top of page

इंदापूर मुठवली शिबीर २००८….

Updated: Dec 26, 2022२००८ च्या मार्च महिन्यातली गोष्ट. अंजली सावंतचा ऑफिसमध्ये फोन आला.तिने नुकतेच एका ठिकाणी भेट दिली होती. तिला त्याबद्दल सांगायचे होते. तिला एखादी गोष्ट मुलांच्या दृष्टीकोनातून भावली की लगेच माझ्याशी शेअर करायची. तिच्या भाचीने म्हणजे सायली दळवींने तिला इंदापूर येथील आकार पॉट आर्ट हे ठिकाण दाखवले होते.ते पाहून तिला वाटले हे मुलांसाठी उपयोगी आहे.मग तिने मला सांगितले एकदा इंदापूर येथे जाऊन ये. मुक्तांगण ग्रुप साठी एखादा उपक्रम तिथे घेता येईल. तिथली बरीच माहिती तिने दिली.मग एक दिवस जाऊन यायचे ठरले.

एक दिवस वेळ काढून इंदापूर येथे गेलो.स्टॅण्डच्या अगदी मागच्या बाजूला आकार पॉट आर्ट गॅलरी आहे. सोबत विनोद सावंत होते.आत गेल्यावर आमची त्यांनी विचारपूस केली. गॅलरीचे मालक राजेश कुलकर्णी भेटले. त्यांनी प्रथम सर्व गॅलरी बघायला सांगितली नंतर त्यांनी स्वतः वर्कशॉप दाखवला. थोड्या वेळाने ऑफिसमध्ये बोलत बसलो.

शिबीर नियोजन या विषयावर बोलत बसलो. मुलांना तुमचे उपक्रम दाखवायची इच्छा बोलून दाखवली. त्यांनी सांगितले इथे एका दिवसासाठी प्रत्येक मुलाकडून १५० रुपये फी आकारली जाते. तीही १५ वर्षा खालील मुलांकडून.वरील सर्व मुलांची फी ज्यास्त आहे. त्यात त्यांनी सांगितले मुलांना ते स्वतः दिवसभर शिकवतील. माती देऊन प्रत्यक्ष मुलांना कलाकृती करायला संधी मिळेल.मी त्यांना सांगितले जरी ही मुले कॉलनीतील असली तरी आमचे शिबीर आम्ही ग्रामीण भागात घेतो. गावात बऱ्यापैकी सोय असलेल्या घरात राहतो. जेवण आमचे आम्हीच तयार करतो त्यामुळे आमच्या शिबिराचे बजेट अगदी सर्व प्रवास खर्च धरून चारशे रुपयाच्या वर नसते. त्यामुळे आम्ही तुमची फक्त गॅलरी बघायला येऊ असे सांगितले.मग कुलकर्णी यांनी बरेच प्रश्न विचारले. कधीपासून हे उपक्रम करता वगैरे. त्याची फी किती आकारता. अशा गप्पा झाल्यानंतर त्यांनी सांगितले तुम्ही या मुलांना घेऊन मग आपण पाहूया असे म्हणाले.

मग तनुचे बाबा आणि मी परत निघालो.मग डोक्यात चक्र सुरू झाले. आता जवळपास राहण्याचे ठिकाण पाहूया.मग आम्ही तनुच्या आत्याकडे गेलो. तिथे तिची आत्येबहिन सायली भेटली. तिच्याशी गप्पा मारल्या.मग त्यांनी शिबिरासाठी त्यांचे गाव मुठवली सुचवले. त्यांचा बंगला तिथे आहे. त्यात राहा असे सुचवले.मग गावाच्या आसपास काय काय उपक्रम करण्यासारखे आहे काय त्याबद्दल चर्चा केली.मग आम्ही कॉलनीत परत आलो.

शिबिराला कार्यकर्त्ये कोण कोण येणार आहेत याची माहिती घेतली. पांडे फॅमिली, आम्ही सहकुटुंब आणि अभिजित येईल असे ठरले. रत्नाकर ठाकूर सुध्दा यायला तयार झाला. फक्त तो डायरेक्ट इंदापूर येथे येणार होता .काही कॉलेजात शिकत असलेली मुले जी नेहमी शिबिराला यायची अशा पैकी कोणी येत आहे काय त्याबद्दल विचारणा केली. त्यावर्षी विक्रांत KEM मेडिकल कॉलेज मध्ये शिकत होता. तनु नवीन पनवेल मध्ये बोयो टेक्नॉलॉजी मध्ये ग्रॅज्युऐशन करत होती. कल्पना अकरावीत होती.हे सर्वजण कॅम्पला येणार होते. विक्रांत कॉलेजमधून डायरेक्ट शिबिराच्या ठिकाणी येणारं होतI सौमित्र जोशी, अथर्व पाटील, मृणाल महाजन, सिध्दी जोशी, जीवन भारंबे, फाल्गुनी बोरीकर हा गार्गी ,अश्विनी जाधव, आरोही जोशी, सायली कदम, गौरी पांडे, खराडे, निखील शिंदे, कल्पना भारंबे ,तन्मय ढगे, मंदार पाटील,मृणाल धकाते, विराज गावडे, परज पाध्ये , प्रथमेश रोडे, माळवदे, वरद खराडे,यश ताडकर, मानव घोडींदे, बारी, रोहित घोरपडे, निरज जाधव, ओंकार घागरे, उन्मेष शेट्टी, हर्ष कुंवर, ओंकार काळवीट, सम्हिहान लोहित, चैत्राली येरुडकर, प्रणित घोलप अशा बऱ्याच जणांची नावे आली होती.२५ ते ३० जणांचा गट तयार झाला होता.

