायचे होते .पांडेना सांगितले तेही तयार झाले. मिहिरची आई सुद्धा येणार असे सांगितले. मुलांना सर्वांना निरोप पाठवले. शिबिराची कल्पना दिली.
मुलांची एक दिवस मीटिंग घेतली. शिबिराचे पूर्ण नियोजन केले. शिबिराच्या दिवशी सकाळी दादर शॉपिंग बसने जायचे ठरले. शिबिरातील कार्यकर्ते व मुले यांची संख्या जवळपास पंचवीस होईल असा अंदाज होता . त्याप्रमाणे तिकिटे काढायची होती.परंतु एकदम २५ तिकिटे सुटीच्या काळात मिळणे कठीण होते.मग काही तिकिटे वाशी बसची काढली आणि काही दादर बसची काढली. मुलांना सर्व शिबिराचे साहित्य जमा करून ठेवण्यास सांगितले. टोपी, पाण्याच्या बॉटल, क्लोरीवेट, टॉर्च, मेणबत्ती, डायरी, ड्रॉइंग साहित्य, अंथरूण, डिश, पेला, वाटी, सुका खाऊ, सकाळचा जेवणाचा डबा, औषधे, कपडे इत्यादी साहित्य घ्यायच्या सूचना केल्या. विजय, विनिता, नाझिरकर ही थोड्या मोठ्या गटातील मुले येणार होती, तन्वी सावंत पनवेल वरून येणार होती.यसुफ मेहेर अली सेंटर ,ग्रीन नर्सरी, कर्नाळा अभयारण्य आणि किल्ला यांना भेट देणे हा शिबिराचा मुख्य हेतु होता.
शिबिराच्या दिवशी सकाळी लवकरच सातच्या सुमारास बस स्टॉपवर गेलो. मुलांची नावे घेतली. प्रत्येकाला तिकिटे दिली.बस वेळेवर आली. सर्वजण बस मध्ये चढलो .बस मध्ये सर्वजण आमच्या कडे बघत होते कारण सर्वजण ट्रेकिंगच्या बॅगा घेऊन होते. पंधरा जण तरी त्या बसला ग्रुप मधील होतो. उरलेले सर्वजण नऊच्या बसने येणार होते. सकाळी ट्रॅफिक काहीच नव्हते त्यामुळे अगदी वेळेत पेन क्रॉस केले. मध्ये एके ठिकाणी बस नाष्टा करण्यासाठी थांबली. तिथं मुले फ्रेश झाली. तिथून कर्नाळा किल्ला समोरच दिसत होता. आमचा स्टॉप जवळ आला होता. दहा पंधरा मिनिटात आमचा स्टॉप येणार होता .तारा गाव खारपाडा गाव ओलांडले की लगेच येते. गावाजवळ रस्ता अरुंद आहे. त्यामुळे बसमधून लगेच उतरायचे होते. आम्ही अगोदरच उभे राहिलो. स्टॉप आला की पटकन उतरलो. रस्ता क्रॉस करून गावात गेलो. जगदीश जोशी अगोदरच तिथे आले होते. त्यांनी मग त्या आश्रम शाळेत नेले. आठवडा भर शाळा बंद असल्याने थोडी धूळ साठली होती. सर्वात आधी आम्ही साफसफाई केली. तिथे किचन वेगळे होते . गॅस सिलिंडर , भांडी सर्व काही होते. त्यामुळे फक्त किराणा सामान आणने बाकी होते. भाजी, किराणा याची यादी केली आणि गावातून मुलांना किराणा दुकानात जायला सांगितले. सोबत एक कार्यकर्ता होता.मग सर्वांनी मिळून भाज्या निवडून ठेवल्या. पांडे सोबत असले की जेवणाची तयारी जोरात असते.ते अगदी मन लावून जेवण बनवितात. सर्वांना हाताशी धरून असेल त्या सामानात चांगले जेवण करणे हा त्यांचा हातखंडा. जबाबदारी आहे म्हणून करणे आणि अगदी मनापासून करणे हा फरक त्यांच्यात दिसतो. त्यामुळे मुलांमध्ये पांडे काका अगदी फेमस. शिबिरामध्ये सर्व प्रकारची माणसे असतील तर शिबीर मस्त होते. रटाळ होत नाही.