मुलांना शिबिराला लागणाऱ्या सर्व वस्तूंची यादी करायला सांगितली. रविवारचा कार्यक्रमात एक उपक्रम घेतला त्यात गट पाडून प्रत्येकाला शिबिराचे नियोजन करायला सांगितले. त्यामध्ये जेवण व्यवस्था व प्रवास खर्च, घेण्यात येणारे उपक्रम यासंबधी सर्व गटांना लिहायला सांगितले. अगदी किराणा सामान यादी सुध्दा तयार करायला सांगितली.तीस जणांना लागणारे पीठ, चहासाठी दूध, भाज्या या सर्वाबद्दल घरी पालकांसोबत चर्चा करण्यास सांगितले. गार्गीच्या वयोगटातील मुले पहिल्यांदाच कुठेतरी पालकांशिवाय मुक्कामी शिबिराला येणार होती त्यामुळे त्यांच्या काही सूचना होत्या. परज पाध्ये हा खोडकर जमातीतला. त्यामुळे असे पालक त्याची काळजी करतात कारण अशांना घरी सांभाळणे किती कठीण असते याची त्यांना पूर्ण जाणीव असते. मला त्याच्या आईने सांगितले त्याला झोपताना टेडी बेअर लागतो, त्यांना सांगितले पाठवून द्या त्याच्या सोबत. मी आणि पांडे सहकुटुंब शिबिराला असणार होतो त्यामुळे मुलांची जबाबदारी घेता आली.चार कार्यकर्त्ये असले आणि त्यात जर पांडे यांच्या सारखा व्यक्ती सोबत असेल तर जबाबदारी घेता येते. मुलांना चांगल्या पद्धतीने सांभाळून घेणे आणि मुलांनीही त्याच्याशी सहमत असणे ही गोष्ट तशी सोपी नाही.माजी मुलगी गार्गी नेहमी शिबिराच्या अगोदर विचारणार पांडे काका आहेत काय ? ज्यावेळी मुलांकडून असा प्रतिसाद येतो त्यावेळी आपण त्यांच्या साठी योग्य आहोत हे सिद्ध होते. अशावेळी तुम्ही सांगितलेल्या सर्व सूचना पाळण्याची त्यांची तयारी असते. माझा मुलगा सौजन्य त्यावेळी ज्युनियर केजी मध्ये होता. पहिल्यांदाच मुलांसोबत शिबीर बघायला मिळणार म्हणून खूप खुश होता. सर्व मुले ओळखायची त्यामुळे त्याची धमाल चालायची.

मुलांनी आपल्या ग्रुप नुसार माझ्याकडे प्रत्येकाचे रिपोर्ट दिले. ओंकार घागरे याने सर्वात चांगले लिहिले होते. त्यात त्याने सर्व शिबीर आयोजित करण्याचा येणारा एकूण खर्च लिहिला होता. उपक्रमाचे नियोजन फार सुंदर केले होते. सर्वांना त्याचा रिपोर्ट दाखवला. हल्लीच्या काळात शहरात जागोजागी शिबिराचे पेव फुटले आहे आणि पालकांना व्यक्तिमत्व विकासाच्या नावाखाली अक्षरशः लुटत आहेत. परंतु त्यांची पण चूक नाही कारण हे लोक जाहिरात एव्हढी जबरदस्त करतात की त्याची पालकांना भुरळ पडते.तसे पाहिले तर दोन दिवसाच्या शिबिरात काही अमुलाग्र बदल घडवून आणू शकतो ही गोष्ट तशी शंकास्पद आहे. एखाद्या अनोळखी गटाला घेऊन शिबीर करणे आणि त्याच्याकडून खूप काही गोष्टी करून घेणे अवघड आहे.दोन दिवसात मुलांची खरतर ओळख सुध्दा नीट होऊ शकत नाही. अगदी काटेकोर शिस्तबद्ध पद्धतीने घेतलेल्या शिबिरात फारतर नवीन ओळखी, तुमच्याकडे इतरांच्या मानाने काय कमी ज्यास्त आहे याची प्रचिती होऊ शकते. परंतु असणारा गट कसा असेल यावर ते अवलंबून राहते. त्यामुळे आर्थिक बाबी लक्षात घेऊनच शहरात आयोजन करतात. पालकांच्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून आखणी करण्यात येते.जेवण, मेडिकल सुविधा, राहण्याची सुविधा, रॉक चढणे उतरणे, फोटोसेशन , टोकण गिफ्ट अशा कितीतरी गोष्टींचा आधार घेऊन भक्कम नियोजन करतात. पालक त्यासाठी भरपूर पैसे द्यायला तयार असतात. हिमाचल ट्रेक साठी तर २५ हजारापर्यंत रक्कम घेतात आणि खर्च साधारण ७ हजारापर्यंत येतो.