प्रत्येक गोष्ट लक्षात राहील असे उपक्रम झाले पाहिजेत. शाळेसमोर एक मोकळे शेत होते तिथे मग मुलांचा क्रिकेटचा डाव रंगला. थोडा वेळ खेळल्यानंतर परत आलो. दुपारी युसफ मेहर अली सेंटर येथे जायचे होते. त्यामुळे नऊच्या बसची मुले आली की जेऊन लगेच निघायचे होते. .सकाळचे जेवण मुलांनी सोबत आणले होते. साडेअकराच्या सुमारास उरलेली मुले स्टॉपवर उतरली. त्यांना घेण्यासाठी आम्ही स्टॉपवर गेलो होतो कारण हायवे असल्याने रस्ता क्रॉस करताना अडचण येत होती. त्यांना बसमधून उतरऊन घेतले. नंतर सर्वजण आश्रमशाळेत गेलो. बारा वाजत आले होते. सर्वांनी जेवण केले. लगेच आम्ही मेहर अली सेंटरला भेट द्यायला गेलो. गेटवर मोठा बोर्ड लावला होता त्यावर प्रमिला दंडवते आणि मधु दंडवते मेहर अली सेंटर असे नाव लिहिले होते.
यूसफ मेहेर अली हे नाव आता जरी अपरिचित असले तरी या माणसाने फार मोठे कार्य केलेले आहे. भारत छोडो आंदोलना मध्ये यांचा मोलाचा वाटा होता. याचे स्लोगन त्यांनी तयार केले होते.ते काँग्रेस पक्षाचे मोठे नेते होते. साईमन गो बॅक हा नारा त्यांनी पहिला दिला होता. मुंबई शहराचे ते पाहिले तरुण महापौर झाले होते. त्यावेळी त्यांनी केलेल्या सुधारणा लोकांनी कायम लक्षात ठेवल्या. ज्यावेळी त्यांचे १९५० साली निधन झाले त्यावेळी सर्व मुंबई दुकाने, मिल्स, शाळा अगदी शेअर बाजार सुद्धा बंद झाला होता. समाजवादी विचारांचा नेता अल्पवयात गेला. त्याच्या स्मरणार्थ देशाच्या सहा राज्यात १९६२ मध्ये ग्रामीण भागात विकास होण्यासाठी मेहेर अली सेंटर सुरू करण्यात आली.. त्याचे उद्घाटन झाकीर हुसेन यांनी केले होते. खादी ग्रामोद्योग , नवनवीन सिंचन पद्धती, हॉस्पिटल, आदिवासी मुले मुलांसाठी हॉस्टेल अशा बऱ्याच योजना सुरू करण्यात आल्या. समृध्द ग्राम साठी रोल मॉडेल इथे तयार करण्यात येत होते.
आत सेंटर मध्ये शिरल्यावर समोरच एक नकाशा लावलेला आहे. त्यात सर्व प्रकल्पाची ठिकाणे दाखवण्यात आली आहेत.प्रवेशद्वाराजवळ मेहर अली यांची माहिती लिहिलेली आहे. पुढे गेल्यानंतर काचेच्या बाटल्या व माती यापासून बनविलेल्या इग्लू हाऊस सारख्या गुहा बनविलेल्या आहेत. प्लास्टिक बॉटल्स वापरून एक झाड बनवले आहे आणि त्याच्या जवळच झाडाचे ओंडके रचून अंड्याचा आकार बनवला आहे.हे सर्व विदेशी पर्यटकांनी त्यांच्या शिबिराला आल्यानंतर केले आहे.गेट वरील बोर्ड वर अजून दोन नावे होती मधु दंडवते आणि प्रमिला दंडवते ही नावे मात्र माझ्या परिचित.ही दोन व्यक्तिमत्वे म्हणजे समाजा साठी झोकून दिलेली, समाजसेवा हेच त्यांचे जीवन होते. मला मात्र त्यांना जवळून पाहण्याचा योग आला होता. मुलुंडच्या पुरंदरे हायस्कूलच्या स्नेहसंमेलनाला प्रमिला दंडवते आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या हस्ते मला बक्षीस मिळाले होते. त्यांचे भाषण अगदी जवळून एकले होते.