मुलांना याबाबत विचार करून शिबिरांची निवड कशी करावी,काय त्यात असावे याचे ज्ञान मिळावे यासाठी हा उपक्रम राबवला होता. मुलांना शिबिराचे तीन दिवसाचे वेळापत्रक दिले. योग्य ती तयारी करून त्या दिवशी सकाळी सात वाजता शॉपिंग सेंटर बस स्टॉपवर यायला सांगितले.

शिबिराच्या दिवशी सकाळी सर्वजण बस स्टॉपवर जमा झालो. आम्ही सहकुटुंब होतो, आमच्या बिल्डिंग परिसरातील बरीच मुले होती त्यामुळे सर्वजण एकत्र निघालो होतो. मेघा पांडे, राजेंद्र पांडे, श्रीकांत रोडे हे कार्यकर्त्ये स्टॉपवर अगोदरच आले होते . सातच्या नागोठणे मार्केटिंग बस मधून स्टँड वर गेलो. नेहमीप्रमाणे मुलांची वडापाव फर्माईश पूर्ण केली. पांडे आणि मी दोघांनी जाऊन वडापाव साई हॉटेल मधून आणले.महाडकडे जाणाऱ्या गाडीची चौकशी केली आठ वाजता गाडी येईल असे सांगितले. सव्वा आठ वाजता गाडी आली. मुंबईहून गाडी आली होती परंतु माणगाव पर्यन्त असल्याने गर्दी कमी होती . सुट्ट्या नुकत्याच लागल्या असल्याने विशेष गर्दी नव्हती. साधारण तासाभरात आम्ही इंदापूर येथे पोहचलो. तिथून रस्त्यावर न जाता मधल्या गल्लीतून सरळ गॅलरीत गेलो. रत्नाकर ठाकूर आमच्या पाठोपाठ पोहचला होता.तो आला की कॅमेरा आला आणि एक काम कमी झाले. शिबिरात जेवढे अॅक्टिव कार्यकर्त्ये जास्त तेवढे फायद्याचे असते. एकतर खूपशा अॅक्टीविटी आपोआप होतात. मुलांना पण चांगला स्पेस मिळतो. जबाबदारी विभागली जाते. मुलांच्या बाबतीत फायद्यात गोष्ट असते.आम्ही तिथे पोहचलो तेंव्हा त्यांच्या एका माणसाने आत तसा निरोप दिला.

राजेश कुलकर्णी बाहेर आले. सर्व मुलांना त्यांनी आत त्यांच्या घराच्या हॉल मध्ये बोलावले. परंतु आम्ही गॅलरीच्या बाहेरील बाजूस बसू असे सांगितले. मुलांना चपला, बूट आणि बॅगा व्यवस्थित रांगेत ठेवा अशा सूचना केल्या. प्रत्येक जण डायरी,पेन घेऊन आला. कुलकर्णी यांना भेटून सांगितले की आपण प्रथम मुलांना सर्व भाग फिरून यायला सांगुया, नंतर त्यावर प्रश्न काढून मग सर्व उपक्रमाची माहिती द्या. फक्त माहिती दिली तर त्याचा परिणाम फारसा होणार नाही.जर मुलांना विचार करायला लावले तर मात्र उपक्रम इफेक्टिव होईल. त्यांना आमची कल्पना आवडली.मग तुम्हीच ती सूचना मुलांना द्यावी असे सुचवले.मग कुलकर्णी मुलांकडे बघुन म्हणाले, “ सर्वजण गॅलरी आणि वर्कशॉप बघुन या, मग आपण चर्चा करुया.मग मुलांचे गट पाडले.प्रत्येक गटाला काय काय पाहिले आणि पडलेले प्रश्न लिहून काढायला सांगितले.

गॅलरी मध्ये सर्व मातीच्या कलाकृती छानपैकी काचेच्या कपाटात ठेवल्या होत्या. एका मोठ्या फलकावर लिहिले होते

' आकार' भाजलेल्या मातीचे ' आकार' , स्थानिक तरुणांच्या कलाकृतीचे ' आकार ', कलाकारांच्या व्यक्तिमत्वाला मिळत असणारे ' आकार ', नवीन कल्पना नवीन संकल्पना.