खादी ग्रामोद्योग या विभागात गेलो तिथे विविध तेलबियांपासून तेल काढण्याचे छोटे प्रकल्प होते. तीळ, भुईमूग, बदाम, राई , नारळ यांपासून तेल बनवितात.पांडे सोबत असल्याने त्यांची मुलांना घेऊन प्रश्नांची सरबत्ती चालली होती. तेलाची प्रोसेस मुलांना खूप आवडली .त्यांची प्रोसेस कशी चालते हे सविस्तर सांगितले.तेल रिफाइन कसे करतात. प्रत्येक तेलातील विविध जीवनसत्वे त्यांचे रोजच्या जीवनात होणारे उपयोग याबाबत मार्गदर्शन केले. विशेष बाब म्हणजे येथील आदिवासी जमाती मधील लोक हे सर्व काम करतात .बाजूलाच बेकरी होती. पाव तयार करण्याची पद्धत सांगितली. पावाची भट्टी दाखवली. त्याच्या तांत्रिक गोष्टी सांगितल्या. मुलांनी छान प्रश्न विचारले. पुढे मातीकाम विभाग होता. तिथे मातीच्या विविध वस्तू बनवितात. दिवाळीच्या पणत्या, माठ, कुंड्या, शोभेच्या वस्तू, मातीची भांडी अशा बऱ्याच वस्तू येथे बनवतात. मुलांना प्रत्यक्ष माती कालवून दाखवून , मातीच्या गोळ्याला आऱ्यावर ठेऊन त्याला छान फुलदाणीचा आकार कसा देतात ते दाखवले. मातीचे नमुने दाखवले.
पुढे बापू कुटी नावाचा विभाग आहे.या ठिकाणी झोपडीवजा घर आहे. वर्धा येथे जी बापू कुटी आहे त्याची प्रतिकृती इथे बनवली आहे. वर्धा येथील सेवाग्राम आश्रम मध्ये गांधीजी ज्या झोपडीत कार्यकर्त्यांना संबोधित करायचे त्या प्रकारची झोपडी बांधली आहे. इथे NSS, स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था यांची शिबिरे आयोजित केली जातात. वैचारिक देवाघेवाण इथे होत असते. बरेचशे परदेशी पर्यटक सुद्धा ईथे भेटी देतात.या परिसरात दोन शाळा आहेत एक उर्दू माध्यम आणि एक मराठी माध्यम .या परिसरात बरीचशी गावे वाडे वस्तीची आहेत. बऱ्याच प्रमाणात आदिवासी लोक राहतात. त्यामुळे शाळेत नापास मुलांचे प्रमाण खूप आहे.या मुलांसाठी सेंटरमध्ये vocational education सुरू केले आहे.
इथे वेगवेगळी शिबिरे , चर्चासत्र चालू असतात. आम्ही गेलो तेंव्हा एक साहसी शिबीर चालू होते.त्यात रोपणे झाडावर चढणे व उतरणे, ब्रीज क्रॉसिंग हे शिकवत होते. बाजूच्या एका चर्चासत्रात आम्ही सहभागी झालो. दूध आणि मस्य उद्योग प्रकल्प इथे सुरू आहेत.कमी जागेत शेतीचे जास्त उत्पन्न देणारे प्रकल्प इथे सुरू आहेत.सर्व परिसर पाहिल्यानंतर परत निघालो. वाटेत एक नर्सरी होती. तिथे खूप प्रकारची शोभेच्या झाडांची रोपे होती, वेगवेगळ्या प्रकारची फलझाडे तिथे होती.काही घरात कुंडीत असणारी छोटी रोपे होती. बोन्सायची बरीचशी रोपे कुंड्यांमध्ये लावलेली दिसली. जगदीश जोशी यांच्या काकांनी यात बरीच मदत केली. बरीचशी माहिती त्यांच्याकडून मिळाली. त्यांचे आभार मानून आम्ही परत तारा गावाकडे निघालो.पाच वाजून गेले होते. गेल्यावर मुले थोडावेळ क्रिकेट खेळली. तिथे जवळच एक निवासी शाळा होती तिथे जाऊन आलो. तिथल्या मुलांना भेटून आलो.. नंतर मुलांनी कॅम्प फायर साठी नाटक बसवायला सुरवात केली. भाकरीची ऑर्डर गावात एकाला दिली होती. त्यांना भेटून आलो. दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या जेवण आणि नाष्टा याबद्दल त्यांना सांगायचे होते कारण आम्हाला सकाळी लवकरच किल्ला बघायला जायचे होते. इकडे किचनमध्ये रात्रीच्या जेवणाची तयारी चालली होती. भाजी , भात आणि डाळ आम्ही सर्वांनी मिळून बनवली. स्वयंपाक घर फार नीटनेटके होते. त्यामुळे फायदा झाला. जेवल्यानंतर कॅम्प फायर प्रोग्राम झाला. मुलांनी वेगवेगळ्या गोष्टींचे सादरीकरण केले.साधारण अकरा वाजेपर्यंत कार्यक्रम चालला. सकाळी लवकरच उठून आवरून किल्ला बघायला जायचे होते त्यामुळे मुलांना झोपायला सांगितले.
दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता सर्वांना उठवले.पटकन आवरून तयार व्हायला सांगितले. सुका खाऊ सोबत घेतला होता. सकाळी आठच्या सुमारास आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचलो. सुरवातीला वण विभाग कर्नाळा अभयारण्य यांची केबिन आहे. त्याच्या बाजूलाच अजून एक केबिन आहे ती म्हणजे येथील कल्हे गावाची. कल्हे गाव बऱ्याच लोकांना परिचित आहे. त्याचे कारण म्हणजे जब्बार पटेल यांचा जैत रे जैत हा सिनेमा या भागात चित्रित केला होता.या सिनेमाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. यात दिगज कलाकारांनी काम केले होते. मोहन आगाशे, निळू फुले, स्मिता पाटील, सुलभा देशपांडे असे नामवंत कलाकार यात होते. आदिवासी जमाती मधील लोकांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा होता. सिनेमा पाहताना असे कुठेही वाटले नाही की पांढरपेशा लोकांनी यात काम केले आहे. खरोखर प्रत्येक बाबतीत म्हणजे कातकरी , ठाकर समाजासारखी हुबेहूब वेशभुषा, भाषा शैली,दैनदिन जीवन यांचे चित्रण केले होते.काहीही फरक जाणवत नाही. अगदी हुबेहूब बोलीभाषा हे तर मोठे वैशिष्ट.ते कलावंत भूमिका खरोखर जगले..कवी ना. धो. महानोर यांच्या कविता आणि अख्खे मंगेशकर कुटुंबीय यांच्या साथीने सिनेमातील सर्व्ह गाणी अजरामर झाली .सोबत कर्नाळा परिसर अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचला. ठाकर,कातकरी समाजाचे वर्णन करणाऱ्या गो. नी दांडेकर यांनी लिहलेल्या कादंबरीतील प्रसंगांचे हुबेहूब चित्रण ' आम्ही ठाकरं ठाकरं '' वाडी वरल्या वाटा' जांभूळ पिकल्या झाडाखाली, लींगोबाचा डोंगुर आभाळी गेला अशा गाण्यातून झाला.