या ओळी गॅलरीच्या वेगळ्या ओळखीचे कारण बनतात. आतील प्रत्येक वस्तू काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते. एका कपाटात मातीच्या मेंढ्यांच्या समूह दिसला, झोपाळा आणि त्यात वाचत बसलेला माणूस, घराच्या गॅलरीत उभी राहिलेली माणसे, बाजूलाच गणपतीच्या वेगवेगळी वाद्ये वाजवत असलेल्या लहान मुर्ती होत्या. भिंतीवर मातीच्या पानावरील घड्याळे दिसत होती.एका ठिकाणी नावांच्या पाट्या वेगवेगळ्या आकारात कोरल्या होत्या. एका ठिकाणी ग्रामीण भागातील जीवन दाखवले होते त्यात दळण दळताना, जेवण करताना, चपाती लाटताना, पाट्यावर चटणी करताना,सूप घेवून पाखडताना, भाजीचे टोपले घेतलेल्या स्त्रिया दाखवल्या होत्या. त्यांच्या फार सुंदर मूर्ती होत्या.लहान मुलाचे रांगतना, झोपाळ्यावर बसलेले, हातात खेळणी घेतलेल्या मूर्तींचा विविध कला दाखवणारा संग्रह दिसला. चहाचे नक्षीदार कप,वॉटरबॅग अशी की ज्यावर गोणपाटाचा ठसा उमटवला होता ,पेनचे स्टँड तर अप्रतिम हंटर शूज सारखे अशा कितीतरी गोष्टी तिथे होत्या. प्रत्येक गोष्टीत नावीन्य. काही मात्र कळण्यापलीकडल्या होत्या. एका ठिकाणी एक मोठा काळा दगड ठेवला होता त्याला चार कामगार पहारीने ढकलत असताना दाखवले होते. कुलकर्णी यांना त्याबद्दल विचारणा केली असता त्यांनी मला सांगितले .पण मुलांनी मात्र तिथे प्रश्न विचारायचे नव्हते. नंतर मला एक मोठी ढाल ,कट्यार, कडे अशी रचना असलेले शिल्प दिसले.त्याचाही अर्थ मला कुळकर्णी यांनी सांगितला. नंतर वर्कशॉप बघितला .सर्व मुले गॅलरी आणि वर्कशॉप पाहून बाहेर व्हरांड्यात आली. त्यांना प्रत्येकाला आतमध्ये जे काही पाहिले त्याबद्दल डायरी मध्ये लिहायला सांगितले. काही प्रश्न काढायला सूचना दिल्या.

दरम्यान कुलकर्णी यांनी मुलांसाठी बसायला टाकले.मुले आपापल्या कामात व्यस्त झाली. दरम्यान कुलकर्णी यांनी मला ऑफिसात बोलावले. त्यांच्या बाजूला एक मुलगी आणि तिची आई उभी होती. यांना ओळखता का? असे विचारले.त्या दोघींना कधी पाहिले असे वाटत नव्हते.मग त्यांनी स्वतः हुन ओळख सांगितली. आमच्या कंपनीत डेप्युटी प्रेसिडेंट म्हणून काम करत असलेल्या संगवार साहेबांची ती मुलगी होती. सोबत तिची आई होती. साहेबांना ओळखत होतो पण त्यांना कॉलनीत कधी कुटुंबीयांना पाहिले नव्हते.ते पुण्यात रहात असल्याने बघण्यात नव्हते.त्या दोघी महिनाभर तिथे मुक्काम करून होत्या. दिवसाला आठशे रुपये मोजून त्या तिथे रहात होत्या. बॅचलर ऑफ आर्किटेक्चर या कोर्सच्या शेवटच्या वर्षाच्या प्रोजेक्ट्स साठी त्या दोघी महिनाभर तिथे मुक्काम करून होत्या.यावरून मला एक जाणवले की मुंबई पुण्यातील लोक ज्ञान मिळावे यासाठी किती धडपड करतात. आपल्या वीस पंचवीस किलोमीटरवर असलेल्या लहान सहान गोष्टींची किंमत त्यांना चांगली कळते पण आपल्याला त्याचा थांगपत्ता नसतो.