तर असे हे कल्हे गाव. प्रथम वन विभागाच्या वतीने आम्हाला सूचना देण्यात आल्या. आमच्या कडील सर्व बॅगा व्यवस्थित तपासल्या. त्यातील प्लास्टिक सामानाची यादी केली. अभयारण्य प्रवेश फी घेण्यात आली. पाचशे रुपये रुपये अनामत रक्कम घेतली. परत आल्यावर सर्व प्लास्टिक सामान परत आणायचे आणि नंतर पाचशे रुपये परत मिळतील असे सांगितले. नंतर समोरचा फलक वाचायला सांगितला. त्यावर काही नावे लिहिली होती.त्या नावापुढे त्या व्यक्तीने केलेले चुकीचे काम लिहीले होते.त्यात माकडांना खायला घालने, जंगलात आग पेटवने , माकडांना दगड मारणे, मोठमोठ्याने गाणी लावणे, जंगलात जेवण करणे असे दखलपात्र गुन्हे लिहिले होते.त्यात दंडाची रक्कम आणि शिक्षा लिहिल्या होत्या. तारखे सकट दंडित लोकांची माहिती लिहिली होती. कमीत कमी दंड ५०० रुपये होता तो म्हणजे जंगलात प्लास्टिक फेकणे या गुन्ह्याला. बाजूच्या काउंटरवर कल्हे गावचे कर्मचारी बसले होते. त्यांनी गावाची प्रवेश फी घेतली आणि सांगितले त्याचे कार्यकर्ते जंगलात टेहळणी करीत आहेत. बाजूच्या बोर्डवर जे लिहिले आहे ते व्यवस्थित वाचा यातील कोणतीही गोष्ट करताना तुम्ही आढळलात तर त्यांचे कर्मचारी तुम्हाला पकडतील आणि पुढची कारवाई सुरू होईल.
हे नियम एकूण फार बरे वाटले. असा बडगा उगारण्यात आल्या शिवाय लोक सुधारत नाहीत हे नक्की.हे पाऊल उचलण्यात आले याचे कारण साधे सुधे नक्कीच नाही. कर्नाळा पक्षी अभयारण्य हे हा परिसर प्राणी, पक्षी, वनराई यांनी गजबजलेला आहे. शहरातील हौशी कलाकार इथे मौजमजा, पार्ट्या करायला येतात.या हौशानवश्याचा एक गोड गैरसमज असतो की या दऱ्या खोऱ्यात अडाणी लोक राहतात आणि जंगल संपत्ती ही त्यांच्या पुज्य पिताश्री यांची आहे. त्यामुळे जंगलात आग करून जेवण करणे, दारूच्या बाटल्या रिचवून त्या फोडण्याचे महान काम करणे. माकडांना त्रास देणे. किल्ल्यांच्या भिंतीवर आपल्या नावाची मोहोर उमटवणे.अमुक तमुक भागाचे मान्यवर या ठिकाणी येऊन तिथली धरती पावन केली.या सर्व प्रकाराना आळा घालण्यासाठी हे नियम केले असावेत.