मुलांचा प्रश्न उत्तरांचा तास सुरू झाला. प्रत्येक ग्रुपला वेगवेगळ्या रांगेत बसवले. आळीपाळीने सर्वांनी प्रश्न विचारायचे असे सांगितले. पहिलाच प्रश्न विचारला प्रथमेश रोडेने,” तुम्ही माती कोणती वापरता”. कुलकर्णी यांनी सांगितले की यात खूप प्रकार आहेत , प्रामुख्याने व्हायटींग पावडर, सिलिका, फायर क्ले, टाल्क, फेलस्पार, जांभा मृदा, लोकल क्ले, बनारस क्ले, राख, लाकडाचा भुसा, थाने क्ले या जाती आहेत.ही सर्व माती गुजरात, राजस्थान , बनारस आणि कोकणातून आणली जाते. त्यावर ओंकार काळवीट याने विचारले,” कुठे ही माती मिळते”. त्यांनी सांगितले ही माती तळ्यात, खाणीत, नदी मधून, डोंगरातून मिळते.आरोही जोशी हिने विचारले,” क्ले आणि इतर माती यातील फरक काय आहे”. यावर ते म्हणाले,” दोन्ही मध्ये साइज फरक आहे ,२ मायक्रान च्या खाली क्ले म्हणतात.” नंतर गौरी पांडे हीचा प्रश्न होता बॉल मिल आणि पब मिल याबद्दल .बॉल मिल मध्ये पाणी आणि माती टाकून फिरवतात त्यात चीनिमातीचे गोल दगड असतात .ते मिश्रण फिरवल्यावर माती त्या दगडावर आपटून बारीक होते.पब मिल मध्ये एक कॉम्प्रेसर असतो ज्यात एका मोठ्या स्क्रूने माती फिरवली जाते आणि बारीक केली जाते. रोहित घोरपडे याने दोन छान प्रश्न विचारले. त्यावर राजेश कुलकर्णी खूप खुश झाले.त्याने विचारले एका निळ्या चीनिमातीच्या भांड्याविषयी जे इतरांपेक्षा वेगळे होते आणि ते इथे बनलेले नव्हते. त्यांनी सांगितले ते भांडे कोराडी खापरखेडा इथे बनले होते. दुसरा प्रश्न होता भांडी कशी भाजतात. त्यावर त्यांनी इलेक्ट्रिक भट्टी आणि कोळसा भट्टी याविषयी सांगितले.इलेक्ट्रिक भट्टी ही ऑटोमॅटिक प्रकारात मोडते.पण कोळसा भट्टी हे मात्र खूप स्किलचे काम असते.८०० डिग्री पर्यन्त तापमान करायला लागते. मातीच्या बदललेल्या रंगानुसार काही वेळा भाजले आहे काय ये ओळखावे लागते. भांड्यांचे भाजणे या प्रकारात खूप पारंगत लोक लागतात कारण खूप कष्टाने तयार केलेले भांडे जात नीट भाजले नाही तर सर्व मेहनत वाया जाते. खरंतर सर्व गोष्टींना तेवढेच महत्व आहे.माती व्यवस्थित बारीक करून मळली पाहिजे , तिला आकार नीट दिला पाहिजे अशी सर्वच कामे महत्वाची आणि कौशल्याची आहेत.सम्हिहनचे प्रश्न म्हणजे जरा थोडे हटके.त्याने विचारले एका प्रकारच्या विशिष्ट मातीची म्हणजे टेराकोटा प्रकारची भांडी बनवताना त्यावर जो काचेसारखा चकचकीतपणा असतो तो कसा येतो.त्यावर असे सांगितले की या प्रकारची भांडी बनवल्यावर मग काच बनविताना जे घटक वापरतात त्याची पेस्ट घेऊन भांड्यावर लावतात किंवा त्या पेस्ट मध्ये त्या भांड्यांना बुडवितात.त्याने लगेच पोट प्रश्न केला की ती भांडी त्यावेळी तुटत का नाहीत. राजेश कुलकर्णी म्हणाले,”ती भांडी ८०० डिग्री तापमान होईपर्यंत भाजतात,नंतर त्यावर त्याची फवारणी करतात.या उत्तराने सम्हीहन नेहमीप्रमाणे मिश्किल हसला. गार्गी आणि सौजन्य या दोघांनीही प्रश्न विचारले.गार्गीने विचारले ,”या कामात तुम्हाला कोण मदत करते. राजेश कुलकर्णी यांनी मग त्यांच्या सहकार्यांची ओळख सर्वांना करून दिली. सौजन्य याने कप कसा बनवला आणि त्याला कान कसा चिकटवला याबद्दल विचारले. त्यालाही त्यांनी उत्तर दिले. .मुलांचे प्रश्न कुळकर्णी यांना खूप आवडले.प्रत्येकाने असे खोदून प्रश्न विचारले की रॉ मेटरियल पासून ते फायनल प्रोडक्ट पर्यन्तचा सर्व प्रवास त्यांनी सांगितला. माळवदे, मृणाल धकाते यांनी सुध्दा काही प्रश्न विचारले. जीवनने एक सुंदर प्रश्न विचारला. एका मूर्तीवर वेगवेगळे रंग कसे दिसतात ?. त्यावर अशी माहिती दिली की या अशा भांड्यांच्या प्रकारात वेगवेगळ्या प्रकारची माती वापरतात भाजल्यानंतर त्यांचे रंग बदलतात त्यानंतर हव्या त्या डीझाईन आकारात त्याला खरवडून काढल्यावर मग वेगवेगळे रंग दिसतात. गॅलरीत असलेली विविध नावाच्या पाट्या आणि गणपती मूर्ती याबद्दल काही प्रश्न विचारले. त्यांनी मग प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती कशा बनवतात आणि अक्षरे कागदावर काढून मातीच्या चपाती सारख्या बनवलेल्या भागावर ठेवून त्या विशिष्ट आकारात कापतात याची माहिती दिली.मुलांनी दोन महत्त्वाचे प्रश्न विचारले ते म्हणजे सर्वाचे लक्ष वेधून घेणाऱ्या त्या दोन प्रतिकृती बद्दल एक म्हणजे दगड आणि तो ढकलत असलेले कामगार,दुसरे शिल्प ज्यात ढाल तलवार आणि कट्यार दाखवली आहे यांचा अर्थ काय आणि त्या कशासाठी बनवल्या आहेत. कुळकर्णी यांनी सांगितले की ही दोन्ही शिल्प मुंबईतील दोन कंपनीतील ऑफीसमध्ये लावण्यासाठी बनवण्यात आली आहेत. यात ढाल तलवार हे शिल्प शीख धर्माच्या निगडित आहे आणि दुसरे शिल्प हे कामगार व त्याचे युक्तीबल दर्शवते. यांची किंमत पंधरा हजार रुपयांपर्यंत होती. यांची ऑर्डर त्यांच्या मालकांनी स्वतः तिथे येऊन दिली होती अशी माहिती दिली. प्रश्न उत्तर यामध्ये

तासभर तरी गेला.मग मुलांना चहा नाष्टा कुळकर्णी यांनी दिला.नंतर प्रत्यक्ष मूर्ती, भांडी कशी बनवतात याचा डेमो करून दाखवण्यासाठी सर्वांना वर्कशॉप मध्ये बोलावले. इलेक्ट्रिक मोटर वर चालणाऱ्या कुंभाराच्या चाकावर मातीची भांडी बनवायला घेतली.ते म्हणाले,” लोक असे नेहमी म्हणतात इलेक्ट्रिक वर चालणारे चाक हे कुंभाराच्या चाकाला वरचढ होऊ शकत नाही पण मग त्या चाकाची सर इलेक्ट्रिक चाकाला येत नसेल तर अशे म्हणणारे लोकसुद्धा बैल गाडीतून प्रवास का करत नाहीत , पेट्रोल वर चालणाऱ्या वाहनात बसून प्रवास का करतात?. अशा छान गप्पा मारत त्यांचे भांड्यांना आकार द्यायचे काम चालू होते. छोट्या छोट्या आकाराच्या तुकड्यांनी भांड्यावर रेषा, विविध आकार