फार वर्षापूर्वी आम्हीं एकदा कर्नाळा किल्ला बघायला आलो होतो. जवळ जवळ साठ सत्तर जणांचा गट होता. किल्ल्यावर पोहचल्यावर आम्ही नाष्टा करत होतो . नंतर पाणी कुठे आहे का ते पाहायला कर्नाळा सुळक्याच्या भोवती असलेल्या गुहेच्या दिशेने गेलो. वाटेतच एकजण पळत येताना दिसला. त्याच्या पाठी माशा लागल्या होत्या. आम्ही थोडे बाजूला झालो. सर्वकडे माशांचा थर दिसायला लागला.एका गुहेत शिरलो. तिथे अगोदरच तीनचार घाबरून शांत बसून राहिले होते. तेवढ्यात तिथे अजून एक जण घुसला. त्याच्या हातावर माश्या बसत होत्या तो जशी हालचाल करत होता तशा चावत होत्या.त्याला दम देऊन तिथून जायला सांगितले.मी स्वेटर घातला होता आणि जाड जीन्स घातली होती. डोक्यात टोपी होती.तोंड गुडघ्यात वाकवून शांत बसून राहिलो. दहा बारा माशा टोपी वर बसल्याची जाणीव होत होती.परंतु दहा मिनिटे शांत बसून राहिलो.नंतर माशा उठून गेल्या.गुहेतून हळूच बाहेर आलो. बाहेर एक मोठा टेबल पॉईंट आहे तिथे बरेच जण अंगावर काहीतरी घेऊन बसले होते. मला मात्र तिथे थांबून राहण्यात काही पॉईंट वाटला नाही त्यामुळे मी सरळ खाली धूम ठोकली.बऱ्याच जणांना माशा चावल्या. सर्वांच्या अगदी जिवावर बेतले होते. कोणत्यातरी ग्रुपने जेवण करण्यासाठी आग पेटवली होती. लाकडे ओली असल्याने धूर झाला होता. कर्नाळा सुळक्यावर मधाची पोळी खूप आहेत. त्या धुराने माशा चिडून उठल्या आणि लोकांच्या पाठी लागल्या. सर्वजण जीव मुठीत घेऊन किल्ल्याच्या पायथ्याशी पळत सुटले.
किल्ल्याच्या संदर्भात अशा या आठवणी.हा किल्ला मात्र मुबईला जातायेता आपल्याला अंगठा दाखवत असतो. माझ्यापर्यंत पोहचा असे नेहमीच आव्हान करत असतो. वन विभागाच्या नियमांचे पालन करूया असे ठरऊन आम्ही किल्ल्याकडे निघालो. तेवढ्यात तनुचा फोन आला.ती स्कूटरने पनवेल वरून कर्नाळा येथे पोहचली. तिच्या आईने स्कूटर वरून येऊ नको असे बजावले होते.पण तरीसुद्धा आली.ती लगेच गार्गीच्या आईसोबत जॉईन झाली. किल्ला चढायला सुरुवात केली की लगेच वनविभागाचे कार्यालय लागते. तिथे अभयारण्यातील काही पक्षी पिंजऱ्यात ठेवले आहेत.ज्या लोकांना परिसरात फिरून पक्षी बघायचे नसतील ते लोक पाहू शकतात. तिथे तनु , गार्गीची आई आणि मीहिरची आई बसल्या. आम्ही पुढे किल्ल्यावर निघालो. वाटेत किल्ल्याच्या माहितीचे फलक लावण्यात आले होते. समुद्र सपाटी पासून हजार फूट उंचावर असणारा हा किल्ला टेहळणी साठी वापरला जायचा. किल्ल्यावरून सांक्षी गड, माणिकगड, इर्षाळगड, मलंगगड, माथेरानचे डोंगर दिसतात. पलीकडील बाजूला रसायनी एमआयडीसी भाग दिसतो.एका बाजूस मुबईच्या परिसरातील उत्तूंग इमारती दिसतात. वाढत्या शहरीकरणामुळे ह किल्ला किती दिवस तग धरून राहील याची शाश्वती नाही. कदाचित याची अवस्था कात्रज घाट परिसरा सारखी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आताच ही वनराई बघुन घ्या.वाटेत झाडावर बोर्ड लावले होते. त्यावर त्या त्या झाडाची माहिती लिहिली होती.काही ठिकाणी येथे आढळणाऱ्या पक्षांचे फोटो लावले होते.ते सर्व बघत आम्ही वर चाललो होतो.प्रथम बराच चढ लागला. नंतर आम्ही एका सपाटीवर पोहचलो. तिथून पलीकडे आपटा परिसर दिसतो. तिथून येणारी वाट दिसते. वाटेत एक समाधान वाटले की कुठेही प्लास्टिक पिशव्या पडलेल्या नव्हत्या, कुरकुरे , लेज ची पाकिटे पडलेली नव्हती. तिथून आम्ही उजवीकडे अंगठ्या सारख्या दिसणाऱ्या सुळक्याकडे निघालो. वाटेत एक मंदिर लागले. करणाई देवीचे मंदिर आहे. काळा पाषाण दगडाची घडवलेली मुर्ती आत आहे.यात आजूबाजूला बऱ्याच मुर्ती दिसतात. देवीच्या मूर्ती मध्ये चार हात व प्रत्येक हातात एक शस्त्र आहे.एक छोटेखानी मंदिर आहे. लगेच पुढे गेल्यावर बालेकिल्ला असतो तशी ठेवणं असलेली चढण लागली. तिथे छान पायऱ्या आहेत. रेलिंग लावलेल्या असल्याने त्यांना धरून वर चढता येते. बालेकिल्ल्याला जसे प्रवेशद्वार असते तसे येथेही आहे.प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उंच पायऱ्या लागतात. नंतर किल्ल्याचा मुख्य भाग सुरू होतो. बाजूने तटबंदी सुरू होताना दिसते. एक मोठा पडका वाडा दिसला. वाड्यातील विविध भाग दिसत होते. समोरच एक शिवमंदिर आहे. किल्ल्यात पूर्वी बऱ्यापैकी वस्ती असावी .सर्वांनी तिथे ग्रुप फोटो काढले. आसपास माशांचा आवाज येत होता.मग आम्ही ठरवले फक्त चार जण जाऊन सुळक्याच्या परिसर पाहून यायचा.जर माशांनी पाठलाग केला तर चार जण छोट्याशा वाटेने पळू शकतात पण सर्वांना एकदम शक्य होणार नाही.मग सर्वांनी जाऊन परिसर पाहिला.. सर्वात मोठा आश्चर्याचा सुखद धक्का बसला तिथे एकही प्लास्टिक वा काचेची बाटली पडलेली नव्हती, एकही रॅपर नव्हते. याचे सर्व श्रेय कल्ल्हे गावाला जाते. त्यांच्या आणि वन विभागाच्या नियमांचे काटेकोर पालन लोक भीतीपोटी करत आहेत. मला जुना लोकांनी गलिच्छ केलेला कर्नाळा आठवला आणि हे नवीन रूप बघून खूप बरे वाटले. सुळक्याच्या पायथ्याशी जी तळी कोरलेली आहेत त्यावर तारेचे जाळे टाकलेले आहे. त्यामुळे आतील पाणी कचरा विरहित होते. साधारण पस्तीस फुटाचा सुळका आहे. यावरून बहुतेक पूर्वी टेहळणी करत असावेत. बाजूचे बुरुज चांगल्या स्थितीत आहेत. पुढे एक टेकडीवर दारूगोळा कोठार दिसते. इमारत पडकी आहे. मधाची पोळी सुळक्यावर खूप आहेत. त्यांच्यासाठी सर्वात चांगली जागा आहे. आसपासच्या जंगलातील समृध्द वनराई आणि शिवाय सुरक्षित जागा त्यामुळे बरीच पोळी दिसतात. एका बाजूस छान टेबल पॉईंट आहे.खाली हिरव्या गार जंगलातून जाणारा डांबरी रस्ता उठून दिसतो. समोर पाताळगंगा नदीचे पात्र पार आपटा इथ पासून ते पार उरण पर्यन्त दिसते. ट्रेन चे रुळ नागमोडी वळणे घेत खारपाडा ओलांडून पेण कडे जाताना दिसतात. धरमतरची खाडी आणि पाताळगंगा पुढे समुद्राला मिळतात. खाली वाहनाची येजा होताना दिसते. तिथे दोन तीन ठिकाणी फारशी भाषेमध्ये आणि मराठी भाषेमध्ये शिलालेख आढळतात.हा किल्ला यादवकालीन असावा. यावर आदिलशहा, मराठे, मुघल, ब्रिटिश या सर्वांनी राज्य केले.याचे वर्णन शिवचरित्रात आढळते. वासुदेव बळवंत फडके यांचे शिरढोण हे गाव पलीकडेच आहे.हे खरे मूळचे केळशी गावचे परंतु पेशवाईत फडके घराण्याला इथली किल्लेदारी मिळाली. ब्रिटिशांविरुद्ध इथे वासुदेव बळवंत फडके यांचे युद्ध झाले होते. समुद्रमार्गे येणारी जहाजे व त्यातून होणारी मालाची नेआण , त्यांची होणारी वाहतूक ही पूर्वीपासून बोरघाट, नाणेघाट इथून होत असे. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला महत्वाचा होता. सर्वांनी परिसर पाहिला.