देत होते. चाकावर मातीचे भांडे तयार होताना रेषा वर खाली होत होत्या तशा मुलांच्या प्रतिक्रिया उमटत होत्या. परज, ओंकार काळवीट यांसारखी मुले पटकन रियाक्ट करत होती. मोठे बनवा, छोटे बनवा,हा आकार द्या,तो आकार द्या आणि सोबत राजेंद्र पांडे यांची त्यांच्यासोबत जुगलबंदी चालली होती. छोटा माठ,कप,पेन स्टँड, सुरई अशा बऱ्याच वस्तू त्यांनी बनवून दाखवल्या. विशेष म्हणजे हे काम चालू असताना त्यांचा मुलांशी सवांद चालूच होता.मग त्यांनी त्यांच्या राजा दादा याला बोलावले त्याने मग माणूस आणि गणपती तयार करून दाखवला. मातीचे छोटे गोळे बनवून त्या प्रत्येक गोळ्या पासून वेगवेगळे अवयव तयार करून जोडले.

यात जवळ जवळ तासभर गेला. जेवणाची वेळ झाली होती. त्यामुळे डब्बे काढायला सांगितले.नंतर मुलांनी जेवण करून घेतले.

आत शेवटचा भाग म्हणजे प्रत्यक्ष मुलांनी काही मातीच्या वस्तू तयार करणे.मग बाहेर सर्वांना रांगेत बसवले. प्रत्येकाला एक लाकडी पाट दिला. त्यावर मातीचे गोळे दिले.मग माणूस आणि गणपती करण्याचे प्रात्यक्षिक परत दाखवले.मुलांनी आपापल्या परिने करण्याचा प्रयत्न केला. कुळकर्णी यांनी सर्वांच्या तयार केलेल्या वस्तू बघितल्या.नंतर सर्व मुले एकत्र बसली.कार्यक्रमाबद्दल प्रतिक्रया व्यक्त केल्या . मुलांनी आकार ग्रुप मधील सर्वांचे आभार मानले.

सुरवातीला ज्यावेळी कुळकर्णी यांना भेटलो होतो त्यावेळी त्यांनी प्रत्येक मुला मागे १५० रुपये वर्कशॉप साठी आकरेन असे सांगितले होते आणि मी त्याला नकार देत फक्त गॅलरी भेट देण्यासाठी येईन मग सांगितले होते.पण ज्यावेळी आम्ही आलो त्यावेळी तिथे त्यांनी मुलांना भरभरून दिले. अगदी त्यांचा वेळ, कच्चा माल सुध्दा खर्च केला. अगदी मुलांना चहा नाष्टा सुध्दा दिला.यात त्यांनी एकाही पैशाची मागणी केली नाही.मी त्यांना आमचे बजेट आणि उद्देश स्पष्ट केले होते. श्रीकांत रोडे, पांडे फॅमिली, माझे सर्व कुटुंबीय, रत्नाकर ठाकूर हे सर्वजण मुलांना त्यांच्या पालकांइतकेच जवळचे वाटायचे त्यामुळे शिबिराला एक वेगळी रंगत यायची .पण मुलांची उत्सुकता, कार्यकर्त्यांची कोणताही फायदा तोटा यांचा विचार न करता असलेली शिबिरातील तत्परता या सर्व गोष्टी पाहून आकार ग्रुपने मुलांसाठी छान योगदान दिले आणि तेही अतिशय मोलाचे होते.

आकारचा निरोप घेतला आणि इंदापूर बस स्टॉपवर आलो. इंदापूर तळा गाडी लागली होती.मुठवली हे गाव इंदापूर तळा रस्त्यावर आहे.या गावात तनुच्या आत्याचा बंगला होता. तनुची आत्येबहीन सायली दळवी ही आमच्या सोबत होती. त्यामुळे वेगळ्या गाईडची गरज नव्हती. मुलांचे पाय पाळण्यात दिसतात तसे या सायलीचे होते. त्यावेळीच या मुलीचा कॉन्फिडन्स एवढा जबरदस्त होता की ही पुढील आयुष्यात नक्कीच वेगळी होणार हे स्पष्ट होते. कॅम्पचे बरेचशे नियोजन तिनेच केले होते. त्यावेळी ती बहुतेक सातवी आठवीत असावी.

तळा बस मधून आम्ही मुठवली गावात पोहचलो. गावात जवळच घर होते. तिथे एक सुंदर मंदिर दिसले. घराच्या बाहेर मोठी गॅलरी असल्याने बाहेर सर्वांना बसता आले. सर्व बॅगा व्यवस्थित ठेवल्या. सकाळपासून बरेच तास उपक्रमात गेले. थोडे रिलॅक्स होण्यासाठी मुलांना गाणी म्हणायला सांगितली.जीवन, ओंकार काळवीट, यश ताडकर, सौमित्र जोशी यांनी गाणी गायली.सौमित्रने नेहमीप्रमाणे त्याचे आवडते गाणे 'उट्ठा उट्ठा चिऊताई', यशने 'नन्हा मुन्हा राही हू', ओंकारने 'हम होंगे कामयाब”, गाणी गायली. सर्व मुलांनी त्यांना साथ दिली. नंतर मुलांना ग्रीटिंग कार्ड्स तयार करायला दिली. विक्रांत, कल्पना मुलांना मार्गदर्शन करत होते. नंदा, मेघा पांडे यांनी मुलांकडून ग्रीटिंग कार्ड्स बनवून घेतली. तोपर्यंत चार वाजत आले होते.मग सायलीने सांगितले आपण एका धरणावर जाऊया. मग एका टेकडीवर असलेल्या तलावाकडे निघालो. अर्ध्या तासात आम्ही वर पोहचलो. वाटेत एक ब्रीज लागला होता. टेकडीवर जाताना बरेच फार्म हाऊस दिसले. मुंबई पुण्यातील लोक या डोंगराळ भागात पोहचले सुध्दा आणि सर्व टेकड्या बहुतेक गिळल्या असाव्यात. धरणावर गेल्यावर पाहिले तर मातीचे बांधकाम दिसत होते. पाणी तसे कमीच होते. पावसाळ्यात मात्र बरेच असावे. धरणावरील भिंतीवर सर्वजण एकत्र बसलो. तिथे काही ग्रुप फोटो काढले. अभिजित जोशी नुकताच आम्हाला जॉईन झाला होता. पांडे सोबत असल्यामुळे मुलांची पाण्यात मस्ती चालली होती.या शिबिरात प्रथमच बराच छोटा ग्रुप होता. आरोही यांचा एक गट त्यातल्या त्यात मोठा होता . विक्रांत मुलांना त्याच्यापरीने मार्गदर्शन करत होता. कल्पना भारंबे सुध्दा मुलांना मदत करत होती. सायली दळवी शिबिराची मुख्य सूत्रधार असल्याने गावात काय बघायचे हे तिच्या मार्गदर्शनाखाली चालले होते. धरणाच्या भिंतीवर अर्धा तास रेंगाळत बसलो.मग परत जाण्यास निघालो. वाटेत एका फार्महाऊसवर लहान मुलांचे झोके आणि घसरगुंडी होती. तिथे मुले जरा वेळ खेळत बसली. नंतर गावात परतलो.सहा वाजून गेले होते.मग रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू केली. सर्वांनी मिळून जेवण तयार केले.सात वाजता पांडे मुलांना घेऊन देवळात गेले. तिथे त्यांनी आरती केली.मग आठ वाजेपर्यंत परत आले. जेवणाची वेळ झाली होती. व्हरांड्यात बरीच जागा होती. तिथे सर्वजण बसलो. जेवण झाल्यावर मुलांना प्रत्येकाला काही अॅक्टीविटी करण्यास सांगितल्या. मुलांनी उस्फूर्तपणे यात भाग घेतला. कार्यक्रम अकरा वाजेपर्यंत रंगला. मग मुलांना झोपायला सांगितले.

सकाळीं मुलांना सहा वाजता उठवले. आवराआवर करायला सांगितली. नाष्टा तयारी सुरू केली. नाष्टा तयारी चालू होती. मुलांना कालच्या कार्यक्रमाची डायरी लिहायला सांगितली. नाष्टा केल्यानंतर मुलांना ड्रॉइंग पेपर वाटले. त्यांना काही विषय देउन ड्रॉइंग काढायला लावले.सम्हिहन त्या ग्रुप मध्ये दिसत नव्हता. बाहेर पाहिले तर हा नळावर त्याचे कपडे धुवत बसला होता. त्याच्या सोबत ओंकार घागरे उभा होता. त्याला विचारले असता त्याने सांगितले आईने बजावले आहे शिबिरातील कपडे तिकडेच धुऊन आणायचे.ते सांगताना अगदी त्याच्या टिपिकल स्टाईलने सांगितले.हा पोरगा म्हणजे अगदी जगावेगळा.