मग आम्ही सर्वजण परतीच्या वाटेवर निघालो. उतरताना मुले मात्र सुसाट वेगाने खाली गेली. उतरताना मुबईचा मुलांचा मोठा ग्रुप आला होता. नियोजनाचा अभाव जाणवत होता. मुले नुसती पुढे पळत होती त्यांना पुढे मार्गदर्शन करायला कोणही नव्हते. मुलांचा वयोगट पण दुसरी तिसरी असाच होता. बॉटल तर संपलेल्या दिसत होत्या. बारा वाजले होते त्यामुळे सूर्य डोक्यावर होता. कडक ऊन होते. त्यांचे आयोजक आणि पाहिला मुलगा यात अर्धा किलोमीटर अंतर असावे. जवळ जवळ शंभर मुले तरी असावीत. आम्हाला उतरताना सर्व ग्रुप दिसत होता. त्यांना वाट देत आम्ही खाली उतरलो. तनु वगैरे खालीच होते. त्यांना घेऊन आम्ही वनविभागाच्या केबिन पर्यन्त आलो. सर्व बॅगा दाखवल्या जेवढे प्लास्टिक आणले होते ते दाखवले.मग त्यांनी अनामत रक्कम परत मिळाली.मग तारा गावात परत आलो. आश्रमशाळेत गेल्यावर जेवण केले. दुपारी दोन वाजून गेले होते. मुलांनी आपापली डायरी लिहिली.तनु सुद्धा आली होती. तिच्या अभ्यासाबद्दल , कॉलेज विषयी बऱ्याच गप्पा मारल्या.सर्व ग्रुप तसा नवीन होता पण सगळ्यांशी तिची ओळख मात्र झाली.दोन दिवसात बरेच उपक्रम राबवले होते. गावातील जगदीश जोशी कुटुंबाने बरीच मदत केली. त्यांच्या मदतीशिवाय कॅम्प होऊ शकला नसता. त्यांना घरी जाऊन भेटून आलो. नंतर सर्व आवरून बॅगा व्यवस्थित भरून तारा बस स्टॉपवर आलो. उन्हाळी सुट्टी लागल्याने बऱ्याच बसेस पनवेल वरून भरून येत होत्या. त्यात आम्ही पंचवीस जण होतो. त्यामुळे एकही बस थांबत नव्हती..
जवळ जवळ अर्धा तास आमचा असाच गेला.मग एक आंब्याचा ट्रक ४०७ वाशी मार्केटमध्ये जाऊन परत येत होता. त्याला हात केला.त्याने बाजूला उभा केला.तो रोह्यावरून सकाळी आला होता. काही जण पुढे बसले. आम्ही बाकी सर्वजण ट्रक मध्ये चढलो. ट्रक मोठा असल्याने सर्वजण व्यवस्थित ऐसपैस बसून, गाणी म्हणत बसलो.पेन ,वडखळ कधी आले गेले समजले नाही. आम्ही तासाभरात आंबेघर फाट्यावर पोहचलो. नंतर नागोठण्यावरून रिक्षा बोलावल्या.मग सर्वजण पाच पर्यन्त कॉलनीत पोहचलो.
Yorumlar