सायलीने सुचवले इथे समोरच पाच किलोमीटर अंतरावर एक टेकडी आहे तिथे शंकर मंदिर आहे तिथे आपण जाऊया. तिनेच एक टेम्पो अरेंज केला. मंदिर टेकडीवर असल्याने रस्त्यापासून थोडे चालायचे होते. काहीजण टेम्पोत बसले. पांडे , विक्रांत मुलांसोबत टेम्पोत बसले.मी , अभिजित, ठाकूर कार मधून आलो. मंदिराच्या स्टॉपवर आल्यावर सायलीने टेम्पो ड्रायव्हरला परत येण्यासाठी फोन करेन असे सांगितले.तिथून मग चालत निघालो. मुलांची डिमांड होती, “फोटो काढा, फोटो काढा,”. त्यांचे तिथे फोटो काढले. नेहमीप्रमाणे सम्हीहन सर्वांच्या पुढे पळत होता. पांडे मागून त्याला ओरडून सूचना करत होते. बाकी सर्वजण रमत गमत चालली होती. थोड्या वेळाने त्या टेकडीवर पोहचलो. छान परिसर होता. लोकेशन एकदम जबरदस्त होते. पांडेनी सोबत भेळ साहित्य आणले होते.मग भेळ करायला घेतली. कालच्या उपक्रमात काय नवीन शिकायला मिळाले याबद्दल चर्चा केली. तिथे तासभर काढल्यानंतर आम्ही टेकडीच्या पायथ्याशी आलो. सायलिने टेम्पो ड्रायव्हरला परत येण्यासाठी फोन केला होता. तिथून परत गावात आलो.मुले नंतर थोडा वेळ ड्रॉइंग काढायला बसली.काही जण डायरी लिहायला बसले. जेवणाची तयारी चालली होती. दुपारी जाताना कोलाड धरण आणि तिथला हाइड्रोपॉवर जनरेटर बघायचा होता.दुपारी जेवण उरकल्यानंतर आम्ही इंदापूरला जाण्यास निघालो. जाण्यापूर्वी मुलांना सर्व साहित्य चेक करून बॅगा व्यवस्थित भरायला सांगितल्या. सर्वजण गावातील बस स्टॉप वर येऊन थांबलो. तिथून तळा इंदापूर गाडी मिळाली. इंदापूर स्टँडवर गेलो. तिथून कोलाडला जायचे होते. मुंबई कडे जाणारी गाडी इंदापूर येथे थांबते. कोलाडला बसने वीस पंचवीस मिनिटात पोहचलो. तिथे आल्यावर विक्रम रिक्षा चालकांना विचारले,” कोलाड धरण बघुन टाऊनशिप नागोठणे येथे जायचे आहे तुम्ही येऊ शकाल काय? तीन रिक्षा लागणार होत्या. त्यांनी अगदी व्यवस्थित भाडे सांगितले. त्यामुळे आम्ही तयार झालो. बाकी सर्व कार्यकर्त्ये अभिजित सोबत कारने निघून गेले. कोलाड धरण तिथून पाचसहा किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे पंधरा वीस मिनिटे जायला लागली. धरणाच्या जवळ छोट्या कालव्या जवळ सर्व रिक्षा थांबवल्या. तिथून चालत शासकीय विश्रामगृह समोरील दरवाजापाशी पोहचलो. तिथे समोरच धरणाच्या माहितीचा बोर्ड लावला होता. मुलांना त्याची माहिती डायरीत लिहून घ्यायला सांगितली. धरणाच्या भिंतीवर फेरफटका मारत परिसर पाहून घेतला. पलीकडे घेरा सुरगड दिसत होता. मागील शिबिरात गडावरून धरण पाहिले होते आणि आताच्या शिबिरात धरणावरून गड पहात होतो. विद्युत निर्मिती केंद्राला जाणाऱ्या पाण्याचा व्हॉल्व वर दिसत होता. जनरेटर मद्ये पाणी सोडताना या व्हॉल्वला हाताने उघडतात. त्यानंतर आम्ही खाली विद्युत केंद्राकडे गेलो. तिथल्या वॉचमेनने अडवले.मग त्यांना सांगितले आम्ही कॉलनी मधून आलो आहोत.मग आतमध्ये प्रोजेक्ट इंजिनिअर बसले होते त्यांना भेटलो.मग त्यांनी मुलांना आत यायला परवानगी दिली. आतमध्ये जमिनीखाली हा प्रकल्प आहे. यात समांतर मांडणीचा टरबाइन आहे. जुन्या प्रकल्पात उभ्या मांडणीचा टरबाईन असायचा.त्या अधिकाऱ्याने सर्व माहिती दिली. अत्याधुनिक सोई सुविधा असलेला हा प्रकल्प आहे. पूर्णपणे कॉम्प्युटरवर चालणारी यंत्रणा आहे. मुलांनी बरेच प्रश्न विचारले. विक्रांत, कल्पना, सायली, आश्र्विनी बऱ्यापैकी मोठा गट होता त्यांना याचा चांगला उपयोग झाला. पाणी धरणातून जनित्रात आल्यावर तिथे एक गियर प्रणाली आहे त्यानुसार पाण्याचा दाब जनित्र फिरवतो पण इथे गियर द्वारे त्याचा वेग ७०० पट वाढवला जातो.यातून २ मेगा वॉट विद्युत निर्मिती होते. तिथे दोन जनित्र आहेत. याचे नियंत्रण कॉम्प्युटर वर केले जाते. याचा सर्व डेटा कोलाडमधील ऑफिस मध्ये बसून पाहण्याची सोय केलेली आहे. निर्मिती नंतर वीज कशी पाठवली जाते याबद्दल माहिती घेतली.मग आम्ही त्या तळघरातून वर आलो.


बाहेर एका झाडाखाली बसलो. मुलांना बॅगेत असलेले सर्व खाण्याचे उरलेलं साहित्य काढायला सांगितले. सर्व खाऊ एकत्र करून मग सर्वांनी मिळून खाल्ला.घरी जाताना काही शिल्लक ठेवायचे नाही त्यामुळे नेहमी शिबीर संपताना हे करावे लागते.

सर्वांना आपल्या बॅग घेऊन रिक्षात बसायला सांगितले. तासाभरात कॉलनीत पोहचलो.

19 views0 comments

Recent Posts

See All
bottom of page